राव, उडुपि रामचंद्र : (१० मार्च १९३२ – ). भारतीय अवकाशवैज्ञानिक. ⇨विश्वकिरण (बाह्य अवकाशातून सर्व दिशांनी पृथ्वीवर येणारे भेदक किरण), आंतरग्रहीय भौतिकी, क्ष-किरण व गॅमा किरण ज्योतिषशास्त्र, सौर भौतिकी आणि कृत्रिम उपग्रह तंत्रविद्या अशा विविध विषयांत त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केलेले आहे.

राव यांचा जन्म कर्नाटकातील अदमार येथे झाला. मद्रास विद्यापीठाची बी.एस्‌सी. (१९५१) आणि बनारस हिंदू विद्यापीठाची एम्.एस्‌सी. (१९५३) या पदव्या संपादन केल्यावर त्यांनी विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये विश्वकिरणांसंबंधी संशोधन करून १९६० मध्ये गुजरात विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळविली. १९६१ मध्ये ते अमेरिकेतील मॅसॅचूसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत डॉक्टरेट पदव्युत्तर संशोधन अधिछात्र म्हणून गेले आणि तेथे त्यांनी विश्वकिरणांचे विरूपण व सौरवाताचे [⟶ सूर्य] गुणधर्म यांसंबंधी संशोधन केले. त्यानंतर १९६३ मध्ये ते डॅलस येथील साऊथ वेस्ट सेंटर फॉर अँडव्हान्सड स्टडी या संस्थेत साहाय्यक प्राध्यापक झाले व तेथे विश्वकिरणांसंबंधीचे संशोधन त्यांनी पुढे चालू ठेवले. पायोनियर–६,–७,–८ व–९ या दूरावकाशीय अन्वेषक यानांनी आणि एक्स्प्लोअरर –३४ व–४१ या उपग्रहांनी यशस्वीपणे वाहून नेलेल्या विश्वकिरण प्रयोगांत राव यांचा प्रमुख सहभाग होता. त्यांनी आयोजित केलेल्या या प्रयोगांमुळे आंतरग्रहीय भौतिकीसंबंधी शास्त्रज्ञांना पूर्णतः नवीन अंतर्दृष्टी मिळालेली आहे.

उड्डपि रामचंद्र राव

इ. स. १९६६ मध्ये अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत पुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी फुगे, रॉकेट व उपग्रह यांत बसविलेल्या उपकरणांचा उपयोग करून क्ष-किरण व गॅमा किरण ज्योतिषशास्त्रविषयक संशोधन करण्याचा नवीन कार्यक्रम आयोजित केला. त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांच्या साहाय्याने तयार केलेली क्ष किरण उपकरणे ‘आर्यभट’ या पहिल्या भारतीय उपग्रहाबरोबर यशस्वीपणे पाठविण्यात आली. राव यांनी विश्वकिरणांत कालानुसार होणाऱ्या चलनांविषयीच्या (बदलांविषयीच्या), विशेषतः आकाशगंगेतून येणाऱ्या विश्वकिरणांतील दैनंदिन व अर्ध-दैनंदिन चलनांविषयीच्या ज्ञानात महत्त्वाची भर घातली आहे. भूचुंबकीय क्षेत्राच्या सुविकसित प्रतिमानांचा (मॉडेल्सचा) उपयोग करून त्यांनी मांडलेली एक संकल्पना विश्वकिरणांतील चलनांविषयीच्या विवरणात आता सर्वत्र वापरली जाते. आंतरग्रहीय चुंबकीय क्षेत्राची सूक्ष्मरचना समजण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पायोनियर अन्वेषक याने व एक्स्प्लोअरर उपग्रह यांतील खास प्रयोगांची योजना केलेली होती. यामुळे सूर्यापासून निरनिराळ्या अंतरांवरील वेगवेगळ्या अवकाशयानांच्या साहाय्याने केलेल्या विश्वकिरण असमदिक्तेच्या (दिशेनुसार गुणधर्मांत बदल होण्याच्या) निरीक्षणांवरून एकूण आंतरग्रहीय माध्यमाचे स्वरूप स्पष्टपणे समजून येण्यास मदत झाली.

राव यांनी केलेले आणखी महत्त्वाचे कार्य म्हणजे मरिनर – २ या यानाने केलेल्या निरीक्षणांचा उपयोग करून त्यांनी प्रस्थापित केलेले सौरवाताचे अखंडित स्वरूप व त्याचे गुणधर्म हे होय. सौरवातासंबंधीचे प्रचल (दिलेल्या परिस्थितीत अचल राहणाऱ्या पण इतर परिस्थितींत बदलणे शक्य असलेल्या राशी) व पृथ्वीवर निरीक्षिलेले भूचुंबकीय विक्षोभ यांतील अर्थपूर्ण सहसंबंध त्यांनीच प्रथम प्रस्थापित केला आणि अशा प्रकारे सौरवाताची पृथ्वीच्या वातावरणाशी होणारी गतिमान आंतरक्रिया सिद्ध झाली. 

