रोगवाहक : सूक्ष्मजंतू, आदिजीव (एकपेशीय जीव), परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणारे जीव), कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती), व्हायरस वगैरे रोगकारक सूक्ष्मजीवांना आश्रय देणारे व त्यांचे एका आश्रयी जीवाकडून दुसऱ्याकडे संक्रमण (प्रसार) करणाऱ्यांना रोगवाहक म्हणतात. 

इतिहास : नाना तऱ्हेच्या रोगांच्या प्रसारास रोगवाहक कारणीभूत ठरतात. मानवांमध्ये कीटक रोगप्रसार घडवून आणतात यासंबंधीची माहिती सर्वप्रथम स्कॉटिश वैद्य ⇨सर पॅट्रिक मॅन्सन यांनी १८७८ मध्ये जमा केली. हत्ती रोगाच्या प्रसारात डास रोगवाहकाचे काम करतात हे त्यांनी दाखवून दिले. त्यानंतर सु. वीस वर्षांनी जी. बी. ग्रास्सी यांनी इटलीमध्ये तर ⇨सर रॉनल्ड रॉस यांनी भारतामध्ये डासांमार्फत होणाऱ्या हिवतापाच्या फैलावाचे वर्णन केले. वनस्पतींमध्येही रोगवाहकांमार्फत रोगप्रसार होतो, हे १८९२ साली लक्षात आले. सफरचंद व तत्सम वृक्षांवरील आग्या करपा रोगाचा प्रसार मधमाश्यांमार्फत होतो हे ह्या वेळी कळून आले. 

रोगवाहक मानवी व्यक्तीविषयीचा पहिला पुरावा रॉबर्ट कॉख यांच्याबरोबर काम करीत असताना डब्ल्यू. पी. डनबार यांनी दिला. दुखण्यातून नुकत्याच उठलेल्या रोग्यांच्याच नव्हे, तर पटकीने आजारी नसलेल्या व्यक्तीच्या विष्ठेतही पटकीचे जंतू असतात, असे डनबार यांनी दाखवून दिले. पुढे घटसर्प रोगवाहकांच्या अभ्यासातून रोगवाहक अवस्थेविषयी अधिक माहिती जमा झाली. तसेच विविध सूक्ष्मजीवांचे रोगवाहकांमधील अस्तित्व सामान्यपणे अन्नमार्गात वा श्वासमार्गात, तर हिवताप व यकृतशोथ-ब [⟶ यकृतशोथ] यांचे सूक्ष्मजीव रोगवाहकाच्या रक्तात आढळतात, हे माहीत झाले.

प्रकार : रोगवाहकांमध्ये सजीवांचा व निर्जीवांचा समावेश होतो. इंग्रजीत व्हेक्टर, कॅरिअर व फोमाइट या नावांनी ते ओळखले जातात. व्हेक्टर व कॅरिअर हे सजीव आहेत, तर फोमाइट निर्जीव आहेत. सामान्यतः रोगवहन करणाऱ्या कीटकांना किंवा प्राण्यांना व्हेक्टर्स, तर मानवांना कॅरिअर म्हणून संबोधिले जाते. रोगवाहकांमार्फत रोगप्रसार यांत्रिक किंवा जैव पद्धतीने होतो. सजीव रोगवाहक यांत्रिक वा जैव पद्धतीने रोगप्रसार करतात तर निर्जीव फक्त यांत्रिक पद्धतीनेच रोगप्रसार करतात.

 

