बोटांचे ठसे : (अंगुलिमुद्रा). बोटांच्या तळहाताकडील त्वचेवरील विशिष्ट रेषा व दोन रेषांमधील खोलगट भागाचा, त्वचेवर ओलसर पदार्थ लागल्यामुळे किंवा बोट एखाद्या पदार्थाला लागल्यामुळे जो ठसा वस्तूवर उमटतो त्याला बोटाचा ठसा म्हणतात. थोडक्यात बोटांच्या तळहाताकडील त्वचेच्या विशिष्ट रचनेमुळे उमटणाऱ्या ठशांना बोटांचे ठसे म्हणतात व या ठशांचा अभ्यास ज्या शास्त्रात करतात त्याला ‘अंगुलीमुद्राशास्त्र’ अथवा बोटांच्या ठशांचे शास्त्र म्हणतात. या रेषांचे वैशिष्ट्य असे की, त्या जन्मापासून बाह्यत्वचा व अंतस्त्वचा या दोन्हींवर असतात. तसेच आयुष्यभर त्या कायम असतात. बोटांवर जखमा करून किंवा भाजून या रेषांचे मूळ आकृतिबंध नष्ट करण्याचा प्रयत्न सराईत गुन्हेगार केव्हा केव्हा करतात परंतु जेव्हा संपूर्ण त्वचा अधस्त्वचेसहित अथवा सत्यत्वचेसहित (म्हणजे अंतस्त्वचेच्या खालील थरासहित) नाश पावते तेव्हाच आकृतिबंध नाहीसे होतात. टी. जे. डेव्हिड या शास्त्रज्ञांनी १९७० मध्ये उदरगुहीय रोगात (ग्लुटेन नावाचे अन्नातील प्रथिन पचविण्याची अक्षमता असलेल्या, मोठे पोट, क्षुधानाश, अतिसार इ. लक्षणे असलेल्या लहान मुलांतील विकृतीत) बोटांवरील रेषांचे आकृतिबंध तात्पुरते नाश पावतात किंवा बदलतात, असे दाखवून दिले आहे.

कोणत्याही दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे, अगदी एकयुग्मजीय (एकाच अंडापासून तयार झालेल्या) जुळ्यांच्या बोटांचे ठसेसुद्धा सारखे नसतात. १८९३ मध्ये इंग्लंडमध्ये गुन्हेगारांची ओळख पटविण्याच्या साधनांची चौकशी करण्याकरिता नेमलेल्या ‘ट्रुप कमिटी’ ने नमुद केले आहे की, ‘दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे जुळण्याची शक्यता ६४ अब्जांत १ एवढी आहे’. एका अंदाजाप्रमाणे जागतिक लोकसंख्येच्या तीस पटींनी अधिक एवढ्या माणसांत दोन व्यक्तिंच्या बोटांचे ठसे जुळण्याची शक्यता फक्त एकदाच आहे. ज्योतिषशास्त्रज्ञ सूर्य पूर्णपणे थंड पडण्यास जो काळ लागेल असा अंदाज करतात, त्या काळात केवळ एकदाच दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे जुळण्याची शक्यता आहे.

गुन्ह्याच्या शोधात बोटांच्या ठशांप्रमाणेच कधी कधी पावलांचे ठसेही महत्त्वाचे ठरतात. प्रस्तुत नोंदीत पावलांच्या ठशांविषयीही माहिती दिली आहे.

इतिहास : इतिहासपूर्व काळातील बोटांच्या ठशांसारखे आकृतिबंध काही ठिकाणी सापडले आहेत. काही इष्टिकाग्रंथांतून (विटेसारख्या वस्तूवर कोरलेल्या ग्रंथातून) व प्राचीन कागदपत्रांतून बोटांचे ठसे आढळले आहेत परंतु त्यांचा नक्की उद्देश अजूनही अज्ञात आहे. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात चीनमध्ये कागदपत्रावर बोटांचे ठसे उमटविण्याची पद्धत रुढ होती. अनेक शतके चिनी बादशाहांच्या उजव्या हाताच्या आंगठ्याचा ठसा राजमुद्रा म्हणून मानला जात होता. बोटांच्या ठशांचा पहिला शास्त्रीय अभ्यास इटलीतील बोलोन्या विद्यापीठातील शरीररचनाशास्त्राचे प्राध्यापक मार्चेल्लो मालपीगी यांनी १६८६ च्या सुमारास केल्याचे ज्ञात आहे. टॉमस ब्युइक या कोरीवकाम करणाऱ्या कारागिरांनी इंग्लंडमध्ये १८०९ साली आपल्या बोटांच्या ठशासारखे आकृतिबंध लाकडावर कोरुन त्यांचा आपल्या ग्रंथावर छपाई करून व्यापारचिन्हासारखा उपयोग केला होता. ब्रेस्लौ विद्यापीठातील शरीररचनाशास्त्राचे प्राध्यापक जे. ई. पुर्‌किन्ये यांनी १८२३ मध्ये विद्यापीठाच्या डॉक्टरेट पदवीकरिता सादर केलेल्या प्रबंधात प्रत्येक बोटावरील रेषांचा निरनिराळा उल्लेख केला होता व त्यावरील आकृतिबंधाचे एकूण नऊ गट पाडले होते परंतु या ठशांचा उपयोग व्यक्तीची ओळख पटविण्याकरिता करता येईल, अशी पुसट शंकाही त्यांच्या मनात आलेली नव्हती.

बोटांच्या ठशांचा ओळख पटविण्याकरिता उपयोग करता येण्याची शक्यता टोकिओमधील रुग्णालयात काम करणाऱ्या हेन्री फॉल्डस या स्कॉटिश डॉक्टरांनी अनेक बोटांच्या ठशांचा अभ्यास करून नेचर या इंग्रजी वैज्ञानिक नियतकालिकाला १८८० मध्ये पाठविलेल्या पत्रात प्रकट केली होती. या त्यांच्या पत्रात बोटांवरील रेषांच्या आकृतिबंधातील व्यापक फरक, एकव्यक्तिता, कायमपणा, त्यात बदल करण्याची किंवा घालवून टाकण्याची अशक्यता इत्यादींचा स्पष्ट उल्लेख होता. इंग्लंडला परतल्यावर फॉल्डस यांनी बोटांच्या ठशांचे न्यायकार्यातील महत्त्व तत्कालीन सरकारला व पोलीस खात्याला पटविण्याचा प्रयत्न केला होता.

