विश्वासार्हता ( अभियांत्रिकी ) : एखाद्या वस्तूने (किंवा उत्पादनाने) विशिष्ट परिस्थितीत ठराविक काळापर्यंत, अपेक्षेनुसार, विनातक्रार कार्यक्षम रीतीने कार्य करण्याची संभाव्यता (शक्यता) म्हणजे त्या वस्तूची विश्वासार्हता होय. विश्वासार्हतेची ही व्याख्या १९५७ साली अमेरिकेतील ॲडव्हायझरी ग्रूप ऑन रिलायबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट (AGREE) या संस्थेने केली होती. यावरून उत्पादित वस्तू ग्राहकाला सहजपणे स्वीकारार्ह होण्यासाठी तिच्या विश्वासार्हतेची पातळी (स्तर) वाढविणे आवश्यक असून त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्यवस्थापनाच्या निरनिराळ्या पद्धती म्हणजे विश्वासार्हता अभियांत्रिकी होय.

एखादी अभियांत्रिकीय प्रणाली किंवा यंत्रणा ही तिच्यासाठी ठरवून दिलेल्या पर्यावरणाच्या व कामाच्या परिस्थितीमध्ये तिच्या अपेक्षित असलेल्या आयुष्यात उपभोक्त्याच्या किंवा ग्राहकाच्या दृष्टीने समाधानकारक रीतीने आपले ठरवून दिलेले कार्य पार पाडील ही संभाव्यता म्हणजे तिची विश्वासार्हता होय. म्हणून प्रणालीची विश्वासार्हता समजून घेण्यासाठी संभाव्यता सिद्धांताचे अध्ययन आवश्यक असते. [⟶ संभाव्यता सिद्धांत].

विश्वासार्हता केवळ अभियांत्रिकीय क्षेत्रापुरती मर्यादित नसून ती सामान्यपणे सर्व उपयुक्त उत्पादित वस्तूंना लागू आहे. रोजच्या व्यवहारात वापरण्यात येत असलेल्या वस्तू, यंत्रे, उपकरणे व प्रणाली किती योग्य प्रकारे कार्य करतात? त्यांच्यावर कितपत विसंबून राहता येऊ शकते? अपेक्षित कार्य त्या किती काळापर्यंत करतात? आयत्यावेळी त्यांची कार्यक्षमता कमी होते किंवा कसे? या सर्व गोष्टींचा विचार विश्वासार्हतेत केला जातो.

वापरण्यात येणारे यंत्र (उपकरण, प्रणाली इ.) हे त्याच्या अपेक्षित कामाच्या दृष्टीने किती विश्वासार्ह आहे, हे समजणे महत्त्वाचे आहे. कारण ते ऐनवेळी निरुपयोगी झाले वा योग्य प्रकारे काम करीनासे झाले, तर फार मोठा अनर्थ होऊ शकतो. उदा., आकाशात उडत असताना विमानाचे एंजिन अचानक बंद पडणे, महत्वाची शस्त्रक्रिया चालू असताना एखादे उपकरण बंद पडणे अथवा योग्य तऱ्हेने काम देईनासे होणे, लढाईच्या ऐन धामधुमीत बंदुकीतून गोळ्या न उडणे वगैरे. या सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करून याविषयीच्या विश्वासार्हतेच्या चाचण्या घेतल्या जातात किंवा परीक्षणे करण्यात येतात. नंतरच त्या उपकरणाचा दर्जा किंवा कार्यक्षम रीतीने काम करण्याचा कालावधी म्हणजे त्याचे आयुष्य निश्चित करतात.

विश्वासार्हता ठरविताना पुढील मुद्दे विचारात घेतात : विश्वसनीय व भरवसा असणे, दीर्घ आयुष्य, अखंडपणे सेवा देण्याची शक्यता, सामान्यपणे काम करण्याचा कालावधी आणि उत्पादन व वापर यांसाठी येणारा एकूण खर्च. वस्तूचे स्वरूप, ती वापरावयाचे क्षेत्र, तिच्यामुळे होणारे लाभ व तिची किंमत यांनुसार वरीलपैकी कोणत्या मुद्याला प्राधान्य द्यायचे ते ठरवितात. उदा., विमानाचा कोणताही भाग हा मुख्यतः विश्वसनीय व भरवशाचा असणे अत्यंत आवश्यक असते मग त्याची किंमत कितीही असो.