व्हेक्टर : यांत्रिक रोगप्रसार : सर्वांत सोप्या रीतीने घडवून आणलेला रोगप्रसार असे यांत्रिक रोगप्रसाराचे वर्णन करता येईल. या प्रकारामध्ये रोगवाहकांमध्ये रोगजंतूंची (रोगकारक सूक्ष्मजीवांची) वाढ होत नाही किंवा रोगजंतूंच्या वाढीसाठी रोगवाहकाचे कोणत्याही तऱ्हेचे सहकार्य असत नाही. रोगवाहक फक्त रोगजंतूंचे संक्रमण घडवून आणतो. मिक्झोमायसेटिसमुळे होणाऱ्या रोगाचा सशांमध्ये होणारा प्रसार हे व्हेक्टरमार्फत होणाऱ्या यांत्रिक रोगप्रसाराचे प्रातिनिधिक उदाहरण मानता येईल, डास, गोचीड व इतर चावा घेणारे कीटक रोगांनी पछाडलेल्या सशांना चावा घेतात तेव्हा त्यांची सोंड (मुखांगे) रोगकारक व्हायरसांनी लडबडून जाते. तेव्हा हे कीटक निरोगी सशांना चावतात तेव्हा त्यांच्या सोंडेवरचे व्हायरस या सशांच्या शरीरात टोचले जाऊन त्यांच्यामध्ये रोगोद्‌भव होतो. रोगकारक व्हायरस वाळलेल्या स्थितीत महिनोमहिने कीटकांच्या सोंडेवर जिवंत रहात असल्याने एवढ्या मोठ्या कालावधीपर्यंत हे कीटक सशांमध्ये रोगप्रसार घडवून आणू शकतात. आंत्रज्वर (टायफॉइड ज्वर), पटकी (कॉलरा), हगवण किंवा अमिबाजन्य विकार यांचा माश्यांमार्फत मानवांमध्ये होणारा रोगप्रसारही यांत्रिक रोगप्रसार ठरतो. या रोगांनी पछाडलेल्या रोग्यांच्या विष्ठेमध्ये रोगजंतूंचे अस्तित्व असते. माश्या अशा विष्ठेवर बसल्यास त्यांच्या शरीराला हे रोगजंतू चिकटतात. रोगजंतूंनी लडबडलेल्या या माश्या अन्नपदार्थांवर बसल्यास रोगजंतूंचा अन्नात प्रवेश होतो. या अन्नाच्या सेवनाने माणसांमध्ये रोगाची लागण होते. 


जैव रोगप्रसार : या प्रकारच्या रोगप्रसारात रोगवाहकांमध्ये रोगजंतूंची वाढ होते किंवा रोगजंतूंचे जीवनचक्र पुरे होते. जंतूंच्या वाढीसाठी किंवा जीवनचक्रपूर्ततेसाठी काही काळ जावा लागतो. म्हणून जास्त आयुष्य लाभलेले कीटक जैव रोगवहनाचे काम अधिक यशस्वी रीतीने करू शकतात. उवेमार्फत पसरणारा प्रलापक सन्निपात ज्वर (टायफस ज्वर) हे जैव रोगप्रसाराचे उत्तम उदाहरण आहे. या रोगाने पछाडलेल्याला उवेने चावा घेतला की, रोगकारक रिकेट्‌सिया उवेच्या उदरात प्रवेश करतात. तेथे त्यांची वाढ होते व उवेच्या विष्ठेमध्ये ते समाविष्ट होतात. ही विष्ठा कातडीवाटे किंवा श्वासाबरोबर निरोगी माणसाच्या शरीरात शिरली की, त्याला प्रलापक रोगाची लागण होते. पिसवांमार्फत होणारा प्लेगाचा प्रसार हे जैव रोगप्रसाराचे आणखी एक उदाहरण आहे. प्लेगाने पछाडलेल्या उंदराला पिसू चावली की, प्लेगाचे जंतू पिसवेच्या अन्ननलिकेत शिरकाव करतात. तेथे त्यांची वाढ झाल्याने अन्ननलिका काहीशी चोंदली जाते. ही पिसू निरोगी माणसाला किंवा उंदराला चावली की, प्रथम अन्ननलिका मोकळी करण्यासाठी प्लेगजंतू ओकते, नंतर रक्त शोषून घेते. अशा रीतीने प्लेगजंतूंचा निरोगी माणसाच्या किंवा उंदराच्या शरीरात प्रवेश होऊन ती रोगाला बळी पडतात.

चावा घेऊन रक्त शोषण्यापूर्वी चावा घेतलेल्या प्राण्याच्या शरीरात लाळ सोडण्याची कीटकांची प्रथा आहे. त्यामुळे शोषलेले रक्त लवकर गोठत नाही. म्हणून कीटकांच्या लाळेतच रोगजंतू असतील, तर रोगप्रसार चटकन होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पीतज्वर व डेंग्यूज्वर या रोगांचा प्रसार. या रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या व्हायरसांची डासांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते व ते डासाच्या लाला ग्रंथीत जमा होतात. अशा डासांनी चावा घेतल्यानंतर लाळेतील व्हायरस चावा घेतलेल्या माणसात सहजी प्रवेश करतात.