यानंतर (१) सर विल्यम जेम्स हर्शेल, (२) सर फ्रान्सिस गॉल्टन आणि (३) सर एडवर्ड हेन्री या तीन इंग्रज शास्त्रज्ञांनी या शास्त्रात मौलिक भर घातली.

सर विल्यम जेम्स हर्शेल : (१८३३ – १९१७). बंगालमधील हुगळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना १८५८ मध्ये सरकारी कामकाजामध्ये नेहमीच्या सही घेण्याच्या पद्धतीबरोबरच हर्शेल यांना कागदपत्रावर हाताचा पंजा उठविण्याची कल्पना सुचली. हर्शेल यांना सरकारी कामकाजात सही करून नाकबूल करणे आणि तोतयेगिरी यांना सतत तोंड द्यावे लागे. हात-बोटांच्या ठशाबद्दल जनतेत बराच भ्रममूलक विश्वास असल्याचे हर्शेल यांना माहीत होते. कामकाजात ठसे घेण्याची पद्धत त्यांनी जवळजवळ रुढ केल्यापासून तोतयेगिरी व नाकबुलीचे प्रमाण एकदम कमी झाले. त्यांनी त्या काळच्या बंगाल सरकारला ही पद्धत सबंध प्रांताच्या सरकारी कामकाजात वापरण्याची शिफारस केली पण प्रत्यक्षात ती प्रचारामध्ये आली नाही. भारतातील आपल्या कारकीर्दीत त्यांनी हातांचे व बोटांचे ठसे जमा करणे सुरुच ठेवले होते. या त्यांच्या पद्धतशीर संग्रहाचा पुढे गॉल्टन यांना बोटांच्या ठशांच्या उपयुक्ततेसंबंधी संशोधन करण्यात मोठा उपयोग झाला. बोटांचे ठसे जन्मापासून मरेपर्यंत कायम असतात व वाढत्या वयाबरोबर त्यांत कोणताही बदल होत नाही, हे हर्शेल यांनी स्वतःच्या बोटांच्या ठशांवरून सिद्ध केले होते. उजवी तर्जनी व उजवे मधले बोट यांचे ठसे त्यांनी १८५९, १८७७ आणि १९१६ मध्ये घेऊन ठेवले होते (आ.१). १८५९ ते १९१६ या सत्तावन्न वर्षांच्या कालावधीला ‘हर्शेल कालांतर’ असेच म्हणतात.


आ. १. विल्यम हर्शेल यांच्या उजवी तर्जनी व उजवे मधले बोट यांचे ठसे : (अ) १८५९ (आ) १८७७ (इ) १९१६.

फॉल्डस व हर्शेल समकालीन होते आणि दोघांचेही लक्ष बोटांच्या ठशांच्या वैशिष्ट्याकडे जवळजवळ एकाच काळात गेले होते. हर्शेल यांना या ठशांचा पहिला व्यवहार्य उपयोग करणारे म्हणून आणि फॉल्डस यांना या विषयावर पहिला लेख प्रसिद्ध करणारे म्हणून या शास्त्रात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

सर फ्रान्सिस गॉल्टन : (१८२२ – १९११). फॉल्डस व हर्शेल यांनी लक्ष वेधलेल्या बोटांच्या त्वचेवरील आकृतिबंधांच्या एकव्यक्तितेबद्दल व कायमपणाबद्दल गॉल्टन यांनी अधिक अभ्यास केला. प्रामुख्याने ते सुप्रजाजननशास्त्रज्ञ (पितरांच्या योग्य निवडीने मानववंशातील गुणलक्षणे सुधारण्यासंबंधीच्या शास्त्रातील तज्ञ) व मानवमितिज्ञ (मानवी शरीराचे आकारमान व त्याची प्रमाणे यांचे मापन करणाऱ्या शास्त्रातील तज्ञ) होते. आनुवंशिकीचा (एका पिढीतील लक्षणे पुढील पिढीत कशा रीतीने उतरतात, तसेच नात्यातील व्यक्तींच्या साम्य व भेदांची कारणे कोणती यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचा) अभ्यास करीत असताना त्यांनी बोटांच्या ठशांचा फार मोठा संग्रह केला होता.


त्यांचा अभ्यास करून त्यांनी फिंगरप्रिंट्स (१८९२), डिसायफरमेंट ऑफ ब्लर्ड फिंगरप्रिंट्स (१८९३) आणि हर्शेल यांना अर्पण केलेला फिंगरप्रिंट डिरेक्टरीज (१८९५) हे ग्रंथ लिहिले. प्रत्येक बोटावरील रेषा निरनिराळ्या असतात तसेच त्यांची रचना मरेपर्यंत कायम असते, हे त्यांनी निर्विवादपणे दाखवून दिले. त्यांच्या कार्याचा परिणाम होऊन ब्रिटीश सरकारने बोटांचे ठसे ओळख पटविण्याकरिता वापरता येतील किंवा कसे हे आजमावण्याकरिता एक समिती नेमली. या समितीवर सर एडवर्ड रिचर्ड हेन्री यांची नेमणूक करण्यात आली होती. [⟶ गॉल्टन, सर फ्रान्सिस].

