धूम्रपान : तंबाखू , अफू व इतर पदार्थांचा धूर श्वासोच्छ‌्वासातून आत ओढण्याच्या व बाहेर टाकण्याच्या क्रियेला धूम्रपान म्हणतात. निरनिराळ्या पदार्थांचे धूम्रपान करण्याची सवय जगाच्या वेगवेगळ्या भागांत निरनिराळ्या वेळी प्रचारात आली असावी. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात ग्रीक इतिहासकार हिरॉडोटस यांनी सिथियन लोक जळत्या पानांचा धूर ओढून धुंद झाल्याचा उल्लेख केला आहे. आयुर्वेदीय चिकित्सेमध्ये औषधे देण्याचा एक मार्ग म्हणून धूम्रपानाचा उपयोग करतात. तंबाखूशिवाय अफू, गांजा, चरस किंवा हशिश इ. पदार्थांचा धूम्रपानाकरिता वापर केला जातो.

धूम्रपानाकरिता वापरले जाणारे पदार्थ :तंबाखू : सोलॅनेसी कुलातील निकोटियाना वंशातील वनस्पतींना तंबाखू म्हणतात. या वनस्पतीच्या पन्नासपेक्षा जास्त जाती असून त्यांपासून ओढण्याची, हुंगण्याची किंवा खाण्याची तंबाखू तयार करतात. धूम्रपानाकरिता निकोटियाना टाबॅकमनि. रस्टिका  या जाती विशेष वापरल्या जातात.

तंबाखूचे मूळ स्थान द. अमेरिका असून तेथील मूळचे रहिवासी तिचा धार्मिक व औषधी उपयोग करीत. हे रहिवासी धूम्रपानाकरिता जी विशिष्ट नळी वापरीत तिला ते टोबॅकोस म्हणत. त्यावरून स्पॅनिश आक्रमकांनी या वनस्पतीला ‘टोबॅको’ हे नाव दिले. १५५८ मध्ये फ्रान्सिस्को फर्नान्डेझ नावाच्या वैद्यांनी पोर्तुगालमधील फ्रेंच राजदूत झां निको यांना ही वनस्पती प्रथम दाखविली. त्यांनी ती फ्रान्समध्ये पाठविली व ती हळूहळू लोकप्रिय झाली. या फ्रेंच राजदूतांच्या नावावरून तंबाखूमधील अल्कलॉइडास ⇨ निकोटीन हे नाव मिळाले. इंग्लंडमध्ये तंबाखूचा प्रसार १६०० पूर्वी झाला असावा. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या काळातील अनेक लेखकांनी धूम्रपानाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर तंबाखूचा प्रसार यूरोपात सर्वत्र झाला. आशिया व आफ्रिकेतही तो याच्या पाठोपाठच झाला असावा.

सतराव्या शतकात पोर्तुगीज लोकांनी भारतात तंबाखू प्रथम आणली असावी. १६०५ च्या सुमारास आसदबेग यांनी अकबर बादशाहांस विजापूरहून तंबाखू पाठविल्याचा उल्लेख आढळतो. जहांगिर बादशहांनी तंबाखू ओढण्यास मनाई केली होती. १८२९ च्या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीने काही खास प्रकारची तंबाखूची रोपे भारतात पाठविली होती. १९२० च्या सुमारास उत्तम प्रकारची व्हर्जिनिया तंबाखू भारतात तयार होऊ लागून ती टिकविण्याकरिता नव्या पद्धतीचा १९२८ पासून अवलंब करण्यात आला. सिगारेटीकरिता लागणाऱ्या तंबाखूपैकी ९०% तंबाखू आंध्र प्रदेशात तयार होते. तंबाखू उत्पादक देशांत भारताचा अमेरिका आणि चीन यांच्याखालोखाल म्हणजे तिसरा क्रमांक असून भारतातून सु. ५० देशांना तंबाखू निर्यात होते. विडी, सिगारेट, सिगार, चिरूट, हुक्का, तपकीर यांकरिता तसेच चघळण्यासाठी लागणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या तंबाखूचे भारतात उत्पादन होते [ → तंबाखू].

अफू :पॅपॅव्हर सोम्निफेरम  या लॅटिन नावाने ओळखण्यात येणाऱ्या वनस्पतीला येणाऱ्या बोंडांना ती अपक्वावस्थेत असताना चिरा पाडून, त्यांमधून गळणारा रस वाळवून अफू तयार करतात. ही वनस्पती मूळची प. आशियातील असून तुर्कस्तान, इराण, रशिया, चीन, ब्रम्हदेश, लाओस आणि भारत या देशांत तिची लागवड करण्यात येते. ‘ओपास’ या ‘रस’ अशा अर्थाच्या ग्रीक शब्दावरून इंग्रजीतील ओपियम हा शब्द आला आहे. अफूचा रंग पिवळा ते गडद करडा असून तिला विशिष्ट प्रकारचा वास असतो आणि कडवट चव असते. मादक, चंदू किंवा अशुद्ध अफू या स्वरूपात अफू ओढतात.