ॲनॉफेलीस डासांमार्फत होणारा हिवतापाचा प्रसार हा एक वैशिष्ट्यपूर्ण जैव रोगप्रसार आहे. हिवताप रोगजंतूंचे जीवनचक्र लैंगिक व अलैंगिक भागात विभागलेले आहे. त्यापैकी या रोगजंतूंची लैंगिक वाढ डासाच्या शरीरात तर अलैंगिक वाढ माणसाच्या रक्तातील तांबड्या कोशिकेत (पेशीत) होते म्हणजेच डांसाशिवाय हिवताप रोगजंतूंचे जीवनचक्र पुरे होणे अशक्य ठरते. शरीरात हिवताप जंतू असलेला डास माणसाला चावला की, माणसाच्या रक्तातील तांबड्या कोशिकांत हिवताप जंतूंची वाढ होऊन तो माणूस हिवतापाने ग्रस्त होतो. अशा रोग्याला डास चावला की, रक्तावाटे रोगजंतू डासाच्या शरीरात शिरतात तेथे त्यांचे लैंगिक जीवनचक्र पुरे होऊन त्यांच्या संख्येत वाढ होते आणि डास रोगप्रसारक्षम होतो. [⟶ हिवताप].

काही कीटकांमध्ये रोगजंतूंनी प्रवेश केल्यावर त्यांची कीटकांच्या शरीरात वाढ होऊन ते कीटकांच्या शरीरभर पसरतात, इतकेच नव्हे, तर त्यांच्या अंडाशयातही प्रवेश करतात. यामुळे नवीन प्रजाही रोगप्रसारक्षम बनते. वालुमक्षिका ज्वर या रोगाचा माशीमार्फत होणारा प्रसार या प्रकारच्या रोगप्रसाराचे उदाहरण आहे. संधिपाद (सांधेयुक्त पाय असलेले) व स्तनी प्राणी ह्यांची मुख्यतः रोगवाहकांमध्ये गणना होते. सामान्यतः ते उष्ण कटिबंधात आढळतात व मानवाच्या ऊतकांवर (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांवर) हल्ला करतात. अशा रोगवाहकांची उदाहरणे म्हणजे डास, माशी, गोचीड, ऊ, पिसू, कुत्रा, मांजर, घटवाघूळ, लांडगा वगैरे. या वाहकांशी निगडित असलेले काही रोग पुढीलप्रमाणे : डास-हिवताप, पीतज्वर, डेंग्यू ज्वर, विविध प्रकारचे मस्तिष्कशोथ (मेंदूची दाहयुक्त सूज) माशी-त्से त्से माशी-निद्रारोग वालुमक्षिका-वालुमक्षिका ज्वर, काळा आजार गोचीड-कॅसेनूर जंगल रोग, ट्युलॅरिमिया, रशियन उन्हाळी मस्तिष्कशोथ ऊ-प्रलापक सन्निपात ज्वर, खंदक ज्वर, पुनरावर्ती ज्वर पिसू-प्लेग कुत्रा, मांजर, वटवाघूळ, लांडगा-अलर्क रोग (पिसाळ रोग). यांशिवाय लाल माइट, तांबडे ढेकूण, गोगलगाई यांचाही रोगवाहकांत समावेश होतो.


संधिपाद प्राण्यांमार्फत फैलावणाऱ्या रोगांची वारंवारता व वाटणी यांच्यावर या रोगवाहकांच्या सवयींचा मोठा प्रभाव पडतो. उदा., कीटकनाशकांची फवारणी करून रोगवाहक डासांचे नियंत्रण करण्यात अपयश आल्यास हिवतापाची साथ परत उद्‌भवू शकते. गोचिडींची संख्या वाढली म्हणजे बॅबेसियासिस रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगवाहकाच्या सवयीनुसार संसर्गाची जागाही बदलू शकते. उदा., मध्य अमेरिकेत ऑन्कोसेर-किआसिस रोगाच्या गाठी लोकांच्या डोक्याच्या कातडीवर, तर आफ्रिकेत त्या मांड्यांवर येतात. याला कारण अमेरिकेमधील या रोगाच्या वाहकांना डोक्यावर चावा घेणे आवडते, तर आफ्रिकेमधील रोगवाहक मांडीवर चावा घेणे पसंत करतात.