सर एडवर्ड रिचर्ड हेन्री : (१८५९ – १९३१). भारतात बंगाल प्रांतात १८९१ मध्ये पोलिस महानिरीक्षक या हुद्यावर हेन्री काम करीत होते. गुन्हेगारांना ओळखण्याकरिता त्या वेळी ‘बर्टिलॉन पद्धत’ [ॲल्फाँस बर्टिलॉन (आल्फाँस बेरतीयाँ) या फ्रेंच गुन्हेगारीशास्त्रज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारी पद्धत] अथवा ‘मानवमिती पद्धत’ उपयोगात होती. हर्शेल यांचा बोटांच्या ठशांचा मर्यादित स्वरुपाचा उपयोग हेन्री यांना माहीत होता. बर्टिलॉन पद्धतीत काही फेरफार करून ती शास्त्रीय ज्ञान नसलेल्या व पूर्वशिक्षण नसलेल्यांनाही वापरता येईल, अशी नवी पद्धत हेन्री यांनी वापरात आणली. या पद्धतीत बोटांच्या ठशांचा सर्रास उपयोग केला होता. त्या वेळच्या इंग्रज सरकारने १८९७ मध्ये ही पद्धत सरकारी पातळीवर वापरण्याचे ठरविले. याविषयीचा हेन्री यांनी लिहिलेला अहवाल सरकारने १९०० च्या सुमारास क्लासिफिकेशन अँड युझेस ऑफ फिंगरप्रिंट्स या नावाने पुस्तक रुपात छापवून घेतला व त्याचा सरकारमान्य पाठ्यपुस्तकासारखा वापर सुरु झाला.

आधुनिक अंगुलिमुद्राशास्त्र शास्त्रीय पायावर उभारण्याचे श्रेय हेन्री यांनाच द्यावे लागते. १९०१ च्या सुमारास हेन्री इंग्लंडला परतले व त्यांची पोलीस खात्यात उपआयुक्त म्हणून नेमणूक झाली. तेव्हापासून ब्रिटीश पोलीस त्यांची पद्धत वापरु लागले. स्कॉटलंड यार्डमध्ये बोटांच्या ठशांचा खास विभाग सुरु करण्यात आला. आजही अनेक देशांतून त्यांची पद्धत उपयोगात असून तिचा उल्लेख ‘हेन्री पद्धत’ असाच करतात. १८९९ मध्ये भारत सरकारने बोटांच्या ठशाबद्दलची तज्ञांची साक्ष ग्राह्य धरणारा कायदा केला. हेन्री भारतात असताना हेमचंद्र बोस आणि अझिझ-उल-हक् नावाच्या दोन हिंदी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या कामात मोठी मदत केली होती. त्याबद्दल सरकारने दोघांनाही मानसन्मान दिले होते.

भारतात व ब्रिटनमध्ये वरील प्रगती चालू असतानाच अर्जेंटिनातील ह्‌वान व्ह्युसेटिक् नावाच्या अधिकाऱ्यांना खुनाच्या एका गुन्ह्यात बोटांच्या ठशांच्या निरीक्षणावरुन गुन्हेगाराला पकडण्यात व पुढे त्याला कोर्टात शिक्षा देवविण्यात यश आले होते. यामुळे प्रभावित होऊन त्यांनी बोटांच्या ठशांविषयीची स्वतःची पद्धत उपयोगात आणली होती. १९०१ व १९०४ मध्ये त्यांनी या विषयावर स्पॅनिश भाषेत दोन ग्रंथ प्रसिद्ध केले होते. काही देशांतून व्ह्युसेटिक् वर्गीकरण पद्धत उपयोगात आहे. व्ह्युसेटिक् यांची ब्वेनस एअरीझमधील बोटांच्या ठशांच्या विभागाचे संचालक म्हणून पुढे नेमणूक झाली. १९३२ मध्ये या विभागात बोटांच्या ठशांची २७,२२,८५६ नोंदकार्डे जमली होती. हेन्री- व्ह्युसेटिक् पद्धतीत दोन्ही हातांच्या दहाही बोटांचा वर्गीकरणाकरिता उपयोग करतात. फरक एवढाच की, पहिल्या पद्धतीत आकृतीबंधाचे पाच प्रमुख प्रकार ओळखले जातात, तर दुसरीत चार प्रमुख प्रकार ओळखतात.

अमेरिकेत हेन्री पद्धत उपयोगात आहे. १९०३ नंतर स्कॉटलंड यार्डच्या एका अधिकाऱ्याने अमेरिकन पोलीसांना या नव्या शास्त्राची माहिती करून दिली होती. १९३२ मध्ये वॉशिंग्टनमधील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या बोटांच्या ठशांच्या विभागात ३३,४०,२६१ नोंदकार्डे होती. अलीकडील अंदाजानुसार ही संख्या एकोणीस कोटीपेक्षाही जास्त झाली आहे.

कालांतराने बोटांच्या ठशांच्या वर्गीकरणाच्या अनेक पद्धती शोधण्यात आल्या परंतु त्या फक्त स्थानीय स्वरुपाच्या होत्या. बहुतेक सर्व हेन्री किंवा व्ह्युसेटिक् वर्गीकरणावरच आधारित आहेत.

पुष्कळ वेळा गुन्ह्याच्या ठिकाणी एखादाच बोटाचा ठसा मिळतो. अशा वेळी दहा बोटांच्या ठशांवर आधारित अशी हेन्री पद्धत उपयोगी पडत नाही. १९२४ मध्ये जे. ए. लार्सन व १९३१ मध्ये हॅरी बॅटली यांनी आपापल्या ‘एकबोट ठसा’ पद्धती शोधल्या. दोघांनीही त्यांवर स्वतंत्र ग्रंथ लिहिले आहेत.

बोटांचे ठसे घेण्याचे तंत्र : बोटांचे ठसे घेण्याकरिता लागणारी सामग्री व साधने सोपी, स्वस्त आणि हाताळण्यास सुलभ असतात. सु. ६ मिमी. जाड, सु. १० सेंमी. रुंद, आणि सु. ३० सेंमी. किंवा सु. ३५ सेंमी. लांब काचेचा अथवा छिद्रहीन धातूचा गुळगुळीत तुकडा, शाई पसरविण्याकरिता रबरी छोटे लाटणे, मुद्रण शाई आणि सु. २० सेंमी. X २० सेंमी. आकारमानाचे पांढरे कार्ड या वस्तू ठसे घेण्यास पुरतात. बहुसंख्य देशांतील पोलीस खात्यांत दहाही बोटांचे ठसे ठराविक क्रमाने घेणे सोपे जाईल अशी छापील नोंदकार्डे किंवा अभिलेख चिट्ठ्या वापरतात (चित्रपत्र ४३). काचेच्या तुकड्यावर काळ्या शाईचा पातळ थर लाटण्याने पसरविल्यानंतर त्यावर बोटे ठेवून लगेचच कार्डावर उमटवितात.

