संग्रहालये : विविध विषयांतर्गत दुर्मिळ व नावीन्यपूर्ण वस्तू आणि सामग्री यांचे परिरक्षण, जतन, संवर्धन, प्रदर्शन व अर्थबोधन करणारी एक संस्था. संग्रहालय किंवा वस्तुसंग्रहालय हा म्यूझीयम या इंग्रजी संज्ञेसाठी ( शब्दासाठी ) वापरलेला मराठी प्रतिशब्द होय. म्यूझीयम हा शब्द मूळ माऊझयॉन (mouseion) या ग्रीक शब्दापासून बनला असून प्रथम तो लॅटिनमध्ये आला व पुढे तो इंग्रजीत म्यूझीयम म्हणून प्रविष्ट झाला. माऊझयॉन या ग्रीक शब्दाचा अर्थ म्यूझेस या कला व विज्ञानाच्या देवतेचे अधिष्ठान किंवा मंदिर असा आहे. अर्थबोधन व परिरक्षण ( संवर्धन ) या दोन निकट ( जुळ्या ) संकल्पनांची उत्पत्ती, हा संग्रहालयाचा मूलभूत स्रोत ( पाया ) असून तो मानवाची चिकित्सा व जिज्ञासू वृत्ती आणि वस्तुसंग्रह करण्याची नैसर्गिक सहज प्रवृत्ती यांतून दृग्गोचर होतो. नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारांशी संबंधित बहुविध विषय उदा., कला आणि विमानशास्त्र, धर्म आणि कीडा, जीवशास्त्र आणि संगीत- शास्त्र, नैसर्गिक विज्ञाने आणि सामाजिक शास्त्रे, असे विविध क्षेत्रांतील विषय संग्रहालयांच्या व्यवस्थापनाखाली ( अखत्यारीत ) येतात. संग्रहा- लयांचा उद्देश शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक असा दुहेरी आहे. विदयार्थी, अभ्यासक व संशोधक यांबरोबरच सामान्य प्रजाजनांना संग्रहालये सेवा देतात. यथार्थतेच्या व वास्तवतेच्या दृष्टिकोनातून त्यांचा आशय ज्ञानार्जन असला, तरी दृष्टिसुख ( दृष्टीला आव्हान देणे ) याचाही तेथे गांभीर्याने विचार केला जातो. संग्रहालयांमध्ये विचारांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य आहे, तद्वतच भावनात्मक आवाहनही ती करतात. सत्यतेचा वृत्तांत लेखक ( वाकनवीस ) म्हणून संग्रहालयांचा विचार केला जावा आणि मानवी जीवनातील सद्‌गुणाचा गुणधर्मांचा सदुपयोग करणारी अगेसर संस्था म्हणून त्यास स्थान द्यावे, असा विचार तत्संबंधी अलीकडे व्यक्त केला जातो कारण संग्रहालये ही सांस्कृतिक वारसाची अधिरक्षक (पालक) व अन्वेषक ( विवरणकर्ता ) आहेत. ती मानवप्राणी व नैसर्गिक इतिहास, समूह विकास, फावला वेळ किंवा मनोरंजन यांच्या सुविधांची सामाजिक साधने होत.

इतिहास : आज अभिप्रेत असलेली संग्रहालयाची विकसित संकल्पना प्राचीन काळी अस्तित्वात नसावी कारण आतापर्यंतच्या पुरा- तत्त्वीय व ऐतिहासिक पुराव्यांत तत्संबंधी कोणत्याही प्रकारचे दाखले मिळाले नाहीत तथापि काही प्राचीन संस्कृतींमधील राजांनी वस्तुसंग्रह केल्याचे पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक पुरावे उपलब्ध झाले आहेत. त्या संस्कृत्यांपैकी बॅबिलोनिया, चीन येथील राजे तसेच ग्रीक व रोमन संस्कृतींतील शपथ-दान म्हणून केलेल्या वस्तू मंदिरांत संग्रहित करीत असल्याचे दाखले मिळतात. एवढेच नव्हे तर त्यांच्यासाठी स्वतंत्र वास्तूही उभारीत असत. त्यांत कलात्मक वस्तूंबरोबर काही नैसर्गिक दुर्मिळ वस्तू तसेच साम्राज्याच्या इतर भागांतून आणलेल्या परदेशी नावीन्यपूर्ण वस्तू असत आणि त्या अल्पसे शुल्क देऊन सामान्य जनांनाही पाहता येत असत. ⇨चार्ल्स लेनर्ड वुली   या पुरातत्त्ववेत्त्यांनी बॅबिलोनियातील ⇨अर   येथे उत्खनन केले. त्यांना इ. स. पू. सहाव्या शतकातील काही अवशेष मिळाले. त्या अवशेषांवरून त्यांनी असे अनुमान काढले आहे की, तत्कालीन राजे नेबुकॅड्नेझर आणि नेबोनिडस या बॅबिलोनियन राजांना काही जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद होता. एवढेच नव्हे तर तेथील एका मंदिराजवळील दालनात विटांवर लिहिलेली यादी सापडली. वुली यांच्या मते ती संग्रहातील वस्तूंची यादी असावी. नेबोनिडसची कन्या व तत्कालीन उपाध्यायीण एन्निगल्डी-नन्ना ही येथे एक विदयालय चालवीत असावी आणि तेथे एक लहान शैक्षणिक संग्रहालय असावे. या संग्रहालयापूर्वी ग्रीसमधील अथेन्स शहरात अकॉपलिस येथे इ. स. पू. पाचव्या शतकात ‘ पिनाकोथेकी ’ या दालनात म्यूझीयम या संकल्पनेशी सादृश दर्शविणारा संग्रह केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यात देवदेवतांची चित्रे होती. मॅसिडोनियन वंशातील पहिले टॉलेमी-सोटर ( इ. स. पू. ३६४-२८४) यांनी ॲलेक्झांडि्नया ( ईजिप्त ) येथे राजधानी स्थापून तेथे एक वस्तुसंग्रहालय व गंथालय स्थापन केले. हे संग्रहालय त्यांच्या राजप्रासादाला जोडून असलेल्या वास्तूत होते. त्यात खगोल- शास्त्रीय व शस्त्रकियेची साधने, प्राण्यांचे व वनस्पतींचे दुर्मिळ नमुने, प्राण्यांची कातडी, विचारवंतांचे पुतळे, तसबिरी, चित्रे, हस्तिदंती वस्तू इत्यादींचा संग्रह केला होता. कदाचित जगातील हे पहिले आधुनिक म्यूझीयम या संकल्पनेशी मिळतेजुळते संग्रहालय म्हणता येईल. या ग्रहालयाला प्रथमच म्यूझीयम ही संज्ञा त्यावेळी देण्यात आली होती. टॉलेमी-सोटर स्वत: विव्दान होते आणि त्यांनी अलेक्झांडरच्या स्वाऱ्यांचा इतिहास लिहिला. उतारवयात त्यांनी ‘सेरापीज’ नावाचा एक धर्मपंथ सुरू केला. त्यांच्या गंथालयाचा व्यवस्थापक थोर ग्रीक व्याकरणकार झनॉडटस ( इ. स. पू. ३२५-२६०) होते. त्यांनी तेथील काव्यसंग्रहाची भाषा- शास्त्राच्या आधारे विभागणी केली होती. या गंथालयात सु. ५ लाख गंथ असावेत, अशी वदंता आहे. येथील गुंडाळीच्या रूपातील गंथांच्या प्रती तयार करून त्या इतर गंथालयांना पुरविण्याची सोय तेथे होती. ईजिप्त- मधील या इतिहासप्रसिद्ध गंथालयातील सु. ४० हजार गंथ जुलिअस  सीझर यांच्या सैनिकांनी प्रथम नष्ट केले ( इ. स. ४७). पुढे रोमच्या मार्क अँटनी यांनी ईजिप्तची राणी क्लीओपात्रा हिला भेट म्हणून दिलेल्या गंथामुळे ते थोडे सावरले, पण पुन्हा नंतरच्या रोमन समाटांनी आणि उमर खलीफा यांनी ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

चीनमधील शिर-ह्‌वांग-टी ( इ. स. पू. २५९-२१०) या सम्राटाच्या प्रशस्त राजवाडयात अतिशय दुर्मिळ व मूल्यवान वस्तूंचा संग्रह होता. त्यानंतरचेही चिनी सम्राट कलाभिज्ञ होते. त्यांनी चित्रकला, सुलेखनकला, धातुकाम, काचकाम, नक्षीदार मृत्पात्रे, हरितमणी इत्यादींचे उत्कृष्ट नमुने जमविलेले होते आणि अनेक उत्तम कलावस्तू तयार करून घेऊन त्यांचा संग्रह केला होता. उदा., हान सम्राट वू-ती ( इ. स. पू. १४०-८७) यांनी एक कलानिकेतन स्थापन केले होते. त्यांत सुरेख चित्रे व प्रत्येक प्रांतातील सुलेखन कलेचे नमुने ठेवले होते. शेवटचा हान सम्राट स्यन-ती यांनी इ. स. तिसऱ्या शतकात आपल्या राजदरबारातील मंत्र्यांच्या व्यक्ति-चित्रांची एक कलावीथी स्थापन केली होती. प्राचीन काळी इटलीतील  रोमन सरदार व वरिष्ठ शासकीय अधिकारी वस्तुसंग्रह करीत असत. ग्रीसमधील अनेक मंदिरांतील वस्तुसंग्रह दालनामध्ये सोने, चांदी, तांबे, कथिल, कासे इ. धातु-मिश्रधातूंचे देवदेवतांचे पुतळे प्रदर्शित केलेले असत. रोममध्ये काही सरदारांनी प्रसाधनगृहे, बागा यांचे उत्तम नमुने जपले होते. इटलीतील हेरियम राजांनी राजवाडयाजवळ संग्रहालयाच्या स्वतंत्र इमारती बांधल्याचे उल्लेख मिळतात. आशिया खंडात विशेषत: भारत, जपान, चीन आदी देशांतूनही वस्तूंचे संग्रह करण्याची प्रवृत्ती आढळते.

भारतात प्राचीन काळात संग्रह करण्याची, वस्तू जमविण्याची आणि ती पुढील पिढीला दाखविण्यासाठी जतन करून ठेवण्याची मानवी सहज-प्रवृत्ती आढळते. तिचा निर्देश प्राचीन संस्कृत, प्राकृत, पाली साहित्यात आणि हिंदू, बौद्ध, जैन आदी धार्मिक वाङ्‌मयात आढळतो. प्रसिद्ध संस्कृत नाटककार भास यांच्या रामायण गंथावर आधारलेले प्रतिमा  हे नाटक आहे. त्या नाटकात भरत हा चित्रशाळेत आपल्या वडिलांचा ( दशरथ राजा ) पुतळा पाहून आश्चर्यचकित व दु:खी होतो, असे एका प्रसंगात दर्शविले आहे कारण चित्रशाळेत ईक्ष्वाकू कुळातील दिवंगत राजांचे पुतळे प्रदर्शित केलेले होते. तेथे पुतळा पाहून वडिलांच्या निधनाची वार्ता त्याला अशी अनपेक्षितपणे समजल्यामुळे त्याची अशी अवस्था होते. दुसरा जेष्ठ संस्कृत नाटककार भवभूती यांची महावीरचरित उत्तररामचरित ही दोन नाटके रामकथेवर आधारलेली असून त्यांतील उत्तररामचरिता तील एका प्रसंगात सीता रामचंद्रांकडून त्यागली गेल्यावर वनातील आश्रमात राहत असताना पूर्वस्मृतींना उजाळा देण्यासाठी चित्रसंग्रह पाहत असल्याचे वर्णन आहे. चित्रशाळा व चित्रसंग्रह या विषयींच्या या दोन प्रसंगांवरून प्राचीन काळी संग्रह, चित्रशाळा व संग्रहालय यांची संकल्पना अस्तित्वात असावी, असे म्हणता येईल. प्राचीन साहित्यात अनेक ठिकाणी चित्र-शाळांचा उल्लेख आहे. बौद्ध विहार, चैत्यगृहे, स्तूप, गुंफा ( लेणी ) यांतून शिल्पाकृती आणि भित्तिचित्रे यांचे संग्रह आढळतात. अजिंठा-वेरूळ इ. गुंफा ही संग्रहालयेच होत.


दहाव्या शतकाच्या आसपास चीन व जपान येथील राजवाड्यांत, मंदिरांमध्ये मौल्यवान व सुंदर वस्तूंचे संग्रह करण्याची पद्धत व प्रथा होती. यांपैकी जपानच्या नारा शहरातील टोडाई मंदिरातील ‘शोसोइन’ कोठारात काही मौल्यवान वस्तूंचे अवशेष होते. ते अदयापि जतन करून ठेवले आहेत.

मध्ययुगात चर्च, कॅथीड्रल, विदयापीठे इ. ज्ञानदानाची केंद्रे होती. त्यांतून सचित्र हस्तलिखिते, राजचिन्हे, पुरातत्त्वीय अवशेष इत्यादींचा संग्रह केलेला असे. कलाकुसर असलेल्या वस्तूंमधून आध्यात्मिक विचारांचा आविष्कार होतो, अशी चर्चची श्रद्धा व भावना होती. चर्चच्या खिडक्यांच्या रंगीत काचांवर, मोझॅइक फरशीवर धार्मिक घटना चितारणे व लोकांना आकर्षित करणे, अशा व्यवस्था चर्च करीत असे. इटलीतील व्हेनिस शहरातील सेंट मार्क चर्च व जर्मनीतील कॅथीड्रल हाले, ही प्रार्थनाकेंद्रे अशा संग्रहांसाठी तेव्हा प्रसिद्ध होती.

सोळाव्या शतकात वस्तुसंग्रह करण्याची आवड वाढली व त्याच- बरोबर नवीन ज्ञानशाखांची माहिती करून घेण्याची लोकांची इच्छा बळावली. आपल्या तिजोरीत सुरक्षित ठेवलेले जडजवाहीर दडवून ठेवणे योग्य नाही, असे सरदार व शासकीय अधिकारी यांना वाटू लागले. या मौल्यवान वस्तू नातेवाईक, मित्र यांना दाखविणे त्यांना गरजेचे व प्रतिष्ठेचे वाटले. या प्रदर्शनातून वस्तुज्ञान प्रसारित होते, असा अनुभव त्यांना येऊ लागला. त्या काळी म्यूझिओ, स्टुडिओला, स्क्रिफ्ट्झो इ. वस्तुसंग्रहांचा निर्देश करणारे नवीन शब्द वापरात आले. यांतून इटलीत संग्रहालयांची सुरूवात झाली, असे म्हणता येईल. संग्रहालयातील मौल्यवान वस्तूंच्या प्रदर्शनासाठी त्यांनी खास प्रकारचे फर्निचर, कपाटे तयार करवून घेतली होती. यांपैकी काही फर्निचरचे नमुने न्यूयॉर्क शहरातील मेट्रपॉलिटन म्यूझीयम ऑफ आर्ट या संग्रहालयात आजही पहावयास मिळतात. त्या काळी प्रसिद्घ चित्रकारांनी त्यांवर चित्रे कोरली होती. यांपैकी एक प्रकार ‘फीस्ट ऑफ गॉड’ अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट या संग्रहालयात पहावयास मिळतो. या काळात फ्रान्समध्ये आणि स्कँडिनेव्हियन देशांत संग्रहालये स्थापनझालीहोती. या संग्रहालयांना कुंस्ट उंड वुंडर कामेर असे म्हणत.

सोळाव्या शतकातच यूरोपातील अनेक देशांत संग्रहालये स्थापन झाली होती. मौल्यवान वस्तूंबरोबरच संग्रहालयात धार्मिक घटनांच्या मोठमोठया तसबिरी, दंतकथांमधून निर्माण झालेली चित्रे, भित्तिचित्रे  लावणे सुरू झाले आणि अशा प्रदर्शनासाठी खास दालने गृहरचनाकारांनी बांधावयास सुरूवात केली होती. मेडिची राजांचे फ्लॉरेन्स, हॅप्सबर्ग राजांचे व्हिएन्ना व माद्रिद, बूर्बाँ राजांचे पॅरिस, कॅथरिन द गेट यांचा सेंट पीटर्झबर्ग ( लेनिनगाड ) आणि पोप यांचे व्हॅटिकन सिटी येथील  राजवाडयांतील संग्रह-दालने प्रसिद्ध व प्रेक्षणीय आहेत. अशा स्वतंत्र वास्तू राजवाडयाजवळच राजाश्रयाने बांधल्या जात. आधुनिक संग्रहालयांच्या  वास्तूंची ही नांदीच म्हणता येईल.

सॅम्यूएल फॉन क्विशबर्ग यांनी १५६५ मध्ये संग्रहालयांच्या स्वरूपाशीर रीत्या वर्गीकरण करून प्रदर्शित करावेत, म्हणजे ते संग्रह वैशिष्टयपूर्ण बनतील व अर्थपूर्णही होतील, असे आगही मत मांडले. या गंथामुळे वस्तुसंग्रहाच्या प्रदर्शनाला वेगळी कलाटणी मिळाली. पुढे हा गंथ सु. दोनशे वर्षे महत्त्वाचा मानला गेला. व्हॅटिकन सिटीतील संग्रहालय १७३९ मध्ये जनतेला पाहण्यासाठी खुले करण्यात आले. यातून साहजिकच संग्रहालयाची उपयुक्तता आणखी वाढीस लागली.

इंग्लंडमध्ये राजप्रासादात बहुमोल वस्तुसंग्रह होता. पहिल्या चार्ल्सला फाशी दिल्यानंतर (१६४९) या शाही संग्रहालयातील अनेक मौल्यवान वस्तू लिलावाव्दारे विकण्यात आल्या. ऑक्सफर्ड विदयापीठातील अश्मो- लीअन म्यूझीयम १६८३ मध्ये फक्त विव्दान आणि संशोधकांसाठी खुले करण्यात आले. डब्लिन ( आयर्लंड ) येथे राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना १७३१ मध्येच झाली. फ्रेंच शाही कलावस्तू सामान्य लोकांना पहावयास मिळाव्यात म्हणून पॅलेस द लक्सेंबर्ग (पॅरिस), हे राजाश्रयाखालील संग्रहालय काही विशिष्ट दिवसांकरिता खुले ठेवण्याची राजाज्ञा झाली (१७५०). सर हॅन्स स्लोन (१६६०-१७५३) हे एक इंग्लंडमधील प्रसिद्ध वैदय व निसर्गवैज्ञानिक होते. त्यांनी एक वनस्पती उदयानही स्थापन केले होते (१७२१) आणि वृक्षांच्या सु. ८०० जातींचा संग्रह केला होता. त्यांनी गंथ, हस्तलिखिते, नाणी, दुर्मिळ वस्तू इत्यादींचा प्रचंड संग्रह केला होता. या संग्रहालयातील सु. ५०,००० गंथ, काही हजार हस्तलिखिते, चित्रे, नाणी, दुर्मिळ वस्तू इ. सर्व त्यांनी मृत्युपत्राव्दारे देशाला अर्पण केली. तीच सर्व सामग्री ब्रिटिश म्यूझीयमच्या स्थापनेत केंद्रस्थानी व पायाभूत ठरली. ब्रिटिश म्यूझीयम लंडनच्या ब्लूम्झबरीमध्ये (१७५९) सामान्य जनांसाठी खुले करण्यात आले. अठराव्या शतकात संग्रहालयी चळवळ सर्व यूरोपभर प्रसृत झाली. कास्पर एफ्. नीकेल यांचाम्यूझिओगाफिया   हा गंथ १७२७ मध्ये प्रकाशित झाला. नवीन संग्रहालयांच्या जडणघडणीत या गंथाचा विशेष प्रभाव पडलेला आढळतो. प्रसिद्ध वनस्पतिविज्ञ कार्ल लिनीअस यांनी वनस्पती व प्राणी यांच्या वर्गीकरणाची पद्धती विकसित केली. त्यामुळे शास्त्रज्ञांनी अनेक वर्षे इंद्रियविशिष्ट जीवांवर लक्ष केंद्रित केले. परिणामत: शास्त्रशुद्ध नमुन्यांचे संग्रह वर्गीकरणाच्या हेतूसाठी वापरण्यात येऊ लागले आणि म्यूझीयम ही संज्ञा अशा संग्रहांसाठी सर्रास वापरली जाऊ लागली. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात (१७८९-९९) तत्कालीन शासनाने राजवाडयातील शाहीकलासंग्रह ⇨लूव्ह्‌र (फ्रान्स ) येथे हलविला. पुढे त्यास १७९३ मध्ये सार्वजनिक संग्रहालयाचा दर्जा प्राप्त झाला. याच सुमारास अमेरिकेच्या वसाहतींत दक्षिण कॅरोलायनामधील चार्ल्सटन यांच्या चार्ल्सटन लायबरी सोसायटीने पहिले सार्वजनिक संग्रहालय १७७३ मध्ये सर्वांसाठी खुले केले. त्यात स्थानिक नैसर्गिक इतिहासविषयक सामग्री होती. त्यानंतर १७८० च्या दशकात चार्ल्स विल्सन पील या चित्रकाराने आपल्या फिलाडेल्फिया ( पेनसिल्व्हेनिया ) येथील राहत्या घरातील संग्रह सर्वांसाठी खुला केला. त्यांच्या संग्रहालयात काही प्राण्यांचे आणि खनिजांचे वैशिष्टय-पूर्ण नमुने आणि अमेरिकन राज्यक्रांतीच्या प्रसिद्ध व्यक्तींची व्यक्तिचित्रे होती. नेपोलियनचा भाऊ व तत्कालीन स्पेनचा राजा जोझेफ बोनापार्ट यांनी १८०९ मध्ये प्रादो येथील संग्रह सर्वांसाठी खुला केला. त्यामुळे अन्य काही राजांनी त्याचे अनुकरण करून आपले शाही संग्रह सामान्य लोकांना पाहण्याकरिता खुले केले.