वेळेच्या सापेक्षतेवर विश्वासार्हता अवलंबून असते. विश्वासार्हतेचे मापन पुढील प्रकारे करतात : एखाद्या उपकरणाचा किंवा त्याच्या सुट्या भागांचा (प्रणालीचा किंवा उपप्रणालींचा) निरुपयोगी किंवा निष्फल होण्याचा काळ, एखाद्या यंत्रात किंवा त्याच्या सुट्या भागांत तुटफूट होण्याचा काळ, एखादी प्रणाली वा तिच्या उपप्रणाली १० टक्के निष्फल होण्याचा काळ, एखाद्या विशिष्ट कालावधीसाठीची (उदा., T एवढ्या काळासाठीची) उपकरणाची विश्वासार्हता म्हणजे या कालावधीत उपकरणात काहीही बिघाड न होता त्याची कार्यक्षमता योग्य तेवढी राहण्याची पूर्ण संभाव्यता.

उपकरणाची वा यंत्राची विश्वासार्हता योग्य असण्यासाठी सुरुवातीपासूनच निरनिराळ्या पातळ्यांवर दक्षता घेऊन योग्य तेवढी विश्वासार्हता असल्याचे आजमावावे लागते. उदा., उपकरणाचा अभिकल्प (आराखडा) तयार करतानाच त्याच्या सर्व भागांच्या विश्वासार्हतेची योग्य खबरदारी घेणे, उत्पादन होत असताना त्याच्या सुट्या भागांच्या गुणवत्तेचे परीक्षण करणे व कार्यक्षमता विश्वासार्ह आहे हे तपासणे, सक्षम व नाजूक भागांचा खास अभ्यास व परीक्षण करून आवश्यकतेनुसार त्यांच्यात बदल करणे आणि उपकरण वापरणाऱ्या ग्राहकांशी सतत संपर्क ठेवणे आणि त्याच्या सूचनांची व तक्रारींची दखल घेऊन त्यानुसार उपकरणात योग्य ते बदल करणे.

वस्तुनिर्मितीची विशिष्ट प्रक्रिया असते व ती ठराविक पद्धतीने चालते. या प्रक्रियेत काही क्रिया असतात आणि क्रियेमध्ये भागक्रिया व बीजक्रिया असतात. बीजक्रिया व्यवस्थित रीतीने भागक्रिया व्यवस्थित होतात आणि भागक्रिया व्यवस्थित रीतीने झाल्याने क्रिया उत्तम प्रकारे होतात. परिणामी एकूण प्रक्रिया उत्तम व गुणवत्तापूर्ण होते. या क्रिया क्रमशः व अखंडपणे झाल्या, तरच वस्तुनिर्मिती विश्वासार्ह रीतीने होते (आ.१). वस्तुनिर्मितीच्या उत्पादन विकास,

आ. १. उत्पादन प्रक्रियेतील क्रिया, भागक्रिया व बीजक्रिया यांच्यातील परस्परसंबंध

अभिकल्प किंवा आरेखन या प्राथमिक अवस्थेपासूनच विश्वासार्हतेच्या कार्यक्रमाचा अवलंब केल्यास अंतिम उत्पादनाची गुणवत्ता चांगली राहते व उत्पादनाचा खर्च मर्यादित राहू शकतो. उलट विश्वासार्हता कार्यक्रमाचा अवलंब प्रत्यक्ष उत्पादनाच्या अवस्थेत वस्तू असताना वा त्याहूनही उशीराने केल्यास प्रत्यक्षात आणण्यास जितका विलंब होतो तितक्या प्रमाणात वस्तूची गुणवत्ता खालावते आणि परिणामतः उत्पादनाचा खर्चही वाढतो. (आ. २).


