रामचंद्रन्, गोपालसमुद्रम् नारायण : (८ ऑक्टोबर १९२२–). भारतीय जीवभौतिकीविज्ञ. प्राणिशरीरातील संयोजी ऊतकांत (कार्यकारी कोशिकांना-पेशींना-आधार देऊन त्यांना एकत्र ठेवण्याचे काम करणाऱ्या कोशिकासमूहांत) आढळणाऱ्या कोलॅजेन या प्रथिनाच्या संरचनेसंबंधी व स्फटिकरचनेच्या निर्धारणाच्या तंत्राविषयी केलेल्या कार्याकरिता विशेष प्रसिद्ध.

गोपालसमुद्रम् नारायण रामचंद्रन्, रामचंद्रनांचा जन्म एर्नाकुलम् (केरळ) येथे झाला. त्यांचे शिक्षण तिरूचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजात व बंगलोर येथील इंडियन इनस्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये झाले. त्यांनी मद्रास विद्यापीठाच्या एम्.ए., एम्. एस्‌सी. व डी. एस्‌सी.या पदव्या संपादन केल्या. बंगलोर येथे त्यांना प्रकाशकी, स्फटिक भौतिकी व स्फटिकविज्ञान या विषयांत सी. व्ही. रामन यांचे मार्गदर्शन लाभले. १९४६-४७ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये अधिव्याख्याते म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९४७–४९ या काळात त्यांना १८५१ एक्झिबिशन शिष्यवृत्ती मिळाल्याने त्यांनी केंब्रीज येथे कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत सर लॉरेन्स ब्रॅग यांच्या मार्गदर्शनाखाली क्ष-किरण विवर्तनासंबंधी [⟶ क्ष-किरण] संशोधन करून पी. एच्.डी. मिळविली. भारतात परत आल्यावर १९४९–५२ या काळात ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये भौतिकीचे साहाय्यक प्राध्यापक होते. १९५२ मध्ये मद्रास विद्यापीठात भौतिकी विभागामध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. या पदांबरोबरच १९६४ पासून मद्रास विद्यापीठाच्या सेंटर फॉर ॲडव्हान्स्‌ड स्टडी इन बायोफिजिक्स या संस्थेचे ते संचालक होते. १९७० मध्ये ते आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये परत आले व तेथे रेणवीय जीवभौतिकीचा विभाग स्थापन करून त्यात जीवभौतिकीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी १९७७ पर्यंत काम केले. अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेत फोगार्टी आंतरराष्ट्रीय विद्वान म्हणून १९७७ पर्यंत काम केले. अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेत फोगार्टी आंतरराष्ट्रीय विद्वान म्हणून १९७७-७८ मध्ये काम केल्यावर बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये १९७८-८१ या काळात गणितीय जीवविज्ञानाचे (नंतर गणितीय तत्त्वज्ञानाचे) प्राध्यापक होते. त्याच संस्थेत १९८४ पासून ते ॲल्बर्ट आइन्स्टाऊन प्राध्यापकपदावर काम करीत आहेत.

मद्रास येथे असताना त्यांनी जैव संयुगांच्या रासायनिक व जैव क्रियाशीलतेच्या दृष्टीने त्यांच्या रेणवीय संरचनेच्या संशोधनास प्रारंभ करून भारतात जीवभौतिकी हे संशोधनाचे एक मूलभूत क्षेत्र म्हणून प्रस्थापित केले. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रारंभी मद्रास येथे व नंतर बंगलोर येथे या विषयात केलेल्या महत्त्वाच्या कार्यात पुढील गोष्टी विशेष उल्लेखनीय आहेत : (१) मानवी ऊतकांत सर्वांत विपुल आढळणाऱ्या कोलॅजेन या प्रथिनाची तिहेरी सर्पिलाकार वलयित वेटोळ्यासारखी संरचना (२) प्रथिनांच्या संरचनेविषयीच्या संशोधनात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारा (ϕψ) – आलेख (हा आलेख रामचंद्रन् आकृती म्हणून ओळखण्यात येतो) (३) स्फटिकांच्या संरचना निर्धारित करण्याच्या तंत्राविषयीचे संशोधन. रोगप्रतिकारकविज्ञान व क जीवनसत्त्व यांसंबंधी रामचंद्रन् यांनी केलेले कार्य आरोग्यशास्त्रातील त्यासंबंधीच्या अधिक संशोधनात उपयुक्त ठरले आहे. ‘संवलन पद्धती’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या तंत्राच्या साहाय्याने त्रिमितीय क्ष-किरण क्रमवीक्षण तंत्राचा विकास झाला. १९८२ नंतरच्या काळात त्यांनी सैद्धांतिक भौतिकी व गणितीय तर्कशास्त्र या विषयात संशोधन करण्यास प्रारंभ केला.

