कमला सोहोनीसोहोनी, कमला : (१८ जुलै १९११–७ सप्टेंबर १९९७). आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आहारतज्ञ व पहिल्या भारतीय महिला जीवरसायनशास्त्रज्ञ. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांच्या भगिनी. जन्म महा-राष्ट्रातील पंढरपूर येथे. सुरुवातीचे शिक्षण इंदूर येथे घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयातील बी.एस्सी. पदवी प्रथम वर्गात प्रथम क्रमांकात मिळविली (१९३३). ही पदवी घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी बंगळुरू येथील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ (आताचे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ‘) या संस्थेकडे अर्ज केला. मात्र त्यांना ‘महिला असल्याने प्रवेश देता येत नाही’, असे कळविण्यात आले. शिक्षणाची जिद्द असल्याने त्यांनी संस्थेविरोधात प्रखर सत्याग्रह करण्याचा निर्धार बोलून दाखविला असता काही अटींवर वर्षभरासाठी त्यांना संस्थेत प्रवेश देण्यात आला. त्यानंतरच त्यांना जीवरसायनशास्त्रात संशोधन करण्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते ⇨ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा पाठिंबा मिळाला. त्यांनी तज्ञ शिक्षक श्री. श्रीनिवासय्या यांच्या सर्वांगीण मार्गदर्शनाखाली निरनिराळ्या प्राण्यांचे दूध व कडधान्ये यांतील प्रथिनांवर केलेले संशोधन मुंबई विद्यापीठाला सादर केले आणि १९३६ मध्ये एम्.एस्सी. पदवी मिळविली.

सोहोनी यांना १९३७ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या ‘स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप’ व ‘सर मंगळदास नथूभाई फॉरिन एज्युकेशन स्कॉलरशिप’ अशा दोन शिष्यवृत्त्या उच्च शिक्षणाकरिता मिळाल्या व त्या इंग्लंडला गेल्या. केंब्रिज येथील ‘सर विल्यम ड्वान इन्स्टिट्यूट ऑफ बायो-केमिस्ट्री’ या संस्थेत त्यांना प्रसिद्ध नोबेल शास्त्रज्ञ ⇨ सर फ्रेडरिक गाउलंड हॉपकिन्स यांचे मार्गदर्शन लाभले. तेथे त्यांनी वनस्पती कोशिकांच्या श्वसनक्रियेवर अभ्यास केला. बटाट्यावर संशोधन करताना त्यांना प्रत्येक वनस्पती कोशिकांत ‘सायटोक्रोम-सी’चा (वनस्पती कोशिकांतील कलकणूंमध्ये आढळणाऱ्या जटिल प्रथिनाचा) शोध लागला. हे प्रथिन श्वसन रंजक असते असे आढळून आले आहे. तसेच सर्व वनस्पती कोशिकांच्या ऑक्सिडीकरणात ‘सायटोक्रोम-सी’चा सहभाग असतो, हे माहीत झाले. हे मूलभूत संशोधन सोहोनी यांनी केंब्रिज विद्यापीठाला सादर करून पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९३९). तोपर्यंत ‘सायटोक्रोम-सी’चे अस्तित्व प्राणिजगतातच असल्याचे ज्ञात होते, मात्र सोहोनी यांच्या संशोधनामुळे सर्व वनस्पती कोशिकांमध्येसुद्धा ते असल्याचे सिद्ध झाले. सोहोनी ह्या केंब्रिज विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय विदुषी ठरल्या.