अफू हा एक जटिल पदार्थ असून त्यामधील जवळजवळ २५ अल्कलॉइडे मेकॉनिक अम्ल, लॅक्टिक अम्ल आणि सल्फ्यूरिक अम्ल यांमध्ये मिश्रित असतात. अल्कलॉइडांपैकी ⇨ मॉर्फीन हे महत्त्वाचे असून भारतीय अफूमध्ये त्याचे प्रमाण ९·५ ते १४·२% असते. या अल्कलॉइडामुळे सुखभ्रम उत्पन्न होतो तसेच कामोद्दीपन होते, अशा समजुतीमुळे अफूची सवय लागते. अफूची सवय शरीराला हानिकारक असल्यामुळे तसेच ती समाजघातक असल्यामुळे जून १९३३ मध्ये त्या वेळच्या बंगाल सरकारने ‘बेंगॉल ओपियम’ ॲक्ट गस्मोकिं नावाचा कायदा संमत केला होता. या कायद्यान्वये अफू ओढणाऱ्यांना आपली नावे अबकारी खात्यात नोंदवून परवाना काढावा लागे. मार्च १९३४ नंतर जी व्यक्ती परवान्याशिवाय अफू ओढताना पकडली जाईल तिला सहा महिन्यांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली होती. त्याशिवाय अफू चौकशी समितीने सुचविल्याप्रमाणे जवळ बाळगण्याच्या अफूचे प्रमाण एक तोळ्यावरून (सु. ११·७ ग्रॅं.) फक्त १२ ग्रेन (सु. ०·८ ग्रॅ.) इतके कमी करण्यात आले. महाराष्ट्रात ‘बॉम्बे ओपियम स्मोकिंग ॲक्ट’ १९३६ मध्ये करण्यात आला असून तो १९४९ मध्ये दुरुस्त करण्यात आला आहे.

अफूची आसक्ती लवकर उत्पन्न होते. तीमुळे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात. अमेरिकेत अफूची लागवड बेकायदेशीर ठरविण्यात आली आहे. कॅनडामध्ये अफूवर मोठा आयात कर बसविण्यात आला असून धूम्रपानास योग्य असे अफूचे चूर्ण आयात करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अफूमधील औषधी गुणांमुळे वैद्यकात ते एक अतिशय उपयुक्त औषध म्हणून गणले जाई. अलीकडे पाश्चात्य वैद्यकात अफूपासून मिळणाऱ्या औषधांचा उपयोग फार कमी प्रमाणात केला जातो. [ → अफू].

हशीश किंवा चरस : भांगेचे किंवा गांजाचे झाड (कॅनाबिस सॅटिव्हा वा कॅ. इंडिका) या नावाने ओळखण्यात येणाऱ्या वनस्पतीपासून हा द्रव पदार्थ तयार करतात. या झाडाची पाने, देठ व फुलोरा यांपासून मिळणाऱ्या चिकापासून हशीश तयार करतात. झाडाचे शेंडे व नाजूक भाग पाणी, लोणी किंवा तेल यांच्या मिश्रणात उकळूनही हा पदार्थ बनवितात. पाईप किंवा चिलिमीत घालून धूम्रपान करतात. या झाडापासून मिळणाऱ्या भांग, गांजा वगैरे पदार्थांमध्ये हशीश सर्वांत जास्त प्रभावी आहे. हशीश ओढल्यामुळे सुखस्वप्ने व सुखभ्रम उत्पन्न होतात. गुंगी येऊन गाढ झोप लागते. हशीश बनविण्याकरिता लागणारी झाडे समुद्रसपाटीपासून १,८००—२,४०० मी. उंचीवरील डोंगराळ प्रदेशातील असावी लागतात. म्हणून नेपाळसारख्या देशात हशीश मोठ्या प्रमाणावर तयार होतो.

गांजा : भांगेच्या झाडापासून गांजा तयार करतात. ही झाडे सपाट प्रदेशातील व स्त्रीलिंगी असावी लागतात. फळे किंवा फुले येणाऱ्या रेझीनयुक्त शेंड्यापासून गांजा तयार होतो. गांजा बनविताना निरनिराळ्या प्रक्रिया करतात. चापट, गोल व चूर्ण या तीन प्रकारचा गांजा मिळतो. चिलिम अथवा हुक्क्यातून तंबाखूमिश्रित गांजा धूम्रपानाकरिता वापरतात. गांजालाच स्पॅनिश भाषेत मरिव्हाना (मारिजुआना) म्हणतात. अमेरिकेत सिगरेटीप्रमाणे गुंडाळी करून गांजा ओढतात. या सिगारेटींना ‘रीफर्स’ म्हणतात. गांजाची लागवड, उत्पादन, विक्री व उपयोग यांवर कायदेशीर बंधने घालण्यात आलेली आहेत. गांजा ओढण्यामुळे एक प्रकारची सुखद तंद्री लागते. सवयीमुळे कोणताही अडथळा न येता रोजची कामे पार पाडता येतात. [ → गांजा].

खोरासनी ओवा : सोलॅनेसी कुलातील हायोसायामस नायगर किंवा हेनबेन या नावाने ओळखण्यात येणाऱ्या वनस्पतीला खोरासनी ओवा म्हणतात. हिमालयाच्या प्रदेशातील हे एक जंगली झाड असून त्याचे सर्व भाग, विशेषेकरून बी, विषारी असते. या झाडाची वाळलेली पाने आणि फुले गांजाप्रमाणे ओढण्याची सवय सिंधमधील फकीर जमातीत आढळते. बियांचे चूर्णही ओढण्याची प्रथा आहे. [ → ओवा, खोरासनी].

धूम्रपानाची साधने : (१) विडी, (२) सिगारेट, (३) सिगार किंवा चिरूट, (४) पाइप, (५) चिलीम, (६) हुक्का, (७) गुडगुडी.

धूम्रपानाची साधने : सिगारेट, सिगार, चिरूट, विडी, पाइप, चिलीम, हुक्का व गुडगुडी ही धूम्रपानाची प्रमुख साधने होत.

