स्वयंचालन : ( ऑटोमेशन ). स्वयंचालनात माणसाच्या वा पशूच्या श्रमाऐवजी यंत्रे वापरतात. यंत्र किंवा प्रयुक्ती स्वयंचलित रीतीने किंवा दूरवर्ती नियंत्रणाद्वारे चालवून स्वयंचालनात काम केले जाते. अशा रीतीने निर्णय घेण्याची आवश्यकता असलेली कामे करण्यासाठी स्वयंचालनात यंत्रांचा वापर करतात. स्वयंचालनात इलेट्रॉनीय संगणक व संबंधित सामग्री तसेच रोबॉट यांचाही वापर करतात. अतिशय गुंतागुंतीची, माणसाला धोकादायक ठरू शकणारी, त्याला कंटाळवाणी वाटू शकणारी, परत परत करावी लागणारी, माणसाने केल्यास खर्चिक ठरू शकणारी इ. विविध प्रकारच्या कामांमध्ये स्वयंचालन वापरतात. घरासाठीची तापन ( व वायुवीजन ) प्रणाली हे स्वयंचालनाचे साधे उदाहरण आहे. या प्रणालीतील भट्टी उष्णता पुरविते व तापनियंत्रकाद्वारे घराचे तापमान इष्ट तेवढे राखले जाते. यासाठी तापनियंत्रक भट्टी पेटवितो अथवा विझवितो. मोटारगाडीच्या उत्पादनाच्या प्रक्रियेची साखळी नियंत्रित करणे किंवा कंपनीतील कर्मचारी वर्गाच्या वेतनपटाचे नियंत्रण करणारी संगणकीय व रोबॉटयुक्त जटिल प्रणाली हे स्वयंचालनाचे गुंतागुंतीचे श्रमसाधक उदाहरण आहे. तंत्रविद्या म्हणून उत्पादनापासून ते कारकुनी वा प्रशासकीय कामापर्यंतच्या जवळजवळ माणसाच्या प्रत्येक शारीरिक श्रमाच्या कामात स्वयंचालनाचा उपयोग करता येतो.

कोणत्याही कामाचे पूर्ण वा अंशतः स्वयंचालन बहुधा पुढील बाबींवर आधारलेले असते. दर एकक कालात केलेल्या कामाला उत्पादकता किंवा उत्पादनक्षमता म्हणतात व स्वयंचालनाने उत्पादकता वाढते. एखादे काम पूर्ण करताना स्वयंचालनामुळे कार्यक्षमता वाढते. विद्युत् शक्तीसारख्या कच्च्या मालाच्या प्रमाणाशी कार्यक्षमता व्यस्त प्रमाणात असते. स्वयं-चालनामुळे अंतिम उत्पादन वा प्रक्रियेची गुणवत्ता ( उत्कृष्टतेची मात्रा ) पुष्कळ प्रमाणात वाढते. कामातील माणसाचा थेट हस्तक्षेप किंवा कार्य स्वयंचालनाने काढून टाकल्याने कोणत्याही कामाची सुरक्षितता वाढते. हे खास करून उत्पादन क्षेत्राच्या बाबतीत खरे ठरते. एखाद्या प्रक्रियेची लवचिकता स्वयंचालनाने पुष्कळ वृद्धिंगत होते. कालाच्या एका एककात पूर्ण होणाऱ्या कामांच्या संख्येत वा स्वरूपात बदल घडविण्याची क्षमता म्हणजे लवचिकता होय. यांपैकी प्रत्येक गोष्टीचा काम पूर्ण करण्या-साठी येणाऱ्या खर्चाशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध असतो. कामाचे स्वयंचालन करण्यामागे पुष्कळदा खर्चातील कपात हा मुख्य हेतू असतो. या खर्चातील मुख्य बचतींचा संबंध कामगारांशी असतो. यांमध्ये कामगारांचे पगार, लाभ, प्रशिक्षण इ. गोष्टी येतात.

इतिहास : यूरोपमध्ये औद्योगिकीकरणाच्या काळात (१७५०—१८८०) यांत्रिकीकरण सुरू झाले आणि त्याच्याशी निगडित क्षेत्रांमधून स्वयंचालन तंत्रविद्या उत्क्रांत झाली. मनुष्यबळ व पशुबळ यांऐवजी कोणती तरी यांत्रिक शक्ती वापरणे म्हणजे यांत्रिकीकरण होय. हत्यारे व यांत्रिक प्रयुत्या तयार करण्याची माणसाची प्रवृत्ती असून तिच्यामुळे यांत्रिकीकरणाला प्रेरणा मिळाली.

प्रारंभिक विकास : प्रागैतिहासिक काळातील दगडी हत्यारे हा मानवी बुद्धीच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक बळ वापरण्याचा पहिला प्रयत्न होता. नंतरच्या काही हजार वर्षांत चाक, तरफ, कप्पी इ. साध्या यांत्रिक प्रयुत्या विकसित झाल्या. या प्रयुत्यांमुळे मानवी स्नायूंचे बळ वाढले. पाणचक्की, पवनचक्की, वाफेवर चालणाऱ्या साध्या प्रयुत्या ही शक्तिचालित यंत्रे हा प्रगतीचा पुढील टप्पा असून तो चालविण्यासाठी मनुष्यबळाची गरज नसते. चीनमध्ये २,००० वर्षांहून आधीच्या काळात जादा शक्तीचे विशिष्ट प्रकारचे घण ( ट्रिप हॅमर ) तयार केले होते. तो चालविण्यासाठी वाहते पाणी व पाणचक्की वापरीत. प्राचीन ग्रीकांनी वाफेवर चालणाऱ्या साध्या प्रत्याघात चलित्रावर प्रयोग केले. यूरोपात यांत्रिक घड्याळ सु. १३३५ मध्ये तयार करण्यात आले. यूरोपात व मध्यपूर्वेत आपोआप फिरणारी पाती असलेल्या पवनचया मध्य युगात विकसित झाल्या. शक्तिचालित यंत्रांच्या विकासातील वाफेचे एंजिन हा प्रमुख टप्पा आहे. कारण तेव्हापासून औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. पुढील दोन शतकांत शक्तिचालित यंत्रे व एंजिने बनविण्यात आली. त्यांना वाफ, वीज तसेच रासायनिक, यांत्रिक व अणुकेंद्रीय उर्जा यांपासून शक्ती मिळत असे.

शक्तिचालित यंत्रांच्या प्रगतीमधील प्रत्येक टप्प्याबरोबरच यंत्राची शक्ती संपादन करताना नियंत्रक प्रयुत्यांची गरजही वाढत होती. सर्वांत आधीच्या वाफेच्या एंजिनांतील झडपांची उघडझाप हातांनी करावी लागत असे. सरक झडप यंत्रणेच्या शोधामुळे ही कामे आपोआप होऊ लागली. मात्र एंजिनाची गती व शक्ती नियंत्रित करणाऱ्या वाफेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी माणसाची मदत घ्यावी लागे. जेम्स वॉट यांनी १७८७ मध्ये शोधलेल्या उडत्या गोलक नियंत्रकामुळे वाफ एंजिनाची गती नियंत्रित होऊन ही अडचणही दूर झाली, हा नियंत्रक हे ऋण पुनःप्रदाय नियंत्रक प्रणालीचे उदाहरण आहे. अशा प्रणालीच्या वाढत्या प्रदानाचा उपयोग तिची क्रियाशीलता कमी करण्यासाठी केला जातो. एखाद्या प्रणालीसाठीची स्थिर कार्यकारी पातळी साध्य होण्यासाठी ऋण पुनःप्रदाय स्वयंचलित नियमनाचे साधन व्यापकपणे वापरतात. आधुनिक इमारतींमधील खोलीचे तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारा तापनियंत्रक हा पुनःप्रदाय नियंत्रक प्रणालीचे सामान्य उदाहरण आहे.

