सत्यासत्य शोधक : (लाय डिटेक्टर). एखादी व्यक्तीखरे बोलते आहे की नाही, हे ठरविण्यासाठी या उपकरणाची (साधनाची) मदत होते. याचे लाय डिटेक्टर हे नाव लोकप्रिय असले, तरी फसवे आहे. कारण खोटेपणा इतकाच खरेपणाही प्रस्थापित करण्यासाठी हे वापरतात. यामुळे याला पॉलिग्राफ म्हणजे बहुआलेखक (अथवा बहुपरिवाही लेखक वा चलनवलनलेखक) असेही म्हणतात. व्यक्तीच्या खरेखोटेपणाचे मूल्यमापन करण्यासाठी तिला प्रश्न विचारतात आणि या प्रश्नांना तिच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादांच्या वेळी तिच्या शरीरात घडणाऱ्या काही क्रियांमधील बदलांची या उपकरणात नोंद होते. असे शरीरक्रिया वैज्ञानिक प्रतिसाद बोधनक्षम म्हणजे जाणून घेता येणारे असतात. व्यक्ती खोटे बोलते तेव्हा तिच्या नाडीच्या ठोक्यांची त्वरा, श्वसन, रक्तदाब व स्वेदन (घाम येणे) यांत बदल होऊ शकतात. शरीरक्रियावैज्ञानिक आविष्कारांतील हे बदल या उपकरणाने नोंदले जातात. अशा रीतीने मिळालेली माहिती व्यक्ती खोटे बोलते आहे की नाही, हे ठरविण्यासाठी आधारभूत म्हणून वापरतात. या चाचणीत नोंदण्यासाठी निवडलेले बहुतेक शरीरक्रियावैज्ञानिक आविष्कार मोठया प्रमाणात ऐच्छिक नियंत्रणाखालील नसतात. खोटेपणाप्रमाणेच भीती, आश्चर्य, राग, वेदना, गांगरून जाणे, पेचात पकडले जाणे, अनिश्चितता इत्यादींमुळेही असे बदल होऊ शकतात. याचा अर्थ खोटेपणाशी निगडित असलेला शरीरक्रियावैज्ञानिक प्रतिसाद देणारा एकच एक आविष्कार नाही, म्हणून फसवणूक ओळखण्याच्या या कलेमध्ये तपास करावयाच्या घटनेशी सुसंगत व संयुक्तिक प्रश्नांवरील प्रतिसादांची तुलना नेहमीच्या (नियंत्रित) प्रश्नांवरील प्रतिसादांशी करतात. निर्दोष व्यक्तीला या चाचणीत चुकून दोषी ठरू शकू अशी चिंता वाटू शकते. यामुळे याबाबतीत परीक्षकाचे कौशल्य महत्त्वाचे ठरते. गुन्ह्यातील खऱ्या गोष्टी निर्दोष व्यक्तीला माहीत नसतात उलट दोषी व्यक्तीला गुन्ह्यातील गुप्त गोष्टी आधीच माहीत असतात. चाचणी घेताना या गोष्टी विचारात घेणे गरजेचे असते.

