हॅमिल्टन ऑथॅनेल स्मिथ

स्मिथ, हॅमिल्टन ऑथॅनेल : (२३ ऑगस्ट १९३१). अमेरिकन सूक्ष्मजीववैज्ञानिक. त्यांना १९७८ सालचे वैद्यकाचे अथवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक वेर्नर आर्बर व डॅनियल नाथान्स यांच्याबरोबर विभागून देण्यात आले. स्मिथ यांनी निर्बंधित ( रिस्ट्रिक्शन ) एंझाइमांचा एक नवीन वर्ग शोधून काढला. ही एंझाइमे डीएनए ( डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल ) रेणूमधील न्यूक्लिओटाइडांचा विशिष्ट अनुक्रम ओळखतात आणि ती विशिष्ट ठिकाणी रेणू छेदून त्याचे खंड ( तुकडे ) पाडतात.

स्मिथ यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात व शिक्षण इलिनॉय राज्यातील अरबाना येथील पब्लिक स्कूलमध्ये झाले. त्यांनी बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदवी मिळविली (१९५२). नंतर त्यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसीन येथून एम्.डी. ही पदवी १९५६ मध्ये संपादन केली. त्यांनी डिट्रॉइट येथील हेन्री फोर्ड हॉस्पिटलमध्ये १९५९६२ यांदरम्यान संशोधक म्हणून काम केले. १९६२ मध्ये ते मिशिगन विद्यापीठात अध्यापन व संशोधन करू लागले. १९६७ मध्ये ते जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात परत आले व १९७३ मध्ये तेथे सूक्ष्मजीवविज्ञानाचे प्राध्यापक झाले. २००६ मध्ये स्मिथ हे जे. क्रेग व्हेन्टर इन्स्टिट्यूट या संस्थेतील संश्लेषित जीवविज्ञान आणि जैवऊर्जा संशोधन गटाचे प्रमुख झाले.

वेर्नर आर्बर व इतरांनी रीकाँबिनंट ( पुनःसंयोगी ) एंझाइमांचा अभ्यास केला होता. ही एंझाइमे विशिष्ट डीएनए रेणूमधील न्यूक्लिओटाइडांचा अनुक्रम ओळखत असत; परंतु ही प्रकार I ची एंझाइमे डीएनए रेणूचे अनियत ठिकाणी छेद घेत होते. त्यामुळे या वैज्ञानिकांना भाकीत करता येऊ शकेल अशा ठिकाणी डीएनए रेणूंचे खंड पाडता येत नव्हते. हीमोफायलस इन्फ्ल्यूएंझी हा सूक्ष्मजीव फेज व्हायरस P22 यापासून डीएनए घेऊ शकतो, अशा यंत्रणेचा अभ्यास स्मिथ व त्यांच्या सहकार्‍यांनी केला आणि प्रकार II च्या निर्बंधित एंझाइमांपैकी पहिल्या एंझाइमांचा शोध लावला. या एंझाइमांचे भाकीत करता येऊ शकेल अशा वर्तनामुळे ती डीएनए संरचनेच्या अभ्यासातील व रीकाँबिनंट डीएनए तंत्रविद्येतील महत्त्वाची साधने बनली आहेत. भावी काळात या डीएनए तंत्राचा उपयोग रोगोपचारात होऊ शकेल अशी शक्यता आहे.

द इन्स्टिट्यूट फॉर जीनोमिक्स रिसर्च या संस्थेतील जे. क्रेग व्हेन्टर आणि इतर संशोधकांसोबत स्मिथ यांनी १९९५ मध्ये जलद ‘ शॉटगन ’ अनुक्रम पद्धतीने ही. इन्फ्ल्यूएंझी या सूक्ष्मजीवाच्या संजीनाचा ( जीनोम कोशिकांतील किंवा सजीव प्राण्यातील जनुकांच्या पूर्ण संचाचा ) अनुक्रम शोधून काढला. १९९८ मध्ये स्मिथ यांनी एका खाजगी संशोधन कंपनीला फळमाशी ( ड्रॉसोफिला ) आणि मानवी संजीनाचा अनुक्रम शोधण्यासाठी मदत केली. २००२ मध्ये ते मेरिलंड येथील इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल एनर्जी अल्टरनेटिव्ह्ज या संस्थेचे वैज्ञानिक संचालक झाले. स्वतःचे संरक्षण आणि पुनरुत्पादन करू शकेल अशा एककोशीय सूक्ष्मजीवाची संश्लेषित ( कृत्रिम ) पद्धतीने निर्मिती करण्यासाठी स्मिथ प्रयत्न करीत आहेत. या संशोधनाचा हेतू जिवंत राहण्यासाठी कोणकोणती जनुके अत्यावश्यक असतात यांची निश्चिती करणे हा आहे.

ठाकूर, अ. ना.