लॅक्टोबॅसिलेसी : सूक्ष्मजंतूंच्या यूबॅक्टेरिएलीझ गणातील तेरा कुलांपैकी एक कुल. या कुलातील सूक्ष्मजंतू शलाकाकार (काडीसारखे) किंवा गोलाकार असून मालिकेत असतात. हे बहुतांशी अचर (गतिशील नसलेले), थोड्याच जाती चर असून त्यांच्या कोशिकेच्या (पेशीच्या) सभोवार अनेक कशाभिका (हालचालीस उपयुक्त पडणाऱ्या धाग्यासारख्या वाढी) असतात. ते ग्रॅमरंजक-व्यक्त (एच्. सी. जे. ग्रॅम यांच्या रंजकक्रियेने तयार होणारा जांभळटसर रंग अल्कोहॉलाने धुतल्यानंतरही टिकून राहतो असे), अत्यल्प ऑक्सिजीवी (जगण्यासाठी अत्यल्प मुक्त ऑक्सिजन लागणारे) किंवा अनॉक्सिजीवी (जगण्यासाठी मुक्त ऑक्सिजनाची आवश्यकता नसलेले) आहेत. या सूक्ष्मजंतूंमुळे कार्बोहायड्रेटांच्या होणाऱ्या किण्वनातून (आंबण्याच्या क्रियेतून) प्रामुख्याने लॅक्टिक अम्ल तसेच अल्कोहॉल, इतर कार्बनी अम्ले व कार्बन डाय-ऑक्साइड यांची निर्मिती होते. यांच्यामुळे जिलेटिनाचे द्रवीकरण किंवा नायट्रेटांचे ⇨ क्षपण होत नाही. द्रव सवर्धकांच्या पृष्ठभागावर यांची क्वचितच वाढ होते. हे सूक्ष्मजंतू बहुतांशी मृतोपजीवी (मृत वा कुजणाऱ्या कार्बनी द्रव्यावर उपजीविका करणारे) असून त्यांच्या थोड्या जाती रोगकारक आहेत. यांचे अस्तित्व प्रामुख्याने मानव व इतर प्राण्यांच्या मुखात व आतड्यात, अन्नात, दुग्धपदार्थात आणि फळांच्या वा भाजीपाल्याच्या आंबणाऱ्या रसात आढळते. या कुलात स्ट्रेप्टोकॉकी व लॅक्टोबॅसिली ही दोन उपकुले समाविष्ट आहेत.

स्ट्रेप्टोकॉकी : यातील सूक्ष्मजंतू गोलाकार असून मालिकेत व क्वचित जोडीत आढळतात. द्रव संवर्धकात वाढ झाल्यास मालिका सुस्पष्ट दिसतात. अत्यल्प ऑक्सिजीवी जाती कार्बोहायड्रेटांचे किण्वन करतात. त्यांपैकी समकिण्वनीय (किण्वनाद्वारे पूर्णतः अथवा प्रामुख्याने एकच अंत्य पदार्थ तयार करणाऱ्या) जाती लॅक्टिक अम्ल तयार करतात, तर विषमकिण्वनीय (किण्वनाद्वारे अनेक अंत्य पदार्थ तयार करणाऱ्या) जाती लॅक्टिक व ॲसिटिक अम्ले, अल्कोहॉल व कार्बन डाय-ऑक्साइड निर्माण करतात. अनॉक्सिजीवी जातींमुळे प्रथिनांचे पाचन होऊन कार्बोनिक अम्लाची तर कार्बोहायड्रेटांपासून कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन व इतर पदार्थ यांची निर्मिती होते. यातील जाती मुखात, पचनमार्गात, खाद्य व दुग्ध पदार्थात आढळतात. काही थोड्या जाती रोगकारक आहेत.

वर्गीकरण : वैकल्पिक अनॉक्सिजीवी वा अत्यल्प्-ऑक्सिजीवी  :

(अ) समकिण्वनीय : कार्बोहायड्रेटांपासून लॅक्टिक अमलाव्यतिरिक्त इतर पदार्थांची अल्पांशाने निर्मिती करतात. 

(१) ग्लुकोज शर्करेपासून दक्षिणवलनी [⟶ ध्रुवणमिति] लॅक्टिक अम्लाची निर्मिती करतात.

(क) जोडीत अस्तित्व, रोगकारक, कोशिकांचा पित्तरसात विद्राव होतो.

प्रजाती – (१) डिप्लोकॉकस

जाती-डि. न्यूमोनी : फुफ्फुसाच्या एका अगर अधिक खंडांना होणाऱ्या न्यूमोनियास कारणीभूत. 

(ख) लघू अथवा दीर्घ मालिका, रोगकारक अथवा मृतोपजीवी, कोशिकांचा पित्तरसात विद्राव होत नाही. 

प्रजाती -(२) स्ट्रेप्टोकॉकस

जाती-स्ट्रे लॅक्टिस. 