सिगारेट व सिगार : दंडगोल आकाराच्या, कागदाचे वेष्टन असलेल्या तंबाखूमिश्रण भरलेल्या धूम्रपानाकरिता बनविलेल्या वस्तूस सिगारेट म्हणतात. १८७२ पासून सिगारेटींच्या यांत्रिक उत्पादनास प्रारंभ झाला. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या सुमारास सिगारेट उत्पादनात फार मोठी वाढ झाली. आज दर मिनिटास ६०० ते १,००० सिगारेटी तयार करणारी यंत्रे उपलब्ध आहेत. तंबाखूमिश्रणात शर्करा व ज्येष्ठमध मिसळल्याने विशिष्ट स्वाद उत्पन्न होतो. सिगारेट बनविण्याकरिता विशिष्ट प्रकारचाच कागद वापरतात. टर्किश व ईजिप्शियन बनावटीच्या सिगारेटींचा आडवा छेद लंबगोलाकार असतो व इतर सिगारेटींचा वर्तुळाकार असतो. ईजिप्तमध्ये पौर्वात्य देशांतून मागविलेल्या तंबाखूपासून सिगारेट उत्पादन करीत. इतर देशांनी नंतर ईजिप्तचे अनुकरण केले. तंबाखूच्या धुरातील हानिकारक पदार्थ शोषिले जाऊ नयेत किंवा त्यांचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने गाळणीयुक्त धारक तयार करण्यात आले. नंतर सिगारेटच्या ओठात धरावयाच्या भागातच गाळणी बसविण्याची प्रथा सुरू झाली. अर्थात अशा गाळणी मार्फत निकोटिनासारख्या हानिकारक पदार्थांचा थोडासा अंशच काढून टाकण्यास मदत होते, हे लक्षात ठेवले पाहिजे.

सिगारमध्ये कागदाचा वापर करीत नाहीत. संपूर्ण तंबाखूच्याच बनविलेल्या या साधनात भरणा करणारी पाने बांधणाऱ्या पानांत गुंडाळून त्यावर वेष्टनाचे पान सर्पिल पद्धतीने बसवितात. हाव्हॅना सिगार उत्तम समजतात. क्यूबातील उत्तम प्रतीच्या तंबाखू पानापासून त्या बनवितात. सिगारचे एक टोक रुंद असते व दुसरे निमुळते असून बंद असते. चिरूट तंबाखूच्या पानांचा तयार करण्यात येतो. त्याची दोन्ही टोके छाटलेली असतात. मूळ तमिळ शब्द ‘शुरूट्टु’ (Shuruttu) या ‘तंबाखूची वळकटी’ अशा अर्थाच्या शब्दावरून चिरूट (Cheroot) हा शब्द रूढ झाला आहे. तिरूचिरापल्ली (तमिळनाडू) येथील सिगार व चिरूट प्रसिद्ध आहेत. मॅनिलामध्ये उत्तम सिगार तयार होतात [ → सिगारेट व सिगार].

विडी :तंबाखू ओढण्याचे भारतातील विडी हे प्रमुख साधन होय. रुई, पळस, कुडा, तेंडू व टेंबुर्णी या वनस्पतींची पाने विडी उत्पादनात वापरतात. यांपैकी टेंबुर्णीची झाडे मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र व बंगाल यांशिवाय जगातील कोणत्याही भागात उगवत नाहीत. ज्या ठिकाणी ही पाने भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात तेथे विडी उत्पादन अधिक प्रमाणात होते. सर्वसाधारणपणे १,००० विड्यांमध्ये ३० ग्रॅम तंबाखू असते. आंध्र प्रदेशातील काही स्त्रियांना विडीचा जळता भाग तोंडात धरून ओढण्याची सवय असल्याचे आढळून आले आहे. [ → विडी].

पाइप, चिलीम, हुक्का व गुडगुडी : पोकळ नळी व तंबाखू जळत ठेवण्याचे खोलगट लहान भांडे एकमेकांस जोडून बनविलेल्या धूम्रपान उपकरणास इंग्रजीत पाइप म्हणतात. तंबाखू ठेवण्याचे भांडे दगड, माती, चिनी माती, लाकूड, मक्याच्या कणसाचे बुरखुंड, हाडे किंवा मिरशम (मॅग्नेशियम सिलिकेटयुक्त खनिज) यांची बनवीत. इंग्लंडमध्ये पाइप मेकर्स कंपनी स्थापन करण्यात आली होती व यूरोपातही इंग्लिश पाइप लोकप्रिय झाला होता. मध्य यूरोपात डच बनावटीच्या पाइपांचे अनुकरण करीत. हल्ली बाजारात मिळणारा उत्तम पाइप भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वाढणाऱ्या ब्रायर (एरिका आर्बोरिया) नावाच्या वनस्पतीच्या जाड मुळ्यांपासून बनविलेल्या तंबाखू भांड्याचा व कठीण रबर किंवा प्लॅस्टीक नळीचा बनविलेला असतो. अमेरिकेत मक्याच्या कणसाचे बुरखुंड (तंबाखूचे भांडे) व लाकडी पोकळ नळी यांपासून तयार केलेला पाइप लोकप्रिय आहे. चिनी लोक पाइपाकरिता बांबूच्या पोकळ नळ्या वापरीत. सांपत्तिक स्थितीप्रमाणे या पाइपांची तंबाखू जाळण्याची भांडी सोने, चांदी किंवा तांब्याची बनवीत. अमेरिकन इंडियन लोक शिष्टाचाराकरिता जो पाइप ओढीत त्याला ‘पीस पाइप’ किंवा ‘कॅल्युमेट’ म्हणत. त्याचे तंबाखूचे भांडे तांबड्या वालुकाश्माचे बनविलेले असे. पाइप शोभिवंत करण्यासाठी तंबाखूच्या भांड्यांना पशू, पक्षी यांचा किंवा मानवी आकार देतात.