सत्यासत्य चाचणी देणारी व्यक्ती एका खुर्चीत बसून प्रश्नांची उत्तरे देते. तेव्हा हे साधन व्यक्तीच्या हात, पाय इ. एखादया अवयवाला जोडतात. उदा., श्वसनलेखननलिका त्या व्यक्तीच्या छातीभोवती घट्ट बांधतात आणि रक्तदाब व नाडीचे ठोके मोजणारी मनगटपट्टी हाताभोवती आवळून बांधतात. यांव्दारे त्या व्यक्तीच्या नाडीच्या ठोक्यांची त्वरा (हृदयगती), रक्तदाबातील चढ-उतार, उरामधील व वक्षीय श्वसन, तसेच स्वेदन (हाताला घाम येण्याची क्रिया) यांची नोंद आलेखपत्रावर पेनाने रेषा उमटवून सतत होते. आलेखपत्र विद्युत् चलिताव्दारे फिरत असतो. याला संगणकाचीही जोड देतात. पुष्कळदा चाचणी घ्यावयाच्या व्यक्तीवर तयार प्रश्नावलीमधील प्रश्नांचा भडीमार करतात आणि या प्रश्नांच्या ताणामुळे निर्माण झालेल्या मनोभावांची (भावनांची) नोंद होऊन ते समजून घेता येतात. या चाचणीत तपास करावयाच्या बाबींशी निगडित प्रश्न परीक्षक विचारतो. इतर प्रश्न या बाबींशी निगडित नसतात किंवा थोडेच निगडित असतात. या इतर प्रश्नांमुळे चाचणीची अचूकता सुधारते. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सामान्यपणे होय किंवा नाही असे अपेक्षित असते. व्यक्ती खोटे बोलत असल्यास नोंदल्या जात असलेल्या शरीरक्रियावैज्ञानिक क्रियांपैकी एका वा अनेक क्रियांमध्ये झालेले बदल सामान्यपणे आलेखात नोंदले गेलेले आढळतात. खोटे बोलण्यातून आलेल्या व्यक्तीच्या भावनात्मक प्रतिसादांमुळे असे बदल होतात. अशा प्रकारे चाचणीतून मिळालेल्या फलांचा अर्थ परीक्षक लावतात.

गुन्हा, नोकरभरती, व्यक्तिगत सुरक्षा किंवा शासकीय गुप्तता यांविषयीच्या तपासणीसाठी मुख्यतः या तंत्राचे भिन्न प्रकार वापरतात. परीक्षकाची क्षमता व कौशल्य, चाचणी देणाऱ्याची मानसिक जडणघडण, चाचणीचा संदर्भ यांचा चाचणीच्या वैधतेवर व अचूकतेवर परिणाम होऊ शकतो. परिणामी या चाचणीत मानसशास्त्रीय घटक खूप महत्त्वाचे असतात. उदा., विशिष्ट प्रश्नांच्या संदर्भात व्यक्ती खोटे बोलत असल्याचे परीक्षकाकडून सूचित होत असल्यास अशा प्रश्नांना ती व्यक्ती काळजीपोटी तीव्र प्रतिसाद देईल. प्रश्नाच्या अर्थाविषयी परीक्षक व चाचणी देणारा यांच्यात मतैक्य असणे आवश्यक असते. निर्दोष व्यक्तीला या चाचणीमुळे आपली सचोटी सिद्ध होईल, असा विश्वास वाटत असतो.

ध्वनिविचार या विज्ञानशाखेत शब्दोच्चराच्या वेळी निर्माण होणारे विविध ध्वनी व त्यांच्यातील बदल, ध्वनिकंपनांची कंप्रता (दर सेकंदातील कंपनांची संख्या) इत्यादींचा अगदी बारकाईने अभ्यास झाला आहे. ध्वनिविचार यासाठी विविध इलेक्ट्रॉनीय उपकरणेही बनविली आहेत. या विज्ञानशाखेनुसार ध्वनीमधील भावावेगावरून व्यक्तीच्या बोलण्याच्या क्रियेतील (वाचेतील) बदलांमधून माणसाच्या मनोभावांशी निगडित असलेल्या अनेक शरीरक्रियावैज्ञानिक आविष्कारांचा (उदा., सर्वसाधारणपणे श्वसनाची गती, हृदयस्पंदन गती, रक्तदाबातील बदल इत्यादींचा) नीट बोध होऊ शकतो. शब्दोच्चरांतील चढ-उतार, गिळण्याची क्रिया इ. साध्या क्षुल्ल्क सवयींमध्येही व्यक्तीवरील ताणतणावामुळे बदल होऊ शकतात, याचेही बोधन कारणपरत्वे करतात. यातून मिळणारी माहिती गुन्ह्याच्या तपासासाठी वापरता येते. मात्र हे शरीरक्रियावैज्ञानिक आविष्कार स्थल, काल, परिस्थिती यांच्याशी सापेक्ष असतात. म्हणून ही माहिती न्यायालयीन निवाडयासाठी पुष्कळदा गाह्य धरीत नाहीत. तथापि, या चाचणीने विशिष्ट गुन्हेगार खरे बोलतो आहे की खोटे, याचा काही प्रमाणात सुगावा लागतो.