ठसे घेताना पुढील ठराविक क्रमाने घेतात. वरच्या बाजूस उजवा हात-आंगठा, तर्जनी, मधले बोट, अनामिका आणि करंगळी डावा हात त्या खाली व त्याच क्रमाने उमटवितात. प्रत्येक बोटाच्या दूरस्थ किंवा शेवटच्या पेऱ्यावरील त्वचेचा ठसा उमटतो.


 ठसे दोन प्रकारचे असतात : (१) शाई लावलेले बोट कार्डावर ठेवून किंचित दाबून काढून घेणे. अशा ठशाला ‘साधा ठसा’ म्हणतात. (२) ठसा घेणाराने बोट धरुन एका कडेपासून दुसऱ्या कडेपर्यंत दाबून फिरविणे. या ठशाला ‘बोट फिरवून घेतलेला ठसा’ म्हणतात (आ.२). हा ठसा काहीसा रुंद असतो व त्याचे वैशिष्ट्य असे की, त्यात नख व रेषाहीन त्वचा सोडून संपूर्ण त्वचेचा ठसा उमटतो.

आ. २. बोट फिरवून ठसा घेणे

ठशांचे वर्गीकरण : बोटांच्या ठशांच्या वर्गीकरणाची कोणतीही पद्धत वापरली, तरी मुख्य हेतू एकच असतो व तो म्हणजे नोंदकार्डे शक्य तेवढ्या कमी वेळात सापडावीत अशा प्रकारे ती फाईल करणे. गुन्हेगाराच्या बोटांच्या ठशांचे कार्ड कोणत्या फायलीत मिळेल, तसेच नवीन कार्ड कोणत्या फायलीत घालावे हे ठरविण्याचे कार्य या पद्धती करतात. बोटावरील रेषांच्या ठशांचे वर्गीकरण करताना तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो : (१) सर्वसाधारण आकार, (२) आकृतिबंधांची दहा बोटांवरील विभागणी आणि (३) सापेक्ष आकार : हा ठरविताना ठशातील रेषांची संख्या मोजणे व अनुरेखन करणे या गोष्टी कराव्या लागतात.

प्रस्तुत नोंदीत सर्वसाधारणपणे अधिक उपयोगात असणाऱ्या हेन्री पद्धतीविषयी थोडक्यात व ढोबळ माहिती दिली आहे. कोष्टकीकरण पद्धत आणि अंतिम वर्गीकरण हे अतिशय जटिल (गुंतागुंतीचे) असून बऱ्याच अनुभवांती साध्य होतात.

हेन्री यांनी एकूण पाच आकृतिबंध ओळखले होते : (१) कमान, (२) उचललेली अथवा डेरेदार कमान, (३) बाह्यास्थीकडील (प्रबाहूतील दोन हाडांपैकी बाहेरच्या हाडाकडील ) शंख, (४) अंतरास्थीकडील (प्रबाहूतील आतल्या बाजूच्या हाडाकडील) शंख व (५) चक्र.

एकूण आकृतिबंधामध्ये ६५% शंख (दोन्ही प्रकार), ३०% चक्र आणि उरलेले ५% कमान (दोन्ही प्रकार) आढळतात. मूळ चक्र प्रकारात काही उपप्रकारही ओळखता येतात.

अमेरिकेत रुढ असलेल्या हेन्री पद्धतीनुसार आठ प्रमुख आकृतिबंध वर्गीकरणाकरिता वापरतात : (१) साधी कमान, (२) डेरेदार कमान, (३) बाह्यास्थी शंख, (४) अंतरास्थी शंख, (५) साधे चक्र, (६) मध्यवर्ती कप्पा असलेला शंख, (७) दोन कप्प्यांचा शंख, (८) संमिश्र अथवा क्वचित आढळणारे प्रकार (उदा., चक्राभोवती शंख, चक्रावर शंख, शंखावर चक्र वगैरे).


प्रत्येक ठशाच्या मध्यवर्ती क्षेत्राला आकृतिबंधक्षेत्र म्हणतात. या क्षेत्रातील आकृतिबंधाच्या निरीक्षणावरून प्रत्येक बोटाचा गट ठरविता येतो. दहा बोटांपैकी चक्र किती व कोणत्या बोटांवर आहे, हे प्रथम बघतात. उदा., एकही बोटावर चक्र नाही असे दहा बोटांचे एकक, तर फक्त उजव्या आंगठ्यावरच चक्र असणाऱ्या दहा बोटांचे एकक वगैरे. एककावरुन विशिष्ट वर्गीकरण सूत्र मिळवता येते व त्यावरुन नोंदकार्ड योग्य जागी फाईल केले जाते. समान आकृतिबंध असलेली कार्डे एकत्र ठेवलेली असल्यामुळे लक्षावधी कार्डामधून विशिष्ट कार्डावरील ठशांची ओळख काही मिनिटांच्या आत पटवणे शक्य होते.

अप्रकट ठसे : गुन्ह्याच्या ठिकाणी पुष्कळवेळा गुन्हेगाराच्या बोटांचे ठसे निरनिराळ्या वस्तूंवर उमटण्याची शक्यता असते. वरकरणी तपासणीत न दिसणाऱ्या या ठशांना अदृश्य किंवा अप्रकट ठसे असेही म्हणतात. अशा ठशांवरुन गुन्हेगाराचा शोध लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. अदृश्य ठशांना विशिष्ट उपचारांनी दृश्य करावे लागते व शिवाय कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यायोग्य बनवावे लागते.

आ. ४. पिस्तुलावरील अदृश्य ठसा स्पष्ट करण्याची कृती

अदृश्य ठसे कोणत्याही गुळगुळीत पृष्ठभागावर उमटण्याची शक्यता असते. अशोषक पृष्ठभागावरील ठसे विशिष्ट पावडर त्या भागावर फवारुन स्पष्ट करता येतात. अतिशय बारीक चूर्णन केलेल्या निरनिराळ्या रंगांच्या पावडरी त्याकरिता उपलब्ध आहेत. सर्वसाधारणपणे पृष्ठभाग ज्या रंगाचा असेल त्याच्या विरोधी रंगाची पावडर वापरतात. उदा., कपबशीवरील ठसे स्पष्ट करण्याकरिता काजळ किंवा काळ्या शिशाची पावडर वापरतात. अदृश्य ठसे असलेली वस्तू हाताळणाऱ्याने हातमोजे घालणे आवश्यक असते. कधीकधी अशा वस्तूवर पावडर पसरविण्याकरिता उंटाच्या केसांचा किंवा इतर मऊ केसांचा ब्रश वापरतात.

