सूक्ष्मजीव अभिरंजन : सूक्ष्मजीव आकारमानाने अतिशय लहान तसेच पारदर्शक म्हणजे जवळजवळ रंगहीन असल्यामुळे स्पष्टपणे दिसत नाहीत. उच्च विवर्धनक्षमता असलेल्या ⇨ सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेही सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करणे अवघड असते. परिणामी त्यांच्या कोशिकांविषयीची (पेशींविषयीची) माहिती मिळविणे कठिण जाते. त्यामुळे सूक्ष्मजीव स्पष्ट दिसण्यासाठी त्यांच्यावर अभिरंजनाची (रंगीत करण्याची) क्रिया करतात. त्यासाठी अभिरंजक किंवा रंजक द्रव्य वापरतात. यामुळे सूक्ष्मजीवाच्या कोशिकेचा आकार, तिच्यातील घटक व द्रव्ये, तिचे स्वरूप, कशाभिका, कोशिका-आवरण, बीजाणू इत्यादींची माहिती मिळू शकते. ऊतकांचेही (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांचेही) अभिरंजन करतात.

अभिरंजक हे रंगीत कार्बनी संयुग असून त्याला बहुधा रंजक म्हणतात. अभिरंजन केलेल्या पदार्थाला आधार द्रव्य म्हणतात. अभिरंजनामुळे आधार द्रव्याचे निरीक्षण करणे सुलभ होते. कारण अभिरंजनामुळे आधार द्रव्य व त्याच्या सभोवतालचा भाग अथवा एकाच आधार द्रव्याचे भिन्न भाग यांच्यामध्ये प्रकाशकीय दाटपणामध्ये (घनतेत) किंवा प्रकाशाच्या शोषणात भिन्नता वा भेद निर्माण होतात.

इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामध्ये आणि कधीकधी प्रकाशीय सूक्ष्मदर्शकामध्ये (उदा., कोशिका-आवरण किंवा कशाभिका यांच्या अभिरंजनाच्या चांदी संसेचन तंत्रामध्ये) क्रोमियम किंवा सोने यांसारख्या धातूंच्या पराछायादर्शकीय कणांचे आधार द्रव्यावर निक्षेपण करून अभिरंजन पूर्ण केले जाते. यालाच तथाकथित छायानिर्मिती प्रक्रिया म्हणतात. अथवा असे अभिरंजन युरॅनिल ॲसिटेट किंवा फॉस्फोटंगस्टिक अम्ल यासारख्या धातवीय संयुगाच्या विद्रावाचे आधार द्रव्यावर संस्करण करून करतात.

सूक्ष्मजीवांच्या अभिरंजनाचा उपयोग सर्वप्रथम कार्ल वीगर्ट यांनी १८७१ मध्ये केला. त्यानंतर उत्तरोत्तर संशोधन होत जाऊन अभिरंजनाच्या निरनिराळ्या पद्घती पुढे आल्या. सुरुवातीस अभिरंजनासाठी नैसर्गिक रंग वा रंजक वापरीत. कृत्रिम रंग बनविण्यात येऊ लागल्यानंतर नैसर्गिक रंगांचा अभिरंजनातील वापर कमी होत गेला आणि केवळ कृत्रिम रंगच अभिरंजनात वापरले जाऊ लागले. कृत्रिम रंगांना ॲनिलीन अथवा डांबरापासून बनविल्यामुळे कोल टार रंग म्हणतात. हे रंग म्हणजे कार्बनी संयुगे असून त्यांचे मुख्यत्वे अम्लयुक्त व अल्कलीयुक्त असे दोन प्रकार आढळतात. यांपैकी अल्कलीयुक्त रंगच सामान्यतः वापरतात. सूक्ष्मजंतूंच्या कोशिक्रांतील न्यूक्लिइक अम्लाशी अल्कलीयुक्त रंगाचा संयोग होऊन रंग प्रभावी रीतीने बनतो. अम्लयुक्त रंग विशेषतः कोशिकाद्रव्याच्या अभिरंजनासाठी वापरतात. त्यांचे आयनीभवन (विद्युत् भारित अणू, रेणू किंवा अणुगट निर्माण होण्याची क्रिया) होते. त्यामुळे कोशिकेतील रंगगाह्य घटकाला ऋण विद्युत् भार मिळून अभिरंजन होते. याउलट अल्कलीयुक्त रंगामुळे सदर घटकास धन विद्युत् भार मिळून अभिरंजन होते.