 

कॅरिअर : मनुष्य काही विशिष्ट परिस्थितीत रोगप्रसारास जबाबदार ठरतो. एखादी व्यक्ती रोगानी पछाडली की, त्या रोगाची वाहक बनते. रोगाच्या प्राथमिक अवस्थेत रोगलक्षणे प्रकट न झाल्याने ती व्यक्ती रोगी आहे हे ध्यानात येत नाही मात्र या कालातही तिच्याकडून रोगप्रसार होतो. अशा व्यक्तीला परिपाक कालीन (अन्तःपोषक) किंवा अकालपक्व रोगवाहक म्हणतात. काही व्यक्तींच्या शरीरात रोगजंतू शिल्यानंतरही प्रत्यक्ष रोगाची लागण होत नाही, मात्र तिच्यावाटे रोगप्रसार होतो. अशा व्यक्तीला निष्क्रिय रोगवाहक म्हणतात. रोग बरा झाल्यानंतरही रोग्याच्या शरीरात रोगजंतूंचे काही काळ अस्तित्व असते आणि या कालावधीत तो रोगप्रसार करतो. हा कालावधी लहान म्हणजे काही दिवसांचा वा आठवड्यांचा असू शकतो किंवा दीर्घ म्हणजे वर्षानुवर्षे असू शकतो. अल्पकाळापुरता रोगप्रसार करणाऱ्याला तात्कालिक रोगवाहक तर दीर्घकाल रोगप्रसार करणाऱ्याला चिरकारी रोगवाहक म्हणतात. चिरकारी रोगवाहकाचे जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे टायफॉइड मेरी. स्वयंपाकिणीचे काम करणाऱ्या या स्त्रीला आंत्रज्वर झाला होता व रोगजंतूंनी तिच्या शरीरात कायमचे ठाण मांडले होते. विविध संस्थांतून व घरांतून निरनिराळ्या नावांनी या स्त्रीने काम केले आणि ३० वर्षांच्या कालावधीत वरील सर्व ठिकाणी आंत्रज्वराची लागण झाली. ती रोगवाहक आहे हे ध्यानात आल्यानंतर तिला मृत्यूपर्यंत पुढील २३ वर्ष अलग ठेवण्यात आले. विशिष्ट रोग कधीही झाला नसतानाही प्रसंगोपात त्या रोगाचे जंतू शरीरात असल्याने रोगप्रसार करणाऱ्याला निरोगी रोगवाहक म्हणतात. रोग झाला असतानाही उत्सर्गात रोगजंतू नसल्याने रोग न फैलावणाऱ्याला बंदिस्त रोगवाहक, तर वेळोवेळी उत्सर्जन करून त्या त्या काळापुरता रोगप्रसार करणाऱ्याला सविराम रोगवाहक म्हणतात. रोगजंतूंचे उत्सर्जन विविध मार्गांतून होते. त्यानुसारही रोगवाहक संबोधिला जातो. मलोत्सर्गातून रोगजंतू बाहेर टाकणाऱ्याला आंत्रीय, तर मूत्रावाटे रोगजंतू बाहेर टाकणाराला मूत्रोत्सर्गीं म्हणतात.

मानवी रोगवाहकाची रोगप्रसार करण्याची क्षमता एकसारखी नसते. त्याच्या शरीरात रोगजंतूंचे अस्तित्व कोठे आहे तसेच त्याची राहाणी आणि स्वच्छतेविषयीच्या त्याच्या कल्पना यांवर ती अवलंबून राहते. उदा., रक्तविलयी (रक्तातील तांबड्या कोशिकांतील हीमोग्लोबिन मुक्त करणारे) स्ट्रेप्टोकॉकस किंवा स्टॅफिलोकॉकस यांचे अस्तित्व रोग्याच्या नाकात किंवा घशात असते. नाकात रोगजंतू असणारा घशात रोगजंतू असणाऱ्यापेक्षा अधिक प्रमाणात रोगप्रसार करतो. शिंकताना किंवा खोकताना नाकातोंडापुढे रुमाल न धरणारे रोगी मोठ्या प्रमाणावर रोगप्रसार करतात. स्ट्रेप्टोकॉकसजन्य घशाच्या व्रणाची साथ शिंकण्याने, तर क्षयरोगाचा प्रसार रोग्याच्या खोकण्याने होतो. रोग्याच्या नाकात, घशात किंवा आतड्यात असणारे रोगजंतू त्याच्या हातावर मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात. खरजेसारखे त्वचारोगाचे जंतू तर सहज येतात. हात धुण्याची सवय नसलेले असे रोगी अधिक प्रमाणात रोगप्रसार घडवून आणतात. उदा., वाढपी, आचारी, रोग्यांची देखभाल करणारे यांच्यामार्फत आंत्रज्वरासारख्या आतड्याच्या रोगांचा व अन्नविषबाधेचा प्रसार होतो.

