प्लॅटिहेल्मिंथिस: (पृथुकृमी संघ). ‘चापट कृमी’ म्हणून सामान्यतः ओळखल्या जाणाऱ्या अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांचा हा एक संघ आहे. हे प्राणी द्विपार्श्व-सममित (एकाच प्रतलाने शरीराचे दोन सारखे भाग करता येतात असे) अखंड आणि वरून खाली चपटे असतात. हे उभयलिंगी (नर व मादी यांची जननेंद्रिये एकाच प्राण्यात असलेले) असून त्यांचे जनन तंत्र (जनन संस्था) जटिल (गुंतागुंतीचे) असते. या संघाच्या वर्गीकरणाबद्दल भिन्न मते असली, तरी सर्वसाधारणपणे पुढील तीन वर्गात त्यांचे वर्गीकरण केले जाते. (१) टर्बेलॅरिया : या वर्गातील कृमी मुख्यतःमुक्तजीवीव हिंस्त्र असतात (२) ट्रिमॅटोडा (पर्णकृमी अथवा पर्णाभकृमी): हे कमी बाह्यपरजीवी (दुसऱ्या जीवाच्या शरीरावर राहून उपजीविका करणारे) अथवा अंतःपरजीवी (दुसऱ्या जीवाच्या शरीरामध्ये राहून उपजीविका करणारे) असतात (३) सेस्टॉयडिया (पट्टकृमी अथवा फीतकृमी) : हे पृष्ठवंशी प्राण्यांच्या आंत्रात (आतड्यात) अंतःपरजीवी असतात. यांचे डिंभ (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसलेल्या सामान्यतः क्रियाशील असलेल्या पूर्व अवस्था) अपृष्ठवंशी किंवा पृष्ठवंशी प्राण्यांच्या ऊतकांत (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांत) सापडतात.

या संघातील परजीवी वर्गाचा क्रमविकास (उत्क्रांती) टर्बेलॅरिया या मुक्तजीवी वर्गापासून झाला असावा.

पुष्कळशा टर्बेलॅरियनांची लांबी ५ मिमी.च्या आतच असते. काही अतिसूक्ष्मही असतात, तर काहींची लांबी ०·५ मी. असते. पर्णकृमींची लांबी ५ ते १०० मिमी. इतकी असू शकते. काही जातींची लांबी कित्येक सेंमी. ही असू शकते. पट्टकृमींच्या काही जाती कित्येक मी. लांबीच्या आहेत. १५ मी. लांबीचेही पट्टकृमी आढळलेले आहेत.

शरीर-रचना:चापट कृमींचे शरीर तीन-स्तरांपासून उत्पन्न झालेले असते. बाह्यस्तरापासून शरीराचा पृष्ठभाग, अंतःस्तरापासून आंत्र आणि मध्यस्तरापासून वर्तुळ व अनुदैर्घ्य (शरीराच्या लांबीला समांतर असलेले) स्नायू आणि आंतरांगांना वेढणारे मृदूतक (स्पंजासारखे मऊ ऊतक) तयार होतात. मृदूतकात मधूनमधून द्रवाने भरलेल्या जागा असतात पण खरी देहगुहा (आतडे वगैरे इंद्रिये जिच्यात असतात अशी पोकळी) अथवा रुधिर तंत्र (रक्ताभिसरण संस्था) नसते. काही चापट कृमींमध्ये तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) जाळ्यासारखे आद्य स्थिती दर्शविणारे असते परंतु बहुतेकांत शीर्षामध्ये युग्मित प्रमस्तिष्क गुच्छिका (तंत्रिका कोशिकांचे समूह मेंदू) असतात आणि दोन मुख्य अनुदैर्घ्य तंत्रिकारज्जू असून त्या आडव्या तंत्रिकांनी जोडलेल्या असतात. शीर्ष आणि शरीर यांवर विविध प्रकारची ज्ञानेंद्रिये (संस्पर्शक-लवचिक स्पर्शेद्रिय, अक्षिका-प्रकाशग्राही कोशिकांचा पुंज, संतुलन पुटी-शरीराचा तोल सांभाळण्यासाठी असलेले ज्ञानेंद्रिय वगैरे) असतात पण परजीवी प्राण्यांमध्ये त्यांचा ऱ्हास झालेला असतो किंवा ती मुळीच नसतात. उत्सर्जन तंत्र वृक्ककीय (शरीरातील निरूपयोगी द्रव्ये बाहेर टाकणारे नलिकेसारखे इंद्रिये असलेल्या) नमुन्याचे असते. ते बारीक नलिकांचे बनलेले असून प्रत्येक नलिकेच्या टोकावर एक मोठी ज्वालाकोशिका (एक प्रकारची पोकळ कोशिका) असते ज्वालाकोशिकेत लांब पक्ष्मभिकांचा (सूक्ष्म,नाजूक व चाबकाच्या दोरीसारख्या वाढींचा) एक जुडगा असून तो नलिकेच्या सुषिरकात (पोकळीत) पुढे आलेला असतो याच्या तरंगी (लयबद्ध) हालचाली सारख्या चालू असतात व त्यांमुळे अधोगामी प्रवाह निर्माण होतो. मुख असले तर ते बहुधा अग्र (पुढच्या) टोकावर किंवा अधर (खालच्या पृष्ठावर असून ते एका स्नायुमय ग्रसनीत (घशात) उघडते. आंत्र पिशवीसारखे किंवा शाखित असून सामान्यतः त्याचे मागचे टोक बंद असते. गुदद्वार क्वचितच असते. पचन अंतराकोशिकी (कोशिकांच्या दरम्यानच्या भागात होणारे) अथवा अंतःकोशिकी (कोशिकेच्या अंतर्गत भागावर होणारे) असते. कंकाल तंत्र (शरीराला आधार, आकार व संरक्षण देणारा सांगाडा), वाहक तंत्र (द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या इंद्रियांचे तंत्र) आणि श्वसन तंत्र नसतात वायूंची अदलाबदल शरीराच्या पृष्ठामधून होते वायू, पोषक द्रव्ये इ. विसरणाने (दोन पदार्थांचे रेणू एकमेकांच्या मधल्या मोकळ्या जागांत जाऊन मिसळण्याने) शरीराच्या सर्व भागांना पुरविली जातात आणि या कामी स्नायूंच्या हालचालींची मदत होते.

