कवक : (लॅ. फंजाय). बहुतेक सर्व परिचित वनस्पतींतील हिरवा रंग (हरितद्रव्य) ज्यांमध्ये आढळत नाही अशा इतर सर्व अबीजी वनस्पतींना पूर्वी ‘कवक’ म्हणत असत. ज्यांना संस्कृतमध्ये ‘भूछत्र’, ‘शिलिंघ्र’ (म. अळंभे, इं. मशरूम) म्हणतो त्यांना लॅटिन भाषेत फंजाय (एकवचन फंगस) असे मूळचे नाव असून हल्ली कवक ही संज्ञा भूछत्रासह इतर तत्सम वनस्पतींकरिता (उदा., बुरशी, भुरी, काणी, तांबेरा इत्यादींकरिता) वापरतात. ⇨शैवले, कवके आणि या दोन्ही मिळून बनलेल्या ⇨शैवाक (धोंडफुले) वनस्पतींना शास्त्रीय परिभाषेत त्यांच्या अत्यंत साध्या शरीरामुळे ‘कायक वनस्पती’ (ज्यांच्या शरीराचे मूळ, खोड यांमध्ये विभेदन झालेले नाही अशा वनस्पती) म्हणण्याची जुनी परंपरा आहे. परंतु सर्वच वनस्पतिविज्ञांना हल्ली ती मान्य नाही. त्याऐवजी त्यांनी यांपैकी पहिल्या दोन विभागांना स्वतंत्र वर्गाचा दर्जा दिला आहे. हरितद्रव्याचा अभाव व त्यामुळे येणारी परोपजीविता (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणे) ही लक्षणे मुख्यत: विचारात घेऊन सूक्ष्मजंतू, श्लेष्मकवके (प्राण्यांसारख्या काही लक्षणांची कवके) व इतर सत्यकवके (भूछत्रे, बुरशी इ.) या तिन्हींचा समावेश साधारणत: कवकांमध्ये करतात पण इतर अनेक लक्षणे लक्षात घेऊन व तिन्हींच्या स्वतंत्र उगमाच्या विचाराला अधिक महत्त्व देऊन यांचे तीन स्वतंत्र विभाग काही वनस्पतिविज्ञ करतात. सामान्य भाषेत, कवकांत सूक्ष्मजंतूंखेरीज फक्त इतर दोन विभागांचा समावेश अधिक सोईस्कर असल्याने बहुधा तसा करतात. सूक्ष्मजंतूंना अलीकडे अनेक दृष्ट्या महत्त्व प्राप्त झाल्याने त्यांचा अभ्यास सूक्ष्मजंतूशास्त्र या स्वतंत्र शाखेत केला जातो व फक्त कवकांच्या अभ्यासशाखेस ‘कवकविज्ञान’ म्हणतात. यामध्ये त्यांची अंतर्बाह्य संरचना, क्रियाविज्ञान, प्रसार, जीवनचक्रे, वर्गीकरण, व्यावहारिक महत्त्व इत्यादींचा समावेश होतो. काही कवकांपासून अनेक स्वतंत्र हिरव्या वनस्पतींना व काही प्राण्यांना रोग होतात त्यामुळे कवकविज्ञान शाखेला विशेष महत्त्व आले आहे. पेनिसिलिनासारखी मानवी रोगांवरची औषधे (प्रतिजैविके, अँटिबायॉटिक्स) अरगटिनासारखी अल्कलॉइडे, यीस्ट (किण्व) सारखे मद्योत्पादक कवक, काही खाद्य भूछत्रे इत्यादींमुळेही या शाखेचे महत्त्व वाढत आहे.

इतिहास : काही भूछत्रे खाद्य, काही औषधी दृष्ट्या उपयुक्त आणि काही विषारी असतात तसेच निरेची किंवा द्राक्षरसाची दारू बनते, खाद्य पदार्थांवर बुरशी येते व ते बिघडतात अशी कवकांबद्दल व्यावहारिक माहिती भारतात होती. तथापि कवकांच्या पद्धतशीर अभ्यासाचा प्रारंभ व विकास मात्र पाश्चात्य देशांत झाला. रोमन लोकांना अनेक खाद्य व विषारी कवकांची माहिती होती. सम्राट निरो यांना एक विशिष्ट कवक (ॲमानिटा सीसॅरिया) फार आवडत असे. चिनी लोक खाण्यास व औषधाकरिता कवकांचा उपयोग जरी शेकडो वर्षे करीत आले आहेत, तरी त्यांना याबाबत वैज्ञानिक माहिती पूर्वी नव्हती.

क्लूझियस (१६०१) यांनी पश्चिम यूरोपातील काही खाद्य व विषारी कवकांची सचित्र माहिती हर्बल्स ह्या पहिल्या वनस्पतीविषयक ग्रंथात दिली आहे. त्यानंतर कवके गोळा करणे, त्यांची चित्रे काढणे, वर्णने करणे, त्यांना नावे देणे आणि त्यांचे वर्गीकरण अशी कामे अनेकांनी केली. गास्पार बौहीन (बोअँ १५६०—१६२४), टूर्नफॉर (१६५६—१७०८), डिलीनियस (१६८७—१७४७), सेबास्त्यां व्हायां (१६६९—१७२२) इत्यादींची नावे या संदर्भात नमूद आहेत. मुद्रणकला व सूक्ष्मदर्शकाच्या शोधानंतर ह्या विज्ञानशाखेची अधिक जलद प्रगती होत गेली. आंतोन्यो मिचेली (१६३९—१७३७) यांनी कवकांविषयी माहितीपर ग्रंथ दोन खंडांत लिहिला. त्यांचे कवकज्ञान फारच सरस होते त्यांनी निश्चित केलेले काही वंश आजही प्रमाण मानले जातात. बुरशीच्या संवर्धनाचे प्रयत्न पहिल्याने त्यांनी केले व बीजुकांमुळे (सूक्ष्म प्रजोत्पादक अवयवांमुळे) त्यांचा प्रसार होतो हे सप्रयोग सिद्ध केले. कार्ल लिनीअस (१७०७—१७७८) यांनी आपल्या वर्गीकरण पद्धतीतील चोविसाव्या वर्गात (क्रिप्टोगॅमिया) कवकांना निश्चित स्थान दिले होते. सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने अधिक निश्चित संरचनात्मक माहिती मिळवून त्यानुसार वर्गीकरणात प्रगती केल्याचे श्रेय क्रिस्तियान हेंड्रिक पेरसून (१७५५—१८३७) यांना दिले जाते ते व एलीआस मॅग्नस फ्रीस (१७९४—१८७८) या दोघांनी कवकविज्ञानाला दिलेल्या चालनेमुळे कवकांच्या हजारो जातींची माहिती जगातल्या सर्व भागांतून मिळू लागली. एकोणिसाव्या शतकात आउगुस्ट कार्ल योझेफ कोर्डा (१८०९—४९) यांनी आपल्या Icones Fungorum या ग्रंथात अनेक मोठ्या व कित्येक सूक्ष्म कवकांची तपशीलवार माहिती प्रसिद्ध केली व त्यानंतर तुल्सेन बंधूंनी Selecta Fungorum Carpologia (१८६१–६५) या ग्रंथाच्या तीन खंडांत सचित्र व संरचनादर्शक माहिती प्रसिद्ध केली.

