कार्यविधि अभियांत्रिकी : (मेथड्‌स एंजिनियरिंग). कारखान्यांतील किंवा कार्यालयांतील कार्यविधी (काम करण्याच्या पद्धती) सुधारून त्यावर होणारा खर्च कमी करण्या‌करिता वापरण्यात येणारे शास्त्र. कोणतेही कार्य अधिक सुलभ रीतीने आणि कमीतकमी खर्चात करण्याचा प्रयत्न या शास्त्रात केला जातो. कोणत्याही कामातील प्रत्येक क्रियेचे अभ्यासपूर्वक विश्लेषण करून त्यात जो जरूर नसेल तो भाग वगळला जातो. तसेच जरूर असलेले कार्य जलद, सफाईने व परिणामकारक होण्यावर भर दिला जातो.

व्याप्ती व उपयोग : कार्यविधी अभियांत्रिकीच्या उपयोगाने कारखाने, इमारती, यंत्रसामग्री, कार्यालये इत्यादींचे अभिकल्प (आराखडे) व आखणी (मांडणी) चांगली होतात काम करण्याची परिस्थिती व तेथील पर्यावरण (आसमंत) यांत सुधारणा होते संबंधितांचे आरोग्य व सुरक्षा ह्यांचे मान सुधारते उपलब्ध असलेल्या साधनांचा अधिक चांगला उपयोग केला जातो माल अधिक क्षमतेने हाताळला जातो कार्याचे प्रमाणीकरण होऊन त्याचा वेग वाढतो उत्पादनाचा दर्जा सुधारून अस्वीकार्य नगांची प्रमाणे कमी होतात प्रशासनात सुधारणा होऊन उत्पादनक्षमता वाढते आणि एकूण निर्मितीची किंमत कमी होऊन नफ्यात वाढ होते. या तंत्राचा उपयोग कारखाने, कार्यालये, उपहारगृहे, दवाखाने, बॅंका, मालगुदामे इ. ठिकाणी केला जातो.

इतिहास : या शास्त्राचा इतिहास हा उद्योगधंद्यांचाचा इतिहास आहे. जेथे कारखाने आहेत तेथे ओघानेच व्यवस्थापन आहे. एकोणिसाव्या शतकापर्यंत मालकीहक्कामुळे कारखान्यांचे व्यवस्थापन हे वंशपरंपरेवर आधारित होते. तेव्हा साहजिकच नव्या व्यवस्थापकाला वडिलधाऱ्यांकडून ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा मिळायचा आणि त्या अनुभवाने कारखान्याची सुधारणा व्हायची. एफ्‌. डब्ल्यू. टेलर (१८५६—१९१५) यांनी प्रथम धंद्यातील व्यवस्थापनाचा शास्त्रीय दृष्ट्या विचार केला व शास्त्रीय व्यवस्थापनाकडेही धंदा या दृष्टीने लक्ष दिले. पुढे समाजात स्थित्यंतरे झाली. मानव म्हणजे यंत्र नाही ह्याची जाणीव झाली. मानवी मूल्यांचा विचार होऊ लागला. कामगारां‌ची स्थिती सुधारण्याकरिता नवीन कायदे झाले. समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, जीववैज्ञानिक आणि अभियंते यांनी उत्पादन कार्यात मानवाचे प्राधान्य दाखवून दिले. कामातील कार्यक्षमता, अभिप्रेरणा, काम चांगले केल्याचे समाधान व उत्पादन यांचा कामगाराशी आणि त्याच्या पर्यावरणाशी असलेला कार्यकारण संबंध दाखवून दिला. या सर्व जाणिवांतूनच कार्यविधी अभियांत्रिकीचा जन्म दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात झाला. नंतर या धंद्यात विशेषज्ञताही आली व त्याचे आता एक स्वतंत्र शास्त्र बनले आहे.

कार्यपद्धती : या शास्त्राच्या तंत्रांत कार्यविधी, साधनसामग्री व काम करण्याची परिस्थिती यांच्या प्रमाणीकरणाचा समावेश होतो. प्रमाण पद्धतीने काम करण्यास कर्मचाऱ्यास किती वेळ लागतो हे कामकालमापन करून ठरविले जाते आणि प्रत्येक कर्मचाऱ्यास त्या प्रमाण पद्धतीने काम करण्यास शिकविले जाते. वस्तू तयार करण्याच्या चालू विधीचा सांगोपांग अभ्यास करून नवीन अधिक कार्यक्षम विधी योजला जातो. नवीन वस्तू निर्माण करावयाची असल्यास तिचा विधी व त्यातील निरनिराळ्या क्रिया यांचे विश्लेषण करून त्यांचे एक रेखाचित्र बनवितात. वस्तूच्या उत्पादनपद्धतीचा अभ्यास करून त्यात शीघ्रता आणण्याचा व काटकसर करण्याचा प्रयत्न केला जातो.

