गर्भपात : गर्भ जीवनक्षम बनण्यापूर्वी गर्भाशयातून बाहेर पडल्यास गर्भपात झाला असे म्हणतात. गर्भधारणेनंतर २४ आठवड्यांपर्यंत किंवा साधारणपणे एक किग्रॅ. पेक्षा कमी वजन असलेला गर्भ जीवनक्षम नसतो. गर्भधारणेनंतर सु. १२ ते १६ आठवड्यांनंतर वार तयार होते. त्यानंतरच्या (३ ते ७ महिनेपर्यंत) गर्भपाताला गर्भस्राव असे म्हणतात. पूर्ण दिवस भरण्यापूर्वी प्रसव झाल्यास त्या प्रकाराला ‘अकाल-प्रसव’ असे नाव असून त्याचे वर्णन येथे केलेले नाही.

एकूण गर्भधारणांपैकी गर्भपात किती प्रमाणात होत असावा याबद्दल निश्चित ज्ञान नाही परंतु ते प्रमाण सु. १० ते १२ टक्के तरी असावे, असे मानण्यात येते. गर्भधारणेनंतर आठव्या, दहाव्या किंवा सोळाव्या आठवड्यात गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते.

कारणे : गर्भपाताला अनेक कारणे आहेत. त्यांचे वर्गीकरण तीन प्रकारांत केलेले आहे.

(१) मातृज कारणे : ही सर्वांत महत्त्वाची आहेत.

(अ) गर्भारपणी मातेच्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या प्रवर्तकांमुळे (अंतःस्रावी ग्रंथीच्या स्रावांमुळे, हॉर्मोनांमुळे) गर्भाची पूर्ण वाढ होत असते. ह्या प्रवर्तकांच्या प्रमाणात कमतरता उत्पन्न झाल्यास गर्भाची वाढ पुरेशी न होता गर्भपात होण्याचा संभव असतो. पीतपिंडात (अंडाशयात असणाऱ्या आणि पक्व व ज्यातील अंड बाहेर पडलेले आहे अशा अंडपुटकापासून तयार झालेल्या पिवळ्या रंगाच्या पुंजात) उत्पन्न होणाऱ्या ⇨ प्रगर्भरक्षी  (प्रोजेस्टेरोन) या प्रवर्तकाचे या दृष्टीने फार महत्त्व आहे. गर्भपोषककोशातही (गर्भ ज्यामध्ये पोसला जातो त्या पिशवीतही) अशीच प्रवर्तके गर्भारपणाच्या सु. दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात उत्पन्न होऊ लागतात. ती कमी पडली तरीही गर्भपात संभवतो.

(आ) गर्भारपणी मातेच्या शरीराचे पोषण नीट न झाल्यास गर्भाची वाढ होत नाही. जीवनसत्त्वांपैकी इ जीवनसत्त्व या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मातेच्या आहारातील अन्नघटक योग्य प्रमाणात नसल्यास गर्भाची वाढ नीट होत नाही.

(इ) मातेला मधुमेह, हृद्‌विकार, वृक्कविकार (मूत्रपिंडविकार) वगैरे विकार असल्यासही गर्भपात होतो. गर्भिणीविषबाधेमुळेही [गर्भारपणी होणाऱ्या झटके येणाऱ्या विकारामुळेही Ž→ गर्भारपणा] गर्भपात संभवतो.