पौर्वात्य देशांतून हुक्का नावाचे उपकरण तंबाखू अथवा इतर पदार्थांच्या धूम्रपानाकरिता वापरतात. उर्दूतील ‘हुक्क’ या मूळ भांडे असा अर्थ असलेल्या शब्दावरून संपूर्ण उपकरणास हुक्का हे नाव प्राप्त झाले आहे. या उपकरणात धूर पाण्यातून नेऊन मग लांब लवचिक नळीवाटे श्वसनमार्गात ओढण्याची व्यवस्था असते. इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान व भारत या देशांत हुक्का ओढण्याची पद्धत बरीच जुनी असावी. मुसलमानी राजांच्या कारकीर्दीत बहुतेक बड्या व्यक्तिंच्या घरातून हुक्का असे आणि पाहुण्यांना तो देण्याची पद्धत रूढ होती. थोरामोठ्यांच्या स्त्रियाही हुक्का ओढीत. हुक्क्याची भांडी निरनिराळ्या धातूंची व नक्षीदार बनवीत. गुडगुडी हे हुक्क्यासारखेच उपकरण असून ते मराठेशाहीत लोकप्रिय होते. त्याचे पाण्याचे भांडे नारळाच्या सबंध करवंटीचे बनविलेले असे. पाण्यातून येणाऱ्या धुराचा गुड-गुड असा आवाज होई, त्यावरून गुडगुडी हे नाव मिळाले असावे.

आफ्रिकेत पाइप ओढीत, याशिवाय तेथे नदीकिनाऱ्यावरील उतरत्या भागी दोन भोके पाडून ती जमिनीखालून एकमेकांना जोडीत आणि एखा भोकात जळती तंबाखू ठेवून पालथे पडून दुसऱ्यातून धूर ओढून धूम्रपान करीत असत.

धूम्रपान व आरोग्य : धूम्रपानाकरिता वापरण्यात येणाऱ्या सर्व पदार्थांमध्ये तंबाखू हा मुख्य पदार्थ होय. तंबाखूप्रमाणेच अफू, गांजा वगैरे पदार्थही शरीरास हानिकारक आहेत हे निर्विवाद आहे. प्रस्तुत नोंदीत तंबाखूच्या धूम्रपानाच्या परिणामांचा विशेष विचार केलेला असून अफू व गांजा यांच्या परिणामांचे त्या त्या शीर्षकाच्या नोंदीत वर्णन दिलेले आहे. यांखेरीज ‘मादक पदार्थ’ ही नोंदही पहावी. शतकानुशतके तंबाखूचे धूम्रपान चालू असून त्याचा व आरोग्याचा परस्परसंबंध हा १९५० सालानंतर संशोधनाचा विषय बनला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या दृष्टीने तंबाखूचे धूम्रपान हा वादाचा प्रश्न बनला आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने व ब्रिटनमधील धूम्रपानासंबंधीच्या कोष्टक क्र. १ ते ४ मधील आकडेवारीवरून ही सवय सतत वाढत असल्याचेच दिसते.

इतर देशांच्या मानाने भारतातील धूम्रपाणाचे प्रमाण कमी दिसत असले, तरी सिगारेट उत्पादनाचे प्रमाण सतत वाढत असल्यामुळे भारत पाश्चात्त्यदेशांशी लवकरच बरोबरी करेल असे वाटते.

मुंबई येथील गोल्डन टोबॅको कंपनीच्या सिगारेट कारखान्यात काही कामगार दररोज ३ लाख सिगारेटी हाताळतात. भारतात जवळजवळ दोन कोटी लोक सिगारेट ओढीत असावेत.

सिगारेटींच्या तंबाखूचा धूर हा बहुजिनसी पदार्थ असून तो वायू, असंघनित (द्रवरूप न झालेली ) बाष्पे व जलकणांचा बनलेला असतो. धूर तोंडात शिरते वेळी त्याच्या प्रत्येक घ. सेमी. मध्ये कोट्यावधी कण तयार झालेले असतात. या कणांचे आकारमान सर्वसाधारणपणे ०·५ मायक्रॉन (१ मायक्रॉन = १०-३ मिमी.) असते. धुराच्या मिश्रणावर सिगारेटीच्या जळत्या टोकाच्या तापमानाचा परिणाम होतो. झुरका मारताना जळत्या टोकाचे तापमान जवळ-जवळ ८८४° से.पर्यंत जाते व इतर वेळी ते ८३५° से. असते.

तंबाखूच्या धुराचा आणि आरोग्याचा संबंध प्रस्थापित करण्यास १९३० च्या सुमारास सुरुवात झाली. मृत्युसंख्या व धूम्रपान यांचा विशेष अभ्यास केला जाऊ लागला. सिगार अथवा पाइप ओढण्यापेक्षा सिगारेट ओढणे अधिक हानिकारक असल्याचा दावा करण्यात आल्यामुळे सिगारेट धुराविषयी अधिक संशोधन करण्यात आले.

