स्यूडोमोनेडेसी : हे सूक्ष्मजंतूंच्या स्यूडोमोनेडेली गणातील व स्यूडोमोनेडिनी उपगणामधील एक कुल आहे. या कुलातील सूक्ष्मजंतू ग्रॅम-रंजक-अव्यक्त असून बीजाणुजनक नसतात. त्यांच्या कोशिका शलाकाकार ( काडीसारख्या ) ते लंबगोलाकार असून बहुतांशी चल असतात. त्यांचा व्यास सु. १ म्यूमी. आणि लांबी अनेक म्यूमी. असते (१ म्यूमी. = १० मी.). कशाभिका ( कोशिकेबाहेर आलेल्या जीवद्रव्याचा केसासारखा धागा ) कोशिकांच्या टोकांवर एक किंवा अनेक, लहान वा मोठ्या झुबक्यांत आढळतात. ते बहुतांशी सानिल ( हवेच्या सान्निध्यात जगणारे ) असले, तरी त्यातील काही जाती अननिल ( हवेच्या अभावी जगणारे ) आहेत. त्यांच्यामध्ये प्रकाशसंश्लेषी रंगद्रव्य नसले, तरी पायोसायनीन व फ्ल्यूओरेसीन ही रंगद्रव्ये सामान्यपणे आढळतात. काही जाती प्रकाशजनक आहेत. सामान्यपणे त्या मृदेत अथवा पाण्यात असतात.

महत्त्वाच्या प्रजाती व जाती : (१) स्यूडोमोनस : या प्रजातीतील सूक्ष्मजंतू मृदा व पाण्यात असतात, त्यामुळे ते सर्वत्र आढळतात. काही जाती सेल्युलोजाचे विघटन करतात, तर काही मानव, प्राणी व वनस्पती यांना रोगकारक आहेत. तसेच काही जाती उद्योगधंद्यांतही उपद्रवी आहेत. काही जातींमध्ये रंगद्रव्य निळसर हिरवे अथवा बदामी रंगाचे आढळते. बहुधा ते सानिल असतात, परंतु काही अननिल आहेत.

(अ) स्यू. एरुजिनोझा : ही एक प्रमुख जाती असून तिच्यामुळे जखमेत पू होतो. तसेच बालकांमध्ये हगवण लागते व कोंबड्यांनाही रोग होतो. पॉलिमिक्सी बी व ई यांशिवाय हे सूक्ष्मजंतू इतर प्रतिजैविकांस प्रतिकारक आहेत.

(आ) स्यू. फ्ल्युओरेसेन्स : ह्या सूक्ष्मजंतूंमध्ये हिरवट पिवळे रंगद्रव्य आढळते.

(इ) स्यू. टाबासाय : तंबाखूवरील रोगकारक जाती.

(ई) स्यू. मँजिफेरी : या जातीमुळे आंब्यावर रोग पडतो.

(२) झँथोमोनस : या प्रजातीतील बहुतेक जाती वनस्पतींना रोगकारक आहेत. यांमध्ये पिवळे रंगद्रव्य आढळते व ते पाण्यात विरघळत नाही. या सूक्ष्मजंतूंच्या कोशिकेच्या टोकावर एकच कशाभिका असते.

(अ) झँ. सिट्री : या जातीमुळे कागदी लिंबावर खैरा रोग पडतो.

(आ) झँ. ओरिझी : ही जाती भात पिकासाठी रोगकारक आहे.

(इ) झँ. माल्व्हेसिॲरम : ही जाती कपाशीवरील रोगाला जबाबदार आहे.

(३) ॲसिटोबॅक्टर : या प्रजातीतील सूक्ष्मजंतू एथेनॉलपासून व्हिनेगर व ॲसिटिक अम्लाची निर्मिती करतात.

(४) एरोमोनस : या प्रजातीतील सूक्ष्मजंतू मासे व पाण्यातील इतर प्राण्यांना रोगकारक आहेत.

(५) फोटोबॅक्टिरियम : या प्रजातीतील सूक्ष्मजंतू प्रकाशमान असल्यामुळे अंधारात चमकतात आणि मृत मासे व समुद्रातील प्राण्यांवर वस्ती करतात.

(६) ॲसिटोमोनस : या प्रजातीतील सूक्ष्मजंतू मृदेमध्ये हवेतील नायट्रोजन वायूचे स्थिरीकरण करतात.

(७) झायमोमोनस : या प्रजातीतील सूक्ष्मजंतूमुळे त्वरित साखरेचे किण्वन होऊन १०% अल्कोहॉल बनते त्यामुळे बिअर व पल्कसारखी अल्कोहॉलयुक्त पेय निर्मितीमध्ये त्यांचा उपयोग करतात.

झूग्लोइयाहॅलोबॅक्टिरियम या प्रजाती कमी महत्त्वाच्या आहेत. झूग्लोइया प्रजातीतील सूक्ष्मजंतू वाहितमल व औद्योगिक सांडपाणी यांचे ऑक्सिडीकरण करतात. हॅलोबॅक्टिरियम या प्रजातीतील सूक्ष्मजंतू खार्‍या पाण्यात किंवा खारे मासे व कातडीवर राहून कॅरोटिनॉइड रंग-द्रव्याच्या शेंदरी ते लालसर रंगछटा निर्माण करतात.

पहा : ॲसिटोबॅक्टर सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण.

संदर्भ : 1. Burrows, N. Textbook of Microbiology, London, 1965. 2. Dey, N. C. Medical Bacteriology, Calcutta, 1962.

3. Salle, A. J. Fundamental Principles of Bacteriology, Tokyo, 1961. 4. Stanier, R. Y. Doudoroff, M. Adelberg, E. A. General Microbiology, 1963.

कुलकर्णी, नी. बा.