लँग्ली, सॅम्युएल पीअर पाँट : (२२ ऑगस्ट १८३४- २७ फेब्रुवारी १९०६). अमेरिकन ज्योतिर्विद, भौतिकीविज्ञ आणि विमानविद्येतील एक आद्यप्रवर्तक. सौर प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) व विमानविद्या यासंबंधीच्या प्रयोगकार्याकरिता विशेष प्रसिद्ध.

लॅंग्ली यांचा जन्म रॉक्सबरी, मॅसॅचूसेट्स येथे झाला. बॉस्टन येथे १८५१ मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील अध्ययन त्यांनी स्वतःच केले. १८५१-६४ या काळात शिकागो व सेंट लूइस येथे स्थापत्य अभियंते व वास्तुशिल्पज्ञ म्हणून काम केल्यानंतर ते बॉस्टन येथे परत आले. मग त्यांनी हार्व्हर्ड वेधशाळेत साहाय्यक म्हणून एक वर्ष काम केले. १८६६ मध्ये ते ॲनॅपोलिस येथील नेव्हल ॲकॅडेमीत गणिताचे साहाय्यक प्राध्यापक आणि पुढे १८६७ मध्ये पेनसिल्वेनियातील ॲलेगेनी वेधशाळेचे संचालक व पिट्सबर्ग विद्यापीठात भौतिकी व ज्योतिषशास्त्र या विषयांचे प्राध्यापक झाले. १८८७ मध्ये स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनच्या सचिवपदावर त्यांची नेमणूक झाली. त्यांनी १८९० मध्ये स्मिथसोनियन खगोलीय भौतिकी वेधशाळा स्थापन केली. याचबरोबर त्यांनी इन्स्टिट्यूशनच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करून वॉशिंग्टन नॅशनल झूलॉजिकल पार्क व नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट यांचा प्रारंभ केला.

सौर क्रियाशीलता व तिचा पृथ्वीच्या हवामानावर होणारा परिणाम याबाबत लँग्ली यांना प्रामुख्याने रस होता. १८७८-८१ या काळात त्यांनी बोलोमीटर हे उष्णता प्रारण मोजणारे अतिशय संवदनशील उपकरण तयार केले [⟶ उष्णता प्रारण] व त्याच्या साहाय्याने वातावरणातून येणाऱ्या सौर प्रारणाचे निरनिराळ्या उंचीकरिता प्रमाण मोजले. या उपकरणाच्या साहाय्याने तामानातील १०-५° से. (अंशाचा एक दशसहस्त्रांश) इतका अत्यल्प फरक मोजता येतो. या उपकरणामुळे सौर वर्णपटाच्या दूर अवरक्त भागाचाही (दृश्य वर्णपटाच्या तांबड्या भागाच्या अलीकडील ५० ते १,००० मायक्रॉन तरंगलांबी असलेल्या भागाचाही) अभ्यास करणे आणि सौर प्रारणाची विविध तरंगलांब्यांकरिता असणारी तीव्रता मोजणे त्यांना शक्य झाले.

ॲलेगेनी वेधशाळेत काम करीत असताना लँग्ली यांनी हवेतून ठराविक मोजक्या वेगाने जाणाऱ्या विमानाच्या उत्थान प्रेरणा (गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वर उचलणारी प्रेरणा) व कर्षण प्रेरणा (हवेच्या घर्षणामुळे गतीला विरोध करणारी प्रेरणा) यांसंबंधी महत्त्वाचे प्रयोग केले. या प्रयोगांच्या आधारे त्यांनी पंखांची फारशी विशेष हालचाल न करता पक्षी आरोहण व विसर्पण उड्डाण कसे करतात याचे प्रथमच सुस्पष्ट विवरण केले[⟶प्राण्यांचे उड्डाण]. १८९६ मध्ये त्यांनीच प्रथम हवेपेक्षा जड असलेले उडणारे वाहन तयार केले. वाफेच्या एंजिनावर चालणाऱ्या ९.७ किग्रॅ. वजनाच्या या नमुनारूप वाहनाने १,२८० मी. अंतर कापले. त्यानंतर मानवासह उड्डाण करावयाच्या वाहनाच्या आकारमानाच्या एकचतुर्थांश आकारमानाच्या त्यांनी केलेल्या नमुना वाहनाने यशस्वी उड्डाण केले. त्यांचे पहिले मानवासहित विमान पाच सिलिंडरांच्या हवेने थंड केलेल्या, ५२ अश्वशक्तीच्या पेट्रोल एंजिनावर चालणारे व त्यांचे साहाय्यक  चार्ल्स मॅन्ली यांनी अभिकल्पित केलेले होते. हे विमान मॅन्ली यांनीच चालविले परंतु ते गोफणीसारख्या यंत्रणेतून क्षेपित केल्यावर बिघाडामुळ पोटोमॅक नदीत दुसऱ्यांदा ८ डिसेंबर १९०३ रोजी कोसळले. ही घटना राइट बंधूंनी किटी हॉक येथे केलेल्या यशस्वी विमान उड्डाणाच्या केवळ नऊ दिवस अगोदर घडून आली. या विमानाच्या पंखाची लांबी १४.६ मी. व वजन (चालकासह) ३८५ किग्रॅ. होते.

लँग्ली यांना अनेक बहुमान व सन्माननीय पदव्या मिळाल्या, ते अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, लंडनची रॉयल सोसायटी वगैरे शास्त्रीय संस्थांचे सदस्य होते. अमेरिकन ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे ते अध्यक्ष होते. ते साऊथ कॅरोलायनामधील आयकेन येथे मृत्यू पावले.

भदे, व.ग.