तंबाखूमधील प्रमुख हानिकारक घटक निकोटीन हे अल्कलॉइड असून ७० मीमी. लांबीच्या एका सिगारेटमध्ये १६ ते ३२ मिग्रॅ. निकोटीन असते. ६·४ मिग्रॅ. निकोटीन कुत्र्याला आंतरनीला अंतःक्षेपणातून (इंजेक्शनातून) दिल्यास तो ३ मिनिटांत मरतो. १० ग्रॅम वजनाच्या सिगारेट धुरात ३२ मिग्रॅ. निकोटीन असते, तर सिगारच्या धुरात निकोटिनाचे प्रमाण सु. १५ ते ४० मिग्रॅ. असते. सिगारेट ओढण्याची पद्धत सिगारेट प्रकार (गाळणीयुक्त वा गाळणीविरहित), झुरक्याची खोली, धूर फक्त तोंडात धरून बाहेर सोडणे इत्यादींवर निकोटिनाच्या शोषणाचे प्रमाण अवलंबून असते. दम मारून झुरके घेणाऱ्यामध्ये ९०% निकोटीन शोषिले जाते, तर धूर तोंडातून बाहेर टाकणाऱ्यांमध्ये २५% ते ५०% एवढेच शोषिले जाते. सिगारेट ओढण्याची सवय जडविणारा पदार्थ निकोटीनच असावा. योग्य प्रमाणात घेतल्यास निकोटीन उत्तेजक असते, पण उत्तेजनाच्या मागोमाग औदासिन्यही येते. निकोटीनाचा उत्तेजक परिणाम सवय जडविण्यास पुरेसा असतो.

सिगारेटच्या धुरातील जवळजवळ ३,००० घटक आजपर्यंत ओळखले गेल आहेत. निकोटिनाशिवाय या धुरातील महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे आहेत : पिरिडीन आणि इतर नायट्रोजनयुक्त कार्बनी संयुगे, आयसोप्रिनॉइड संयुगे, बाष्पनशील अम्ले, टारसदृश पदार्थ, फिनॉलिक पदार्थ-विशेषेकरून फुरफुराल आणि ॲक्रोटीन. सिगारेट धुराचा अभ्यास करताना धुराच्या (१) कणीय अवस्था आणि (२) वायू अवस्था अशा दोन अवस्था ओळखल्या जातात. सबंध धूर ६०% वायू आणि ४०% कणांचा बनलेला असतो. कणीय अवस्थेतील धुरात सापडणारे काही घटक व त्यांचे फुफ्फुसावर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत.

कणीय अवस्थेतील सात बहुवलयी ( अणूंची एकापेक्षा अधिक वलये असलेली ) संयुगे कर्करोगोत्पादक असल्याचे सिद्ध झाले आहे. तंबाखूच्या ऊर्ध्वपातनापासून मिळविलेला पदार्थ (टार) या प्रत्येक संयुगापेक्षा अधिक कर्करोगोत्पादक असतो. वायू अवस्थेतील पदार्थ प्रायोगिक प्राण्यावर तसेच प्रायोगिक मानवी शरीरभागावर दुष्परिणाम करतात. श्वासनाल (घसा व फुप्फुसे यांना जोडणारा मुख्य श्वसनमार्ग) व श्वावसनलिका यांच्या श्लेष्मकलास्तरावरील (बुळबुळीत पातळ अस्तरावरील) कोशिकांच्या (पेशींच्या) केसासारख्या सूक्ष्म भागांच्या हालचालीवर यांचा परिणाम होतो. या हालचालीमुळे श्वसनमार्गातील बाहेरून येणारे कण आणि स्राव शरीराबाहेर टाकण्याच्या उद्देशाने श्वासनालाच्या वरच्या भागाकडे वाहून नेली जातात. शेवटी ⇨ खोकला येऊन हे पदार्थ बाहेर फेकले जातात. श्वसनमार्गात शिरणारे सूक्ष्मजंतू याच प्रकारे शरीराबाहेर टाकले जातात. हालचालीत व्यत्यय आल्यामुळे सूक्ष्मजंतू तेथेच वाढून वारंवार पडसे येणे, श्वासनाल आणि श्वासनलिकांचा शोथ (दाहयुक्त सूज) व फुप्फुसशोथ इ. रोग उद्‌भवतात.

कार्बन मोनॉक्साइडामुळे प्रत्यक्ष फुप्फुसावर परिणाम होत नसला, तरी रक्तातील तांबड्या कोशिकांतील हीमोग्लोबिनाचे कार‌्बॉक्सी हीमोग्लोबिनात रूपांतर झाल्यामुळे ऑक्सीजन पुरवठा कमी होतो. एकामागून एक सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये (शृंखला किंवा अविरत धूम्रपान) रुधिराभिसरणातील एकूण हीमोग्लोबिनापैकी ५ ते १०% भागाचे कार‌्बॉक्सी हीमोग्लोबिनात रूपांतर होते. सुदृढ प्रकृती असे तोपर्यंत ऑक्सिजनातील तूट जाणवत नाही परंतु उंच प्रदेशात, रक्तक्षयाच्या रोग्यांना तसेच हृद‌्यरोहिणीजन्य हृद‌्यरोगात ही तूट हानिकारक ठरते.

हृदय आणि रक्तवाहिन्यांवर अनिष्ट परिणाम होतो. निकोटिनाच्या चेतावणीमुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तदाबही वाढतो. हृदयाची गती अनियमीत होते. कधीकधी हृदयाची गती अतिजलद करणारे झटके येतात. छातीत कळा येतात आणि धडधडते. रक्तवाहिन्यांचा अपकर्ष (ऱ्हास) होऊन त्यांचा लवचिकपणा कमी होतो आणि त्या कठीण बनतात. परिणामी हृद‌्यरोहिण्या कठीण बनून हृद‌्यरोग होतो. दररोज वीस ते चाळीस सिगारेटी ओढणाऱ्या व्यक्तींमधील हृद‌्यरोगामुळे मरणाऱ्यांची संख्या, जे धूम्रपान अजिबात करीत नाहीत त्यांच्या पेक्षा तिप्पट आढळली आहे. फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण धूम्रपान करणाऱ्यांमध्ये ११ पट अधिक आढळले आहे. सिगारेटमधील तंबाखू शिवाय वेष्टनाच्या कागदातही कर्करोगोत्पादक पदार्थ आढळल्यामुळे इतर प्रकारच्या धूम्रपानापेक्षा ते अधिक हानिकारक असते.