मुक्तजीवी व परजीवी पृथुकृमी चयापचयाकरिता (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींकरिता) जेव्हा शक्य असेल तेव्हा ऑक्सिजनाचा उपयोग करतात. बऱ्याच पृथुकृमींवर संशोधन झालेले असून त्यांपैकी काहींना श्वसनक्रियेसाठी ऑक्सिजनाची जरूरी नाही, असे आढळून आले आहे. त्यांचे श्वसन ऑक्सिजनविरहित आहे, असे दिसून आले आहे. रक्तवाहिन्यांत राहणाऱ्या काही जातींतही ऑक्सिजनविरहित श्वसन आढळते. इतर प्राण्यांप्रमाणे पृथुकृमींचे शरीरही प्रथिने, कार्बोहायड्रेटे व लिपिडे यांचे बनलेले असते. इतर प्राण्यांच्या मानाने कार्बोहायड्रेटाचे प्रमाण मात्र जास्त असते. हे कार्बोहायड्रेट प्राणि-स्टार्च (ग्लायकोजेन) या प्रकारचे असते. कार्बोहायड्रेटाचे हे प्रमाण पोषकाच्या (आश्रय देणाऱ्या प्राण्याच्या) आहारातील घटकांवर अवलंबून असते. वाळविलेल्या परजीवी पृथुकृमींच्या काही जातींत ४०% ग्लायकोजेन आढळले आहे. पट्टकृमींवरील आतापर्यंतच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, त्यांच्या पुष्कळशा जाती ग्लुकोज व गॅलॅक्टोज ही कार्बोहायड्रेटे पचवितात. फक्त थोड्याच जाती माल्टोज व सुक्रोज पचवू शकतात. कॅल्केरिअस कॉर्पस्क्युलस या पृथुकृमीच्या शरीरात आढळणाऱ्या रचनेत कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस यांचा साठा आढळतो. पृथुकृमींच्या शरीरात केराटीन व स्क्लेरोटिन ही प्रथिने आढळतात.