अनेक वस्तूंच्या यंत्रांच्या किंवा उपकरणांच्या बाबतीत उत्पादकाकडून हमीचा काळ दिलेला असतो (गॅरंटी, वॉरंटी काळ). या काळात उपकरण नादुरूस्त होत नाही व या काळात त्याची कार्यक्षमता तशीच टिकून राहते. म्हणजे या वस्तूची विश्वासार्हता त्या काल मर्यादेपर्यंत  निश्चित असते आणि त्या दृष्टीने उत्पादन, परीक्षणे किंवा चाचण्या आणि गुणवत्ता सांभाळली जाते.

आ. २ विश्वासार्हता कार्यक्रमाची सुरूवात होण्याची वेळ आणि उत्पादन खर्च तसेच गुणवत्ता यांच्यातील परस्परसंबंध : (१) उत्पादन विकास, (२) प्राथमिक अभिकल्प, (३) अंतिम अभिकल्प, (४) प्रत्यक्ष उत्पादन, (५) ग्राहकाला वस्तू देणे, (६) ग्राहकाच्या तक्रारीचे विश्लेषण केल्यावर गुणवत्ता : (क) चांगली, (ख) बरी, (ग) मध्यम, (घ) अस्वीकार्य.

 विश्वासार्हता अभियांत्रिकी : विश्वासार्हता अभियांत्रिकी हा सु १९६० सालानंतर अधिक वेगाने विकसित झालेला विषय आहे. याआधी जीवन कमी गतिमान होते. नंतर जीवनाची गती फार वाढली आहे. पूर्वीही एखादे यंत्र निकामी झाल्यास त्रास होत असेच. मात्र त्यापासून आजच्या गतिमान युगात जेवढा भयंकर अनर्थ होऊ शकतो, तेवढा पूर्वी होत नसे. जलदगती व अत्याधुनिक तंत्रविद्या यांच्यामुळे विश्वासार्हतेची निकड अतिशय भासू लागली आणि यामुळेच अलीकडच्या काळात या शास्त्रात फार प्रगती झाली आहे. यामध्ये मुख्यतः पुढील मूद्दे विचारात घेतात.

प्रणालीची परिणामकारकता : ज्या वेळी एखादी योजना कार्यान्वित करण्यात येते, त्या वेळी तिच्यात अनेक प्रकारचे कार्यविभाग असतात आणि त्यांना लागणाऱ्या वेळेचा विचार करावा लागतो. वेळेचे हे प्रमाण पुढील प्रकारचे असते : (१) यंत्र वा उपकरण ज्या काळात प्रत्यक्ष काम करीत असते, तो कार्यरत असण्याचा काळ होय. (२) ज्या काळात उपकरण कामासाठी वापरले जात नाही, तो विश्रांतीचा काळ होय (उदा., दुकान बंद झाल्यावर झेरॉक्स यंत्र काम करीत नाही). (३) ज्या वेळी उपकरण चालू करून ठेवलेले असते,  त्याचा प्रत्यक्ष वापर होत नसतो, तो साठवण काळ होय. (४) ज्या वेळी उपकरणाचा वापर आवश्यक असतो परंतु उपकरण नादुरूस्त असल्याने वापरात नसते, त्या काळाला नादुरुस्तीचा काळ म्हणतात.

गणितीय अर्थ : एख्याद्या प्रणालीची (कार्यपद्धतीची) विश्वासार्हता गणितीय भाषेत जाणून घ्यायची झाल्यास असे म्हणता येईल : ज्या कालावधीत व परिस्थितीत प्रणाली समाधानकारक रीतीने कार्य करू शकते त्याची संभाव्यता म्हणजे विश्वासार्हता होय. हे गणितीय सूत्रात असे मांडता येते. 

R (t) = F (P)

[येथे R (t) – ‘t’ वेळातील विश्वासार्हता, P – संभाव्यता, F (P)- ‘P’ चे फलन म्हणजे P प्रमाणे बदलणारे समीकरण ⟶ फलन].