या प्रजातीत चार शरीरक्रियात्मक गट आढळतात. त्यांपैकी दोन गटांतील जाती अल्पांशाने अम्लोत्पादन करतात आणि त्या पचनमार्गात व संसर्गात आढळतात. बाकीच्या दोन गटांतील जाती उच्च प्रमाणात अम्लोत्पादन करतात आणि त्या खाद्यपदार्थांच्या किण्वनाशी संबंधित आहेत. रक्तरस परीक्षेने [⟶ रक्तरसविज्ञान] हे चारही गट व त्यांतील जाती ओळखता येतात. या प्रजातीतील सूक्ष्मजंतू रक्तमिश्रित संवर्धकार वाढत असताना विविध तऱ्हांचे रक्तविलयन (रक्तातील तांबड्या कोशिकांचे विघटन) घडवून आणतात.

(२) ग्लुकोज शर्करेपासून लॅक्टिक अम्लाचे रॅसेमिक मिश्रण (दक्षिणवलनी व वामवलनी रूपांचे समान प्रमाण असलेले आणि त्यामुळे प्रकाशीय दृष्ट्या अक्रियाशील असलेले मिश्रण) मिळते. स्वतंत्र, जोडीत, लघू मालिकेत अथवा चतुष्कात आढळतात.

प्रजाती -(३) पेडिओकॉकस

यातील जाती बिअर व अन्य किण्वन होणाऱ्या खाद्यपदार्थात आढळतात. स्ट्रेप्टोकॉकी उपकुलातील सर्वाधिक अम्लोत्पादन करणाऱ्या जातींचा या प्रजातीत समावेश होतो. 

(आ) विषमकिण्वनीय : कार्बोहायड्रेटांपासून लॅक्टिक अम्लाव्यतिरिक्त एथिल अल्कोहॉल, ॲसिटिक अम्ल व कार्बन डाय-ऑक्साइड यांची निर्मिती होते.

प्रजाती -(४) ल्युकॉनोस्टॉक

 

या प्रजातीतील जाती सायट्रेट लवणांचे विघटन करून डायॲसिटिलाची निर्मिती करतात. यामुळे अन्नपदार्थांचा स्वाद येतो. इडलीच्या किण्वनात या सूक्ष्मजंतूंचा मोठा सहभाग असतो. साखर कारखान्यातील चिकटसर द्रव्यात हे सूक्ष्मजंतू प्रथम आढळले. हे फ्रुक्टोजाचे मॅनिटॉलामध्ये व सुक्रोजाचे डेक्स्ट्रानात अंशतःरूपांतर करतात. 

पूर्णतः अनॉक्सिजीवी : 

                   प्रजाती -(५) पेप्टोस्ट्रेप्टोकॉकस

या प्रजातीतील जाती कुजणाऱ्या कार्बनी द्रव्यात किंवा कोथयुक्त (शरीर भागाचा मृत्यू होऊन तो सडू लागण्याच्या क्रियेतील) परिस्थितीत अथवा श्वसनमार्गात आढळतात. क्वचित रोगकारक असतात. या सूक्ष्मजंतूंमुळे कार्बोहायड्रेटांपासून लॅक्टिक अम्लाखेरीज कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाइड व निरनिराळी अम्ले निर्माण होतात.

लॅक्टोवॅसिली : यातील सूक्ष्मजंतू सरळ वा वक्र शलाकाकार, तंतुमय किंवा आभासी शाखायुक्त, स्वतंत्र अथवा मालिकेत, बहुधा अचर, चर असल्यास कोशिकेभोवती अनेक कशाभिका, ग्रॅम-रंजकव्यक्त, अत्यल्प ऑक्सिजीवी ते अनॉक्सिजीवी, रोगकारक अथवा मृतोपजीवी असतात. कार्बोहायड्रेटांच्या किण्वनातून फॉर्मिक, ॲसिटिक, प्रोपिऑनिक, ब्युटिरिक आणि लॅक्टिक ही अम्ले, अल्कोहॉल, डायॲसिटिल व कार्बन डाय-ऑक्साइड यांची निर्मिती करतात. हे सूक्ष्मजंतू सवंर्धकावर वाढताना लक्षणीय गंध निर्माण करीत नाहीत. मात्र दूध व अन्नपदार्थात वाढ होताना डायॲसिटिलासारख्या बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणाऱ्या) गंधयुक्त पदार्थाची निर्मिती करून किण्वित पदार्थांना स्वाद प्राप्त करून देतात. आंबलेल्या प्राणिजन्य व वनस्पतिजन्य पदार्थात, मानवाच्या आणि इतर प्राण्यांच्या पचनमार्गात तसेच प्राण्यांच्या जखमांत हे सूक्ष्मजंतू आढळतात.