आधुनिक संग्रहालये : एकोणिसाव्या शतकात यूरोपमध्ये सार्वजनिक संग्रहालयांची निर्मिती झपाटयाने होऊ लागली. नागरीकरण आणि मोफत शिक्षण या चळवळींनी जोर धरल्यामुळे संग्रहालयांचा विकास झाला आणि आधुनिक सार्वजनिक संग्रहालयांची निर्मितीही झपाटयाने होऊ लागली. बूडापेस्ट (१८०२), प्राग (१८१८), लंडन (१८१८), माद्रिद (१८१९), बर्लिन (१८३०), म्यूनिक (१८३६) इ. शहरांतील संग्रहालये देणग्यांतून उभी राहिली. अनेक राजे आणि संस्थानिक यांनी स्वत:च्या मर्यादा ओळखून आपापले वस्तुसंग्रह मोठया संग्रहालयांना देणगी म्हणून देऊन टाकले तर खाजगी संग्रहकर्त्यांनी आपणाकडील वस्तुसंग्रह अशा संग्रहालयांना या काळात विकले. इंग्लंडमध्ये १८८७ पूर्वी सु. १०० संग्रहालये स्थापन झाली होती तर जर्मनीत दहा वर्षांत (१८७६-८७) सु. ५० संग्रहालये स्थापन झाली. या सर्वांमध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील संग्रहालयांचा कमांक अधिकतर होता. हा नवप्रवर्तनाचा काळ होता, त्यामुळे सार्वजनिक संग्रहालयांच्या चळवळीला गती मिळाली. १८३० च्या सुमारास किंबहुना या दशकात भूवैज्ञानिक व जीवविज्ञानीय सर्वेक्षणातून स्टेट म्यूझीयम ( न्यूयॉर्क १८४३), व्हर्माँट (१८४५), ॲलाबॅमा (१८४८) इ. ठिकाणची संग्रहालये निर्माण झाली. त्यानंतर ⇨स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन  कार्यरत होऊन तिच्याव्दारे कला, इतिहास आणि विज्ञान यांची संग्रहालये स्थापन झाली. अर्थात या संग्रहालयांच्या स्थापनेत इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जेम्स स्मिथसन यांची पेरणा आणि सहभागही मोठा होता. त्यांनी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना दिलेल्या देणगीतून ती स्थापन झाली होती. दक्षिण अमेरिकेतही मोठया शहरांमधून व विदयापीठांतून काही संग्रहालये स्थापन झाली. यांमध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील न्यूयॉर्क येथील मेट्रपॉलिटन म्यूझीयम ऑफ आर्ट (१८७२) हे जगातील एक अगेसर संग्रहालय अस्तित्वात आले. पुढे मॅसॅचूसेट्स येथील जॉर्ज पीबॉडी या धनाढय् गृहस्थाने हार्व्हर्ड आणि येल विदयापीठांना मोठया देणग्या दिल्या. त्यांतून तेथे विज्ञान संग्रहालये स्थापन करण्यात आली (१८८६). तत्पूर्वी लंडनमध्ये (इंग्लंड ) विज्ञान संग्रहालय स्थापन झाले होते (१८५७). याशिवाय लीमा ( पेरू, १८९१) येथे भूवैज्ञानिक आणि साऊँ पाउलू (बाझील, १८९५) येथे भौगोलिक आणि भूवैज्ञानिक संग्रहालये स्थापन झाली. शिवाय विशिष्ट विषयाला वाहिलेली राष्ट्रीय संग्रहालये निर्माण झाली होती. त्यांपैकी टायगर हे अर्जेंटिनामधील सागरी संग्रहालय (१८९२) ख्यातकीर्त आहे. ब्रिटिश म्यूझीयममधील प्राणी आणि वनस्पतींचे वैशिष्टयपूर्ण नमुने ( संग्रह ) लंडन-मधील साउथ केसिंग्टन येथे हलविण्यात आले (१८८०). पुढे ती नॅचरल हिस्टरी म्यूझीयमची पायाभूत सामग्री झाली.

विसाव्या शतकात संग्रहालये मुक्तव्दार आणि दृक्‌श्राव्य शिक्षणाची केंद्रे झाल्यामुळे संग्रहालयांना नवीन रचनात्मक धोरणे स्वीकारावी लागली. तत्पूर्वी सतराव्या शतकापर्यंत संग्रहालये, वस्तूंची संग्रह व्यवस्था म्हणून ओळखली जात. या संस्थांना आता पूरक शिक्षण संस्था म्हणून राजमान्यता व लोकमान्यता लाभल्यामुळे एकोणिसाव्या शतकापासून संग्रहालयांना नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागल्या. केवळ मौल्यवान, सुंदर आणि आकर्षक वस्तूंमुळे शिक्षणाचे ध्येय पूर्ण होत नाही, हे आयोजकांच्या लक्षात आले. वस्तूंची निवड आणि त्यांची मांडणी- व्यवस्था अधिक व्यापक झाली. जुने स्मारकांचे दगड, पुरालेख, शिलालेख, फरश्या, पुतळे, नाणी, बिल्ले, पदके, शिक्के अशा वस्तूही संग्रहात जमविणे आवश्यक झाले. या संग्रहामुळे पूर्वापार चालत आलेले कला संग्रहालयांचे स्वरूप पूर्णपणे पालटले, एवढेच नव्हे तर या प्रकारच्या वस्तूंच्या संग्रहामुळे कलाक्षेत्रही अधिक व्यापक होऊ लागले. उदा., आदिवासी, वनवासी ज्या वस्तू चरितार्थासाठी वापरीत असत, त्या वस्तू संग्रहा- लयातून आदिम समाजाच्या शिक्षणासाठी संग्रहित होऊ लागल्या. या वस्तूंमधील कलात्मकता कलाकारांच्या लक्षात येऊ लागली. या वस्तूंचे सौंदर्य, घाटदारपणा, प्रमाणबद्धता, रंगसंगती, उपयोजिता ( व्यावहारिक उपयोग करून घेण्याची क्षमता ) इ. गोष्टींकडे अभ्यासकांचे लक्ष वेधले गेले. अन्यथा आतापर्यंत या गोष्टी अभ्यासकांना माहीत नव्हत्या. कलावंतांनी आपल्या कलासाधनेत अधिक व्यापकता आणि सर्वसमावेशकता समाविष्ट केली.

विसाव्या शतकात संस्थांच्या लोकशाहीकरणामुळे संग्रहालयांची संख्या वाढली आणि प्रेक्षकही वाढले. त्यांचा संग्रहालयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, ती आता केवळ उच्चभ्रू समाजाची मक्तेदारी न राहता सामान्य माणूस त्यात रस घेऊ लागला. प्रत्येक राष्ट्रांच्या अस्मितेची ती दयोतक बनली. इतर घटकांबरोबर त्यांच्या वैकासिक वाटचालीत पर्या-वरणाविषयीची सर्वसामान्यांची जागृती संग्रहालयांतील वस्तु-सामग्री यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी दिवसेंदिवस अधिक उपयुक्त ठरत आहे. शिक्षण केंद्रांना पूरक अशी नवीन संग्रहालये विसाव्या शतकात अस्तित्वात येऊ लागली. वनस्पती संग्रहालये, प्राणी संग्रहालये, पक्षिजीवन संग्रहालये, ऐतिहासिक संग्रहालये इ. या काळात निर्माण झाली. संग्रहालयांचे प्रकार वाढले, त्याबरोबरच त्यांचे व्यवस्थापन, जतन, संरक्षण, प्रदर्शन या व्यवस्थेतही बदल झाले. अशा विविधतेमुळे संग्रहालयांना उच्च शिक्षण घेतलेल्या तज्ञ व प्रगत नोकरवर्गाची गरज भासू लागली. संग्रहालयांच्या संख्येतील वाढ, प्रकारांतील वाढ व प्रशिक्षित नोकरवर्ग यांच्यामुळे या क्षेत्रातील ज्ञान प्रगत झाले आणि यातून एक नवीनच संग्रहालयशास्त्र ही ज्ञानशाखा उदयास आली.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी देशात अशांतता पसरली होती. पॅरिस शहर कलात्मक वस्तूंच्या बाजारपेठेचे यूरोपातील महत्त्वाचे केंद्र होते. देशातील अस्थिर वातावरणामुळे संग्रहालयासाठी गोळा करावयाच्या वस्तूंची खरेदीविकी लंडन शहरातून होऊ लागली. खाजगी संग्रहालयांनी यावेळी अनेक वस्तूंची खरेदी केली. फ्रान्समधून वस्तूंची होणारी निर्यात थांबविण्या-साठी सरकारने फ्रान्समध्ये म्यूसी नॅशनल देस मॉन्युमेंत्स फांस्वा या नावाचे व शैक्षणिक उद्देश असलेले संग्रहालय स्थापन केले. नंतर हे संग्रहालय म्यूसी नेपोलियन या संग्रहालयात विलीन झाले. यूरोपमध्ये नेपोलियन यांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या. त्यांनी जिंकून अगर लुटून आणलेल्या वस्तू या संग्रहालयात प्रदर्शित केलेल्या होत्या. या संग्रहालयात देशोदेशींच्या विविध वस्तू संग्रहित झाल्यामुळे आंतरदेशीय कलाभ्यासाचे एक केंद्र म्हणून त्याचा उपयोग होऊ लागला. येथील वस्तू पळवून, लुटून आणलेल्या असल्यामुळे, हे संग्रहालय अडचणीत आले. यूरोपमधील देशांना या वस्तू आपल्या मालकीच्या आहेत , ही जाणीव होऊ लागली. आपल्या राष्ट्रीय परंपरांची, संस्कृतीची त्यांना प्रकर्षाने ओढ निर्माण झाली व या वस्तू परत मिळाव्यात, असा त्यांनी फ्रान्सकडे आगह धरला. या वस्तू फ्रान्सला परत कराव्या लागल्या. आपल्या देशाचे स्वत्व ( अस्मिता ) जोपासण्यासाठी प्रत्येक देशाने तत्पर असावे, असे या यूरोपीय देशांना वाटू लागले. या घटनांचा परिणाम म्हणून देशोदेशी राष्ट्रीय संग्रहालये स्थापन झाली.


इतिहासातील या घटनेमुळे संग्रहालयांना आणखी एक महत्त्वाचे उद्दिष्ट जोडले गेले. संग्रहालये मनोरंजन, शिक्षण केंद्र, ज्ञान आणि संशोधन केंद्र, ही उद्दिष्टे पार पाडत होतीच. आता त्यात भर म्हणून राष्ट्रीय परंपरा, स्वत्व जोपासणे, ही नवीन दृष्टी संग्रहालयांना लाभली. संग्रहालयांनी नवीन जबाबदारी स्वीकारली की त्यांच्या रचनेत, व्यवस्थापनात वेगळेपण येते. त्यामुळे संग्रहालये बदलत जातात व त्यांचे समाजातील स्थान  अधिक महत्त्वाचे होत जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर यूनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने ‘राष्ट्रीय परंपरा’ व ‘संग्रहालये’ या विषयांत विशेष काम केले [→  संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना]. मनोरंजनाच्या कार्यासह संग्रहालये ही शैक्षणिक सुविधा देणारी तसेच आदान-प्रदान करणारी आधुनिक केंद्रस्थाने बनली आणि संग्रहालयांची संख्या वाढली. त्यांपैकी एकतृतीयांश संग्रहालये फक्त अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत होती (२००६).

विसाव्या शतकात संग्रहालयांना आणखी एक कलाटणी मिळाली. मोठी संग्रहालये शहरांत वसलेली असत. त्यामुळे येथील वस्तूंचा भरणा शहरी वस्तींतून जास्त होत असे पण संग्रहालयांना शिक्षणकेंद्रांची जोड लाभल्यावर खेडेगावातील वस्तू , आदिवासी, गिरिजन, वनवासीजनांच्या वापरातील वस्तू व त्यांची कला, यांना संग्रहालयात स्थान मिळू लागले. संग्रहालये या धोरणातून सामाजिक समतेचे महत्त्वपूर्ण तत्त्व अंमलात आणू लागली. यूरोपीय संग्रहालये पूर्वी फक्त यूरोपमधील वस्तूंचा संग्रह करीत. तेथील देश एकोणिसाव्या शतकात अन्य खंडांतील वस्तूंचा मागोवा घेऊ लागली. या व्यवस्थेतून प्रेक्षकांना प्रेरणा मिळावी व त्यांना काही संदेश मिळावा, अशी योजना ⇨जॉन रस्किन  या विचारवंतांनी मांडली व त्यांच्या विचारांना संग्रहालय अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत विविधता, व्यापकता यांमुळे संग्रहालये समाजाच्या जीवनाची प्रभावी केंद्रे बनली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कॅनडासारख्या देशांनी गंथालय चळवळीच्या शासकीय धोरणानुसार नॅशनल म्यूझीयम पॉलिसी १९७२ मध्ये जाहीर केली. त्यामुळे प्रांतीय संग्रहालयांना चालना मिळाली. रशियानेही असे धोरण अंगीकारले. आशियाई देशांच्या युनेस्कोतील सहभागामुळे (१९७६ चर्चासत्र ) आधुनिक जगताशी जुळवून घेण्यासाठी नवी दिल्लीत संग्रहालयाच्या  आंतरराष्ट्रीय मंडळाची ( आयकॉम ) परिषद झाली. तीत या संस्थेने मध्यस्थाची भूमिका बजावून आशियातील संग्रहालयांना पॅरिस येथील आयकॉम संस्थेच्या मुख्यालयाशी संलग्न केले. जपानमध्ये १९५१-७१ दरम्यान संग्रहालयांची संख्या दुप्पट झाली. विज्ञान संग्रहालये जपान व भारत यांत प्रामुख्याने होती. ती आता इतरही आशियाई देशांत स्थापन झाली आहेत.

संग्रहालयाकरिता वस्तू जमविण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग देणगी मिळविण्याचा आहे. सर्वसाधारणपणे संग्रहालयांकडे बऱ्याच देणगीदारांनी आपल्या वस्तू हस्तांतरित केल्या आहेत. श्रीमंत कुटुंबात आवडीच्या वस्तू जमविणे हा छंद असतो. या वस्तू सुरक्षित राखणे व त्यांची सातत्याने काळजी घेणे, सहज शक्य होतेच असे नाही. मग आपल्या वस्तूंची व्यवस्था करण्यासाठी देणगी देणे, हा त्यांच्यापुढे पर्याय असतो. पूर्वी संग्रहालयांना संग्रह गोळा करण्यात निश्चित धोरण नव्हते, पण आधुनिक संग्रहालयांना वस्तू स्वीकारण्यावर बरीच धोरणात्मक बंधने आहेत. कारण संग्रहालये आता शिक्षणकेंद्रे, संशोधन केंद्रे व राष्ट्रीय अस्मिता रक्षण करणारी केंद्रे असावीत, अशी अपेक्षा असते. संग्रहालये आता वैशिष्टये सांभाळून असतात. त्यामुळे एकाच प्रकारच्या वस्तूंचा संग्रह टाळणे व ज्या वस्तू धोरणात बसतात, त्याच स्वीकारणे शक्य असते. देणगी घेतानाही कायदेशीर बाबी सांभाळणे आवश्यक ठरते.

संग्रहासंबंधी आता शासनाने काही कायदे केले आहेत. एखादी महत्त्वाची वस्तू खाजगी कुटुंबाच्या मालकीची असेल व ती सार्वजनिक उपयोगाची असेल, तर कायदेशीर मार्गाने ती संग्रहालयाला ताब्यात घेता येते. खोदकामात आढळलेले अवशेष जर १०० वर्षांपूर्वीचे असतील व खाजगी जमिनीतून मिळालेले असतील, तर ते सरकारी मालकीचे होतात. यथावकाश ते राज्य संग्रहालयाकडे सुपूर्त होऊ शकतात.

काही उपयुक्त वस्तू दुसऱ्या संग्रहालयांकडून उसन्या आणणे आवश्यक ठरते. या उसनवारीतून संग्रहालयातील अपूर्णता घालविता येते. दरम्यानच्या काळात तशी वस्तू संग्रहालयाला मिळवावी लागते व उसनी वस्तू परत करता येते. सर्वसाधारणपणे सर्वच संग्रहालये नेहमीच आर्थिक अडचणीत असतात. सहसा कोणतेही संग्रहालय सतत आर्थिक मदत मिळण्याच्या, मिळविण्याच्या प्रयत्नांत असते. यामुळे संग्रहालये नवीन वस्तू विकत घेण्यासंबंधी अतिशय काटेकोर धोरण स्वीकारतात. उदा., सहसा कोणतेही संग्रहालय आवश्यक वस्तू मिळविण्यासाठी लिलावात सहभागी होत नाही. बाजारात मिळणाऱ्या वस्तू हलक्या दर्जाच्या, बनावट, चोरलेल्या असू शकतात. त्यामुळे खरेदीचा व्यवहार खबरदारी घेऊनच करावा लागतो.

काही संग्रहालयांतून एकाच प्रकारच्या अधिक वस्तू असू शकतात. अशा वस्तू आदान-प्रदान पद्धतीने दिल्या-घेतल्या जाऊ शकतात. या धोरणातून संग्रहालयांना अधिक वस्तू जमविता येतात. मृत्युपत्रांनुसारही काही वस्तू संग्रहालयाकडे येतात.

संग्रहालयात आलेल्या प्रत्येक वस्तूंसंबंधी नोंद ठेवणे, आवश्यक असते. ही नोंद शास्त्रीय पद्धतीने करावी लागते. त्या वस्तूंचे छायाचित्र विशिष्ट पद्धतीने घेऊन ठेवावे लागते. वस्तूमध्ये काही दुरूस्ती करावयाची असेल, तर तशी नोंद करून मगच वस्तू प्रयोगशाळेत वा कार्यशाळेत पाठवावी लागते. ती दुरूस्त करून आल्यानंतर ती प्रदर्शित करण्यासाठी संग्रहालयात मांडली जाते. प्रत्येक संग्रहालयास आपल्याकडील संग्रहाची वार्षिक तपासणी करावी लागते. ही तपासणी सर्व बाजूंनी करून घेण्यात संग्रहालये तत्पर राहतात. त्यामुळे त्यातील उणिवा काढून टाकणे शक्य होते. संग्रहालयातील वस्तूंची नोंद करण्याचे काम आणि जबाबदारी अभिरक्षकाची असते. अपूर्ण माहितीची, चुकीच्या माहितीची नोंद केली, तर सांस्कृतिक दृष्टया अडचणी येतात. संग्रहालयांतील वस्तूंच्या नोंदींवर त्यांसंबंधीचे संशोधन अवलंबून असते. ही नोंद व त्यावरील संशोधन नंतर शोधनिबंध, संशोधनगंथ यांतून प्रसिद्ध होते आणि त्यांचा आधार, संदर्भ अन्य अभ्यासक्षेत्रात घेतला जातो. नोंदींचे महत्त्व लक्षात घेऊन आता अचूकपणासाठी संगणकाचा उपयोग केला जातो. यामुळे माहितीचे आदान-प्रदान तत्परतेने होते. संग्रहालयातील वस्तूची चोरी झाली, तर वस्तूंची नोंद ती शोधून काढण्यास मदतीला येते. संग्रहालयात येणाऱ्या वस्तूंची नोंद होते, तशीच तेथून बाहेर जाणाऱ्या वस्तूंचीही नोंद करणे आवश्यक असते.

युनायटेड किंग्डम : यूरोपात इंग्लंडमध्ये शिक्षणाचा प्रसार इतर देशांच्या तुलनेत झपाटयाने झाला. असाच वेग संग्रहालयांनी सुद्धा स्वीकारला. पहिल्या महायुद्धानंतर केंबिजमधील फिट्झ विल्यम म्यूझीयम आणि कार्डिफमधील ‘नॅशनल म्यूझीयम ऑफ वेल्स’, या संग्रहालयांचे फार मोठया प्रमाणावर पुनर्वसन करावे लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर नॅशनल गॅलरी, व्हिक्टोरिया अँड ॲल्बर्ट म्यूझीयम आणि टेट गॅलरी या संग्रहालयांचा जीर्णोद्धार लोकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन केला गेला. लीड्स, मँचेस्टर, लिव्हरपूल, ग्लासद्धद्घ केली. दुसऱ्या महायुद्धानंतर विज्ञानविषयक व औदयोगिक संग्रहालयांना महत्त्व आले. अन्य यूरोपियन देशांनी इंग्लंडचे उदाहरण समोर ठेवून अनेक संग्रहालये काढली. यूरोपमधील देशांतून संग्रहालयांची संख्या खूप मोठी झाली आहे.


पुष्कळ देशांतील राष्ट्रीय संग्रहालये ही वस्तुत: सर्वसाधारण संग्रहालये असतात. उदा., लंडन ( इंग्लंड ) येथील ब्रिटिश म्यूझीयममध्ये कलात्मक  व पुरातत्त्वविदयाविषयक सामग्री, प्राचीन दस्तऐवज व हस्तलिखितेही  आहेत. तेथील नॅचरल हिस्टरी म्यूझीयम आणि ब्रिटिश लायबरी ही मुळात याच संग्रहालयाचे विभाग ( खाती ) म्हणून स्थापन झाले होते.

एडिंबरो ( स्कॉटलंड ) येथे केवळ शस्त्रक्रिया या विषयाला वाहिलेले एक संग्रहालय आहे. तसेच तेथे एक लेखक-संग्रहालय आहे. या संग्रहा-लयात रॉबर्ट बर्न्स (१७५९-९६), सर वॉल्टर स्कॉट (१७७१-१८३२) आणि रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन (१८५०-९४) या तीन लेखकांच्या लहानपणापासून जीवनाच्या अखेरपर्यंत घडलेल्या कित्येक प्रसंगांची, त्यांच्या नित्याच्या वापरातील वस्तूंची आणि त्यांच्या प्रमुख साहित्यकृतींची जपणूक केलेली आहे.

कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया : हे देश राष्ट्रकुल संघटनेचे सदस्य आहेत. इंग्लंडमधील संग्रहालय चळवळीचा प्रभाव या सदस्य राष्ट्रांवरही पडला आहे. ओटावा या कॅनडाच्या राजधानीच्या शहरात चित्रांचे फार भव्य संग्रह आहेत. क्वीबेकमधील म्यूझीयम ऑफ सिव्हिलायझेशन हे खास संग्रहालय प्रसिद्ध आहे. टोराँटो या शहरात कलावस्तूंची भव्य संग्रहालये आहेत. द रॉयल आँटॅरिओ म्यूझीयम ( टोराँटो ) हे साठ लाख प्रदर्शित वस्तू आणि चाळीस कलावीथी यांनी अलंकृत झालेले कॅनडामधील सर्वांत मोठे संग्रहालय आहे. यात २००८ मध्ये सर क्रिस्तोफर ओंदात्जे यांच्या देणगीतून त्यांच्याच नावाने दक्षिण आशियाई कलावीथी स्थापण्यात आली आहे. तीत भारत, श्रीलंका, तिबेट, बांगला देश, पाकिस्तान, नेपाळ आदी देशांतील सु. ३५० दुर्मिळ कलावस्तू पदर्शनार्थ मांडल्या आहेत. त्यात दक्षिण आशियातील सिंधू संस्कृतीपासून अव्वल इंग्रजी अंमलापर्यंतच्या काळातील निवडक वस्तू आहेत. त्यातील फिरत्या प्रदर्शित कलावीथीत मुरलीधर कृष्णाची चित्रित कथा असून, अन्य चाळीस कलावस्तूंत पिछवी जरतारी वस्त्रावरील चित्रमय विणकाम, बुद्धाची तिसऱ्या शतकातील रत्नजडित अस्थिमंजुषा, बाराव्या शतकातील ब्रॉंझची नटराज शिवाची सुरेख मूर्ती, अठराव्या शतकातील रंगीत चित्रे काढलेली वस्त्रप्रावरणे वगैरे काही दुर्मिळ व वैशिष्टपूर्ण कला अवशेष आहेत. दीपाली दिवाण या महाराष्ट्रीय महिला या कलावीथीच्या मार्गदर्शक-अभिरक्षक आहेत.

ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरातील नॅशनल गॅलरी ऑफ व्हिक्टोरिया हे संग्रहालय भव्य असून त्यात यूरोपमधील अनेक मौल्यवान वस्तू , चित्रे संग्रहित केलेली आहेत. कॅनबरा शहरातील नॅशनल गॅलरी ऑफ ऑस्ट्रेलिया हे संग्रहालय कलावस्तू संग्रहाबद्दल जगात प्रसिद्ध आहे.

आफ्रिका : आफ्रिका खंडात फारच थोडी संग्रहालये स्थापन झाली आहेत. दक्षिण आफिकेत केपटाउन व जोहॅनिसबर्ग या शहरांतून भव्य कलावस्तू संग्रहालये आहेत. झँबियातील विंडहोक शहरात, तर केन्यामध्ये नैरोबी शहरात राष्ट्रीय संग्रहालये ही बहु-उद्देशीय स्वरूपाची आणि भव्य मानली जातात.