उपयुक्त आयुष्य : कोणत्याही उपकरणाचे उपयुक्त आयुष्य म्हणजे ते उपकरण किती काळ समाधानकारक काम करू शकते आणि या कालावधीत त्यात किती वेळा दुरुस्ती करावी लागते किंवा देखभाल करावी लागते याते वर्गीकरण होय. नवीन उपकरणांचा अभिकल्प मापे व नकाशे तयार करतानाच त्याचे उपयुक्त आयुष्य ठरवावे लागते. उपयुक्त आयुष्य वाढवावयाचे असल्यास त्याप्रमाणात उपकरणाच्या किंमतीतही वाढ होते. साधारणपणे उपकरणाची किंमत, उपयुक्त आयुष्य व विश्वासार्हता यांचा समन्वय साधूनच त्याच्या उत्पादनाची आखणी केली जाते. यामध्ये सांख्यिकीचा (संख्याशास्त्राचा) फार मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

विश्वासार्हतेची संभाव्यता : एखाद्या उपकरणाच्या विश्वासार्हतेची संभाव्यता (अंदाज) ही त्या उपकरणाच्या निरनिराळ्या चाचण्या (परीक्षणे) घेऊन ठरविली जाते. अशा चाचण्या संपूर्ण उपकरणाच्या तसेच त्यातील सुट्या भागांच्याही घ्याव्या लागतात. उपकरणांच्या उत्पादन गटातील काही उपकरणे घेऊन त्यांच्या कार्यक्षमतेच्या निरनिराळ्या चाचण्या घेतल्या जातात. ह्या चाचण्या प्रयोगशाळेत व प्रत्यक्ष वापराच्या ठिकाणीही घेतात. या सर्व चाचण्येंच्या निष्कर्षांवरून गणितीय व सांख्यिकीय पद्धतीने विश्वासार्हतेची संभाव्यता ठरवितात.

विश्वासार्हता व गुणवत्ता नियंत्रण : या दोन्हींमध्ये फार जवळचा संबंध आहे. वस्तूची गुणवत्ता फार महत्वाची असून तिच्यावरच वस्तूची उपयुक्तता व किंमत ठरते. यामुळे विश्वासार्हता आणि गुणवत्ता यांचा मेळ घातला, तरच उत्तम दर्जाच्या व योग्य प्रकारे बिनतक्रार काम देणाऱ्या वस्तू वाजवी किंमतीत उपलब्ध होऊ शकतात. आधुनिक तंत्रविद्या वापरून हे साध्य करण्याचे प्रयत्‍न सतत होत असतात. याकरिता मुख्यतः व्यवस्थापनातील आधुनिकीकरणावर भर दिला जातो. उच्च व्यवस्थापनाद्वारे मुख्यतः हे साध्य होते.

आ. ३ उच्च व्यवस्थापन संकुल

विश्वासार्हता व गुणवत्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून यांकरिता व्यवस्थापनाने पुढील गोष्टी करणे आवश्यक असते : (१) वेळेनुसार काम करण्याचे कोष्टक व आराखडा, (२) वेळेनुसार एकूण कामाचे लहान लहान भागांत विभाजन, (३) वेळेनुसार कामाची काटेकोर अंमलबजावणी, (४) योग्य तऱहेने केलेल्या कार्याचे मूल्यमापन  

 आणि त्यासाठी संबंधितांचे कौतुक, (५) किंमतीवर काटेकोर नियंत्रण व त्याकरिता खर्चाची अंदाजपत्रकी कोष्टके, (६) योग्य वेळी व उत्कृष्ट प्रकारे घेतलेले निर्णय, (७) कामगार व काम करून घेणारे यांचे योग्य प्रकारे प्रशिक्षण, (८) ठराविक काळानंतर घेतलेला कामाचा आढावा व त्याचा तपशीलवार अभ्यास आणि त्यातील त्रुटींचे योग्य नियंत्रण, (९) कार्यप्रणालीचा व तिच्या उपप्रणालींमधील दोषांचा वरचेवर विचार व त्यांत योग्य त्या सुधारणा आणि (१०) योग्य वेळी सूचना देणारी यंत्रणा, तसेच व्यवस्थापन आणि काम करणारे यांच्यातील सुसंवाद व समन्वय. आ. ३ वरून उच्च व्यवस्थापन संकुलाची कल्पना येईल. [⟶ गुणवत्ता नियंत्रण].