टर्बेलॅरिया मुक्तजीवी प्राणी असून त्यांच्या शरीरावर पक्ष्माभिकायुक्त पृष्ठीय उपकला (अनेक थरांनी बनलेले व तळाशी घट्ट कोशिकांनी बनलेला आधारस्तर असलेले ऊतक) असते. दगडांवरून व तृणावरून घसरत जाणे ही यांची चलनाची एक विशिष्ट रीत आहे पण ते सरपटत जाऊ शकतात व पोहू शकतात. पर्णकृमी (ट्रिमॅटोडा) व पट्टकृमी (सेस्टॉयडिया) परजीवी असून त्यांच्या शरीरावर बाह्य संरक्षक उपकला असते. पर्णकृमींमध्ये आहारनाल (अन्नमार्ग) असतो पण पट्टकृमीत तो नसतो, त्यामुळे ते पोषकाच्या शरीरातून पोषक द्रव्ये त्वचेमधून घेतात. पर्णकृमी आणि पट्टकृमी या दोहोंनाही पोषकाच्या ऊतकांना घट्ट चिकटण्याकरिता चूषक आणि बहुधा अंकुश आणि अंकुशिका असतात. काही पर्णकमी माशांची त्वचा, पर अथवा क्लोम (कल्ले) यांवर बाह्यपरजीवी म्हणून असतात इतर अनेक पृष्ठवंशी प्राण्यांचे आंत्र, यकृत, फुप्फुसे अथवा वृक्क (मूत्रपिंड) यांत अंतःपरजीवी म्हणून राहतात. प्रौढ पट्टकृमी पृष्वंशी पोषकांच्या आतड्यात केवळ अंतःपरजीवी असतात.


प्रजोत्पादन: पृथुकृमी लैंगिक आणि अलिंगी अशा दोन्ही रीतींनी प्रजोत्पादन करतात. लैंगिक जननात मैथुनानंतर अंड्यांचे निषेचन (फलन) शरीराच्या आत होते. परनिषेचन (एका व्यक्तीच्या अंड्यांचा त्याच जातीच्या दुसऱ्या शुक्राणूंशी-पुं-जनन कोशिकांशी संयोग होऊन फलन होणे) अथवा स्वनिषेचन (एका व्यक्तीच्या अंड्यांचे त्याच व्यक्तीच्या शुक्राणूंमुळे फलन होणे) होऊ शकते. अंडी पीतक-कोशिकांनी (पोषक द्रव्ययुक्त कोशिकांनी) वेढलेली असून त्यांच्याभोवती एक कठीण चिवट कवच अथवा संपुट तयार होते. टर्बेलॅरियात संपुट बहुधा कोकूनमध्ये (संरक्षक आवेष्टनात) ठेवलेले असतात आणि त्यांतच पिलांची वाढ होते. पर्णकृमी व पट्टकृमी यांची अंडी पोषकांच्या शरीरातून बाहेर पडतात आणि ती खाली तरी जातात अथवा पाण्यात फुटून मुक्तप्लावी (स्वतंत्रपणे पोहणारे) डिंभ बाहेर पडतात. यानंतर ते मध्यस्थ पोषकांच्या शरीरात जातात [→जीवोपजीवन].

या संघात अलिंगी प्रजोत्पादन नेहमी आढळते. पुष्कळ टर्बेलॅरियन प्राण्यांचे विखंडनाने अथवा द्विभाजनाने पुनरूत्पादन होते. काहींमध्ये प्राण्यांच्या तात्पुरत्या साखळ्या तयार होतात. पर्णकृमींचे डिंभावस्थेत अलिंगी रीतीने पुनरूत्पादन होते काही पट्टकृमींमध्येही ते याच तऱ्हेने होते. जनन-खंडांची (पुं-आणि स्त्री-जननेंद्रिये एकत्रित असलेल्या शरीराच्या भागांची) उत्पत्ती ही एक अलिंगी प्रक्रिया आहे.

टर्बेलॅरिया व बाह्यपरजीवी पर्णकृमी यांच्यापासून पुष्कळदा प्रौढाशी थोडेबहुत साम्य असणाऱ्या पिलांची उत्पत्ती होते अथवा ज्यांचे प्रौढात लवकर रूपांतरण होते असे डिंभ उत्पन्न होतात. अंतःपरजीवी पृथुकृमी डिंभरूपांच्या एका परंपरेतून जाण्याची शक्यता शक्यता असते आणि जीवन-चक्र पूर्ण होण्याकरिता त्यांना एका किंवा अधिक पोषकांची जरूरी असते या पोषकांपैकी फक्त अंतिम पोषकच पृष्ठवंशी प्राणी असतो. बहुप्रजता (भरपूर प्रजा निर्माण करणे) हे या प्राण्याचे एक लक्षात येण्यासारखे लक्षण आहे. बहुप्रजतेमुळे या प्राण्यांच्या विशेषित जीवन-चक्रातील धोके भरून निघतात. पट्टकृमीचे शरीर फितीसारखे असून ते शीर्ष आणि जनन-खंडांच्या एका मालिकेचे बनलेले असते प्रत्येक जनन-खंडात उभयलिंगी जननेंद्रियांचा एक अथवा कधीकधी दोन संच असतात. अंतःपरजीवी पर्णकृमींच्या डिंभाचे अलिंगी पद्धतीने प्रजनन होते म्हणून एका अंड्यापासून अनेक डिंभ उत्पन्न होतात, ही स्थिती पट्टकृमींमध्ये क्वचितच आढळते. टर्बेलॅरिया आणि बाह्यपरजीवी पर्णकृमी यांच्यापासून कमी संतती उत्पन्न होते, कारण यांच्या जीवन-चक्रात एखादी अवस्था नष्ट होण्याचा धोका कमी असतो.