तेलकट ठसा स्पष्ट करण्याकरिता वस्तू एका छोट्या कपाटात ठेवून तीवर आयोडिनाची वाफ सोडतात. ठसा स्पष्ट होताच त्याचे छायाचित्र घेऊन ठेवतात कारण असा ठसा अल्पकाळ टिकणारा असतो. कार्डबोर्ड किंवा कागदावरील ठसे सिल्व्हर नायट्रेटाच्या द्रावणात बुडवून स्पष्ट करता येतात. ठसा स्पष्ट करण्यासाठी काही इतर पदार्थही वापरतात. उदा., निनहायड्रीन, मॅग्नेशियम कार्बोनेट, पांढरे शिसे, लाल शिसे, फेरिक ऑक्साइड, ॲल्युमिनियम पावडर.


अदृश्य ठसे स्पष्ट करण्याकरिता अलीकडे काही नव्या तंत्रांचा उपयोग करण्यात येत आहे. यामध्ये लेसर किरणांचा [⟶ लेसर] उपयोग, जपानी संशोधकांनी शोधिलेले स्वयंकिरणोत्सर्ग-चित्रण तंत्र (कागद किंवा कापडावरील ठसे स्पष्ट करण्याकरिता तो भाग किरणोत्सर्गी-भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या – कार्बनमिश्रित फॉर्माल्डिहाइडाची वाफ त्यांवर पसरवून ठसा स्पष्ट करणारे तंत्र), स्वयं-क्ष-किरण-चित्रण (ठशांवर पसरविलेली शिशाची पावडर प्रखर क्ष-किरणांच्या मदतीने स्पष्ट करणारे तंत्र), ⇨ इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने क्रमवीक्षण करणे (अतिशय सूक्ष्म व्यासाच्या इलेक्ट्रॉन शलाकेने वस्तूचे क्रमाक्रमाने निरीक्षण करणे (यात धातू किंवा काचेवरील अदृश्य ठसे कोणतीही पूर्वप्रक्रिया न करता दिसू शकतात) वगैरे. या नव्या साधनांनी जिवंत किंवा मृत त्वचा, कागद, प्लॅस्टिकचे पदार्थ, कापड, रबरी पदार्थ यांसारख्या पदार्थांवरील अदृश्य ठसे स्पष्ट करून त्याची छायाचित्रे घेणे शक्य झाले आहे.

लेसर किरण तंत्राच्या साहाय्याने अतिशय उष्णतेच्या वा थंडीच्या परिस्थितीत राहिलेले, तसेच पाण्यात बुचकळले गेलेले आणि कागदपत्रांवरील, चलनी नोटांवरील व कापडावरील जुने ठसेही स्पष्ट करता येतात. या तंत्रात आर्‌गॉन-आयन लेसरची शलाका वापरण्यात येते आणि त्यामुळे ठसे पिवळ्या वा नारिंगी रंगात दिसतात. यात ठशांचे सरळ निरीक्षण करता येते किंवा बंद-मंडल दूरचित्रवाणीवर [⟶ दूरचित्रवाणी] ते प्रदर्शित करता येतात अथवा त्यांची छायाचित्रे घेता येतात. इतर पद्धतीप्रमाणे या तंत्रात वस्तूच्या पृष्ठभागावर परिणाम होत नसल्याने हे तंत्र जेथे अयशस्वी ठरेल तेथे इतर पद्धतीही वापरून पहाता येतात.

स्वेदछिद्र तंत्र : १९१२ च्या सुमारास फ्रेंच शास्त्रज्ञ एद्‌माँ लोकार्द यांनी लीआँ येथील पोलीस प्रयोगशाळेत काम करीत असताना, बोटावरील त्वचेतील स्वेदछिद्रांची तपासणी करून व्यक्तीची ओळख पटविण्याचे तंत्र शोधले होते. प्रत्येक व्यक्तीच्या बोटाच्या त्वचेमध्ये अनेक स्वेद ग्रंथी असतात व त्यांत तयार होणारा घाम पृष्ठभागावर येण्याकरिता योजिलेल्या अनेक नलिकांची तोंडे छोट्या छिद्रांच्या स्वरुपात त्वचेवर उघडतात. ही छिद्रे न बदलणारी व कायम असतात, तसेच प्रत्येक व्यक्तीत त्यांची मांडणी निरनिराळी असते. या विशिष्ट शरीररचनेमुळे व्यक्तीची ओळख या स्वेदछिद्र परीक्षणावरून पटवणे शक्य आहे. नेहमीच्या बोटांच्या ठशांच्या तपासणीस आवश्यक अशा गोष्टींचा अभाव असूनही अपूर्ण, अस्पष्ट किंवा पुसट, एखादाच ठसा या तंत्राने तपासल्यास ओळख पटवता येते. वयोमानाप्रमाणे छिद्रांचा आकार बदलला, तरी त्यांचे परस्परांतील संबंध (उदा., दोन छिद्रांतील अंतर वगैरै) व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत बदलत नाहीत. या शास्त्राचा अधिक खोल अभ्यास करण्यात आला असून त्याचे विशेषज्ञ तयार झाले आहेत. या तंत्रात सूक्ष्मदर्शकी छायाचित्रणाचा (सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने केलेल्या छायाचित्रणाचा) उपयोग करावा लागतो. या शास्त्राची विशेष उपयुक्तता म्हणजे ज्या वेळी हाताच्या बोटाशिवाय इतर भागाचा अर्धवट ठसा मिळतो त्या वेळीही व्यक्तीची ओळख पटवणे शक्य असते.

खेडकर त्रि. कृ. भालेराव, य. त्र्यं.