(ई) गर्भाशयाच्या विकारांतही गर्भ गर्भाशयाच्या अंत:स्तराला योग्य पद्धतीने न चिकटल्यास त्याचे पोषण नीट होत नाही. गर्भाशयाच्या अंत:स्तराचा चिरकारी (दीर्घकालीन) शोथ (दाहयुक्त) आणि तेथील तंत्वार्बुदामुळे (नवीन पेशींच्या वाढीने तयार झालेल्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या तंतुमय गाठीमुळे) असे घडू शकते. गर्भाशयाची ग्रीवा (मुखाजवळचा निमुळता भाग) सैल पडल्यास अथवा तेथे व्रणोत्पत्ती झाल्यास गर्भस्खलन होऊ शकते. गर्भाशय प्राकृतावस्थेत (नेहमी असणाऱ्या स्थितीत) थोडासा अग्र दिशेने कललेला असतो त्याऐवजी तो जर पश्चभागाकडे वाकला तर सु. १२ ते १५ आठवड्यांनंतर गर्भाशय मोठा होत असताना श्रोणीत (धडाच्या शेवटी हाडांनी वेष्टित असलेल्या पोकळीत) पुरेशी जागा न मिळाल्यामुळे गर्भपात होऊ शकतो. गर्भाशयाच्या जन्मजात विकृतीमुळेही गर्भपात होतो.

(उ) जंतुजन्य रोगांमध्ये, पुष्कळ ताप आल्यामुळे गर्भपात होऊ शकतो. फुप्फुसशोथ, परिमस्तिष्कशोथ (मेदूच्या भोवतालच्या आवरणाची दाहयुक्त सूज), देवी वगैरे संसर्गी रोगांमध्ये अशी परिस्थिती होते. गर्भारपणी मातेला कांजिण्या झाल्या, तर गर्भावर फार विपरीत परिणाम होऊ शकतो.

उपदंश (गरमी), क्षय वगैरे चिरकारी रोगांमध्ये गर्भपात होऊ शकतो. विशेषत: उपदंशामध्ये गर्भपात वारंवार होत राहतो. पहिल्या वेळेपेक्षा दुसर्‍या वेळी अधिक काळानंतर गर्भपात होतो. काही वेळा पूर्ण दिवस गेल्यावरही मृतप्रसव होऊ शकतो. जरी मूल जिवंत असले तरी त्याच्या शरीरात अनेक दोष दिसतात [Ž→ उपदंश].

(ऊ) अपघात, पडल्यामुळे होणारी इजा यांमुळे तसेच मातेला गर्भारपणी तीव्र भावनिक अवसाद (धक्का बसणे) झाल्यासही गर्भपात संभवतो.

(२) गर्भज कारणे : गर्भाची वाढ प्राकृतावस्थेप्रमाणे न होता त्यात दोष उत्पन्न झाल्यास ‘विकटगर्भ’ (अती वेडीवाकडी वाढ झालेला गर्भ) होऊन गर्भपात होऊ शकतो. नाळ फार लांब असून ती गर्भाभोवती गुंडाळली गेल्यास गर्भाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे गर्भमृत्यू होऊन गर्भपात होतो.

(३) पितृज कारणे : पित्याला चिरकारी रोग असल्यास, काळजी लागून राहिल्यास आणि मद्यादी दुष्ट सवयी असल्यास शुक्राणूंची ( पुं-प्रजोत्पादक पेशींची) वाढ नीट होत नाही असे मानण्यात येते. तसेच काही वेळा शुक्राणू व अंडाणू (स्त्री-प्रजोत्पादक पेशी) यांमध्ये परस्परविरोधी गुण असल्यास गर्भधारणाच होत नाही अथवा लवकर गर्भपात होतो.

लक्षणे :(१) रक्तस्राव : गर्भकलांमध्ये (गर्भाच्या भोवतालच्या पातळ आवरणांमध्ये) रक्तस्राव होऊन गर्भाशयापासून गर्भकला विलग होऊ लागतात. हा रक्तस्राव योनीमार्गे बाहेर पडतो अथवा आतल्याआतच रक्त साठून राहिल्यामुळे गर्भाशयाचा आकार एकदम वाढून ⇨रक्तस्रावाची सर्व लक्षणे दिसतात. गर्भारपणाच्या सु. पाचव्या महिन्याच्या सुमारास वार तयार झालेली असते. अशा वेळी रक्तस्राव सुरू झाला म्हणजे गर्भकला फुटून गर्भ प्रथम बाहेर पडतो व त्यानंतर वारही बाहेर येते. सर्व वार बाहेर न पडली, तर रक्तस्राव सारखाच होत राहून मातेच्या प्राणावरही बेतते.

