सापळा : वन्यप्राणी (सावज) पकडण्यासाठी, त्याला अपंग करण्यासाठी किंवा मारण्यासाठी तसेच लहान किड्यांपासून ते हत्तीएवढी मोठी जनावरे, मासे, पक्षी इ. पकडण्यासाठी सापळ्यासारखी साधने वापरतात. पिंजरे, विशिष्ट जाळी व फास यांचाही अंतर्भाव सापळ्यांत करतात. अगदी पुरातन काळापासून सापळ्यांचा उपयोग होत आला आहे. अन्न व वस्त्र यांची गरज भागविण्यासाठी आदिम माणसाने वापरलेली सापळा ही एक महत्त्वाची प्रयुक्ती आहे. पकडलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे व त्यांच्या कातडीची वस्त्रे तयार करीत असे. अर्थात जगाच्या अनेक भागांत अजूनही सापळे वापरतात. आफ्रिकेतील लोक मांसासाठी माकडे व हरणे सापळे लावून पकडतात. शिकारीचा व मासेमारीचा छंद, अन्न, वस्त्र व इतर कच्चा माल मिळविण्यासाठी सापळे वापरतात. सर्व जगभरात अनेक प्रकारचे सापळे आढळतात. पुरातत्त्वविद्येच्या अध्ययनातून त्यांचा हजारो वर्षांपासूनचा इतिहास लक्षात येतो. या सापळ्यांत साम्य आढळते आणि धातूंचे सापळे प्रचारात येईपर्यंत दीर्घकाळ सापळ्यांत खूप बदल झालेले दिसत नाहीत.

जगभर निरनिराळे सावज पकडण्यासाठी अनेक प्रकारचे सापळे बनविण्यात आले. पकडावयाचा प्राणी, सापळ्यासाठी लागणारे साहित्य आणि शिकाऱ्याचे त्या विषयातील ज्ञान यांनुसार सापळ्याचा प्रकार ठरतो. काही सापळ्यांत प्राणी खड्ड्यासारख्या लहानशा जागेत बंदिस्त होऊन कोंडला जातो तर काहींत प्राणी पकडून ठेवला जाऊन अडकून राहतो किंवा ठार मारला जातो. काही सापळ्यांचे कार्य मानवामार्फत घडवून आणले जाते तर काही स्वयंचलित रीतीने कार्य करतात, म्हणजे सापळ्यातील कळ सावजाकडूनच आपोआप कार्यान्वित होण्याची योजना केलेली असते. जनावरांप्रमाणेच चोरांसही पकडून ठेवण्यासाठी सापळे वापरलेले आहेत.

सापळे परिणामकारक रीतीने वापरता येण्यासाठी सावजाच्या सवयी, त्याची उडी मारण्याची कुवत व त्याच्या सामान्य प्रवृत्ती यांची शिकाऱ्याला माहिती असणे गरजेचे असते. अशी माहिती नसल्यास किंवा तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास सापळे लावण्याचे काम निष्फळ ठरु शकते. प्राचीन काळी माणसाने अशा माहितीचा चांगला उपयोग करुन घेतलेला दिसतो. उदा., हत्ती उडी मारु शकत नाही हे माहीत असल्याने हत्ती पकडण्यासाठी तो खड्ड्याचा वापर करीत असे. रानमांजर व लिंक्स हे प्राणी गरीब स्वभावाचे असून ते गळफासात अडकले, तरी त्यातून निसटून जाण्यासाठी ते धडपड करणार नाहीत, हे त्यास माहीत होते. यामुळे त्याचे काम सोपे झाले. लांडग्याला रक्त फार आवडते हे माहीत झाल्यावर या माहितीचाच उपयोग करुन लांडगे मारण्यात येत. त्यासाठी एका सुऱ्याला रक्त लावून ते गोठू देतात. असा सुरा धार वर करुन पुरतात. लांडगा त्यावरील रक्त चाटू लागला की, सुऱ्याच्या धारेने त्याची जीभ कापली जाऊन तिच्यातूनच रक्त येऊ लागते, हे त्याच्या लक्षात येत नाही. परिणामी तो अधिक जोमाने रक्त चाटू लागतो व आणखी रक्त येते. रक्ताच्या वासाने इतर लांडगे तेथे येतात. नंतर त्यांच्यातच मारामारी होऊन अनेक लांडगे मरतात. आमिष, प्राण्याचा अधाशीपणा, आकमक वृत्ती, उत्सुकता व निष्काळजीपणा यांसारख्या स्वभाव वैशिष्ट्यां चा प्राणी पकडण्यासाठी उपयोग करुन घेता येतो.

