बॅसिलेसी : सूक्ष्मजंतूंच्या यूबॅक्टेरिएलीझ या गणातील तेरा कुलातील एक कुल. या कुलातील जंतू बहुतांशी ग्रॅम-रंजक-व्यक्त (एच्. सी. जे. ग्रॅम यांच्या रंजकक्रियेने तयार होणारा जांभळटसर रंग अल्कोहॉलाने धुतल्यानंतरही टिकून राहतो असे), काही थोडे ग्रॅम-रंजक अव्यक्त (ग्रॅम यांच्या रंजकक्रियेने तयार होणारा जांभळटसर रंग अल्कोहॉलने धुतल्यानंतर टिकून राहात नाही असे) आणि काही दोन्हीही (परिवर्ती) आहेत. हे दीर्घ शलाकाकार (काडीसारखे) असून त्यांचे वैशिष्ट्य अंतर्बीजाणूंच्या (कोशिकेच्या–पेशीच्या–आत तयार होणाऱ्या प्रजोत्पादक सूक्ष्म घटकांच्या) निर्मितीत आहे. हा बीजाणू कोशिकेत भिन्न ठिकाणी बनतो त्यापासून पुन्हा कोशिका निर्मिली जाते तेव्हा बीजाणचे अंकुरण होते, म्हणजे आवरण फुटून सूक्ष्मजंतू बाहेर येतो. बीजाणूत पाण्याचा अंश कमी असून त्यांची रासायनिक जंतुनाशकांमुळे व उच्चतापमानामुळे हानी होत नाही. काही ९०° से. तापमानाच्या पाण्यात काही वेळाने नाश पावतात, तर काही १००° से. तापमानही सहन करू शकतात.

अंतर्बीजाणा (अ) निर्मितीचे प्रकार : (१) सूक्ष्मजंतू. (२)बीजाणू (आ) अंकुरणाचे प्रकार : (१) बीजाणूचे आवरण, (२) कोशिका.हे सूक्ष्मजंतू चर (गतिशील) अथवा अचर असून चर असल्यास कशाभिकायुक्त (हालचाल करण्यास उपयोगी पडणाऱ्या चाबकाच्या दोरीसारख्या, लांब नाजूक व बारीक जीवद्रवीय–कोशिकेतील अत्यावश्यक जिवंत द्रव्यापासून बनलेल्या–संरचनांनी युक्त) असतात. कशाभिका अनेक व शलाकेभोवती असतात. रंगद्रव्यनिर्मिती क्वचित होते ते जिलेटिनाचे पाचन (रासायनिक रूपांतर) आणि शर्करांचे वायुहीन किण्वन [एंझाइमांद्वारे होणारे रासायनिक अपघटन ⟶ किण्वन] करतात. तसेच काही हवेत किंवा काही हवा नसलेल्या ठिकाणी, तर काही दोन्ही ठिकाणी जगू शकतात. काही उच्च तापमान पसंत करतात. ते बहुतांशी शवोपजीवी असून काही मृत वनस्पतींवर व काही थोडे मानव, इतर प्राणी व कीटक इत्यादीवर जगतात. ते मातीत आढळतात.

वर्गीकरण : या सूक्ष्मजंतूंच्या समावेश पुढील दोन वंशात करतात : (अ)बॅसिलिस : हे सूक्ष्मजंतू ऑक्सिजीवी (ज्यांना जगण्यासाठी मुक्त ऑक्सिजनाची आवश्यकता असते असे) किंवा विकल्पी अनॉक्सिजीवी (ज्यांना जगण्यासाठी मुक्त ऑक्सिजन प्रसंगानुरूप लागतो असे) असून हायड्रोजन पेरॉक्साइडाचे अपघटन करणाऱ्या कॅटॅलेज या एंझाइमाची (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणाऱ्या प्रथिनाची) निर्मिती करणारे आहेत.

(आ)क्लॉस्ट्रिडियम : हे सूक्ष्मजंतू अनॉक्सिजीवी किंवा मुक्त ऑक्सिजनयुक्त हवेत काही मर्यादेपर्यंतच वाढ होऊ शकणारे असून कॅटॅलेजाची निर्मिती करीत नाहीत.