रंजकांचे वर्गीकरण : जैव रंजकांचे वर्गीकरण त्यांच्यातील वर्णधारी घटकांनुसार (क्रोमोफोरनुसार) करतात (अनेक कार्बनी संयुगांमध्ये क्रोमोफोर या अणूंच्या मांडणीमुळे संयुगाला रंग आलेला असतो). नायट्रो (उदा., पिक्रिक अम्ल), ॲझो (उदा., भडक पिवळा, कांगो लाल), अँथ्रॅक्विनोन (उदा., ॲलिझरीन), थायाझोल (उदा., टिटॅन पिवळा), क्विनोनिमाझीन [उदा., इंडोफिनॉल, मिथिलीन, नाइट किंवा नाईल निळा, रिसाझुरीन, उदासीन (न्यूट्रॉल) लाल, सॅफ्रानीन, निग्रोसीन] फिनाइट, मिथेन [उदा., तेजस्वी हिरवा, बेसिक (क्षारकीय) फुक्सीन, क्रिस्टल व्हायोलेट (जांभळा)] आणि झँथीन (उदा., पायरोनीन, अम्ल दृढ निळा, इओसीन, क्रेसॉल हिरवा इ.) हे या वर्गीकरणातील रंजकांचे प्रकार आहेत. नीळ, ऑरसीन, लिटमस, ब्राझीलीन इ. नैसर्गिक रंजके होत.

रंजकांचे वर्गीकरण त्यांच्या रेणवीय संरचनेनुसारही करता येते. उदा., फुक्सिने व मिथिल जांभळा यांसारखी ट्रायफिनाइट मिथेन रंगद्रव्ये, नाईल निळ्यासारखी ऑक्झॅझाइन रंगद्रव्ये आणि थायोनीन व मिथिलीन निळा यांसारखी थायाझीन रंगद्रव्ये.

रंजकांचे त्यांच्या रासायनिक वर्तनानुसार अम्लीय, क्षारकीय, उदासीन व तटस्थ असेही वर्गीकरण करता येते. हे वर्गीकरण जीववैज्ञानिकांच्या दृष्टीने अधिक व्यावहारिक मूल्याचे आहे. कांगो लाल वा इओसीन यांसारखे अम्ल रंजक हे बहुधा एखाद्या रंजक अम्लाचे सोडियम किंवा पोटॅशियम लवण असते. मिथिलीन निळा किंवा नाईल निळा हे रंजक अम्लाचे बहुधा क्लोराइड वा सल्फेट लवण असते. मिथिलिनेटाचे इओसिनासारखे उदासीन रंजक हे रंजक अम्लाचे रंजक क्षारकाशी असलेले जटिल लवण असते. सूदान III यासारखे तटस्थ रंजक अल्प रासायनिक क्रियाशीलता असलेले रंजक आहे. सर्वसाधारण ⇨ पीएच मूल्याला कोशिकांचे क्षारकीय रंजकांनी अभिरंजन होते तर कमी पीएच मूल्याला कोशिकांचे अम्लीय रंजकांनी अभिरंजन होते. [→ रंजक, जीवविज्ञानीय].

अभिरंजनाची कार्यपद्घती : सूक्ष्मजीवांचे अभिरंजन बहुधा लेपन द्रव्य (स्मीअर) तयार करण्यापासून होते. जेव्हा आंतरकोशिकीय संबंध जतन करून ठेवायची इच्छा असते, तेव्हा लेपन द्रव्याची जागा सूक्ष्मसंवर्धक घेऊ शकते. साध्या रंजकांच्या बाबतीत लेपन द्रव्य किंवा त्याचा पर्याय हे बहुधा उष्णतेने पक्के वा स्थिर करतात आणि कोणत्या तरी योग्य जैव रंजकाच्या विद्रावाचे त्यावर संस्करण करतात. अधिक गुंतागुंतीच्या कार्यपद्घतीमध्ये लेपन द्रव्य रासायनिक रीतीने पक्के करता येते. त्यासाठी त्यावर रंगबंधकांचे संस्करण, अभिरंजन, अंशतः विरंजन आणि प्रतिअभिरंजन करतात. विशिष्ट कार्यपद्घतीमध्ये अभिरंजनाआधी आधार द्रव्याचे भाग रासायनिक रीतीने काढून टाकतात. हे करताना स्वच्छ काचपट्टी, नुकतेच तयार केलेले रंजकांचे विद्राव आणि सूक्ष्मजीव वाढ होण्याच्या अवस्थेत असलेले असतात.