याच सुमारास अमेरिकेत, स्थानिक कवकांसंबंधीचे वर्णनात्मक ग्रंथ एल्‌. डी. श्वाइनिट्स, सी. एच्‌. पेक इत्यादींनी प्रसिद्ध केले. त्याचप्रमाणे इतर राष्ट्रांतील अनेक कवकांची वर्णनेही प्रसिद्ध झाली. कवकांच्या अनेक जातींचा प्रसार फार मोठा असल्याने काही जातींच्या वर्णनाच्या नकळत पुनरावृत्ती झाल्या. हा दोष टाळण्याकरिता इटलीतील अँड्रीया साकार्डो (१८४५—१९२०) यांनी १८८० च्या पूर्वीची सर्व कवकांची वर्णने एकत्र देण्याचे ठरविले व Sylloge Fungorum या ग्रंथमालेचा पहिला खंड १८८२ मध्ये व पंचविसावा खंड १९३१ मध्ये प्रसिद्ध झाला. याच काळात कवकांची वर्णनपर व संरचनादर्शक माहिती देणारी अनेक नियतकालिकेही प्रसिद्ध होऊ लागली.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर कवकांच्या जीवनवृत्तासंबंधीची माहिती प्रसिद्ध होत गेली. आंटोन द बारी (१८३१—८८) यांचा श्लेष्मकवकांवरचा प्रसिद्ध ग्रंथ १८५६ मध्ये पुरा झाला व त्यांनीच पुढे १८६५ च्या सुमारास तांबेरा रोगासंबंधीच्या संशोधनाने काही जाती एकापेक्षा अधिक आश्रयांवर राहून आपला जीवनक्रम पूर्ण करतात हे सिद्ध केले. ओस्कार बेफेल्ट यांनी कवकांच्या कृत्रिम संवर्धनाचा प्राथमिक अभ्यास सुरू केला व त्यामुळे कवकांचा विकास व क्रियाविज्ञान कळू लागले (१८७२—१९१२). प्रथम द बारी यांचे शिष्य व नंतर संहसंशोधक रशियन शास्त्रज्ञ एम्‌. एस्‌. व्होरोनीन (१८३८—१९०३) यांनी मायदेशी परतल्यावर तेच कार्य चालू ठेवून कवकविज्ञानात बरीच भर टाकली. कवकांच्या कोशिकाविज्ञानातील (कोशिकांची म्हणजे पेशींची संरचना, कार्य पुनर्जनन यांसंबंधीच्या विज्ञानातील) संशोधनाचे श्रेय फ्रान्समधील प्येर ऑग्युस्तीन दांजेआर यांनी १८९४ मध्ये व आर्‌. ए. हार्पर यांनी १८९४–९७ या काळात केलेल्या महत्त्वपूर्णकार्याबद्दल त्यांना देण्यात येते. यानंतर प्रसिद्ध केलेल्या अशाच माहितीमुळे कवकांच्या लैंगिकतेच्या जुन्या कल्पना तपासून घेणे व त्यांचे आप्तभाव निश्चित करणे शक्य झाले. ए. एफ्‌. ब्लॅकेस्ली यांनी १९०४ मध्ये काही काळ्या बुरशींतील प्रारंभिक लैंगिकतेचा पुरावा दाखवून तिला ‘विषमजालकता’ (पुष्कळ जातींच्या कवकांच्या तंतूंमध्ये क्रियावैज्ञानिक फरक असणे) असे नाव दिले. पुढे १९३२ पर्यंत अनेकांनी ही घटना इतर कवकांत असल्याचे सिद्ध केले. बी. ओ. डॉज (१९२८) व लिंडग्रीन (१९३३) यांनी कवकांच्या आनुवंशिकीत खूपच प्रगती (विशेषत: न्यूरोस्पोरासंबंधी) केली. इतर काहींनी काणीच्या बाबतीत तशीच माहिती मिळविली. अलीकडे काणी व तांबेरा अशा रोगकारक कवकांचे संकरज (दोन भिन्न जातींपासून झालेली संतती) निर्माण करून बरीच नवीन माहिती उपलब्ध झाली आहे व त्यामुळे या शाखेत उल्लेखनीय प्रगती झाली आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग, फ्लोरी व त्यांच्या सहकाऱ्‍यांच्या श्रमाचे फळ म्हणजे पेनिसिलियम बुरशीपासून उपलब्ध झालेले ‘पेनिसिलीन’ हे उपयुक्त प्रतिजैव होय. अशी आणखी प्रतिजैव मिळविण्याच्या दृष्टीने कवकांचा अभ्यास सुरू आहे. कवकांपासून वनस्पतींना होणाऱ्‍या रोगांच्या अभ्यासाने वनस्पतिरोगविज्ञान शाखेत मोलाची भर पडली आहे. भारतातील कवकांसंबंधी एच्‌. सिडो, इ. जे. बटलर, ए. बार्क्ली, जी. आर्‌. बिस्बी, एम्‌. सी. कुक, टी. पेच, के. सी. मेहता, बी. बी. मुंडकूर, एस्‌. एल्‌. आजरेकर, आर्‌. एस्‌. वासुदेव, म. ना. कामत, जे. एफ्‌. दस्तुर, एस्‌. आर्‌. बोस, एम्‌. मित्र, टी. एस्‌. रामकृष्णन अय्यर, एस्‌. पी. रायचौधरी, एम्‌. जे. तिरूमलाचार इ. अनेक शास्त्रज्ञांनी बरेच संशोधन केले आहे.

अधिवास, प्रसार, पुरातनत्व इत्यादी : सर्व पृथ्वीवर जेथे उपजीविकेकरिता कार्बनी (सेंद्रिय) पदार्थ मिळू शकतात तेथे कवके आढळतात. उष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत त्यांचे वैपुल्य आहे. दक्षिण ध्रुवीय प्रदेशातील वनस्पतींच्या अत्यल्प संख्येत त्यांचे प्रमाण बरेच आहे तसेच गोड्या पाण्यात त्यांचे प्रमाण सापेक्षत: अधिक, पण खाऱ्‍या पाण्यात बरेच कमी असते. उच्च वातावरणात व वरच्या अक्षांशांवर कवकांची जननक्षम बीजुके आढळतात. कवकांच्या जातींची एकूण संख्या सु. एक लक्षावर जाते. १९५२ सालापर्यंत भारतातील शोधून काढलेल्या कवकांच्या जातींची संख्या ३,८९५ होती त्यानंतर तीत बरीच भर पडली आहे. फार प्राचीन काळी अस्तित्वात असलेल्या कवकांच्या कालगणनेत अनिश्चितपणा आहे कारण आज सापडणाऱ्‍या जीवाश्मांचा (शिळारूप अवशेषांचा) पुरावा तुरळक स्वरूपाचा आहे. डेव्होनियन कल्पातील (सु. ४० कोटी वर्षांपूर्वी) काही इतर वनस्पतींच्या जीवाश्मांत त्यांच्या तंतूंचे ठसे आढळतात कित्येक वनस्पतींची बीजुके, पराग व शारीरिक भाग यांच्या जीवाश्मांबरोबर कवक-बीजुके दिसून येतात तथापि त्यांच्या निश्चित जाती व वंश ठरविणे अशक्य आहे कारण त्याबरोबर आवश्यक तो बीजुकधारी भाग नसतो. काही विद्यमान कवकांशी साम्य आढळल्याने त्यांची नावे प्राचीन कवक-जीवाश्मांना दिली आहेत.