पर्णकृमीत प्रकाशाच्या उत्तेजनाने एक प्रकारचे एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिन) निर्माण होते. या एंजाइमाच्या व ऑक्सिजनाच्या विक्रियेने अंड्यावरचे झाकण उघडले जाते व त्यातून डिंभ बाहेर पडतो. पट्टकृमीत दुसऱ्या पोषकाच्या शरीरात अंड्याचा प्रवेश झाल्यानंतर अंड्याचे झाकण उघडते व डिंभ बाहेर पडतो.


प्रसार:मुक्तजीवी पृथुकृमी जेथे जेथे ओलावा असतो तेथे तेथे आढळण्याची शक्यता असते. हे कृमी जगात सर्वत्र आढळतात. हे समुद्राच्या खाऱ्या पाण्यात व जमिनीवरच्या गोड्या पाण्यातही राहतात. समुद्रसपाटीपासून २,१०० मी. उंचीवरील पाण्यातही हे आढळले आहेत. बाह्यपरजीवी व अंतःपरजीवी पर्णकृमी व पट्टकृमी जगात सर्वत्र आढळतात. यांच्या जातींचा प्रसार त्या कोणत्या पृष्ठवंशी प्राण्याच्या शरीरावर किंवा शरीरात राहतात, त्या प्राण्याच्या प्रसारावर अवलंबून असतो. काही पृथुकृमींना त्यांचे जीवन-चक्र पूर्ण करण्याकरिता एकापेक्षा जास्त पोषकांची गरज असते, तेव्हा ज्या पृष्ठवंशी प्राण्यांत हे कृमी अंतःपरजीवी जीवन जगतात, त्यांच्याबरोबरच त्यांना जीवन-चक्र पूर्ण करण्याकरिता लागणारे दुसरे पृष्ठवंशी अगर अपृष्ठवंशी पोषक उपलब्ध असतील त्या प्रदेशांतच हे कृमी सापडतात.

टर्बेलॅरियाच्या जाती जमिनीत, रेतीत, सडक्या पानांच्या ढिगाऱ्यात, चिखलात व दगडांखाली आढळतात. अंधारात राहण्याऱ्या जातींत डोळ्यांचा व शरीरावरील रंगांचा ऱ्हास झालेला आढळतो. काही जातींची निरनिराळ्या तापमानांत राहण्याची क्षमताही उल्लेखनीय आहे. क्रेनोबिया अल्पिना ही जाती – ४०° से. ते -५०° से. या तापमानात जिवंत राहू शकते, तर मॅक्रोस्टोमम थमेंल ही जाती उष्ण पाण्याच्या झऱ्यात ४०° से. ते ४७° से. या तापमानात आढळते.