कुलकर्णी, प्र. दि. भिडे, शं. गो.


 सॉफ्टवेअर विश्वासार्हता : (एका विशिष्ट प्रकारच्या संगणकावर वापरता येण्याजोग्या समग्र कार्यक्रमाला सॉफ्टवेअर म्हणतात आणि यात नियमपुस्तिका, आकृत्या व कार्यकारी सूचना यांसारखा एखाद्या संगणकाशी किंवा कार्यक्रमाशी निगडित असलेला सूक्ष्मसंदर्भही येतो). विनिर्देशित (ठरवून दिलेल्या) कालावधीसाठी व पर्यावरणीय परिस्थितीमध्ये विनातक्रार व निष्फळ न होता सॉफ्टवेअरचे कार्य चालू राहण्याची संभाव्यता म्हणजे सॉफ्टवेअर विश्वासार्हता होय.

संगणकाचा वापर समाजात सर्वत्र वाढत असतानाच त्याच्या सॉफ्टवेअर प्रणालीचे आकारमान (संख्यात्मक) व जटिलता (गुंतागुंत) एकसारखी वाढत आहे. पुष्कळ संस्था महत्त्वाच्या सेवा पुरविण्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात संगणकांवर अवलंबून राहत आहेत. आंतरराष्ट्रीय बँकिंग, पोलिसांचा तपास, विमान कंपन्यांची आरक्षण सेवा ही व्यवहारातील अशा काही सेवांची मोजकी उदाहरणे होत. अणुभट्‌ट्या, संरक्षण प्रणाली व हवाई वाहतूक यांच्या नियंत्रणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टाने महत्त्वाची असलेली कामे संगणकांच्या सॉफ्टवेअर प्रणालींच्या आधारेच केली जातात. सॉफ्टवेअर प्रणालींची जटिलता, त्यांच्यावर ठेवण्यात येणारा भरवसा आणि सॉफ्टवेअर अचानकपणे निष्फल वा निकामी होण्याचे उद्‌भवू शकणारे गंभीर स्वरूपाचे परिणाम या गोष्टीमुळे सॉफ्टवेअरच्या गुणवत्तेची परिमाणात्मक हमी मिळणे गरजेचे होते.

सॉफ्टवेअरचे दोष व सॉफ्टवेअर निष्फलता : कार्यक्रमांच्या गरजांचे कार्यक्रम प्रदानाद्वारे स्वीकारता येणार नाही अशा रीतीने उल्लंघन होणे म्हणजे सॉफ्टवेअर निष्फलता होय. अशा निष्फलतांची गंभीरता कमी-जास्त असू शकते. उदा., दर्शकफलकावरील चुकीचे स्पेलिंग असण्याऱ्या शब्दासारखी निरुपद्रवी चूक ते विमान हरवण्यासारखी गंभीर आपत्ती.

संगणकाच्या किंवा माहिती संस्करण प्रणालीच्या भौतिक, मूर्त व स्थायी घटकांना हार्डवेअर म्हणतात. हार्डवेअरच्या निष्फलता पुष्कळ वेळा या घटकांची प्रत्यक्ष झीज झाल्याने उद्‌भवतात, तर सॉप्टवेअर निष्फलता अभिकल्पातील दोषांनी निर्माण होतात. हे दोष म्हणजे उणिवा असतात व सॉफ्टवेअरचा अभिकल्प तयार करण्याच्या टप्प्यातील चुकीच्या किंवा अपूर्ण विनिर्देशांमुळे अथवा कार्यक्रमण (प्रोग्रॅमिंग) करताना झालेल्या साध्या चुकांमुळे निर्माण होतात. सॉफ्टवेअर वापरताना त्याची गाठ ज्या आदानासाठी सॉफ्टवेअर अभिकल्पन किंवा परीक्षण केलेले नाही अशा आदानाशी पडू शकते. अशा काही आदानांच्या प्रभावाखाली दोषाद्वारे निष्फलता उद्‌भवेल.