उगम व जातिविकास : प्रथम शैवले व त्यांपासून कवके उत्क्रांत झाली असावीत अशी पूर्वी विचारसरणी होती, परंतु बहुतेक सर्व कवकविज्ञांच्या मते कवके शैवालांपासून अवतरली नसून ह्या दोन्ही गटांतील वनस्पती तत्पूर्वी भूतलावर सूक्ष्म फ्लॅजेलेटा [प्राकलाच्या (मूलभूत वस्तू म्हणून समजल्या जाणाऱ्‍या पेशीतील द्रव्याच्या, जीवद्रव्याच्या) सूक्ष्म केसासारख्या धाग्यांनी हालचाल करणारे एककोशिक सजीव] प्रकारच्या प्रारंभिक सजीवांपासून स्वतंत्रपणे उत्क्रांत झाल्या असाव्यात. याच कारणाकरिता कायक वनस्पती असा स्वतंत्र विभाग आता मानीत नाहीत. फ्लॅजेलेटांचा अंतर्भाव प्राणिकोटीतील अत्यंत साध्या व प्रारंभिक गटात [→प्रोटोझोआ] केला जातो. शैवले व कवके यांतील साम्य यांच्या समान पूर्वजांपासून झालेल्या समांतर उत्क्रांतीमुळे असावे असे मानतात. कित्येक कवकविज्ञांच्या मते फ्लॅजेलेटापासून फक्त प्रारंभिककवके (शैवल-कवके) व त्यांच्यापासून पुढे क्रमाने साधी व उच्चतर कवके विकास पावली असावीत. काहींच्या मते उच्चतर कवके स्वंतत्रपणे लाल शैवलांपासून अवतरली असावीत कारण त्यांच्या (उदा., धानीकवक) स्त्री-जननेंद्रियात साम्य आढळते [→क्रमविकास].

शारीर : कवकांची संरचना फार साधी किंवा थोडीफार गुंतागुंतीची असते. त्यांना मूळ, खोड, पान वगैरे अवयव नसतात (पहा : आकृतींचा तक्ता). त्यांचे शरीर एका नग्न किंवा आवरणयुक्त आणि एक प्रकलयुक्त (कोशिकेतील क्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या गोलसर भागाने युक्त, केंद्रकयुक्त) किंवा अनेक प्रकलयुक्त कोशिकांचे बनलेले असते. बहुसंख्य कवकांचे शरीर अनेक कोशिकांच्या तंतूंचे बनलेले असून ते सामान्यपणे कापसाच्या पुंजक्यासारखे दिसते. कधी त्या तंतूंमध्ये आडव्या भित्ती नसल्याने (उदा., म्यूकर, ऱ्हायझोपस इ. काळ्या बुरशी) ती एक अखंड परंतु अनेक प्रकले असलेली कोशिका असते भित्ती असल्यास (उदा., ॲस्परजिलस, पेनिसिलियम इ. हिरव्या पिवळ्या बुरशी व भूछत्रे) तंतूमध्ये एक किंवा दोन प्रकले असलेल्या कोशिका आढळतात. विरल तंतूंचा भाग कधी फक्त दुसऱ्या वस्तूवर वाढत असून काही तंतू त्या वस्तूत प्रवेश करून अन्नशोषण करतात व काही वस्तू बाहेर सरळ वर वाढतात व प्रजोत्पादक कोशिका बनवितात. तंतूंच्या जाळ्याला कवकजाल म्हणतात. तथापि काही कवकांमध्ये (उदा., यीस्ट) एकच कोशिका किंवा सारख्या कोशिकांची माळ असते त्यालाही कवकजाल म्हणतात. अधिक उच्च दर्जाच्या कवकांमध्ये शरीराचे दोन भाग पडतात. एक भाग पोषक तंतूंचा विरळ गुंता व दुसरा भाग अनेक तंतू एकत्र विणले जाऊन भरीव, विविध स्वरूपाचा, लहानमोठ्या आकाराचा व प्रजोत्पादक (बीजुकदंड म्हणजे बीजुक धारण करणारा भाग) असतो. पोषक भाग बहुधा त्या पदार्थात राहून त्यावर असलेल्या जटिल भागाला अन्नपुरवठा करतो. 

काही कवकांत (उदा., स्क्लेरोशियम, ऱ्‍हायझोक्टोनिया) अनेक शाखायुक्त तंतू एकत्र घट्ट विणले जाऊन लहान बियांएवढ्या, गोळीसारख्या किंवा भिंगासारख्या आकाराचे खंड बनतात व कवकाच्या प्रसारास मदत करतात. कधीकधी अधिक मोठ्या व लंबगोल आकाराचे असेच खंड जमिनीत (उदा., पॉलिपोरस, पोरिका इ.) किंवा जमिनीवर अथवा आश्रय (परजीवीला जगविणाऱ्या) वनस्पतीवर (उदा., अरगट) बनतात, त्यांना जालाश्म म्हणतात त्यामध्ये अन्नसंचय होतो व पुढे त्यापासून प्रजोत्पादक इंद्रिये निर्माण होतात. अनेक वंध्य (वांझ) तंतू एकत्र वाढून जाडजूड खपलीप्रमाणे किंवा गाठीप्रमाणे अथवा लहानशा गदेसारखे व इतर प्रकारचे भाग बनतात. त्यांवर किंवा त्यांमध्ये बनलेल्या पोकळ्यांत विशेष प्रकारची बीजुके निर्माण होऊन प्रजोत्पादन होते, त्यांना पीठिका म्हणतात. (उदा., झायलॅरिया). इतर कित्येक कवकांत अनेक समांतर तंतू नंतर एकत्र (दोरीप्रमाणे किंवा फितीप्रमाणे) विणले जातात त्यांना तंतुजटा म्हणतात. यांचीही वाढ होऊन कवकाचा प्रसार साधला जातो. जटिल प्रकारच्या काही मोठ्या कवकांत (उदा., भूछत्रे, भूकंदुक, भूतारका) पोषक तंतूव्यतिरिक्त बीजुकोत्पादक भाग, छत्री, चेंडू, तारता इत्यादींप्रमाणे जमिनीवर ठळकपणे आढळतो. यांशिवाय त्यांमध्ये मनुष्याचे कान (उदा., ऑरिक्युलॅरिया), पक्ष्यांचे घरटे (उदा., नीडुलॅरिया), पेला (उदा., पेझिझा), घोड्याचा खूर (उदा., फोम्स), पोवळे (उदा., क्लॅव्हेरिया), सपाट व अर्धचक्र (उदा., पॉलिपोरस, गॅनोडर्मा) इ. विविध आकारांचे व भिन्न रंगांचे प्रकार आढळतात. बीजुकावस्थेत कवकजाल काळे, पिवळे, हिरवे किंवा तपकिरी रंगाचे दिसते. त्यावरून अशा कवकांना अनुक्रमे काळी, पिवळी किंवा हिरवी बुरशी (मोल्ड) म्हणतात.

कवकात प्राकलकण (कोशिकेत अंतर्भूत झालेले लहान दाट जीवद्रव्याचे भाग) नसतात. फारच थोड्यांच्या कोशिकावरणात तूलीर (सेल्युलोज) असते बहुधा ते कायटिन नावाच्या शिंगासारख्या पदार्थाचे असते यालाच कोणी कवक-तूलीर म्हणतात. कार्बोहायड्रेटासारखा हा पदार्थ कीटकांसारख्या प्राण्यांच्या शरीरावरणात आढळतो. काही कवकांचे (उदा., ट्रेमेला, ऑरिक्युलॅरिया इ.) शरीर पाणी शोषून घेऊन फुगते व श्लेष्मल (बुळबुळीत) बनते. काहींत ते जाड, कठीण, काष्ठयुक्त, खनिजयुक्त किंवा राळयुक्त बनते. कोशिकावरणात रंगद्रव्ये समाविष्ट झाल्याने वर्णपटातील एक तरी रंग तेथे आढळतो. प्राकलात ग्लायकोजेन हा कार्बोहायड्रेट पदार्थ व तैलबिंदू असतात.