लेपनाची कृती : सूक्ष्मजीव असणारे द्रव्य काचपट्टीच्या पृष्ठभागावर पसरवितात किंवा लेपाप्रमाणे लावतात. असे द्रवरूप द्रव्य प्लॅटिनमाच्या किंवा एखाद्या योग्य मिश्रधातूच्या वेटोळ्याने (नेढ्याने) पसरवितात. हे वेटोळे लेप करण्याआधी ज्योतीवर तापवून थंड केलेले असते. घनरूप द्रव्य पृष्ठभागावर सरळ पसरवितात वा लावतात. अथवा घनरूप द्रव्याचे पाणी किंवा इतर द्रवात निलंबन करून असे थेंबभर निलंबन काचपट्टीवर पसरवितात. अशा रीतीने तयार झालेले पटल हवेत सुकू देतात. नंतर पटलाची बाजू वर ठेवून काचपट्टी बन्सन (बुन्सेन) ज्वालकाच्या ज्योतीवरून तीन वा चार वेळा नेऊन पटल पक्के करतात. काही कोशिकावैज्ञानिक कार्यपद्घतींत रासायनिक दृष्ट्या पटल पक्के वा स्थिर करणे गरजेचे असते. थंड केल्यावर पटलाचे अभिरंजन होते. नंतर काचपट्टीचे परीक्षण करतात.

साधी रंजके : या कार्यपद्घतीत लेपन द्रव्य किंवा आधार द्रव्य यांचे अभिरंजन रंजकाच्या विद्रावाने ठराविक कालावधीपर्यंत करतात, पाण्याने धुतात, हवेने सुकवितात व परीक्षण करतात. रंजकाचा विद्राव पाण्यात करतात. कित्येकदा रंजके पाण्यात विरघळत नाहीत. अशा वेळी रंजक प्रथम थोड्याशा एथिल अल्कोहॉलात विरघळवून नंतर पाणी घालून तयार केलेला सौम्य विद्राव वापरतात. तीव्र विद्रावाने अभिरंजन चांगले होत नाही. कित्येक वेळा रंग पक्के बसविण्यासाठी रंजकात किंवा अभिरंजनात रंगबंधके वापरतात. रंगबंधक स्वतंत्रपणे किंवा रंजकाच्या विद्रावात मिसळून वापरतात. अमोनियम ऑक्झॅलेट, टॅनिक अम्ल, आयोडीन इ. रंगबंधके ग्रॅम किंवा अम्ल-दृढ अभिरंजनामध्ये वापरतात.


साध्या अभिरंजनासाठी पुढील विद्राव सर्वांत व्यापकपणे वापरले जातात : (१) लफ्लर मिथिलीन निळा या विद्रावात ३० मिलि. ९५% एथिल अल्कोहॉलात ०·३ ग्रॅम मिथिलीन निळा रंजक असून हा विद्राव ०·०१ % पोटॅशियम हायड्रॉक्साइडाच्या १०० मिलि.मध्ये मिसळतात. (२) त्सील-नेल्सन कार्‌बॉल फुक्सीन हा १० मिलि. ९५% एथिल अल्कोहॉलातील ०·३ ग्रॅ. क्षारकीय फुक्सिने असलेला विद्राव असून तो शुद्घ (ऊर्ध्वपातित) पाण्याच्या ९५ मिलि.मध्ये ५ ग्रॅ. फिनॉल असलेल्या विद्रावात मिसळतात. (३) २० मिलि. ९५% एथिल अल्कोहॉलात ०·२ ग्रॅ. स्फटिक जांभळा हे रंजक असलेला विद्राव आणि ८० मिलि. शुद्घ पाण्यात ०·८ ग्रॅ. अमोनियम ऑक्झॅलेट असलेला विद्राव मिसळून हुकर स्फटिक जांभळा हा विद्राव तयार करतात.