जर्मनी, इटली आणि फ्रान्स : या यूरोपियन देशांतूनच संग्रहालयांचा इतिहास सुरू झाला. अतिशय भव्य स्वरूपाची, विविधता असलेली संग्रहालये अनेक शहरांतून पहावयास मिळतात.

बर्लिन ( जर्मनी ) शहरातील स्टेट म्यूझीयम जागतिक कीर्तीचे समजले जाते. जर्मनीतील सर्व संग्रहालयांना व्हिल्हेल्म फोन बोडे या प्रसिद्ध संग्रहालय संचालकांनी मोठी प्रेरणा दिली आहे. यूरोप, आशिया आणि अमेरिका खंडांतील अनेक वस्तूंचे संग्रह जर्मनीतील संग्रहालयांतून आढळतात. दुसऱ्या महायुद्धात नाझी संघटनेने संग्रहालयांवर अनेक बंधने लादली पण ही घसरण नंतरच्या काळात जर्मनीने थांबविली आहे. जर्मनीतील संग्रहालयांचे वेगळेपण त्यांनी संग्रहालयासाठी बांधलेल्या भव्य इमारतींतून लक्षात येते. म्यूनिक, कोलोन, फँकफुर्ट या शहरांतून विविध प्रकारची संग्रहालये आहेत.

इटलीतील फ्लॉरेन्स, मिलान, नेपल्स, रोम, तूरिन, व्हेनिस या महत्त्वाच्या शहरांतून जागतिक कीर्ती लाभलेली अनेक संग्रहालये स्थापन झालेली आहेत. या शहरांव्यतिरिक्त अनेक चर्च आणि प्रार्थना केंद्रांतून मोठया आकारमानाची संग्रहालये मान्यता पावली आहेत. या संग्रहालयांचे वैशिष्टय म्हणजे त्यांत अनेक नामवंत चित्रकारांची चित्रे आणि भित्तिचित्रे व धार्मिक प्रतिमा, पुतळे, शिल्पकला यांचे भव्य संग्रह आहेत.

फ्रान्समधील पॅरिस येथील म्यूझी द लूव्ह्रर हे राष्ट्रीय कला वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. हे संग्रहालय भव्य आहे कारण अनेक खाजगी संग्रहालये यात विलीन झाली आहेत. इटलीमधील संग्रहालयाप्रमाणे फ्रान्समध्ये कलावस्तूंचे वैविध्य, चित्रे, पुतळे, शिल्पकला नमुने यांचे वैविध्य अनुभवयास मिळते. दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्समध्ये स्टेट म्यूझीयम स्थापण्यावर भर देण्यात आला. आता बूर्गे, दीजॉन ल मेअर, ल्याँस, नाइस, राइन्स, तूर्स इ. ठिकाणी विविध प्रकारची संग्रहालये स्थापन झाली आहेत.

आशिया : जपानमध्ये टोकिओ शहरात नॅशनल म्यूझीयम ऑफ फाइन आर्ट्स आहे. येथे जपानची कलाकुसर आणि मौल्यवान वस्तूंचा संग्रह  आहे. क्योटो शहरातील म्युन्सिपल म्यूझीयममध्ये जपानी कलाकृतींचे भव्य संग्रह आहेत. नारा शहरात जपानी मंदिरे, धार्मिक प्रतिमा यांचा संग्रह आहे. चीबा शहरात नॅशनल म्यूझीयम ऑफ जापनिज हिस्टरी, हे ऐतिहासिक संग्रहालय आहे. ओसाका शहरातील नॅशनल म्यूझीयम ऑफ एथ्नॉलॉजी हे संग्रहालय जागतिक कीर्तीचे मानले जाते.

पश्र्चिम आशियात अंकारा आणि इस्तंबूल (तुर्कस्तान), बगदाद (इराक), जेरूसलेम (इझ्राएल), तेहरान (इराण), कैरो (ईजिप्त), शारजा (संयुक्त अरब अमीर राज्ये) या शहरांत भव्य संग्रहालये आहेत. अरब लोकांचा, इस्लाम धर्माचा आणि राष्ट्रांचा इतिहास, त्यांच्या कलाकृती, साहित्य यांचे संग्रह या संग्रहालयांत केलेले आहेत. पाकिस्तानात कराची, इस्लामाबाद, लाहोर आणि पेशावर या शहरांतून मोठी संग्रहालये आहेत.

सिंगापूरचे एशिअन सिव्हिलायझेशन म्यूझीयम, कोरियातील सेऊल शहरातील नॅशनल म्यूझीयम ऑफ कॉन्टेम्पररी आर्ट, हाँगकाँग शहरातील हाँगकाँग म्यूझीयम ऑफ आर्ट, ही संग्रहालये जागतिक कीर्तीची मानली जातात.

चीनमध्ये प्रत्येक मोठया शहरात भव्य संग्रहालये आहेत. चीनमधील अनेक संग्रहालये कित्येक शतकांपूर्वीची आहेत. सूजो शहरातील ‘ रेशीम संग्रहालय ’ हे केवळ रेशमी कपडयांसंबंधी प्रसिद्ध आहे. सूजो शहर जगाची रेशीम राजधानी म्हणूनही ओळखले जाते.


जगातील नामवंत संग्रहालये : जगातील निवडक, प्रसिद्ध आणि विभागवार संग्रहालयांची यादी स्टेफनी मारा या लेखिकेने २० सप्टेंबर २००५ रोजी महाजालात ( इंटरनेटमध्ये ) दिली आहे. ही यादी अदयवत असून आयकॉम या संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. ( कोष्टक क. १).

कोष्टक क्र. १ जगातील अन्य नामवंत संग्रहालये
संग्रहालयाचे नाव शहराचे नाव देशाचे नाव
ब्रिटिश म्यूझीयम

हंगेरियन नॅशनल म्यूझीयम

नॅशनल म्यूझीयम ऑफ डेन्मार्क

नॅशनल म्यूझीयम ऑफ लिथ्युएनिया

नॅशनल म्यूझीयम ऑफ स्लोव्हेनिया

नॅशनल म्यूझीयम ऑफ प्राग

नॅशनल म्यूझीयम ऑफ केन्या नॅशनल म्यूझीयम ऑफ रूमानिया स्विस नॅशनल म्यूझीयम

इझ्राएल म्यूझीयम

नॅशनल म्यूझीयम ऑफ  ऑस्ट्रेलिया

नॅशनल म्यूझीयम ऑफ न्यूझीलंड

लंडन

बूडापेस्ट

कोपनहेगन

व्हिल्निअस

ल्यूब्ल्याना

प्राग

नैरोबी

बूकारेस्ट

झुरिक

जेरूसलेम

कॅनबरा

टी पापा ताँगॅरावा

युनायटेड किंग्डम

हंगेरी

डेन्मार्क

लिथ्युएनिया

स्लोव्हेनिया

झेकोस्लोव्हाक्रिया

केन्या

रूमानिया

स्वित्झर्लंड

इझ्राएल

ऑस्ट्रेलिया

न्यूझीलंड

प्रागितिहास आणि पुरातत्त्वविदया संग्रहालये
ईजिप्शिअन म्यूझीयम

पेट्री म्यूझीयम ऑफ ईजिप्शिअन आर्किऑलॉजी

कैरो

लंडन

ईजिप्त

युनायटेड किंग्डम

युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया म्यूझीयम ऑफ आर्किऑलॉजी अँड अँथॉपॉलॉजी

म्यूझीयम ऑफ  आर्ट  अँड आर्किऑलॉजी

फिलाडेल्फिया

कोलंबिया

अमेरिका

अमेरिका

नॅशनल आर्किऑलॉजी म्यूझीयम ऑफ अथेन्स

पॅर्गमॉन मूझीअम

मूझीअम फ्यूर फोर- उंड फ्यू गेशिष्ट

अथेन्स

बर्लिन

बर्लिन

ग्रीस

जर्मनी

जर्मनी

नॅशनल अँथॉपॉलॉजी म्यूझीयम

नॅशनल ऑर्किऑलॉजिकल  म्यूझीयम

शारजा आर्किऑलॉजिकल  म्यूझीयम

मेक्सिको सिटी

ऊंबिआ

शारजा

मेक्सिको

इटली

संयुक्त अरब अमीर राज्ये

कला आणि कला इतिहास संग्रहालये
म्यूझी द लूव्ह्र

व्हिक्टोरिया अँड ॲल्बर्टम्यूझीयम

नॅशनल गॅलरी

गालेरिक डेग्ली उफिझी

म्यूझी व्हाटीकानी

मेट्नोपॉलिटन म्यूझीयम ऑफ आर्ट पॉल गेटी म्यूझीयम

नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट

नॅशनल पोर्टेट गॅलरी

गूगेनहाइम म्यूझीयम

म्यूझीयम ऑफकॉन्टेम्पररी आर्ट कुन्स्ट हिस्टोशिस म्यूझीयम

लेस्सेन-बोर्नेमिस्झा म्यूझिओ

म्यूझिओ देल प्रादो

नॅशनल गॅलरी ऑफ आयर्लंड

नॅशनल म्यूझीयम ऑफ मॉडर्न आर्ट

नॅशनल गॅलरी ऑफ कॅनडा

नॅशनल गॅलरी ऑफ ऑस्ट्रेलिया

रिज्कस म्यूझीयम

कुन्स्ट हाले

कुन्स्ट-उंड ऑस्टेलुंगश्टाले

कुंस्ट मूझीअम

लूटव्हिग-फोरूम फ्यूर इंटरनॅशनल

मूझीअम फोकवाँग

ऑकलंड आर्ट गॅलरी

नॅशनल म्यूझीयम ऑफ कॉन्टेम्पररी आर्ट

स्टेट हर्मिटेज म्यूझीयम

हाँगकाँग म्यूझीयम ऑफ आर्ट

पॅरिस

लंडन

लंडन

फ्लॉरेन्स

व्हॅटिकन सिटी

न्यूयॉर्क

लॉस अँजेल्स

वॉशिंग्टन

वॉशिंग्टन

न्यूयॉर्क

सॅन डिएगो

व्हिएन्ना

माद्रिद

माद्रिद

डब्लिन

टोकिओ

ओटावा

कॅनबरा

ॲम्स्टरडॅम

बाझेल

बॉन

ड्यूसेलडॉर्फ

आखेन

एसेन

तॉइ ओ तामकी

सेऊल

सेंट पीटर्झबर्ग

हाँगकाँग

फ्रान्स

युनायटेड किंग्डम

युनायटेड किंग्डम

इटली

व्हॅटिकन

अमेरिका

अमेरिका

अमेरिका

अमेरिका

अमेरिका

अमेरिका

ऑस्ट्रिया

स्पेन

स्पेन

आयर्लंड

जपान

कॅनडा

ऑस्ट्रेलिया

नेदरर्लंड्स

स्वित्झर्लंड

जर्मनी

जर्मनी

जर्मनी

जर्मनी

न्यूझीलंड

कोरिया

रशिया

हाँगकाँग

ऐतिहासिक संग्रहालये
युनायटेड स्टेट्स  होलोकाउस्ट मेमोरिअल म्यूझीयम

नॅशनल म्यूझीयम ऑफ अमेरिकन हिस्टरी

वॉशिंग्टन

वॉशिंग्टन

अमेरिका

अमेरिका

संग्रहालयाचे नाव शहराचे नाव देशाचे नाव
डॉइश हिस्टोरिशे मूझीअम

नॅशनल म्यूझीयम ऑफ जापनिज हिस्टरी

नॅशनल म्यूझीयम ऑफ हिस्टरी

बर्लिन

चीबा

सोफिया

जर्मनी

जपान

बेल्जियम

औदयोगिक आणि तंत्रविदया संग्रहालये
नॅशनल एअर अँड स्पेस म्यूझीयम

अमेरिकन टेक्स्टाइल हिस्टरी म्यूझीयम

नॅशनल रेल्वे म्यूझीयम

नॅशनल म्यूझीयम ऑफ फोटोग्राफी, फिल्म, टेलिव्हिजन

नॅशनल मेरिटाइम म्यूझीयम

नॅशनल कोल मायनिंग म्यूझीयम

पॉवरहाऊस म्यूझीयम

कॅनडियन सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्यूझीयम

डॉइश मूझीअम

डॉइश बेर्गबाऊ मूझीअम

डॉइश बार मूझीअम/बेर्कर्स मूझीअम

वॉशिंग्टन

बॉस्टन

लंडन

बॅडफर्ड

ग्रिनिच

वेकफील्ड

सिडनी

ओटावा

म्यूनिक

बोखुम

न्यूरेंबर्ग

अमेरिका

अमेरिका

युनायटेड किंग्डम

युनायटेड किंग्डम

युनायटेड किंग्डम

युनायटेड किंग्डम

ऑस्ट्रेलिया

कॅनडा

जर्मनी

जर्मनी

जर्मनी

निसर्ग आणि निसर्गविज्ञान संग्रहालये
सायन्स म्यूझीयम

नॅचरल हिस्टरी म्यूझीयम

नॅशनल म्यूझीयम ऑफ नॅचरल हिस्टरी

अमेरिकन म्यूझीयम ऑफ नॅचरल हिस्टरी

नाचूर मूझीअम सेंकेंबेर्ग

म्यूझी नाशनल दं हिस्तॉरी नाचुराली

स्टेट डार्विन म्यूझीयम

स्विडिश म्यूझीयम ऑफ नॅचरल हिस्टरी

नॅचरल हिस्टरी म्यूझीयम

नॅचरल हिस्टरी म्यूझीयम

नॅशनल सायन्स म्यूझीयम

लंडन

लंडन

वॉशिंग्टन

न्यूयॉर्क

फँकफुर्ट

पॅरिस

मॉस्को

स्टॉकहोम

बर्न

व्हिएन्ना

टोकिओ

युनायटेड किंग्डम

युनायटेड किंग्डम

अमेरिका

अमेरिका

जर्मनी

फ्रान्स

रशिया

स्वीडन

स्वित्झर्लंड

ऑस्ट्रिया

जपान

मानवजातिविज्ञान/संस्कृतिविज्ञान संग्रहालये
म्यूझीयम फ्यूर फोल्करकुन्स्ट

लिंडेन मूझीअम

एटनोलोजीशे मूझीअम

म्यूझीयम ऑफ सिव्हिलायझेशन

नॅशनल म्यूझीयम ऑफ एथ्नॉलॉजी

व्हिएन्ना

स्टटगार्ट

बर्लिन

क्वीबेक

लायडेन

ऑस्ट्रिया

जर्मनी

जर्मनी

कॅनडा

नेदर्लंड्स

एशिअन सिव्हिलायझेशन म्यूझीयम

नॅशनल म्यूझीयम ऑफ एथ्नॉलॉजी

नॅशनल म्यूझीयम ऑफ द

अमेरिकन इंडियन्स

सिंगापूर

ओसाका

सिंगापूर

जपान

अमेरिका

]- न्यूयॉर्क

मेरिलंड

वॉशिंग्टन

]-

भारतीय संग्रहालये : प्राचीन काळी भारतातील काही राजे, संस्थानिक, सरदार, जहागीरदार व धनिक लोक आपल्या महालांतून विविध ( संग्रहालय-स्वरूपात ) वस्तूंचा संग्रह करीत असत. यात पूर्वजांचे पुतळे, तसबिरी, भित्तिचित्रे यांचा समावेश असे. या संग्रहांना त्यावेळी चित्रशाळा म्हणत असत. काही राजवाड्यांतून शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करीत असत. इतिहासात असे काही उल्लेख आढळतात. उदा., फिरोझशाह तुघलक (१३५१-८८) या बादशहांनी पॅलेस म्यूझीयम दिल्लीत उभे केले होते तसेच मोगल काळातील (१५२६-१७०७) काही बादशहांनी अनेक चित्रकारांना आश्रय देऊन विविध प्रकारची चित्रे काढून घेतली होती. त्यांचा संग्रह शाहजहानच्या राजप्रासादात होता. सवाई माधवराव ( कार. १७७४-९५) यांचाही वस्तुसंग्रह शनिवारवाडयात ( पुणे ) होता.

स्वातंत्र्यपूर्वकालीन संग्रहालये:   ⇨ सर विल्यम जोन्स  या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतात संग्रहालयांची सुरूवात केली. १७८४ साली कोलकाता येथे त्यांनी ⇨एशियाटिक सोसायटी  या संस्थेची स्थापना केली. भारतातीलच नव्हे, तर आशिया खंडामधील सर्व देशांतील संस्कृती, समाजजीवन व साहित्य यांचा अभ्यास करणे, हे या संस्थेचे ध्येय होय. संस्कृतीच्या अभ्यासासाठी एकाच देशाच्या सीमा अपुऱ्या पडतात. म्हणून त्यांनी या संस्थेचा हेतू आशिया खंडापर्यंत विस्तारित केला. १७८८ साली त्यांनी एशियाटिक संशोधन  हे नियतकालिक सुरू केले. या नियतकालिकाच्या पहिल्याच अंकात त्यांनी लेख लिहून या सोसायटीचे ध्येयधोरण अधोरेखित केले. मनुष्य आणि सृष्टी यांच्या संयोगातून संस्कृती विकास पावते, असे ते म्हणत असत. त्यांच्या या प्रयत्नांचे फळ म्हणून १७९६ साली या सोसायटीने भारतातील पहिले संग्रहालय काढण्याचे योजले. या वेळेपर्यंत सोसायटीकडे काही पुरातत्त्वीय अवशेष, भूविज्ञान, मानववंशशास्त्र, प्राणिविज्ञान या शास्त्रांतील काही दुर्मिळ वस्तू व कलात्मक प्रतिमा जमा झाल्या होत्या. १८०८ साली सोसायटीला संग्रहालय इमारतीसाठी जागा मिळाली व इमारत पूर्ण होऊन देशातील पहिले संग्रहालय १८१४ मध्ये स्थापन झाले. हे भारतातील सर्वांत जुने व महत्त्वाचे संग्रहालय होय. त्यानंतर मद्रास ( चेन्नई १८५१) येथे संग्रहालय स्थापन झाले आणि त्याच वर्षी व्हिक्टोरिया अँड ॲल्बर्ट ( मुंबई ) हे संग्रहालयस्थापन करण्यात आले.

व्हाइसरॉय लॉर्ड चार्ल्स जॉन कॅनिंग यांनी उत्तर हिंदुस्थानकरिता पुराणवस्तुसंशोधन खाते सुरू केले (१८६२). त्या खात्याचा प्रमुख म्हणून सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांची नियुक्ती केली. या विभागामुळे भारतात संग्रहालये स्थापन करण्याला चालना मिळाली. भारतातील इतिहासकालीन वस्तूंचे आणि पुरातत्त्वीय अवशेषांचे महत्त्व यामुळे नागरिकांच्या लक्षात येऊ लागले. १८७५ सालापर्यंत कोलकाता येथील संग्रहालय विस्तृत झाले व ते नवीन इमारतीत हलविले.

इ. स. १८१८ मध्ये मुंबई येथे ‘ लिटररी सोसायटी ऑफ बाँबे ’ ही संस्था सर जेम्स मॅकिंटॉश या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या प्रेरणेने सुरू झाली. अशीच संस्था चेन्नई ( मद्रास ) येथे सुरू झाली. या दोन्ही संस्थांचे कार्य भारतीय संस्कृती आणि इतिहास या विषयांचा अभ्यास व संशोधन करणे असे होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारताचा शोध घेण्यास केलेली सुरूवात भारतीय विव्दानांच्या लक्षात आली व या प्रकारच्या कार्यात त्यांनी सहकार्य देण्यास सुरूवात केली. यात कोलकाता येथील थोर समाजसेवक

⇨ राजा राममोहन रॉय हे आघाडीवर होते. याच काळात बाह्मो समाजाची स्थापना झाली. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांत आर्यसमाजाची स्थापना झाली. या संस्थांमुळे भारतीय संस्कृती, इतिहास व साहित्य यांच्या अभ्यासास चालना मिळाली.

या चळवळीतून १८५७ पर्यंत भारतात १०-१२ संग्रहालये सुरू झाली. याच सुमारास व नंतर सरकारी संग्रहालय (त्रिवेंद्रम १८५७), म्हैसूर सरकारी संग्रहालय ( बंगलोर १८६६) आणि सरकारी केंद्रीय संग्रहालय ( जयपूर १८७६) ही तीन प्रेक्षणीय संग्रहालये स्थापन झाली. त्यांपैकी (१) त्रिवेंद्रम येथील संग्रहालय भूतपूर्व त्रावणकोरच्या संस्थानिकांनी स्थापन केले होते. सुमारे २४ हेक्टर जमिनीवर उद्यान व प्राणि-संग्रहालय निर्माण करून तेथे प्रादेशिक कलावस्तू , हस्तव्यवसाय सामग्री, प्राचीन अवशेष, नाणी व सृष्टिज्ञानविषयक वस्तू ठेवल्या होत्या. शिवाय एका नायर समाजाच्या प्रातिनिधिक घराचा नमुनाही ठेवला होता.

(२) म्हैसूर सरकारी संग्रहालयाचे पहिले अभिरक्षक एडवर्ड बालफोर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथे पुरातत्त्वशास्त्र, सांस्कृतिक इतिहास, नाणी, मानवशास्त्र, औदयोगिक कला, भूस्तरशास्त्र, वनस्पतिविज्ञान व प्राणिशास्त्र वगैरे स्वतंत्र भाग पाडले होते. यांत मुख्यत्वे कर्नाटकातील प्राचीन दुर्मिळ वस्तू व शिल्पाकृती ठेवल्या असून प्राचीन आणि आधुनिक शस्त्रांचा संग्रह आहे. याशिवाय हस्तिदंत, चंदन यांत कोरलेल्या सुरेख नक्षीकाम केलेल्या वस्तू आहेत. शिवाय त्यांत राजघराण्यातील मौल्यवान जडजवाहीर, दागिने, वादये, वस्त्रे आणि रंगीत चित्रे यांचाही प्रेक्षणीय संग्रह आहे.

(३) जयपूरचे सरकारी केंद्रीय संग्रहालय राजवाडयाजवळच्या आकर्षक व भव्य वास्तूंत असून, त्यात विषयवार नऊ भव्य दालने आहेत. त्यांतून सत्ताधारी घराण्याच्या सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच्या विविध वस्तू व सामग्री जतन केली आहे. त्यांत धातू, लाकूड व माती या माध्यमांत घडविलेल्या कलाकुसरयुक्त सुंदर कलाकृतींचा विशेषत: मृण्मूर्ती व काष्ठशिल्पे यांचा संग्रह आहे. याशिवाय जुनी शस्त्रास्त्रे, राजचिन्हे, जड-जवाहीर, चिलखते, राजपूत शैलीतील रंगीत चित्रे, शाहीवस्त्रे, गालीचे, खेळणी, बाहुल्या इत्यादींचे दुर्मिळ नमुने आहेत. काही प्राण्यांचे ( भुसा भरलेले ) आणि वनस्पतींचे नमुने आहेत.