विसाव्या शतकात स्वयंचलित नियंत्रणाचा उपयोग अनेक प्रक्रियांमध्ये होऊ लागला. घूर्णीद्वारे नियंत्रित दिशानियंत्रक ( सुकाणू ) प्रणाली प्रथम १९२०—३० या दशकादरम्यान जहाजांत वापरण्यात आली. १९३०—४० या दशकात अशा प्रणाल्या विमानांत नियमितपणे वापरात आल्या. याच सुमारास पुनःप्रदायाने नियंत्रित विवर्धक वापरून दूरध्वनिविद्येतील संदेशांची गुणवत्ता सुधारण्यात आली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून रासायनिक उत्पादनात व खनिज तेल परिष्करणात स्वयंचलित नियंत्रक प्रणाल्या वापरण्यात येत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर (१९३९—४५) स्वयं-चालनाच्या प्रगतीला आणखी चालना मिळाली. रडार व इलेट्रॉनीय सामग्री वापरून स्वयंचलित रीतीने रोखण्यात येणाऱ्या विमानविरोधी तोफा १९४४ मध्ये वापरण्यास सुरुवात झाली.


जकार्ड माग हा स्वयंचालनातील प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. याद्वारे कार्यक्रमणक्षम यंत्राची संकल्पना स्पष्टपणे विशद केली गेली. या स्वयंचलित मागातील छिद्रित पोलादी पत्रे हे आधुनिक स्वयंचलित यंत्रांचे नियंत्रण करणाऱ्या छिद्रयुक्त कागदी पत्रांचे व फितींचे पूर्वसुरी आहेत. यंत्राच्या कार्यक्रमणाची संकल्पना एकोणिसाव्या शतकात चार्ल्स बॅबिज यांनी आणखी विकसित केली. त्यांनी प्रस्तावित केलेल्या ‘ वैश्लेषिक एंजिना ’ द्वारे अंकगणितीय व प्रदत्त-संस्करण केले जाऊ शकले असते. तथापि हे एंजिन पूर्ण रूपात तयार होऊ शकले नाही. अर्थात हे एंजिन आधुनिक संगणकाचे पूर्वसुरी ठरले.

आधुनिक प्रगती : अंकीय संगणक, संगणक कार्यक्रम लिहिण्या-साठीची प्रदत्त साठवण तंत्रविद्या व सॉफ्टवेअर यांतील सुधारणा, संवेदन तंत्रविद्येतील प्रगतीचे टप्पे व गणितीय नियंत्रक सिद्धांताची उपपत्ती हे विसाव्या शतकातील विविध क्षेत्रांमधील प्रगतीचे महत्त्वपूर्ण टप्पे आहेत.  

इलेट्रॉनीय अंकीय संगणकांमुळे स्वयंचालनातील नियामक कार्ये पुष्कळच अधिक सुविकसित झाली आणि त्याच्याशी निगडित आकडेमोड पुष्कळच जलदपणे करता येऊ लागली. १९६०—७० या दशकादरम्यान संकलित मंडले विकसित झाल्याने संगणक तंत्रविद्येमधील लघु-करणाची प्रगती झपाट्याने झाली. यामुळे अधिक लहान व स्वस्त परंतु अधिक जलदपणे काम करणारी यंत्रे उपलब्ध झाली उदा., मोठ्या अंकीय संगणकाची सर्व तार्किक व अंकगणितीय कामे करणारा सूक्ष्मप्रक्रियक पुढे आला.

कार्यक्रम-संग्राहक तंत्रविद्येतही प्रगती होऊन कार्यक्रमण आज्ञावली--संग्राहक म्हणून ती उपयुक्त आहे. चुंबकीय फिती व तबकड्या, चुंबकीय बुद्बुद्स्मृती, लेसरने वाचता येणारा प्रकाशकीय प्रदत्त संग्राहक, व्हिडिओ तबकडी व इलेट्रॉन शलाका-अभिभाषणक्षम स्मृती प्रणाली ही आधुनिक ( प्रदत्त ) संग्राहक माध्यमे आहेत. शिवाय संगणकांच्या कार्यक्रमणाच्या पद्धतींत सुधारणा झाल्या. आधुनिक कार्यक्रमणभाषा वापरायला सोप्या असून प्रदत्त संस्करणात व तार्किक क्षमतांमध्ये त्या अधिक शक्तिशाली आहेत.

संवेदक तंत्रविद्येतील प्रगतीमुळे असंख्य मापन प्रयुत्या उपलब्ध झाल्या आणि त्या स्वयंचलित पुनःप्रदाय नियामक प्रणालींचे घटक म्हणून वापरता येतात. उच्च संवेदनशील विद्युत्-यांत्रिक एषण्या, क्रम-वीक्षक लेसर शलाका, विद्युतीय क्षेत्र तंत्रे व यंत्रदृष्टी या अशा प्रयुत्या आहेत. यांपैकी काहींच्या वापरासाठी संगणकाची गरज असते. भागाचे अभिज्ञान, गुणवत्ता परीक्षण, रोबॉट मार्गदर्शन यांसारख्या औद्योगिक कामांसाठी संवेदन तंत्रविद्या सर्वकामी संवेदी क्षमता म्हणून सिद्ध होत आहेत.

दुसऱ्या महायुद्धानंतर नियंत्रक प्रणालींविषयीचा अतिप्रगत गणितीय सिद्धांत उत्क्रांत झाला आहे. या सिद्धांतात परंपरागत ऋण पुनःप्रदाय नियंत्रण, अनुकूलतम नियंत्रण, अनुकूल नियंत्रण व म संश्लेषित बुद्धिमत्ता यांचा अंतर्भाव आहे.

संश्लेषित बुद्धिमत्ता हे संगणकशास्त्राचे प्रगत क्षेत्र आहे. यात मानवी बुद्धिमत्तेशी सामान्यपणे निगडित असलेली गुणवैशिष्ट्ये दर्शविण्यासाठी संगणकाचे कार्यक्रमण केलेले असते. अध्ययन वा ज्ञानसंपादन क्षमता, भाषेचे आकलन, युक्तिवाद करणे, समस्या सोडविणे, तज्ञ सूक्ष्म तपास व यांसारख्या मानसिक क्षमता ही अशी गुणवैशिष्ट्ये आहेत. संश्लेषित बुद्धिमत्तेविषयीच्या सुधारणांमुळे रोबॉट व इतर ‘बुद्धिमान’ यंत्रांना माणसाशी संवाद साधण्याची क्षमता प्राप्त होईल. तसेच अतिशय उच्च पातळीच्या सूचना स्वीकारण्याची क्षमता त्यांना लाभेल अशी अपेक्षा आहे.

