मूल्य अभियांत्रिकी : एखादी वस्तू, प्रक्रिया किंवा सेवा यांच्या विविध घटकांच्या कार्याची विधायक दृष्टिकोनातून व पद्धतशीरपणे छाननी करून त्यांचे (घटकांचे) कार्य व उपयुक्तता कोणत्याही तऱ्हेने कमी न होता कमीत कमी परिव्ययात (खर्चात) उपलब्ध करून देण्याच्या तंत्रास मूल्य अभियांत्रिकी किंवा मूल्य विश्लेषण असे म्हणतात. वस्तूचे मूल्य परिस्थितीवर अवलंबून असते उदा., गार पाण्याचे मूल्य वाळवंटात थंड हवेच्या ठिकाणापेक्षा जास्त असेल. तसेच उपयुक्ततेनुसार मूल्य जास्त होते. वस्तूच्या ज्या गुणामुळे तिची कार्यक्षमता किंवा ग्राहक पसंती वाढून विक्री वाढते त्या गुणास कार्य असे म्हणतात. ग्राहक एखाद्या वस्तूची पसंती कोणत्या गुणावर करतो, हे विविध परिस्थितींवर अवलंबून असते उदा., बाह्य स्वरूप, दीर्घकालीन टिकाऊपणा, प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून किंवा फारशी देखभाल न लागणे इत्यादी. ग्राहकांच्या प्रतिक्रियेचा अभ्यास करून हे ठरवावे लागते. प्रत्येक मूल्य विश्लेषणात कार्यक्षमता किंवा उपयुक्तता कमी न होता वस्तूची किंमत कमी करणे हा मुख्य उद्देश असतो.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात यंत्रनिर्मितीस लागणाऱ्या पदार्थांचा तुटवडा भासू लागल्यावर पर्यायी पदार्थ व प्रक्रिया यांचा शोध सुरू झाला व असे दिसून आले की, यंत्रांची कार्यक्षमता कमी न होता पर्यायी पदार्थ, तसेच पर्यायी प्रक्रिया वापरणे शक्य आहे. महायुद्धानंतरच्या काळात सुद्धा अंतर्गत व परदेशी स्पर्धेमुळे वस्तूंच्या किंमती कमी करण्याची निकड भासू लागली.  पर्यायी पदार्थ शोधण्याच्या तंत्राचा उपयोग उत्पादन खर्च कमी करण्यात केला जाऊ लागला.  या प्रयत्नातून मूल्य अभियांत्रिकीचा उगम झाला. एल्. डी. माइल्स या अमेरिकन अभियंत्यांनी या नवीन तंत्राला पद्धतिबद्ध रचनेचे स्वरूप दिले  व मूल्य अभियांत्रिकी व्यवस्थापनातील एक नवे कार्यक्षेत्र उपलब्ध झाले आहे.

उत्पादन उद्योगाच्या स्वरूपावर मूल्य अभियांत्रिकी समूहाची संघटना अवलंबून असते. ह्या समूहातील तंत्रज्ञांना विविध पदार्थ व प्रक्रिया यांचे ज्ञान असावे लागते, तसेच त्यांचा संबंध निरनिराळ्या विभागांतील विविध स्थरांवरील विशेषज्ञांशी येत असल्यामुळे त्यांच्यात परस्परांमध्ये सामंजस्य साधण्याचे कौशल्य असणे जरूरी असते. कार्यनिष्ठ औद्योगिक व्यवस्थापनातील मूल्य अभियांत्रिकी समूहाचे स्थान अभियांत्रिकी विभाग किंवा सामग्री व्यवस्थापन असा स्वतंत्र विभाग असल्यास त्या विभागात असते परंतु मूल्य अभियांत्रिकी तंत्रात एखाद्या वस्तूचा उत्पादन खर्च कमी करावयाचा असल्यामुळे त्या वस्तूचा अभिकल्प (आराखडा), वापरलेले पदार्थ व उत्पादन प्रक्रिया यांमध्ये बदल करणे अपरिहार्य असते. प्रस्थापित व्यवस्थेत बदल करताना नेहमीच विरोध होतो म्हणून मूल्य अभियांत्रिकी घटकाचा जास्तीत जास्त उपयोग करावयाचा असल्यास व्यवस्थापनातील उच्च स्तरातील अधिकाऱ्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. ज्या व्यवस्थापनात या तंत्राचा योग्य तो उपयोग केला गेला आहे त्या ठिकाणी मूल्य अभियांत्रिकी कार्याकरिता केलेल्या खर्चाच्या दसपट फायदा झालेला आहे, असे दिसून येते. भारतातील संरक्षण दलात मूल्य अभियांत्रिकी समूह स्थापन झाला आहे.

वस्तूच्या उत्पादनात अभिकल्प, रेखाचित्रे तयार करणे, आद्यनमुना (आकार, अभिकल्प व कार्यमान या दृष्टींनी संपूर्णपणे मूल्यमापन करण्यासाठी उपयोगी पडेल असा नमुना) तयार करणे, महोत्पादन करणे इ. टप्पे असतात. कोणत्याही टप्प्यात मूल्य विश्लेषण करता येते. मूल्य विश्लेषणास वस्तूची निवड काळजीपूर्वक करावी लागते. जटिल (गुंतागुंतीची) रचना असलेली, बाहेरून विकत घेतलेले किंवा आयात केलेले घटक असलेली किंवा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावयाची वस्तू मूल्य विश्लेषणास योग्य असते.