खाण्यापिण्याच्या रूढ सवयीही रोगकारक परजीवी रोगवाहकाच्या शरीरात साठून राहाण्यास सहाय्यभूत ठरतात. उदा., अर्धेकच्चे मांस खाणाऱ्यामध्ये डुक्कर, वॉलरस, अस्वल यांच्यात असणारे रोगकारक आदिजीव किंवा कृमी वास करतात आणि त्यांच्यावाटे या आदिजीवजन्य किंवा कृमिजन्य रोग्यांचा प्रसार होतो. अर्धेकच्चे डुकराचे मांस, गोमांस वा मासे खाणारे पट्टकृमीचा फैलाव करतात. कच्चे कवचधारी प्राणी खाणारे पॅरागोनिमिॲसिस या रोगाचा, तर गोड्या पाण्यातील कच्चे मासे खाणारे ॲनिसॅकिॲसिस या रोगाचा फैलाव करतात.


फोमाइट : निर्जीव रोगवाहक यांत्रिक पद्धतीनेच रोगप्रसार घडवून आणतात. छत्री, काठी वगैरे नित्योपयोगी वस्तू, हातोडा, करवतीसारखी हत्यारे किंवा उपकरणे, सुया, आंथरुण, पांघरुण, जेवणाखाण्याची भांडी, कपबश्या, काटे, चमचे, सुऱ्या, कपडे, बंधपट्टी, मलमपट्टी, अन्न, पाणी इत्यादींचा निर्जीव रोगवाहकांमध्ये समावेश होतो. रोग्यांनी त्या वस्तू हाताळल्यामुळे किंवा रोग्यांशी त्यांचा संपर्क आल्याने या वस्तूंवर रोगजंतू चिकटतात, आरोहण करतात आणि त्यांच्यामार्फत रोगजंतूंचा फैलाव होतो.

वनस्पती व रोगप्रसार : वनस्पतींतही रोगवाहकांमार्फत रोगप्रसार होतो. प्रामुख्याने तऱ्हेतऱ्हेचे कीटक वनस्पतींमध्ये रोगप्रसार घडवून आणतात.  संपर्कामुळेही वनस्पतीत रोगप्रसार घडून येतो. उदा., रोगट झाडाला एखादा माणूस वा जनावर घसटून नंतर दुसऱ्या निरोगी झाडाला त्याने घसटले, तर रोगग्रस्त झाडाकडून निरोगी झाडाकडे रोगजंतूंचे संक्रमण होण्याची शक्यता असते. एकाच जातीच्या झाडांची मुळे एकत्र वाढून रोगी व निरोगी झाडांमध्ये दुवा निर्माण झाल्याने रोगप्रसार होऊ शकतो.

वनस्पतींमध्ये कीटक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे रोगप्रसार घडवून आणतात. रोगट वनस्पतींच्या सान्निध्यात आल्याने कीटकांच्या शरीरावर किंवा शरीरात सूक्ष्मजंतू, कवक, व्हायरस यांसारखे रोगजंतू जातात. अशा कीटकांनी निरोगी वनस्पतींचा काही भाग खाल्ला, तर तेथे जखम होऊन कीटकातील रोगजंतू वनस्पतीमध्ये संक्रमित होतात आणि रोगाची लागण होते. उदा., सफरचंदावरील आग्या करपा व चेस्टनटावरील करपा रोग भुंगेरे व मधमाश्या यांच्यामार्फत पसरतात. वनस्पतीवरील सालीसारख्या संरक्षक कवचावर कीटकांकडून इजा पोचली, तर आतील भाग उघडे पडून रोगजंतूंच्या संक्रमणाला मदत होते. उदा., कीटक फळांना बारीक भोके पाडतात. या भोकांवाटे सूक्ष्मजीवांनी फळात प्रवेश केल्यास ते सडते. ह्या साऱ्या रोगप्रसारात कीटकांचा सहभाग अप्रत्यक्ष असल्याने त्यांना निष्क्रिय रोगवाहक म्हटले जाते. काही कीटक मात्र वनस्पतींतील रोगप्रसारात प्रत्यक्षपणे भाग घेतात म्हणजेच रोगजंतूंना जीवंत राहाण्यास कीटकांचे सहाय्य होते. उदा., काकडीवर पडणारा मर रोग. ह्या रोगाचे जंतू हिवाळ्यातील प्रतिकूल काळात भुंगेऱ्याच्या पचनमार्गाचा आश्रय घेऊन तेथे जिवंत राहतात. एरवी हिवाळ्यात ते नष्ट होतात. पुढे भुंगेऱ्यांच्या विष्ठेवाटे या रोगजंतूंचा काकडीमध्ये प्रसार होतो.