औद्योगिक रोबॉटिस ही स्वयंचालन तंत्रविद्या असून सु. १९६० पासून तिच्याकडे खूप लक्ष दिले जाऊ लागले आहे. १९६१ मध्ये प्रथम उद्योगधंद्यांत रोबॉट वापरला गेला. त्याचे नियंत्रण संगणकामार्फत होत असे व तो मोटारगाडीची जोडणी करणाऱ्या संयंत्रात वापरण्यात आला होता. नंतर असे अनेक रोबॉट इलेट्रॉनीय उद्योगांत तसेच मोटारगाड्या, विमाने, अवजड बांधकाम यंत्रे यांच्या उत्पादनात वापरतात. १९७८—८० या सुमारास यंत्रे चालविण्यासाठी संगणकांचा उपयोग होऊ लागल्याने स्वयंचालनाच्या प्रगतीला मोठी चालना मिळाली.

ऑटोमेशन ( स्वयंचालन ) ही संज्ञा मोटारगाडी उद्योगात १९४६ मध्ये तयार करण्यात आली. यांत्रिकीकृत उत्पादन शृंखलांमधील स्वयंचलित प्रयुत्या व नियंत्रक यांच्या वाढत्या वापराचे वर्णन करण्यासाठी ही संज्ञा तयार केली. तेव्हा फोर्ड मोटार कंपनीत अभियंते-व्यवस्थापक असलेले डी. एस्. हार्डर यांनी ही संज्ञा बनविली, असे मानतात. उत्पा-दनाच्या संदर्भात व्यापकपणे व विविध उत्पादन प्रणालींतही ही संज्ञा वापरतात. या प्रणालींमध्ये मानवी प्रयत्न व बुद्धिमत्ता यांची जागा मोठ्या प्रमाणात यांत्रिक, विद्युतीय व संगणकीकृत क्रिया यांनी घेतली आहे.

स्वयंचालन तंत्रविद्येची प्रगती वाढत्या प्रमाणात संगणक व त्याच्याशी निगडित तंत्रविद्यांवर अवलंबून राहिलेली आहे. परिणामी स्वयंचलित प्रणाली वाढत्या प्रमाणात सुविकसित व जटिल होत आहेत. यांतील प्रगत प्रणालींची क्षमता व कार्यमान उच्च दर्जाचे असून तीच कामे करण्यासाठी लागणाऱ्या मानवी क्षमता व कार्यमान यांच्यापेक्षा स्वयंचालन अनेक प्रकारे अधिक श्रेष्ठ आहे.


स्वयंचालन तंत्रविद्या इतकी प्रगल्भ झाली आहे की, तिच्यामधून अनेक तंत्रविद्या विकसित झाल्या असून त्यांना मान्यता व प्रतिष्ठाही प्राप्त झाली आहे. यांपैकी रोबॉटिस ही स्वयंचालनाची विशेषीकृत शाखाझाली आहे. शक्तिचालित यांत्रिक हात हे आधुनिक औद्योगिक रोबॉटाचे सर्वाधिक नमुनेदार वैशिष्ट्य आहे. उपयुक्त काम करण्यासाठी त्याची क्रमवार हालचाल होईल, अशा रीतीने यांत्रिक हाताचे कार्यक्रमण केलेले असते. उदा., मोटारगाडीच्या जोडणीच्या शृंखलेत तिच्या कायेतील धातूच्या पत्र्यांवर हा हात बिंदू वितळजोडकाम करतो किंवा उत्पादक यंत्रालगत सुटे भाग भरण्याचे वा उचलण्याचे काम करतो. अशा रीतीने कारखान्यातील कामांसाठी कामगारांऐवजी नमुनेदार औद्योगिक रोबॉट वापरतात. [⟶ रोबॉट ].

कार्यपद्धती : स्वयंचलित प्रणालीत संवेदक असतात. यंत्राच्या कामाच्या फलनिष्पत्तींविषयीची माहिती संवेदक गोळा करतात. यंत्राच्या कामावर परिणाम घडवून आणणाऱ्या पर्यावरणीय विशिष्ट परिस्थितीचे संवेदनही संवेदकांना होऊ शकते. संवेदकांनी ‘ वाचलेली ’ माहिती थेटपणे प्रणालीला परत पुरविली जाते.

पुनःप्रदायामुळे स्वयंचालन यांत्रिकीकरणापेक्षा वेगळे आहे उदा., यांत्रिकीकृत औद्योगिक रोबॉटात पुनःप्रदाय वापरला जात नाही. म्हणून या रोबॉटाचे कार्य बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाही. घराच्या स्वयंचलित तापन प्रणालीद्वारे पुनःप्रदायातील मूलभूत घटक विशद करता येतील. आदान व प्रदान वापरून ही प्रणाली एखाद्या खोलीचे तापमान स्थिर ठेवते. आदान म्हणजे तापनियंत्रक इष्ट तापमानाला लावून ठेवणे होय. प्रत्यक्षातील तापमान म्हणजे प्रदान होय. आदानाद्वारे प्रणालीसाठी प्रदान काय असायला हवे ते कळते. प्रदान मोजण्यासाठी स्वयंचलित प्रणालीला संवेदकांची गरज असते. एक तापमापक हा तापन प्रणालीमधील संवेदक असतो. तापमापक खोलीचे तापमान मोजतो. इतर प्रणालींमध्ये संवेदक दाब, आकारमान, वजन यांसारख्या बदलणाऱ्या बाबी मोजतात.

स्वयंचलित प्रणाली तुलनायंत्रामार्फत प्रदानाची तुलना इष्ट प्रदाना-बरोबर करते. तापन प्रणालीतील तापनियंत्रक वा तापस्थापक ( थर्मोस्टॅट ) तुलनायंत्राचे काम करतो. तापमापकातील तापमानाची तुलना तापस्थापक ज्या तापमानाला लावले आहे त्या इष्ट तापमानाबरोबर करतो. प्रणालीचे प्रत्यक्ष प्रदान इष्ट प्रदानापेक्षा भिन्न असल्यास तुलनायंत्र तफावतीविषयीचा संदेश नियंत्रकाकडे ( कंट्रोलरकडे ) पाठविते. प्रदानातील तफावत कशी सुधारायची ते नियंत्रक ठरवितो. तापन प्रणालीतील तापस्थापक हा नियंत्रक व तुलनायंत्र म्हणूनही काम करतो. काही पुनःप्रदाय प्रणालींत संगणक हा नियंत्रक असू शकतो.

स्वयंचलित प्रणालीतील जो भाग पुनःप्रदायाने नियंत्रित होतो व प्रदान बदलतो त्याला प्रक्रिया वा संस्करण म्हणतात. गृहतापन प्रणालीत भट्टी ही प्रक्रिया आहे. खोलीचे तापमान वाढविण्यासाठी तापस्थापक भट्टी प्रज्वलित करतो व खोलीचे तापमान कमी करण्यासाठी तो भट्टी विझवितो. 

कृती करण्यासाठी लागणारा शक्ति-उद्गम, पुनःप्रदाय नियंत्रक व यंत्र-कार्यक्रमण हे स्वयंचलित प्रणालीचे मूलभूत घटक असतात. कोणते तरी कार्य करण्यासाठी स्वयंचलित प्रणाली बनविलेली असते व कार्य करण्यासाठी शक्ती लागते. वीज हा सर्वांत सामान्य शक्तिस्रोत आहे. वीज ही सर्वांत सर्वकामी शक्ती आहे. कारण ती अनेक स्रोतांपासून सहज मिळते. उपयुक्त काम करण्यासाठी ती इतर प्रकारांत ( उदा., यांत्रिक ) सहजपणे परिवर्तित करता येते आणि घटमालांत दीर्घकाळ साठविता येते.