पोलिसांच्या तपासात व चौकशीत हे उपकरण १९२४ सालापासून वापरले जात आहे. मात्र मानसशास्त्रज्ञांमध्ये याच्या वापराबाबत अजूनही मतभेद आहेत. याचे निष्कर्ष न्यायनिवाडयात नेहमीच स्वीकारले जातात असे नाही. अमेरिका, जपान, इझ्राएल व काही यूरोपीय देशांत पोलीस व तपास यंत्रणा याची मदत घेतात. त्यामुळे त्यांना संभाव्य संशयित व्यक्ती एखादया गुन्ह्यात सहभागी असल्याची शक्यता आहे की नाही, हे ठरविता येते. काही देशांत नोकरभरती करताना मालक उमेदवार निवडताना अथवा कर्मचाऱ्यांनी केलेल्या चोरीचा तपास करण्यासाठी याची मदत घेतात. विमानचालक, चलन हाताळणारे बँकेतील कर्मचारी, ज्वालाग्राही व भेदक कण वा किरण बाहेर टाकणारे किरणोत्सर्गी पदार्थ हाताळणारे अधिकारी, मोठया हुदयांवरील सेनाधिकारी इ. महत्त्वाच्या व्यक्तींची निःसंशय सचोटी अजमावण्यासाठी याचा उपयोग करतात.

सत्यासत्य शोधक वापरणारे तज्ञ व या चाचणीचे समर्थक यांच्या मते या चाचण्या खूप अचूक असतात. अमेरिकेतील काही न्यायालयीन खटल्यांचा निवाडा या चाचण्यांच्या आधारे करण्यात आला आहे. संबंधित सर्व व्यक्तींना या चाचण्या आधीच मान्य असल्यास त्यांचा पुरावा म्हणून उपयोग होतो. मात्र अनेक कायदेतज्ञांच्या मते याच्या मदतीने घेतलेली साक्ष वा जबाब न्यायालयात पुरावा म्हणून वापरण्याइतपत अचूक नसतो. फौजदारी खटल्याशी निगडित न्यायाधीश अशी साक्ष पुरावा म्हणून वापरण्यास सहसा परवानगी देत नाहीत. फान्समध्ये ही चाचणी पोलिसांच्या कारवाईच्या दृष्टीने वैध नाही.

चेकोस्लोव्हाकियातील माक्स व्हेर्थायमर यांनी सत्यासत्य शोधक १९०४ साली शोधून काढला. अमेरिकी शास्त्रज्ञ जॉन ए. लार्सन यांनीही आधीच्या काळातील एक सत्यासत्य शोधक तयार केला होता. १९६६ साली अनेक सत्यासत्य शोधक संघटना एकत्र येऊन त्यांनी एक संस्था अमेरिकेत स्थापन केली. ही संस्था या उपकरणाच्या वापरावर लक्ष ठेवते आणि परीक्षकांची अर्हता ठरविते. १९७२ साली ॲलन बेल या संशोधकांनी मानसिक ताणाचे मूल्यमापन करणारे उपकरण शोधून काढले. याच्या मदतीने आवाजातील सूक्ष्म कंप शोधला जातो. या कंपाचा अर्थ लावून व्यक्ती खरे बोलते आहे की नाही, हे ठरविले जाते. मात्र हे उपकरण बिनचूक असल्याचे बहुतेकांना मान्य नाही. त्यांच्या मते सत्यासत्य शोधकाच्या जोडीने हे वापरल्यास उपयुक्त ठरते.

पहा : गुन्हाशोधविज्ञान.

भिडे, शं. गो. ठाकूर, अ. ना.