ब्रूसेलेसी : सूक्ष्मजंतूंच्या यूबॅक्टेरिएलीझ या गणातील तेरा कुलांपैकी हे एक कुल आहे. या कुलातील सूक्ष्मजंतूंपासून काही जनावरांना, कोंबड्यांना व मानवांना रोग होतात. हे सूक्ष्मजंतू फार लहान (०.१-०.५ X ०.३-१.५ मायक्रॉन १ मायक्रॉन = १०-६ मी.) असून गोल ते शलाका अशा आकाराच्या कक्षेत असतात. त्यांची वाढ ३०° ते ३७° से. तापमानात उत्तम होते. प्रत्येक वंशात कृत्रिम संवर्धनात ते अनेक आकारांचे आढळतात. ते ऑक्सिजीवी (जगण्यासाठी मुक्त ऑक्सिजनाची आवश्यकता असणारे), काहींच्या मते प्रासंगिक अनॉक्सिजीवी, चर(गतिशील) अथवा अचर , ग्रॅम-रंजक-अव्यक्त(एच्. सी. जे. ग्रॅम यांच्या रंजकक्रियेने तयार होणारा जांभऴटसर रंग अल्कोहॉलने धुतल्यानंतर टिकून राहत नाही असे) व नियततापी (पर्यावरणाच्या तापमानात बदल झाला, तरी ज्यांच्या शरीराचे तापमान एका ठराविक पातळीवर स्थिर असते अशा) प्राण्यांवर उपजीविका करतात. रंजकक्रिया दोन्ही टोकांवर आढळते. यांच्यामुळे जिलेटिनाचे द्रवीकरण (पातळ होणे), तसेच कार्बोहायड्रेटांचे त्यापासून अम्लाची निर्मिती होईल असे रूपांतर (किण्वन) काही जातींपासून होते आणि काहींपासून होत नाही.

वर्गीकरण : या कुलामध्ये (१) पाश्चुरेला, (२) ब्रूसेला (३) हीमोफायलस, (४) बॉर्देटिल्ला, (५) ॲक्टिनोबॅसिलस, (६) कॅलिमॅटोबॅक्टिरियम, (७)मोरॅक्सेला व (८) नोगुचिया असे आठ वंश आहेत. त्यांपैकी पाश्चुरेला, ब्रूसेला व हीमोफायलस आणि बॉर्देटिल्ला हे चार वंश महत्त्वाचे आहेत.

(१) पाश्चुरेला : लूई पाश्चर ह्या सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ ह्या वंशाला त्यांचे नाव दिले आहे. यात नऊ जाती आहेत त्या प्रासंगिक अनॉक्सिजीवी आहेत त्यांच्यामुळे मानव, पक्षी व जनावरे यांना रोग होतात ते लंबगोल लघुशलाकेसारखे (०.५ – ३ मायक्रॉन) असून रंजकक्रिया प्रामुख्याने दोन्ही टोकांवर आढळते. उष्णतेमुळे व जंतुनाशकांमुळे ते नाश पावतात तथापि धुळीच्या कणांसमवेत काही काळ राहू शकतात.

पाश्चुरेला ट्युलॅरेन्सिस (तुलारेमियाचे जंतू) : (अ) वाणः री (आ) वाणः रुस.

पाश्चुरेला ट्युलॅरेन्सिस (तुलारेमियाचे जंतू) : (अ) वाणः री (आ) वाणः रुस.

काही महत्त्वाच्या जाती : (अ) पा. पेस्टिस (नवीन वर्गीकरणानुसार यर्सिनिया पेस्टिस) हे अचर सूक्ष्मजंतू मानवाला गाठ उठून होणाऱ्या व फुप्फुसदाहयुक्त (न्यूमोनियायुक्त) प्लेगास कारणीभूत होतात[⟶ प्लेग]. प्रथम या सूक्ष्मजंतूंमुळे घुशींना रोग होतो व तो पिसू ह्या कीटकांमार्फत मानवात फैलावतो. खार व कृंतक गणातील (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांच्या गणातील) इतर प्राणी, ससा इत्यादींनाही संसर्ग होतो.