जटिल अभिरंजन कार्यपद्घती : यांमध्ये कशाभिका व कोशिका-आवरण अभिरंजन कार्यपद्घती येतात. या दोन्हींमध्ये खास रंगबंधकांचा वापर करतात. यांतील आधार द्रव्याची घनता वाढविण्यासाठी व त्यांची रंजकाविषयीची आसक्ती वाढविण्यासाठी हे रंगबंधक वापरतात. यामुळे प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाखाली विभेदित होणाऱ्या पल्ल्यापर्यंत कशाभिकांची जाडीही वाढते. कशाभिका व कोशिका-आवरण या दोन्ही संरचनांचे निदर्शन करणाऱ्या अनेक कार्यपद्घती आहेत. लेपन करताना कशाभिका या नाजूक संरचना नष्ट होण्यास प्रतिबंध करण्यासाठी बहुतेक कशाभिका अभिरंजन कार्यपद्घतींत पूर्वदक्षता घेण्याची शिफारस करतात.

प्रकलीय अभिरंजन : बहुतेक प्रकलीय अभिरंजने न्यूक्लिइक अम्लांच्या अभिरंजनविषयक गुणधर्मांवर आधारलेली असतात. अनेक जीवांमध्ये व विशेषतः सूक्ष्मजंतूंमध्ये कोशिकाद्रव्य हे रिबोन्यूक्लिइक अम्लाने (आरएनए याने) संपन्न असते. परिणामी तरुण व परिपक्व संवर्धकांतील संपूर्ण कोशिकेची अभिरंजन होण्याची प्रवृत्ती ही प्रकलासारखी (कोशिकेच्या केंद्रकासारखी) असते. त्यामुळे बहुतेक प्रकलीय अभिरंजनांमध्ये पुढील एक टप्पा असतो. या टप्प्यात आरएनए काढून टाकतात अथवा नायट्रोजनाचा पुरवठा अपुरा असलेल्या माध्यमात सूक्ष्मजंतू वाढवितात. कारण नायट्रोजन पुरेसा नसल्याने आरएनएच्या संश्लेषणाला प्रतिबंध होतो.

रिबोन्यूक्लिएज हे ⇨ एंझाइम  किंवा तीव्र खनिज अम्ल याचे संस्करण करून आरएनए काढून टाकता येते. हे संस्करण व्यापक प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या फ्यूएलगेन विक्रियेचा व HCl (हायड्रोक्लोरिक अम्ल)-गीम्सा अभिरंजनाचा आधार आहे. या दोन्ही पद्घतींमध्ये स्थिर वा पक्के केलेले लेपन सममूल्य (सामान्य) हायड्रोक्लोरिक अम्लात बहुधा ६० तापमानाला सु. १० मिनिटे ठेवतात. फ्यूएलगेन कार्यपद्घतीत या क्रियेनंतर लेपन क्षारकीय फुक्सिनामध्ये अनेक तास ठेवतात. या फुक्सिनाचे सोडियम किंवा पोटॅशियम मेटाबायसल्फाइटाने विरंजन केलेले असते. रंगहीन कोशिकेत प्रकले जांभळी वा नीललोहित दिसतात. 

HCl-ग्रीम्सा पद्घतीत सौम्य गीम्सा रंजकाने लेपनाचे अभिरंजन करतात. या रंजकाच्या साठ्यातील विद्रावांमध्ये मुख्यतः मिथिल अल्कोहॉल व ग्लिसरॉल यांच्या मिश्रणात विरघळविलेली मिथिलीन ॲझ्यूर व मिथिलीन निळा (ब्ल्यू) यांची इओसिनेटे असतात. हे कोशिकाविज्ञानातील मौल्यवान रंजक आहे. कारण विशिष्ट कोशिकांनी शोषले असता याचा भासमान रंग बदलतो, अशा रंजकाला परारंजक म्हणतात.