मासे पकडताना खूपच कल्पकता वापरावी लागते. मच्छीमारास माशांचा स्वभाव व त्यांच्या हालचालींची तऱ्हा यांची माहिती असणे गरजेचे असते. प्रत्येक प्रकारचा सापळा बनविताना तो माशांना आत शिरायला सोयीस्कर, सोपा आणि बाहेर पडण्यास अशक्य वा अवघड होईल याची काळजी घेतात. या मूलभूत तत्त्वांवर माशांच्या जाळ्यांचे व सापळ्यांचे आकार, आकारमान व स्वरुप ठरते आणि त्यांनुसार सापळ्याचा प्रकार ठरतो. उदा., बुरडी सापळे, गोल पिंजरा, शेवंड्यां चा पिंजरा, कोंडवाडी पिंजरा, सांगला जाळे, कालेव वगैरे. [⟶ मत्स्योद्योग].

काही लोक आर्थिक लाभासाठी सापळ्यांचा उपयोग करतात. फर असलेले बहुतेक प्राणी सापळे लावून पकडतात व या प्राण्यांची फर विकतात. या व्यवसायामुळे १७०० –१९०० शतकांदरम्यान उ. अमेरिकेतील अनेक मंडळी गर्भश्रीमंत झाली होती. कारण शैलीदार (फॅशनेबल) कपडे बनविण्यासाठी या प्राण्यांची फर ते विकत असत. अनेकजण मौजेखातर, छंद म्हणून किंवा व्यवसायाचा भाग म्हणून फर असलेले प्राणी सापळे लावून पकडत उदा., अस्वल, खोकड, मार्टेन, मिंक, चिचुंदरी, रॅकून वगैरे. फरची जोमदार वाढ होत असलेल्या काळातच परवानगी घेऊन असे प्राणी सध्या पकडतात. पकडावयाचा प्राणी, त्याचे वसतिस्थान व हवामानाची परिस्थिती यांनुसार सापळ्याचे आकारमान व प्रकार ठरवितात. प्राण्याच्या चटकन लक्षात न येणारे रंग सापळ्यास देतात. सापळ्याला कोठेही ग्रीज राहणार नाही, याची काळजी घेतात. सापळ्याच्या दोऱ्यांना माणसाचा वास राहू नये म्हणून त्यांना धुरी देतात. प्राण्याला आवडेल असे आमिष सापळ्यात ठेवतात. उदा., खोकडाच्या बाबतीत त्याचेच मूत्र हे आमिष वापरतात. (कधीकधी लैंगिक आकर्षणासाठी लैंगिक ग्रंथीतील द्रव्ये व लैंगिक भाग आमिष म्हणून ठेवतात). तसेच सापळा कृत्रिम वाटू नये म्हणून त्यावर धूळ टाकतात. सापळा लावताना व आमिष ठेवताना हातमोजे वापरतात. सापळा लावणाऱ्यांच्या पावलांच्या खुणा पुसून टाकतात. प्राणी जेथे वारंवार येतात तेथे सापळा लावतात. तो खुंट, झाड वा मोठा दगड यांना साखळ्यांनी बांधून ठेवतात. चिचुंदरी किंवा मिंकसाठी सापळा विशिष्ट रीतीने पाण्यात लावतात. यामुळे त्यात सापडलेला प्राणी चटकन पाण्यात बुडतो. अशा रीतीने सापळ्यात पकडलेले प्राणी अंतःक्षेपण (इंजेक्शन) देऊन, मान मुरगाळून, विषारी वायूने, पाण्यात गुदमरवून किंवा विजेचा झटका देऊन मारतात. नंतर त्याची कातडी काढून केसांसहित नीट टिकावी म्हणून तिच्यावर प्रक्रिया करतात. सध्या कृत्रिम फर तयार केली जाते. तसेच मिंक व चिंचिल्ला यांसारखे फर असणारे प्राणी पैदास केंद्रांत प्रजनन करुन वाढवितात आणि त्यांच्यापासून फर मिळवितात.  [⟶ फर–२].

