सूक्ष्मजंतु, गंधकीय : मानवी कोशिकेत (पेशीत) मूलद्रव्यरुपातील गंधक-कण राखीव अन्न म्हणून साठविणारे, गंधक किंवा त्याच्या अकार्बनी संयुगांचे (ऊर्जा मिळविण्यासाठी) ऑक्सिडीकरण करणारे अथवा सल्फेटांचे ⇨ क्षपण घडवून त्यांचा हायड्रोजनग्राही म्हणून उपयोग करणारे, अशा सूक्ष्मजंतूंचा समावेश गंधकीय सूक्ष्मजंतूंत करतात. हे सूक्ष्मजंतू अनेक कुले व उपकुले यांत विखुरलेले असले, तरी प्रामुख्याने त्यांचे सहा प्रकार आढळतात. त्यांतील पाचच प्रकार खऱ्या अर्थाने गंधकीय सूक्ष्मजंतूंचे आहेत. सहाव्या प्रकारात कार्बनी गंधक संयुगांवर क्रिया करु शकणाऱ्या इतरही अनेक सूक्ष्मजंतूंचा समावेश केला जातो.

येथे फक्त खऱ्या गंधकीय सूक्ष्मजंतूंचाच विचार केलेला आहे. गंधकीय सूक्ष्मजंतू हे सामान्यपणे मैला, सांडपाणी, अपघटन होत असलेले कार्बनी पदार्थ, दलदलीची मृदा आणि मृत प्राणी व वनस्पती यांचे सडणारे अवशेष अशा ठिकाणी आढळतात. ते हायड्रोजन सल्फाइडाची निर्मिती करतात किंवा सल्फेटांच्या अपघटनाने हायड्रोजन सल्फाइड बाहेर टाकतात. काही सूक्ष्मजंतू गंधकसाठ्यात, काही कोळशाच्या खाणीतील अम्लयुक्त पाण्यात तर इतर बागेतील मातीतही आढळतात. काही प्रकाशसंश्लेषी सूक्ष्मजंतू समुद्राच्या पाण्यात व इतर काही स्वोपजीवी असून उष्ण गंधक झऱ्यात किंवा गंधकसाठ्यात आढळतात. गंधकाचे ऑक्सिडीकरण घडवून आणणाऱ्या सूक्ष्मजंतूतील प्रकाशसंश्लेषी सूक्ष्मजंतू रोडोस्पायरिलेसी, क्लोरोबिएसी व क्रोमॅटीएसी (ॲथिओऱ्होडेसी, क्लोरोबॅक्टेरिएसी व थायोऱ्होडेसी) या तीन कुलांत असून त्यांच्यासंबंधीची माहिती इतरत्र दिलेली आहे [⟶ प्रकाश-संश्लेषण]. रोडोस्पायरिलेसी कुलातील सूक्ष्मजंतू कोशिकेत गंधक-कण साठवीत नाहीत किंवा कोशिकेबाहेरही टाकत नाहीत. काही थायोसल्फेटांचे ऑक्सिडीकरण, तर इतर मूलद्रव्य हायड्रोजनाचे ऑक्सिडीकरण करतात. बहुतेक परजीवी असून कार्बनी पदार्थांपासून ऊर्जा मिळवितात. क्लोरोबिएसीचे सूक्ष्मजंतू कोशिकेबाहेर गंधक टाकतात, तर क्रोमॅटिएसी कुलातील सूक्ष्मजंतू कोशिकेत मूलद्रव्यरुपातील गंधक-कण साठवितात. त्यांच्या ऑक्सिडीकरणाने या कणांचे सल्फ्यूरिक अम्लात रुपांतर होते.