भेददर्शी अभिरंजने : या प्रकारच्या अभिरंजनामुळे आधार द्रव्य व त्याची पोर्श्वभूमी यांच्यातील किंवा एकाच आधार द्रव्याच्या भिन्न भागांमधील रंगांमधील भेद समोर येतात. तसेच या पद्घतीने सूक्ष्मजंतूंचे निरनिराळे प्रकार ओळखता येतात. ही पद्घती परारंजक रंगद्रव्याने साधे अभिरंजन करून साध्य होऊ शकते. उदा., नाईल निळा या रंजकाने उदासीन वसा थेंबांना तांबडा तर उर्वरित कोशिकेला निळा रंग येतो. या पद्घतीत अम्ले, क्षारके, उदासीन विद्रावक (विरघळविणारे पदार्थ) किंवा इतर काही कारक यांच्याद्वारे नियंत्रित विरंजन वा भिन्नीभवन करण्याची गरज असू शकते. भेददर्शी अभिरंजनांचे काही प्रकार पुढे दिले आहेत.

ग्रॅम अभिरंजन पद्घती : ही पद्घती हान्स क्रिस्त्यान योआकिम ग्रॅम यांनी १८८४ मध्ये शोधून काढली. वनस्पतीच्या ऊतकावर जेन्शन जांभळा (व्हायोलेट) या रंजकाने अभिरंजन करून त्यावर आयोडिनाचा विद्राव टाकून अल्कोहॉलाने धुतल्यास ऊतकातील कोशिकांचा रंग धुतला जातो मात्र त्यातील काही सूक्ष्मजंतूंच्या कोशिकांचा रंग पक्का होतो. या कल्पनेच्या आधारे ग्रॅम यांनी अनेक सूक्ष्मजंतूंवर प्रयोग केले. अल्कोहॉलाने धुतल्यावरही काही जंतूंमध्ये जेन्शन जांभळा रंग टिकून राहतो परंतु इतर सूक्ष्मजंतूंमध्ये अशी क्षमता नसते, असे त्यांना आढळले. यावरून सूक्ष्मजंतूंमध्ये पुढील दोन प्रकार असल्याचे सिद्घ झाले. जेन्शन जांभळा रंग टिकवून ठेवणाऱ्या सूक्ष्मजंतूंना ग्रॅम रंजक व्यक्त व इतरांना ग्रॅम रंजक अव्यक्त अशी नावे देण्यात आली. ग्रॅम यांच्या मूळ पद्घतीत अनेक संशोधकांनी निरनिराळे फेरफार केले असून यातून वेगवेगळ्या ग्रॅम अभिरंजन पद्घती पुढे आल्या आहेत. उदा., कोपेलॉफ-बीर्मन पद्घती.

अम्ल अभिरंजन पद्घती : पॉल अर्लिक यांनी ही पद्घती १८८२ मध्ये शोधून काढली. काही सूक्ष्मजंतू सरल अभिरंजनाने रंगविल्यास नीटपणे रंग घेत नाहीत, असे त्यांना आढळले. अशा सूक्ष्मजंतूंच्या कोशिकांभोवती चरबीयुक्त आवरण असते. रंजक घातल्यावर उष्णता दिल्यास रंग पक्का बसतो तसेच अम्लयुक्त अल्कोहॉलाने धुतल्यानंतरही हा रंग जात नाही, असे त्यांना आढळले. यावरून सूक्ष्मजंतू पुढील दोन प्रकारचे असतात, असे दिसून आले. अम्लयुक्त अल्कोहॉलाने धुतल्या जाणाऱ्या सूक्ष्मजंतूंना अम्ल-अदृढ आणि अम्लयुक्त अल्कोहॉलाने न धुतल्या जाणाऱ्या सूक्ष्मजंतूंना अम्ल-दृढ अशी नावे देण्यात आली.