वर्गीकरण  : अत्यल्प-ऑक्सिजीवी ते अनॉक्सिजीवी

ग्लुकोज शर्करेच्या किण्वनतून लॅक्टिक अम्लोत्पादन किंवा लॅक्टिक व ॲसिटिक अम्ले, अल्कोहॉल व कार्बन डाय-ऑक्साइड यांची निर्मिती.

                      प्रजाती (१) लॅक्टोबॅसिलस. 

या प्रजातीतील जातींत दोन गट आढळतात. काही समकिण्वनीय, तर काही विषमकिण्वनीय आहेत.

 

जाती लॅ. ॲसिडोफिलस, लॅ. बल्गॅरिकस, लॅ. लॅक्टिस, लॅ. थर्मोफिलस, लॅ. केसिआय, लॅ. प्लँटेरम वगैरे. 

लॅ. ॲसिडोफिलस हा मानवाच्या व इतर प्राण्यांच्या आतड्यात नेहमी वास करणारा सूक्ष्मजंतू आरोग्य राखण्यास उपयोगी पडत असल्याने रोगोद्भवानंतर किंवा उपचारानंतर आतड्यात मूळचा प्राकृतिक जंतुसमूह पुन्हा तयार होण्यासाठी लॅ. ॲसिडोफिलसाचा वापर करून तयार केलेल्या दह्याची योजना करण्याचा काही ठिकाणी प्रघात आहे. खास अनुयोजित लॅ. बल्गॅरिकसलॅ. केफिर यांचा अनुक्रमे योगर्ट व केफिर हे दह्यासारखे पदार्थ तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. 

पूर्णतः अनॉक्सिजीवी

           (अ) अचर- (१) कोशिका आभासी शाखायुक्त नसतात. 

                     (क) कोशिका दीर्घ मालिकेत किंवा तंतुमय नसतात.

                                प्रजाती -(२) यूबॅक्टेरियम

                     (ख) कोशिका दीर्घ मालिकेत किंवा तंतुमय असतात.

                             प्रजाती -(३) कॅटेनोबॅक्टेरियम

(२) कोशिका आभासी शाखायुक्त असतात.

               प्रजाती -(४) रॅमिबॅक्टेरियम. 

                (आ) चर-

                                प्रजाती -(५) सिलोबॅक्टेरियम.

लॅक्टोबॅसिलेसी कुलातील सूक्ष्मजंतूंचे महत्त्व : उपयोग : (१) दुग्धपदार्थ : दुधापासून दही, लोणी, चीज व पेये बनविण्यासाठी (२) खाद्यपदार्थ : बेकरी पदार्थांना स्वाद व चव आणण्यासाठी (३) औद्योगिक : अल्कोहॉल, एथिलीन ग्लायकॉल, कृत्रिम रबर यांच्या निर्मितीत (४) इतर : मुरघास (मुरविलेली वैरण) तयार करण्यासाठी तसेच मुरविलेली कोबी (साउरक्राउट), लोणची व मद्य यांना स्वाद आणण्यासाठी (५) या कुलातील काही जाती जीवनसत्त्वे व ॲमिनो अम्ले यांच्या आमापनासाठी उपयुक्त आहेत  [⟶ आमापन, जैव].

उपद्रव : लाणची, मद्ये, फळांचे रस, अन्न व मांस यांच्या नासाडीस या कुलातील काही जाती कारणीभूत होतात. बर्गीज मॅन्युअल ऑफ सिस्टेमॅटिक बॅक्टिरिऑलॉजी (खंड दुसरा १९८६) या ग्रंथातील नवीन वर्गीकरणाप्रमाणे स्ट्रेप्टोकॉकी उपकुलाच्या ग्रॅम-रंजक-व्यक्त कॉकी विभागात (विभाग १२), तर लॅक्टोबॅसिली उपकुलातील प्रजातींचा बीजाणु-असंभवक (सूक्ष्म प्रजोत्पादक घटक तयार न करणाऱ्या) ग्रॅम-रंजक-व्यक्त दंडाणू विभागांत (विभाग १४ व १५) समावेश केलेला आहे. याखेरीज डिप्लोकॉकस प्रजातीचे स्ट्रेप्टोकॉकस प्रजातीत, तर कॅटेनोबॅक्टेरियम, रॅमिबॅक्टेरियमसिलोबॅक्टेरियम या प्रजातींचे यूबॅक्टेरियम या प्रजातीत विलीनीकरण केलेले आहे.

संदर्भ : 1. Frobisher, M. Fundamentals of Microbiology, Tokyo, 1961.

            2. Penerson, C. S. Microbiology of Food Fertmentations, West Port. Conn., 1979.

            3. Salle, A. J. Fundamentals Principles of Bacteriology, New York, 1984.

            4. Sneath, P. H. A. and others, Ed., Bergey’s Manual of Systematic Bacteriology, Vol. 2 Baltimore, 1986.

कुलकर्णी, नी. वा. गोडबोले, श्री. ह.