अंगुलिमुद्रा संग्रहासाठी संगणकाचा उपयोग : अंगुलिमुद्रांच्या साहाय्याने गुन्हेगारांची पूर्वमाहिती मिळविणे सोयीचे व खात्रीशीर असल्याचे १८९७ साली ठरविण्यात आले आणि तेव्हापासून विशिष्ट पद्धतीने प्रत्यक्ष मानवी श्रमाने अंगुलिमुद्रा केंद्रांकडून गुन्हेगारांची माहिती उपलब्ध केली जात आहे. तथापी ही पद्धत त्रासदायक व विलंबकारक असल्यामुळे या कार्यात संगणकाचा (गणक यंत्राचा) उपयोग करण्यासंबंधी संशोधन करण्यात आले असून अद्यापही ते चालू आहे.

भारतामध्ये अंगुलिमुद्रांची प्रत्यक्ष छायाचित्रे संगणकात न ठेवता त्यांची माहिती पुढीलप्रमाणे दोन अंकी दोन संकेत संख्यांच्या स्वरूपात साठविली जाते. अंगुलिमुद्रांचे चार मुख्य प्रकार आहेत. त्यांचे योग्य ते पोटविभाग करून त्यांतील प्रत्येक आकृतिबंधास विशिष्ट संकेत अंक देण्यात आलेले आहेत. हे पोटविभाग एकूण वीस आहेत. या पोटविभागांतील काही विशिष्ट आकृतिबंधांच्या दोन बिंदूमधील रेषा किती आहेत, त्या मोजून त्यांची नोंद केली जाते. त्यातील पहिल्या दोन अंकांनी तयार होणारी संख्या आकृतिबंधाचा प्रकार दर्शविते आणि नंतरच्या दोन अंकांनी बनणारी संख्या रेषांची संख्या निर्देशित करते. उदा., सव्य दिशेने (घड्याळाच्या काट्यांच्या हालचालीच्या दिशेने) चक्राकृती फिरणारा आकृतिबंध असेल व त्यामध्ये १५ रेषा असतील, तर असा आकृतिबंध संगणकात ठेवण्यासाठी १,३१५ अशी संख्या लिहून नोंदविला जातो.

गुन्हेगारांची माहिती संगणकात साठविल्यानंतर ज्या वेळी एखाद्या गुन्हेगाराची माहिती त्याच पद्धतीने विचारली जाते त्या वेळी संगणकातील स्मरण यंत्रेणेद्वारे दोन्ही संकेत संख्यांचा विचार केला जातो आणि मिळत्या-जुळत्या असलेल्या संकेत संख्यांची यादी गुन्हेगारांचे अंगुलिमुद्रा वर्गीकरण व नाव यांसह दिली जाते. या यादीच्या आधारे अंगुलिमुद्रा केंद्राच्या दप्तरातील मूळ कार्डे प्रत्यक्ष (मानवी श्रमाने) तपासण्यात येऊन खात्री केली जाते. ही खात्री आकृत्यांमधील अत्यंत सूक्ष्म अशा रेषांच्या वैशिष्ट्यांच्या निकषावरच केली जाते.

संगणकाच्या साहाय्याने जरी गुन्हेगार शोधण्याची पद्धत अवलंबिली, तरी ज्या व्यक्तीची माहीती पाहिजे असेल त्याच नेमक्या व्यक्तीची माहिती मिळावी व त्या दृष्टीने संगणकामध्ये रेषांची वैशिष्ट्ये कोणत्या पद्धतीने बिनचूकपणे साठविता येतील ही महत्त्वाची समस्या जगातील सर्व राष्ट्रांपुढे आहे. सर्व राष्ट्रांत या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत पण अजून तरी त्यात पूर्णपणे यश आलेले नाही. भारतामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात याकरिता कसोशीचे प्रयत्न चालू आहेत.


महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर व औरंगाबाद येथील अंगुलिमुद्रा केंद्रातून १ जानेवारी १९८२ रोजी अनुक्रमे ४,९८,९९७ १,८६,८७५ ९१,१२० व २८,५२८ गुन्हेगारांची अंगुलिमुद्रा कार्डे साठविलेली आहेत. या सर्व गुन्हेगारांची माहिती संगणकात नोंदविण्यासाठी ५० लाख आकृतिबंध तपासणे आवश्यक आहे. हे काम १९७८ पासून सुरु झालेले असून १९८२ पर्यंत यापैकी एक तृतीयांश काम संपत आलेले होते. हे काम पूर्ण होण्यास आणखी सात वर्षे लागतील असा अंदाज आहे. प्रचलित असलेली अंगुलिमुद्रा वर्गीकरणाप्रमाणे जे वर्गीकरण संगणकावर घेतले जाईल तेवढ्या वर्गीकरणाच्या संशयिताची अंगुलिमुद्रा कार्डे संगणकावर तपासण्याची सुरुवात १९८३ च्या सुमारास करण्यात येईल, असा अंदाज आहे.

साठे, प. ज.

उपयुक्तता : मृताची ओळख पटविण्याकरिता बोटांचे ठसे अतिशय उपयुक्त असतात. अपघाती मृत्यू, खून, गुन्ह्याच्या ठिकाणी मरून पडलेल्या गुन्हेगाराची ओळख वगैरे कारणांकरिता पोलिसांना अज्ञात मृत शरीराची ओळख पटविणे, आवश्यक असते. मृत शरीराच्या बोटांचे ठसे घेणे तेवढे अवघड नसते. मात्र ते शवकाठिण्य (मरणोत्तर काही काळ टिकणारी स्नायूंच्या ताठरपणाची अवस्था) संपल्यानंतरच घेणे चांगले. अपघटन झालेल्या (अती कुजलेल्या) मृत शरीराच्या बोटांचे ठसे घेणे अवघड असते. अशा वेळी पोलीस शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला दहाही बोटांच्या शेवटच्या पेऱ्यावरील संपूर्ण त्वचा काढून ठेवण्याची विनंती करतात. अशा वेळी दहा निरनिराळी पाकिटे घेऊन प्रत्येकावर त्यात ठेवलेल्या त्वचेच्या बोटाचे नाव (उदा., उजवा आंगठा, उजवी तर्जनी वगैरे) अगदी स्पष्ट लिहिणे जरुर असते. त्वचेचा पृष्ठभाग मुद्दाम खराब करण्याचा प्रयत्न केला असला, तरी ०.६ मिमी. खोलीवरील सूक्ष्मशारीरिक छेदाद्वारे बोटावरील ठसे स्पष्ट करता येतात, असे सी. ए. डेव्हिस या शास्त्रज्ञांनी १९५७ मध्ये दाखवून दिले आहे. पूतिभवनानंतर (सूक्ष्मजंतूच्या प्रक्रियेमुळे कालांतराने होणारे मृतदेहाचे अपघटन) बाह्यत्वचा झडून गेली असली, तरी खाली उरलेल्या अंतस्त्वचेवरील ठसे स्पष्ट करून ओळखता येतात. पाण्यात पुष्कळ वेळ बुडून राहिलेल्या मृत देहाच्या पंजावरील बाह्यत्वचा एखाद्या हातमोजासारखी संपूर्ण निघून येते. या त्वचेच्या आतील पृष्ठभागावरील आकृतिबंधाचे ठसे घेऊन ओळख पटवता येते. ठशांची छायाचित्रे घेण्याकरिता विशिष्ट प्रकारचा कॅमेरा वापरण्यात येतो.