क्षयरोगास कारणीभूत होणारा मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस आणि कुष्ठरोगाला कारणीभूत होणारा मा. लेप्री  हे सूक्ष्मजंतू अम्ल-दृढ आहेत. यांच्या अभिरंजनासाठी अनेक पद्घती असल्या, तरी त्सील-नेल्सन पद्घती सामान्यपणे वापरतात. या पद्घतीत सूक्ष्मजंतू काचपट्टीवर पातळ थराच्या रूपात पसरल्यावर त्यावर त्सील-कार्‌बॉल फुक्सिनाचा विद्राव ओतून पाच मिनिटे अभिरंजन करतात. क्षारकीय फुक्सिनाचा एथिल अल्कोहॉलातील विद्राव आणि पाण्यातील फिनॉलाचा विद्राव यांचे मिश्रण म्हणजे त्सील-कार्‌बॉल फुक्सिनाचा विद्राव असतो. अभिरंजन होत असताना काचपट्टी स्पिरिटाच्या दिव्याच्या ज्योतीवर धरतात आणि विद्राव न उकळता त्याची वाफ होईल एवढी उष्णता देण्याची या वेळी दक्षता घेतात. नंतर काचपट्टी पाण्याने धुतात. ३% तीव्र हायड्रोक्लोरिक अम्लयुक्त ९५% अल्कोहॉलामध्ये काचपट्टी रंग धुवून जाईपर्यंत बुडवून ठेवतात. ती साध्या पाण्याने धुतल्यावर तिचे मिथिलीन निळा या रंजकाने अभिरंजन करतात. त्यासाठी मिथिलीन निळ्या रंजकाचा एथिल अल्कोहॉल व पाणी यांच्यातील विद्राव वापरतात. अशी काचपट्टी पाण्याने धुवून सुकवितात. नंतर तिचे सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण करतात. या वेळी अम्ल-दृढ सूक्ष्मजंतू तांबडे झालेले दिसतात, तर अम्ल-अदृढ सूक्ष्मजंतू निळे दिसतात. भेददर्शी अभिरंजन पद्घतींव्यतिरिक्त सूक्ष्मजंतूंच्या कोशिकांमधील इतर संरचना पाहण्यासाठी पुढील विशिष्ट अभिरंजन पद्घती वापरतात.

  


बीजाणू अभिरंजन पद्घती : सूक्ष्मजंतूंच्या काही प्रजातींतच बीजाणू निर्माण होतात, बीजाणू सहजपणे रंजक स्वीकारीत नाहीत परंतु एकदा का त्यांचे अभिरंजन झाले की, ते विरंजनाला विरोध करतात. या गोष्टींवर या पद्घती आधारलेल्या आहेत. या अभिरंजनात वापरण्यात येणारे भेददर्शी कारक हे कार्बनी अम्लाचा सौम्य विद्राव, अम्ल रंजक किंवा दुसरे क्षारकीय रंजक असू शकतात. यांपैकी बार्थालोमेऊ-मिट्‌वर पद्घती पुढे दिली आहे. सूक्ष्मजंतूंचा पातळ थर असलेल्या काचपट्टीवर मॅलॅकाइट हिरवा या रंजकाचा विद्राव ओतून सु. १० मिनिटे अभिरंजन करतात. मग ती पाण्याने स्वच्छ धुतात. नंतर २५% पाण्यात विरघळविलेल्या सॅफ्रॅनिनाचा विद्राव सु. १५ सेकंदांपर्यंत काचपट्टीवर ओततात. यानंतर काचपट्टी पाण्याने धुतात व सुकवितात. तिच्यावरील सूक्ष्मजंतूंचे निरीक्षण करतात, तेव्हा बीजाणू हिरव्या तर कोशिका लाल रंगाच्या दिसतात. 

कोशिका-आवरण अभिरंजन पद्घती : काही सूक्ष्मजंतूंच्या कोशिकांभोवती चिकट आवरण असते. या आवरणासह सूक्ष्मजंतू स्पष्ट दिसण्यासाठी अभिरंजन पद्घती वापरतात. त्यांपैकी अंटोनी टायलर यांच्या सुधारित पद्घतीत सूक्ष्मजंतूंचा पातळ थर असलेल्या काचपट्टीवर शुद्घ पाणी व ग्लेशिअल ॲसिटिक अम्ल यांच्यातील स्फटिक (क्रिस्टल) जांभळा या रंजकाचा विद्राव टाकून ४–७ मिनिटे अभिरंजन करतात. नंतर २०% मोरचूद असलेल्या विद्रावाने काचपट्टी धुतात. सुकल्यावर या काचपट्टीचे सूक्ष्मदर्शकाने निरीक्षण करतात. तेव्हा सूक्ष्मजंतू कोशिका-आवरण जांभळट तर कोशिका गर्द निळ्या दिसतात.

