लब, झाक : (७ एप्रिल १८५९-११फेब्रुवारी १९२४) जर्मन-अमेरिकन जीववैज्ञानिक. कृत्रिम अनिपेकजननावरील (अंड्याच्या फलनक्रियेशिवाय होणाऱ्या प्रजोत्पादनावरील) प्रायोगिक कार्याबद्दल विशेष प्रसिद्ध.

लब यांचा जन्म जर्मनीतील माइअन येथे झाला. प्रथम बर्लिन व म्यूनिक विद्यापीठांत आणि पुढे स्ट्रस्बर्ग विद्यापीठात शिक्षण घेऊन १८८४ मध्ये त्यांनी एम्.डी. पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी वुर्टस्बर्ग विद्यापीठ (१८८६-८८), स्ट्रस्बर्ग विद्यापीठ (१८८८-९०) व नेपल्स जीववैज्ञानिक केंद्र (१८८९-९१), येथे जीववैज्ञानिक संशोधन केले. १८९१ मध्ये त्यांनी अमेरिकेला स्थलांतर केले आणि क्रमाक्रमाने ते ब्रिन मार कॉलेज (पेनसिल्व्हेनिया, १८९१-९२), शिकागो विद्यापीठ (१८९२-१९०२) व कॅलिफोर्निया विद्यापीठ (बर्कली, १९०२-१०) येथे प्राध्यापक झाले. त्यानंतर १९१० पासून मृत्यूपावेतो त्यांनी न्यूयॉर्क येथील रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेत काम केले. त्यानी आपले बरेचसे प्रायोगिक कार्य वुड्झ होल, मॅसॅचूसेट्स येथील मरीन बायॉलॉजिकल लॅबोरेटरीत केले.

अनिषेकजननासंबधी त्यांनी केलेल्या प्रयोगांकडे जनसामान्यांचे लक्ष वेधले होते व त्यासंबधी काहीसा वादही निर्माण झाला होता. १८९९ मध्ये त्यांनी समुद्री अर्चिनांच्या अनिषेचित अंड्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीत नियंत्रित बदल घडवून आणून त्यांपासून डिंभ (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या पूर्व अवस्था ) विकसित करण्यात यश मिळविले. पाण्यात विरघळलेल्या विविध पदार्थांच्या तर्षण दाबाने [⟶ तर्षण] समुद्री अर्चिनांची अंडी निषेचित होतात, असे त्यांनी दाखविले. या कार्याचा पुढे त्यांनी अनिषेकजनित बेडकांचे उत्पादन करण्यापर्यत विस्तार केला व हे बेडूक लैगिक पक्वता प्राप्त होईपर्यंत वाढविले. निषेचनक्रियेतील कोशिकांच्या (पेशींच्या) विभाजनाची सुरुवात रासायनिक रीत्या नियंत्रित केली जाते व वस्तुतः आनुवंशिक लक्षणांच्या संक्रमणापासून ती अलग असते, असे दाखविण्यात लब यांचे कार्य महत्त्वाचे ठरले आहे.

वनस्पती व प्राणी यांचे अनुवर्तन (प्रकाश, उष्णता, पाणी वगैरे उद्दीपकांना प्रतिसाद म्हणून होणारी दिक्स्थिती बदलणारी अनैच्छिक हालचाल), ऊतकांचे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांचे) पुनर्जनन, मेदुचे शरीरक्रियाविज्ञान व आयुःकालावधी यांसंबंधीचे त्यांचे कार्य संस्मरमीय आहे. जीवनाविष्काराचे स्पष्टीकरण भौतिक व रासायनिक नियमांच्या पदांत देता येणे शक्य आहे या जडवादी संकल्पनांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी मांडलेला युक्तिवाद विख्यात आहे. १९१८ ते मृत्यूपावेतो त्यांनी प्रथिनांच्या कलिलीय [⟶कलिल] वर्तनाच्या सिद्धांतात महत्त्वाची भर घतली व हे आपले कार्य सारांशरूपाने प्रोटिन्स ‌अँड द थिअरी ऑफ कलॉयडल बिहेवियर (१९२२) या ग्रंथाद्वारे प्रसिद्द केले. द मेकॅनिस्टिक कन्सेप्शन ऑफ लाइफ (१९१२), आर्टिफिशियल पार्थेनोजेनेसिस अँड फर्टिलायझेशन (१९१३) आणि द ऑर्गॅनिझम ॲज अ होल (१९१६)हे त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. ते बर्म्युडातील हॅमिल्टन येथे मृत्यृ पावले.

भालेराव, य. त्र्यं.