रानकुत्रा : हा प्राणी कॅनिडी कुलातील असून ह्याचे शास्त्रीय नाव क्युऑन अल्पिनस असे आहे. हा खांद्याजवळ साधारणपणे ४३ –५५ सेंमी. उंच आणि डोके व धड धरून ९० सेंमी. लांब असतो. ह्याचे शेपूट ४० – ४३ सेंमी. लांब असून खूप केसाळ असते. ह्याचे वजन २० किग्रॅ. भरते. मादी त्या मानाने हलकी असते.

रानकुत्रासर्वसाधारणपणे हा प्राणी माणसाळलेल्या कुत्र्यासारखाच दिसतो. ह्याचे शरीर लांबट आणि लांडग्यासारखे सडपातळ असते. ह्याचे पाय व जबडा मात्र काहीसे आखूड असतात. तथापि लांडगा व गावठी कुत्रा यांना सात सात दाढा असतात, तर ह्याला फक्त सहा सहाच दाढा असतात. तसेच गावठी कुत्र्याला केवळ दहाच आचळ असतात. स्थानपरत्वे आणि ऋतुपरत्वे ह्यांचा विशिष्ट तांबडा रंग कमीजास्ती आढळतो. हिमालयात आढळणारी जात अधिक तांबडी असते परंतु हिमालयापलीकडची ह्याची जात अधिक फिकट असते. भारताच्या द्वीपकल्पात (दक्षिण भारतात) ह्याचा रंग तपकिरी आढळतो.

मध्य आशिया, अल्‌ताई पर्वतापासून पूर्व आशियाचा भाग, दक्षिण मँचूरिया, मलाया प्रदेश व भारतातील जंगले यांत हे आढळतात. तीन जातींचे रानकुत्रे भारतात आढळतात.

रानकुत्रे बहुधा जंगलातून आढळतात. लडाख आणि तिबेट या प्रदेशांत ते मोकळ्या मैदानावर आढळतात, कारण त्या उजाड प्रदेशात जंगले नाहीत परंतु भारतात इतरत्र ते जंगलातच आढळतात. जंगलात त्यांना सावली, अन्न व पडून राहण्यास निवाऱ्याच्या जागा मिळतात.

रानकुत्रा एकलकोंडा नाही. तो कळप करून राहतो. या कळपात एक किंवा अनेक कुटुंबे एकत्र आढळतात. यामुळे टोळी मोठी बनते व ते सर्व मिळून मोठ्या प्राण्यांचीही शिकार करू शकतात.

वासाच्या साहाय्याने ते आपले भक्ष्य शोधतात. भक्ष्य दृष्टीच्या टप्प्यात आले की, ते त्याचा पाठलाग करतात. ते एकदम तुटून पडत नाहीत. आपल्या भक्ष्यापासून ते धीम्या गतीने पाठलाग करतात आणि शेवटी त्याच्यावर हल्ला करतात. एकेका हरिणामागे टोळ्याटोळ्यांनी ते धावतात. तेव्हा ते सतत शिट्टी वाजल्यासारखे भुंकतात. माणूस दिसला तरीही ते असाच आवाज काढतात.

तिबेट आणि लडाखमध्ये ते मेंढ्या व हरिणे यांची शिकार करतात, काश्मीरच्या जंगलात ते मार्खोर, कस्तुरी मृग व गोरल यांची शिकार करतात. हिमालयात त्यांचे भक्ष्य ताहर हा प्राणी असतो. भारतात मात्र त्यांचे अन्न मुख्यतः हरिणे असतात. तथापि मोठाल्या टोळ्या म्हशी किंवा गवे यांच्यावरही हल्ला करतात. रानडुकरे हे त्यांचे भक्ष्य होय. चित्ते, अस्वल आणि वाघही त्यांनी मारून खाल्लेले आहेत.

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत त्यांना ४ – ६ पर्यंत पिल्ले होतात. एकाच ठिकाणी अनेक माद्या पिल्ले प्रसवतात.

कानिटकर, बा. मो.