आधुनिक स्वयंचलित प्रणालींमध्ये पुनःप्रदाय नियंत्रणे व्यापकपणे वापरतात. आदान, नियंत्रित होणारे संस्करण, प्रदान, संवेदक, नियंत्रक व कार्यान्वयनकारक हे पुनःप्रदाय नियंत्रण प्रणालीचे मूलभूत घटक वर दिले आहेत.

प्रणालीकडून स्वयंचलित रीतीने साध्य होणाऱ्या क्रियांचा संच कार्यक्रमण केलेल्या सूचनांमार्फत निश्चित होतो. स्वयंचलित प्रणालीने काम करायला हवे व इष्ट फळ साध्य होण्यासाठी तिच्या विविध घटकांनी कसे काम करायला हवे ते कार्यक्रमात नमूद केलेले असते. कार्यक्रमाचा आशय प्रणालीनुसार अगदी भिन्न असू शकतो. सापेक्षतः साध्या प्रणालींत काटेकोर ( नेमया ) क्रियांची संख्या मर्यादित असते, या क्रिया योग्य अनुक्रमाने अखंडपणे परत परत केल्या जातात. अधिक गुंतागुंतीच्या प्रणालींत कार्यक्रमण आज्ञांची संख्या पुष्कळ जास्त असू शकते व प्रत्येक आज्ञेतील तपशिलाची मात्रा ( पातळी ) पुष्कळच जास्त असते. सापेक्षतः सुविकसित प्रणालींत कच्चा माल किंवा इतर परिणामकारक परिस्थिती यांच्यातील बदलानुसार कार्यक्रमातील क्रियांच्या अनुक्रमात बदल होण्याची तरतूद केलेली असते.

प्रमाद ओळखणे व त्यात सुधारणा करणे, सुरक्षेवर नजर ठेवणे, माणसाबरोबरची परस्परक्रिया व इष्टतम संस्करण ही स्वयंचलित प्रणालीत निर्णय घेण्याच्या क्षमतेची तरतूद करण्यामागील प्रमुख कारणे आहेत.

दैनंदिन जीवनातील स्वयंचालन : दैनंदिन जीवनात माणसाला स्वयंचालनाचे अनेक उपयोग होऊ लागले आहेत. औद्योगिक उत्पादनां-शिवाय संदेशवहन, वाहतूक, सेवा उद्योग, ग्राहकोपयोगी उत्पादने यांसारख्या क्षेत्रांमध्ये स्वयंचालनाचे महत्त्वपूर्ण उपयोग होत आहेत. काही महत्त्वाचे उपयोग पुढे दिले आहेत.

संदेशवहन : दूरध्वनिविद्येतील स्विचिंग हा स्वयंचालनाचा एक सर्वांत आधीचा व्यावहारिक उपयोग आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस शोधलेले पहिले स्विचिंग यंत्र हा साधा यांत्रिक स्विच होता. दूरध्वनी संचावरील बटने दाबून किंवा तबकडी फिरवून त्याचे दूरवरून नियंत्रण करीत. आधुनिक दूरध्वनी स्विचिंग प्रणाल्या उच्च सुविकसित अंकीय संगणकांवर आधारलेल्या आहेत. हे संगणक पुढील प्रकारची कामे करतात. हजारो दूरध्वनी तारांवर नजर ठेवतात. कोणत्या तारांना सेवा हवी ते ठरविण्यास लावलेल्या दूरध्वनी क्रमांकातील प्रत्येक अंक स्मृतीत साठवितात. हव्या असलेल्या जोडण्या लावून देतात. ग्राहकाच्या दूरध्वनीवर नाद होण्यासाठी विद्युत् संकेत पाठवितात. दूरध्वनीवर चालू असलेल्या बोलण्यावर नजर ठेवतात व बोलणे झाल्यावर दूरध्वनीची जोडणी तोडतात. सर्वांत नवीन इलेट्रॉनीय प्रणाली या कामांव्यतिरिक्त तबकडी फिरवून पाठविलेल्या संकेतांना प्रतिसाद देऊन ग्राहकांच्या इतर सेवाही हाताळतात. या प्रणाल्या स्वतःच्या कामासंबंधीच्या कार्यविषयक चाचण्या करतात समस्या उद्भवल्यास त्यांचा बारीक तपास करतात व त्या सोडविण्यासाठी तपशीलवार सूचना मुद्रित करतात.


स्थानिक क्षेत्र जालक ( लोकल एरिया नेटवर्क, LAN ), संदेशवहन उपग्रह व स्वयंचलित डाकसंग्राहक यंत्रे हेही स्वयंचालनाचे संदेशवहनातील इतर उपयोग आहेत. स्थानिक क्षेत्र जालके एका इमारतीतील वा इमारतींच्या गटातील स्वयंचलित दूरध्वनी कंपनीप्रमाणे काम करते. ही जालके सर्व-साधारणपणे प्रणालीमधील दोन अग्रांदरम्यान केवळ ध्वनीचे नव्हे तर अंकीय प्रदत्ताचे प्रेषण करू शकतात. खूप मोठ्या अंतरावरील संदेशवाहक दूरध्वनी किंवा दृश्य संकेत धाडण्यासाठी संदेशवहन उपग्रह आवश्यक झाले आहेत. स्वयंचलित मार्गदर्शक प्रणालींशिवाय असे संदेशवहन शय झाले नसते. कारण अशा प्रणालींत उपग्रह आधीच निश्चित केलेल्या कक्षांमध्ये स्थापित ( स्थिर ) केलेले असून त्यांचे स्थान टिकवून ठेवलेले असते. संकेत वाचून गंतव्य स्थानानुसार टपालातील पाकिटांचे प्रकारीकरण करण्यासाठी जगातील अनेक टपाल कार्यालयांत स्वयंचलित टपाल--प्रकारीकरण करणारी यंत्रे विकसित झाली आहेत.

वाहतूक : वाहतूक उद्योगात अनेक प्रकारे स्वयंचालनाचा उपयोग होतो. विमानांच्या सर्व उड्डाणांची परिस्थिती सतत समजत राहावी म्हणून विमान कंपन्या संगणकीकृत आरक्षण प्रणाली वापरतात. तिच्यामुळे दूरदूरच्या ठिकाणी असणाऱ्या तिकीट एजंटांना कोणत्या उड्डाणात किती आसनांची जागा उपलब्ध आहे, याची माहिती काही सेकंदांत मिळते. प्रत्येक उड्डाणाच्या परिस्थितीवरून ही प्रणाली आसनांच्या मागण्यांची तुलना करते व आसने उपलब्ध असल्यास आसनांच्या मागण्या मान्य करते. प्रवाशांना उड्डाणाच्या गंतव्य वेळेच्या आधीच आसन मिळाल्याची खातरजमा होते.

जवळजवळ सर्व व्यापारी विमानात स्वयंचलित वैमानिक ( वा चालक) या उपकरणांची सोय केलेली असते. सामान्य उड्डाण परिस्थितीत ही स्वयंचालन प्रणाली आधी ठरविलेल्या मार्गावर विमानाला मार्गदर्शन करते. घूर्णी व त्यासारख्या उपकरणांवरून विमानाच्या दिक्स्थितीतील व क्षितिजसमांतर दिशेतील बदल ओळखून व विमानाच्या सुकाणू यंत्रणेला योग्य नियामक संकेत पाठवून असे मार्गदर्शन ही प्रणाली करते. स्वयं-चलित मार्गनिर्देशन प्रणाली व उपकरण अवतरण प्रणाली जमिनीवरून शलाकांकडून ( बीकॉनकडून ) येणारे रेडिओ संकेत वापरून काम करते व त्यावरून विमानाला मार्गनिर्देशनासाठी मार्गदिशा पुरविते. विमान जमिनीवरील वाहतूक नियंत्रणाच्या कक्षेत असताना विमानाचे नियंत्रण मानवी वैमानिक हातात घेतो.