पोषण : हरितद्रव्ययुक्त वनस्पतींप्रमाणे कवकात कार्बोहायड्रेटांची निर्मिती होत नाही. प्राणी व सूक्ष्मजंतूप्रमाणे त्यांना तयार अन्न लागते. त्यांच्या शरीरात पाचक वितंचके (शरीरात रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे पदार्थ, एंझाइमे) निर्माण होत असल्याने साखर, स्टार्च, तूलीर, लिग्निन इत्यादींवर त्यांची उपजीविका होते. चरबी, तेले वगैरे स्निग्ध पदार्थ काहींना आवश्यक आहेत. इतर कित्येक कवके नायट्रेटे, अमोनिया, प्रथिने व ऍमिनो अम्ले यांचा उपयोग करू शकतात. बहुतेकांना फॉस्फेट, सल्फेट, लोह व मॅग्नेशियम यांची जरूरी असून त्यांशिवाय काहींना अल्पांशाने तरी जस्त, तांबे, मँगॅनीज, मॉलिब्डेनम व गॅलियम यांचा पुरवठा लागतो. तसेच ब (थायामीन) जीवनसत्त्व सर्वांना लागते ब (रिबोफ्लाविन) कोणालाच लागत नाही. पाणी व थोडाफार ऑक्सिजन हवेतून, विद्रावातून सर्वांनाच आवश्यक ठरला आहे.

सर्व जिवंत कवकांच्या कोशिकावरणांतून पाणी व त्यात विरघळलेली लवणे व अन्नपदार्थ विसरणाने (रेणू एकमेकांत मिसळण्याची क्रिया होऊन) आत जातात व प्राकलातून कोशिकारसात (कोशिकेतील द्रवरूप घटकात) येतात. त्यांनंतरचा त्यांचा तंतूतील प्रवास प्रवाहासारखा किंवा विसरणाने होतो. तंतूच्या किंवा कोशिकेच्या आवरणातून बाहेरच्या अन्नपदार्थांत वितंचके स्रवतात व तेथे त्यांचे अंशमात्र पचन (रूपांतर) होते व त्यानंतर कोशिकेत प्रवेश होतो.

कवकांचे प्रकार : अन्नपदार्थ लक्षात घेऊन कवकांचे एकूण खालील तीन प्रकार केले जातात.

(१) जीवोपजीवी : या गटात अनेक जाती येतात. त्यांपैकी कित्येक जिवंत वनस्पती किंवा प्राणी यांच्याकडून प्रथम अन्न घेतात, परंतु त्यांच्या मृत्यूनंतरही शवातून घेतात त्यांना प्रासंगिक जीवोपजीवी म्हणतात (उदा., पिथियम). अनेकदा पहिल्या अवस्थेत अलिंग बीजुकाद्वारे व नंतरच्या अवस्थेत सलिंग प्रकारे किंवा जटिल शरीराद्वारे हे प्रजोत्पादन करतात. काही कवके (उदा., सॅप्रोलेग्निया एंटॉमॉप्थोरा ही पाण-बुरशी) मासे व बेडूक यांसारखे जलस्थलवासी (पाण्यात व जमिनीवर रहाणारे) प्राणी आणि कीटक यांपासून अन्नरस घेऊन रोगांना कारणीभूत होतात. मक्यावरच्या काणी किंवा काजळी रोगामुळे दाणे पिठाऐवजी काजळीसारख्या भुकटीने भरून जातात ही भुकटी (बीजुके) वाऱ्याने पसरविली जाऊन रोगाचा फैलाव होतो. गव्हावर येणारा तांबेरा रोग, भुईमुगावरचा टिक्का रोग, बाजरीवरचे हिरवे कणीस व चिकटा रोग, भातावरचा करपा रोग, द्राक्षावरची भुरी ही उदाहरणे जीवोपजीवी कवकांपासून होणाऱ्या रोगांची आहेत. यांपैकी तांबेरा व भुरी अनिवार्य किंवा सक्त जीवोपजीवी आहेत. सर्व जीवोपजीवी कवके कमी जास्त प्रमाणात आश्रय वनस्पतींमध्ये किंवा प्राण्यांमध्ये रोग उत्पन्न करून त्यांचे नुकसान (उदा., खुरटेपणा, वंध्यत्व, फुले व पाने झडणे, फुगणे, वेडेवाकडेपणा येणे, कुजणे इ.) करतात. यांतील काही कवक आपल्या जीवनचक्रात दोन आश्रय वनस्पतींवर आळीपाळीने वाढतात (उदा., पक्सिनिया ग्रॅमिनिस हा तांबेरा, गहू व बार्बेरी या दोन्हींवर वाढून जीवनचक्र पूर्ण करतो). काही जीवोपजीवी कवकांचे तंतू आश्रय वनस्पतीच्या कोशिकांमधून वाढतात व कोशिकावरणात शिरून अन्नरस घेतात. इतर काहींच्या (तंतु-भुरी) तंतूचा लहान भाग आश्रयाच्या कोशिकेत शिरून त्यातील अन्न घेतो किंवा ते आतच भरपूर वाढून त्यांचे जाळे बनते त्यास शोषक म्हणतात.


(२) शवोपजीवी : या प्रकारच्या कवकांचे पोषण मृत प्राणी, त्यांचे भाग किंवा मृत वनस्पतींवर होते. सृष्टिक्रमात त्यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. कारण ती कवके प्राणी वा वनस्पती यांच्या मृत शरीरात वितंचकांच्या साहाय्याने पूर्ण बदल घडवून आणतात आणि त्यायोगे कार्बनी पदार्थाचे विघटन व अपघटन होऊन (मूळ रेणूचे तुकडे पडून लहान रेणू अथवा अणू बनून) मुख्य मूलद्रव्ये सुटी होतात व अकार्बनी स्वरूपात विलीन होतात. त्यांच्या (व काही सूक्ष्मजंतूंच्या) अभावी पृथ्वीवर मृत कार्बनी पदार्थांचे फार मोठे ढीग साचून सजीवांना राहण्यासही जागा पुरली नसती. परंतु कवकांच्या व सूक्ष्मजंतूच्या या कृतीने प्राण्यांत किंवा वनस्पतींत एकरूप झालेली द्रव्ये पुन्हा परत वापरण्यास मिळतात. कवकांमुळे बहुतेक कार्बोहायड्रेटांचे अपघटन होते तर सूक्ष्मजंतूची क्रिया बव्हंशी प्रथिनांवर होते. काळ्या व हिरव्या बुरशी आणि अनेक भूछत्रे या गटात येतात. अंशत: अपघटित कार्बनी खतावर अगॅरिकसच्या भूछत्रांची लागवड करता येते. जिवंत वृक्षांच्या खोडावर वाढणाऱ्‍या काही कवकांचे (उदा., गॅनोडर्मा, फोम्स, पॉलिपोसर इ.) तंतू फक्त मृत मध्यकाष्ठातूनच (काष्ठाच्या बऱ्‍याच जुन्या, अधिक कठीण व मधील मृत भागातून) अन्नरस घेतात मात्र मृत खोडाच्या कोणत्याही भागातून ते घेऊ शकतात. या व इतर जातींपासून इमारती लाकडांचे फार नुकसान होते कारण त्या लाकडांचा कुजून भुगा होत जातो. शर्करायुक्त रसाचे मद्यात रूपांतर (उदा., ताडी, माडी, बीअर इ.) यीस्ट या कवकामुळे घडून येते तसेच पाव भाजण्यापूर्वी याच कवकाचा उपयोग तो आंबविण्यासाठी करतात. त्यामुळे पाव मऊ, सच्छिद्र आणि विशिष्ट चव व स्वादयुक्त बनतो. सरबते, काकवी, लोणची, मुरंबे व कित्येक खाद्य पदार्थ उघडे पडल्यास त्यावर बुरशी येऊन तो पदार्थ नासतो. उपयोगात नसलेली पादत्राणे व कपडे यांवरही बुरशी येते. त्यामुळे या वस्तू हळूहळू नाश पावतात.