कशाभिका अभिरंजन पद्घती : कशाभिकांचे अभिरंजन ही अतिशय अवघड क्रिया असून ती अगदी हळूवारपणे करतात. कारण सूक्ष्मजंतूंची हाताळणी व अभिरंजन करताना थोडासाही हलगर्जीपणा झाला, तरी कशाभिका तुटतात. सूक्ष्मजंतूंची नवीन वाढ, स्वच्छ काचपट्टी व रंजकाचा ताजा विद्राव या पद्घतीत वापरणे इष्ट असते. कशाभिकांवर रंग पक्का व गडद बसण्यासाठी रंगबंधक वापरतात. नंतर ठराविक क्रिया करून तयार झालेल्या काचपट्टीचे सूक्ष्मदर्शकाखाली परीक्षण करतात. या वेळी कशाभिका तांबड्या आणि कोशिका निळ्या दिसतात. या मूळ पद्घतीत सर रॉनल्ड एल्मर फिशर व फेर्डिनांट यूलिउस कोन यांनी सुधारणा करून नवीन पद्घती तयार केली. तिच्यात टॅनिक अम्ल व फेरिक क्लोराइड यांचे पाण्यातील विद्राव आणि क्षारकीय फुक्सिनाचा एथिल अल्कोहॉलातील विद्राव तसेच तीव्र हायड्रोक्लोरिक अम्ल व फॉर्‌मॅलीन यांचा दुसरा विद्राव यांचे मिश्रण वापरतात.

मॅकिआव्हेल्ली अभिरंजन पद्घती : रिकेट्‌सिया सूक्ष्मजंतू दर्शविणारी ही भेददर्शी अभिरंजनाची पद्घती आहे. या पद्घतीत स्थिर ऊतकाचे लेपन क्षारकीय फुक्सिनाने अभिरंजित करतात. सायट्रिक अम्लाच्या ०·५% विद्रावाने त्याचे भिन्नीभवन करतात आणि मिथिलीन निळा या रंजकाच्या एक टक्का विद्रावाने प्रति-अभिरंजन करतात. यात रिकेट्‌सिया लाल तर ऊतकातील कोशिका निळ्या व त्यांतील केंद्रके गर्द निळी दिसतात. या पद्घतीचे नाव तिच्या संशोधकावरून पडले आहे. 

ऋण अभिरंजन पद्घती : ही अभिरंजनाची आणखी एक भेददर्शी पद्घती आहे. या पद्घतीत रंगहीन कोशिका रंगीत पार्श्वभूमीवर ठळक व उठावदार दिसतात. कारण सूक्ष्मजंतू (कोशिका) रंगीत होत नाहीत. इंडिया इंक (शाई), पाण्यात विरघळणारे निग्रोसीन किंवा एक टक्का जलीय विद्रावातील काँगो लाल यांसारख्या ऋण रंजकाच्या लहान थेंबामध्ये कोशिका काचपट्टीवर निलंबित असतात. हा लहान थेंब पातळ पटलाच्या रूपात पसरवितात व हवेत सुकवितात. जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीवांचे परीक्षण करावयाचे असते, तेव्हा सदर काचपट्टी १ मिलि. संहत हायड्रोक्लोरिक अम्ल व १०० मिलि. ९५% एथिल अल्कोहॉल यांच्या मिश्रणात बुडवून ठेवतात. अम्ल अल्कोहॉलामुळे काँगो लाल रंजकाचा रंग निळा होतो. त्यामुळे रंगांमध्ये अधिक चांगला विरोधाभास निर्माण होतो. स्पायरोकीट सूक्ष्मजंतूंच्या अभ्यासासाठीही ही पद्घत वापरतात. 