कोणत्याही तयार होणाऱ्या वस्तूच्या कार्यविधीमध्ये सुधारणा करताना पुढील विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात : (१) सध्या कोणत्या पद्धतीने काम चालले आहे ? (२) त्याकरिता कोणते साहित्य वापरले जाते आहे ? (३) कोणती हत्यारे व साधने वापरली जात आहेत ? (४) तयार होणाऱ्या वस्तूची रचना कशी आहे ?

विधीचा तक्ता किंवा प्रवाह-रेखाचित्र विश्लेषिताना किंवा तयार करताना त्यातील प्रत्येक बाबीविषयी पुढील प्रश्न विचारावेत – काय, का, कोण, कोठे, केव्हा, कसे ?

(१) काय चालले आहे ? (२) कार्याचे कारण काय ? ते का केले पाहिजे ? त्यातील प्रत्येक भाग केलाच पाहिजे का ? (३) कोण काम करीत आहे ? तोच ते का करीत आहे ? ह्यापेक्षा चांगल्या रीतीने कोण करील ? थोडा फेरफार केल्यास कमी कुशल माणूस हे कार्य करील का ? (४) कोठे काम चालले आहे ? तेथेच का ? दुसऱ्या कोठे कमी खर्चात जमणार नाही का ? (५) केव्हा काम केले जाते ? त्याच वेळी का ? इतर कोणत्या वेळेस काम जास्त चांगले होणार नाही का ? (६) कार्य कसे केले जाते ? तसेच का केले जाते ? या सर्व बाबी विचारात घेतल्यावर कार्यवाहीतील पुढची पायरी म्हणजे : (१) जरूर नसलेली सर्व कामे कमी करणे, (२) आवश्यक क्रिया चालू ठेवणे, (३) क्रियांचा अनुक्रम लावणे व आवश्यक असल्यास बदलणे, (४) जरूर त्या क्रिया सोप्या करणे.

ह्याकरिता विधीचे काळजीपूर्वक ‌परीक्षण व विश्लेषण आवश्यक असते. उदा., फळे लाकडी फळ्यांच्या बंद पेट्यांतून पाठवण्यापेक्षा पट्ट्यांच्या पेट्यांतून पाठवल्यास वजन, वाहतूक व एकूण खर्च ह्यांत कपात होईल. शिसपेन्सिल संपताना जो शेवटचा भाग उरतो त्यातील शिसे निरूपयोगी असते. तेवढे शिसे कमी वापरल्याने दहा टक्के तरी बचत होईल.

प्राथमिक विश्लेषण तंत्रात ‘हे कार्य का केले जाते’ ह्याचा विचार करण्यावर भर दिला जातो. ह्याचा शोध करण्यास विधी रेखाचित्र विश्लेषण, क्रिया विश्लेषण व प्रतिदर्श (नमुना) तपासणी ह्यांचा उपयोग केला जातो. जेव्हा जरूर नसलेली कार्ये कमी करून सुधारणा घडवून आणतात तेव्हा तपशीलवार विश्लेषण तंत्र वापरले जाते. ह्या तंत्रात गति-अध्ययनाचा विचार केला जातो. प्रत्येक घटकाची किंवा मानवी अवयवाची गती अभ्यासली जाते.

गति-अध्ययनामुळे कार्य जास्त सोप्या पद्धतीने व कमी श्रमात कसे केले जावे, हे समजणे शक्य होते व त्या दृष्टीने उपाय योजता येतात. एक पद्धत म्हणजे कार्याचे नुसत्या डोळ्यांनी अवलोकन व अध्ययन करणे. कामाची जलद पुनरावृत्ती होत असेल, तर सूक्ष्मगतीने अध्ययन करणे जरूर असते. उदा., रत्नागिरीत आंब्याच्या मोसमात आंबे कापून डबाबंद करतात. हा डबाबंदीचा (कॅनिंगचा) धंदा मोठा असून हजारो कामगार-तास आंबे कापण्यात जातात. कापण्याचे काम जास्त जलद कसे होईल ? कापण्याच्या क्रियेचे गति-अध्ययन करण्यासाठी चलचित्र कॅमेऱ्याचा व अवधिमापन साधनाचा उपयोग केल्यास कार्यातील प्रत्येक टप्प्यास किती वेळ लागतो व दोष कोठे आहे, हे ध्यानी घेऊन सुधारणा करता येईल आणि मजुरी वाचवता येईल.