(२) वेदना : ओटीपोटात आणि कंबरेत दुखू लागते. या वेदना राहून राहून होणाऱ्या म्हणजे प्रसूतिवेदनांसारख्याच असतात.

(३) गर्भाशयग्रीवेचे प्रसरण : गर्भारपणी गर्भाशयग्रीवा घट्ट आणि बंद असते परंतु गर्भपाताच्या वेळी तिचे प्रसरण होऊन ती अगदी मऊ व बिलबिलीत होते.

प्रकार : गर्भपाताचे दोन प्रकार आहेत : (१) भयसूचक व (२) अपरिहार्य.

(१) भयसूचक प्रकारामध्ये गर्भपातास सुरुवात झाली असली, तरी योग्य उपचारांनी तो थोपविता येतो. गर्भिणीस स्वस्थ झोपवून शांतक औषध देणे, योग्य प्रवर्तके वापरणे इ. इलाज करतात.

(२) योग्य इलाजानंतरही गर्भपात क्रिया न थांबता चालूच राहिली, तर गर्भपात अपरिहार्य ठरतो. ज्यावेळी संपूर्ण गर्भ आवरणासहित बाहेर पडतो तो गर्भपात ‘पूर्ण गर्भपात’ होय. या उलट गर्भाचा अथवा गर्भकलांचा काही भाग गर्भाशयातच राहतो तो ‘अपूर्ण गर्भपात’ होय. या दुसऱ्या प्रकारात भयंकर रक्तस्राव होऊन गर्भिणीच्या जीवितास धोका होण्याचा संभव असतो. त्याशिवाय सूक्ष्मजंतूंच्या संक्रमणाचाही (संसर्गाचाही) धोका असतो.

कोणत्याही प्रकारच्या गर्भपाताच्या वेळी तज्ञाकडून तपासणी व उपाययोजना करणे इष्ट असते.


कृत्रिम गर्भपात : वरील विवेचन ‘नैसर्गिक’ गर्भपाताबद्दलचे आहे. ‘कृत्रिम’ गर्भपाताबद्दल खाली माहिती दिली आहे.

मातेच्या जीवितास धोका होण्याचा संभव असल्यास कृत्रिम उपायांनी गर्भपात करण्याची प्रथा सर्वमान्य व रूढ होती. अशा प्रकारच्या गर्भपातास ‘प्रवर्तित (मुद्दाम घडविलेला) गर्भपात’ म्हणतात. जुन्या काळात गर्भपात घडवून आणण्याकरिता गर्भिणीने उंचावरून उड्या मारणे, आळीपाळीने गरम व थंड पाण्याने आंघोळ करणे, पोट चोळणे, कापूर, पपई, जायफळ, लवंग, केशर आदींचे सेवन करणे व गर्भाशयात काटक्या घालून घेणे इ. उपाय करीत. परंतु यामुळे रक्तस्रा, जंतुसंसर्ग इत्यादींचा उपद्रव झाल्यामुळे बऱ्याच वेळा मातेच्या जीवितास धोका निर्माण होत असे.