अमेरिकेतील बहुजन-संक्रमण प्रणाली हे स्वयंचलित रेल्वे वाहतुकीचे उदाहरण आहे उदा., सॅन फ्रॅन्सिस्को येथील बे एरिया रॅपीड ट्रँझिट ( बीएआरटी ) हा लोहमार्ग. हा लोहमार्ग १२० किमी.पेक्षा लांब आहे. यावरील ३० स्थानकांदरम्यान गर्दीच्या काळात सु. १०० रेल्वे ( आगगाड्या ) धावतात. या रेल्वे कधीकधी ताशी सु. १२८ किमी. गतीने धावतात व दोन रेल्वेंमधील कालांतर ९० सेकंदांएवढे अल्प असते. प्रत्येक रेल्वेत एक चालक ( ऑपरेटर ) असून तो निरीक्षक व संदेशवाहक म्हणून काम करतो आणि आणीबाणीच्या वेळी स्वयंचलित प्रणालीचे काम बंद करतो. दोन रेल्वेंमध्ये हमखास सुरक्षित अंतर राखणे व त्यांच्या गतींचे नियंत्रण करणे ही कामे करून स्वयंचलित प्रणाली रेल्वेंची सुरक्षितता राखते. रेल्वेंची मार्गनिश्चिती नियंत्रित करणे व वेळापत्रकानुसार संपूर्ण प्रणाली चालू ठेवणे यांसाठी प्रत्येक रेल्वेच्या कार्यात जुळवणी करणे हेही स्वयंचलित प्रणालीचे काम असते. [⟶ रेल्वे ]. 

रेल्वे स्थानकात आल्यावर स्वयंचलित रीतीने तिची ओळख ( क्रमांक ), गंतव्य ठिकाण व लांबी प्रेषित करते. अशा रीतीने प्रवाशांच्या माहितीसाठी दर्शक फलक प्रकाशित होतो व ही माहिती नियंत्रण केंद्रांकडे प्रेषित होते. रेल्वेच्या स्थानकात थांबण्याचा कालावधी व पुढील स्थानका-पर्यंत जाण्यासाठी लागणारा कालावधी नियंत्रित करण्यासाठी संकेत स्वयंचलित रीतीने रेल्वेकडे परत प्रेषित होतात. दिवसाच्या सुरुवातीस आदर्श वेळापत्रक ठरवितात, दिवस पुढे जातो तसा प्रत्येक गाडीच्या कार्यमानाची तुलना वेळापत्रकाशी करतात व गरजेनुसार प्रत्येक गाडीच्या कार्यमानात जुळवाजुळव करतात. संपूर्ण प्रणालीचे नियंत्रण एकसारख्या दोन संगणकांमार्फत होते. त्यामुळे एकाचे कार्य चुकल्यास प्रणालीचे पूर्ण नियंत्रण दुसऱ्या संगणकामार्फत होते. संगणकाचे कार्य पूर्णपणे फसल्यावर नियंत्रण प्रणाली परत माणसाच्या नियंत्रणाखाली येते.

अनेक शहरांत सुरळीत रस्ता वाहतुकीसाठी वाहतुकीच्या दिव्यांमध्ये स्वयंचलित यंत्रणेमार्फत समन्वय साधण्यात येतो. जमिनीखालील संवेदक रस्त्यावरील वाहनांची गती व संख्या निश्चित करतात. ही माहिती संगणकाकडे पाठविली जाते. त्या भागातील प्रत्येक वाहतुकीच्या दिव्याचा प्रकाशमान होण्याचा कालावधी कसा निश्चित करायचा ते संगणक ठरवितो व तसे संदेश त्या दिव्यांना पाठवितो.

सेवा उद्योग : आरोग्याची काळजी घेणाऱ्या उद्योगातील सेवा, बँकिंग व इतर आर्थिक सेवा, शासकीय सेवा व किरकोळ विक्री अशा अगदी भिन्न प्रकारच्या सेवा असून त्यांच्यासाठी येणारे अर्जही वैविध्यपूर्ण असतात. या सेवा व अर्ज यांची वर्गवारी करणे हे सेवा उद्योगातील स्वयंचालनाचे काम असते.

आरोग्याची काळजी घेणाऱ्या उद्योगातील सेवा सुधारण्यासाठी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार हलका करण्यासाठी संगणक प्रणालीच्या रूपातील स्वयंचालनाचा वापर नाट्यमय रीतीने वाढला. रुग्णाची स्थिती, केलेली औषधयोजना व इतर प्रसंगोचित माहिती यांची रुग्णा-लयातील प्रत्येक मजल्यावरील संगणकाच्या अग्रांवर नोंद होते. काही प्रणाली इतर जादा कामे करतात. उदा., रुग्णालयातील औषधांच्या दुकानातून औषधांची मागणी नोंदविणे व परिचारिकांना बोलाविणे. परिचारिकेने रुग्णाला पुरविलेल्या सेवेची अधिकृत नोंद ही प्रणाली पुरविते व त्याचा उपयोग करून या सेवा पुरविणारा कर्मचारी आपली पाळी बदलण्याच्या वेळी अहवाल देतो. रुग्णालयातील संगणक प्रणाली त्याच्या व्यापारी कार्यालयाला जोडलेली असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला पुरविलेल्या सेवा व औषधे यांची योग्य रक्कम रुग्णाच्या नावे दाखविता येते.

भावी काळातील आरोग्याची काळजी घेण्याच्या वितरण प्रणालीत रोबॉटिसची मदत घेता येईल. परिचारिका, परिचारक व त्यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांना काही नेहमीची व पुनःपुन्हा करायची कामे करावी लागतात. रोबॉट वापरून पुढील प्रकारची अशी कामे स्वयंचलित रीतीने करता येतील. उदा., बिछाने तयार करणे, रुग्णालयाला वस्तूंचा पुरवठा करणे, अपंगांना मदत करणे, रुग्णांशी संवाद साधणे वगैरे. पुनःपुन्हा करावी लागणारी कामे दीर्घकाळ करीत राहणाऱ्या माणसाला त्याचा कंटाळा येतो. उदा., उत्पादित वस्तूंची जोडणी, परीक्षण व बांधणी करणे यांसारख्या ठराविक क्रमांच्या कामांसाठी स्वयंचलित सामग्री वापरणे सोयीचे ठरते.