(३) सहजीवी : याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे धोंडफुले अथवा शैवाक वनस्पती हे होय. हिच्यातील कवक भाग शैवलापासून मुख्यतः कार्बोहायड्रेट घेतो व त्याच्या मोबदल्यात शैवलास पाणी आणि संरक्षण देतो. जेथे त्यांपैकी एकट्याला स्वंतत्रपणे जगता येणे कठीण होते तेथे सहजीवनामुळे दोघेही एकत्र राहू शकतात. काही नेचे, काही विद्यमान व प्राचीन वाहिनीवंत (द्रवरूप पदार्थांची ने-आण करणारे, कोशिकासमूह असणाऱ्या) अबीजी वनस्पती (उदा., सायलोटम व लायकोपोडियम), काही प्रकटबीजी (उदा., पाइन), काही आवृतबीजी (ऑर्किडेसी, एरिकेलीझ) इ. वनस्पतींच्या मुळांवर, मुळांतील आंतराकोशिकीय (कोशिकांमधील) जागेत किंवा कोशिकांत काही कवकांचे तंतू वस्ती करतात. त्यांनी शोषलेले पाणी व लवणे हिरव्या वनस्पतीला उपलब्ध होऊन त्यांच्या मोबदल्यात कवकाला कार्बोहायड्रेट आणि ब गटातील जीवनसत्त्वे मिळतात. या प्रकारच्या सहजीवनाला संकवक म्हणतात. कवकतंतू कोशिकांत असल्यास अंतःस्थित व नसल्यास बहिःस्थित संकवक म्हणतात. सेप्टोबॅसिडियम या वंशातील कवके काही बीजी वनस्पतींच्या सालीवर वाढतात. साल व कवक यांमध्ये रहात असलेल्या काही शल्क-कीटकांच्या (खवले किडे) शरीरांतून कवक अन्नरस शोषते, तर ते कीटक वनस्पतींच्या सालीतून अन्नरस घेतात. याप्रमाणे अन्नशोषणाची एक साखळीसारखी योजना आढळते मात्र येथे कीटकांना जरी वंध्यत्व येत असले तरी ते नाश पावत नाहीत. कवक कीटकावर जगते व कीटक आश्रय वनस्पतींवर जगतो. दोन्ही अनिवार्य जीवोपजीवी आहेत. कीटकसमूहातील इतर काही कीटक कवकाने सालीत बनविलेल्या बोगद्यांतून किंवा पोकळ्यांतून आपल्या शत्रूपासून सुरक्षित राहतात व आश्रय वनस्पतीपासून अन्नरस घेतात. पुढे ज्यावेळी कवकांची बीजुके तयार होऊन बाहेर पडतात त्याचवेळी वंध्य न झालेल्या कीटकांची नवीन संततीही झालेली असते व त्यांपैकी काहींना बीजुकांचा संपर्क होतो. ते सालीच्या दुसऱ्या जागी जाऊन नवीन वस्ती करतात किंवा त्यांपैकी काही तेथेच राहून पूर्वीची वस्ती वाढवितात. संपर्क न झालेली नवीन संतती तेथेच जुन्या वस्तीत सुरक्षित राहते. रोझाइट्स व ॲम्ब्रोशिया या नावाच्या कवकांची काही कीटक लागवड करतात व त्यावर उपजीविका करतात तसेच कित्येक कवके कीटकांवर जगतात.

प्रजोत्पादन : कवकांची संख्यावाढ व प्रसार अनेक एककोशिक सूक्ष्म कणांपासून होतो व त्यांना बीजुके म्हणतात. कार्याच्या दृष्टीने ही कवकांची बीजे होत. अर्थात खरे बीज त्या मानाने फार जटिल असते. कवकांमध्ये इतर वनस्पतींप्रमाणे सलिंग व अलिंग हे लिंगभेदाच्या अस्तित्वावर आधारलेले भाग आढळतात. तसेच या प्रकारच्या दोन पिढ्यांचे एकांतरण काहींत आढळते [→एकांतरण, पिढ्यांचे]. काहींत कवकजाल अलिंग पद्धतीने (बीजुकांच्या साहाय्याने किंवा शाकीय पद्धतीने तंतूपासून) नवीन कवकोत्पादन करते, तर काहींत एकाचे तंतू दुसऱ्याच्या तंतूशी संपर्क साधतात आणि अशा प्रकारे सलिंग प्रजोत्पादन होते.

(१) अलिंग प्रजोत्पादन : यामध्ये बीजुके, विशेष प्रकारची विबीजुके (अलैंगिक रीतीने तयार झालेली बीजुके) व ऑइडिया कवकतंतूपासून स्वतंत्र होतात व वारा, पाणी, प्राणी (कीटक) यांच्याकरवी ती पसरली जाऊन नंतर रुजल्यावर त्यांच्यापासून नवीन कवके बनतात. विबीजुके गोलसर, दंडगोलाकृती किंवा विशिष्ट स्वरूपाची असतात तसेच ती बहुधा एक किंवा कधी अनेक कोशिकांची बनलेली असतात. पोषक कवकतंतूवर ती कोठेही अथवा विशिष्ट प्रकारच्या तंतूशाखेवर म्हणजे विबीजुकदंडावर येतात. या शाखा स्वंतत्र व एकेकट्या असतात किंवा त्यातील अनेकांचे खपलीसारखे किंवा फुगीर उशीप्रमाणे थर बनतात अथवा त्याच्या जुड्या बनतात. कधीकधी विबीजुकदंड विशिष्ट इंद्रियांच्या, पलिघांच्या (आद्य पुंजनन कोशिकांच्या), पेरूच्या आकाराच्या पोकळीत येतात. काही कवकांमध्ये अनेक तंतू परस्परांत गुंतून व विणले जाऊन स्वतंत्र कंदिका (लहान कंद) बनतात व त्यांपासून शाकीय प्रजोत्पादन होते. कित्येक प्रकारच्या (काळ्या, जलवासी किंवा काही इतर) बुरशीत तंतूपासून स्वंतत्र मोठ्या कोशिका (बीजुककोश) प्रथम बनतात आणि नंतर त्यातील प्राकलाचे विभाजन होऊन अनेक स्वतंत्र बीजुके बनतात. काळ्या बुरशीच्या बीजुकांभोवती जाड आवरण असल्याने ती सुरक्षित असतात व न सुकता वाऱ्याने दूरवर पसरविली जातात. याउलट बहुतेक जलवासी कवकांची बीजुके अनावृत (नग्न) असून त्यावर हालचालीस उपयुक्त अशी एक किंवा अनेक सूक्ष्म व केसासारखी साधने (केसले, प्रकेसले) असतात व त्यामुळे त्यांचा प्रसार होतो. पोषक कवकतंतूची कधीकधी विभागणी होऊन अनेक सुट्या कोशिका बनतात व त्यांच्यापासून नवीन कवकतंतू बनतात त्यांना ऑइडिया म्हणतात. या सर्व विविध बीजुकांतून त्यांच्या जनकतंतूंच्या प्रकलातील जनुकांच्यामार्फत [आनुवंशिक लक्षणे निर्देशित करणाऱ्या रंगसूत्रावरील एककांच्या मार्फत, →जीन] आनुवंशिक लक्षणांची परंपरा पिढ्यानुपिढ्या न बदलता चालू राहते. यांना अपूर्ण बीजुके म्हणतात. यांचा आकार एका मिमी. च्या काही सहस्रांश (म्यू) ते एक मिमी. या मर्यादेत असतो. सूक्ष्मदर्शकातूनच तो मोजता येतो व त्यांचे स्वरूपही स्पष्ट दिसते. रंगहीनापासून तो हिरवट, तपकिरी, पिवळट, पिंगट व गडद काळ्या रंगांपर्यंत फरक दिसतात. आकाराने गोलसर, लांबट गोलसर, सुईसारखे, सरळ, वाकडे किंवा तारकाकृती अशी विविधता आढळते. त्यांचे आवरण पातळ किंवा जाड आणि पृष्ठभाग गुळगुळीत किंवा काटेरी अथवा शिल्पयुक्त असतो. असेच वैचित्र्य बीजुकदंडांमध्येही आढळते. काही बीजुके तात्काल व काही विश्रांतिकालानंतर रुजतात.  