एखाद्या कार्यक्रमात राहून गेलेल्या अनेक दोषांमुळे त्याच्या कार्यक्षमतेवर (कार्यमानावर) परिणाम होतो, तर सॉफ्टवेअरच्या विश्वासार्हतेचे अधिक माहितीयुक्त (वा तपशीलवार) माप म्हणजे त्याची निष्फलता त्वरा हे होय (निष्फलता त्वरेला निष्फलता तीव्रता असेही म्हणतात व ही दर एकक काळात घडणाऱ्या निष्फलतांची संख्या असते). जर प्रत्येक दोष हा क्वचित घडणारा असेल, तर असे पुष्कळ दोष असणाऱ्या प्रणालीही चांगल्या विश्वासार्ह असू शकतात.

अभिकल्पातील दोष हे सॉफ्टवेअर निष्फलतेमागील कारण असल्याने सॉफ्टवेअर विश्वासार्हता ही हार्डवेअर विश्वासार्हतेपेक्षा अनेक प्रकारे वेगळी असते. जेव्हा हार्डवेअर घटक निष्फल होतो, तेव्हा त्याच्या जागी त्याच प्रकारचा घटक बसविण्यात येईल व तोही अखेरीस निष्फल होईल. या उलट योग्य रीतीने काढून टाकण्यात आलेला एखादा सॉफ्टवेअर दोष पुन्हा कधीही उद्‌भवणार नाही. अशा प्रकारे जिच्यात अखेरीस सर्व दोष काढून टाकण्यात आलेले आहेत अशा एका काल्पनिक किंवा गृहीत धरलेल्या स्थितीतील सॉफ्टवेअर दोषरहित असेल व कधीही निष्फल न होता ते काम करीत राहील. शिवाय विश्वासार्हता वाढविण्यासाठी हार्डवेअरची प्रतिष्ठापना करता येते, उलट कार्यक्रमाची (सॉफ्टवेअरची) अशी प्रतिष्ठापना केल्यास त्याच्या अभिकल्पातील दोषांची पुनरावृत्ती तेवढी होईल.

सॉफ्टवेअर विश्वासार्हता संपादन करणे : सॉफ्टवेअर विश्वासार्हता संपादन करण्याची अनेक तंत्रे विकसित झाली आहेत. स्थूलपणे या तंत्रांचे तीन प्रमुख प्रकार करता येतात : (१) दोष टाळणे, (२) दोष काढून टाकणे व (३) दोष सहन करणे.

दोष टाळण्याच्या तंत्रांमध्ये दोषनिर्मितीला प्रतिबंध करण्यासाठी योजलेले सॉफ्टवेअर व्यवस्थापनाचे उपाय येतात. सॉफ्टवेअरच्या आवश्यकता व विनिर्देश यांची सुस्पष्ट व्याख्या, अचूक कार्यक्रम संरचनांचा वापर आणि प्रस्थापित विश्वासार्हतेच्या सॉफ्टवेअर घटकांचा पुनर्वापर ही अशी तंत्रे आहेत.

दोषनिवारणाच्या म्हणजे दोष काढून टाकण्याच्या तंत्रांमध्ये सॉफ्टवेअर वापरण्यासाठी खुले होण्याआधी निर्माण झालेले दोष उघडकीस आणण्याचे व ते दुरुस्त करण्याचे प्रयत्‍न केले जातात. उदा., अधिकृत पडताळा पाहणे (यात सॉफ्टवेअर हे त्याच्या विनिर्देशांशी सुसंगत आहे याची खातरजमा करून घेण्याचा प्रयत्‍न केला जातो), संकेतावलीचे पद्धतशीर पुनर्विलोकन व तपासणी करणे आणि विकासातील प्रत्येक टप्प्याला सॉफ्टवेअरचे परीक्षण करणे.

