गोरिला : सर्व मानवसदृश कपींमध्ये गोरिला मोठा आहे. याच्या दोन जाती आहेत. एका जातीचे शास्त्रीय नाव गोरिला गोरिला  असून ती पश्चिम आफ्रिकेच्या उष्ण कटिबंधातील काँगो नदीच्या खोऱ्यात राहते. दुसऱ्या जातीचे शास्त्रीय नाव गोरिला बेरिंगेई  असून ती पूर्व झाईरे (बेल्जियन काँगो) आणि पश्चिम युगांडातील पर्वतांत आढळते. 

गोरिलाची उंची १·२५–१·७५ मी. असते वजन १४०–२७५ किग्रॅ. असते. मादी नरापेक्षा लहान असते. 

गोरिला

अंगावर दाट काळे केस असतात. म्हातारपणी नराच्या पाठीवरचे केस रुपेरी करडे होतात. चेहरा, कान, हाताचा पंजा आणि पाऊल यांवर केस नसतात. गोरिलाचे शरीर भरदार असून त्याच्या अंगी असाधारण शक्ती असते. मुस्कट आखूड, नाकपुड्या मोठ्या, डोळे बारीक आणि कान लहान असतात.

गोरिला शांत स्वभावाचा आणि एकांतप्रिय असतो, पण त्याला छेडले तर त्याच्यासारखा दुसरा भयंकर शत्रू नाही. तो पुष्कळदा ताठ उभा राहतो, पण हातापायांनी चालतो चालताना हातांची अर्धवट मूठ मिटून ती जमिनीवर टेकलेली असते. याच्या सगळ्या हालचाली सहेतुक असतात. 

यांचे सु.२५ जणांचे गट असतात एका गटात एक सत्ताधारी नर, काही दुय्यम दर्जाचे नर, बऱ्याच माद्या व पिल्ले असतात. म्हाताऱ्या गोरिलाला गटातून हाकून लावतात नंतर तो एकलकोंडेपणाने राहतो. मादी व पिल्ले झाडावर खोपट तयार करून त्यात झोपतात, पण नर झाडाखाली खोपटात झोपतो.

गोरिला शाकाहारी असून फळे, पाने इ. खातो. भक्ष्य शोधण्याकरिता तो झाडावर १५ मी. उंचीपर्यंत देखील चढतो.

सु. नऊ महिन्यांच्या गर्भावधीनंतर (गर्भारपणाच्या काळानंतर) मादीला एकच पिल्लू होते. रानातील गोरिला सु. ५० वर्षे जगतो.

गो. बेरिंगेई  ही पर्वतावर राहणारी जाती काँगो खोऱ्यात राहणाऱ्या जातीपेक्षा बरीच मोठी असते. 

पहा : मानवसदृश कपि.

जोशी, मीनाक्षी