पुढे वर्णन केल्याप्रमाणे सलिंग प्रकारच्या प्रजोत्पादनात घडून येणाऱ्या अनेककोशिक गंतुकाशयांच्या (प्रजोत्पादक कोशिका म्हणजे गंतुके तयार करणाऱ्या अवयवांच्या), कोशिकांच्या किंवा एका कोशिकेतील प्रकलांच्या संयोगानंतर विशिष्ट प्रकारच्या बीजुकनिर्मितीस सुरुवात होते व ती बीजुके कवकांच्या परस्परांतील नात्याने निदर्शक मानली जातात त्यांना पूर्ण बीजुके म्हणतात. वर्गीकरणात त्यांना बरेच महत्त्व असून त्यांची उत्पत्ती ज्या अवस्थेत होते ती पूर्णावस्था मानतात. ज्या कवकांत ती नसते किंवा अद्याप आढळलेली नाही, त्यांना अपूर्ण कवक (फंजाय इंपरफेक्टाय) म्हणतात त्यांचा एक स्वतंत्र वर्ग केलेला आहे.  


(२) सलिंग प्रजोत्पादन : यामध्ये सर्वसाधारणपणे दोन प्राकलयुक्त घटकांचा (गंतुकांचा) संयोग होऊन त्यांपासून एक संयुक्त घटक, रंदुक (चल पुंजनन कोशिका) बनतो. बहुतेक कवकांत ही घटना आढळते. कोशिकांचा (प्राकलांचा) संयोग व त्यांतल्या प्रकलांचा संयोग यांमधला अवधी बहुतेक सर्व जीवनचक्रात चालू राहतो. तथापि प्राकलसंयोग ही अंतिम व क्रांतिक घटना असते. संयोगात सहभागी होणाऱ्‍या प्राकलखंडात रंगसूत्रांची संख्या एकगुणित (एकपट) व फलनानंतर बनणाऱ्‍या रंदुकात ती द्विगुणित (दुप्पट) होते. प्रकलसंयोग हा रंगसूत्रांच्या (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांच्या) एकपट संख्येचा शेवट व दुप्पट संख्येचा प्रारंभ याउलट प्रकार न्यूनीकरणात (रंगसूत्रांची दुप्पट असलेली संख्या एकपट होणाऱ्या कोशिकांच्या विभाजनाच्या प्रकारात) आढळतो [→कोशिका]. काही कवकांत (अनेक ॲस्कोमायसिटीज व काही बॅसिडिओमायसिटीज) तिसरी अवस्थ आढळते ती प्राकलसंयोगानंतरची पण प्रकलसंयोगापूर्वीची असते. ह्यात दोन पितरांकडून आलेले प्रकल एकाच प्राकलात (न मिसळता) स्वतंत्र राहतात ह्या स्थितीस प्रकलयुती म्हणतात. काही कवकांमध्ये रंदुकावस्थेत आलेली द्विगुणितावस्था पुढे काही काल टिकून राहते. काळ्या बुरशीत बहुप्रकल तंतूंच्या शाखांचा संपर्क होऊन प्राकलसंयोग होतो. जलवासी बुरशीत अंदुकाशी (अचल स्त्रीजनन कोशिकेशी) नर-तंतुशाखेतील (रेतुकाशयातील म्हणजे रंदुक धारण करणाऱ्या कलशासारख्या भागातील) एका प्रकलाचा संयोग होतो. काहींत (ॲस्कोमायसिटीज) नर व स्त्री-गंतुकाशये स्पष्ट असतात परंतु संयोगी प्राकलखंड (गंतुके) सारखेच असतात. इतर काहींत रेतुकाशयाऐवजी सामान्य तंतूंतील कोशिका त्याचे कार्य करते. सर्वोच्च (बॅसिडिओमायसिटीज) कवकांमध्ये दोन तंतू, एक तंतू व दुसरे विबीजुक किंवा दोन विबीजुके यांमध्ये संयोग घडून येतो.

ऱ्‍हायझोपस निग्रिकॅन्स या काळ्या बुरशीत सकृद्दर्शनी सारख्या दिसणाऱ्या कवकजालात प्रारंभिक लिंगभेद आढळतो. ही बुरशी कृत्रिम प्रकारे प्रयोगशाळेत वाढविली असता बीजुककोश व बीजुके नित्याप्रमाणे बनताना आढळतात. परंतु गंतुकाशये (गंतुके ज्यांत तयार होतात असे भाग) व गंतुबीजुके (दोन समान लैंगिक कोशिकांच्या संयोगाने तयार झालेली बीजुके) मात्र क्वचित बनतात. १९०४ मध्ये ब्लॅकेस्ली यांना असे आढळून आले की, या बुरशीचे कवकजाल दोन वाणांतील असून त्यांपैकी जेव्हा एकाच वाणातील तंतू एकत्र वाढतात तेव्हा फलन न होता फक्त बीजुकेच बनतात. परंतु भिन्न वाणांतील तंतूंचा संपर्क झाल्यास गंतुकांचा संयोग घडून गंतुबीजुक बनते. याचा अर्थ त्या जातीत विषम प्रकारचे कवकजाल असतात. याला ‘विषमजालकता’ म्हणतात. या दोन वाणांतील तंतूंच्या शारीरिक लक्षणांत इतर क्रिया-विक्रियांत फरक नसून फक्त वर सांगितलेल्या त्यांच्या प्रवृत्तीतील भेदच त्यांना ओळखण्यास उपयोगी पडतो. त्यातल्या एका वाणातील तंतूंना नर व दुसऱ्यातील तंतूंना मादी असे म्हणणे कठीण असून सलिंग प्रजोत्पादनात परस्परांस पूरक ठरणाऱ्या या दोन्हींपैकी एकाला धन (+) व दुसऱ्याला ऋण (-) म्हणतात. गंतुबीजुक रुजून पुढे त्यापासून बनणाऱ्या बीजुकदंडावरच्या बीजुककोशातून (बीजुके तयार होणाऱ्या भित्तीयुक्त भागातून) दोन प्रकारची बीजुके (ऋण आणि धन) बनतात. ती रुजल्यावर साहजिकच पुन्हा दोन प्रकारचे कवकजाल निर्माण होतात. हा प्रकार आता अनेक कवकांत व काही शैवलांतही आढळला आहे. एकाच कवकजालाच्या कोशिका किंवा प्रकल यांचा संयोग फलदायी होण्याच्या नित्य प्रकारास ‘समजालकता’ म्हणतात. यांपैकी बहुतेक कवक विषमजालक कवकांपासून अवतरले असावे असे मानतात.