पूर्णतः  निर्दोष अशा सॉफ्टवेअरची हमी देणे जवळजवळ अशक्य आहे. यामुळे दोष सहन करण्याची वा चालवून घेण्याची तंत्रे वापरतात. त्यांद्वारे आधीच वापरात असलेल्या सॉफ्टवेअरमधील दोषाचे परिणाम ओळखून त्यांनी झालेले नुकसान भरून काढतात. स्वतंत्रपणे लिहिलेले अनेक कार्यक्रम समांतर पद्धतीने चालविले जातात. ते परस्परविरोधी असल्यास बहुमत मतदानासारख्या पूर्वनिर्धारित योजनेद्वारे वापरावयाचा प्रदान निश्चित केला जातो.


सॉफ्टवेअर विश्वासार्हता प्रतिकृतिनिर्मिती : सॉफ्टवेअर विश्वासार्हता प्रतिकृती (नमुना) हे सॉफ्टवेअर विश्वासार्हतेचे मूल्यनिर्धारण करण्याचे प्रमुख सांख्यिकीय साधन आहे. सॉफ्टवेअर निष्फलता प्रक्रियेचे संभाव्यतेवर आधारलेले वर्णन आणि भूतकाळातील कार्यमानाविषयीची माहितीवर आधारलेली सॉफ्टवेअर निष्फलतेची भाकिते करण्यासाठी असलेली एक सांख्यिकीय अनुमान पद्धती यांचा एका प्रतिकृतीत नमुनेदार पद्धतीने संयोग केला आहे.

सॉफ्टवेअर विश्वासार्हता मापनाची सर्वांत आधीची प्रतिकृती १९७२ साली झेड्. जेलिन्स्की व पी. मोरांडा तसेच एम्. एल्. शूमन यांनी स्वतंत्रपणे सुचविली होती. या प्रतिकृतींत पुढील गृहिते आहेत : (१) निष्फलता यदृच्छ (स्वैर) रीतीने उपस्थित होतात, (२) कार्यक्रमाची निष्फलता त्वरा ही त्यात उरलेल्या अभिकल्पातील दोषांच्या संख्येच्या प्रमाणात असते आणि (३) प्रत्येक निष्फलतेने एक दोष नक्की होतो. महत्तम शक्यतेची सांख्यिकीय पद्धती वापरून अभिकल्पातील दोषांची एकूण संख्या व समानुपातित्वाचा स्थिरांक (सरासरी मूल्य) काढण्यासाठी निष्फलतांमधील कालावधीविषयीच्या माहितीचा उपयोग करतात.

आधीची ही प्रतिकृती सॉफ्टवेअर विश्वासार्हतेची प्रतिकृती तयार करण्याच्या बाबतीत खूप प्रभावी ठरली. मात्र असे असले, तरी हिच्या मदतीने सॉफ्टवेअर विश्वासार्हतेविषयी करण्यात येणारी भाकिते सर्वसाधारणपणे अपुरी म्हणजे कमी अचूक असतात. कार्यक्रमाच्या अविश्वासार्हतेला सर्व चुका सारख्याच प्रमाणात कारणीभूत असतात, हे गृहीत या कमी अचूकतेमागील मुख्य कारण आहे. प्रत्यक्ष व्यवहारात कार्यक्रमविषयक निष्फलतेच्या एकूण त्वरेमध्ये भिन्न दोष भिन्न प्रमाणांत कारणीभूत होतात. उदा., संकेतावलीच्या वारंवार वापरण्यात येणाऱ्या भागांत आढळणारे वा घडणारे दोष हे या संकेतावलीच्या क्वचित वापरल्या जाणाऱ्या भागांतील दोषांपेक्षा सॉफ्टवेअर निष्फलता त्वरेला अधिक प्रमाणात कारणीभूत होत असतात.