अर्जेंटिनातील सुविख्यात अंगुलिमुद्रातज्ञ ह्‌वान व्हुसेटिक् यांना सुरुवातीपासूनच बोटांच्या ठशाबद्दल काही तरी आंतरराष्ट्रीय व्यवस्था असावी असे वाटत होते. त्याकरिता त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विचारविनिमयाकरिता परिषद भरवण्याचे प्रयत्नही केले होते. इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन नावाची (इंटरपोल या संक्षिप्त नावाने ओळखली जाणारी) आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य करणारी संस्था १९२३ मध्ये स्थापन झाल्यानंतर व्हुसेटिक् यांच्या कल्पनांना मूर्त स्वरुप प्राप्त झाले [⟶ गुन्हातपासणी]. आंतरराष्ट्रीय स्वरूपांच्या गुन्हेगारीत वाढ झाल्यानंतर या संस्थेचे महत्त्व अनेक देशांना पटले असून पॅरिसमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या या संस्थेचे शंभरपेक्षा जास्त देश आज सभासद आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशांची, तसेच इतर माहितीची अनेक कार्डे आहेत. १९४७ मध्ये स्वित्झर्लंडमधील एका गावी लक्षावधी स्विस फ्रँक किंमतीच्या जडजवाहिराची जबरी चोरी करून गुन्हेगार शेजारच्या फ्रान्समध्ये पळून गेले. सात गुन्हेगारांपैकी सहांना पकडण्यात फ्रेंच पोलिसांना यश आले पण सातवा जो प्रमुख गुन्हेगार होता तो निसटला. १९४९ मध्ये इझ्राएली पोलिसांनी एका गुन्हेगाराला पकडले व त्याची माहिती त्याच्या बोटांच्या ठशांच्या छायाचित्रासहित इंटरपोलकडे पाठविली. स्वित्झर्लंडमध्ये चोरी करून पळून गेलेला टोळी प्रमुख इझ्राएलमध्ये पकडला गेल्याची माहिती इंटरपोलने स्वित्झर्लंडला कळवली. तो नाव बदलून फिरत होता पण बोटांच्या ठशांनी अशा प्रकारे शेवटी तो पकडला गेला.

आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांच्या शोधाकरिता परदेशी गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे त्यांच्या मूळ देशाकडे ताबडतोब पाठविल्यास पुष्कळ माहिती मिळू शकते. त्याकरिता लंडन पोलिसांनी बोटांचे ठसे तारसंदेश किंवा बिनतारी संदेश व्यवस्थेद्वारा जगाच्या कोणत्याही भागात पाठविण्याची योजना शोधली आहे. या पद्धतीत कमान, शंख, चक्र इ. आकृतिबंधांना सूचक अंक दिलेले असून या अंकावरून दहाही बोटांच्या ठशांचे वर्णन मिळू शकते. महाराष्ट्रातील मुंबईतील संगणकाद्वारे मिळणारी माहिती राज्यात निरनिराळ्या प्रमुख ठिकाणी चटकन पाठविण्याच्या उद्देशाने ही ठिकाणे दूरमुद्रकाने (दूर अंतरावर संदेश पाठवून तेथे कागदाच्या फितीवर संदेश मुद्रित करणाऱ्या प्रयुक्तीने) जोडण्याची योजना महाराष्ट्र राज्य पोलीस खात्याच्या विचाराधीन आहे.

काही आनुवंशिक [उदा., मंगोलॉइड वेडेपण, क्लाइनफेल्टर लक्षणसमूह इ. ⟶ आनुवंशिकी ] व जन्मजात रोग आणि बोटांवरील ठसे यांचा परस्परसंबंध आहे किंवा कसे याकडे अलीकडेच वैद्यकीय संशोधकांचे लक्ष गेले असून त्यासंबंधी संशोधन चालू आहे. या संदर्भात बोटांच्या ठशांच्या आकृतिबंधांशिवाय तळहात व तळपाय यांवरील सर्वच रेषांच्या आकृतिबंधांचा शास्त्रज्ञ विचार करीत आहेत.

बोटांचे ठसे व कायदा : गुन्हेगार, निर्वासित व्यक्ती, तुरुंगातील कैदी व काही मुलकी आणि लष्करी नोकरांच्या बोटांचे ठसे त्यांच्या सेवापुस्तकावर नोंदणीकरिता घेतात. निवृत्तिवेतनाच्या कागदपत्रांच्या पूर्ततेकरिताही ठसे घेतात. निरक्षर व्यक्तींच्या बाबतीत कागदपत्रांवर सहीऐवजी त्यांच्या डाव्या अंगठ्याचा ठसा घेण्यात येतो, तसेच निवडणुकांमध्ये मतदाराच्या ओळखीकरिता अंगठ्याच्या ठशाचा उपयोग करतात. वैद्यकीय प्रमाणपत्रावर बहुधा डाव्या अंगठ्याचा ठसा घेतात. १९२० च्य कैद्याची ओळख पटविण्याच्या (तेविसाव्या) अधिनियमान्वये कैद्याच्या बोटांचे ठसे, पावलांचा ठसे, वजन, उंची वगैरे मापे आणि छायाचित्र घेण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. पुरावा कायद्याच्या कलम ४३ अन्वये अंगुलिमुद्रातज्ञांचे मत बोटांच्या ठशांविषयी पुरावा म्हणून दाखल करून घेण्यात येते. कलम ७३ अन्वये न्यायालयात हजर असलेल्या कोणाही व्यक्तीचे ठसे घेण्याचे आदेश न्यायमूर्ती देऊ शकतात. अशी सक्ती करण्यामध्ये भारतीय संविधानाने दिलेल्या संरक्षण हक्काचा भंग होत नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

