आगर : (आगर आगर). समुद्रकाठावर आढळणाऱ्या शैवलवर्गातील एक तण. त्यास ‘चिनी गवत’ असेही म्हणतात. हे प्रामुख्याने जपान, चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया तसेच रशिया, अमेरिका, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका या प्रदेशांच्या समुद्रकिनाऱ्यांवर आढळते. बाजारात मिळणारे आगर या तणापासून निष्कर्षणाने (अर्क काढून) बनविलेले कलिल (अतिसूक्ष्म आकारचे कण) असून चूर्ण वा तुकड्यांच्या स्वरूपात मिळते. ते सच्छिद्र, दुधी काचेसारखे पारभासी, पापुद्र्यासारखे, फिकट पिवळसर, वाळलेल्या स्वरूपात ठिसूळ पण ओले केल्यास चिवट होणारे असते. आगराचा प्रथम उपयोग सतराव्या शतकात जपानमध्ये जेली करण्यासाठी केल्याचा आढळतो. यूरोप व अमेरिकेत मात्र एकोणिसाव्या शतकापासून आगराचा उपयोग होत आहे. सूक्ष्मजीवशास्त्रात जंतुसंवर्धकाच्या (प्रायोगिक रीत्या सूक्ष्मजंतू वाढविण्याच्या) द्रवाचे घनात रूपांतर करणे हा आगराचा प्रमुख उपयोग आहे. १८८३ मध्ये रॉबर्ट कॉख यांनी क्षयरोगकारक जंतूंच्या वाढीसाठी द्रव संवर्धक घन करण्याकरिता आगराचा उपयोग केला. तेव्हापासून सूक्ष्मजीवशास्त्रीय प्रयोगशाळेत आगराचे स्थान अढळ बनलेले आहे.

रासायनिक दृष्ट्या आगर हे गॅलॅक्टनाचे सल्फ्यूरिक एस्टर असून शैवलांच्या कोशिकाभित्तींत (पेशींच्या भित्तींत) आढळते. कित्येकदा ते कॅल्शियमयुक्त अथवा कॅल्शियम व मॅग्नेशियम लवणयुक्तही आढळते. थंड पाण्यात आगर विरघळत नाही, पण फुगते व स्वतःच्या वजनाच्या वीसपटीने पाणी शोषते. गरम पाण्यात ते अर्धा टक्का या प्रमाणात वापरल्यास विरघळते व पाण्याचे जेलीत रूपांतर होते. कुठल्याही पदार्थापेक्षा जेली तयार करण्याची क्षमता आगरामध्ये उत्कृष्ट आहे. एक ते तीन टक्क्यांपर्यंत वापरल्यास द्रव पदार्थाचे घन पदार्थात रूपांतर होते. घनीभवन (घट्ट होण्याची क्रिया) ४० से. तापमानाला होते, पण घन पदार्थाचे पुन्हा द्रव पदार्थांत रूपांतर करण्यास ९५ से. तापमान आवश्यक असते.

उत्पादन: सामान्यत: आगराचे उत्पादन शैवलवर्गातील जोलिडियम वंशातील जातींपासून करतात. याशिवाय सैबेरियास अहन्फोल्शिया वंशातील तांबड्या शैवलापासून, न्यूझीलंडमध्येटेरोक्लाडिया वंशातील शैवलापासून, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व अमेरिकेत ग्रॅसिलॅरिया वंशातील शैवलांपासूनही आगराचे उत्पादन प्रक्रिया केल्यानंतरच मिळते. यासाठी शैवले पाण्यात उकळतात. नंतर विद्राव गाळून थंड होऊ देतात. थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे करून ते गोठवतात. त्यातील लवणे व इतर अशुद्ध द्रव्ये थंड पाण्यात वारंवार धुतल्यानंतरच आगर शुद्ध होते. त्यानंतर उन्हात अथवा कृत्रिम तऱ्हेने उष्णता देऊन आगर वाळवितात. उत्पादनापूर्वी शैवले विरंजित केल्यास (रंग काढून टाकण्याची क्रिया केल्यास) अथवा आगर ओले असताना सोडियम हायपोक्लोराइटाने विरंजित केल्यास आगर रंगहीन होते. त्यानंतरच आगराची प्रत ठरवितात.

उपयोग : प्रामुख्याने आगराचा उपयोग द्रव पदार्थ घन-अथवा जेली-स्वरूपात करण्यासाठी होतो. घन स्वरूपातील संवर्धके संवर्धनास सुलभ ठरतात म्हणून जगातील सर्वच प्रयोगशाळांत आगर वापरतात. सूक्ष्मजीवांच्या विशिष्ट प्रतिक्रिया अजमावण्यासाठी तसेच स्ट्रेप्‍टोकोकाय सूक्ष्मजंतूंचे चार प्रकार ओळखण्यासाठी रक्तमिश्रित आगराचा उपयोग होतो. आगर हे सौम्य व सवय न लागणारे रेचक आहे. रेशीम व कागद गुळगुळीत करण्यास तसेच निरनिराळ्या प्रकारच्या जेलींत व खाद्य पदार्थात आगर वापरतात. आइसक्रीम दीर्घकाल घट्ट राहावे म्हणून त्यात आगर घालतात. दुग्धव्यवसाय, औषधी गोळ्या व वेष्टने, खाण्याच्या गोळ्या व टॉफी तसेच सौंदर्यप्रसाधनांच्या धंद्यात आगर उपयुक्त आहे. कृत्रिम दात तयार करण्याचे साचे तसेच धातूंच्या तारा काढताना वंगण म्हणूनही आगराचा उपयोग होतो.

पहा : शैवले.

संदर्भ : Whistler, R. L. BeMiller, J. N. Industrail Gums, New York, 1959.

कुळकर्णी, नी. ना.