बँकिंग व वित्तव्यवस्थापन करणाऱ्या संस्थांनी स्वयंचालन वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आर्थिक व्यवहार संगणक तंत्रविद्येमार्फत होतात. असंख्य दस्तऐवज वा कागदपत्रे व वित्तीय व्यवहार यांच्यावरील संस्करण स्वयंचालनामुळे सोयीस्कर झाले. धनादेशांच्या तळाशी असलेल्या आल्फान्युमरिक ( अक्षरअंकरूपी ) वैशिष्ट्यांचा उपयोग करणाऱ्या प्रकाशकीय वैशिष्ट्ये ओळखणाऱ्या प्रणालींद्वारे धनादेशांची वर्गवारी करतात. जवळजवळ सर्व वित्तीय संस्थांनी उभारलेली संगणक प्रणाली वापरून बँकेतील शिल्लक रक्कम गणित करून काढली जाते व नोंदली जाते. प्रमुख बँकांनी इलेट्रॉनीय बँकिंग प्रणाली प्रस्थापित केली आहे. तिच्यात स्वयंचलित रीतीने पैसे मोजून देणारी ( टेलर ) स्वयंचलित यंत्रे येतात. अनेक ठिकाणी असणारी अशी यंत्रे ( एटीएम ) ग्राहकांच्या दृष्टीने सोयीस्कर आहेत. त्यांच्यामुळे बँकेतील मदतनिसांशिवाय ती वापरणाऱ्या ग्राहकाला आपले मूलभूत व्यवहार करणे शय होते.


अगदी भिन्न प्रकारच्या घटना व माहिती हाताळू शकणाऱ्या टिकर-फिती व बंदिस्त मंडलयुक्त दूरचित्र ( सीसीटीव्ही ) यांच्या मदतीने शेअर बाजार व्यवहारांचा अहवाल पाठविण्यासाठी संगणकयुक्त स्वयंचलित प्रणालींवर अवलंबून राहावे लागते. आपल्या ग्राहकाच्या खात्याचा आढावा घेण्यासाठी दलाली कंपन्या संगणकीकृत अभिलेखपालन ( रेकॉर्डकीपिंग ) प्रणाली वापरतात. प्रत्येक खात्याची परिस्थिती दर्शविणारी मासिक विवरणपत्रे स्वयंचलित रीतीने तयार होतात व इलेट्रॉनीय डाकेद्वारे ग्राहकांकडे  पाठविली जातात.

उधारीपत्रांद्वारे ( क्रेडिट कार्डांद्वारे ) होणाऱ्या व्यवहाराचे उच्च पातळी-वरील स्वयंचालन झाले आहे. उपाहारगृहे, किरकोळ दुकानदार व इतर संघटना ज्या प्रणाली वापरतात त्यांच्यामार्फत उधारीपत्राची व ग्राहकाच्या एकूण उधारीची वैधता काही सेकंदांत म्हणजे व्यवहार पूर्ण होईपर्यंत ग्राहक थांबलेला असतो त्या काळात तपासून पाहिली जाते. काही उधारीपत्रांच्या व्यवहारांत लगेचच विक्रीएवढी रक्कम त्याच्या खात्यातून काढून घेऊन व्यापाऱ्याच्या बँक खात्यात जमा होते.

अनेक  शासकीय  सेवांचे  संगणक  व  संगणकीकृत  प्रदत्तपेढी ( डाटाबेस) यांच्या साहाय्याने स्वयंचालन केले जाते. द इंटरनल रेव्हिन्यू सर्व्हिस ( आयआरएस ) ही अमेरिकन सरकारची सेवा दरवर्षी लक्षावधी करदात्यांची करविषयक विवरणपत्रे तपासते व त्यांना मान्यता देते. याची  सुरुवात १९८५ मध्ये झाली. करविषयक कायदे बदल्यावर त्या वर्षीच्या हिशोबासाठी या प्रणालीचा संगणकीय कार्यक्रम नव्याने तयार करतात. यामुळे या सेवेच्या लेखापरीक्षण खात्याला कर्मचारी न वाढविता वाढलेले काम करणे शक्य होते.

स्वयंचालनामुळे किरकोळ व्यापाराच्या कारभारात अनेक बदल झाले. बहुतेक आधुनिक किरकोळ विक्रीच्या दुकानांत संगणकीकृत प्रणाली उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे विक्रीच्या व्यवहाराची गती वाढली व प्रत्येक वस्तूचा साठा कमी झाल्याने मालाच्या यादीतील नोंदी स्वयं-चलित रीतीने अद्ययावत होतात. या प्रणाली युनिव्हर्सल प्रॉडट कोडवर( यूपीसी) आधारलेल्या असून त्यात स्तंभ संकेत तंत्रविद्या ( बार कोड टेनॉलॉजी ) वापरली आहे. वस्तूच्या आवेष्टनावरील स्तंभ संकेत वाचण्या-साठी प्रकाशकीय क्रमवीक्षक वापरतात. १९७३ मध्ये ही प्रणाली किराणा व्यापाराने स्वीकारली. मालाच्या यादीतील नोंदी अद्ययावत होतानाच विक्रीची नोंद मालाच्या यादीच्या फायलीतही होते, त्यामुळे त्या मालाची मागणी परत नोंदणे शय होते. अशा प्रकारे स्वयंचालनामुळे काम जलदपणे व कमी खर्चात होऊ शकते.

ग्राहकोपयोगी वस्तू व उत्पादने : मोटारगाड्यांपासून ते छोट्या विमानांपर्यंतच्या ग्राहकोपयोगी ( उपभोग्य ) वस्तूंचे ग्राहकाच्या हितासाठी स्वयंचालन केले आहे. लघुतरंगांद्वारे चालणाऱ्या चुली, धुलाई यंत्रे, शुष्कक, प्रशीतक, व्हिडिओ रेकॉर्डर ( दृश्य अभिलेखक ) इ. आधुनिक गृहोपयोगी उपकरणांत नमुनेदार सूक्ष्मप्रक्रियक असतो. तो त्या उपकरणा-साठी संगणक नियंत्रक म्हणून कार्य करतो. वापरणारा गरजेची कामे करण्यासाठी नियंत्रकाचे कार्यक्रमण तयार करून मग उपकरण वापरतो. कालावधी ( चूल, भट्टी, शुष्कक ), शक्ती पातळ्या ( सूक्ष्मतरंग भट्टी ), आदान परिवाह ( व्हिडिओ रेकॉर्डर ) व इतर आवर्ती ( नियतकालिक ) कामे ( धुलाई यंत्र ) ही वापरणाऱ्याच्या गरजेनुसार करून घेता येणारी कामे आहेत. यासाठी असलेल्या बटनांच्या मालिकेतील बटने योग्य क्रमाने दाबून उपकरणाचे कार्यक्रमण केले जाते. यामुळे संगणकासाठीच्या कार्य-क्रमणाच्या कार्यपद्धतीचा विचार करण्याची गरज वापरणाऱ्याला करावी लागत नाही. मोटारगाडी ही उच्च दर्जाचे स्वयंचालन केलेली ग्राहकोपयोगी वस्तू आहे. आधुनिक मोटारगाड्यांत अनेक नमुनेदार सूक्ष्मप्रक्रियक असतात. इंधनाचे नियंत्रण ( इंधन-हवा गुणोत्तर ), घड्याळ, रेडिओ मार्गक्रमण नियंत्रण इ. विविध प्रकारची कामे हे सूक्ष्मप्रक्रियक करतात.

उच्च गतीचे लष्करी विमान शत्रूच्या रडारने ओळखू नये म्हणून कधीकधी कमी उंचीवरून उडवावे लागते. अशा वेळी विमानाची अडथळ्यांशी टक्कर होण्याची शयता असते. हे टाळण्यासाठी स्वयंचलित मार्गदर्शन प्रणाली वापरतात. ती ( मानवी ) वैमानिकापेक्षा पुष्कळच जलद-पणे निर्णय घेते.