सुरक्षा तसेच इतर कारणांसाठीही सापळे लावून उपद्रवी प्राणी पकडतात. शास्त्रज्ञ इजा न पोहोचविता प्राणी पकडतात आणि त्यांचे वर्तन व सवयी यांचा अभ्यास करतात. कधीकधी प्रयोगांसाठी शास्त्रज्ञ प्राण्यांचा वापर करतात. कोंबड्या, शेळ्या व मेंढ्या यांना खाणारे लांडगे, खोकड इ. प्राणी शेतकरी सापळे लावून पकडतात. हिरवळ, लाकडी कपाटे व खाद्यपदार्थ यांसारख्या घरगुती गोष्टींचे नुकसान करणारे उंदीर, घुशी, छछुंदर इ. उपद्रवी प्राणी पिंजऱ्यांसारखे सापळे वापरुन पकडतात.

प्रकार : सापळ्यांचे पकडून ठेवणारे, बंदिवान करणारे आणि ठार मारणारे असे तीन मुख्य प्रकार आहेत. अशा सर्व सापळ्यांत आमिष वापरतात मात्र आमिषाची गरज असतेच असे नाही.


पकडून ठेवणारे सापळे : यात प्राणी पकडले जातात परंतु ते मरत नाहीत. खार, सेबल, ससा, रानमांजर, अस्वल, खोकड व रॅकून तसेच फर असलेले इतर प्राणी पकडण्यासाठी खटका यंत्रणा असलेला पोलादी सापळा सामान्यपणे वापरतात. हा सापळा सहज वाहून नेता येतो व टिकाऊ असतो. मात्र त्याला अधिक खर्च येतो. अशा प्रकारचा सापळा भारतात घरातील उंदीर पकडण्यासाठी वापरला जात होता. आता त्याची जागा तारेच्या पिंजऱ्याने घेतली आहे. पोलादी सापळ्यात दोन अर्धऐवर्तुळाकार कड्या असून सापळा लावला असता त्या जमिनीवर पडून एक पूर्ण वर्तुळ तयार होते. एका तरफेमुळे या कड्या आडव्या धरुन ठेवल्या जातात. कड्यांच्या मध्यभागी आमिष ठेवण्यासाठी ताटली असते. आमिष खायला आलेले सावज या ताटलीवर पाय ठेवते. यामुळे ताटली दाबली जाऊन तरफ वर जाते व कड्या मिटल्या जातात. कड्या मिटताना सावजाचा पाय त्यात अडकून ते पकडले जाते. कड्या एकमेकींना घट्टपणे चिकटून राहाव्यात म्हणून मजबूत स्प्रिंगा वापरतात. सावज सापळ्यासह पळून जाऊ नये म्हणून सापळा झाडाला वा जमिनीला घट्टपणे अडकवून ठेवतात.