न्यूयॉर्कमधील नेलॉर डेना इन्स्टिट्यूट ऑफ डिसीझ प्रिव्हेन्शन या संस्थेतील डिट्रिच हॉफमन व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘एन’- नायट्रोसोनॉरनिकोटीन नावाचे संयुग निःसंदिग्धपणे कर्करोगात्पादक असल्याचा १९७४ मध्ये शोध लावला आहे. या हानिकारक पदार्थाचे प्रमाण अमेरिकन तंबाखू प्रकारातून दर दशलक्ष भागात १·९ ते ८८·६ एवढे आढळले आहे. दैनंदिन अन्न व द्रव पदार्थात या पदार्थाचे प्रमाण क्वचितच दर दशलक्ष भागात ०·१ पेक्षा जास्त आढळते. तंबाखूपासून अलग मिळविण्यात आलेले ‘एन’-नायट्रोसोनॉरनिकोटीन हे पहिलेच कार्बनी संयुग आहे. धूम्रपानामुळे या संयुगाचे शोषण होऊन फुप्फुसांच्या श्लेष्मकलास्तराशी होणारा त्याचा दीर्घकालीन संपर्क कर्करोगोत्पादनास प्रत्यक्ष संधी देतो.

अमेरिकन सरकारच्या आरोग्य खात्याने धूम्रपानाचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्याकरिता नेमलेल्या समितीने काढलेले निष्कर्ष पुढे थोडक्यात दिले आहेत. (१) फुप्फुसांचा कर्करोग : सिगारेट धूम्रपान व हा रोग यांचा थोडाफार संबंध आहे. (२) तोंडाचा कर्करोग :  कर्करोग उद्‌भवण्यापूर्वीची सर्व लक्षणे सिगारेट ओढणाऱ्यांच्या तोंडात आढळतात. उदा., ल्यूकोप्लेकिया (तोंडातील व जिभेवरील श्लेष्मकलास्तरावर पांढरे किंवा किंचित निळी झाक असलेले चट्टे पडणे). [ मुंबई येथील कर्करोग संशोधन संस्थेने आंध्र प्रदेशातील विडीचा जळता भाग तोंडात धरून धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांतील तोंडाच्या कर्करोगाबद्दल असाच निष्कर्ष काढला आहे]. (३) स्वरयंत्राचा कर्करोग : पुरुषातील या रोगाचा व धूम्रपानाचा संबंध घनिष्ठ आहे. (४) अन्न नलिका कर्करोग : धूम्रपानाचा व या रोगाचा संबंध असावा. (५) ओठांचा कर्करोग : पाइप धूम्रपान व या रोगाचा संबंध निश्चित स्वरूपाचा आहे. (६) मूत्राशय कर्करोग : १९५५ मध्ये उंदरांच्या तोंडातील श्लेष्मकलेवर पाच महिने तंबाखू टार चोळून पाहिल्यानंतर त्यांना मूत्राशयाचा कर्करोग झाल्याचे आढळले आहे. (७) श्वासनलिकाशोथ : चिरकारी (दीर्घकालीन) श्वासनलिकाशोथ व धूम्रपान यांचा संबंध आहे. या रोगामुळे मरणाऱ्यांच्या संख्येत धूम्रपानामुळे भर पडते. (८) फुप्फुसातील वायुकोशांची अपसामान्य वाढ : या रोगाचा व धूम्रपानाचा घनिष्ठ संबंध आहे. धूम्रपानामुळे हा रोग होऊन मृत्यूचा धोका वाढतो. (९) फुप्फुसांच्या वायूधारणाक्षमतेवर धूम्रपानाचा अनिष्ट परिणाम होऊन धूम्रपान करणारे लवकर दमतात. (१०) दमा आणि जठराचा कर्करोग : या रोगांचा व धूम्रपानाचा संबंध प्रस्थापित झालेला नाही. (११) हृद‌्यरोहिणीजन्य हृद्रोगामुळे मरणाऱ्यांच्या संख्येमध्ये धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते, असे सिद्ध झाले आहे. (१२) धूम्रपान आणि आग लागून होणारे अपघाती मृत्यू यांचा संबंध आहे. (१३) दृष्टीचा अधूपणा आणि तंबाखू यांचा संबंध एका शतकापेक्षा आधिक काळ ज्ञात आहे. या रोगाचा व फक्त तंबाखूचाच संबंध नसून अपोषणजन्य न्यूनताही कारणीभूत असावी. (१४) समान सामाजिक पातळीवरील स्त्रियांमध्ये गर्भारपणात धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांच्या नवजात अर्भकांचे वजन धूम्रपान न करणाऱ्या स्त्रियांच्या नवजात अर्भकांच्या वजनापेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. हे वजन घटण्याचे निश्चित कारण सापडलेले नाही. यांशिवाय गर्भपाताचा धोका, मृतजन्म आणि नवजात अर्भकाचा मृत्यू यांचे प्रमाण धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांत अधिक आढळले आहे.