माणसाला असुरक्षित असलेल्या जागी स्वयंचालनयुक्त यंत्रसामग्री काम करू शकते. पाण्याखाली उच्च दाब असलेल्या ठिकाणी असलेल्या नळांची दुरुस्ती करण्यासाठी स्वयंचालन प्रणाली वापरता येते. तसेच माणसाला त्रासदायक ठरणारे रंगलेप फवारून मोटारगाड्या रंगविण्याचे काम रोबॉट करू शकतो. शिवाय रोबॉटाचा कार्यक्रम बदलून त्याच्या-कडून भिन्न कामे करून घेता येतात. म्हणजे एकच काम करणाऱ्या अनेक यंत्रांची कामे एकच रोबॉट करू शकतो. यामुळेही वेळ व खर्च यांत बचत होते. कामगारांसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या जागा सुरक्षित करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चातही बचत होते.

स्वयंचालन व समाज : स्वयंचालनाच्या सामाजिक गुणा--वगुणांविषयी कामगार नेते, व्यवसायातील उच्चपदस्थ व्यक्ती, सरकारी अधिकारी, प्राध्यापक इत्यादींनी अनेक वर्षे ऊहापोह केला आहे. रोजगारावरील स्वयंचालनाच्या होणाऱ्या परिणामांविषयी सर्वाधिक मतभेद आहेत. स्वयंचालनाचा उत्पादनक्षमतेवरील परिणाम, आर्थिक स्पर्धा, शिक्षण व मानवी जीवनाची गुणवत्ता हे या संबंधातील इतर महत्त्वाचे मुद्दे आहेत.


व्यक्तीवरील परिणाम : स्वयंचालनाच्या विशेषतः रोबॉटिसच्या जवळजवळ सर्व औद्योगिक आस्थापनांमध्ये मानवी श्रमाची म्हणजे पर्यायाने कामगारांची जागा स्वयंचालन प्रणालीने घेतली जाते. याचा थेट परिणाम म्हणजे कामाच्या ठिकाणांतून कामगार बाहेर पडतात. तथापि रोजगारी व बेकारी यांच्या त्वरेवरील स्वयंचालनाचे दीर्घकालीन परिणाम हा विषय वादग्रस्त आहे. या संबंधातील बहुतेक अभ्यास विवादास्पद व अनिर्णायक आहेत. स्वयंचालनाने कामगारांचा रोजगार गेला हे खरे असले, तरी लोकसंख्येतील वाढ व स्वयंचालनाद्वारे उत्पादित वस्तूंच्या मागणीत झालेली वाढ यांमुळे या हानीची भरपाई झाली आहे. कामगार संघटनांनी आपले विचार मांडले व अनेक कंपन्यांनी पुढील धोरण अवलंबिले. अशा काढून टाकलेल्या कामगारांना इतर कामांसाठी कंपनीतच ठेवले व कदाचित हे करताना त्यांच्या कौशल्याचा दर्जा उंचावला. कंपनीची व एकूणच अर्थव्यवस्थेची वाढ पुरेशा जलद गतीने होत असते, तेव्हा हा युक्तिवाद खरा ठरतो. कारण अशा परिस्थितीत स्वयंचालनामुळे जेवढा रोजगार गमवावा लागला, तेवढ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्माण होऊ शकतो.

कामगारांची जागा यंत्रांनी घेतल्याने वाढत्या स्वयंचालनामुळे बेकारी वाढेल, असे अनेकांना वाटते. तथापि, स्वयंचालनामुळे कमी कौशल्याची कामे कमी होत असली, तरी त्यामुळे उच्च कुशल कामगारांची मागणी वाढते. स्वयंचालन प्रणालीचा अभिकल्प, उभारणी व देखभाल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुशल कामगारांची गरज असते. शिवाय स्वयंचालना-मुळे उत्पादकांना वस्तूची किंमत कमी करणे व विक्री वाढविणे शय होईल आणि विक्री वाढली की रोजगार वाढेल.

औद्योगिक रोबॉटांचा रोजगारावर होणारा परिणाम हा कामगार नेत्यांचा विशेष काळजीचा विषय आहे. एक रोबॉट दोन वा तीन कामगारांची जागा घेतो. मात्र याविरुद्धच्या युक्तिवादानुसार रोबॉटांमुळे अमेरिकेतील कारखान्यांची उत्पादनक्षमता वाढल्याने अशा कंपन्या अधिक स्पर्धात्मक झाल्या व रोजगार परकीय कंपन्यांच्या हाती गेला नाही. रोबॉटिसचा कामगारांवर होणारा परिणाम सापेक्षतः गौण आहे. कारण कामगारांच्या संख्येच्या तुलनेत अमेरिकेतील रोबॉटांची संख्या अत्यल्प आहे. १९९०—९२ या सुमारास अमेरिकेत १ लाखाहून कमी रोबॉट होते व तेव्हा कामगारांची एकूण संख्या दहा कोटी होती आणि यांपैकी २ कोटी कामगार कारखान्यात काम करणारे होते.

स्वयंचालनाचा कामगारांच्या कामाच्या प्रकारांवरही परिणाम होतो. स्वयंचालन वापरणाऱ्या कारखान्यांत श्रमाऐवजी संगणक प्रणाली व सुविकसित कार्यक्रमणक्षम यंत्रे वापरण्याकडे कल असतो. तेथे शारीरिक श्रमापेक्षा ज्ञानाधिष्ठित कामे व तांत्रिक कौशल्य यांच्यावर खूप अधिक भर देतात. आधुनिक कारखान्यांत पुढील प्रकारचे रोजगार असतात : यंत्रांची  जादा देखभाल, सुधारित योजनालेख ( सारणी ) व प्रक्रिया पर्याप्तीकरण, प्रणाली विश्लेषण तसेच संगणक कार्यक्रम तयार करणे व संगणक वापरणे. यांमुळे अशी कामे करण्यासाठी कामगार तंत्रविद्येत निष्णात असावे लागतात. व्यावसायिक व अर्धव्यावसायिक तसेच परंपरागत कामगारांचे  रोजगार यांच्यावर कारखान्यात स्वयंचालनावर भर देण्याच्या प्रवृत्तीचा परिणाम होतो. 

समाजावर होणारे परिणाम : कामगारांमुळे सर्वसाधारण समाजावरही स्वयंचालनाचा परिणाम झाला आहे. उत्पादकता मूलभूत आर्थिक बाब आहे व तिच्यावर स्वयंचालनाचा परिणाम झाला आहे. प्रदान घटकांचे आदान घटकांशी असलेले गुणोत्तर म्हणजे उत्पादकता ही परंपरागत व्याख्या आहे. वाजवी समर्थनीय स्वयंचालन प्रकल्पामुळे उत्पादनाचा दर वाढतो व कामगारांची संख्या घटते, म्हणजेच उत्पादकता वाढते. अनेक वर्षांच्या काळात उत्पादकतेतील अशा लाभामुळे उत्पादनांच्या किमती कमी झाल्या व समाजाची भरभराट झाली.