निर्वात चूषणक्रियेने गर्भाशय मोकळे करण्याचे उपकरण

आधुनिक कृत्रिम गर्भपाताकरिता पुढील उपाय योजितात : (१) गर्भाशयाच्या ग्रीवेचे विस्फारण व गर्भाशयाचा अंतर्भाग खरवडणे (क्युरेटिंग) या शस्रक्रिया करून गर्भ काढणे. (२) चूषण उत्सारण (हवेच्या दाबापेक्षा कमी दाब निर्माण करून खेचून घेण्याचे) किंवा निर्वात चूषण तंत्र. ही एक प्रकारची शस्रक्रियाच आहे. या तंत्रात एका बाटलीला जोडलेल्या नळीचे (या निरनिराळ्या आकारमानांच्या असतात) दुसरे टोक गर्भाशयाच्या पोकळीत घालतात. या बाटलीत निर्वातावस्था निर्माण करून गर्भ बाटलीत खेचला (शोषिला) जातो. या तंत्रामध्ये रक्तस्राव अत्यंत अल्प प्रमाणात होतो. (३) गर्भाशयावर शस्त्रक्रिया करणे. (४) द्राक्षशर्करेचे (ग्‍लुकोजचे) किंवा लवण-विद्रावाचे गर्भाशयात अंत:क्षेपण (आत घुसवण्याची क्रिया) करणे. (५) गर्भाशयास आकुंचन करावयास उद्युक्त करणारी पियटोसीन, अरगट यांसारखी औषधे वापरणे. (६) लॅमिनेरिया टेंटस  नावाच्या एका सागरी शैवल वनस्पतीचे शुष्क देठ गर्भाशयग्रीवेत ठेवणे. या देठात द्रव शोषण करून फुगण्याचा गुणधर्म असल्यामुळे गर्भाशयग्रीवा विस्फारित झाल्याने गर्भपात होतो. (७) प्रोस्टाग्‍लँडिनासारखी नवी औषधे वापरणे.

निर्धोक, अंथरुणावर जास्त वेळ पडून रहावे लागू नये, अल्पखर्चिक व सुलभ कृत्रिम गर्भपात करण्याजोगा इलाज शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. आज चूषण उत्सारण किंवा निर्वात चूषणक्रिया तंत्र या दृष्टीने योग्य असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्याकरिता विशिष्ट उपकरणांची गरज असते.

विद्युत्‌शक्तीच्या साहाय्याने निर्वात चूषणक्रिया करता येते. ज्या ठिकाणी विद्युत्‌शक्ती उपलब्ध नसेल तेथे हे उपकरण हातपंपास जोडता येते. गर्भधारणेचे १२ आठवडे पूर्ण होण्याच्या आत वापरल्यास हे उपकरण निर्धोक असले, तरी ते वापरण्याचा योग्य काळ ८ आठवडेच होय. या क्रियेत स्थानिक संवेदनाहरण तंत्र वापरण्यात येत असल्याने रूग्‍णालयात फक्त ८ ते १२ तास थांबले तरी पुरते. तसेच रक्तस्रावाचाही धोका नसतो.

गर्भपातासंबंधीचे कायदे : गर्भिणीचा जीव धोक्यात असल्यास कृत्रिम गर्भपात करण्याची प्रथा रूढ असावी व ती न्यायमूलकही असावी. कृत्रिम गर्भपातास कायदेशीर परवानगी द्यावी किंवा नाही ? उत्तेजन द्यावे की जोरदार विरोध करावा ? इ. प्रश्न पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रारंभापासून तत्त्वज्ञानी व कायदेपंडित यांच्यामधील चर्चेचे विवाद्य प्रश्न बनले आहेत. ख्रिश्चन धर्मवेत्त्यांनी विशेषत: रोमन कॅथॉलिक पंथीयांनी सुरुवातीपासूनच गर्भपाताविरूद्ध जोरदार मत प्रदर्शित केले होते. तरीदेखील एकोणिसाव्या शतकापर्यंत गर्भपातास गुन्ह्याचे स्वरूप देण्यात आले नव्हते. पुढे जेथे इंग्रजी भाषा बोलत त्या देशांमधून गर्भपातास कायद्याने बंदी घालण्यात आली. गर्भिणीचा जीव धोक्यात असल्यास केलेला गर्भपात याला अपवाद होता. लैंगिक वर्तणुकीबद्दलचे कायदे जसे उल्लंघिले जातात तसेच गर्भपातविषयक कायद्याच्या बाबतीत घडले. बेकायदा गर्भपात होतच राहिले. इंग्‍लंडमध्ये पूर्वी गर्भ हालचाल करू लागण्यापूर्वी केलेला गर्भपात हा गुन्हा गणला जात नसे. ही हालचाल सर्वसाधारणपणे गर्भितावस्थेच्या मध्यास सुरू होते. त्यानंतर गर्भितावस्थेच्या कोणत्याही काळात केलेला गर्भपात गुन्हा ठरविण्यात आला. अमेरिकेतील मिसिसिपी, नॉर्थ व साउथ कॅरोलायना या राज्यांतील गर्भपातविषयक कायद्यांतून गर्भाची हालचाल सुरू होण्यापूर्वी केलेला गर्भपात आजही गुन्हा समजला जात नाही.

