मुंगीखाऊ : (१) तमांडुआ टेट्राडॅक्टिला, (२) सायक्लोपस डायडॅक्टिलस, (३) केपचा मुंगीखाऊ (आर्डव्हॉर्क), (४) पट्टेवाला मुंगीखाऊ.

मुंगीखाऊ : जे स्तनी प्राणी मुंग्या किंवा वाळवी खाऊन आपली उपजीविका करतात, त्यांना मुंगीखाऊ म्हणतात. मुंगीखाऊ प्राणी निरनिराळ्या प्रकारचे आहेत.

एडेंटेटा या स्तनी वर्गाच्या गणात मोडणारा महत्त्वाचा मुंगीखाऊ मार्मिकोफॅजिडी या कुलातला आहे. याचे शास्त्रीय नाव मर्मिकोफॅगा ट्रायडॅक्टिला असे आहे. हा मध्य व दक्षिण अमेरिकेतील उष्ण कटिबंधातील दलदलीच्या व गवताळ प्रदेशांत आणि उघड्या रानात राहतो. याची डोक्यासकट शरीराची लांबी १ ते १·२ मी., शेपटाची लांबी ६५ ते ९० सेंमी. असते. शरीर निमुळते असून पूर्ण वाढ झालेल्या प्राण्याचे वजन सरासरी १८ ते २१ किग्रॅ. असते. रंग करडा असून अंगावर पांढऱ्या कडा असलेला तिरकस काळा पट्टा असतो. केस जाडे भरडे आणि ताठ असतात. शेपूट केसाळ असून त्यावरील केस लांब असतात. डोके लांबट, अरुंद असून मुस्कट लांब नळीसारखे व चिंचोळे असते. त्याच्या टोकाशी तोंड असते. जमिनीवर चालताना पुढच्या पायांची बोटे जमिनीवर टेकलेली असतात. सगळ्या बोटांवर नख्या असतात पण पुढच्या पायांवरील तीन नख्या लांब, मजूबूत व अणुचीदार असतात आणि चौथी लहान असते. मागच्या पायांवरील पाचही बोटांवर पुढच्या पायांच्या नख्यांपेक्षा लहान नख्या असतात.

वाळवी व मुंग्या हे याचे मुख्य भक्ष्य होय. पुढच्या पायांवरच्या नख्यांनी हा वाळवीची व मुंग्यांची वारुळे उकरतो आणि आपल्या लांब, चिकट जिभेने हे कीटक टिपून खातो. जिभेचा तोंडाबाहेर काढलेला भाग सरासरी ६० सेंमी. आणि तिचा व्यास सु. १० ते १५ मिमी. असतो. याला दात नसतात.

मुंगीखाऊ भूचर असून उत्तम पोहणारा आहे. हे प्राणी एकलकोंडे राहतात. एखादी सुरक्षित जागा पाहून शरीराचे मुटकुळे करून व शेपटी अंगाभोवती गुंडाळून तो विश्रांती घेतो किंवा झोपतो. याचा गर्भधारणेचा कालवधी १९० दिवसांचा असतो. मादीला एकावेळी एकच पिलू होते. ती त्याला आपल्या पाठीवर बसवते व पुन्हा गर्भधारणा होईपर्यंत त्याची काळजी घेते.

तमांडुआ टेट्राड्रॅक्टिला ही मुंगीखाऊ जाती दक्षिण मेक्सिकोच्या उष्ण प्रदेशातील जंगलात आढळते. शरीराची लांबी ५४ ते ५८ सेंमी. व शेपूट ५४·५ ते ५५·५ सेंमी. असते. शरीरावर लहान, दाट राठ केस असतात. मागील व पुढील पायांमध्ये काळा पट्टा असतो. असाच काळा पट्टा मानेभोवतीही असतो. काही प्राण्यांचा रंग फिकट पिवळा, तपकिरी किंवा काळा असतो. मधल्या बोटाची नखी तीक्ष्ण व मोठी असते. इतर बोटांवरील नख्या लहान असतात. हे पायांच्या तळव्यांच्या बाहेरील भागावर जोर देऊन चालतात. यांच्या हालचाली जास्त करून अंधार पडल्यावर होतात. हात व तीक्ष्ण नख्यांनी ते शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करतात. मुंग्या, वाळवी व मधमाश्या हे यांचे खाद्य होय. याचे तोंड लहान असते. त्याचा व्यास शिसपेन्सिलीइतका (सु. ५ मिमी.) असतो. यांना दात नसतात. दाताचे कार्य उदराच्या पेषणीसारख्या (ज्यात अन्न बारीक केले जाते त्या स्नायुमय भागासारख्या) काही भागात केले जाते. उत्तेजित झाल्यास हे प्राणी एक अप्रिय असा वास सोडतात. यांच्या विणीबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही.