सॉफ्टवेअर विश्वासार्हता मोजण्यासाठी अधिक आधुनिक प्रतिकृती सुचविण्यात आल्या आहेत. निष्फलता प्रक्रियेतील अनिश्चितता ही केवळ यदृच्छपणे आढळणाऱ्या दोषानेच येत असते, असे आधीच्या प्रतिकृतीत गृहीत धरलेले असते. उलट अधिक सुविकसित प्रतिकृतींत सॉफ्टवेअर निष्फलता प्रक्रिया हा अनिश्चिततेचा पुढील दोन उद्‌गमांचा परिणाम असतो, असे गृहीत धरतात : (१) कार्यक्रमाच्या आदानासाठीची निवड व (२) कार्यक्रमातील चूक किंवा संगणकाचे सदोष कार्य काढून टाकण्याचा म्हणजे दोषनिरासाचा परिणाम. दोषनिरासामधील अनिश्चितता ही पुढील दोन्ही कारणांमुळे असू शकते : (१) काढून टाकण्यात आलेले दोष आढळण्याची त्वरा आणि (२) दोषनिरास परिपूर्ण नसू शकेल ही वस्तुस्थिती. सॉफ्टवेअर प्रतिकृतीच्या भाकितांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्याच्या आणि आधीच्या कार्यमानाच्या संदर्भात त्यांचे परिष्करण (शुद्धी) करण्याच्या पद्धतीही आता उपलब्ध आहेत.

परीक्षणामध्ये दोष उघड न झाल्यास सॉफ्टवेअर निष्फलतेची संभाव्यता काढण्याचे प्रयत्‍नही प्रगत प्रतिकृतींत केले जातात. या पद्धतींत परीक्षणांचे निष्कर्ष, वापर करताना असणारी आदान-वाटपाविषयीची माहिती आणि सॉफ्टवेअर निष्फलतेच्या संभाव्यतेविषयीची आधीची गृहीते अंतर्भूत असतात.

सॉफ्टवेअर केव्हा व कोठे वापरण्यासाठी सज्‍ज असेल याचे मूल्यमापन करण्यासाठी आणि सॉफ्टवेअर विश्वासार्हता अथवा भावी काळातील देखभालीचा खर्च काढण्यासाठी सॉफ्टवेअर विश्वासार्हतेचे मापन हे उपयुक्त साधन आहे. मध्यम पातळीच्या विश्वासार्हतेची गरज असणाऱ्या व्यापारी पद्धतींमध्ये हे साधन विशेषकरून उपयुक्त आहे. आता वापरात असलेल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा काही प्रणालींमध्ये अतिउच्च पातळीची विश्वासार्हता (१० तासांत एकापेक्षा कमी निष्फलता) आवश्यक असते. मात्र दुर्दैवाने विश्वासार्हतेच्या एवढ्या पातळीची हमी देणारी कोणतीही पद्धती उपलब्ध नाही.

 ठाकूर, अ. ना.

पहा : गुणवत्ता नियंत्रण.

संदर्भ : 1. Bittanti, S, Ed., Software Reliability Modelling and Identification, New York,1988.

           2. Ireson, W. G. Coombs, C. F., Eds., Handbook of ReliabilityEngineering and Management, 1988.

           3. Kapur, K. C. Lamberson, L. R. Reliability in EngineeringDesign, New York, 1977.

           4. Kececioglu, D. Reliability Engineering Handbook, Vols. 1 and 2, 1991.

           5. Klassen, K. B. Van Peppen, J. C. L. System Reliability Concepts andApplications, New York, 1989.

           6. Musa, J. D. lannino, A.: Okumoto, K. Software Reliability :Measurement, Prediction and Application,1990.

           7. Raheja, D, G.,   Assurance Technologies : Principles and Practice, New York, 1991.

           8. Shooman, M. L. Software Engineering : Reliability, Development andManagement, New York, 1983.