ॲसिटोबॅक्टर : सूक्ष्मजंतूंच्या स्यूडोमोनेडेसी कुलातील एक वंश. यातील सूक्ष्मजंतू अंडाकार ते शलाकाकार किंवा अनियमित आकारात गोलाणू, लांबट, तंतुमय, गदाकार, फुगीर, वक्र किंवा तंतुशाखायुक्त आढळतात. चल असल्यास टोकावर एकच कशाभिका (हालचालीस उपयुक्त असणारा नाजूक धागा) किंवा अचल. ते पूर्णपणे वातापेक्षी (हवेच्या सान्निध्यात वाढणारे) असून एकटेच, जोडीने, अथवा साखळीत आढळतात. वाढ होताना ‘ग्रॅम-रंजक-अव्यक्त’ (ग्रॅम यांच्या रंजकक्रियेने तयार होणारा जांभळटसर रंग टिकून न राहणारे) पण पूर्ण वाढीनंतर ‘ग्रॅम-रंजक-अस्थिर’ (काही वेळा ग्रॅम-रंजक-व्यक्त व काही वेळा ग्रॅम-रंजक-अव्यक्त) असतात. त्यांच्यामुळे कार्बनी संयुगांचे ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन] होऊन त्यांचे कार्बनी अम्‍लात रूपांतर होते. उदा., एथिल अल्कोहॉलाचे ॲसिटिक अम्‍लात, ग्‍लुकोजाचे ग्‍लुकोनिक अम्‍लात, सॉर्बिटॉलाचे सॉर्बोजामध्ये. त्यांच्या पोषणास सरल किंवा जटिल (गुंतागुंतीची संरचना असलेले) पदार्थ लागतात. निरनिराळ्या जातींना पोषणासाठी भिन्न तपमान लागते. त्यांचे अस्तित्व अल्कोहॉली किण्वनाची (शर्करेचे विघटन करून अम्‍ल व काही वेळा कार्बन डाय-ऑक्साइड व अल्कोहॉल तयार होण्याची) शक्यता असलेल्या वनस्पतींवर आढळते. शिर्का (व्हिनेगार) निर्मितीस तसेच कार्बनचक्र पूर्ण करण्यास उपयुक्त. अल्कोहॉलाचे वातापेक्षी ऑक्सिडीकरण होऊन ॲसिटिक अम्‍लात रूपांतर पुढीलप्रमाणे होते.

  १)अल्कोहॉला च्या विहायड्रोजनीकरणामुळे (हायड्रोजन काढून टाकल्यामुळे) ॲसिटाल्डिहाइड होते.

 

(२)पाणी शोषल्यामुळे ॲसिटाल्डिहाइड जलान्वित होते.

 

(३)सजल ॲसिटाल्डिहाइडाचे विहायड्रोजनीकरण होते. त्यामुळे ॲसिटिक अम्‍ल मिळते.

 

शिर्क्यामध्ये चार टक्के ॲसिटिक अम्‍ल असते. त्याच्या औद्योगिक निर्मितीस ऑर्लिअन्स व इतर जलद पद्धती वापरतात. त्यात किण्वनासाठी अल्कोहॉल १० ते १३ टक्के लागते. ॲसिटोबॅक्टराच्या . असेटी, . पाश्वरीयानम, .श्वेझेनबाखाय, . ऑर्लिअन्स, . कर्व्हम या जाती अल्कोहॉलाच्या किण्वनात वापरतात. शिर्का उघड्यावर राहिल्यास ॲसिटोबॅक्टरामुळे त्यातील ॲसिटिक अम्‍लाचे ऑक्सिडीकरण होऊन त्याचे कार्बन डाय-ऑक्साइड व पाण्यात रूपांतर होते :

CH3.COOH+2O2→2CO2+2H2O

म्हणून पाश्वरीकरणानंतर (उष्णता देऊन निर्जंतुकीकरण केल्यानंतर) शिर्का बाटल्यांत घट्ट बुचे लावून साठवितात.. सबऑक्सिडन्स या जातीमुळे कार्बनी संयुगांचे विहायड्रोजीकरण व मद्यातील एथेनॉल वगैरेंचे किण्वन होते,

पहा : ॲसिटिक अम्‍ल औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र किण्वन शिर्का स्यूडोमोनेडेसी.

संदर्भ : 1. Frobisher, M. Fundamentals of Microbiology, Tokyo, 1961.

           2. Salle, A. J.Fundamental Principles of Bacteriology, New Tork, 1961.

कुलकर्णी, नी. बा.