या संग्रहालयांव्यतिरिक्त याच काळात सेंट्रल म्यूझीयम, नागपूर (१८६३) आणि स्टेट म्यूझीयम, लखनौ (१८६३) व मथुरा म्यूझीयम (१८७४) स्थापन झाली होती. संग्रहालयांची तशी ही प्राथमिक अवस्था होती. या प्रयत्नांना जोडून १८७२ साली इंडियन अँटिक्विटी, १८८८ साली एपिगाफिया इंडिका व नंतर कॉर्पस इन्स्किप्शनम इंडिकारम   ही नियतकालिके सुरू झाली. १८९८ मध्ये ⇨लॉर्ड जॉर्ज नाथॅन्येल कर्झन   भारताचे व्हाइसरॉय झाले. त्यांनी भारतातील सांस्कृतिक वारसा स्पष्ट करणाऱ्या वस्तू , ऐतिहासिक स्थळे, इमारती, राजवाडे, कलाकृती पाहिल्या व त्यांचे जतन आणि संरक्षण करण्यासंबंधी कायदे करून जुन्या वस्तू व वास्तू यांचा ऱ्हास थांबविण्याचा प्रयत्न केला. तसेच पुरातत्त्व खात्याची त्यांनी नव्याने कार्यक्षम रचना केली. कोलकाता येथे व्हिक्टोरिया मिमॉरिअल हॉल ही भव्य वास्तू बांधून तेथे मोठे संग्रहालय सुरू केले. त्या काळातील मौल्यवान वस्तू त्यांनी येथे संग्रहित केल्या. याच ठिकाणी व्हिक्टोरिया राणींचे लेखनाचे टेबल व त्यांचा पियानो संग्रहित केलेला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई येथे शोभिवंत कलावस्तू , अनुप्रयुक्त कलावस्तू , वस्त्रोदयोग, भारतीय पुरातत्त्वविदयाविषयक वस्तू, लघुचित्रे, ऐतिहासिक चित्रे, थोडी यूरोपीय चित्रे व पौर्वात्य मृत्तिका-शिल्पे आहेत. चेन्नईच्या गव्हर्न्मेंट म्यूझीयममध्ये असंख्य ब्रॉंझच्या व पाषाण मूर्ती आहेत तर बनारस हिंदू विश्र्वविदयालयाच्या भारत कलाभवन या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण चित्रे आहेत. तेथे प्राचीन काळातील टेराकोटा वस्तूही आहेत.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्वातंत्र्यापूर्वी भारतीय संस्कृतीच्या उत्थापनासाठी अनेक संस्थांची निर्मिती झाली. पुरातत्त्व खात्याचे संचालक सर जॉन मार्शल यांच्या प्रेरणेने कित्येक ठिकाणी उत्खनने सुरू झाली आणि त्यांतील उत्खनित अवशेषांचे प्रदर्शन त्या त्या स्थळी करण्यात आले. त्यांपैकी सारनाथ (१९०४) व नालंदा (१९१७) येथील संग्रहालये विशेष गाजली. अशाच प्रकारची संग्रहालये पुढे १९२२ नंतर मोहें-जो-दडो, हडप्पा व तक्षशिला येथे स्थापन झाली. याशिवाय वाराणसी येथे राय कृष्णदास यांच्या प्रयत्नांमुळे भारत कलाभवन नावाचे फक्त कलाकुसरींच्या वस्तूंचे संग्रहालय (१९१९) स्थापन झाले. १९३१ साली राजवाडे इतिहास संशोधन मंडळ या संस्थेची धुळे (महाराष्ट्र ) येथे स्थापना झाली.⇨बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी, ⇨भारत इतिहास संशोधक मंडळ ( पुणे ), कामपुरा अनुसंधान समिती (गौहात्ती ) अशा अनेक संस्था निघाल्या. त्यांनी आपल्याकडे जमलेल्या प्राचीन वस्तू, चित्रे यांचे संग्रह स्वतंत्र दालनात प्रदर्शित केले. प्रॉव्हिन्शियल म्यूझीयम (ओरिसा), अलाहाबाद म्युन्सिपल म्यूझीयम (१९३५), आशुतोष म्यूझीयम ऑफ फाईन आर्ट्स (कोलकाता, १९३७) इत्यादी या क्षेत्रात प्रसिद्ध होत्या. दक्षिण भारतातील काही मंदिरांतून संग्रहालये स्थापन करण्यात आली. त्यांपैकी बृहदीश्वर मंदिरातील राजराजा संग्रहालय ( तंजावर ) मोठे आहे. मीनाक्षी मंदिर (मदुरा) आणि श्रीरंगम् ( तिरूचिरापल्ली ) येथील संग्रहालये अनुकमे हस्तिदंती वस्तू आणि पाषाण व धातूंच्या सुंदर मूर्ती यांबद्दल प्रसिद्ध आहेत.

काही कर्मचाऱ्यांनी १९४३ साली म्यूझीयम ॲसोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली. या संस्थेचे जर्नल ऑफ इंडियन म्यूझीयम्स   हे वार्षिक प्रसिद्ध होते. दरवर्षी ऑल इंडिया म्यूझीयम्स कॉन्फरन्स ही परिषद भरते. तेव्हा दोन दिवसांच्या चर्चासत्रात संग्रहालयविषयक विशेष विषयांवर चर्चा होते.

स्वातंत्र्योत्तर काळातील संग्रहालये : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९४९ साली ⇨सर मॉर्टिमर व्हीलर   यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना दिल्लीत झाली.  या राष्ट्रीय संग्रहालयाची संकल्पना १८३७ साली प्रथम जेम्स प्रिन्सेप  यांनी मांडली होती. १९४७ सालानंतर भारतात संग्रहालये स्थापन करण्याच्या कार्याला गती मिळाली. अनेक विदयापीठांतून विज्ञान विषयाचा अभ्यास प्रगत होऊ लागला. नंतरच्या ५० वर्षांत त्यामुळे विज्ञान संग्रहालये स्थापन झाली आहेत. नॅशनल रेल ट्रान्स्पोर्ट म्यूझीयम ( दिल्ली ), बिर्ला म्यूझीयम ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ( कोलकाता ), नेहरू सायन्स सेंटर ( मुंबई ) ही यांपैकी काही मान्यवर संग्रहालये होत.

इंडियन वॉर मिमॉरिअल म्यूझीयम ( लाल किल्ल दिल्ली ), बालकांसाठी संग्रहालये ( उदा., शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्यूझीयम नवी दिल्लीचे नॅशनल चिल्ड्नेन म्यूझीयम, अलाहाबादचे मोतीलाल नेहरू बाल संग्रहालय इ.) अशा संस्थाही निर्माण झाल्या. केंद्र सरकार, राज्य सरकारे, विश्वस्त आणि औदयोगिक संस्था, विदयापीठे व खाजगी संस्था भारतात संग्रहालय माध्यमातून लोकोपयोगी कामे करतात.

भारतातील काही प्रमुख संग्रहालये : (१) दिल्ली येथील ‘ राष्ट्रीय संग्रहालय ’ हे सर्वांत केंद्रस्थानी मानले जाते. या संग्रहालयात ३२० पाषाणशिल्पे विविध चित्रशैलींची ८,००० रंगीत चित्रे सु. ६१५ ब्रॉंझमूर्ती १,००० वस्त्रे ४,२०० फार्सी व अरबी हस्तलिखिते २,५०० संस्कृत, प्राकृत, पाली हस्तलिखिते १०,००० नाणी आणि जवाहिरांचा एक संग्रह आहे. यांशिवाय शस्त्रास्त्रे, हस्तिदंती व काष्ठशिल्पे आणि असंख्य मृत्पात्रे असून त्यात दरवर्षी दुर्मिळ वस्तूंची भर पडत आहे. आज तेथे विविध प्रकारच्या कलावस्तू , सर्व प्रकारची शिल्पे व अन्य सामग्री अशी दोन लाखांहून अधिक साहित्य-सामग्री आहे. या संग्रहालयात विशेषत्वाने प्रागितिहास, आद्य इतिहास, सिंधू संस्कृतीचे अवशेष मौर्य, शुंग, गुप्त, विजयानगर इ. काळांतील तसेच राजस्थानातील खास मूर्तिशिल्पे संग्रहित केली आहेत. शिवाय काही लक्षणीय भित्तिचित्रे व बीद्री नमुने या संग्रहालयात आहेत. (२) १९६४ साली पुणे येथे⇨राष्ट्रीय फिल्म विकास निगम  ही संस्था सुरू झाली. (३) १७८७ साली कोलकाता येथे वनस्पतिसंग्रह नामक संग्रहालय सुरू झाले. आता ह्या संग्रहाच्या पाच मजली इमारतीत वनस्पतींचे सु. १५ लाख नमुने आहेत. [→ वनस्पतिसंग्रह]. (४)⇨ भारतीय इतिहास संशोधक मंडळ १९१० साली पुणे येथे सुरू झाले. या संस्थेचे ऐतिहासिक वस्तू व हस्त-लिखिते यांचे संग्रहालय सुसज्ज आहे. (५) कृत्रिम तारामंडळे कोलकाता, हैदराबाद, मुंबई, दिल्ली, लखनौ, पुणे आणि पिलाणी येथे आहेत [→तारामंडळ, कृत्रिम]. (६)⇨बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी   संग्रहालय १८८३ साली सुरू झाले. (७) दार्जिलिंग ( प. बंगाल ) येथील निसर्गेतिहास संग्रहालय हे सर्वार्थाने इतर वस्तुसंग्रहालयांच्या मानाने आगळेवेगळे आहे. या संग्रहालयात पूर्वभारतातील पशुपक्ष्यांचे विविध नमुने ठेवलेले आहेत. ते सर्व प्राणी जिवंत भासावेत, अशा पद्धतीने प्रदर्शित केल्यामुळे हे संग्रहालय आकर्षक बनले आहे.

याशिवाय भारतात संग्रहालयांचा आणखी एक प्रकार आढळतो, तो म्हणजे थोर पुरूषांच्या वास्तू किंवा त्यांच्या नावे जमा केलेली सामग्री व चित्रमयदर्शन होय. डेरवण ( चिपळूण तालुका, जिल्हा रत्नागिरी ) येथील शिवसृष्टी किंवा श्रीशैलम् ( कर्नूल जिल्हा, आंध्र प्रदेश ) येथील श्री शिवाजी स्फूर्तिकेंद्र (१९९९) ही संग्रहालये अलीकडे पर्यटकांची आकर्षणे बनली आहेत. शिवाय महात्मा गांधी, पंडित नेहरू, स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, इंदिरा गांधी, रवींद्रनाथ टागोर वगैरेंच्या घरांचे वास्तूंचे तत्कालीन स्वरूप कायम ठेवून, तेथे त्या व्यक्तींनी वापरलेल्या वस्तू , कपडे, गंथ, पत्रे, छायाचित्रे इत्यादींचा संग्रह केला आहे. त्यांतील महात्मा गांधी स्मारक-संग्रहालय व गंथालय, पंडित नेहरू स्मारक-संग्रहालय ( तीन मूर्ती ), इंदिरा गांधी स्मारक-संग्रहालय ह्या सर्व दिल्लीतील वास्तू आहेत तर रवींद्रनाथ टागोरांचे स्मारक-संग्रहालय शांतिनिकेतन येथे त्यांच्या उदयन नावाच्या बंगल्यात आहे. लोकमान्य टिळकांचे स्मारक-संग्रहालय मुंबईतील सरदारगृहात जेथे त्यांचे निधन झाले त्या स्थळी आहे.

भारतातील प्रसिद्ध मंदिरांच्या आणि स्तूपांच्या परिसरात संग्रहालये आढळतात. त्यांपैकी खजुराहो, कोनारक, सांची, मथुरा, हळेबीड, हंपी, नागार्जुनकोंडा, अमरावती ( आंध्र प्रदेश ) इ. ठिकाणची पुरातत्त्वीय संग्रहालये प्रेक्षणीय असून त्यांतून मुख्यत्वे त्या स्थळांच्या परिसरातील पाषाणशिल्पे व उत्खनित अवशेष आढळतात. अलाहाबादचे संग्रहालय १९८५ मध्ये राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर झाले. येथे नेहरू कुटुंबातील वारसा हक्काव्दारे चालत आलेल्या वस्तू, हस्तलिखिते व पत्रव्यवहार आहे. तसेच विजयवर्गिया आणि बेंगॉल पेंटिंग्ज आहेत. ते केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाखाली आहे. भारहूत, भूमरा व जमसोद येथील संग्रहालये पाषाणशिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांत पक्वमृदा ( टेराकोटा ) कला अवशेष आहेत. ते कौशाम्बी, भिटा, झुसी, सारनाथ, पाटलिपुत्र, राजघाट आणि अहिच्छत्र येथे उपलब्ध झाले.


दिल्ली या राजधानीत राष्ट्रीय संग्रहालयाव्यतिरिक्त नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, नॅशनल काफ्ट्स म्यूझीयम (प्रगती मैदान), निसर्ग इतिहास संग्रहालय ( बाराखंबा मार्ग ), नेहरू तारांगण ( तीनमूर्ती वास्तू ), गांधी दर्शन आणि गांधी राष्ट्रीय संग्रहालय ( राजघाट ), महात्मा गांधी स्मृतिसंग्रहालय ( बिर्ला हाऊस ), इंदिरा गांधी स्मृतिसंग्रहालय (सफदरजंग मार्ग), नॅशनल सायन्स म्यूझीयम ( प्रगती मैदानाजवळ ), दारा शुकोव्ह पुरातत्त्व संग्रहालय ( सिव्हिल लाइन ), डॉल्स म्यूझीयम ( बहादूरशहा जफर मार्ग ), राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय ( चाणक्यपुरी ) वगैरे संग्रहालये प्रसिद्ध आहेत.

यांशिवाय भारतातील काही महत्त्वाची संग्रहालये पुढीलप्रमाणे आहेत : महात्मा फुले वस्तुसंग्रहालय हे पुण्यातील अनुप्रयुक्तविज्ञान, उदयोग व तंत्र-विदया यांविषयीचे संग्रहालय पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालय हे सर्वसाधारण संग्रहालय कोलकाता येथील बिर्ला इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल म्यूझीयम जुन्या व नव्या वस्त्रोदयोगांशी निगडित असलेले अहमदाबादचे कॅलिको म्यूझीयम जम्मू येथील अमरसिंह पॅलेस म्यूझीयम हैदराबाद येथील सार्वजनिक आरोग्य खात्याचे शैक्षणिक दृष्टया महत्त्वाचे असलेले हेल्थ म्यूझीयम आणि काकतीय मूर्तिशिल्पे, रोमन मूर्तींचे नमुने, चित्रे, फर्निचर तसेच कोटयवधी किंमतीचे निजामांचे जडजवाहीर असलेले सालारजंग संग्रहालय वगैरे.

अलीकडे म्हैसूर शहरात ( कर्नाटक ) क्षेत्रीय प्राकृतिक विज्ञान संग्रहालय या नावाचे प्रामुख्याने नेत्रहिनांसाठी वनस्पती संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे (२००२). त्याच्या प्रवेशव्दाराजवळ एक धातूचा ब्रेल लिपीत उठावदार नकाशा मार्गदर्शनासाठी ठेवला आहे. शिवाय उदयानांत जागोजाग सूचना फलक आहेत. ‘ या, स्पर्श करा आणि वनराईचा परिचय करून घ्या ’ या भावनेने नेत्रहिनांना हाक दिली आहे. बागेतून पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज आणि मधमाश्यांचे गुंजन ऐकावयास मिळते. शिवाय ध्वनिफितीव्दारे येथील वृक्षांची-कुंडीतील झाडांची ओळख करून देण्यात येते. स्पर्शज्ञानाने अंध मुले वृक्षांचे शोध घेतात. येथील हेलेन केलर पूल हे सर्वांत मोठे आकर्षण होय.

इ. स. १९११ साली भारतातील संग्रहालयांची पहिली दर्शनिका प्रसिद्ध झाली. त्यावेळी देशात ३९ संग्रहालये होती. १९५६ साली त्यांची संख्या १०५ तर १९६९ साली २४० झाली. १९७७ मध्ये ३६१ वर ही संख्या पोहोचली. १९७७ पर्यंत भारतातील ७३ विदयापीठांत असणारी संग्रहालये ७ बहु-उद्देशीय, ७ पुराणवस्तू, ३ खास विषयांची, ७ मानववंशशास्त्र, १६ वैदयकीय, १५ कलात्मक, २ शेतीविषयक, १६ वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान या विषयांची आहेत.१९७९ मध्ये विदयापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष सतीशचंद्र यांनी भारतातील संग्रहालयांसंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला. भारतात २००२ सालापर्यंत ६३८ संग्रहालयांची एकूण नोंद झालेली आहे. या संग्रहालयांची विभागणी पुढील तीस प्रकारांत केली जाते. शेतीविषयक (४), वायुसेना (१), पुरातत्त्वविदया (१५३), अभिलेखागार (२), शस्त्रागार (१), भूसेना (२३), मानवशास्त्र आणि संस्कृतिविज्ञान (४१), कला  आणि शिल्प (९९), वनस्पतिविषयक (१८), बालकांसाठी (७), बाहुल्या (१), शैक्षणिक (३६), वन (४), भूविज्ञान (५), गंथालय (३), वैदयकीय (१९), बहु-उद्देशीय (११५), संगीत (१), प्रकृतिविज्ञान (७), नौसेना (२), खुले (१), व्यक्तिविषयक (२८), पोलीस (२), रेल्वे (१), धार्मिक (५), विज्ञान (४०), विशेषीकृत ( खास ) (२), खेळ (१), वस्त्रनिर्माण (३), प्राणिविषयक (१३).

भारतातील काही वैशिष्टयपूर्ण संग्रहालयांची यादी कोष्टक क. २ मध्ये दिली आहे.

कोष्टक क. २. भारतातील काही वैशिष्टपूर्ण संग्रहालये
शहर संग्रहालयाचे नाव स्थापना वर्ष प्रकार/स्वरूप
अहमदाबाद

अहमदाबाद

कोलकाता

कोलकाता

दार्जिलिंग

दिल्ली

दिल्ली

दिल्ली

दिल्ली

दिल्ली

दिल्ली

दिल्ली

दिल्ली

वेचार युटेन्सिल्स  म्यूझीयम

काइट म्यूझीयम

व्हेटर्नरी सायन्स अँड ॲनिमल सायन्स म्यूझीयम

ज्यूट म्यूझीयम

वेस्ट बेंगॉल फॉरेस्ट म्यूझीयम

गॅलरी ऑफ म्यूझिकल इन्स्ट्रूमेंट्स

शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्यूझीयम

एअर फोर्स म्यूझीयम

नॅशनल रेल ट्रान्स्पोर्ट म्यूझीयम

राजपुताना रायफल म्यूझीयम

स्पोर्ट म्यूझीयम

नॅशनल पोलीस म्यूझीयम

नॅशनल सायन्स सेंटर

१९८१

१९८५

१८९४

१९४५

१९०७

१९६४

१९६५

१९६७

१९७७

१९८४

१९८४

१९९१

१९९२

भांड्यांचे संग्रहालय

वेगवेगळे पतंग

पशुवैदयक आणि खाटीकखाना येथून मिळविलेला संग्रह

तागासंबंधी वस्तुसंग्रहालय

वनासंबंधी सर्व काही

संगीत नाटक अकादमी, संगीत साधने, मुखवटे, पोशाख संग्रह

८० देशांतील ६,००० बाहुल्या

सर्व प्रकारची विमाने

१५० वर्षांचा रेल्वेचा इतिहास व प्रगती

भूसेना संग्रहालय

खेळ-वस्तुसंग्रहालय खेळ,करंडकसाहित्य छायाचित्रे इत्यादी.

गुन्हा अभिज्ञान- पोलिसांनी प्रदर्शित केलेले बोटांचे ठसे

वैज्ञानिक साधने

दिल्ली

पुणे

मुंबई

मुंबई

मोइरंग

( मणिपूर राज्य )

वडोदरा

(बडोदा)

हुगळी

मुंबई

कोलकाता

सुलभ इंटरनॅशनल म्यूझीयम

म्यूझीयम ऑफ आर्थोपोडा

ॲनॉटमी म्यूझीयम ( जी. एस्. मेडिकल कॉलेज)

फ्रामगी दादाभाई अलपैवाले म्यूझीयम

आ य एन ए वॉर मेमोरियल म्यूझीयम

हेल्थ म्यूझीयम

टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी म्यूझीयम

आ य एम एस विक्रांत संग्रहालय ( इंडियन

म्यूझीयम शिप )

द कोलकाता पोलीस म्यूझीयम

१९९४

१९७४

१९२५

१९५४

१९६९

१९३२

१९५९

२००१

चित्रफलक, प्रतिकृती

कीटक, कृमी संग्रहालय

वैज्ञानिक संग्रहालय

पारशी पंचायत संग्रहालय

आझाद हिंद सरकारचे अवशेष आणि शस्त्रे

आरोग्य प्रदर्शन

वस्त्रनिर्मितीसंबंधी सर्व काही

भारत-पाक युद्धाची

जिवंत दृश्ये

१७०४ सालापासूनचे

दस्तऐवज, छायाचित्रे आणि शस्त्रे यांचा अमोल संग्रह


भारतात मनोरंजन, शिक्षण आणि संशोधन या कार्यांसाठी काही खास संग्रहालये स्वातंत्र्यानंतर स्थापन झाली. संग्रहालयांच्या या बहुविविधतेमुळे भारताला संग्रहालय क्षेत्रात आता महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

राज्यस्तरीय संग्रहालये : यूनेस्को समितीच्या सूचनेवरून सदस्य राष्ट्रांनी आपापल्या देशात एक राष्ट्रीय संग्रहालय निर्देशित केले आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून देशातील अन्य संग्रहालयांशी यूनेस्को व आयसीएम या संस्था संपर्क ठेवतात. भारतातील राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे आहे. भारत खंडप्राय देश आहे व त्यात २८ राज्यांनी प्रत्येकी एक राज्य संग्रहालय निर्देशित केले आहे. यांपैकी काही महत्त्वाच्या संग्रहालयांचा उल्लेख कोष्टक क. ३ मध्ये थोडक्यात केला आहे. या

कोष्टकात राज्य व शहर या रकान्यात त्या राज्यात एकूण किती संग्रहालये आहेती ती संख्या कंसात दिली आहे.