(आ) पा. ट्युलॅरेन्सिस : हे जंतू अचर व ऑक्सिजीवी असून रानटी जनावरांत पिसू, माश्या व गोचिड यांच्याद्वारे तुलारेमिया हा रोग फैलावतो आणि ससे, गिनीपिग, उंदीर, घुशी, खारी इत्यादींमधून शिकारी, आचारी व खाटीक लोक यांना अचानक थंडी व ज्वर ही प्रारंभिक लक्षणे असलेला हा रोग होतो.

(इ) पा. मल्टोसिडा : यांपासून कोंबड्यांना पटकी रोग होतो. पा. हीमोलिटिकामुळे मेंढ्या व गुरे यांना फुप्फुसदाह होतो.

(२) ब्रूसेला : डेव्हिड ब्रूस या इंग्रज सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञांचे नाव या वंशाला दिले आहे. या वंशातील रोगकारक जातींच्या सूक्ष्मजंतूंमुळे पाळीव जनावरांना रोग होतात तसेच मानवांना ⇨ आंदोलज्वर (माल्टा ज्वर किंवा ब्रूसेलोसिस) हा रोग होतो.


महत्वाच्या जाती : (अ) ब्रू. ॲबॉर्टस : हे अचर तंतू एक एकटे, जोडीने किंवा साखळीसारख्या समूहाने राहतात. या सूक्ष्मजंतूंमुळे गुरांमध्ये संसर्गजन्य गर्भपात घडून येतो. १८९५ मध्ये बी. एल्. एफ्. बांग या डॅनिश शरीरक्रियावैज्ञानिकांनी हे जंतू शोधून काढले व त्यामुळे या रोगास जनावरांचा ‘बांग रोग’ असेही म्हणतात. मानवांना या जंतूपासून आंदोलज्वर हा रोग होतो.

(आ) ब्रू. सुईस : आंदोलज्वराला तसेच रानडुकरांच्या गर्भपातास हे जंतू कारणीभूत असतात गायी व बकऱ्यांनाही रोगबाधा होते.

(इ) ब्रू. मेलिटान्सिस : हे जंतू वरीलप्रमाणे एक एकटे, जोडीने किंवा साखळीच्या स्वरूपात अचर असतात. मानवाचा आंदोलज्वर आणि बकऱ्यांचा  गर्भपात या सूक्ष्मजंतूंमुळे होऊ शकतो. कावळे, रानडुकरे यांनाही रोग होतो सर्व पाळीव प्राण्यांना यांचा संसर्ग होऊ शकतो.

(३) हीमोफायलस : या वंशामधील १५ जातींच्या सूक्ष्मजंतूंपैकी काही रोगोत्पादक व महत्वाचे आहेत. यांच्या वाढीला रक्तातील व्ही (फॉस्फोपिरिडिन न्यूक्लिओटाइड) अथवा एक्स (हेमीन) किंवा दोन्ही घटक आवश्यक असतात. यातील सूक्ष्मजंतू शलाकाकार, अचर, ग्रॅम-रंजक-अव्यक्त व जीवोपजीवी (अन्य जीवांवर उपजीविका करणारे) असतात. यांचे नैसर्गिक स्थान पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांचे नासिकामार्ग, विविध विकारस्थले व स्त्राव यांत असते. यातील महत्त्वाच्या जाती पुढे दिल्या आहेत.