भारतात परत आल्यानंतर त्यांची नेमणूक दिल्लीच्या ‘लेडी हार्डिंग्ज मेडिकल कॉलेज’मध्ये प्राध्यापक पदावर झाली (१९३९). त्यानंतर त्यांची दक्षिण भारतातील कुन्नूर येथे भारत सरकारच्या ‘न्यूट्रिशन रिसर्च लॅबोरेटरी’ या आहारशास्त्रात संशोधन करणाऱ्या संस्थेत सहायक संचालिका म्हणून नेमणूक झाली. तेथे त्यांनी पोषणशास्त्राचा अभ्यास करून हरभऱ्यातील जीवनसत्त्वे शोधून काढली. आहारात हरभऱ्यातील व लिंबूरसातील जीवनसत्त्वे एकत्र दिली तर रक्तवाहिन्यांचे आवरण मजबूत होते, रक्तस्राव होत नाही, हिरड्यांतून व कातडीखालून होणारे चिवट आजार थोड्याच अवधीत बरे होऊ शकतात हे त्यांनी सिद्ध केले.

सोहोनी १९४७ मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर मुंबईत स्थायिक झाल्या. तेथे त्यांची (रॉयल) ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेत जीवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक झाली (१९४९). याच संस्थेत त्या संचालक पदावर १९६९ मध्ये सेवानिवृत्त झाल्या. तेथे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांबरोबर निरनिराळ्या कडधान्यांतील प्रथिनांवर काम करून त्यातील अ-पाचक घटक वेगळा करून दाखविला. भाताच्या तूसावर काम करून त्यापासून खाण्यायोग्य धान-आटा बनविला. तसेच नीरा या भारतभर सर्वत्र मिळणाऱ्या नैसर्गिक पेयासंबंधी अभ्यास करून त्याचे कुपोषणासाठी होणारे फायदे दाखविले.

नीरेमध्ये क, ब व फॉलिक अम्ल ही जीवनसत्त्वे, लोह आणि फॉस्फरसासारखे क्षार असल्यामुळे ते रोजच्या आहारात उपयुक्त ठरते. नीरेचा मुलांच्या प्रकृतीवर कसा परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी सोहोनी यांनी डहाणूजवळच्या आदिवासी शाळकरी मुलांची तसेच गर्भवती स्त्रियांची निवड केली. त्यांना या मुलांमध्ये हिरड्यातून रक्त येणे व त्या मऊ होणे तसेच पांडुरोग (ॲनिमिया) व खरूज मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले. त्या मुलांना प्रत्येक दिवशी जेवणाव्यतिरिक्त एक ग्लास नीरा पाच महिने देण्यात आली. नीरेमधील क जीवनसत्त्वामुळे हिरड्यातून येणारे रक्त बंद झाले, तर लोहामुळे पांडुरोग बरा झाला. इतर जीवनसत्त्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून खरूज बरी झाली. या कार्याबद्दल त्यांना ‘सर्वोत्तम शास्त्रीय संशोधना ‘चे राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले (१९६०). त्यांच्या या संशोधनात सहभागी झालेल्या २५ विद्यार्थ्यांना एम्.एस्सी. व १७ विद्यार्थ्यांना पीएच्.डी. पदवी मुंबई विद्यापीठाकडून मिळाली.

सोहोनी यांनी निवृत्तीनंतर ‘कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेमध्ये काम सुरू केले. अन्नातील भेसळीबाबत ग्राहकांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी भेसळ कशी ओळखावी याची प्रात्यक्षिके दाखविली व अनेक लेख लिहिले. त्यांनी केलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना मुंबईतील ‘इंडियन विमेन सायंटिस्ट ॲसोसिएशन’ या संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ‘पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ’ म्हणून गौरविण्यात आले, तर नवी दिल्लीच्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या संस्थेने त्यांचा जीवनगौरव प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला. त्यांनी स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवर संशोधन करून अनेक लेख लिहिले. या विषयावर त्यांनी आहार-गाथा (आहार व आरोग्य विचार) हे पुस्तक लिहिले (१९९६).

सोहोनी यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले.

संदर्भ : १. धुरू, वसुमती, विज्ञान विशारदा, पुणे, २००७.

           २. सोहोनी, कमला, आहार-गाथा (आहार व आरोग्य विचार), पुणे, १९९६.

घोडराज, रवीन्द्र