वनस्पतीतील रस शोषून घेणारे कीटक हे वनस्पतींचे महत्त्वाचे रोगवाहक ठरतात. रस शोषून घेतल्याने त्यांच्या लाळेवाटे रोगजंतू वनस्पतीत संक्रमित होतात. कीटकांमार्फत अशा रीतीने होणाऱ्या रोग प्रसाराचे दीर्घस्थायी व अल्पस्थायी असे दोन प्रकार आहेत. दीर्घस्थायी प्रकारात रोगजंतूंचे कीटकांमधील वास्तव्य दीर्घकाळ असते. अशा कीटकांपासून दीर्घकाळापर्यंत रोगप्रसार होत राहतो. रोगजंतूंचे कीटकांमधील वास्तव्य अल्पकाळ असेल, तर थोड्या दिवसांपुरताच अशा कीटकांकडून रोगप्रसार होतो म्हणून रोगप्रसार अल्पस्थायी ठरतो. मावा, पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे अशा पद्धतीने वनस्पतींत रोगप्रसार घडवून आणतात. संत्र्यावरील सल, उसावरची गवताळ वाढ, वांग्यावरील गुच्छ (रोझेट), वेलदोड्याचा व्हायरस रोग, पपईवरील केवडा, केळीवरील पर्णगुच्छ या साऱ्या व्हायरसजन्य रोगांचा प्रसार माव्याच्या विविध जाती करतात. तंबाखू वा कपाशीची पाने वाळणे तसेच टोमॅटो व भेंडीवरील केवडा रोगाचा प्रसार पांढरी माशी करते. मिरचीवरील बोकड्या (मुरडा) रोगाचा फैलाव फुलकिडे व तुडतुडे करतात. ह्या साऱ्या रोगांचा प्रादुर्भाव भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.

साध्या उपद्रवी कीटकांपेक्षा रोगवाहक कीटकांकडून वनस्पतींना अधिक हानी पोहोचते कारण त्यांच्या खाण्याने वनस्पतीचे नुकसान तर होतेच शिवाय रोगप्रसार झाल्याने सारी वनस्पतीच नष्ट होण्याची शक्यता असते. एवढेच नव्हे, तर पुढील पिकांनाही त्या रोगाचा उद्‌भव संभवतो.


नियंत्रण : रोगप्रसार टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे रोगवाहकांचे नियंत्रण करणे. कीटक व प्राणी यांच्यामार्फत होणारा रोगप्रसार रोखण्यासाठी विविध पीडकनाशकांचा वापर करून रोगवाहकांचा नाश करण्याचा अवलंब करण्यात आला. डीडीटी व डायएंड्रीन या पीडकनाशकांचा या कामी सर्वाधिक उपयोग करण्यात आला. कीटकानाशकांची फवारणी व दलदलीच्या जागांतील पाण्याचा निचरा या उपायांनी हिवतापाच्या वाहक डांसाच्या संख्येवर नियंत्रण ठेवून उष्ण कटिबंधीय प्रदेशातील हिवतापाचे नियंत्रण करण्यात यश येऊन लाखो लोकांचे प्राण वाचविण्यात आले. क्यूबा, इटली, पनामा कालव्यालगतचा प्रदेश इ. भागांतून तर हिवतापाचे निर्मूलन झाले. प्लेग, मस्तिष्कावरणशोथ वगैरेंच्या रोगवाहकांच्या नियंत्रणासाठी मर्यादित प्रमाणात पीडकनाशके उपयुक्त ठरली. मध्यपूर्व आफ्रिका व उष्ण कटिबंधी आशियामधील खंडितकायी कृमी रोगाच्या वाहकांच्या नियंत्रणासाठीही पीडकनाशकावर भर देण्यात आला. त्यांच्याद्वारे रोगकारक कृमींना आश्रय देणाऱ्या गोगलगायींचे नियंत्रण करण्याचे प्रयत्न करण्यात आले. रोगप्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या प्राण्यांचे नियंत्रण करूनही रोगप्रसार टाळण्यात यश आले. उदा., अलर्क रोगाचा वाहक कुत्रा असून त्यालाच रोगाविरुद्धची लस टोचून किंवा त्याला विलग्नवासात ठेवून अलर्क रोगाला नुसता आळाच नाही, तर त्याचे संपूर्ण निर्मूलन करण्यात काही देशांना यश आले. उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून प्लेग रोगप्रसार टाळण्यातही अनेक ठिकाणी यश आले.