एकोणिसाव्या शतकातील गर्भपातविषयक परिस्थितीत बदल करण्याच्या उद्देशाने १९२० मध्ये रशियाने पहिले पाऊल उचलले. क्रांतीनंतर स्थापन झालेल्या सरकारने गर्भिणीने विनंती केल्यास केलेला गर्भपात न्यायमूलक ठरविला. १९३६ मध्ये गर्भपातविषयक कायदा कडक करण्यात आला होता परंतु १९५५ नंतर गर्भिणीच्या विनंतीवरून केलेला गर्भपात पुन्हा मान्य झाला. रशियानंतर गर्भपातविषयक कायदा वैद्यकीय व सामाजिक दृष्टिकोनातून सैल करण्यामध्ये आइसलँडने पुढाकार घेतला. या देशाने दोन प्रसूतींमधील अंतर, कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती याही गोष्टी विचारात घेऊन गर्भपात करण्यास १९३५ मध्ये मान्यता दिली. दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र गर्भपाताकडे पाहण्याच्या जागतिक दृष्टिकोनातच बदल झाला. स्त्री-हक्क संरक्षण, वाढती लोकसंख्या आणि बेकायदा गर्भपातांनी होणारी मृत्यूंची संख्या या गोष्टी लक्षात घेऊन सर्वच अगर बहुसंख्य गर्भपातांना विधिमान्यता असावी असा विचारप्रवाह सुरू झाला व काही देशांनी तत्काळ त्याला मान्यताही दिली. स्वीडन व डेन्मार्क या देशांनी त्यांच्या गर्भपात कायद्यात अशा प्रकारे बदल केले. अशाच तर्‍हेच्या वैद्यकीय-सामाजिक दृष्टिकोनातून मान्यता देणारे कायदे जपान (१९४८), चीन (१९५४),रूमानिया (१९६०), बल्गेरिया (१९६०),ब्रिटन (१९६७), सिंगापूर (१९६९), फिनलंड (१९७०), भारत (१९७२) तसेच हंगेरी, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया या देशांनी केले. यामुळे आता निम्म्याहून जास्त लोकसंख्येस वैद्यकीय-सामाजिक कारणानुसार गर्भपात करण्यास विधिमान्यता आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत तर न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, अलास्का व हवाई या राज्यांत गर्भपात नियंत्रण करणारे कायदेच रद्द केले आहेत. तर बाकीच्या राज्यांतून ते बरेच सैल केले आहेत.चिली, मेक्सिको, इटली, बेल्जियम, पश्चिम जर्मनी व फ्रान्स या देशांतून गर्भपात कायद्यामध्ये असा बदल केला नसून तेथे गर्भपात हा अजूनही गुन्हाच मानला जातो. तरीदेखील या देशांत गर्भपाताचे प्रमाण अधिक  आहे.