स्वयंचालन, रोबॉटिस, संगणक प्रणाली व संबंधित तंत्रविद्या यांच्या वापरामुळे शिक्षण व प्रशिक्षण यांच्या संबंधीचे प्रश्न समोर आले. जसे स्वयंचालनाचे प्रमाण वाढले तसे या तंत्रविद्यांचा वापर करण्यासाठी लागणाऱ्या तंत्रविद्येच्या दृष्टीने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टंचाई वाढत गेली. स्वयंचलित प्रणालीच्या नवीन वापराच्या त्वरेवर ( गतीवर ) या टंचाईचा थेट परिणाम झाला. कुशल कामगारांची कमतरता दूर होण्यासाठी व्यावसायिक तंत्रविद्याविषयक प्रशिक्षणाची गरज वाढली. हे विषय शिकविण्याच्या दृष्टीने अर्हताप्राप्त अध्यापकांची शिक्षणक्षेत्रात गरज निर्माण झाली आणि दुर्दैवाने शाळांमध्ये उपलब्ध असलेली प्रयोगशाळेतील सामग्री ( व सुविधा ) नेहमीच उद्योगात नमुनेदारपणे वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्षातील तंत्रविद्येला साजेशी असतेच असे नाही. 

स्वयंचालनाचे फायदे व तोटे : उत्पादनाची उच्चतर त्वरा, उत्पादकतेतील वाढ, द्रव्यांचा अधिक कार्यक्षम वापर, उत्पादित वस्तूची चांगली गुणवत्ता, सुरक्षिततेत झालेली सुधारणा, कामगारांसाठी कमी कालावधीचा आठवडा व कारखान्याच्या वेळेत झालेली घट हे स्वयंचालनाचे सामान्य फायदे आहेत. उच्चतर गुणवत्तेचे उत्पादन व वाढलेली उत्पादकता ही स्वयंचालनाच्या वापराचे समर्थन करणारी दोन मुख्य कारणे आहेत. माणसाच्या चांगल्या कौशल्याद्वारे उच्च गुणवत्ता साध्य होते, असे दावे केले जातात. मात्र स्वयंचलित प्रणाली उत्पादन प्रक्रिया नमुनेदारपणे ( सूचकपणे ) माणसांपेक्षा कमी परिवर्तनशीलतेने कार्य करतात. परिणामी उत्पादित वस्तूच्या गुणवत्तेचे नियंत्रण व मजबुती अधिक प्रमाणात होते. प्रक्रियेच्या वाढलेल्या नियंत्रणामुळे द्रव्य अधिक कार्यक्षम रीतीने वापरले जाऊन टाकाऊ भाग कमी उरतो.

औद्योगिक कार्याचे स्वयंचालन करण्यामागे कामगाराची सुरक्षितता हे महत्त्वाचे कारण आहे. स्वयंचलित प्रणालींमुळे पुष्कळदा कामगाराला काम करण्याच्या ठिकाणातून बाहेर काढले जाते, अशा प्रकारे कामगारांचे कारखान्याच्या परिसरातील धोयांपासून संरक्षण होते. अमेरिकेतील १९७० मधील व्यावसायिक सुरक्षितता व आरोग्य या कायद्यामुळे काम अधिक सुरक्षित झाले व कामगाराच्या शारीरिक हिताचे संरक्षण झाले. कारखान्यातील स्वयंचालन व रोबॉटिस यांचा वापर वाढला.

कामगारांचे कारखान्यातील दर आठवड्यातील कामाचे सरासरी तास कमी होणे हा स्वयंचालनाचा आणखी एक फायदा आहे. १९०० मध्ये आठवड्यातील कामाचे तास ७० होते. हळूहळू हे कमी होत जाऊन अमेरिकेतील प्रमाण आठवड्यातील कामाचे तास सु. ४० झाले. कामाचे तास कमी होण्यामागे यांत्रिकीकरण व स्वयंचालन यांचे योगदान मोठे आहे. अखेरीस स्वयंचालनामुळे कारखान्यात एक नमुनेदार उत्पादनाच्या मागणीसाठी प्रक्रिया पूर्ण होण्यास लागणारा कालावधी सर्वसाधारणपणे कमी झाला.

कामगार कपात हा स्वयंचालनाचा मोठा तोटा असल्याचा उल्लेख वर आला आहेच. अशा कामगाराला काही काळ भावनिक तणावाला सामोरे जावे लागतेच शिवाय काम शोधण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागल्यास तेही या ताणाचे दुसरे कारण होते.

स्वयंचलित सामग्रीचे इतर तोटे पुढे दिले आहेत. स्वयंचालनामधील गुंतवणुकीसाठी जादा भांडवली खर्च करावा लागतो (  स्वयंचलित प्रणालीचा अभिकल्प, जोडणी व उभारणी यांसाठी लक्षावधी रुपये खर्च होऊ शकतात ). हाताने चालविण्याच्या यंत्रापेक्षा स्वयंचालनाकरिता अधिक उच्च दर्जाच्या देखभालीची आवश्यकता असते. तसेच मनुष्यबळावर चालणाऱ्या प्रणालीच्या तुलनेत स्वयंचालनाद्वारे होणाऱ्या संभाव्य उत्पादित वस्तूंच्या संदर्भात लवचिकतेची मात्रा कमी असते. ( अगदी सर्वांत लवचिक स्वयंचालनही माणसांपेक्षा कमी लवचिक असते. कारण माणूस हे सर्वाधिक अष्टपैलू वा सर्वकामी म्हणजे नाना विषयांत निष्णात असलेले यंत्र आहे ).

माणसाच्या सेवेपलीकडे असणाऱ्या स्वयंचालन तंत्रविद्येच्या संभाव्य जोखमी अखेर आवायात येतील. कामगार स्वयंचलित यंत्राचे गुलाम होण्याची शयता, माणसाच्या खाजगी जीवनावर प्रचंड संगणक प्रदत्त जालकांचे आक्रमण होण्याची शयता, तंत्रविद्येच्या व्यवस्थापनातील मानवी चुकीमुळे कोणत्या तरी प्रकारे संस्कृती धोयात येण्याची शयता आणि समाज त्याच्या आर्थिक हितासाठी स्वयंचालनावर अवलंबून राहण्याची शयता या त्या स्वयंचालन तंत्रविद्येच्या संभाव्य जोखमी आहेत.

सदर धोके विचारात न घेता स्वयंचालन तंत्रविद्या शहाणपणाने व प्रभावीपणे वापरल्यास मानवी भवितव्याच्या बाबतीत पुरेशा संधी उपलब्ध होऊ शकतील. पुनःपुन्हा कराव्या लागणाऱ्या ( कंटाळवाण्या ), धोकादायक व नावडत्या अशा सर्व प्रकारच्या कष्टांमधून माणसांची मुक्ती करण्याची संधी स्वयंचालनामुळे मिळेल. शिवाय भावी स्वयंचालन तंत्रविद्यांमार्फत वर्धिष्णू सामाजिक व आर्थिक परिस्थिती उपलब्ध होण्याची संधी मिळेल आणि या परिस्थितीत माणसाला उच्चतर जीवनमान व अधिक चांगली जीवनप्रणाली उपभोगता येईल.

पहा : उपकरण योजना औद्योगिक इलेट्रॉनिकी तंत्रविद्या दूरवर्ती नियंत्रण प्रणाली नियंत्रण प्रणाली मोटारगाडी उद्योग यंत्र-१ यांत्रिक हत्यारे रोबॉट.

संदर्भ : 1. Asfahl, C. R. Robots and Manufacturing Automation, 1992.

           2. Ayres, R. V., etal, Eds., Computer Integrated Manufacturing, 1991-92.

           3. Dorf, R. C. Kusiak, A., Eds., Handbook of Design, Manufacturing and  Automation, 1994.

           4. Groover, M. P. Automation, Production Systems and Computer Integrated Manufacturing, 1991-92.

           5. Sheridan,T. B. Tele Robotics, Automation and Human Supervision Control, 1992.

ठाकूर, अ. ना.