मानवामार्फत होणारा रोगप्रसार रोखणे मात्र कठीण ठरते. कीटक किंवा प्राणी रोगवाहकांप्रमाणे त्यांच्यावर पीडकनाशकांची फवारणी करता येत नाही. त्यांना बांधून एका जागी ठेवता येत नाही किंवा त्यांच्या तोंडाला मुसकीही बांधता येत नाहीत. रोगवाहक व्यक्ती शोधून काढणेही दुरापास्त ठरते कारण अनेक वेळेला रोगवाहकांमध्ये रोगाची लक्षणेच दिसत नाहीत. रोगवाहक आढळून आला, तरी त्याला इतरांपासून अलग करणे कठीण जाते. मात्र अशा व्यक्तीची रोगवाहक अवस्था नाहीशी करता येते. सुरुवातीच्या काळात रोगवाहकाला विलग्नवासात अलग ठेवणे हा एकमेव व्यावहारिक उपाय वापरात होता. त्यामुळे रोगप्रसाराला काही प्रमाणात प्रतिबंध होतो, तसेच देशात रोग प्रविष्ट होण्यासही प्रतिबंध होतो. प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थांच्या शोधानंतर मात्र रोगवाहकाच्या शरीरातील रोगजंतूंचा पूर्णतया नाश करणे शक्य झाले. इतर काही औषधी उपायही या कामी उपयुक्त ठरतात. लोहितांग ज्वर, गिलायुशोथ (टॉन्सिलांची दाहयुक्त सूज), न्यूमोनिया या रोगांच्या वाहकांवर पेनिसिलिनाचा उपचार करून रोगप्रसार नियंत्रत करणे शक्य असते. मस्तिष्कावरणशोथाच्या वाहकांवर सल्फाडायझिनाच्या व हिवताप वाहकांवर क्लोरोक्विनाच्या उपचाराने त्यांची रोगवाहक अवस्था नाहीशी होते. सार्वजनिक आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन, तसेच व्यक्तिगत स्वच्छतेचे कटाक्षाने पालन या उपायांनी मानवामार्फत होणाऱ्या अनेक रोगांच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणे व्यवहार्य ठरते.

वनस्पतींमध्ये होणारा रोगप्रसार प्रामुख्याने कीटकांमार्फत होत असल्याने त्यांच्या नियंत्रणास कीटकनाशके उपयोगी पडतात.

पहा : उष्णकटिबंधी रोग पीडकनाशके रोगप्रतिकारक्षमता रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यक वनस्पतिरोगविज्ञान संसर्गजन्य रोग साथ व साथीचे नियंत्रण सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य सूक्ष्मजीवविज्ञान.

संदर्भ : 1. Cruickshank, R. Medical Microbiology, London, 1965.

           2. Fuerest, R. Frobisher and Fuerest’s Microbiology in Health and Disease, London, 1983.

           3. Ghosh, B. N. A Treatise on Hygiene and Public Health, Calcutta, 1959.

           4. Pelcral, M. J. and others, Microbiology, Tokyo, 1986.

           5. Service, M. W. Blood Sucking Insects- Vectors of Diseases, London, 1986.

           6. Stanier, R. Y. and others, General Microbiology, London, 1985.

           7. Winslow, C. E. A. The Conquest of Epidemic Diseases, Princeton, 1943.

गोडबोले, श्री. ह. ठाकूर, अ. ना.