(अ) बॅसिलस : या वंशातील सूक्ष्मजंतू ग्रॅम-रंजकव्यक्त किंवा परिवर्ती व बहुतांशी चर असतात. त्यांना जगण्याकरिता आवश्यक असे तापमान विविध असू शकते. काही जाती उष्णताप्रिय असतात व त्या ७०° से. तापमानावरही जगतात व वाढतात. किण्वनास योग्य अशी शर्करा किंवा नायट्रेट यांचा पुरवठा केल्यास काही जाती अनॉक्सिजीवी परिस्थितीतही वाढू शकतात. त्यांची प्रथिनांवर होणारी विक्रिया आणि शर्करांपासून अम्ल, अम्ल व वायू किंवा ॲसिटोइन (ॲसिटीलमिथिल कार्बिनॉल) तयार करण्याची त्यांची क्षमता यांसारख्या जीवरासायनिक लक्षणांवरून त्यांच्या विविध जाती ओळखता येतात. बीजाणू लंबवर्तुळाकार किंवा गोलाकार असून ते कोशिकांच्या मध्यावर अगर टोकावर आढळतात. ह्या सूक्ष्मजंतूंचा उपयोग कागद, रेशीम, कॉफी व चामड्याच्या व्यवसायात जटिल (गुंतागुंतीची संरचना असलेल्या) पदार्थांचे साध्या पदार्थांच रूपांतर करण्यात होत असला, तरी या पदार्थाच्या तसेच अन्न, लाकूडकाम यांच्या नासाडीसही हे करणीभूत होतात. बॅसिट्रॅसीन व पॉलिमिकिसिने यांसारखे उपयुक्त ⇨ प्रतिजैव पदार्थ (अँटिबायॉटिक्स) यांच्यापासून मिळतात. बहुतांशी जाती शवोपजीवी असून जमीन (माती) पाणी यांत आढळतात. बॅ. अँथ्रेसिस ही जाती मात्र मानवास रोगकारक आहे. काही महत्त्वाच्या जाती खाली दिल्या आहेत :

(१) बॅ. अँथ्रॅसिस : हे ग्रॅम-रंजक-व्यक्त व अचर असून त्यांच्या २ ते ८ शलाका लांब साखळीत असतात. कोशिका आवरणयुक्त असतात. हे मानवाच्या व पशूंच्या सांसर्गिक काळपुळी (अँथ्रॅक्स) या रोगास कारणीभूत असतात. पाळीव पशूंपासून मनुष्यांना संसर्ग होतो हा संसर्ग प्रत्यक्ष अथवा त्याचे मांस, हाडांची पूड, कातडी व केस यांच्याशी झालेल्या संपर्कामुळे होतो. [⟶ काळपुळी, संसर्गजन्य]. (२) बॅ. सब्टिलिस : हे सामान्यतः सर्वत्र धुळीत आढळतात. ते चर व साखळीच्या रूपात असतात आणि बीजाणुनिर्मिती करतात. ते बाजाणू उच्च तापमान सोसून टिकतात. सब्टिलीन व बॅसिट्रॅसीन हे प्रतिजैव पदार्थ यांच्यापासून मिळतात. कार्बनी नायट्रोजन संयुगावर ह्या सूक्ष्मजंतूची क्रिया होऊन संवर्धक माध्यमाला अमोनियाचा वास येतो. (३) बॅ. कोॲग्युलन्स : डबाबंद अन्नाच्या नासाडीस हे कारणीभूत होतात अम्लयुक्त अन्नपदार्थावर (उदा., टोमॅटोवर) यांची वाढ होते. वायू तयार न होता यांची वाढ होत असल्यामुळे अन्नाचा बंद डबा उघडल्याशिवाय ते दिसून येत नाहीत. बीजाणू उच्च तापमानास प्रतिकारक असतात ते विकल्पी अनॉक्सिजीवी असावेत. (४) बॅ. स्टीरोथर्मोफिलस : उच्च तापमानास या जातीला प्रिय असल्याने डबाबंदीकरण व्यवसायातही ती उपद्रवी असते. बीजाणू अति-उच्च तापमान सोसून टिकतात. (५) बॅ. पॉपिलीबॅ. लेंटिमॉर्बस : जपानी भुंगेऱ्‍यांच्या नाशाकरिता काही सूक्ष्मजंतू त्यांच्या अळ्यांना ‘दुग्धधवल’ किंवा श्वेत रोगोत्पादक आहेत असे आढळून आले आहे, म्हणून त्यांच्या (अळ्यांच्या) नाशास हे सूक्ष्मजंतू वापरतात. (६) बॅ. ॲलव्ही : मधमाश्यांच्या अळ्यांच्या ‘फाऊलब्रूड’ नावाच्या विनाशक रोगास हे सूक्ष्मजंतू कारणीभूत आहेत.


