फैजाबाद – १  : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील फैजाबाद जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व इतिहासप्रसिद्ध शहर .  लोकसंख्या कॅंटोनमेंटसह १,०९,८०६  ( १९७१ ).  हे लखनौच्या पूर्वेस १२५ किमी .  घागरा नदीकाठी वसले आहे .  रस्ते व लोहमार्ग यांनी ते इतर शहरांशी जोडले आहे .  पूर्वी फैजाबाद जंगलव्याप्त होते .  या ठिकाणी सादतअली खा न या अयोध्येच्या पहिल्या नबाबाने शिकारीचे ठाणे केले .  त्यांच्यानंतरचा नबाब सफदरजंग ऊर्फ अबुल – मन्सूर खान याने फैजाबादची स्थापना केली आणि तेथे आपले लष्करी ठाणे उभारले .  यानंतरचा नबाब शुजाउद्दौला याचा इंग्रजांनी बक्सारच्या लढाईत  (१७६४) पराभव केल्याने तो फैजाबादला आला .  तेव्हापासून अयोध्येच्या नबाबाची राजधानी येथेच केली गेली .  शुजाउद्दौलाने येथे किल्ला बांधला .  त्याच्या कारकीर्दीत या शहराचे महत्त्व वाढले .  त्याच्या निधनानंतर मात्र असफउद्दौलाने येथून राजधानी हलवून ती लखनौस  ‌ नेली .  शुजाउद्दौलाची प त्‍नी  ( बहू बेगम )  मात्र येथेच राहत होती .  येथील बेगमांचा खजिना हस्तगत करण्यासाठी वॉरन हेस्टिंग्जने असफउद्दौलास सैनिकी मदत पुरविली .  वॉरन हेस्टिंग्जची ही कृती पुढे ब्रिटिश संसदेत भ्रष्टाचार प्रकरण म्हणून खूपच गाजली .  परिणामतः त्यावेळी फैजाबादला खूपच प्रसिद्धी मिळाली .   येथे साखरनिर्मिती ,  तेलगिरण्या ,  तंबाखूचे पदार्थ ,  कातडी वस्तुनिर्मिती इ .  उद्योगांचा विकास झाला आहे .  आसमंतातील शेतमालाची फैजाबाद ही एक मोठी बाजारपेठ आहे .  येथे अवध विद्यापीठ  ( १९७५ )  व नरेंद्र देव कृषी आणि तंत्रविद्या विद्यापीठ  ( स्था .  १९७४) इ .  उच्च शैक्षणिक संस्था आहेत .    येथील गुप्तचर उद्यानात एक मंदिर असून तेथूनच राम अदृश्य झाले असे म्हणतात .  येथे अनेक उत्सव साजरे केले जात असून त्यांत जन्माष्टमी व रामलीला हे प्रमुख आहेत .  येथील ब हू बेगमची कबर व शुजाउद्दौलाची गुलाब बारी ही कबर प्रेक्षणीय आहे .

 गाडे ,  ना .  स .