कोष्टक क. ३.भारतातील महत्त्वाची राज्य संग्रहालये
राज्यव(शहर) राज्यसंग्रहालयाचे

नाव

स्थापना वर्ष स्वरूप, इतिहास, संग्रह
अंदमान व

निकोबार

(पोर्ट ब्लेअर) (२)

क्षेत्रीय मानवशास्त्र संग्रहालय १९५५ भारतीय मानवशास्त्र सर्वेक्षण, जमातींच्या दुर्मिळ हस्तनिर्मित वस्तू, नकाशे आणि तक्ते.
अरूणाचलप्रदेश

(इटानगर) (८)

जवाहरलाल नेहरूराज्य संग्रहालय १९५६ मानवजातिवर्णन असलेले संग्रहालय,कलावस्तू, नकाशे, छायाचित्रे इत्यादी.
आंध्रप्रदेश

(हैदराबाद)(३५)

सालारजंग

संग्रहालय

१९५१ बहु-उद्देशीयसंग्रहालय कलावस्तू संग्रह पर्शियन, अरबी कागदपत्रे, जडजवाहीर.
आसाम(गौहाती) (२५) आसाम राज्य संग्रहालय १९४० बहु-उद्देशीय संग्रहालय, वनवासी जीवनातील वस्तू, हस्तिदंती वस्तू, शस्त्रास्त्रे.
उत्तर प्रदेश

(अलाहाबाद) (९२)

अलाहाबादसंग्रहालय १९३१ पाषाण मूर्ती, पुतळे, हस्तकला वस्तू , जुने गंथ, शस्त्रास्त्रे, पं. नेहरू यांनी देणगी दिलेल्या वस्तू.
ओरिसा

(भुवनेश्वर)(२१)

ओरिसाराज्य संग्रहालय १९४८ बहु-उद्देशीय संग्रहालय, भूर्जपत्रे, संगीत साधने, पाषाण वस्तू.
कर्नाटक

(बंगलोर)(३६)

विश्र्वेश्र्वरय्या औदयोगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय १९६५ राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय, विज्ञान व तंत्रज्ञान इतिहास.
केरळ

(तिरूअनंतपुरम्) (१७)

आर्ट म्यूझीयम कला आणि शिल्प संग्रहालय, लाकडी व हस्तिदंती कोरीव वस्तू.
गुजरात

(अहमदाबाद) (३३)

कॅलिको म्यूझीयम ऑफ टेक्स्टाइल १९४९ भारतातील जुनी व नवी आधुनिक वस्त्रे, तंबू, गालिचे,इतिहास, वस्त्रासंबंधी गंथ.
गोवा

(पणजी) (४)

गोवा राज्यसंग्रहालय १९७७ पोर्तुगीजकालीन वस्तू, मानवशास्त्रदृष्टया महत्त्व असलेल्या वस्तू,कोरीव लेख, नाणी.
चंडीगढ(६) राज्य संग्रहालय व कलावीथी १९७१ भव्य संग्रह, कलावस्तू, पुराणकालीन वस्तुसंग्रह,प्रागितिहास अवशेष, पर्शियन तैलचित्रे.
जम्मू व काश्मीर

( जम्मू ) (६)

श्री. प्रतापसिंहसंग्रहालय १८९८ बहु-उद्देशीय संग्रहालय, बालविभाग, शस्त्रास्त्रे, प्रकृतिविज्ञान.
तमिळनाडू

(चेन्नई) (५१)

राज्यसंग्रहालय १८५१ बहु-उद्देशीय संग्रहालय, भूर्जपत्रे, वनस्पतिसंग्रह, ब्रॉंझ धातूंच्या वस्तू,प्राणिजीवन इतिहास.
त्रिपुरा(अगरतला) (१) त्रिपुरा शासकीयसंग्रहालय १९७० पाषाण मूर्ती, वस्त्रप्रावरणे, तैलचित्रे, बहु-उद्देशीय संग्रहालय.
दिल्ली(२८) राष्ट्रीय संग्रहालय १९४९ भव्य आणि बहु-उद्देशीय संग्रहालय, प्रागितिहास व आद्यइतिहास वस्तू, आशियातील संग्रह, प्रशिक्षण कार्यकम.
नागालँड

(कोहिमा)(१)

नागालँड राज्यसंग्रहालय १९७० बहु-उद्देशीय संग्रहालय, मानवशास्त्रविषयक

नमुने, पाषाण वस्तू.

पंजाब

(अमृतसर) (१४)

केंद्रीय शीखसंग्रहालय १९५८ शीख धर्माचा इतिहास, नाणी व शस्त्रसंग्रह, धर्मगंथ, धार्मिक संग्रहालय.
पश्र्चिम बंगाल

(कोलकाता) (५७)

इंडियन म्यूझीयम १८१४ तेलबिया, वनस्पती जीवाश्म,धार्मिक प्रतिमा वस्तू, सिंधू संस्कृती अवशेष,प्रागितिहास वस्तू, चांदीच्या वस्तू.
पाँडिचेरी

(३१)

पाँडिचेरी

वस्तुसंग्रहालय

१८८३ भारतातील पहिले बहु-उद्देशीय भव्य संग्रहालय, औषधी वनस्पती, रंग, मंदिरांचे अवशेष, आरसे, दीपसंग्रह,शस्त्रास्त्रे, तोफखाना.
बिहार( पाटणा )

(३२)

पाटणा राज्यसंग्रहालय

(के. पी.  जयस्वालसंग्रहालय)

१९१७ बहु-उद्देशीय संग्रहालय(भव्य), डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा वस्तुसंग्रह, संगीत साधने, चित्रे.
मणिपूर(इंफाळ) (२०) मणिपूर राज्य संग्रहालय १९६९ बहु-उद्देशीय संग्रहालय, शस्त्रास्त्रे.
मध्य प्रदेश(भोपाळ)

(३५)

बिर्ला संग्रहालय १९७१ पाषाण वस्तू, जुने गंथ, पुरातत्त्व संग्रहालय, उच्च शिक्षणाची सोय.
महाराष्ट्र(मुंबई)

(३६)

श्री छत्रपती

शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय

१९२२ कला, पुरातत्त्व,प्रकृतिविज्ञान संग्रहालय, भव्य संग्रहालय.
मिझोराम

(ऐझवाल) (१)

मेघालय राज्य

संग्रहालय

१९७७ आदिवासी, वनवासी वस्त्रे, बहु-उद्देशीय संग्रहालय.
मेघालय

(शिलाँग) (४)

विष्णू संग्रहालय

(राज्य संग्रहालय)

१९४३ जपानमधील पकडलेली शस्त्रास्त्रे(दुसरे महायुद्ध).
राजस्थान

(जयपूर) (२७)

शासकीय केंद्रीय

संग्रहालय

१८८६ बहु-उद्देशीय संग्रहालय, सिरॅमिक्स, संगमरवरी, मृत्तिका, हस्तिदंती वस्तू, चित्रे, वैज्ञानिक वस्तुसंग्रह.
हरयाणा(जाजर)(४) हरयाणा प्रांतीयपुरातत्त्व संग्रहालय १९६१ सिंधू संस्कृती संग्रह, नाणी, जुनी कागदपत्रे, पक्व मृदा (टेराकोटा ) वस्तू.
हिमाचल प्रदेश

(सिमला) (६)

हिमाचल राज्य

संग्रहालय

१९७३ बहु-उद्देशीय संग्रहालय, लाकडी कोरीव वस्तू.

महाराष्ट्रांतील महत्त्वाची काही संग्रहालये : शासकीय वस्तुसंग्रहालये :

(१) मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर: स्थापना वर्ष १८६३. प्रदर्शनीय वस्तूंची संख्या २८,८८७. यांतील ऐतिहासिक अवशेष कला-व्यवसाय, पुरातत्त्व, मानववंशशास्त्र, भूगर्भशास्त्र, निसर्ग, इतिहास ह्या सहा मुख्य दालनांत मांडलेले आहेत. कोरीव कामाच्या विविध वस्तू , बह्मदेशातील कलाकृती, प्रागैतिहासिक ते आजपर्यंतच्या इतिहासाचा उलगडा करणारे पुरावशेष, देवटेक येथील अशोकाचा शिलालेख, नष्ट झालेल्या प्राण्यांचे अश्मीभूत अवशेष, भूगर्भातील रहस्यांचा उलगडा करणारे नमुने ह्या सर्व वस्तू संग्रहालयात आहेत.

(२) प्रादेशिक वस्तुसंग्रहालय, औरंगाबाद: स्थापना वर्ष १९७९. ‘सोनेरी महाल ’ या मोगल कालीन इमारतीत प्रदर्शनीय वस्तूंची संख्या १,०५१. धातुमूर्ती, काष्ठ-कोरीव काम, काच चित्रे, मृण्मय मूर्ती, शिल्प, नाणी, सचित्रित पोथ्या अशा विविध वस्तू येथे आहेत. याशिवाय लोणाड, जि. ठाणे येथील गुंफेत बुद्ध जीवनातील एका प्रसंगाची प्लॅस्टरमधील  प्रतिकृती आहे दौलताबाद ह्या मध्ययुगीन नगराच्या ठिकाणी झालेल्या उत्खननात सापडलेली घरांची रचना व इतर सामाजिक पद्धती दर्शविणारी छायाचित्रे व वस्तू आहेत. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठात रावबहादूर द. ब. पारसनीस यांनी संग्रहित केलेल्या ऐतिहासिक व काही दुर्मिळ चित्रांचा–वस्तूंचा संग्रह आहे.

(३) माहूर वस्तुसंग्रहालय, माहूर (ता. किनवट, जि. नांदेड ) : स्थापना वर्ष १९८४. प्रदर्शनीय वस्तूंची संख्या १,२५१. वंजारी समाजाच्या  दैनंदिन जीवनाची कल्पना देणाऱ्या वस्तू मुख्यत्वेकरून येथे आहेत.  त्याशिवाय मध्ययुगीन नाणी, शिल्पे वगैरे वस्तू आहेत.

(४) तेर वस्तुसंग्रहालय, तेर ( ता. व जि. उस्मानाबाद ) : स्थापना वर्ष १९६७. प्रदर्शनीय वस्तूंची संख्या २४,७३९. ह्या वस्तू प्रामुख्याने तेर येथील जुन्या वस्तिस्थानात सापडलेल्या आहेत. यांत मुख्यत: सातवाहनकालीन वस्तूंचा समावेश होतो. पाँपेई ( द. इटलीतील प्राचीन नगरी ) येथे सापडलेल्या हस्तिदंताच्या स्त्रीमूर्तीशी साम्य असणारी हस्तिदंती  स्त्रीमूर्ती येथे आहे. याशिवाय मृण्मय, शंख, अस्थी, हस्तिदंत, मौल्यवान दगड, धातू यांपासून तयार केलेल्या वस्तू, मध्ययुगीन शिल्पे या ठिकाणी आहेत.

(५) कोल्हापूर वस्तुसंग्रहालय, कोल्हापूर : स्थापना वर्ष १९४६. प्रदर्शनीय वस्तूंची संख्या १,४६९. कोल्हापूर येथील बह्मपुरी उत्खननात सापड-लेल्या रोमन अवशेषांसाठी प्रसिद्ध. याशिवाय शस्त्र, शिलाहारकालीन शिल्पाकृती, नाणी, शिलालेख, चंदन व इतर प्रकारच्या लाकडावरील कोरीव काम, ऐतिहासिक व आधुनिक चित्रे, शिंगकाम अशा विविध वस्तू या संग्रहालयात आहेत.

(६) सांगली वस्तुसंग्रहालय, सांगली : स्थापना वर्ष १९७६. प्रदर्शनीय वस्तूंची संख्या ९३०. ऐतिहासिक चित्रांसाठी प्रसिद्ध. आधुनिक चित्रकारांच्या अप्रतिम चित्रकृती, कृष्णा नदीवरील पुलाची लाकडी प्रतिकृती, विविध माध्यमातील पुतळे, संगमरवरी, हस्तिदंती व लाकडी कलाकृती आणि  कोरीव  कामे  या  वस्तुसंग्रहालयात  आहेत.

(७) श्री भवानी चित्र-संग्रहालय, औंध ( जि. सातारा  ) : स्थापना  वर्ष १९३८. प्रदर्शनीय वस्तूंची संख्या ५,०५२. विविध प्रदेशांत निर्माण झालेली व त्या त्या प्रदेशाची वैशिष्टये सांगणारी ऐतिहासिक व पौराणिक चित्रे, संगमरवरी शिल्पे, कोरीव काम केलेल्या धातूच्या व लाकडाच्या वस्तू, पेंढा भरलेले प्राणी, जुनी घडयाळे, हस्तिदंती कोरीव वस्तू या संग्रहालयात आहेत. याशिवाय समृद्ध असा स्वतंत्र बालविभागही येथे  आहे.

(८) श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा : स्थापना वर्ष १९७०. प्रदर्शनीय वस्तूंची संख्या १,४९२. मराठाकालीन वस्तूंनी समृद्ध. यात मुख्यत: शस्त्रे, वस्त्रे, चित्रे, शिलालेख, संरक्षण चिलखते, मराठाकालीन कागदपत्रे यांचा समावेश आहे. राग–रागिणी, दरबारातील प्रसंग, राजवाडयातील जीवन, ऐतिहासिक व्यक्तींची चित्रे, सिंहासन वगैरे  या  संग्रहालयात  आहेत.

(९) श्री. चंद्रकांत मांढरे कलासंग्रह, कोल्हापूर : प्रदर्शनीय वस्तूंची संख्या ४९६. ख्यातनाम चित्रकार चंद्रकांत मांढरे यांनी चितारलेल्या वैविध्यपूर्ण कलाकृती या संग्रहालयात प्रदर्शित केल्या आहेत. जलरंग, तैलरंग, पावडर शेडिंग या विविध प्रकारच्या रंगछटांच्या माध्यमांतून व विविध विषयांवर निर्माण केलेल्या चित्रकृती येथे आहेत. मांढरे यांची तैलरंगातून पारदर्शकता निर्माण करण्याची हातोटी विशेष उल्लेखनीय आहे.

(१०) राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे : एका व्यक्तीने सातत्याने प्रयत्न करून १९६२ साली हे संग्रहालय स्थापन केले. १२ एप्रिल १९७५ रोजी झालेल्या कराराप्रमाणे महाराष्ट्र शासनास पूर्णत: मालकी हक्काने ते मिळाले. या संग्रहालयात सु. २०,००० वस्तू आहेत. त्यांपैकी केवळ २,५०० वस्तू प्रदर्शनार्थ मांडल्या आहेत. यात ९ दालने असून ४० विभाग आहेत. धातू, लाकूड व हस्तिदंतावरील कोरीव काम, ऐतिहासिक चित्रे, धातू व पाषाण शिल्पे, वादयांचे प्रकार, विविध प्रकार–आकाराचे अडकित्ते, शाईच्या दौती इ. दैनंदिन जीवनातील पूर्वीच्या काळी वापरात असलेल्या वस्तू या संग्रहालयात आहेत.

यांशिवाय पुढील शासकीय वस्तुसंग्रहालयेही आहेत : (१) सिंदखेड राजा वस्तुसंग्रहालय ( जि. बुलढाणा ), २५४  प्रदर्शनीय वस्तू (२) प्रादेशिक वस्तुसंग्रहालय, नाशिक, १,३४८ प्रदर्शनीय वस्तू  (३) श्री.बाळासाहेब पाटील वस्तुसंग्रहालय, पैठण ( जि. औरंगाबाद ), २,०४७ प्रदर्शनीय वस्तू आणि (४) प्रादेशिक वस्तुसंग्रहालय, रत्नागिरी, ४५ प्रदर्शनीय वस्तू.


अशासकीय वस्तुसंग्रहालये : (१) श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय ( पूर्वीचे नाव : प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझीयम ), मुंबई : स्थापना वर्ष १९२२. या संग्रहालयात प्रागैतिहासिक व ऐतिहासिक अवशेष, अतिपूर्व देशातील धातुमूर्ती, मध्ययुगीन पाषाण शिल्पे, अश्मयुगीन अवशेष, तामपाषाणयुगीन भांडी, हत्यारे, अलंकार, अनेक संस्कृतींच्या  वस्तू, ऐतिहासिक रंगीत चित्रे, हस्तिदंत, लाकूड व धातूवरील कोरीव काम, नाणी, शिलालेख, तामपत्र इत्यादी ऐतिहासिक वस्तू आहेत. याशिवाय विविध पक्ष्यांचे पेंढा भरलेले नमुनेही एका वेगळ्या दालनात ठेवलेले आहेत.

(२) महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, पुणे : स्थापना वर्ष १८७५. या संग्रहालयात हस्तकला, शेती, जंगल, निसर्ग, भूगर्भशास्त्र, उदयोग, शस्त्रे,  गंथालय ( छायाचित्रे, तक्ते इत्यादीसहित ) इ. विभाग आहेत.

(३) सोलापूर जिल्ह्यातील भूतपूर्व अक्कलकोट संस्थानातील जुन्या राजवाडयातील हत्यारखाना प्रसिद्ध आहे.

संग्रहालयांची उपयुक्तता : आज जगातील बहुतेक देशांनी संग्रहा-लयांची उपयुक्तता ओळखली आहे. खाजगी, शासकीय आणि संस्थात्मक प्रयत्नांतून संग्रहालय चळवळ सर्वदूर पसरली आहे. कलात्मक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, औदयोगिक इत्यादी विविध विषयांतील वस्तूंचे शास्त्रशुद्ध, शिस्तबद्ध, नियमानुसार संग्रह व संवर्धन करणारी संस्था, असे संग्रहालयांचे वर्णन  करता येईल. ही संस्था कोणत्याही प्रकारचा फायदा मिळविण्याची अपेक्षा करीत नाही. जमविलेल्या वस्तूंची योग्य प्रकारे मांडणी करणे, आकर्षक  पद्धतीने त्यांचे प्रदर्शन करणे, त्यांची नियमितपणे काळजी घेऊन जतन व संरक्षण करणे, अशी कामे ही संस्था करते. सर्वसामान्य लोकांना, विदयार्थ्यांना, अभ्यासकांना, संशोधकांना आनंद मिळावा, तेथील वस्तूंच्या अवलोकनातून त्यांचे शिक्षण व्हावे आपल्या राष्ट्रीय अस्मितेची ( अभि-मानाची ) आठवण होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी बहुविध उद्दिष्टे लक्षात घेऊन संग्रहालये स्थापन झाली आहेत. आपल्या पूर्वजांची कृतिशीलता, सौंदर्यदृष्टी, पराकम यांची जाणीव करून देणारी संग्रहालये ही प्रेरणास्थाने  आहेत. संग्रहालये राष्ट्रीय वारसा सांभाळतात, म्हणून आकमण करणारे  नेहमी संग्रहालये प्रथम नष्ट करण्याच्या प्रयत्नात असतात. ब्रिटिशांनी  भारतातील मौल्यवान, भव्य, इतिहासाची साक्ष असणाऱ्या कोहिनूर हिरा,  मयूर सिंहासन, उत्कृष्ट शिल्पे, जुनी हस्तलिखिते, बगलिघाट चित्रशैलीतील उत्कृष्ट कलाकृती आदी अनेक प्रकारच्या वस्तू इंग्लंडला नेल्या. आपल्या देशातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे व आपल्या काळातील सांस्कृतिक आदर्श, प्रतिमा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हे प्रत्येक पिढीचे कर्तव्य आहे, ही जाणीव संग्रहालये नागरिकांना करून देतात.

सांस्कृतिक वारसा : सांस्कृतिक वारसा सांभाळणे हे संग्रहालयांचे एक महत्त्वाचे व प्रमुख कार्य होय. हा वारसा नेमका कोणत्या वस्तूमधून प्रकट होऊ शकतो, याबद्दल मतभेद होण्याची शक्यता असते. यासाठी  आपल्या देशाची घटना व कायदे लक्षात घेऊन वारसा स्पष्ट करणाऱ्या वस्तूंची यादी निश्र्चित करणे आवश्यक ठरते. या यादीतील वस्तूंच्या निर्देशनाने देशाची, राज्याची ठळक वैशिष्टये कोणती ते निश्र्चित होते. देशादेशांतील संस्कृतींमधील वेगळेपण लक्षात येते. देशातील समाजाची तत्त्वज्ञानावरील निष्ठा आणि धारणा यांतून निर्माण झालेली श्रद्धास्थाने, जीवन जगण्याच्या पद्धती, वस्त्रप्रावरणे, राहण्याची घरे व त्यांची व्यवस्था, जेवणखाण्याच्या पद्धती, विवाहविधी, बालसंगोपन, स्त्रीसंरक्षण, धर्मविषयक कल्पना, धार्मिक संस्थांच्या पतिमा, साधने, साहित्य, कला, मनोरंजनाची साधने, प्रवासाच्या पद्धती, महान पुरूष व त्यांचे आचारविचार, पूजाअर्चा अशा अनेकविध  गोष्टींतून समाजाची ओळख होत असते व इतर समाज गटांपासूनचे त्याचे वेगळेपण स्पष्ट होते. खाली दिलेल्या यादीतून भूभागाची ऐतिहासिक जडणघडण, प्रगती आणि समाजाच्या संस्कृतीची वैशिष्टये स्पष्ट होतात.

(१) दुर्मिळ वस्तूंचा संग्रह, प्राणिजात, वनस्पती, भूमिगत खनिज पदार्थ, पूर्वीच्या प्राण्यांची शरीररचना, खडकातील वनस्पती व प्राणी (२) इतिहासाच्या संबंधातील वस्तू, तंत्रज्ञान, सैन्य, समाजशास्त्रविषयांचा इतिहास, राष्ट्रीय नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ यांची माहिती आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या घटना (३) पुरातत्त्वीय उत्खननांतून मिळालेल्या वस्तू व त्यांवरून काढलेले निष्कर्ष-शोध (४) ऐतिहासिक इमारती, स्मारके,  कलात्मक वस्तू, प्राचीन स्थळे, जमिनीत गडप झालेल्या वस्तू, वास्तू (५) शंभर वर्षांपूर्वीच्या वापरातील वस्तू, नाणी, कोरीव वस्तू, धातुकाम (६)मानववंशशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या वस्तू (७) कलात्मक वस्तू, चित्रे, तैलचित्रे, आलेख, नकाशे, हस्तकलेतून निर्माण झालेल्या वस्तू  अस्सल कलात्मक पुतळे, शिल्प, धातुशिल्प, मुद्रण, कोरीव दगड, शिळाछाप, कलात्मक जोडणी केलेल्या वस्तू, चित्रपट, छायाचित्रे, मांडणी (८) दुर्मिळ हस्तलिखिते, पोथ्या, गंथ, भूर्जपत्रे, दोलामुद्रिते, जुने गंथ, दस्तऐवज तसेच कलात्मक, शोभिवंत, साहित्यिक व वैज्ञानिक गंथ आणि कोशखंड (९) टपाल तिकिटे, कायदेशीर मुद्रांक कागद (१०) जुनी ऐतिहासिक कागदपत्रे, हस्तलिखित छायाचित्रे, रेखाचित्रे, ध्वनिमुद्रिका, चित्रपट, सिनेमाची यंत्रे (११) जुनी पण देखणी काष्ठशिल्पे, फर्निचर (१०० वर्षांपूर्वीचे ).

वरील यादीत सतत नव्या वस्तूंची भर पडत असते. प्रत्येक देशाच्या यादीत फरक असू शकतो. यूनेस्को संस्थेने एक वेगळी यादी तयार केली आहे. तिच्यात आणखीही वस्तू आहेत. त्यांनी आता पर्यावरण विषयासंबंधी वस्तूंचा समावेश केला आहे. ऐतिहासिक वास्तू व स्थळे यांचाही त्यांनी  समावेश केला आहे. यात ‘ सांस्कृतिक संपदा ’ यांचाही समावेश होतो.

संग्रहालयातील प्रदर्शन व्यवस्था : संग्रहालयातील वस्तूंचे  प्रदर्शन हा एक महत्त्वाचा विषय समजला जातो. यात दोन विभागांचा विचार  करावा  लागतो  (१)  संग्रहालयाची  वास्तू  व  (२)  वस्तूंचे प्रत्यक्ष प्रदर्शन.

वास्तू : एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला संग्रहालयांचे वेगळेपण लक्षात घेऊन भव्य वास्तू बांधण्यास प्रगत आणि श्रीमंत देशांनी सुरूवात केली. उंच इमारती, भव्य दालने, सज्जे, आकर्षक आणि उंच प्रवेशव्दार, मोठया खिडक्या, प्रेक्षकांसाठी जाण्यायेण्याचे रूंद मार्ग, अशी श्रीमंत शैली असलेली वास्तू संग्रहालयासाठी उभारली जाऊ लागली. अशा इमारतींभोवती विस्तृत बागा, उंच वृक्ष, कारंजी, इमारतींभोवती फिरण्यासाठी शोभिवंत पायवाटा यांची योजना केलेली असते. अशा प्रकारच्या भव्य कलादालनांचा अनुभव अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली या देशांतून येतो. नंतरच्या काळात वैज्ञानिक, औदयोगिक संग्रहालये निघाली. या प्रकारच्या संग्रहालयांतून युद्धशास्त्रातील वस्तू, जुनी विमाने, नौका, पाणबुडया, रडार व या सर्वांच्या  प्रतिकृती दिसू लागल्या. या प्रकारच्या वस्तूंच्या प्रदर्शनासाठी वेगळ्या प्रकारच्या इमारतींची गरज भासू लागली. पूर्वीच्या पद्धतीत असणारा दालनांचा भव्यपणा, श्रीमंती थाट लुप्त झाला व ज्याला कार्यशील इमारती म्हणून अशा वास्तू उपयोगात येऊ लागल्या. अन्य प्रकारच्या संग्रहालयांमुळेही वास्तुशास्त्रात विविधता येऊ लागली.