सलिंग प्रजोत्पादनातील गंतुकसंयोगाने बनलेल्या गंतुबीजुक किंवा रंदुक अथवा त्यानंतर बनलेली अन्य प्रकारची बीजुके ह्यांना पूर्ण बीजुके म्हणतात. सापेक्षतः काही साध्या कवकांत (शैवलकवकांत) दोन सारख्या गंतुकाशयांच्यामध्ये आधारलेले, बहुधा जाड व शिल्पयुक्त आच्छादनाचे गंतुबीजुक असते किंवा जाड आवरणाचे रंदुक असते. तसेच इतर काहींत (धानीकवकांत) पिशवीसारख्या कोशिकेत (धानीत) पहिल्याने झालेल्या सलिंग संयोगानंतर बनलेली मर्यादित संख्येची (बहुधा आठ) धानीबीजुके (धानीत तयार झालेली बीजुके) आढळतात. आणखी काहींत (गदाकवकांत) ज्यांत सलिंग संयोग झाला आहे अशा गदेसारख्या कोशिकेवर कमीजास्त लांबीच्या देठावर (प्रांगुलावर) विशिष्ट गदाबीजुके येतात.

धानीकवकांचे स्त्री-जननेंद्रिय (धानीयोनी) हा कमीजास्त गुंडाळलेला तंतू असून त्याच्याजवळच वाढलेली किंवा अन्य तंतूवर आलेली लहान तंतुशाखा (रेतुकाशय) यांचा निकट संबंध येऊन परस्परांच्या टोकाजवळच्या एकेक कोशिकेतील प्राकलांचा संयोग होतो पुढे फलित कोशिकेपासून धानीजनक तंतू वाढतात व अनेक वेळा त्या सर्वांभोवती वंध्यतंतूचे कवच बनून धानीफल आणि त्यात अनेक धानीकोशिका व धानीबीजुके तयार होतात. गदाकवकात अशी जननेंद्रिये नसतात.

वर्गीकरण : कवकांच्या उगमाबद्दल व नंतरच्या जातिविकासाबद्दल भिन्न मते असल्यामुळे त्यांच्या वर्गीकरण पद्धतीतही फरक पडले आहेत. पूर्वी उल्लेखिल्याप्रमाणे कवकांतून सूक्ष्मजंतूंना त्यांच्या वैशिष्ट्यामुळे वेगळे ठेवल्यास उरलेल्यात फक्त दोनच विभाग राहतात : (१) श्लेष्मकव (मिक्सोमायकोफायटा) व (२) सत्यकवक (यूमायकोफायटा). पुढे वर्णिल्याप्रमाणे श्लेष्मकवकांच्या काही सूक्ष्म प्राण्यांसारख्या लक्षणांमुळे कित्येक वनस्पतिविज्ञ त्यांना खऱ्या कवकांपासून स्वतंत्र मानतात. शैवलांप्रमाणे या दोन्हींचाही क्रमविकास (उत्क्रांती) फ्लॅजेलेटापासून स्वतंत्रपणे झाला असावा. श्लेष्मकवकांचा क्रमविकास फारसा नसल्याने पूर्वजांशी त्यांचे साम्य अधिक असणे क्रमप्राप्त आहे. त्यामानाने सत्यकवकांपैकी काही सापेक्षत: इतरांपेक्षा कमी (उदा., शैवलकवक) व काही जास्त प्रगत आहेत (उदा., धानीकवक व गदाकवक). कवकजाल, बीजुके व बीजुकदंडांचे प्रकार आणि सलिंग प्रतोत्पादक इंद्रिये इ. बाबींना वर्गीकरणात महत्त्व दिले जाते.

(१) श्लेष्मकवक : (इं. स्लाइम फंजाय लॅ. मायसिटोझोआ, मिक्सोमायकोफायटा). शाकीय अवस्थेत यांचे शरीर नग्न प्राकलयुक्त असून त्यात अनेक प्रकल असतात त्याला प्राकलपुंज म्हणतात. काही जातींत एकाच प्राकलाच्या कोशिका असून इतर जातींत त्या प्रथम स्वतंत्र व नंतर एकत्र येऊन संयुक्त प्राकलपुंज बनतो, त्याला आभासी प्राकलपुंज म्हणतात, कारण त्याचे एकप्रकल घटक पूर्णपणे एकरूप होत नाहीत. प्राकलपुंजाचा रंग पांढरा, पिवळा किंवा गडद गुलाबी असून तो आदिजीवाप्रमाणे (अमीबाप्रमाणे) ओलसर जागी व मंद प्रकाशात सरपटत जातो. या हालचालीचा व्याप काही थोडे चौ. सेंमी. पासून जास्तीत जास्त एक चौ. मी. पर्यंत असतो.


आ. १.कवकांचे विविध प्रकार : श्लेष्मकवच:फायसॅरम (१) प्राकलपुंज, (२) बीजकोशदंडक, (३) बीजुक अंकुरण (४) श्लेष्मादिजीव, (५) गंतुबीजुक (६) प्लॅस्मोकार्प, फुलिगो, (७) उपधानक, (८) सूक्ष्म धागे व बीजुके. या हालचालीत त्याचा संपर्क काही घन अन्नकण, बीजुके, कार्बनी पदार्थ इत्यादींशी येताच तो त्यांना आत्मसात करतो. प्राकलात अनेक रिक्तिका आढळतात या अवस्थेत तो वाढतो. भोवताली रुक्षता आली की, सर्वच पुंजापासून अनेक बहुप्रकल व आवृत खंड बनतात, त्यांस जालाश्म म्हणतात. या विश्रामी अवस्थेत तो पुंज काही वर्षेही तसा राहतो पुढे पाणीपुरवठा झाल्यास पुन्हा पूर्ववत प्राकलपुंज पोषण व वृद्धी चालू करतो. त्यानंतर पुढे प्राकलपुंज कोरड्या जागी व अधिक प्रकाशात येतो व त्याच्या पृष्ठावर काही ठिकाणी फुगवटे येऊन तेथे बीजुककोश बनतात. ते कधी देठावर बनतात व एकेकटे किंवा समूहाने असतात. काही जातींत बीजुककोशात एकप्रकल बीजुके व त्यांमधून सूक्ष्म धाग्यांचे जाळे बनते त्यांच्या हालचालीमुळे बीजुके पृष्ठभागी आणली जातात व वाऱ्‍याने इतरत्र पसरतात. पाण्याच्या सान्निध्यात बीजुके रुजून कोशिकावरणातून नग्न, एकगुणित, प्रकलयुक्त, चर, प्राकलघटक म्हणजेच श्लेष्मादिजीव बाहेर पडतात. काही जातींत या श्लेष्मादिजीवांवर एक किंवा दोन केसासारखी प्रकेसले असतात व त्यांच्या साहाय्याने हा हालचाल करतो. यातल्या प्रकलाचे समविभाजन होऊन अनेक श्लेष्मादिजीव बनतात. काही जातींत यापासून सकेसल चरबीजुके बनतात. यानंतर ही चरबीजुके जोडीने संयोग पावतात किंवा प्रथम श्लेष्मादिजीव बनून नंतर त्यांचे मीलन होते. यात सूक्ष्म अंतस्थ लिंगभेद असावा असे दिसते. यापुढची अवस्था म्हणजे आरंभी उल्लेखिलेला प्राकलपुंज होय. ही एकगुणित अवस्था असते. ही बहुप्रकल प्राकलावस्था प्रयोगशाळेत जगवता व वाढवता येते. यामध्ये कोशिकावरणाचा मृत पदार्थ नसल्याने ती तात्कालिक रासायनिक विश्लेषणाकरिता प्रायोगिक पदार्थ म्हणून फार सोईस्कर ठरली आहे. तसेच संवेदना, चेतना व प्राकलसंश्लेषण (प्राकल कृत्रिम रीत्या तयार करणे) यांच्यासंबंधीच्या संशोधनास हा जीव उत्कृष्ट ठरला आहे.  