(आ) क्लॉरिट्रडियम : या वंशातील जंतू ग्रॅम-रंजक-व्यक्त, अनॉक्सिजीवी व बहुतेक चर असून जटिल कार्बनी पदार्थ त्यांच्या वाढीस आवश्यक असतात. ते शवोपजीवी असून जमिनीत आढळतात. काही उष्णताप्रिय जाती आहे. त्यांच्या रासायनिक विक्रियांमध्ये विविधता आढळते. काही थोड्या धनुर्वात,  अन्नविषबाधा, वायुउत्सर्गी कोथ [⟶ कोथ] इ. रोगांस कारणीभूत आहेत. अळशी व तत्सम काही वनस्पतींची खोडे कुजवून धागा मिळविण्याकरिता ह्या सूक्ष्मजंतूची एक जाती उपयुक्त आहे. काही ब्युटिरिक अम्लनिर्मिती करतात. या वंशातील महत्त्वाच्या जाती पुढीलप्रमाणे जाती पुढीलप्रमाणे आहेत : (१) क्लॉ. टेटॅनी : हा जंतू धनुर्वातास कारणीभूत असतो. याचे बीजाणू कोशिकेच्या टोकावर, फुगीर व बहिर्विष (कोशिकेच्या बाहेर आढळणारे विष) निर्माण करणारे असतात. या विषाचा मनुष्याच्या प्रेरक तंत्रिका केंद्रावर (स्नायूंचे आकुंचन आणि ग्रंथिस्त्रावोत्पादन यांवर नियंत्रण व नियमन करणाऱ्या मज्जासंस्थेच्या केंद्रांवर) परिणाम होतो. ०.०००२५ ग्रॅ. विष मानवाच्या मृत्यूस पुरेसे असते. रोगाचा प्रतिकार प्रतिविष टोचल्याने होतो. [⟶ धनुर्वात]. (२) क्लॉ. परफ्रिंजन्स : हा जंतू वायु-उत्सर्गी कोथ या रोगास कारणीभूत होतो. बीजाणू कोशिकेच्या अर्धमध्यावर असतो जमिनीत आढळतो जखमांवाटे याचा शरीरात शिरकाव होतो. सैनिकांना खोल जखमांवाटे हा रोग होण्याचा संभव असतो. [⟶ कोथ]. (३) क्लॉ. बोट्युलिनम : हा जंतू जमिनीत आढळतो व पूर्णपणे अनॉक्सिजीवी आहे. अन्नविषबाधेस कारणीभूत असतो. बीजाणू उच्च तापमानाचा प्रतिकार करतात. मनुष्य व इतर प्राणी यांच्या शरीरात किंवा अन्नात यांचे बहिर्विष गेल्यास तंत्रिका तंत्रास (मज्जासंस्थेस) विषारी ठरते. [⟶ अन्नविषबाधा]. (४) क्लॉ. ब्युटिरिकम : हा ग्रॅम-परिवर्ती, चर व गोलाकार टोके असलेला शलाकाकृती जंतू जमिनीत आढळतो. हे जंतू कार्बोहायड्रेटांचे किण्वन करतात आणि ब्युटिल, एथिल, अमाइल व प्रोपिल अल्कोहॉले, ॲसिटोन तसेच ॲसिटिक, फॉर्मिक व लॅक्टिक या अम्लांच्या उत्पादनात महत्त्वाचे असतात. किण्वनाची परिस्थिती (उदा., तापमान, पोषक द्रव्ये इ.) व वापरलेला जंतूचा प्रकार यांवर तयार होणारी संयुगे अवलंबून असतात. (५) क्लॉ. ॲसिटोब्युटिलिकम : कार्बोहायड्रेटांच्या ॲसिटोन-ब्युटेनॉल किण्वनात हा चर जंतू उपयुक्त असतो. या किण्वनात ब्युटेनॉल व ॲसिटोन यांच्याबरोबर कमी प्रमाणात ॲसिटिक व ब्युटिरिक ही अम्ले आणि हायड्रोजन व कार्बन-डाय-ऑक्साइड हे वायू तयार होतात. स्टार्च व शर्करा यांपासून मोठ्या प्रमाणावर ॲसिटोन व ब्युटेनॉल तयार करण्याकरिता या सूक्ष्मजंतूंचा उपयोग करतात. (६) क्लॉ. पाश्चारिॲनम : हा जंतू रुतण दलदलीच्या जमिनीत आढळतो. या अनॉक्सिजीवी चर जंतूविषयी एस्. एन्. विनोग्रॅडस्की (१८९५) यांनी संशोधन केलेले असून तो जीवद्रव्याच्या संश्लेषणात (साध्या संयुगांपासून तयार होण्याच्या प्रक्रियेत) नायट्रोजन वायूचे प्रत्यक्ष स्थिरीकरण करतो, असे आढळून आले आहे.

पहा : सूक्ष्मजंतुविज्ञान.  

संदर्भ : 1. Frobisher, M. Fundamentals of Microbiology, Tokyo, 1961.

           2. Salle, A. J. Fundamental Principles of Bacteriology, New York, 1961.

कुलकर्णी, नी. बा. परांडेकर, शं. आ.