भारतात १९७१ पूर्वी अस्तित्वात असलेल्या गर्भपातविषयक कायद्यात (इंडियन पीनल कोड कलम नं. ३१२, ३१३ व ३१४ ) फक्त गर्भिणीचे प्राण वाचविण्याकरिता केलेला गर्भपात शिक्षापात्र नव्हता. भारतीय कायद्यात ‘स्त्रीचा प्राण वाचविण्याकरिता’ (सेव्हिंग द लाइफ ऑफ द वूमन ) असा शब्दप्रयोग होता. इंग्‍लंडमधील कायद्यात ‘मातेच्या जीवन संरक्षणाकरिता’ (प्रिझर्व्हिंग द लाइफ ऑफ द मदर ) असे शब्द असल्यामुळे शारीरिक किंवा मानसिक ऱ्हास होण्याची लक्षणे दिसल्यास गर्भपात करणे तेथे गुन्हा ठरत नसे. त्याशिवाय भारतात पुढील परिस्थितीत केलेला गर्भपात शिक्षापात्रच ठरे : (१) जबरी संभोगामुळे आलेले गर्भारपण, (२) मानसिक विकृतीने पछाडलेल्या स्त्रीचे गरोदरपण, (३) गरोदरपणामुळे स्त्रीची प्रकृती ढासळण्याचा संभव असला, तरी तिच्या जीवितास प्रत्यक्ष धोका नसताना केलेला गर्भपात, (४) आनुवंशिक रोग मुलात उत्पन्न होणार या भीतीने केलेला गर्भपात, (५) कुटुंबाचा बदलौकिक होऊ नये म्हणून केलेला गर्भपात ( उदा., अवैध गरोदरपण), (६) आर्थिक कारणाकरिता केलेला गर्भपात.

भारतात १ एप्रिल १९७२ पासून ‘गर्भारपण वैद्यकीय समाप्ती’ हा नवा कायदा अमलात आला आहे. या कायद्यान्वये नोंदलेल्या वैद्यकीय व्यावसायिकाची जर पुढील गोष्टींची सद्‌हेतुपूर्वक खात्री झाली, तर त्याला गर्भारपण समाप्त करता येते: (१) गर्भारपण चालू राहिल्यास गर्भिणीच्या जीवितास धोका होण्याचा संभव आहे किंवा तिच्यावर गंभीर शारीरिक अगर मानसिक अपाय होण्याचा संभव आहे किंवा (२) भावी अर्भक शारीरिक अगर मानसिक व्यंगाने पछाडलेले असण्याचा व त्यामुळे कायमचे अधू राहण्याचा धोका आहे.

जबरी संभोगामुळे गर्भार झालेल्या स्त्रीच्या मनावर जबरदस्त आघात होण्याची शक्यता असते. विवाहित स्त्रीचा कुटुंबनियोजनाचा हेतू कोणत्याही कारणामुळे असफल होऊन गर्भधारणा होण्यानेही मनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही लक्षात घेता येईल.

या नवीन कायद्यान्वये बारा आठवड्यांपेक्षा कमी दिवसांचे गर्भारपण असल्यास ते समाप्त करण्याकरिता एकच वैद्यकीय मत पुरेल. परंतु बारा आठवड्यांपेक्षा जास्त आणि वीस आठवड्यांपूर्वीची गर्भधारणा समाप्त करावयाची झाल्यास दोन वैद्यकीय मते हवीतच.

नोंदलेला वैद्यकीय व्यावसायिक म्हणजे कोण, याचेही कायद्यात स्पष्टीकरण आहे. त्याअन्वये आयुर्वेदी, युनानी किंवा होमिओपाथिक व्यावसायिकांना गर्भपात करता येणार नाही. तसेच आधुनिक वैद्यकाच्या व्यावसायिकांपैकी ज्यांना स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्राचा विशिष्ट अनुभव नाही त्या नोंदलेल्या व्यावसायिकांनाही तो करता येणार नाही.