बनावट सहीप्रमाणे बनावट बोटांचे ठसेही तयार करता येतात. बनावट सहीपेक्षा बनावट ठसे ओळखणे अधिक कठीण असते आणि या बाबतीत अगदी हुशार अंगुलिमुद्रातज्ञसुद्धा गोंधळून जाण्याची शक्यता असते. भारतीय लष्करी वैद्यकीय सेवेतील मेजर हेन्री स्मिथ यांनी १९०२ मध्ये बनावट ठसा कसा घेतात हे वर्णिले होते. कलकत्यात काही पठाण सावकार बनावट ठसा असलेले खोटे कागदपत्र तयार करून कुळांची पिळवणूक करीत. ते वापरीत असलेले तंत्र ‘काबुली पद्धत’ म्हणूनच ओळखले जात असे. या पद्धतीने घेतलेला ठसा बनावट आहे, हे ओळखण्याच्या विशिष्ट परीक्षाही अस्तित्वात होत्या.


व्यक्तीची ओळख पटवण्याचे सर्वोत्तम साधन तिच्या बोटांचे ठसेच असते. या शास्त्राला पूरक म्हणून (१) व्यक्तीवर्णन, (२) निवडक कैद्यांच्या एकाच बोटाचा ठसा, (३) छायाचित्र व (४) वजन, उंची इ. मापांची नोंद ही उपयुक्त असतात.

पावलांचा ठसे : पावलांच्या ठशांचे दोन प्रकार आहेत. (१) पादत्राणासहित अथवा पादत्राणाचा ठसा आणि पादत्राणविरहित अथवा तळपायाचा ठसा. हे ठसे वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे अनेक वेळा गुन्हेगारांचा शोध लागण्यास उपयुक्त ठरले आहेत.

(१)    पादत्राणाचा ठसा ते वापरणाऱ्याची ओळख पटविण्याकरिता उपयुक्त असतो. पादत्राणावरील नाल, खिळे इत्यादींची रचना, टाचेची व तळाची झीज यांवरुन ओळख पटवता येते.

(२) गुन्ह्याच्या जागी मिळालेला तळपायाचा ठसा व संभाव्य गुन्हेगाराच्या तळपायाचा ठसा तुलनात्मक रीत्या तपासता येतो. पायाच्या बोटांच्या त्वचेवरील कमान, शंख, चक्र इ. आकृतिबंध असतात. तळपायाच्या आंगठ्याच्या मागे जो उंचवटा असतो त्याला ‘पादांगुष्ट क्षेत्र’ म्हणतात. त्यावर निरनिराळे आकृतिबंध असतात. यांशिवाय मूळ तळपायावरील घट्टा, कुरुप किंवा वण ठशात उमटत असल्यामुळे ओळख पटवण्यास मदत होते. टाचेवरही विशिष्ट आकृतिबंध असतात.

काही सूतिकागृहांतून नवजात अर्भकांच्या तळपायांचे ठसे व मातेच्या डाव्या हाताच्या आंगठ्याचा ठसा घेऊन ठेवण्याची पद्धत रुढ आहे. यामुळे चुकीने किंवा मुद्दाम केलेल्या अर्भकांच्या अदलाबदलीमुळे होणारा गोंधळ टाळता येतो. हे ठसे बदलत नसल्यामुळे कालांतरानेही ओळख पटवता येते. अमेरिकेच्या हवाई दलात सेवकांच्या तळपायांचे ठसे घेण्याची पद्धत १९५९ पासून अमलात आहे. गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे घेणे कोणत्याही कारणामुळे अशक्य असल्यास तळपायांचे ठसे घेतात. एका जागी उभे असतानाचा तळपायाचा ठसा चालतानाच्या ठशापेक्षा मोठा असतो असा पूर्वी समज होता परंतु सुप्रसिद्ध न्यायवैद्यकतज्ञ जे. पी. मोदी यांनी असे दाखवून दिले आहे की, चालतानाचा ठसा बहुतकरून उभे असतानाच्या ठशापेक्षा मोठा असतो.

 पहा : गुन्हातपासणी गुन्हाशोधविज्ञान.

संदर्भ :

1. Brewster, F. Fingerprints, Calcutta, 1936. 2. Bridges, B. C. Practical Fingerprinting, New York, 1963. 3. Browne, D. G. Brock, A. Fingerprints, London, 1953. 4. Cummins, H. Midlo, C. Fingerprints, Palms and Soles, New York, 1961. 5. Modi, N. J., Ed, Medical Jurisprudence and Toxicology, Bombay, 1977. 6. Parikh, C. K. Parikh’s Simplified Textbook of Medical Jurisprudence and Toxicology, Bombay, 1976.

खेडकर, त्रिं. कृ भालेराव, य. त्र्यं.

बोटांचे ठसे मिळवण्यासाठी वापरण्यात येणारी प्रमाणभूत साधने.

 

अगंज (स्टेनलेस) पोलादाच्या डब्याच्या दंडगोलाकार बाजूवर अकस्मात मिळालेला डाव्या अनामिकेचा ठसा (वरील) व संशयित गुन्हेगाराच्या त्याच बोटाच्या ठशाचे विविध छायाचित्र (खालील). १ ते १६ आकडे साम्यस्थळे दर्शवितात. न्यायालयात अंगुलिमुद्रातज्ञाला ही साम्यस्थळे पटवून घावी लागतात व त्यांची ठराविक संख्या न्यायमूर्ती ग्राह्य मानतात. भारतात वापरण्यात येणारी अंगुलिमु्द्रा अभिलेख चिठ्ठीचा एक नमुना