रेणवीय जीवभौतिकीविषयक विविध नियतकालिकांतून त्यांचे शंभराहून अधिक संशोधनपर निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. यांशिवाय त्यांनी स्फटिकीय प्रकाशकी, कोलॅजेनाची रेणवीय संरचना, पॉलिपेप्टाइड व प्रथिने या विषयांवर प्रदीर्घ व्याप्तिलेख लिहिलेले आहेत. फूर्ये मेथड्स इन क्रिस्टलोग्राफी (१९७०) हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. क्रिस्टलोग्राफी अँड क्रिस्टल पर्फेक्शन (१९६३), ॲस्पेक्ट्‌स ऑफ प्रोटीन स्ट्रक्चर (१९६३), ॲडव्हान्सड मेथड्स ऑफ क्रिस्टलोग्राफी (१९६४), कन्फॉर्मेशन ऑफ बायोपॉलिमर्स (२ खंड, १९६७), ट्रिटाइज ऑन कोलॅजेन (१९६७) आणि बायोकेमिस्ट्री ऑफ कोलॅजेन (१९७६) या ग्रंथांचे संपादन व त्यातील काही भागांचे लेखन त्यांनी केलेले आहे.

रामचंद्रन् यांनी अनेक पदे भूषविली असून त्यांतील महत्त्वाची म्हणजे जीवभौतिकीच्या राष्ट्रीय समितीचे सदस्य (१९६१–७६), स्फटिकविज्ञानासंबंधीच्या राष्ट्रीय समितीचे सदस्य (१९६३–७५) व अध्यक्ष (१९६३–७०), कौन्सिल ऑफ इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड बायोफिजिक्स या संस्थेचे सदस्य (१९६९–७२) व या संस्थेच्या विविध उपसमित्यांचे सदस्य आणि थर्ड वर्ल्ड ॲकॅडेमी (रोम) या संस्थेचे संस्थापक सदस्य ही महत्त्वाची होत. करंट सायन्स (१९५१–५७) व जर्नल ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (१९७३–७७) या नियतकालिकांचे ते संपादक होते. तसेच भौतिकी, जीवभौतिकी, जीवरसायनशास्त्र इ. विषयांतील विविध नियतकालिकांच्या संपादकीय मंडळांचे ते सदस्य आहेत. ते इंडियन ॲकेडेमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी, रॉयल सोसायटी (लंडन), रॉयल सोसयटी ऑफ आर्ट्स (लंडन), अमेरिकन सोसायटी ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्स, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस इ. मान्यवर शास्त्रीय संस्थांचे सदस्य आहेत. त्यांना भटनागर पारितोषिक (१९६१), वाटुमल पारितोषिक (१९६४), जॉन ऑर्थर विल्सन पुरस्कार (१९६७), मेघनाद साहा पदक (१९७१), रामानुजन पदक (१९७२), विद्यापीठ अनुदान मंडळाचा जगदीशचंद्र बोस पुरस्कार (१९७६), बोस इन्स्टिटूयटचे जगदीशचंद्र बोस पदक (१९७७), फोगार्टी पदक (१९७८), सी. व्ही, रामन पदक (१९८३), वैद्यकातील बिर्ला पुरस्कार (१९८५), रूडकी विद्यापीठाची सन्माननीय डी. एस्‌सी. पदवी वगैरे बहुमान मिळाले.

भोईटे, प्र. वा.