फ्ल्युओरोक्रोम अभिरंजन पद्घती : क्षयरोगाला कारणीभूत होणारा मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस  आणि कुष्ठरोगाला कारणीभूत होणारा मा. लेप्री  हे सूक्ष्मजंतू तसेच मायकोबॅक्टिरिया प्रजातीमधील सूक्ष्मजंतूंच्या इतर जाती आणि नोकॉर्डिया टेरॉइडीज  हे सूक्ष्मजंतू आधीव जलद लक्षात येण्यासाठी ही पद्घती वापरतात. १९७५ सालापासून ही पद्घती जगभर वापरली जात आहे. या पद्घतीला व्यापकपणे ऑरॅइन-ऱ्होडॅमाइन (ए-आर) अम्ल-दृढ अभिरंजन कार्यपद्घती म्हणतात. थुंकी, लघवी व ऊतके यांसारख्या निदानीय नमुन्यांमधील क्षयाचा सूक्ष्मजंतू या पद्घतीने अधिक जलदपणे ओळखू येतोच. शिवाय परंपरागत कार्‌बॉल फुक्सीन हे मुख्य रंगद्रव्य वापरणाऱ्या त्सील-नेल्सन अम्ल-दृढ पद्घतीपेक्षा या पद्घतीत सकारात्मक निष्कर्षांची पातळी उच्चतर आढळते. अनुस्फुरक (स्वयंप्रकाशी) सूक्ष्मदर्शकांच्या विकासातील सुधारणांमुळे ऑरॅमाइन-ऱ्होडॅमाइन पद्घती विशेष लोकप्रिय झाली व सापेक्षतः स्वस्त झाली. ऑरॅमाइन व ऱ्होडॅमाइन या रंगद्रव्यांच्या संरचना या मायकोबॅक्टिरियल (कवक दंडाणूतील) पेप्टिडोलिपीड किंवा पेप्टिडोग्लायकोलिपीड यांच्या ग्राहक बृहत् रेणूंवर घुसण्याच्या किंवा गंजीच्या रूपात रचले जाण्याच्या दृष्टीने कार्‌बॉल फुक्सिनापेक्षा अधिक सोयीस्कर अशा असल्याचे दिसते. ऑरॅमाइन व ऱ्होडॅमाइन यांच्या बाबतीतील शक्य होणारे अंतःकोशिकीय संकेंद्रण कार्‌बॉल फुक्सिनाच्या तुलनेत अधिक असू शकते. त्यामुळे अभिरंजनाची गुणवत्ता उच्चतर असू शकते. मायकोबॅक्टिरियल कोशिकांच्या भित्तींमधील मायकोलिक अम्ल असलेली लिपिडे त्यांच्या मूळ (नैसर्गिक) स्थितीत ऑरॅमाइन व ऱ्होडॅमाइन यांच्या दोन अनुस्फुरक रंगद्रव्य रेणूंशी विक्रिया घडवून आणतात आणि अभिरंजक द्रव्य शोषून घेतात, असा या उच्च गुणवत्तेच्या अभिरंजनाचा अर्थ लावतात. ही रंगद्रव्ये अम्ल-दृढतेचा गुणधर्म चांगल्या रीतीने बहाल करू शकतात. कारण ती पार्यतेमधील अडथळे म्हणून कार्य करू शकतात. त्यामुळे विरंजक कारकाच्या घुसण्याच्या क्रियेत आडकाठी निर्माण करतात. यांशिवाय इतर सूक्ष्मजीवांसाठी विशिष्ट पद्घती त्यांच्या सखोल अध्ययनासाठी वापरतात.

पहा : रंजक, जीवविज्ञानीय सूक्ष्मजंतुविज्ञान सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण सूक्ष्मजीवविज्ञान सूक्ष्मतंत्रे, जीवविज्ञानीय.

संदर्भ : 1. Boon, M. E. Drijver, J. S. Routine Cytological Staining Techniques : Background and Practice, 1986.

            2. Clark, G. Staining Procedures, 1980.

            3. Lewis, P. R. Knight, D. P. Staining Methods for Sectioned Material, 1977.

            4. Murray, P., Ed., Manual of Clinical Microbiology, 1999.

रुईकर, स. के. ठाकूर, अ. ना.