सायक्लोपस डायडॅक्टिलस ही मुंगीखाऊची आणखी एक जाती उष्ण कटिबंधातील मेक्सिको ते बोलिव्हीया व ब्राझील या भागांत आढळते. याची लांबी १५ ते १८ सेंमी. आहे. शेपूट १८ ते २० सेंमी असून शेपटाच्या खालच्या भागावर केस नसतात. रंग करडा असून डोक्यापासून निघणारी आणि मान व पाठीवर आढळणारी एक काळी रेषा असते. नाकाचे टोक गुलाबी असते, पायाचे तळवे लालसर व डोळे काळे असतात. हाताच्या दुसऱ्या व तिसऱ्या बोटांवरील नख्या लांब, वाकलेल्या व तीक्ष्ण असतात. शेपटी परिग्राही (पकड घेऊ शकणारी) असते. हे निशाचर आहेत. यांच्या विणीबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. आर्डव्हॉर्क किंवा केपचा मुंगीखाऊ हा स्तनी प्राणी ट्युबिलिडेंटाटा गणातील ओरिक्टेरोपस या प्रजातीत मोडतो. हा आफ्रिकेत आढळतो व तेथे याला ‘भू-सूकर’ म्हणून ओळखतात. जेथे कीटकरूपी अन्न पुष्कळ प्रमाणात उपलब्ध असेल, अशा जंगलात किंवा गवताळ प्रदेशांत हे आढळतात. मोठ्या प्राण्याने यांच्यावर हल्ला केला, तर ते स्वतःच्या शरीराचा चेंडूसारखा गोळा करतात व नखांनी हल्लेखोरीशी झुंज देतात. उन्हाळ्यात मादी एक पिलास जन्म देते. वाळवीचा नाश करण्यास हे उपयुक्त प्राणी आहेत. आफ्रिकेतील आदिवासी यांचे मांस खातात. यांच्या दातांची माळ घातल्यास भूतबाधेपासून रक्षण होते, अशी त्यांची समजूत आहे. [⟶ आर्डव्हॉर्क].

खवल्या मांजर या मुंगीखाऊला पँगोलीन असेही म्हणतात. दंडगोलाकार उशी या अर्थाचे हे नाव मलायी भाषेतून आले आहे. याला दात नसल्याने पूर्वीच्या वर्गीकरणात यांचा समावेश स्तनी वर्गाच्या एडेंटाटा या गणात होत होता पण असे आढळून आले की, हे साम्य वरवरचे आहे. म्हणून आता यांचा समावेश फोलिडोटा या गणात केला जातो. फोलिडोटा याचा अर्थ शरीरावर खवले असलेले प्राणी असा होतो. हे खवले एकावर एक चढलेले व हलवता येण्यासारखे असतात. खवल्यांचा रंग पिवळट, तपकिरी किंवा हिरवट असतो. प्रत्येक खवल्याच्या बुडाशी तीन किंवा चार केस असतात. मादीला दोन स्तन असतात. नर मादीपेक्षा मोठा असतो. याला दात नसतात.