विसाव्या शतकात मोठया संग्रहालयांनी अनेकविध सुविधा व सुधारणा करून त्यांच्या सामग्रीचा संग्रह दाखविला आहे. त्यामुळे काही प्राधिकाऱ्यांना असे वाटू लागले आहे की, प्रेक्षकांच्या मानसिकतेकडे लक्ष पुरविले पाहिजे. त्यासाठी संग्रहालयातील कर्मचारी वर्ग शैक्षणिक प्रक्रियांच्या बाबतीत जागृत असला पाहिजे. याकरिता काही संग्रहालयांनी आपल्या संग्रहाची सूची आणि तत्संबंधी माहिती देणारे साहित्य प्रकाशित केले आहे. शिवाय स्वागतकक्षेत स्वागतकार प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो. याशिवाय चौकशी कक्ष त्यांना संग्रहालयात प्रवेश केल्यानंतर कोणता अनुभव येईल, याची कल्पना देतो. संग्रहालये पाहण्यासाठी  येणाऱ्या प्रेक्षकांची गरज काय आहे, ते जाणून घेणे आवश्यक आहे कारण हा मोठा खजिना पाहून प्रेक्षक संभमात पडतात. या संदर्भात प्रेक्षकांचे  तीन वर्ग लक्षात घ्यावे लागतील : (१) संग्रहालय वरवर पाहण्यासाठी  येणारे प्रेक्षक (२) शाळा, महाविदयालये यांमधील विदयार्थी, शिक्षक,  प्राध्यापक, सुशिक्षितांचा वर्ग आणि (३) अभ्यासक व संशोधक. पहिल्या प्रकारचे सामान्य प्रेक्षक मनोरंजन, करमणूक आणि आनंद मिळविणे, यांसाठी संग्रहालयाला भेट देतात. दुसऱ्या प्रकारातील प्रेक्षकांचा हेतू शिक्षणाचा असतो. यासाठी संग्रहालयात व्याख्यान दालन, चित्रपट प्रदर्शन यांची सोय करावी लागते. तिसऱ्या प्रकारातील प्रेक्षक वस्तूंचे सौंदर्य, आकर्षकता, काळ, रंगसंगती, आकारमान, उपयोजिता या सर्वांचा वास्तूत तोल कसा साधला आहे, याचा अभ्यास करतात. त्यांच्यासाठी वास्तूत  अभ्यास दालनाची व्यवस्था करावी लागते. गंथालय विकसित करावे लागते. या अभ्यासातून विविध प्रकारचे शोधनिबंध प्रसिद्ध होतात व देशातील औदयोगिक आस्थापनांना त्यांचा विशेष फायदा होतो.

तीनही प्रकारच्या प्रेक्षकांची गरज लक्षात घेऊन संग्रहालयांच्या इमारती उभाराव्या लागतात. प्रेक्षकांसाठी आता छायाचित्र संग्रहिका, सूक्ष्मपट, फीत मुद्रिका, प्रदर्शनातील वस्तूंच्या प्रतिकृती अशा वस्तूंची विकी केंद्रे  निर्माण करावी लागतात. संग्रहालयात व्याख्यान देणारे, चित्रपट दाखविणारे मार्गदर्शक यांची सोय करावी लागते. तसेच संग्रहालयात प्रेक्षकांची फार गर्दी झाल्यास आर्द्रता वाढते आणि श्वासोच्छ्वासामुळे काही वस्तूंना इजा पोहोचण्याचा संभव असतो. त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

वस्तूंचे प्रदर्शन : आधुनिक संग्रहालयात वस्तूंची विविधता विस्तारली आहे. तसेच संग्रहालयांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. प्रदर्शित करावयाच्या  वस्तूंचे सौंदर्य, सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व प्रेक्षकांच्या लक्षात झटपट आणून देणे, ही वाढती गरज निर्माण झाली आहे. याला आंतरशास्त्रीय  दृष्टिकोन म्हणतात. या सर्व उद्दिष्टांच्या विविधतेमधून ‘संग्रहालयातील  वस्तूंचे प्रदर्शन ’ हेच एक शास्त्र झाले आहे.

वस्तू प्रदर्शनात प्रकाशयोजना, पर्यावरण, हवामान व आगीपासून जतन, तस्करी व चोरी यांपासून संरक्षण, वस्तू पाहणाऱ्या प्रेक्षकांची विभागणी अशा अनेक घटकांचा विचार करावा लागतो. त्या घटकांमध्ये वस्तूंच्या वा सामग्रीच्या परिरक्षणात प्रामुख्याने हवामानाचे नियंत्रण, हा महत्त्वाचा घटक आहे. समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात सापेक्ष आर्द्रता  ४० ते ६० टक्के असून १६° ते २४° से. तापमान असते आणि हवा सापेक्षता स्वच्छ ( धुळीपासून मुक्त ) व रासायनिक विकियांपासून अलिप्त असते. ही स्थिती संग्रहालयांना स्पृहणीय अशी ठरते. उष्ण वाळवंटी प्रदेशांत जतनाच्या बाबतीत अनेक समस्या उदभवतात. उष्णता रासायनिक विकियांची गती वाढविते, तर शुष्कता रक्षण करते.

प्रदर्शनीय वस्तूंचा ठसठशीतपणा उठून दिसण्यासाठी नैसर्गिक प्रकाश  आणि कृत्रिम प्रकाश यांची सरमिसळ करावी लागते. वातानुकुलीत  दालनातून तर प्रकाशयोजना आणखी अवघड होते. प्रकाशाच्या स्रोतामुळे निर्माण होणारी उष्णता वस्तूला अपायकारक होऊ शकते. तिची रंगसंगती बदलू शकते किंवा जतनक्रिया बदलू शकते.

वस्तूंचा महत्त्वाचा, योग्य भाग प्रदर्शित होण्यासाठी लाकडाचे वा धातूंचे  टेकू, चौकटी, बैठका, पेटया इ. वस्तू आकारमानानुसार तयार कराव्या लागतात. काही ठिकाणी आरसे लावून पुतळ्यासारख्या वस्तूंचा मागील भागही प्रेक्षकाला समोरून दिसण्याची व्यवस्था करतात. या साधनांमुळे प्रदर्शनीय वस्तूंचे सौंदर्य खुलते पण ही साधनेच जर अतिदेखणी केली, तर प्रेक्षक अशा दुय्यम साधनांकडेच आकर्षित होतील, हे लक्षात घेऊन वस्तूचे महत्त्व अगकमाने लक्षात घ्यावे लागते. कृत्रिम प्रकाशयोजनेमुळे वस्तूचे नेमके आकारमान, प्रमाणबद्धता, समप्रमाणता, रेखीवपणा, रंगसंगती स्पष्ट करणे शक्य होते. संग्रहालयातील मौल्यवान जडजवाहीर, अतिमहत्त्वाच्या वस्तू आगीपासून,  तस्करीपासून सांभाळाव्या लागतात. त्यामुळे अशा वस्तूंचे प्रदर्शन करण्यासाठी खास प्रकारचे फर्निचर तयार करून घ्यावे लागते. आवश्यक  तेथे संरक्षक नेमावा लागतो. चोरी, आग, नुकसान पोहोचविणे यांसारख्या उपद्रवापासून रक्षण करण्याच्या दृष्टीने धोकादायक इशारा देण्याची  व्यवस्था करतात. संग्रहालयातील बाल विभागातील वस्तूंचे प्रदर्शन करण्यासाठी प्रेक्षकांची उंची लक्षात घेऊन फर्निचर तयार करून घ्यावे लागते.

वस्तूंची ओळख तत्परतेने व्हावी, यासाठी चित्रवर्णन किंवा वस्तुवर्णन मजकूर फलकाव्दारे स्पष्टपणे वाचता येईल, अशा ठिकाणी लावण्याची पद्धत आहे. हे फलक केवळ नामनिर्देश करणारे असावेत की वस्तूंची माहिती, ऐतिहासिक महत्त्व त्यांत नोंदवावे, यांसंबंधीचा निर्णय अभिरक्षकाने वस्तूच्या महत्त्वसापेक्षतेनुसार करावयाचा असतो. हे फलक  यथायोग्य प्रमाणात असावेत, असा संकेत पाळावा लागतो.

वस्तूंची मांडणी विविध प्रकारांनी करता येते. त्यांच्या कमाविषयी  काही मूलभूत संकेत ठरले आहेत. ऐतिहासिक संग्रहालयात कालक्रमानुसार वस्तूंची मांडणी अनेक ठिकाणी करतात. काही संग्रहालयांत ती शस्त्रास्त्रे, युद्धातून वापरलेल्या वस्तू, कागदपत्रे, पोषाख अशी विषयवार करता येते. संग्रहालयाचा प्रकार, त्याची व्याप्ती यांचा विचार करून ही योजना अभिरक्षकाला ठरवावी लागते. प्रत्येक प्रकारच्या संग्रहालयामध्ये मांडणीची विविधता उपलब्ध असते व त्यांपैकी एका पद्धतीचा स्वीकार करावा लागतो. काही संग्रहालयांतून प्रदर्शन व्यवस्था कमाकमाने बदलत राहतात.

संग्रहालयातील वस्तूंचे जतन : पुरातन काळापासून जमविलेल्या आणि मानवी विकासाच्या पाऊलखुणा दर्शविणाऱ्या वस्तूंची काळजी घेणे, त्यांचे जतन करणे, त्यांचे संवर्धन व पुन:स्थापन करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्यांचा अन्वयार्थ लावणे याची जबाबदारी संग्रहालयातील व्यवस्थापक, संचालक, अभिरक्षक इ. उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर व सल्लगार तज्ञांवर येऊन पडते. या वस्तू राष्ट्रीय वारसा आहेत. त्यामुळे ही जबाबदारी आणखी वाढते. कलावस्तू जतन करणे, त्यांचे परिरक्षण करणे, अपकर्षापासून त्या वाचवून त्यांची पुन:स्थापना करणे, हे अतिशय गुंतागुंतीचे काम आहे. अनेक वेळा सुरूवातीपासूनच वस्तू जतन करण्यासाठी काही सोप्या पद्धती अंमलात आणल्या, तर वस्तूंचे जीवनमान आपोआपच  वाढते.


संग्रहालयाची दोन महत्त्वाची कामे म्हणजे वस्तू वा सामग्रीचे परिरक्षण–जतन व पुन:स्थापना होय. यांकरिता तज्ञांच्या ज्ञानाची व कौशल्याची नितांत गरज असते. जुनी वा आधुनिक चित्रे स्वच्छ करणे, भिजलेले किंवा पाणथळ झालेले ठसे–शिक्के  यांना वाचविणे आर्द्रता किंवा अन्य कारणांनी धातूंच्या वस्तू गंजत असल्यास त्यांवर रासायनिक प्रक्रिया करणे आवश्यक असते. पुरातत्त्वीय उत्खननातून उपलब्ध झालेल्या अवशेषांचे विशेषतः मृत्पात्राचे परिरक्षण ही बाब नाजूक असून कौशल्याची असते.

सर्वच  वस्तूंना  नैसर्गिक  क्षीणत्व  येणे  आणि  त्यांचा  ऱ्हास  होणे,  हे स्वाभाविकपणे घडत असते. कोरीव दगडी शिल्पाचे क्षारांच्या अस्तित्वाने अपघटन होते, तर कलात्मकपणे घडविलेल्या लाकडी वस्तूंना वातावरणातील आर्द्रतेमुळे भेगा पडतात. प्रकाशामुळे रंगीत चित्रे व वस्त्रे फिकी पडतात. आरेखन वा रेखाचित्रे आणि ठसे–मुद्रादी साहित्य हे कृत्रिम  प्रकाशातच दर्शनीय असावे. प्रकाश पत्रीकरण केलेल्या काचेच्या छतांच्या साह्याने विकीर्ण केलेला असावा. त्यामुळे वस्तूला हानी पोहोचत नाही व ती सुबक दिसते. वाळवीमुळे मौल्यवान लाकडी वस्तू व सेंद्रिय पदार्थ अल्पकाळात नष्ट होतात. कवक ( हरितद्रव्य नसलेल्या सूक्ष्म वनस्पती ), कागदी वस्तू , वस्त्रे, चित्रे यांचा फन्ना उडवितात. वस्तू अशास्त्रीय पद्धतीने बंदिस्त ठेवल्याने ऱ्हास पावतात. या वस्तू संग्रहालयात असल्या, तरी नेहमीच जतन होतील असे म्हणता येत नाही. यासाठी वस्तूंचा अपकर्ष  होऊ नये, याची काळजी नेहमीच घेतली पाहिजे. अयोग्य हाताळणी,     निष्काळजीपणा यांमुळे वस्तूंचा नाश होतो. सांस्कृतिक वारसा टिकविण्यासाठी वस्तूमध्ये असलेल्या दोषांवर उपाय शोधणे व तिचे पुढील नाशापासून रक्षण करणे, या उपायांचा जतन प्रक्रियेत अंतर्भाव होतो. [→ कलावस्तु व अवशेष संरक्षण].

संग्रहालयात संशोधनपर कार्यही करावे लागते. वस्तूला क्रमांक देऊन नोंदणी करणे, तिची मापे, दर्शन, इतिहास इत्यादींच्या सविस्तर वर्णनांसह तिचा संग्रहालयाच्या यादीत ( सूचीत ) समावेश करणे, कापड विटण्यास  व जीर्ण होण्यास विलंब लावणारी क्रिया त्यावर करणे, जैव वस्तूंचे कुरतड-णारे प्राणी व कीटक यांच्यापासून रक्षण करणे, जैव नमुने विद्रावात  टिकवून ठेवणे, मृत्पात्रे खास कौशल्याने सुरक्षित ठेवणे, चर्मपूरणाची व्यवस्था करणे, अभ्यासासाठी वस्तूंचे नमुने बनविणे वा काचेवर नमुने  स्थापित करणे, यांसारखी संशोधनपर कामे संग्रहालयाच्या प्रयोगशाळेत  केली जातात. उदा., भारतातील नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयाची  सेंट्रल  म्यूझीयम  कॉन्झर्व्हेशन  लॅबोरेटरी  ही  प्रयोगशाळा  रासायनिक   विश्र्लेषण, धातूच्या कठिनतेची चाचणी, धुरी देणे इ. गोष्टींचे शिक्षण देते. याशिवाय ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर प्रिझर्व्हेशन अँड रिस्टोरेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी ’ नावाची संस्था १९५९ मध्येच यूनेस्कोव्दारे रोम ( इटली ) शहरात कार्यरत आहे. ही संस्था चित्रे, ब्राँझच्या वस्तू, मृत्पात्रे, मृत्तिकाशिल्पे यांचा अस्सलपणा प्रस्थापित करणाऱ्या वैज्ञानिक पद्धतींची माहिती करून देण्यासाठी  चर्चासत्रे  घेते.

पुराणवस्तूंचे संशोधन, संवर्धन व जतन करण्यासाठी पुणे येथे इन्स्टिटयूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन ओरिएंटल स्टडीज आर्म्स अँड आर्मर ( आय्आर्‌ओएस् ) या संस्थेची प्रयोगशाळा स्थापन झाली आहे (२००७). जुनी तैलचित्रे, नाणी, पोथ्या, हस्तलिखिते, धातूंच्या, दगडाच्या व लाकडाच्या कलात्मक वस्तू, शस्त्रास्त्रे इत्यादींचे जतन करण्याविषयी  प्रशिक्षण व उपाय ही संस्था सुचविते. आग, दुष्काळ आणि इतर आपत्तींमध्ये झळ पोहोचलेल्या वस्तूंवर अदययावत साधनसामग्रीच्या साहाय्याने रासायनिक व अरासायनिक उपचार प्रक्रिया करण्यात येतात. वैयक्तिक संग्रहातील वस्तूंच्या जतनासाठीही मार्गदर्शन केले जाते.

संग्रहालयांचे प्रकार : सतराव्या शतकापूर्वी जगातील संग्रहालये कलात्मक वस्तूंचा संगह करीत. संग्रहालयांचे महत्त्व लक्षात आल्यावर नंतरच्या ३०० वर्षांत विविध प्रकारच्या संस्था स्थापन झाल्या. १९७५ साली जगात सु. २५,००० पेक्षा जास्त संग्रहालये होती. संग्रहालयांचे तीन  प्रमुख प्रकार आहेत : कला संग्रहालये, इतिहासविषयक संग्रहालये आणि विज्ञान व तंत्रविदया संग्रहालये. याशिवाय सर्वसामान्य संग्रहालये असून तीत अनेक विषयांची सामग्री प्रदर्शनार्थ मांडतात. कला संग्रहालये चित्रे, शिल्पे आणि अन्य कलावस्तू यांचे संवर्धन, संरक्षण व प्रदर्शन करतात तर इतिहासविषयक संग्रहालये भूतकाळातील जीवन आणि घटना यांसंबंधीचे  पुरावे, प्राचीन हत्यारे, वस्तू, पुरातत्त्वीय अवशेष ( विशेषतः उपकरणे ) इत्यादींचे संवर्धन-प्रदर्शन करतात. विज्ञान व तंत्रविदयाविषयक संग्रहा- लयांतून निसर्गविज्ञान व तंत्रविदया संबंधित सामग्री प्रदर्शित केलेली असते. अशा संग्रहालयांचा उल्लेख म्यूझीयम्स ऑफ नॅचरल हिस्टरी असाही करतात.    त्यांत प्राणी, वनस्पती, जीवाश्म, खडकांचे नमुने आणि अन्य निसर्गांशी  संबंधित सामग्री असते. याशिवाय काही एकाच विषयाला वाहिलेली किंवा फक्त मुलांसाठी अशी संग्रहालये आहेत. त्यांत इंग्लंडमधील नॅशनल रेल्वे म्यूझीयम, स्कॉटलंडमधील म्यूझीयम ऑफ चाइल्डहूड, एडिंबरोमधील कलेक्शन ऑफ ओल्ड टॉइज वगैरे प्रसिद्धआहेत. अशा विविध प्रकारांमुळे संग्रहालये आता पूरक शिक्षण केंद्रे बनली असून त्यांच्यामुळे राष्ट्रीय आणि सांस्कृतिक वारसा स्पष्ट करणे, हे उद्दिष्ट साध्य झाले. काही भव्य संग्रहालये बहु-उद्देशीय स्वरूपाची असतात.

वित्तपुरवठयाच्या स्रोतानुसार खाजगी, नागरी ( नगरपालिकेसारख्या संस्थेकडून चालविली जाणारी ), राज्याची, प्रादेशिक व राष्ट्रीय असेही संग्रहालयांचे प्रकार केले जातात. काही संग्रहालयांना यांपैकी अनेक  स्रोतांपासून वित्तपुरवठा होत असण्याचीही शक्यता आहे. संग्रहालयांचे   शैक्षणिक व सामाजिक महत्त्व लक्षात आल्यावर त्यांचे प्रकार अधिक  वैविध्यपूर्ण व कल्पक असे झाले. प्रमुख तीन प्रकारच्या संग्रहालयांची अधिक माहिती खाली दिली आहे.

कलावस्तू संग्रहालये : प्राचीन काळापासून सुंदर, मौल्यवान, घाटदार आणि प्रमाणबद्ध आकर्षक वस्तूंचा, चित्रांचा संगह करण्याची  मानवी प्रवृत्ती दिसून येते. संग्रहालयांची सुरूवात या प्रकारच्या संग्रहातूनच झाली. एकोणिसाव्या शतकानंतर अशा संगहांना काही संकेत जोडले गेले  व त्यामुळे त्यांची वाढ दर्जात्मक आणि संख्यात्मक होऊ लागली.  जगातील अस्तित्वात असलेल्या संग्रहालयांतील ८०% संस्था या प्रकारात मोडतात. या वस्तूंच्या शास्त्रीय मांडणीतून समाजाची जीवनदृष्टी, सौंदर्याची ओढ, सांस्कृतिक पातळी यांचा बोध होतो. अशा समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण पटकन लक्षात येते व त्यांची ओळख स्पष्ट होते. संग्रहातील वस्तूंची मांडणी चोखंदळपणे केली,तर त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट होते.


इ. स. १८७० साली अमेरिकेत बॉस्टन म्यूझीयम ऑफ फाइन आर्ट्स आणि मेट्रपॉलिटन म्यूझीयम ऑफ आर्ट (न्यूयॉर्क ) ही भव्य कलावस्तू संग्रहालये निर्माण झाली. अशीच भव्य संग्रहालये फिलाडेल्फिया म्यूझीयम ऑफ आर्ट (१८७१) व बुकलिन म्यूझीयम (१८९३) नंतरच्या काळात स्थापन झाली. या संग्रहालयांत चित्रे, तैलचित्रे, भित्तिचित्रे   यांव्यतिरिक्त मौल्यवान जडजवाहीर, वैशिष्ट्यपूर्ण फर्निचर, लहानमोठी  घाटदार भांडी, रोजच्या वापरातील आकर्षक वस्तू , बैठया खेळांचे प्रकार, हस्तकला वस्तू , काचेच्या वस्तू , निरनिराळ्या प्रकारचे दिवे, झुंबरे, तोरणे, जुन्या प्रकारचे भव्य दरवाजे, खिडक्या, जाळ्या, धार्मिक प्रतिमा, पुतळे, वास्तुशिल्पे अशा विविध प्रकारच्या वस्तू सौंदर्यदृष्टीच्या निकषावर आकर्षक-पणे घेऊन प्रदर्शित केल्या आहेत. वस्तूंची निर्मितिकाळानुसार मांडणी लंडन येथील व्हिक्टोरिया अँड ॲल्बर्ट म्यूझीयममध्ये केली होती पण प्रेक्षकांना अशी मांडणी पसंत पडली नाही. मनोरंजन आणि शिक्षण यांचे योग्य संमिश्रण प्रेक्षकांना आकर्षित करते.

ऐतिहासिक संग्रहालये : संग्रहालयांच्या प्रगतीत महत्त्वाचा टप्पा  ऐतिहासिक संग्रहालये स्थापन झाल्यामुळे गाठला गेला. कलावस्तू जमविणे ही माणसाची सहजप्रवृत्ती असते पण ऐतिहासिक संग्रहालयेण निश्र्चित धोरण ठरवून निर्माण झाली. ऐतिहासिक वस्तू जमवून त्या प्रदर्शित करणे, हे केवळ एकच उद्दिष्ट येथे नव्हते. या वस्तूंच्या प्रदर्शनातून   इतिहास जिवंत स्वरूपात प्रेक्षकांना दाखविणे अशी येथे अपेक्षा आहे. महाराष्ट्रात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ही भावनात्मक वस्तू  आहे. ती इतर तलवारींपेक्षा वेगळी असणारच पण या तलवारीच्या निमित्ताने इतिहासातील राष्ट्रधर्माची जाणीव लोकांना अनुभवता आली, तर या तलवारीच्या प्रदर्शनाचा हेतू साध्य झाला असे वाटेल.