प्रकाशसंश्लेषी नसणारे, परंतु गंधकाचे कण साठविणारे सूक्ष्मजंतू बेगियाटोएसी व ॲक्रोमॅटिएसी कुलांत असून ते मैल्यात व खाऱ्या चिखलात आढळतात. बेगियाटोआ आल्बा ही प्रमुख जाती असून ती हायड्रोजन सल्फाइड विपुल असल्यास कलिल गंधकाचे बिंदू कोशिकेत साठविते आणि त्यांचा उपयोग हायड्रोजन सल्फाइडाची उणीव भासल्यास करते परंतु दोन्हीही उपलब्ध न झाल्यास हे सूक्ष्मजंतू नाश पावतात. थायोबॅसिलस प्रजातीचे सूक्ष्मजंतू चिखल, समुद्राचे पाणी, कोळशाच्या खाणीतील निचऱ्याचे पाणी व दलदलीच्या जागेत आढळतात. यांच्या काही जाती महत्त्वाच्या आहेत. था. थायोपारस हे ऑक्सिजीवी (हवेच्या सान्निध्यात जगणारे) सूक्ष्मजंतू सोडियम थायोसल्फेट, हायड्रोजन सल्फाइड व गंधकाचे ऑक्सिडीकरण करतात. था. डीनायट्रीफिकन्स हे विनॉक्सिजीवी सूक्ष्मजंतू हायड्रोजन सल्फाइडाचे ऑक्सिडीकरण करतात व नायट्रेटांचा हायड्रोजनगाही म्हणून उपयोग करुन त्यांचे नायट्राइटांमध्ये क्षपण करतात. त्यामुळे मृदेची सुपीकता नायट्रेटांचे अपघटन झाल्यामुळे कमी होते. था. थायोऑक्सिडन्स हे ऑक्सिजीवी सूक्ष्मजंतू असून ते गंधकाचे सल्फ्यूरिक अम्लात रुपांतर करतात व अम्लप्रतिरोधी म्हणून तग धरुन राहतात. हे अम्लोत्पादक सूक्ष्मजंतू निरनिराळे दगड व खनिजे यांत उपलब्ध होतात. ते अम्लयुक्त पाण्यात तसेच गंधकाच्या खाणीतून बाहेर पडणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात. यांपैकी विद्राव्य फॉस्फेटांचा खते म्हणून मोलाचा उपयोग होतो. ओसाड अल्कलीयुक्त मृदा लागवडीसाठी पाणी दिल्यानंतर या सूक्ष्मजंतूमुळे उपयुक्त होते. मैल्याचा व कुजणाऱ्या कार्बनी पदार्थांचा घाण वास यांच्यामुळे कमी होतो परंतु अम्लोत्पादनामुळे कोळशाच्या खाणी व पिण्याच्या पाण्याचे नळ गंजून खराब होतात. सल्फोलोबस हे सूक्ष्मजंतू गरम पाण्याच्या झऱ्याच्या ठिकाणी आढळतात. या पाण्यातील गंधकाचा ते वापर करतात.

गंधकाचे अपचयन करणारे सूक्ष्मजंतू स्पोरोव्हिब्रिओडीसल्फोव्हिब्रिओ या प्रजातींत येतात. डी. डीसल्फ्यूरिकन्स हे गोड्या पाण्यात आढळत असून ऑक्सिजीवी व परजीवी आहेत. कार्बनी पदार्थांच्या विहायड्रोजनीकरणामुळे हायड्रोजन निघून सल्फेटांची सल्फाइडे होतात. डी. एश्चुराय हे सूक्ष्मजंतू समुद्राच्या पाण्यात असून ते सल्फाइट, थायोसल्फेट व मूलद्रव्य गंधक यांचे हायड्रोजन सल्फाइडामध्ये रुपांतर करतात. काही स्वोपजीवी सूक्ष्मजंतू हायड्रोजन वायूचे ऑक्सिडीकरण करतात, तसेच सल्फेटांचे हायड्रोजनग्राही म्हणून उपयोग करतात. हायड्रोजनेज एंझाइमामुळे सल्फेटांचे क्षपण होऊन हायड्रोजन सल्फाइडाची निर्मिती होते. हे सूक्ष्मजंतू विनॉक्सिजीवी स्थिती केरोसिनासारख्या खनिज तेलातील हायड्रोकार्बनांचेही ऑक्सिडीकरण घडवितात. त्यामुळे खनिज तेलाच्या उद्योगात नुकसान होते. खनिज तेल विहिरीतील गाळात सल्फेटांचे अल्प प्रमाण तसेच या सूक्ष्मजंतूंमुळे कार्बनी पदार्थांचे हायड्रोकार्बनामध्ये रुपांतर होणे, यांवरुन हे जंतू खनिज तेल तयार होण्यात महत्त्वाचा भाग घेत असावेत.

पहा : गंधक.

संदर्भ : 1. Frobisher, M., Fundamentals of Microbiology, Tokyo, 1961.

2. Stanier, R. Y. Doudoroff, M. Adellerg, E. A. General Microbiology, 1963.

कुलकर्णी, नी. बा.