हे जमिनीवर किंवा झाडावर एकेकटे किंवा जोडीने राहतात. हे भित्रे आहेत व हळूहळू चालतात. संकटात सापडले, तर शरीराची गुंडाळी करतात. शत्रूला पळविण्यासाठी कधी कधी गुदद्वाराजवळच्या ग्रंथीतून दुर्गंधीयुक्त स्त्रावाचा फवारा फेकला जातो. यांच्या बिळांचा व्यास सु. १५ ते २० सेंमी. व खोली ३·५ मी. असते, बिळात गेल्यावर बिळाचे तोंड बंद करण्यात येते. हे रात्री बाहेर पडतात व मुंग्या, वाळवी व इतर कीटक खातात. दात नसल्यामुळे पोटात खाल्लेल्या मुंग्या व इतर कीटक यांचे चर्वण होते. मांसासाठी यांची शिकार होते. यांचे खवले आदिवासी लोक दागिने म्हणून वापरतात आणि औषधे म्हणून त्यांचा उपयोग करतात.

काही वेळा पँगोलीन मुंग्यांनी स्नान करतो, अशी समजूत आहे. यावेळी तो मुंग्यांच्या वारुळात शिरतो व स्वतःचे शरीरावरचे खवले वर उचलतो. मुंग्या खवल्याखाली गेल्या की, तो आपले खवले जोराने सपाट करतो. यामुळे मुंग्या मरतात. यानंतर तो पाण्यात जातो व पुन्हा खवले वर करतो. मेलेल्या मुंग्या पाण्यात सापडतात व तरंगू लागतात. ऑलिगोसीन व मायोसीन (सु. ३·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांत यांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) सापडले आहेत. [⟶ खवल्या मांजर].

पट्टेवाल्या मुंगीखाऊला शिशुधानी मुंगीखाऊ किंवा नुंबॅट असेही म्हणतात. हा मार्मिकोबिडी कुलातील असून याचे शास्त्रीय नाव मर्मिकोबियस फॅसिएटस असे आहे. याच्या शरीराची डोक्यासकट लांबी १७·५ ते २७·५ सेमी. असून शेपटाची लांबी १३ ते १७ सेंमी. असते. पूर्ण वाढ झालेल्या प्राण्याचे वजन २७५ ते ४५० ग्रॅम असते. शरीराचा रंग तपकिरी किंवा काळा असतो. पाठीपासून शेपटापर्यंत अंगावर सहा किंवा सात पांढरे पट्टे असतात. यामुळे याला पट्टेवाला मुंगीखाऊ म्हणतात. मुस्कट लांबट व टोकदार असते. टोकाच्या शेवटी लहान तोंड असते. जिभेची लांबी १० सेंमी. असते. पायास चार बोटे असतात. सर्व बोटांवर नख्या असतात. छातीवर अनेक रंध्रे असलेली ग्रंथी असते. हा प्राणी शिशुधानी असला, तरी याला पिले ठेवण्यास पिशवी नसते. पिशवीच्या क्षेत्रात चार स्तनाग्रे असतात. जेव्हा पिले स्तन तोंडात घेतात तेव्हा तेथील आजूबाजूच्या लांब केसांमुळे त्यांना छातीला चिकटून राहता येते. या स्थितीतच मादी त्यांना आपल्याबरोबर फिरविते. यांना एकंदर ५२ दात असून ते लहान, नाजूक व एकमेकांपासून विलग असतात. हा प्राणी दिवसा क्रियाशील असतो. झाडांच्या किंवा लाकडांच्या ढोलींत हा राहतो. विणीचा हंगाम सोडल्यास इतर वेळी हा एकटाच फिरतो.

मुंग्या व वाळवी यांवर हा जगतो. नख्यांनी वारूळ किंवा कुजणारी लाकडे फोडून हे जिभेने वाळवी किंवा मुंग्या पकडतात. हे प्राणी नैर्ऋत्य ऑस्ट्रेलियात मोठ्या संख्येने आढळतात. यांचा विणीचा हंगाम जानेवारी ते जून हा आहे. एका वेळी मादी चार पिलांना जन्म देते.

काटेरी मुंगीखाऊला एकिड्‌ना असेही म्हणतात व आदिवासी खाण्यासाठी याची शिकार करतात [⟶ काटेरी मुंगीखाऊ].

इनामदार, ना. भा. भट, नलिनी