अमेरिकेत १७७६ साली पहिले ऐतिहासिक संग्रहालय स्थापन झाले. फिलाडेल्फिया या शहरात ते यूगेर द्यू सिमितीएर (१७३९-९४) या इंग्रज व्यक्तीने स्थापन केले. या संग्रहालयाला कालौघात अनेक चढउतार अनुभवावे लागले व त्याचाच एक इतिहास तयार झाला.

इ. स. १९०६ साली अमेरिकेत पुराणकालीन आणि ऐतिहासिक वस्तूंसंबंधी कायदा झाला. १९३५ साली या कायद्याला आणखी व्यापक स्वरूप दिले गेले. यात ऐतिहासिक स्थळांच्या जतनासंबंधी उल्लेख  आहेत. राष्ट्रीय महत्त्वाच्या जागा, इमारती, राष्ट्रपुरूषांची निवासस्थाने, कांती स्थळे, रणांगणे ताब्यात घेऊन त्यांचे जतन करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली. या स्थळांना भेट देण्यासाठी रस्ते, वाहतुकीच्या सोयी, निवासस्थाने यांची सोय झाली. या स्थळांना भेटी देणाऱ्या नागरिकांची संख्या फार मोठी आहे. इतिहासाची जाणीव जनतेमध्ये वाढण्यास या कायदयाने मदत केली आहे.

अठराव्या शतकाच्या सुरूवातीपासून यूरोप खंडात ऐतिहासिक संग्रहालये तयार झाली. फ्रान्समध्ये नेपोलियन बोनापार्ट यांनी गाजविलेले पराक्रम, अठराव्या शतकाच्या शेवटी झालेली औदयोगिक कांती अशा  घटना चित्रमय पद्धतीने रेखाटणारी, तसेच यांसंबंधी उपयोगात आणलेली साधने गोळा करून प्रदर्शित करण्यासाठी ऐतिहासिक संग्रहालये स्थापन झाली व त्यांतून नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. १८५२ साली बांधलेले जर्मानिक नॅशनल म्यूझीयम हे न्यूरेंबर्ग (जर्मनी) येथील संग्रहालय आता भव्य झाले आहे. अशीच संग्रहालये नंतर प्राग ( नॅशनल म्यूझीयम ऑफ प्राग ), म्यूनिक ( बायेरिशे नॅशनल म्यूझीयम ), ॲम्स्टरडॅम ( रॅज्कस म्यूझीयम ), झूरिक ( स्वित्झेरिशे लांडेस म्यूझीयम ), मॉस्को (स्टेट हिस्टॉरिकल म्यूझीयम ) येथे उभारली गेली. या संग्रहालयांना शैक्षणिक आणि संशोधनात्मक महत्त्व आले आहे.

विज्ञान आणि औदयोगिक संग्रहालये : अठराव्या शतकापासून  विज्ञानाची प्रगती झपाटयाने होत गेली. यूरोपीय देशांतून अनेक विदयापीठे आणि प्रयोगशाळा यांमधून विज्ञान या ज्ञानशाखेचा अभ्यास वाढला.  विज्ञानाचे शोध नंतर औदयोगिक क्षेत्रात उपयोजले ( वापरले ) गेले व कारखानदारी वाढत गेली. यातून जीवनोपयोगी नवीन वस्तूंची निर्मिती   वाढली व लोकजीवन समृद्घ होत गेले. विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढावा, कारखानदारीमुळे आलेली संपन्नता आणखी वाढावी, यांसाठी   विज्ञान आणि औदयोगिक संग्रहालये स्थापन होऊ लागली. त्याकाळी कलात्मक वस्तूंची व ऐतिहासिक संग्रहालये होतीच. त्यांत या नवीन प्रकारच्या संग्रहालयांची भर पडली. इटलीतील फाएन्झा या शहरात सिरॅमिक टाइल्सचे ( फरश्यांचे ) एक भव्य संग्रहालय उभारले. हे पहिलेच आगळे- वेगळे संग्रहालय ‘कंपनी  संग्रहालय `’ या नावाने ओळखले जाऊ लागले. अमेरिकेत न्यूयॉर्क राज्यात कॉर्निग या गावी ‘कॉर्निगवेअर’ हे काच  सामानाचे संग्रहालय निर्माण झाले. जगात आता लोह, पोलाद, कोरीव वस्तू , फर्निचर, शस्त्रास्त्रे, विमान, रेल्वे, टपाल तिकिटे अशी वस्तुगणिक संग्रहालये निर्माण झाली आहेत. जगातील काही महत्त्वाच्या विज्ञान संग्रहालयांचा उल्लेख खाली केला आहे.

अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात फ्रँक्लिन इन्स्टिट्यूट या संस्थेचे  १८२४ साली यांत्रिक कला आणि उपयोजित कला यांचे अध्ययन व प्रगती असे ध्येय असलेले एक भव्य संग्रहालय स्थापन केले. १९२३ साली हे संग्रहालय नवीन इमारतीत वसविले. विज्ञानातील अनेक प्रयोग, साधने, औदयोगिक उत्पादने या संग्रहालयात पहावयास मिळतात. देशात वैज्ञानिक वातावरण वाढावे, यासाठी हे संग्रहालय सतत प्रयत्न करते. ही संस्था  फ्रँक्लिन इन्स्टिट्यूट जर्नल  हे नियतकालिक प्रसिद्ध करते. १९१६ साली  शिकागो शहरात म्यूझियम ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे संग्रहालय   स्थापन झाले. नवीन यंत्रे, साधने, प्रयोग दाखविण्यासाठी ही संस्था प्रतिवर्षी मोठी रक्कम खर्च करते.

यूरोपमध्ये जगातील पहिले विज्ञान संग्रहालय १७९४ साली नॅशनल   देस आर्त्स एत मेनिएर्स हे पॅरिसला स्थापन झाले. १९२५ साली जर्मनीत डॉइश म्यूझीयम ( म्यूनिक ) हे भव्य विज्ञान संग्रहालय स्थापन झाले. या संग्रहालयाला राजकीय, सामाजिक चळवळींमुळे अनेक संकटांना तोंड  दयावे लागले.

इंग्लंडमधील लंडन सायन्स म्यूझीयम (१९०९) हे भव्य संग्रहालय   जागतिक प्रमुख संस्थेत गणले जाते. १९२३ साली हे संग्रहालय आणखी भव्य झाले. विज्ञानाचा इतिहास एका खास दालनात या संस्थेने प्रदर्शित केला  आहे.

यांशिवाय एकाच विषयावर भर देणारी खास प्रकारची संग्रहालयेही  असतात. उदा., लोककला, संदेशवहन, जलवाहतुकीचा इतिहास वगैरे विषयांवरील तसेच संग्रहाच्या ऐतिहासिक वा भौगोलिक स्रोतांनुसार  वेगळी असणारी खास संग्रहालयेही असतात. उदा., पौर्वात्य वस्तू व सामग्रीची, इंडियन अमेरिकन लोकांविषयीची ( उदा., नॅशनल म्यूझीयम ऑफ द अमेरिकन इंडियन्स ही न्यूयॉर्क, मेरिलंड व वॉशिंग्टन येथील  संग्रहालये ), अभिजात वस्तूंची संग्रहालये इत्यादी. मनोरूग्णांच्या काचेच्या कलाकृतींचे म्यूझीयम ऑफ इमेजेस ऑफ अनकॉन्शस हे रीओ दे जानेरो ( ब्राझील ) येथील संग्रहालय खास प्रकारचे आहे. लंडन येथील मॅडम मारी तुसो यांच्या मेणाच्या पुतळ्यांच्या (कलाकृतींच्या ) संग्रहालयात थोर ऐति-हासिक महत्त्वाच्या, प्रभावी व विख्यात व्यक्तींचे मेणाचे पुतळे (१८८४) प्रदर्शित केले आहेत. या संग्रहालयाच्या ॲम्स्टरडॅम, लास वेगास, न्यूयॉर्क, हाँगकाँग, शांघाय आणि वॉशिंग्टन येथेही शाखा आहेत. २००८ मध्ये बर्लिन ( जर्मनी ) येथे या संग्रहालयाची आणखी एक नवी शाखा सुरू करण्यात आली आहे. या संग्रहालयातील मेणाचे पूर्णाकृती पुतळे हुबेहूब त्या व्यक्तीं-सारखे असून त्यांची वेशभूषा अगदी यथायोग्य अशी आहे. याचप्रमाणे क्लीव्हलँड हेल्थ म्यूझीयम ( ओहायओ ), व्हेलिंग म्यूझीयम ( न्यू बेडफर्ड, मॅसॅचूसेट्स ), रेल्वे म्यूझीयम ( लीसेस्टर, इंग्लंड ), हंगेरियन ॲगिकल्चरल म्यूझीयम ( बूडापेस्ट ),  तारापोरवाला ॲक्वॅरियम ( मुंबई ), वॉटर्लू रणक्षेत्र ( बेल्जियम ) ही खास प्रकारची विज्ञान संग्रहालये आहेत.


वस्तू प्रेक्षकांपर्यंत नेऊन त्यांना संग्रहालयामध्ये रूची उत्पन्न करणे  व सहभागी करून घेणे यांकरिता संग्रहालये फिरती प्रदर्शने आयोजित  करतात. उदा., विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल म्यूझीयम ( बंगलोर ) आणि म्यूझीयम ऑफ सायन्स अँड इंडस्ट्री ( कोलकाता ) ही   संग्रहालये काही वस्तू व सामग्री वाहनांवरून दूरवरच्या खेडयंपर्यंत नेतात  आणि तेथे प्रतिकृती दाखवून व लोकांना प्रयोगात सहभागी करून घेऊन लोकशिक्षण करतात. रशियात नदीमार्गे जहाजांवरील फिरती प्रदर्शने दूरवर नेली जातात. उघडया संग्रहालयांमध्ये सर्व गामीण इमारती अथवा ऐतिहासिक किंवा धार्मिक स्मारके व जवळचा परिसरही येतो. काही संग्रहालये शाळांपर्यंत आपले कार्यक्रम नेतात.

संग्रहालयातील नोकरवर्ग : संग्रहालयाचा प्रकार, व्याप्ती आणि   विस्तार यांवर तेथील नोकरदारांची संख्या अवलंबून असते. संग्रहालयांची सुरक्षितता, संरक्षण आणि देखभाल हे प्रमुख व महत्त्वाचे मुद्दे असून  ह्या दृष्टिकोनातून पहारा करणे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या प्रेक्षकांवर नजर ठेवणे, हे रक्षकाचे काम असते. याशिवाय संग्रहालयातील कर्मचारी योग्य ती काळजी घेत असतातच. तस्करी, मोडतोड, अग्नी इ. बाबतींत ते दक्ष असतात. संग्रहालयात सर्वसाधारणपणे संचालक, व्यवस्थापक, अभिरक्षक, सचिव, गंथपाल, वस्तुजतनपाल, रंगकर्मी, छायाचित्रकार, संरक्षक, प्रयोगशाळा प्रमुख, भांडारप्रमुख, लेखपाल अशी काही प्रमुख पदे असतात. संग्रहालयाच्या व्याप्तीवर यांपैकी काही पदे कमी-जास्त प्रमाणात भरली जातात. मोठया संग्रहालयात सूक्ष्मसंदर्भ अधिकारी, संशोधक, प्रसिद्धी  प्रमुख, प्रकाशन प्रमुख, वास्तुरक्षक, परिसररक्षक अशी पदेही निर्माण करतात. मोठया संग्रहालयांना प्रेक्षकांचे व्यवस्थापन, व्याख्याते, चित्रपट दाखविणारे तज्ञ यांचीही गरज असते.

संग्रहालयांचे सतत नूतनीकरण करून काळाला अनुसरून बदल  करावे लागतात. यासाठी कार्यशाळा, व्याख्याने, चर्चासत्रे, अभ्यासवर्ग आयोजित करून नोकरांच्या प्रशिक्षणाची सोय करावी लागते. आता संग्रहालय शिक्षण विदयाशाखा काही विदयापीठांतून स्थापन झाल्या आहेत. देशादेशांतील संग्रहालयांच्या वाढत्या व्यापाला पूरक असे शिक्षण देण्याची व्यवस्था झाली आहे.

संग्रहालय संस्था आणि संघटना : दुसऱ्या महायुद्धानंतर ⇨ संयुक्त राष्ट्रे ही जागतिक संघटना स्थापन झाली. या संघटनेतर्फे ⇨संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना ( यूनेस्को UNESCO ) या संस्थेचे कार्य सुरू झाले. यूनेस्कोच्या अंतर्गत संग्रहालये, स्मारके आणि पुराणकालीन व ऐतिहासिक स्थळे हे विषय चर्चिले  जातात. यांसंबंधीचे कार्यालय फ्रान्समध्ये पॅरिस येथे आहे. संग्रहालयांची व्यवस्था, त्यांचे संवर्धन करणे, देशांची संस्कृती जतन करणे व यातून  जागतिक शांतता प्रस्थापित करणे, ही ध्येये या संस्थेने स्वीकारलेली आहेत. यूनेस्को म्यूझीयम  या नावाचे एक त्रैमासिक प्रसिद्ध करण्यात येते. या  संस्थेचे १०० पेक्षा अधिक देश सदस्य आहेत. वसाहती शासनातून नव्याने स्वतंत्र झालेली राष्ट्रे आपली संग्रहालये उभारताना यूनेस्कोची मदत घेतात. पारतंत्र्यात असताना वसाहतवादयांनी स्थानिक लोकांवर अत्याचार करून  देशातील धनसंपदा लुटून नेली. यात त्या देशांतील सांस्कृतिक, धार्मिक प्रतीके, मौल्यवान सुंदर वस्तू , ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू यांचा   समावेश होता. यूनेस्कोच्या सूचनेप्रमाणे या स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांच्या वस्तू वसाहतवादयांना परत कराव्या लागल्या. चोरी, तस्करी यांनाही आता बराच आळा बसला आहे. वस्तूंचे जतन आणि संरक्षण यांसंबंधी यूनेस्कोने केलेल्या सूचना सदस्य राष्ट्रांना बंधनकारक असतात. सांस्कृतिक परंपरा  जपणे, ऐतिहासिक स्थळांची दुरूस्ती करणे व त्यांचे जतन करणे, पुराण-कालीन वस्तू आणि वास्तू शोधणे व त्या टिकविणे, यांसाठी या संस्थेने   अनेक ठराव केले आहेत आणि ते अंमलात आणण्याची यंत्रणा उभी केली आहे. संग्रहालये सुसज्ज व्हावीत, यासाठी परदेशातून वस्तू आणाव्या लागतात. यासंबंधीच्या आयात-निर्यात कायदयात या संस्थेने अनेक सुधारणा सुचविल्या आहेत व अनेक राष्ट्रशासकांनी तसे कायद्यात बदल केले   आहेत. या प्रयत्नांतून व अनेक ठरावांमुळे आता संग्रहालय चळवळ प्रगत झाली, नवी संग्रहालये निघाली व जी अगोदर आहेत ती व्यापक होऊ  लागली. जुनी मंदिरे, चर्चेस, मशिदी यांना ऐतिहासिक महत्त्व आले. जगातील भाषा टिकविणे, सांस्कृतिक परंपरा समृद्ध करणे व संग्रहालया-संबंधी प्रत्यक्ष मदत आणि सहकार्य करणे, या स्वरूपाची कामे यूनेस्कोतर्फे केली जातात. जागतिक शांतता वाढीस लावणे व लहान राष्ट्रांना   सन्मानाने वागविणे या महत्त्वाच्या गोष्टी यूनेस्कोमुळे साध्य झाल्या आहेत.

जगातील संग्रहालयांना साहाय्यभूत होणारी दुसरी संस्था इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्यूझीयम्स ( आयकॉम ) ही असून या संस्थेचे मुख्य कार्यालय पॅरिस येथे आहे. ही संस्था स्वयंसेवी ( नॉनगव्हर्न्मेंट ऑर्गनाय-झेशन एनजीओ ) स्वरूपाची आहे व तिला यूनेस्कोने मान्यता दिली आहे. यूनेस्कोने मान्य केलेले प्रकल्प ही संस्था जगात कार्यवाहीत आणते. जगातील सांस्कृतिक परंपरांचे जतन, जीर्णोद्धार व संरक्षण करणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. कोणत्याही स्वरूपाचा नफा ही संस्था मिळवीत नाही. २००० सालापर्यंत जगातील १४० देशांतील २१,००० सभासद या संस्थेशी संलग्न होते. लेनिनगाड येथे झालेल्या १९७७ सालच्या संस्थेच्या अधिवेशनात दरवर्षी १८ मे हा दिवस ‘ आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस ’ म्हणून साजरा करण्याचा ठराव झाला. दरवर्षी या दिवशी आयकॉमने  दिलेल्या विषयावर जगातील संग्रहालयांतून चर्चा, कृतिसत्र व अभ्यासवर्ग असे कार्यक्रम योजले जातात. २००५ सालचा विषय ‘ म्यूझीयम बिजिंग कल्चर्स ’ असा होता. यूनेस्को आणि आयकॉम या संस्था जगातील संग्रहालये प्रगत व्हावीत, यासाठी विधायक कार्य करीत आहेत. या   संस्थांना संलग्न असणाऱ्या प्रादेशिक, देशीय संघटना हेच कार्य करतात.

५ डिसेंबर १९५६ रोजी यूनेस्कोच्या समितीची सभा दिल्लीत पार पडली. ऐतिहासिक स्थळांच्या उत्खननासंबंधी या सभेत चर्चा झाली. यात उत्खननासाठी पाळावयाचे नियम व सूचना या सभेने निश्र्चित केले. या जागांचे जतन आणि संरक्षण, उत्खननपद्धती आणि व्यवस्थापन, परदेशी संस्थांना उत्खननाची परवानगी, आंतरराष्ट्रीय सहकार्य, त्यासंबंधीचे करार, पुराणकालीन स्थळांचे जतन, तेथे पोहोचण्याचे मार्ग, उत्खननात सापडलेल्या वस्तू , त्यांची शास्त्रीय चिकित्सा, नोंदणी या वस्तूंचा व्यापार, स्थळांचे  संरक्षण व झालेले नुकसान या सर्व व्यवहारांत पाळावयाची नीतिमूल्ये,  परदेशी मालकीच्या वस्तू परत करणे, अशा स्वरूपाची गुंतागुंत असलेल्या व्यवहारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे या सभेत मान्य केली गेली.


जगातील बहुतेक देशांत त्या देशातील संग्रहालयांची संघटना आहे.  उदा., इंग्लंडमध्ये ब्रिटिश ॲसोसिएशन ऑफ फेंड्स ऑफ म्यूझीयम्स, तर  भारतात ॲसोसिएशन ऑफ म्यूझीयम्स इन इंडिया. आयकॉमसारखीच  वर्ल्ड फेडरेशन ऑफ फेंड्स ऑफ म्यूझीयम्स ही संस्था संग्रहालयांच्या  प्रगतीसाठी झटत आहे. इनकॉम-एशिया एजन्सी ही संस्था आशिया खंडातील संग्रहालयांच्या व्यवस्थापनात लक्ष घालते.

यूरोपमध्ये संग्रहालय संघटनांची मोठी साखळी निर्माण झाली आहे.  सरासरी दर ४३,००० लोकसंख्येमागे तेथे एक संग्रहालय आहे.   आफ्रिका खंडात संग्रहालयांची संख्या खूप कमी आहे. तेथे १३ लाख लोकसंख्येमागे एक संग्रहालय आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मदतीने  आफ्रिका आणि आशिया खंडांत नवीन संग्रहालये स्थापन होत आहेत.

संग्रहालयांचे आर्थिक नियोजन : जगातील बहुसंख्य संग्रहालयांना आर्थिक नियोजनासाठी त्या त्या देशातील शासनावर अवलंबून  रहावे लागते. खाजगी संग्रहालयांना त्यांच्या आयोजकांकडून मदत मिळते. विदयापीठे, कंपनी संग्रहालये यांना त्यांच्या व्यवस्थापनावर अवलंबून रहावे लागते. सर्वसाधारणपणे जगातील सर्व संग्रहालयांना आर्थिक  चणचण, ओढाताण भासतेच. संग्रहालये कितीही भव्य आणि व्यापक  असली, तरी तेथील व्यवस्थापकांना ती नेहमी अपूर्णच वाटतात. देशातील सार्वजनिक संस्था, महापालिका, नगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था व श्रीमंत नागरिक संग्रहालयांना प्रासंगिक मदत करतात, देणग्या देतात. संग्रहालयांना वस्तूंची देणगी मिळविणे, हे आर्थिक अडचणीवर मात करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे.

आता बरीच संग्रहालये प्रेक्षकांना प्रवेश शुल्क आकारताना दिसतात  पण हे शुल्क सामान्य पातळीवर ठरवावे लागते. अन्यथा प्रेक्षकांची    संख्या कमी होते व संग्रहालयांचा हेतू साध्य होत नाही. प्रवेश शुल्क या  संवेदनशील विषयावर उपाय म्हणून काही ठिकाणी मुले व ज्येष्ठ नागरिक   यांना प्रवेश शुल्क ठेवलेले नसते. काही संग्रहालये छायाचित्रे, प्रसिद्ध  वस्तूंच्या प्रतिमा, विविध स्वरूपांतील छाप असलेले कपडे, टी र्शट्‌स, बॉलपेन्स, मोमंटोज, चाव्यांसाठीच्या साखळ्या (कीचेन्स ) यांसारख्या भेट वस्तू विकून काही प्रमाणात आर्थिक हातभार लावतात. तसेच संग्रहालयाच्या प्रकाशन विभागातर्फे प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांच्या व  गंथांच्या विकीतून काही प्रमाणात पैसा उभा केला जातो. काही संग्रहालयांत सभासदांकडून शुल्क घेतले जाते, तर अभ्यासक्रम शिकविणारी  संग्रहालये शैक्षणिक शुल्क आकारून अंशत: आर्थिक कमाई करतात.

संग्रहालयातील चोऱ्या, तस्करी, तोडफोड व अग्नी : जगातील बहुतेक संग्रहालयांना एक समान धोका चोरी, तस्करी आणि तोडफोड यांपासून असल्याचे लक्षात येते व त्याविरूद्ध त्यांना उपाययोजना करावी लागते. आक्रमण, कांती यांसारख्या घटनांतून संग्रहालयांचा विध्वंस करून प्रदेशाबरोबरच संस्कृतीवर आक्रमण करणे हे विरोधकांचे उद्दिष्ट असते.  काहीजण संग्रहालयात प्रेक्षक म्हणून येतात व वस्तूंची तोडफोड करणे, वस्तू विद्रूप करणे, रंग खराब करणे, अम्ल टाकून वस्तू नष्ट करणे अशा  विकृतीत रस घेतात. अनेकदा शॉर्ट् सर्किट्मुळे व अन्य कारणांमुळे आग लागून काही वस्तू, फर्निचर भस्मसात होते. ब्रिटिशांनी शाहजहान बादशहाचे राजवाडयातील स्नानगृह इंग्लंडचा राजा चौथा जॉर्ज याला देणगीदाखल दिले होते. नंतर त्याचा लिलाव झाला. या व अशा अनेक घटनांच्या नोंदी इतिहासाने केलेल्या आहेत.

फ्रान्समध्ये गाजलेली चित्रे ( पेंटिंग्ज ) चोरीला गेली. त्यांची संख्या  एका अहवालात दिली आहे. १९७० मध्ये १,२६१ १९७२ मध्ये २,७१२ १९७५ मध्ये ३,७५० १९७६ मध्ये ३,०४० अशा या संख्या आहेत. एव्हिंगजॉन या शहरातील चर्चमधून पिकासोची १०० चित्रे एकाच दिवशी चोरीला गेली.

तमिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यातील शिवपूरम् या गावातील नटराजाची ब्राँझ धातूची मूर्ती दुरूस्तीसाठी ब्राँझ तज्ञाकडे दिली. त्याने  बनावट मूर्ती तयार करून तेथील मंदिराला परत केली व मूळ मूर्ती  विकली. ती अनेक देशांत हस्तांतरित होऊन १९६९ साली या मूर्तीची किंमत १० लाख डॉलर झाली. ही चोरी नंतर इंग्लंडमध्ये उघडकीला आली. त्यावर कायदेशीर कारवाई केल्यानंतर अनेक वर्षांनंतर भारत सरकारला ती मूर्ती परत मिळाली. अजिंठा, वेरूळ, खजुराहो येथील अनेक मूर्ती आक्रमकांनी भष्ट केलेल्या आढळून येतात. काही वेळा  भारतीय संग्रहालयांतील उत्तमोत्तम वस्तू व शिल्पे परदेशांत प्रदर्शनार्थ पाठविली जातात. त्यांची परिवहनात मोडतोड होते. अशा शिल्पांत  के. पी. जयस्वाल म्यूझीयममधील ( पाटणा ) इ. स. पू. चौथ्या शतकातील दिदारगंजची  यक्षी  खराब  झाली.

संग्रहालयातील चोरीविरोधी कायदे : एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला भारतातील प्राचीन संस्कृतीकडे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लक्ष  देण्यास सुरूवात केली. सर कोलिन मॅक्नझी या ब्रिटिश अधिकाऱ्याने दक्षिणेतील प्राचीन स्थळांना भेट दिली. त्यांच्या भारतातील ३८ वर्षांच्या नोकरीत त्यांनी २,६३० चित्रे, ७८ नकाशे, ८,०७६ कोरीव वस्तू , ६,२१८ नाणी आणि १०६ मूर्ती जमविल्या होत्या. अशा वस्तूंचे जतन आणि संरक्षण होणे अगत्याचे आहे, असे ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाटले.

इ. स. १८१० मध्ये ऐतिहासिक इमारतींचा गैरवापर थांबविण्यासाठी  भारतातील पहिला कायदा बेंगॉल रेग्युलेशन ॲक्ट संमत झाला. असाच  कायदा १८१७ साली मद्रास इलाख्यात केला गेला. १८६३ साली  महत्त्वाच्या इमारती, किल्ले, राजवाडे यांचा दुरूपयोग थांबविण्यासाठी  व्यापक कायदा भारतात संमत झाला. १९०४ साली एन्शंट मॉन्युमेंट प्रिझर्वेशन ॲक्ट संमत झाला. पुराणवस्तू संशोधन संरक्षण कायदा १९३५ साली केला. या कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे दिली गेली व केंद्र सरकारने पुराणवस्तू विभागाचे महासंचालक पद निर्माण केले आणि दयाराम सहानी हे पहिले महासंचालक   झाले. १९४७ साली प्राचीन वस्तूंच्या निर्यातीसंबंधी सरकारने प्रतिबंध जारी केले. भारत सरकारने पुराणवस्तू स्थळे, इमारती यांच्या सुस्पष्ट व्याख्या तयार केल्या आणि १९७२ साली त्यांच्या जतनासाठी व संरक्षणासाठी एक सर्वंकष कायदा संमत केला.

भारतीय घटनेनुसार प्रत्येक राज्याने आता पुरातत्त्व आणि पुराणवस्तू यांसंबंधी विभाग काढला आहे. पुराणवस्तूसंबंधीची एक अधिकृत यादी पण तयार केली आहे. कायदयामुळे अशा वस्तूंची आयात, निर्यात, देणगी अशा व्यवहारांवर नियंत्रणे आली. वस्तूंच्या नोंदीसंबंधी स्पष्टता आणली गेली. चोऱ्या, तस्करी, नासाडी, मोडतोड, बनावटगिरी यांसारख्या समाजविरोधी व विघातक कृत्यांना विरोध करणारे कायदे जगातील बहुसंख्य देशांनी संमत केले आहेत. इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्यूझीयम्स या संस्थेने जगातील सर्व देशांचे कायदे एकत्रित करून प्रसिद्घ केले आहेत.


सिंगापूर आणि हाँगकाँग ही मुक्त बंदरे आहेत. तेथे तस्करी, चोऱ्यांतून जमलेल्या वस्तूंची बाजारपेठ होती. आता या देशांनीही त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. अनेक कायदे अस्तित्वात असूनसुद्धा चोरी,  आयात-निर्यात या घटना बंद झालेल्या नाहीत. साम्यवादी देशांत चोऱ्यांचे प्रमाण कमी आहे कारण तेथे सांस्कृतिक वारसा असलेल्या सर्व वस्तू सरकारी मालकीच्या असतात.

संग्रहालय शिक्षण : संग्रहालयातील शिक्षण व्यवस्थेत आता प्रमाणपत्र, पदविका, प्रथम पदवी, व्दितीय पदवी आणि संशोधन पदवी  अशा पातळ्या उपलब्ध आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात सध्या  ७,००० पेक्षा जास्त संग्रहालये आहेत व त्यांतील अनेक संस्था भव्य  आहेत. त्यामुळे या देशात संग्रहालय क्षेत्रातील नोकऱ्या मोठया प्रमाणात  उपलब्ध आहेत. १९१० साली द फार्म्‌सवर्थ म्यूझीयम ऑफ वेलस्ली कॉलेज ( अ. सं. स.) या संस्थेने संग्रहालय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण सुरू केले. समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानववंशशास्त्र, पक्षिविज्ञान या क्षेत्रांतील प्रथम पदवी मिळविलेल्या विदयार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश  मिळत असे. २००० सालानंतर अनेक विषयांतील–विज्ञानासकट–प्रथम पदवीधारकांना संग्रहालय शिक्षण घेण्यास प्रवेश मिळतो. १९२० साली फोग म्यूझीयमनेही ( हार्व्हर्ड युनिव्हर्सिटी ) असाच अभ्यासक्रम सुरू केला.

अमेरिकन ॲसोसिएशन ऑफ म्यूझीयम्स या संस्थेने १९७६ साली  संग्रहालय शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केला. त्यात सर्वसाधारण शिक्षण, संग्रहालयासाठीची कौशल्ये, संग्रहालय इतिहास, तत्त्वज्ञान, प्रदर्शन तंत्रे, संग्रहालय प्रशासन, संग्रहालय संघटन, संग्रहालय व्यवस्थापन, अभिलेखपालन, वास्तू , संगह करण्याच्या पद्धती, पुन:स्थापन तंत्रे, साठवण पद्धती, संग्रहालयविषयक धोरणे व नीतिशास्त्र हे विषय अंतर्भूत होते.

भारतात या क्षेत्रातील पदवी देणारी विदयापीठे अलीगढ, भोपाळ,  कोलकाता, पिलाणी, वडोदरा ( बडोदा ) आणि वाराणसी या सहा     ठिकाणी आहेत. १९५२ साली प्रथम बडोदा विदयापीठाने पदवी परीक्षेचा अभ्यासक्रम सुरू केला. १९५९ साली कोलकाता विदयापीठात पदवी अभ्यासक्रम सुरू झाला. भारतातील या क्षेत्रातील शिक्षण आणि संशोधन प्राथमिक अवस्थेत आहे. प्राथमिक व शालेय शिक्षणात कोशवाङ्मय आणि संग्रहालयासंबंधी संदर्भ अजूनही दिले जात नाहीत. याचा परिणाम  म्हणजे विदयार्थ्यांना ज्ञानक्षेत्राच्या या वाटा माहीत होत नाहीत.

पंचवार्षिक योजनेत भारतातील संग्रहालयांचे पुनर्संघटन व नूतनीकरण यांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. यातून संग्रहालयातील बांधकाम, सुधारणा, शिक्षण, साधनसामग्री व प्रकाशने यांसाठी निधी उपलब्ध होतो. संग्रहालयातील तरूण कर्मचाऱ्यांना संशोधनासाठी अनुदाने मिळतात. बडोदा व कोलकाता विदयापीठांतील दोन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमामुळे संग्रहालयासाठी कर्मचारी उपलब्ध होतात. बडोदयाला स्टडीज इन म्यूझीऑलॉजी  हे वार्षिक प्रसिद्ध होते. त्यात संग्रहालयाविषयीचे लेख असतात. डिरेक्टरी ऑफ इंडियन म्यूझीयम्स   प्रथम १९५९ साली प्रसिद्ध झाली. सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेगवेगळ्या वेळी विविध संग्रहालयांत प्रशिक्षण होते. १९६३ साली शासनाने आपली संग्रहालयविषयक शिबिरे सुरू केली. यांमध्ये संग्रहालयविषयीच्या वरिष्ठ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दोन आठवडयांच्या बैठका होतात. राज्य संग्रहालयातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी व चर्चेसाठी या बैठकींना आमंत्रित करतात. यातून त्यांच्या कामात व्यावसायिक व तांत्रिक सुधारणा घडविण्याचे प्रयत्न केले जातात. १९६६ साली यूनेस्कोने नवी दिल्ली व मुंबई येथे आपले सेकंड एशियन रिजनल सेमिनार ऑन म्यूझीयम हे चर्चासत्र घेतले होते.

नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाने स्वत:ची प्रयोगशाळा १९५८  साली स्थापन केली. तेथील प्रशिक्षित कर्मचारी व साधनसामग्रीत पडलेली भर यांमुळे ती चांगली, मोठी प्रयोगशाळा बनली. ही प्रयोगशाळा ( सेंट्रल म्यूझीयम कॉन्झर्व्हेशन लॅबोरेटरी ) इतर संग्रहालयांना सल्ल देते आणि  मार्गदर्शन व मदतही करते. १९७१ साली यूनेस्कोच्या पाठिंब्याने तिचे संग्रहालयातील कर्मचाऱ्यांसाठीचे रिजनल म्यूझीयम कॉन्झर्व्हेशन ट्रेनिंग सेंटर हे प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. या व इतर संग्रहालयांतील अशा प्रयोगशाळांतील कर्मचारी, तसेच आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया व नॅशनल अर्काइव्ह्ज येथील कर्मचारी यांनी मिळून सांस्कृतिक संपदेच्या जतनाच्या अध्ययनासाठी ‘ इंडियन ॲसोसिएशन ’ ही संस्था उभारली. तिची दरवर्षी बैठक होते. तित होणाऱ्या चर्चेचे निष्कर्ष प्रसिद्ध केले जातात. तिच्या कार्यामुळे रोम येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर द स्टडी ऑफ द प्रिझर्व्हेशन अँड द रिस्टोरेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी या केंद्राने नवी दिल्ली येथे १९७२ साली  एशियन-पॅसिफिक कॉन्फरन्स ऑन कॉन्झर्व्हेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी ही सांस्कृतिक संपदेच्या संरक्षणावरील परिषद पुरस्कृत केली होती.

भारतीय विदयापीठ अनुदान मंडळाने संग्रहालय शिक्षण व संशोधन  यांविषयी विचार करण्यासाठी एक कार्यशाळा १८ एप्रिल १९७६ रोजी  आयोजित केली होती. या वेळी भारतातील संग्रहालयांच्या प्रगतीचाही   विचार झाला. १९७७ पर्यंत भारतातील ७३ विदयापीठांनी आपली संग्रहालये सुरू केली आहेत. भारत शेतीप्रधान देश आहे पण देशात शेतीविषयक संग्रहालये फक्त दोन आहेत. या प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेत खूपच अपूर्णता आहे.

संग्रहालयविषयक माहिती पुरविण्याची मोहीम सावकाश प्रगत होत आहे. मार्गदर्शक सहली व व्याख्याने यांपलीकडे जाऊन शाळांना दयावयाच्या भेटी अधिक काळजीपूर्वक आखल्या जातात. त्यांत चलच्च्त्रिपट, खास सांस्कृतिक घटना व इतर आकर्षक गोष्टी अंतर्भूत करतात. नवी  दिल्लीतील बालभवन हे तरूणांसाठी असलेले प्रत्यक्ष कार्य व कलानिर्मिती  केंद्र आहे. नॅशनल चिल्ड्रन्स म्यूझीयम हा याचा एक भाग असून तेथे संग्रहालयातील साधनसामग्रीचा उपयोग करण्याच्या दृष्टीने शिक्षकांना  प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न केले जातात. दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयाने  १९८९ मध्ये नॅशनल म्यूझीयम इन्स्टिट्यूट ऑफ हिस्टरी ऑफ आर्ट, कॉन्झर्व्हेशन अँड म्यूझीऑलॉजी नावाची संस्था स्थापन केली. तिला  अभिमत विदयापीठाचा दर्जा दिलेला असून तेथून एम्.ए. व पीएच्.डी.  या उच्च पदव्याही देण्यात येतात. शिवाय हे संग्रहालय निवडक विषयांवर चर्चासत्रे व हंगामी प्रदर्शने वेळोवेळी आयोजित करते. तसेच आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांतून सहभागीही होते. गेली पन्नास वर्षे राष्ट्रीय संग्रहालय जगातील  १६१ देशांबरोबर तज्ञ कर्मचारीवर्ग, कलावस्तू , कलेविषयक प्रकाशने आणि कलावस्तूंच्या प्रतिकृती यांबाबतीत सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यकमांतर्गत कार्यरत आहे. केंद्र शासनाच्या आर्थिक साहाय्य या योजनांतर्गत राष्ट्रीय संग्रहालय खासगी संग्रहालयांना त्यांच्या विकासकामासाठी व पुनर्संघटनासाठी  अनुदान  देते.


कोलकात्यातील नॅशनल कौन्सिल  ऑफ  सायन्स  म्यूझीयम्स   ( एनसीएसएम ) ही सांस्कृतिक विभागाखालील एक स्वायत्त संस्था आहे. तिचा उद्देश विदयार्थी व सर्वसामान्य लोक यांत विज्ञान व तंत्रविदया  हे विषय मुख्यत्वे लोकप्रिय करण्याचे असून त्यानिमित्ताने त्याचा प्रसार-प्रचार होईल, यासाठी त्यांनी काही कृती कार्यक्रम परस्परांतील संपर्क व संबंध वाढविण्यासाठी आयोजित केले आहेत. त्या कार्यकमांतर्गत एनसीएसएमने देशभर २६ विज्ञान संग्रहालये व केंद्रे स्थापन केली आहेत. याशिवाय कौन्सिलने अंतर्गेही व प्रांगणीय ( इनडोअर व आउटडोअर ) प्रदर्शने विकसित केली आहेत आणि विदयार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी यंत्रमानवाच्या धर्तीवर यांत्रिक डायनोसॉर बनविले आहेत. कौन्सिलने सायन्स सिटी हा अभिनव प्रयोग कोलकात्याजवळच सु. २० हेक्टर क्षेत्रात राबविला असून तो महानगरातील नागरिकांप्रमाणेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना कुतूहलाचा विषय झाला आहे. या शास्त्र-विषयक नगरात काही भव्य आणि अंत:करण थरारून सोडणाऱ्या शास्त्रीय वस्तू आणि तत्संबंधी शास्त्रीय प्रयोग ठेवण्यात आले आहेत. याशिवाय कौन्सिलने देशभरातील गामीण भागात सु. ३०० शास्त्रीय विदयालये सुरू केली आहेत. त्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच प्रशिक्षित अध्यापक पुरविले जातात. कौन्सिलने गोवा राज्यात सायन्स मॉरिटम ही योजना २००२ मध्ये कार्यान्वित केली आहे.

लखनौची नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी ( एनआरएलसी ) हे केंद्र शासनाच्या अखत्यारीतील एक दुय्यम   कार्यालय आहे. ही एक शास्त्रीय संस्था असून तिचा प्रमुख उद्देश सांस्कृतिक वारसाचे संरक्षण व संवर्धन हा आहे. तिचे कार्य म्हणजे विविध क्षेत्रांतील संशोधनाला विशेषत: भौतिक वस्तू आणि संवर्धनाच्या कार्यपद्धती, यांना   उत्तेजन देणे व उपलब्ध वस्तूंचा अभ्यास आणि कलात्मक वस्तूंचे  तंत्रज्ञान, संवर्धन-संरक्षणाचे प्रशिक्षण आणि संग्रहालये व तद्सदृश संस्था यांना तांत्रिक समुपदेश व सहाय्य देणे हे आहे. या संस्थेचे गंथालय   समृद्ध असून त्यात संग्रहालयाच्या संवर्धन-संरक्षण या संदर्भातील अनेक तपशिलांवर भरपूर संदर्भगंथ आहेत. याशिवाय हे गंथालय निवडक  विषयांची सटीप व सारांश रूपात संदर्भगंथ सूचीची सूक्ष्मसंदर्भ सेवा विविध अन्य संस्थांना पुरविते. ही प्रयोगशाळा संवर्धकांसाठी टिपाटिपणी आणि नियमपुस्तिका प्रकाशित करते. याशिवाय दरवर्षी दहा दिवसांची खास दिशानिश्र्चिती कार्यशाळा संग्रहालयांचे संचालक व अभिरक्षक यांच्यासाठी ठेवते. या कार्यशाळेतून मुख्यत्वे प्रतिबंधक संवर्धन या विषयांवर सहा  महिन्यांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम संवर्धकांसाठी योजला जातो. अलीकडे या प्रयोगशाळेची एक शाखा म्हैसूर ( कर्नाटक ) येथे सुरू झाली आहे. या प्रयोगशाळेतील ( एनआरएलसी ) एका शास्त्रज्ञाची कौन्सिल ऑफ द  इंटरनॅशनल सेंटर फॉर द स्टडी ऑफ प्रिझर्व्हेशन अँड रिस्टोरेशन ऑफ  कल्चरल प्रॉपर्टी ( आयसीसीआरओएम ) या संस्थेच्या १९९६-९९ च्या काळात भारतीय प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती.

परदेशी संग्रहालयातील भारतीय वस्तू : भारत अनेक वर्षे  पारतंत्र्यात होता. अतिप्राचीन संस्कृती, पदीर्घ इतिहास, खंडप्राय व्याप्ती, भाषा, वेश, धर्म, संस्कृती यांची विविधता, अनेक घटनांचे केंद्र, साहित्याची विविधता, जागतिक संस्कृतीत भर घालणारे महापुरूष अशा  अनेक कारणांनी भारताकडे जगातील अनेक राष्ट्रांचे लक्ष होते. फार प्राचीन काळापासून येथील विदयापीठांतून शिक्षण घेण्यासाठी विदयार्थी   भारतात येत. यामुळे भारतीय संस्कृतीची छाप आशिया खंडात मोठया   प्रमाणात पडलेली लक्षात येते. संस्कृत भाषेच्या प्रभावामुळे इंडो-यूरोपियन भाषांचा अभ्यास भारत आणि यूरोपीय देशांत एकोणिसाव्या शतकामध्ये वाढला. या सर्व घटनांचा प्रभाव जगातील अनेक संग्रहालयांवर पडलेला लक्षात येतो.

मुस्लिम आमदानीत भारतातील अनेक वस्तू अरब व आफ्रिकन देशांत गेल्या. रामायण, महाभारत, श्रीमद् भगवद्गीता, पंचतंत्र  असे गंथ जगातील अनेक भाषांत अनुवादित झाले आहेत.

ब्रिटिशांनी भारतात सु. १५० वर्षे तर पोर्तुगीजांनी, फ्रेंचांनी भारतातील काही प्रदेशात अनेक वर्षे राज्य केले. या वसाहतवादयांनी भारतातील संपत्तीबरोबर अनेक मौल्यवान वस्तू लुटल्या. लंडनमधील ब्रिटिश   म्यूझीयम, लिस्बनमधील म्यूझीयम यांत या वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. यूनेस्कोच्या सूचनेवरून भारतातील काही वस्तू या संग्रहालयांनी परत केल्या पण कोहिनूर हिरा, कालीघाट चित्रशैलीतील सुरेख चित्रे इ. वस्तू अजूनही ब्रिटिशांनी परत केलेल्या नाहीत.

पहा : कलावस्तु व अवशेष संरक्षण गंथालय चर्मपूरण जलजीवालय तारामंडळ, कृत्रिम प्राणिसंगहोदयाने बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी भारत इतिहास संशोधक मंडळ राष्ट्रीय फिल्म संग्रहालय वनस्पतिसंगह वृक्षोदयान.

संदर्भ : 1. Agarwal, O. P. Conservation of Manuscripts and Paintings of South-East Asia, London, 1984.

2. Agarwal, Usha, Directory of Museums in India, New Delhi, 2000.

3. Bartz, Bettina Optiz, Helmut Richter, Elizabeth, Eds., Museums of the World, 1992.

4. Bornham, Bonnie, Protection of Cultural Property : A Handbook of National Legislation, Paris, 1974.

5. Colleman, L. V. Museum Buildings, Vol. I, Washington, 1950.

6. Colleman, L. V. The Museums in America, 3 Vols., Washington, 1939.

7. Edson, Gary Dean, David, The Handbook of Museums, 1994.

8. Hudson, Kenneth Nicholls, Ann, Eds., World Directory of Museums, New York, 1975.

9. International Council of Museums,  Directory  of  Museums  in  the  Arab  Countries, London, 1995.

10. Knell, Simon, Comp. and Ed., A Bibliography of Museum Studies, 1994.

11. Sarkar, H. Museums and Protection of Monuments and Antiquities in India, Delhi, 1981.

12. Woodhead, Peter Stansfield, Geoffrey,  Key  Guide  to  Information  Sources  in  Museum Studies, 1994.

१३. केतकर, श. म. संग्रहालय परिचय, पुणे, १९६२.

देव, स. ग. देशपांडे, सु. र.


चेन्नई येथील शासकीय संग्रहालय (१९०१) औंध (सातारा) येथील श्री भवानी चित्र-संग्रहालय व गंथालय.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयातील 'हडप्पा कलावीथी'. श्री भवानी चित्र-संग्रहालयातील 'राजा-रविवर्मा दालन'.
श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई (पूर्वीचे नाव : प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझीयम, १९२२).

१. एल्. फोन क्लेंट्झ यांची ग्लिप्टोथेक वास्तू, म्यूनिक (१९ वे शतक).  २.रोममधील व्हॅटिकन म्यूझीयम्समधील पिओ-क्लेमेंटिनो या संग्रहालयातील एम्. सिमोनेट्टी या कलाकाराचे रोटोंडा दालन (१८ वे शतक).
३. एच्. कॉक या कलाकाराने काढलेले रोममधील व्हाल-कॅप्रानिका राजवाड्याच्या दरबार हॉलचे कोरीव चित्र (१६ वे शतक). ४. आमेरिया रिल (तूरिन) या कलाकाराचे गॅलेरिया ब्यूमाँट कलावीथीचे चित्र (१८ वे शतक).
५. रोममधील व्हॅटिकन म्यूझीयम्समधील पिओ-क्लेमेंटिनो संग्रहालयातील पुतळ्यांचे दालन (१८ वे शतक). ६. व्हेनिसजवळील पोसाग्नो येथील जिप्सोटिका संग्रहालयातील एक कलादालन.
फ्लॉरेन्स येथील पालात्झो पिट्टी राजवाड्यातील इलियाड चित्रांचे दालन (१७ वे शतक). सुशोभीकरण : एल्. साबाटेली (१८१९).