उच्च ऊर्जा ज्योतिषशास्त्रात राव व त्यांच्या सहकाऱ्यांनी फुगे, रॉकेट व उपग्रह यांत बसविलेल्या उपकरणांच्या साहाय्याने पार्श्वभागी व पृथक असलेल्या अशा दोन्ही क्ष-किरण व गॅमा किरण उद्‌गमांच्या सविस्तर गुणधर्माचा शोध घेतला. Sco X -1, Cyg X -1, Her X -1, Cen X -1 व X -2 या क्ष किरण उद्गमांचे सविस्तर वर्णपटीय गुणधर्म Sco X -1या उद्गमाच्या प्रकाशीय व क्ष-किरण उत्सर्जनांतील सहसंबंधाची प्रस्थापना नीच स्तरावरील ⇨आयनांबराचे आयनीभवन (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट यांत रूपांतर) करणारे उद्गम या दृष्टीने खगोलीय क्ष किरण उद्गमांचा असणारा प्रभाव व्याध ताऱ्याजवळील उद्रेकी प्रकारच्या [UV सेटी प्रकारच्या ⟶ तारा] नवीन ताऱ्याचा प्रकाशीय निरीक्षणांवरून शोध वैश्विक पार्श्व गॅमा किरण उत्सर्जनासाठी अनन्य स्वरूपाच्या वर्णपटाची प्रस्थापना ही राव व त्यांच्या सहकाऱ्यांनी उच्च ऊर्जा ज्योतिषशास्त्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीपैकी काही होय.

भारतीय उपग्रह तंत्रविद्या प्रस्थापित करण्याचे महत्कार्य राव यांनीच केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९७५ मध्ये भारताच्या आर्यभट या पहिल्या उपग्रहाचा अभिकल्प (आराखडा) उभारणी व रशियातील अवकाशतळावरून प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर राव व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९७९ मध्ये भास्कर –१ व १९८१ मध्ये भास्कर – २ या दोन दूरवर्ती संवेदनाग्राही उपग्रहांच्या [⟶ संवेदनाग्रहण, दूरवर्ती] आणि जून १९८१ मध्ये अँपल या पहिल्या प्रायोगिक भूस्थिर (ज्याचा पृथ्वीभोवतील प्रदक्षिणाकाल पृथ्वीच्या अक्षीय परिभ्रमणाकालाइतकाच म्हणजे २४ तास असल्याने पृथ्वीवरून स्थिर भासणारा) संदेशवहन उपग्रहाच्या प्रक्षेपणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एस्. एल्. व्ही-३ या रॉकेटाच्या साहाय्याने दोन रोहिणी उपग्रहही यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले.

इनसॅट –१ उपग्रह मालिकेच्या प्रकल्पाकरिता नेमलेल्या मंडळाचे अध्यक्ष या नात्याने राव यांनी प्रकल्पाला एकूण मार्गदर्शन करण्याबरोबरच प्रकल्पाचा सर्व तांत्रिक व इतर आढावा घेण्याची जबाबदारी पार पाडली. इनसॅट –१ उपग्रह प्रणाली ही भूस्थिर बहूद्देशीय संदेशवहन उपग्रहांद्वारे संदेशवहन, दूरचित्रवाणी व वातावरणविज्ञानीय सेवा पुरविणारी पहिली कार्यकारी प्रणाली आहे. त्यानंतरच्या इनसॅट – २ दुसऱ्या पिढीच्या देशीय प्रणालीचा अभिकल्पही राव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. आय्. आर्. एस्. हा पहिला अर्ध-कार्यकारी दूरवर्ती संवेदनाग्राही, ९५० किग्रॅ. वजनाचा व ध्रुवीय कक्षेत फिरणारा उपग्रह राव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात येत आहे. तसेच एस्. आर्. ओ. एस्. एस्. मालिकेतील १५० किग्रॅ. वजनाचे व ए. एस्. एल्. व्ही. रॉकेटाने प्रक्षेपित करावयाचे उपग्रह त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अभिकल्पिले व तयार केले जात आहेत.


राव हे १ ऑक्टोबर १९८४ पासून भारताच्या अवकाश आयोगाचे अध्यक्ष व अवकाश खात्याचे सचिव झाले. याखेरीज ते बंगलोर येथील भारतीय अवकाश संशोधन संघटनेचे अध्यक्ष व हैदराबाद येथील राष्ट्रीय दूरवर्ती संवेदनाग्रहण अधिकरणाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत. इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस व नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थांचे सदस्य म्हणून अनुक्रमे १९६८ मध्ये व १९८७ मध्ये त्यांची निवड झाली. ते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मंडळांचे सदस्य आहेत.

अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स ॲड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनचा गट कामगिरी पुरस्कार (१९७३), रशियाच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय पदक (१९७५), हरि ओम आश्रम प्रेरित विक्रम साराभाई संशोधन पुरस्कार (१९७५), शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (१९७५), इन्स्टिट्यूशन ऑफ एंजिनियर्सचा राष्ट्रीय अभिकल्प पुरस्कार (१९८७), भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार (१९७८), कर्नाटक राज्याचा राज्योत्सव पुरस्कार (१९७५ व १९८३) वगैरे सन्मान त्यांना मिळाले आहेत. यांखेरीज म्हैसूर, राहुरी (कृषी विद्यापीठ), कलकत्ता व मंगलोर येथील विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिलेल्या आहेत. त्यांचे विविध वैज्ञानिक आणि तांत्रिक विषयांवरील सु. १५० संशोधन निबंध निरनिराळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लौकिकाच्या नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले आहेत.

भदे, व. ग.