महत्व: या संघातील कृमी फार महत्त्वाचे आहेत कारण यांच्या पुष्कळ जाती मानवासहित निरनिराळ्या पृष्ठवंशी प्राण्यांच्या आंत्रात अंतःपरजीवी म्हणून जगतात. बऱ्याच प्रगत देशांत मांस व इतर खाद्य पदार्थांची योग्य काळजी घेतली जात असल्यामुळे तेथे या अंतःपरजीवी कृमीपासून होणाऱ्या रोगांचा प्रतिबंध होतो पण ज्या देशांत अज्ञानामुळे अर्धवट शिजविलेले मांस अगर योग्य काळजी न घेतलेले खाद्यपदार्थ व पेये वापरली जातात तेथे या कृमींपासून होणाऱ्या रोगांचा जास्त प्रमाणात उपद्रव होतो. बाल्टिक प्रदेशात रुंद पट्टकृमी (डायफायलोबोश्रियम लेटम), दक्षिण अमेरिका व आशियात लहान पट्टकृमी (डायमेनोलेपिस नाना), यूरोप व अमेरिकेत गोमांसात आढळणारा पट्टकृमी (टीनिया सॅजिनाटा) यांचे प्रमाण बरेच आहे. प्रौढ पट्टकृमी पोषकाच्या आंत्रात किंवा पित्तवाहिन्यांत राहतात. यांचे डिंभ मुख्यतः संधिपाद (सांधेयुक्त पाय असलेल्या आर्थ्रोपॉड) प्राण्यांच्या शरीरात राहतात पण सायक्लोफिलिडिया गणातील पट्टकृमींचे डिंभ सस्तन प्राण्यांच्या शरीरात वाढतात आणि पुष्कळदा त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होतात. पट्टकृमींची डिंभरूपे इतर पृष्ठवंशी प्राण्यांतही आढळतात व त्या प्राण्यांच्या प्रकृतीवर त्यांचा अनिष्ट परिणाम होतो. मेंढ्यांत हे डिंभ मेंदूत आढळतात व त्यामुळे या प्राण्यांच्या शरीरावर मोठे गोळे तयार होतात. या गोळ्यांत अनेक डिंभ असतात. असे गोळे मानवी शरीरावरसुद्धा आढळतात व परिणामी त्यामुळे जीवास धोका निर्माण होतो. जेव्हा मनुष्याचा कुत्र्यासारख्या प्राण्याशी निकटचा संबंध येतो तेव्हा त्या प्राण्याच्या शरीरात असलेले डिंभ अन्नातून वा पाण्यातून मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतात.

प्रौढ पर्णकृमी माणूस व इतर प्राणी यांच्यात अतिशय त्रासदायक रोग उत्पन्न करतात. पर्णकृमींच्या सु. ३६ जाती मनुष्याच्या शरीरात अंतःपरजीवी म्हणून जीवन जगताना आढळल्या आहेत. अर्धवट शिजविलेल्या अन्नातून या कृमींच्या डिंभांचा मनुष्याच्या शरीरात प्रवेश होतो. फुप्फुस पर्णकृमी (पॅरॅगोनिमस वेस्टरमनाय) झिंगे, खेकडे या प्राण्यांतून, आंत्र पर्णकृमी (हेटेरोफाइज हेटेरोफाइज आणि मेटॅगोनिमस योकोरवाइ)व यकृत पर्णकृमी (ऑपिस्थॉर्किस सायनेन्सिस) माशांतून व आंत्र पर्णकृमी (फॅसिओलॉप्सिस बस्काय) वनस्पतींतून माणसाच्या शरीरात डिंभरूपाने प्रवेश मिळवितात. रक्तात राहणारे काही पर्णकृमींचे डिंभ पाण्यातून माणसाच्या कातडीद्वारे शरीरात शिरतात. रक्तातील पर्णकृमींमुळे मनुष्याला शिस्टोसोमियासिस [→खंडितकायी-कृमिरोग] या नावाचा रोग होतो. या पर्णकृमींच्या तीन जाती आहेत. या जाती आशिया, आफ्रिका, वेस्ट इंडीज, दक्षिण अमेरिका व अतिपूर्वेकडील प्रदेशात प्रामुख्याने आढळतात. पाळीव प्राण्यांतील यकृत पर्णकृमी (फॅसिओला हेपॅटिका) हा मेंढ्यांच्या यकृतात आढळतो. याचे गवताच्या पानांवर असतात व असे गवत मेंढ्यांनी खाल्ले म्हणजे हे डिंभ त्यांच्या यकृतात जाऊन त्यांचे रूपांतरण होते. तेथे ते अंतःपरजीवी जीवन जगतात आणि परिणामी मेंढीच्या जीवितास घातक ठरतात.

टर्बेलॅरियन प्राण्यांचा इतर काही उपयोग नसला, तरी ⇨पुनर्जननाची प्रक्रिया आणि तिच्यावर होणारा रसायनांचा व प्रारणाचा (तरंगरूपी ऊर्जेचा) परिणाम यांच्या अभ्यासासाठी त्यांचा उपयोग होतो.

पहा : टर्बेलॅरिया ट्रिमॅटोडा पट्टकृमि पर्णकृमी प्रजोत्पादन सेस्टॉयडिया.

संदर्भ :Hyman, L. H. The Invertebrates, Vol.2, Platyhelminthes and Rhynchocoela, New York, 1951.

कर्वे, ज.नी. जमदाडे, ज.वि.