गर्भारपणाची समाप्ती फक्त ‘सरकारमान्य’ ठिकाणीच (सरकारी रुग्णालये व सरकारमान्य खाजगी रुग्णालये) केला पाहिजे. गर्भपातांची योग्य ती नोंद करावयास हवी व व्यावसायिक गुप्ततेचा भंग होता कामा नये.

गर्भारपण समाप्त करून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीने लेखी संमती दिलीच पाहिजे. अशी स्त्री अल्पवयीन अगर मानसिक विकृतीने पछाडलेली असेल, तर तिच्या पालकाची लेखी संमती हवी.

तातडीच्या वेळी गर्भिणीचा जीव वाचविण्याकरिता २० आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांचे गर्भारपण समाप्त करता यावे, म्हणून या कायद्यात काही सवलतही ठेवली आहे. अशा वेळी दुसऱ्या वैद्यकीय मताची गरज नाही. तसेच वर निर्दिष्ट केलेल्या विशिष्ट अनुभवाचीही वैद्यास जरूर नाही.

गर्भपात व नीतिमत्ता : गर्भपातास मान्यता देण्यासाठी नीतिमत्तेच्या कारणावरून प्रखर असे विरोध आहेत. काही लोकांच्या मते गर्भधारणा झाल्याच्या सुमारापासूनच गर्भ सजीव असतो आणि त्यास जिवंत राहण्याचा हक्क आहे. काहींच्या मते गर्भाची हालचाल सुरू झाली म्हणजे सु. पाचव्या महिन्यापासून तर काहींच्या मते गर्भ गर्भाशयापासून स्वतंत्रपणे जगू  शकेल अशा अवस्थेत (सु. सातव्या महिन्यापासून ) त्यास सजीव असे समजले जावे. त्यामुळे गर्भाची हत्या करणे कोणत्याही परिस्थितीमध्ये अनैतिक समजले जावे, तर काहींच्या मते गर्भाची हत्या ही गर्भिणीचे आयुष्य वाचविण्यासाठी किंवा अपंग, अपरिक्व, सदोष मूल होणार असल्यास किंवा जबरी संभोग अगर अन्य कारणाने गर्भिणीच्या इच्छेविरुद्ध झालेल्या गर्भधारणा वगैरे कारणांमुळे गर्भाची हत्या करणे क्रमप्राप्त असून त्यास अनैतिकता म्हणता येणार नाही. स्त्री-हक्क संरक्षणाचा पाठपुरावा करणाऱ्यांचे तर म्हणणे असे आहे की, गर्भपात हा गर्भिणीची व तिच्या वैद्याची खाजगी बाब असून तीत इतरांना ढवळाढवळ करण्याचा अधिकार असू नये. सर्वच देशांच्या अगदी प्रारंभीच्या काळामध्ये प्रजेच्या वाढीची जरूरी असल्यामुळे बहुप्रसवा स्त्रीला समाजात मान असे. स्मृतिकारांनी स्त्रीच्या संतती हक्कास तिचा पती नसतानाही मान्यता दिली होती त्यामुळे गर्भपात हा अत्यंत भयंकर असा गुन्हा व पाप समजले जाई. परंतु सध्या सर्वच देशांत वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न भेडसावत असल्यामुळे नीतिमत्तेच्या कल्पनाही बदलत असून त्यामुळे गर्भपाताकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदललेला आहे. सध्या तरी कुटुंबनियोजनाचा प्रचार व साधनांची उपलब्धता सुलभ असल्यामुळे नैतिक दृष्ट्या केवळ व्यभिचार वाढेल म्हणून गर्भपातास नैतिक विरोध कमी प्रमाणात होऊ लागला आहे.

गर्भपातविषयक कायद्यात स्त्रीस गर्भपात किती वेळा करून घेता येईल, ठराविक गर्भपातांनंतर संततिप्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घ्यावयासच हवी, योग्य नोंदलेल्या वैद्यकीय व्यावसायिकास गर्भपात करण्यास नकार देता येईल किंवा नाही यांविषयी उल्लेख नाही.

ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.

पशूंतील गर्भपात : सर्व प्रकारच्या पशूंमध्ये गर्भस्राव व गर्भपात संभवतो. गर्भपाताची कारणे पाहू जाता वर वर्णिलेली मादीच्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या प्रवर्तकांची कमतरता, मादीचे अपपोषण, गर्भाशयाचे विकार, प्रामुख्याने गर्भाशयशोथ व ग्रीवेवरील जखमा, आणि विकटगर्भ ही कारणे पशूंतील गर्भपाताला लागू आहेतच. प्रगर्भरक्षी अंतःस्राव गर्भाशयावर नियंत्रण ठेवून गर्भपात होऊ देत नाही. पण काही कारणांमुळे ह्या प्रवर्तकाचे प्रमाण कमी झाले, तर गर्भपात होतो. यांशिवाय गाई-म्हशींमध्ये मारहाणीमुळे, फरशीवरून घसरल्यामुळे अगर वळू व रेडा यांच्या त्रासामुळे गर्भपात होतो. मारहाणीमुळे होणाऱ्या गर्भपाताचे प्रमाण शेळ्यांमध्ये बरेच आहे. प्रगत गाभण अवस्थेत गाई-म्हशींना दूरवरचा प्रवास घडवणे, पोटदुखीसारख्या विकारात तीव्र रेचके देणे ही गर्भपाताची कारणे असू शकतात.

गाभण मेंढीच्या मागे शिकारी कुत्र्याने पाठलाग केला असताना पळण्याच्या त्रासामुळे किंवा घाबरल्यामुळे, घोडीमध्ये गर्भाशयात जुळी शिंगरे असल्यामुळे पाचव्या किंवा सातव्या महिन्यात, डुकरामध्ये वराहज्वर वगैरे कारणांमुळेही गर्भपात होतो. काही जनावरांत गर्भ टाकण्याची प्रवृत्ती आनुवंशिक असते.

ब्रूसेला अबॉर्टस बँग  या सूक्ष्मजंतूंच्या संसर्गामुळे गाई-म्हशींत आणि ब्रूसेला  जंतूच्या इतर जातींमुळे डुकरे व शेळ्या यांस होणारा गर्भपात संसर्गजन्य असून त्याचे प्रमाण बरेच आहे [→ गाय]. व्हिब्रिओ फीटस  या स्वल्पविरामाच्या आकाराच्या जंतूमुळे गाई-म्हशींत आणि मेंढ्यांत त्याचप्रमाणे ट्राकोमोनास व्हजायनॅलिस  या प्रजीवाच्या संसर्गामुळे गर्भपात संभवतो, पण त्याचे प्रमाण अल्प आहे.

गाभण जनावरांना निराळे ठेवून त्यांच्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घेणे, त्यांना मारहाण न करणे, गोठ्यात खडबडीत फरशी घालणे या बाबींकडे लक्ष पुरविल्याने गर्भपात टाळता येतात. जंतूमुळे होणाऱ्या गर्भपाताची शक्यता दृष्टिआड न करता तज्ञाकडून वेळीच तपासणी करून त्याप्रमाणे उपाययोजना केल्याने संसर्गजन्य गर्भपातांचे प्रमाण कमी करणे शक्य होते.

गद्रे, य. त्र्यं.

संदर्भ : 1. Baird, D. Ed., Combined Textbook of Obstetrics and Gynaecology, Edinburgh and London, 1962.

2. Bourne, A. W. A Synopsis of Obstetrics and Gynaecology, Bristol, 1959.

3. Mehta, H. S. Medical Law and Ethics in India, Bombay, 1963.

4. Miller, W. C. West G.P Ed., Black’s Veterinary Dictionary, London, 1962.

5. Journal of the Indian Medical Association, Family Planning Number, October 16, 1972.