आवर्तन-आलेख तंत्राने गतिमार्गाने ‌त्रिमितीय ज्ञान होते आणि ‌गतिमार्गाचा सखोल अभ्यास करता येतो. गतिमान भागाला (उदा., कामगाराच्या हाताला) दिवा जोडला जातो व त्या दिव्याची हालचाल चित्रित केली जाते. काल-आवर्तन आलेखात काळ्या पृष्ठभूमीवर पांढऱ्या रेषांच्या रूपाने चित्र दिसते. या पद्धतीत दिवा एका वि‌वक्षित आवृत्तीने चमकत असतो. त्यामुळे चित्रात बिंदू दिसतात. बिंदूंची संख्या मोजून गतिमान भागाच्या हालचालीला लागलेला वेळ मोजता येतो. अशा रीतीने कार्यविधी-कालमापन होते. शीघ्र चित्रण अध्ययनात चलच्चित्र अतिशय मंद गतीने घेतले जाते, पण नेहमीच्या गतीने पडद्यावर प्रक्षेपित केले जाते. सर्व‌साधारणत: एका मिनिटाला साठ किंवा शंभर चित्रे काढली जातात. त्यामुळे माणसाची कार्यगती पूर्णपणे निरीक्षण करणे सोपे जाते. तसेच वस्तूची गती, तिचा प्रवास व ती हाताळण्याची उपकरणे ह्या सर्वांचे नीट निरीक्षण करता येते. हा अभ्यास स्वयंपाकघरातील कामे करणे, दातांची दुरुस्ती करणे, पूर्वविरचित घरांचे बांधकाम करणे, शहरातील केर उचलणे, मालगुदामातील सामानाची चढउतार करणे इ. क्रियांच्या निरीक्षणास फार उपयुक्त आहे. तसेच प्रक्रियेत किंवा साधनसामग्रीत काय सुधारणा हव्यात तेही या पद्धतीने समजू शकते. त्याच त्याच कामाची हजारो वेळा पुनरावृत्ती होत असेल, तर माणसाऐवजी यंत्राचा वापर फायदेशीर होईल की नाही हेही या अभ्यासाने कळते.

ह्यानंतरचे महत्त्वाचे कार्य म्हणजे प्रमाणीकरण होय. एकदा कामाची नवीन पद्धत अमलात आणण्याचे ठरले की, माल, यंत्रे, हत्यारे आणि कार्यपरिस्थिती ह्या सर्वांचे शक्यतो प्रमाणीकरण केले जाते. कामगारास त्याप्रमाणे कामाचे प्रशिक्षण दिले जाते. कमी वेळात जास्त काम कसे होईल ह्यावर येथे भर दिला जातो. त्यानंतर या पद्धतीचे टिपण केले जाते. त्यास प्रमाण पद्धती म्हणतात. अर्थात प्रमाण परिस्थिती सदैव कायम असेल, तरच प्रमाण कार्य होऊ शकेल आणि प्रमाण दर्जाचा माल उत्पन्न होईल.


ह्यानंतरचा टप्पा म्हणजे कार्यमापन होय. या प्रायोगिक कामासाठी एक योग्य चालक निवडला जातो. त्यास कामाची संपूर्ण पद्धत समजावून दिली जाते. थांबत्या घड्याळाने कामाच्या प्रत्येक भागाला किती वेळ लागतो हे पाहिले जाते. नंतर वैयक्तिक गुण, कामामुळे येणाऱ्या थकव्याचा प्रभाव आणि इतर आनुषंगिक गोष्टी विचारात घेऊन ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल ते काढले जाते. याला त्या कामाची प्रमाण वेळ म्हणतात.

या प्रयोगासाठी चालकाची निवड करण्यापूर्वी तो एक कामगार आहे, या दृष्टिकोनातून त्याच्यासंबंधी पुढील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ह्या कार्यात चालकाला मिळणारे प्रेरक वेतन फार महत्त्वाचे आहे. चालकाला त्या कामाचा अभिमान वाटला पाहिजे, काम केल्याचे त्यास समाधान वाटले पाहिजे, कार्यपरिस्थिती व पर्यावरण कामास पोषक असले पाहिजे, त्यास कामाबद्दल हौस वाटली पाहिजे आणि तो त्या कामाबद्दल अभिप्रेरित झालेला असला पाहिजे. ह्याकरिता प्रत्येक व्यक्तीस आवडणारे व ज्यात तो कुशल असेल असेच काम दिले पाहिजे. निवडल्या जाणाऱ्या व्यक्तीची योग्यता व कामाविषयी त्याची प्रवृत्ती ह्या गोष्टीही दक्षतेने घेतल्या पाहिजेत. सारांश, वरील गोष्टी विचारात घेऊन चालकाची निवड केल्यास त्याचे मनोधैर्य टिकून त्याची कार्यक्षमता चांगली राहील.

वरील विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होईल की, कार्यविधी अभियांत्रिकीचा मुख्य उद्देश म्हणजे कोणतीही कार्य करण्याची पद्धती क्षमतेने व सुसूत्रपणे आखून वेळेची बचत करून कार्य जलद व प्रभावीपणे होणे हा आहे.

पहा : व्यवस्थापनशास्त्र.

संदर्भ : 1. Barnes, R. M. Motion and Time Study, Bombay, 1958.

2. Mundel, M. Motion and Time Study, Englewood Cliffs, New Jersey, 1960.

3. Pennathur, K. The Citizen’s Guide to Work Study, New Delhi, 1967.

4. Pennathur, K. A Manual of Method Study, New Delhi, 1966.

शहा, मो. गु.