काळा बांगडा : या माशाला काटबांगडा, लाबी, ही नावेही आहेत. कॅरॅंजिडी मत्स्य कुलातील कॅरॅंक्स वंशाचा हा मासा असून सामान्य काळ्या बांगड्याचे शास्त्रीय नाव कॅरॅंक्स क्रुमेनॉप्थॅल्मस आहे. कॅरॅंक्स वंशाच्या बहुतेक जातींच्या माशांना हॉर्स मॅकरेल म्हणतात. तांबडा समुद्र, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, पश्चिम आफ्रिका व अमेरिकेच्या उष्णकटिबंधातील अटलांटिक किनारा इ. ठिकाणी हे मासे आढळतात. 

काळा बांगडा

शरीर लांबोडे, जवळजवळ दंडगोलाकार व दोन्ही बाजू दामटल्यासारखे असते. लांबी सु. ३० सेंमी. असते. डोक्याची लांबी एकूण लांबीच्या १/४ व शेपटीची १/५ असते. प्रच्छदावर (माशांच्या कल्ल्यांच्या फटींची बाह्य छिद्रे झाकणाऱ्या अस्थिमय किंवा पातळ पटलाच्या झाकणावर) बहुधा एक काळा ठिपका असतो. डोळे बरेच मोठे व पार्श्वीय (बाजूला) असतात. शरीर, छाती व गाल यांवर खवले असतात. पाठीकडचा रंग रुपेरी असून खालच्या बाजूकडे तो सोनेरी होत गेलेला असतो. पक्ष (हालचाल करण्यास वा तोल सांभाळण्यास उपयोगी पडणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घड्या, पर) सोनेरी असून त्यांवर अगदी बारीक ठिपके असतात. पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) आणि गुदपक्ष यांचे विषम विभाजन होऊन त्यांचा लहान भाग (पक्षिका) अलग झालेला असतो. पुच्छपक्ष (शेपटीचे पर) बराच आतपर्यंत विभागलेला असून त्याची टोके काळी असतात. हा मासा मांसाहारी आहे.

हा मासा खुल्या समुद्रात राहणारा असून सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत त्यांचे मोठाले थवे भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत येतात. तेथे हे मोठ्या प्रमाणावर पकडण्यात येतात. पकडल्यावर हे मासे खारवून व उन्हात वाळवून साठवितात. याच्या शरीरात खूप हाडे असतात व मांसही चवीला चांगले नसते.

भारतात या माशाच्या कित्येक जाती आढळतात. कॅरॅंक्स ॲट्रोपस, कॅरॅंक्स काला  व कॅरॅंक्स ॲफिनिस  या जाती कुलाबा जिल्ह्याच्या किनाऱ्यापाशी सापडतात आणि त्या सगळ्यांना तेथे काटबांगडा म्हणतात.

जमदाडे, ज. वि.