निरनिराळ्या सावजांसाठी विविध आकारांचे व आकारमानांचे पिंजरे बनवितात. या सापळ्यांचा जबडा स्प्रिंगांच्या मदतीने मिटून त्यात प्राण्याचा पाय पकडला जातो. काही सापळ्यांतील जबड्याला दाते असतात. त्यामुळे पकडला गेलेला प्राणी त्यातून सोडवणूक करुन घेताना जखमी होऊन घायाळ होऊ शकतो. ब्रिटन व अमेरिकेतील काही राज्यांत अशा अमानुष दातेरी सापळ्यांवर बंदी घातलेली आहे.

हरणे व त्यासारखी इतर जनावरे पकडण्यासाठी वा. मेक्सिकोमधील याकी जमातीचे लोक पुढील प्रकारचा सापळा वापरतात. यात एक कोवळे झाड वाकवून त्याला दोराचा फास लावलेला असतो. हा फास एका उतरत्या फळीवर पसरुन ठेवतात. हरीण फळीवर चढले की, त्याच्या वजनाने फळी अटकेतून निसटून खाली पडते. झाडाचा आधार गेल्याने ती फासाची दोरी सरळ होते. असे होताना हरणाचे पुढचे पाय फासात अडकून वर उचलले जातात. हरीण ओरडू लागले की सावज पकडले गेल्याची सूचना शिकाऱ्याला मिळते.

गवा, रानटी घोडा, वाघ व सिंह यांसारखे प्राणी पकडण्यासाठी त्यांच्या नेहमीच्या मार्गात व पिण्याच्या पाण्याच्या जागेजवळ जमिनीत पुरेसा खोल खड्डा करतात. या खड्ड्या वर फांद्या व वेली पसरुन त्यावर माती टाकतात. थोडक्यात तो भाग शेजारच्या जमिनीसारखा दिसेल अशा तऱ्हेने खड्डा झाकतात. या आच्छादलेल्या भागाच्या मध्यभागी आमिष (उदा., मारलेले वा जिवंत शेळीसारखे जनावर) ठेवतात. खड्ड्याच्या कडेला साधारण उंचीचे कुंपण घालतात. त्यामुळे सावजाला आमिषापर्यंत पोहोचण्यासाठी उडी मारावी लागते. सावजाने उडी मारली की, हे तकलादू आच्छादन मोडून सावज खड्ड्यात पडून पकडले जाते.

बंदिवान करणारे सापळे : यात प्राणी इजा न होता बंदिवान होतात. हे सापळे पेटी वा पिंजऱ्यासारखे असतात. पेटीसारख्या सापळ्यात आमिष ठेवतात. ते खाण्यासाठी प्राणी सापळ्यात शिरला की, त्याचे दार बंद होऊन प्राणी बंदिस्त केला जातो. प्राणिसंग्रहालये व संशोधन यांसाठी प्राणिसंग्रा हक व शास्त्रज्ञ पुष्कळदा पेटीसारखे सापळे वापरतात. शास्त्रज्ञ पकडलेल्या प्राण्याला खूणचिठ्ठी अथवा इलेक्ट्रॉनिक ट्रॅकर बांधून परत सोडून देतात, यामुळे नंतर सदर प्राण्याच्या हालचालीचा मागोवा घेता येतो. बागेतील वा घरातील खारीसारखे प्राणी पकडण्यासाठी पेटीसारखा सापळा वापरतात. नंतर हे प्राणी वस्तीपासून दूर सोडून देतात.

ठार मारणारे सापळे : घरात वा धान्य कोठारात अशा प्रकारचे घुशीचे व उंदराचे पिंजरे वापरतात. एका प्रकारच्या सापळ्यात स्प्रिंगने कार्यरत होणाऱ्या धातूच्या गजाने घुशीची मान मोडली जाते. उ. अमेरिकेत कॉनिबीअर हा सापळा व्यापक प्रमाणावर वापरला जातो. यात चिचुंद्र्या वा बीव्हर पकडून मारले जातात. यात दोन भक्कम गजांमध्ये प्राणी पकडला जाऊन चिरडला जातो आणि मरतो. कधीकधी वर उल्लेख आलेल्या खड्ड्याच्या सापळ्यात खड्ड्याच्या तळावर अणकुचीदार भाले उलटे रोवून ठेवतात. त्यामुळे उडी मारल्यावर प्राणी या भाल्यांवर पडून मरतो.