टप्पे : मूल्य अभियांत्रिकी तंत्राचे किंवा विश्लेषणाचे साधारणपणे माहिती संकलन, संकल्पनात्पक, विश्लेषणात्मक, निर्णयात्मक आणि कार्यवाही असे पाच टप्पे पडतात.

माहिती संकलन टप्पा : वस्तूच्या प्रत्येक घटकाचे एक-दोन शब्दांत कार्य ठरविणे, प्रत्येक घटकाचा परिव्यय, साठा, उत्पादन पद्धत, कर्मशाळेतील रेखाचित्रे, नमुने यांची, तसेच इतर विभागांतील तंत्रज्ञ किंवा विकत घेतलेल्या घटकांसंबंधी विक्रेत्यांकडून संपूर्ण माहिती मिळवावी लागते.  इतर विभागांनी मिळविलेल्या माहितीपेक्षा जास्त माहिती मूल्य विश्लेषण विभागाला मिळवावी लागते. या माहितीवरून जास्त खर्चाचे किंवा अनावश्यक खर्चाचे घटक कमी करून टाकता येतात. उत्पादन प्रक्रियांच्या माहितीवरून विविध भागांच्या मापांच्या त्रृटिसीमा वाजवीपेक्षा जास्त अरूंद असणे, कमी किंमतीचा प्रमाणित भाग उपलब्ध असताना मुद्दाम तयार केलेला भाग वापरणे, नुकसानकारक प्रक्रिया अंतर्भूत असणे इ. गोष्टी निदर्शनास येतात. अभिकल्पासंबंधीच्या माहितीवरून विविध घटकांचा वाजवीपेक्षा जास्त सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अभिकल्प केलेला असल्यास लक्षात येते.

संकल्पनात्मक टप्पा : प्रत्येक घटकाच्या कार्याचा आणि ते कार्य करण्याकरिता वापरलेल्या पद्धतीचा विधायक दृष्टिकोनातून विचार करून विविध पर्यायी पद्धतीचा विधायक दृष्टिकोनातून विचार केला जातो. अस्तित्त्वात असलेल्या पद्धतीच्या मूलतःच विरुद्ध असलेल्या संकल्पनांचा सुद्धा या वेळी विचार केला जातो.  उत्पादन व्यवस्थापनातील विविध विभागांतील (उदा., अभियांत्रिकी विभाग, सामग्री पुरवठा विभाग, उत्पादन विभाग) तंत्रज्ञांना समाविष्ट करून विविध संकल्पनांच्या संबंधी विचारमंथन केले जाते. या टप्प्यात उत्पादन परिव्यय ५० टक्क्यांपेक्षा जास्त कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते. त्यामुळे नवीन नवीन संकल्पनांना चालना मिळते.

विश्लेषणात्मक टप्पा :  मागील टप्प्यात उपलब्ध झालेल्या सर्वच संकल्पना अभियांत्रिकीदृष्ट्या बरोबर असतीलच असे नाही. वस्तूच्या मूल्यात होणारी वाढ, विहीत कार्य, उपयुक्तता व त्यावर होणारा परिव्यय या सर्वांचा विचार करून त्यांपैकी काही संकल्पना अधिक विचारासाठी निवडल्या जातात.

निर्णयात्मक टप्पा : विश्लेषणात्मक टप्प्यात निवडलेल्या संकल्पनांतील जास्तीत जास्त चांगल्या संकल्पनांबद्दल त्या अमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून अधिक माहिती मिळविली जाते. त्याकरिता व्यवस्थापनातील इतर विभागांतील किंवा जरूर असल्यास बाहेरील तज्ञांची मदत घेतली जाते. एक-दोन पर्यायी योजना तयार केल्या जाता.

कार्यवाही टप्पा : मूल्य अभियंता मागील टप्प्यात निवडलेल्या एका योजनेची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनातील उच्च व्यवस्थापक व प्रत्यक्ष कार्यवाही करणारे इतर विभागांतील अधिकारी यांना योजना पटवून देण्याचे कार्य करतो. कोणताही बदल सुचविताना त्याला निनिराळ्या स्थरांवर विरोध होणार हे लक्षात घेऊन त्याने धोरणीपणे इतरांचे सहकार्य मिळविले पाहिजे. त्याकरिता दुसरी पर्यायी योजना तयार ठेवून जरूर असल्यास वैचारिक देवघेव करण्याची तयारी ठेवून परिव्यय कमी करण्याचे ध्येय गाठले पाहिजे.

कार्यनिष्ठ व्यवस्थापनात मूल्य अभियांत्रिकी समूहाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालेले आहे. ह्या समूहातील तज्ञांना ह्या कामात एक प्रकारची सूक्ष्मदृष्टी आलेली असते कारण व्यवस्थापनातील इतर विभागांतील तज्ञांना अशा तऱ्हेचे विश्लेषन करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. मूल्य विश्लेषण या तंत्राचा उत्पादन क्षेत्राच्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रांतही उपयोग होऊ लागला आहे (खरेदी विभाग, आवेष्टन विभाग, यंत्र परिक्षण विभाग इ.). ⇨ पर्याप्तीकरण तंत्रामध्येही मूल्य विश्लेषण पद्धतीचा उपयोग केला जात आहे.

पहा :  व्यवस्थापनशास्त्र.

संदर्भ :  1. Maynard, H. B. Handbook of Business Management, New York, 1967.

              2. Miles, L.D. Techniques of Value Analysis and Engineering, New York, 1961.

सप्रे, गो. वि.