या समितीने ‘सिगारेट धूम्रपानापासून आरोग्यास धोका असून त्याविरुद्ध उपाय योजना करणे जरूर आहे’ असे आपले स्पष्ट मत  दिले आहे.

तंबाखू धूम्रपान औषधासक्तीत मोडत नाही कारण त्यामुळे सामाजिक धोका असल्याचे सिद्ध झालेले नाही. तथापि या विषयी संशोधन चालू आहे. धूम्रपान न करणाऱ्यांना सिगारेट धुरापासून अधिहर्षता (ॲलर्जी) होत असल्याचे आढळून आले आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये सिगारेट धुराची अधिहर्षता उत्पन्न होईल अशा निदान २० लक्ष व्यक्ती असाव्यात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सिगारेटची सवय सोडण्याकरिता निरनिराळे उपाय सुचविण्यात आलेले आहेत. त्यांत विद्युत चिकित्सा वापरून नावड उत्पन्न करण्याचाही समावेश होतो. भारतातही सिगारेट ओढणे (एकूण धूम्रपान करणे) शरीरास अपायकारक असून निषिद्ध आहे असे मुलांच्या मनावर वेळीच ठसविण्यासाठी शासनातर्फे सूचना फलक लावणे, धोके सांगणे वगैरे विविध मार्ग अवलंबिले जात आहेत. सिगारेट ओढणे संपूर्णतया व एकाएकी बंद करणे अनेक वेळा यशस्वी ठरले आहे. ब्रिटनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशिअन्स या संस्थेने यासाठी पुढील सूचना केल्या आहेत : (१) डॉक्टरांनी धूम्रपान न करून आदर्श घालून द्यावा. (२) जनतेला धूम्रपानाच्या धोक्याविषयी रेडिओ, दूरचित्रवाणी इ. साधनांद्वारे अधिक माहिती पुरवावी. (३) विद्यार्थिवर्गाला शिक्षकांनी आदर्श घालून द्यावा. लहान मुलांना सिगारेट विकण्यावर बंदी घालावी. (४) सिगारेटींच्या जाहिरातींना मनाई करावी. (५) जाहिराती छापल्यास त्यांमध्ये धोकादर्शक सूचना अवश्य छापाव्यात. (६) सिगारेट पाकिटावर धोक्याची सूचना छापावी. (७) रुग्णालयातून धूम्रपानाची सवय सोडू पाहणाऱ्यांना मदतीकरिता खास शाखा उघडाव्यात. अशाच सोयी कारखाने, कार्यालये इ. ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. (८) सिगारेटीमधील निकोटीन व टार या पदार्थाचे प्रमाण पाकिटाच्या वरील भागावर व जाहिरातींत छापून निरनिराळ्या प्रकारच्या बाजारात विक्रिस येणाऱ्या सिगारेटींपैकी कोणत्या जास्त हानिकारक आहेत हे स्पष्ट करावे.

सर्व पुढारलेल्या देशांतून धूम्रपान हानिकारक असल्याचे मान्य झाले आहे. अमेरिकेत सिगारेटींच्या जाहिरातीतील चौकटीत ‘इषारा-सर्जन जनरल यांनी सिगारेट ओढणे आपल्या आरोग्यास धोकादायक असल्याचे ठरविले आहे’, असे छापण्याची सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय निकोटीन व टारचे प्रमाणही छापण्याची प्रथा सुरू आहे. भारतातही प्रत्येक सिगारेटच्या पाकिटावर अशाच स्वरूपाचा इषारा छापण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. रोगोत्पादनाचा व सिगारेटीच्या धुरातील हानिकारक पदार्थांचा घनिष्ट संबंध असल्यामुळे एकूण धुराचे प्रमाणच कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येऊ लागले. त्याकरिता आनुवंशिकी तंत्राचा वापर करून खास तयार करून निवडलेली तंबाखूची झाडे व त्यामुळे कमी सुपीकता असणारे पीक वाढविणे, खुडण्याच्या पद्धतीत योग्य ते बदल करून कमी प्रतीचे उत्पादन कसे होईल याकडे लक्ष पुरविणे, टिकविण्याच्या पद्धती बदलून पानातील एकूण घटकांचे प्रमाण कमी कसे होईल हे बघणे, अनिष्ट घटकांचे प्रमाण अत्यल्प किंवा अजिबात नसलेली तंबाखू बनविणे व त्याच वेळी निष्क्रिय पदार्थांची सरमिसळ करून तीव्रता कमी करणे वगैरे प्रयोग करण्यात आले आहेत. या सर्वांचा उद्देश प्रत्येक वेळी जळणाऱ्या तंबाखूचे प्रमाण कमी करणे, ज्वलन अर्धवट न होऊ देता पूर्ण होऊदेणे, उष्णतेने होणारे विघटन कमी करून टार, कार्बन मोनॉक्साइड व इतर हानिकारक पदार्थांचे उत्पादनच न होऊ देणे हा असतो. अशा तंबाखूपासून तयार केलेल्या सिगारेटीच्या धूराची कर्कजननक्षमता कमी असल्याचे आढळून आले आहे. थोडक्यात हानिकारक पदार्थांचे प्रमाण अत्यल्प असलेल्या सिगारेटी बनविणे व सिगारेट धुराचे श्वसनमार्गात जाण्याचे प्रमाण कमी करणे हे हेतू साध्य करावयाचे आहेत. कदाचित अशा सिगारेटीची ‘चव’ आणि ‘स्वाद’ नेहमीसारखा लागणार नाही परंतु त्यावरही उपाय शोधता येतील.