पूर्व आफ्रिकेत हत्तीला मारणारे सापळे वापरले जातात. हत्तीच्या नेहमीच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर असा सापळा लावतात. सापळ्याच्या दोरीला हत्तीचा धक्का लागला की, ती बाजूच्या अडकविण्याच्या खुंटीवरुन निसटते आणि मागील बाजूला जड वजन लावलेले भाल्याचे टोक हत्तीच्या डोक्यावर पडते. (मराठी विश्वकोश : खंड २, पृष्ठ क्रमांक ३२).

यांशिवाय पक्षी व माणूस पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारचे सापळे असतात. उंचावरुन उडत जाणाऱ्या पक्ष्यांना पकडण्यासाठी बारीक दोराचे फास वापरतात. प्रत्येक फास एका लहान खुंटीला बांधून ती खुंटी जमिनीत पुरतात. उघड्या जागेत अशा अनेक खुंट्या जवळजवळ बसवितात. त्या जागेत पक्ष्यांना आवडणारे धान्याचे दाणे टाकतात व उथळ भांड्यात पाणीही ठेवतात. उडणारे पक्षी पाणी व दाणे पाहून तेथे येतात आणि दाणे खाऊ लागतात. दाणे वेचत असताना त्यांचे पाय फासांत अडकतात व पक्षी पकडले जातात. बदक, बगळा, लावा व तितर यांच्यासारखे जलचर पक्षी पकडण्यासाठीही फास वापरतात. या पक्ष्यांचे थवे भक्ष्य शोधीत फिरतात व एकामागून एक असे ओळीने जातात. त्यांच्या वाटेत एक सखल असे कुंपण करतात आणि त्यात फास ठेवलेले असतात. यातून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करताना ते फासात अडकतात. पुढचा पक्षी फासात अडकला, तरी त्याच्या मागचा पक्षीही तसल्याच फासात जाऊन अडकतो. अशा तऱ्हेचे फास एस्किमो लोक वापरतात. दोऱ्यांमध्ये गुंफून ठेवलेले दाणे, पक्षी बसणाऱ्या झाडांवर चिकट पदार्थ लावलेल्या काड्या ठेवणे इ. पद्घतीही पक्षी पकडण्यासाठी वापरतात.

सापळे मुख्यतः प्राण्यांसाठी वापरले जातात. तरीही चोरुन शिकार करणाऱ्या माणसांना पकडण्यासाठी त्यांच्या रानातील वाटांवर सापळे लावण्याची पद्घत होती. एका सापळ्यात धनुष्याला बाण लावून तो चोरट्या  शिकाऱ्याला दिसणार नाही अशा प्रकारे सज्ज ठेवीत. या सापळ्याच्या वाटेत असलेल्या कळीला त्याचा धक्का लागताच बाण सुटून तो त्याला लागतो. दुसऱ्या महायुद्घात जंगलातील युद्घांमध्ये वेताचे धारदार टोकाचे तुकडे, काठ्या वगैरे लपवून रोवून ठेवीत. या सापळ्यात सैनिक अडकत. याच काळात भूसुरुंग, फसवे सापळे इ. आधुनिक प्रकारही वापरण्यात आले. बिस्किटांचा वा सिगारेटींचा डबा वा पेटी हा फसवा सापळा उघडायला गेल्यास स्फोट होऊन माणूस जखमी होतो वा मरतो. तसेच नट्यांची आकर्षक चित्रे वाकडीतिकडी ठेवीत, हा फसवा सापळा असे. ती व्यवस्थित लावण्यासाठी उचलताच स्फोट होऊन उचलणारा जायबंदी होत असे. पोलादी जबड्याचे सापळे पालापाचोळ्यात लपवून ठेवीत. ते मजबूत असल्याने त्यात पकडलेला माणूस त्यातून निसटून जाऊ शकत नसे. मात्र विसाव्या शतकाच्या सुरुवातीला लोकांच्या भावना लक्षात घेऊन माणूस पकडण्याच्या सापळ्यांच्या पद्घती बंद करण्यात आल्या.