महत्त्वाच्या जाती : (अ) ही इन्फ्ल्यूएंझी : पूर्वी इन्फ्ल्यूएंझा रोग या सूक्ष्मजंतूमुळे होतो अशी समजूत होती परंतु इन्फ्ल्यूएंझा व्हायरसामुळे होतो असे सिद्ध झालेले आहे. हे सूक्ष्मजंतू नाक व घसा यांत आढळतात आणि डांग्या खोकला, गोवर, कांजिण्या, लोहितांग ज्वर इ. रोगांत तेथे गौण किंवा दुय्यम संक्रामक असतात. यांच्या वाढीस रक्तातील एक्स व व्ही हे दोन्ही घटक आवश्यक असतात. यांचा प्रसार नाकातून होणाऱ्या स्त्रावामुळे किंवा त्याकरिता वापरलेल्या कापडामुळे होतो.

(आ) ही. ड्यूक्रेयी : हे सूक्ष्मजंतू ⇨ मृदू रतिव्रण या गुप्तरोगास (संभोगाद्वारे होणाऱ्या रोगास) कारणीभूत असतात. यांच्या वाढीस एक्स घटक आवश्यक असतात. ह्याचे रोगी विशेषतः अमेरिकेच्या द. संयुक्त संस्थानांत आढळतात.

(इ) ही. ईजिप्टियस् : हे अचर एक एकटे किंवा साखळीत असणारे सूक्ष्मजंतू काही नेत्र रोगांस (उदा., डोळे येणे) जबाबदार असतात. अन्य रोग्यांशी संपर्क आल्यामुळे हा रोग होतो. ऑरिओमायसीन, टेरामायसीन, स्ट्रेप्टोमायसीन इ. प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थांचा विकाराच्या जागी लावण्यास उपयोग करतात.

(४) बॉर्देटिल्ला : या वंशातील बॉ. परट्युसिस हे अचर सूक्ष्मजंतू लहान मुलांच्या डांग्या खोकल्यास कारणीभूत होतात [⟶ डांग्या खोकला].

(५) ॲक्टिनोबॅसिलस : हे रोगोत्पादक सूक्ष्मजंतू प्राण्यांना व क्वचित मानवांना रोगकारक आहेत. त्यांची वाढ साध्या संवर्धकावर होते परंतु ते रक्त, रक्तद्रव (रक्त साखळल्यानंतर उरणारा द्रव भाग) आणि कार्बन डाय ऑक्साइडाचा अधिक ताण यांमुळे उद्दीपित होतात ॲ. मॅलीमुळे घोडे व मानव यांना ⇨ शेंबा हा नाकात गाठी व व्रण होणारा रोग होतो नाकातून होणाऱ्या स्त्रावाशी तो संबंधित आहे त्यामुळे हे नाव पडले आहे.

(६) कॅलिमॅटोबॅक्टिरियम : ह्या रोगजंतूंपासून मानवाला एक संभोगजन्य रोग होतो त्यामुळे वंक्षण (जांघेच्या) भागात व क्वचित जननेंद्रियावरही गाठ येते व व्रणही  होतो. त्याला ‘वंक्षण कणार्बुद’ म्हणतात.

(७) मोरॅक्सेला : या वंशातील अचर, ऑक्सिजीवी, रोगकारक सूक्ष्मजंतूंमुळे नेत्रविकार होतात. ते जंतू नियततापी प्राण्यांत आढळतात. ते रुधिरविलयक (रक्त फार पातळ करणारे) असून कार्बोहायड्रेटांचे किण्वन करीत नाहीत.

(८) नोगुचिया : ह्या वंशातील चर सूक्ष्मजंतूंमुळे मानव, माकडे व ससे यांना नेत्रश्लेष्मशोथ (डोळे येणे) हा रोग होतो.

पहा : इन्फ्ल्यूएंझा गर्भपात प्लेग सूक्ष्मजंतुविज्ञान.संदर्भ : 1. Frobisher, M. Fundamentals of Microblology, Tokyo, 1961.2. Salle, A. J. Fundamental Principles of Bacterlology, Tokyo, 1961.

कुलकर्णी, नी. वा. परांडेकर, शं. आ.