ग्रेट ब्रिटनमध्ये दररोज ३५ कोटी सिगारेटींची विक्री होते. सिगारेट उत्पादनाकरिता ब्रिटन ९ कोटी किग्रॅ. तंबाखू आयात करते. तेथील इंपिरिअल केमिकल इंडस्ट्रीज या रासायनिक पदार्थ निर्माण करणाऱ्या कंपनीला तंबाखूऐवजी एखादा बदली पदार्थ तयार करण्याची कल्पना सुचली. पहिल्या दोन वर्षांत या कंपनीने त्यावरील संशोधनाकरिता ५ लक्ष पौंड खर्च केला. त्यानंतर इंपिरिअल टोबॅको नावाच्या तंबाखू उत्पादनात प्रमुख असलेल्या कंपनीच्या सहकार्याने इंपिरिअल डेव्हलपमेंट नावाची कंपनी स्थापण्यात आली. या कंपनीचा उद्देश संपूर्ण कृत्रिम तंबाखू बनविण्याचा नसून असा पदार्थ शोधून काढण्याचा होता की, जो धूम्रपान करणाऱ्यांच्या पसंतीस उतरावा आणि ज्यामध्ये तंबाखूमधील हानिकारक पदार्थ नसावेत. अलीकडेच हे संशोधन यशस्वी झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. या नव्या पदार्थाला ‘एन एस एम’ (न्यू स्मोकिंग मटेरिअल, नवा धूम्रपान योग्य पदार्थ) असे नाव देण्यात आले आहे. हा पदार्थ मानवी आरोग्यास धोकादायक आहे किंवा नाही हे ठरविण्याचे कार्य सरकारी यंत्रणेकडे सोपविण्यात आले आहे. तो निर्धोक असल्याचे सिद्ध होताच बाजारात कृत्रिम पदार्थमिश्रित सिगारेटी मिळू लागतील.

भारतामध्ये लहान मुलांतील धूम्रपान अजून चिंताजनक बनले नाही. पाश्चात्य देशांतून विशेषेकरून अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि प. जर्मनी या देशांतून अल्पवयीन मुला-मुलींचे धूम्रपान हा चिंतेचा विषय बनला आहे. सर्वसाधारणपणे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत धूम्रपानाची सवय जडण्याचा धोका नसतो. ज्या मुलांचे माता व पिता दोघेही धूम्रपान करतात, त्या मुलांमध्ये सवय जडण्याचा धोका अधिक असतो.

मोठी माणसे किंवा लहान मुले धूम्रपान का करतात याविषयी निश्चित कारण सांगता येत नाही. काहींना उत्तेजक गुण तर काहींना धूम्रपानातील प्रशामक गुण जाणवतो. निरनिराळी आंतरिक व बाह्य कारणे (ज्यांमध्ये सामाजिक, कौटुंबिक इ. कारणांचाही समावेश असतो) धूम्रपानास उद्युक्त करीत असावीत.

भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय वर्णन : औषधांचा धूर पिणे, गळसरीच्या वरचे गळ्याचे नाक, तोंड इ.सर्व अवयवांचे वातकफात्मक विकार उत्पन्न होऊ नयेत म्हणून निरोगी अवस्थेत व उत्पन्न झाल्यावर ते नाहीसे करण्याचा एक उपचार.

प्रकार-स्निग्ध, मध्य व तीक्ष्ण असा तीन प्रकारचा धूम्र क्रमाने वात, वातकफ व कफ दोषविकृती असताना उपयुक्त होतो. वर्ज्य– रात्री जागरण झाले, बस्ती, रेचक घेतले, मासे, दही इ. पदार्थ खाल्ले तर स्वस्थाने व रक्तपित्त, पांडू, उदर, मेह इ. झालेल्याने धूम्र पिऊ नये. उपद्रव– धूम्र अकाली वा अतिपान केल्याने रक्तपित्त, अंधत्व, बधिरत्व इ. विकार होतात. औषधे– मृदू, स्निग्ध धूम्राकरिता अगरू, गुग्गुळ इ. औषधे व फळांचे झाडाच्या नारांचे स्नेह, मेदमज्जा, वसा, तूप ही द्रव्ये मध्याकरिता सालईलाख, कमल इ. द्रव्ये व तीक्ष्णाकरिता मालकांगोणी, हळद, दशमुळे इ. द्रव्ये वापरावीत. औषधांची चटणी करून चिरूटासारखी अंगठ्याएवढी जाड, मध्ये उभी पोकळ अशी वात करून, सुकवून ती विधियुक्त तयार केलेल्या टोपणात (धूमनेत्रात) बसवून प्यावी.

धूम्र खोकल्यावर, वांती होण्याकरिता व व्रण शुद्धीकरिताही देतात. धूम्र विधीप्रमाणे द्यावा. धूम्र तोंडानेच प्यावा नाकाने नाही. प्याल्यास दृष्टिविघातक होतो. न होणारे रोग– खोकला, श्वास, दुष्ट पडसे, स्वरभेद, तोंडाला दुर्गंधी, पांडुता, केसांचे रोग, कान, तोंड, डोळ्यांचा स्राव, खाज, वेदना, जडपणा, तसेच तंद्री, उचकी हे विकार धूम्र पिणाऱ्याला स्पर्शही करीत नाहीत.

जोशी, वेणीमाधवशास्त्री

संदर्भ : 1. Katz, A. H. Felton, J. S. Health and Community, London, 1965.

2. Modi, N. J. Medical Jurisprudence and Toxicology, Bombay, 1963.

3. U. S. Department of a Health, Education and Welfare, Somking and Health, Washington.