सापळा व वन्य जीवांचे संरक्षण : वन्यजीव रक्षक गट प्राणी मारणाऱ्या कोणत्याही सापळ्यावर टीकाच करतात. सतत शिकार होत राहिल्यास विशिष्ट प्राणिजाती पृथ्वीवरुन नामशेष होऊ शकतात. त्यामुळे निसर्गातील जैवविविधतेसंबंधीचे संतुलन बिघडते, असे काहींचे म्हणणे आहे. परजीवभक्षक जीव मारल्याने त्यांचे खाद्य असलेल्या प्राण्यांची (उदा., उंदरासारखे कुरतडणारे प्राणी) संख्या जादा होईल. इतर काहींच्या मतानुसार एखाद्या प्राणिजातीची संख्या खूप वाढल्यास त्यांच्यावर जगणाऱ्या भक्षक जीवांची संख्याही वाढेल, कारण त्यांना अधिक अन्नपुरवठा उपलब्ध होईल.

अनेक देशांनी कायदे करुन वन्य जीवांच्या रक्षणाचे प्रयत्न केले आहेत. यांमध्ये विशिष्ट (संरक्षित) प्राणी पकडण्यास पूर्ण बंदी करणारा कायदा असतो. प्राणी पकडण्यासाठी काही देशांत परवाने देतात. त्यानुसार प्राणी कोठे व केव्हा पकडायचे हे ठरवितात. तसेच एका वेळेस कोणत्या प्राणिजाती व त्यांतील किती प्राणी पकडायचे हेही त्यानुसार ठरवितात. गेट ब्रि टनमध्ये विशिष्ट परिस्थिती वगळता कोणताही वन्य जीव सापळ्यात पकडायला मनाई आहे, मात्र यामुळे पाळीव पशू व पिके यांची गंभीर हानी होणार नाही याची काळजी घेतात. यांमध्ये फळे, लाकूड, इतर प्रकारची मालमत्ता व मच्छीमारी यांचाही अंतर्भाव असतो. वापरावयाच्या सापळ्यांची तपशीलवार वैशिष्ट्ये विनिर्देशित केलेली (ठरविलेली) असतात. सापळे विनिर्देशित ठिकाणी वापरता येतात. अशा प्राण्यांमध्ये उंदीर, घुशी, करड्या , खारी, स्टोट, वीझल आणि जमिनीवरील इतर लहान (पिकांचा नाश करणारे) प्राण्यांचा अंतर्भाव असतो.

नष्ट होऊ घातलेली प्राणिजाती व त्या प्राण्यांपासून बनणारी उत्पादने यांच्या आयातीवर काही देशांनी बंदी घातली आहे. अशा कायद्यांमुळे या जातीचे प्राणी कमी पकडले जातील कारण त्यांना परकीय बाजारपेठ नसेल, असे या कायद्यांच्या समर्थकांचे मत आहे. अर्थात संशोधनासाठी लागणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत मात्र खास परवाने देता येतात.

पहा : आदिवासी फर–२ मत्स्योद्योग.

संदर्भ : 1. Bateman, James A. Animal Traps and Trapping, 1971.

    2. Beals, Ralph L. Hoijer, Harry An Introduction to Anthropology, 1959.

    3. Clawson, George, Trapping and Traching, 1977.

    4. Geary, Steven, Fur Trapping in North America, 1985.

    5. Gerstell, Richard, The Steel Trap in North America, 1985.

    6. Jamison, Rick, Trapper’s Handbook, 1983.

ठाकूर, अ. ना. ओगले, कृ. ह.