या कवकांपैकी जीवोपजीवी जातींचा व आभसी पुंजधारींचा समावेश शैवलकवकांत करावा असे काहींचे मत आहे. तथापि श्लेष्मकवकांचे (अ) मिक्सोमायसिटी, (आ) प्लॅस्मोडिफोरेसी व (इ) ॲक्रेसी असे तीन वर्ग मानतात. यांपैकी पहिल्यात एकूण सु. ६० वंश व ४०० जाती असून एक्सोस्पोरी व एंडोस्पोरी असे दोन उपवर्ग आहेत. काही जातींत (उदा., फुलिगो) सर्वच प्राकलपुंजावर आवरण बनून त्याचा जाड चकतीसारखा आकार होतो व त्यात असंख्य बीजुके बनतात, त्याला उपधानक म्हणतात. इतर काही वंशांत (उदा., फायसॅरम) प्राकलपुंजाची जाळीसारखी रूपरेखा टिकून राहिल्याने त्याला प्लॅस्मोकार्प म्हणतात. (आ) प्लॅस्मोडिफोरेसी वर्गात सर्व जाती जीवोपजीवी असून आश्रय वनस्पतीच्या शरीरात प्रजोत्पादक व आवृतबीजुके निर्माण करतात. ही बीजुके रुजून त्यांतून द्विकेसल चरबीजुके बाहेर येतात व ती पुन्हा नवीन आश्रय वनस्पतीत शिरून चरितार्थ चालवितात. प्लॅस्मोडिफोरा ब्रॅसिकी या जातीपासून कोबी व फुलवर यांना मुळावरील गाठीकूज रोग होतो. त्यांची मुळे प्रथम लठ्ठ व गदेप्रमाणे होऊन पुढे कुजून जातात. या वर्गात सु. ८–१२ वंश आहेत. (इ) ॲक्रेसी वर्गात सु. ९ वंश व २५ जाती असून प्राकलपुंज आभासी असतो. बीजुके केसलहीन असून सर्व जाती प्राण्यांच्या विष्ठेवर जगतात. बीजुककोशांना देठ असतात. 

(२) सत्यकवक : (यूमायकोफायटा). या विभागात सु. ३,७०० वंश व २६,००० जातींचा समावेश असून त्यांना शाकीय अवस्थेत कोशिकावरण असते. फार थोड्यांमध्ये शरीर एककोशिक असून इतरांत तंतूंचे कवकजाल बनलेले असते. काहींत तंतूंचा फक्त पुंजका, तर इतर काहींत अनेककोशिक तंतूंचे निश्चित आकार व संरचना असलेले शरीर व आभासी ⇨मृदूतक आढळतात. या विभागात पुढील चार वर्ग असून त्यांमध्ये पूर्ण बीजुके (व पूर्ण अवस्था) व कवकजाल यांची संरचना यांना महत्त्व दिले आहे : (अ) शैवलकवक, (आ) धानीकवक, (इ) गदाकवक व (ई) अपूर्ण कवक. 

(अ) शैवलकवक : या कवकांचे शैवलांशी असलेले साम्य लक्षात घेऊन बारी यांनी प्रथम त्यांचे नामाभिधान केले. यांचे सध्या सु. २४० वंश व १,१०० जाती नोंदल्या आहेत. त्यांपैकी अनेक जाती पाण्यात, काही जमिनीत व अनेक जमिनीवरच्या प्रदेशांत असून त्यांचे शवोपजीवी व जीवोपजीवी असे दोन्ही प्रकार आढळतात. पाण्यातील शवोपजीवी कवके मेलेल्या मत्स्यांवर व कीटकांवर अथवा वनस्पतींच्या अवशेषांवर जगतात, तर जीवोपजीवी जलकवके शैवलांवर किंवा फुलझाडांवर वाढतात. तसेच स्थलवासी (जमिनीवर राहणारी) शवोपजीवी कवके जमिनीत किंवा जमिनीवरच्या मृतावशेषांवर आणि जीवोपजीवी कवके सजीवांवर वाढून शेवटी त्यांच्या नाशाला कारणीभूत होतात. ह्या कवकांचे शरीर बहुधा एकाच बहुप्रकल कोशिकेचे बनलेले असून काहींत बीजुके व गंतुके सर्वच प्राकलापासून बनतात व तिचे बीजुककोशात रूपांतर होते, तर बहुतेकांत प्रजोत्पादक भाग इतर भागांपासून भित्तीने वेगळा होतो. बीजुके बहुधा असंख्य असून पाण्यातील जातींत त्यावर प्रकेसल (एक किंवा अधिक) असते. सलिंग प्रजोत्पादन दोन सारख्या किंवा भिन्न गंतुकांतील प्राकलांचा संयोग होऊन बनणाऱ्या रंदुकांच्या साहाय्याने होते हे रंदुक (किंवा गंतुबीजुक) थोड्याफार प्रसुप्तावस्थेनंतर (निष्क्रिय अवस्थेनंतर) रुजतात व त्यांत न्यूनीकरण-विभाजन होऊन नंतर त्यांपासून एकगुणित बीजुके बनतात ती पाणी व वाऱ्याने पसरली जाऊन कवकांचा प्रसार होतो एकगुणित व द्विगुणित अवस्थांचे एकांतरण बहुधा आढळते.

आ. २. शैवलकवक :(अ) पिथियम:(१)कवकजाल, (२) बीजुककोश, (३)बीजुककोशाचे अंकुरण, (४)चरबीजुक, (५)अंदुकाशय, (६) रेतुकाशय, (७)रंदुकाचे अंकुरण. (आ) म्यूकर : (१) कवकजाल, (२) बीजुककोश, (३)बीजुके, (४)धन व ऋण गंतुकाशयांचा संयोग, (५)गंतुबीजुक. (इ) ऱ्हायझोपस :(१) कवकजाल, (२)बीजुककोश, (३)बीजुके. (ई)फायटोप्थोरा :(१)करपा पडलेले बटाट्याचे पान, (२) पानाचा छेद, (३) बीजुककोशदंड व बीजुककोश, (४) चरबीजुके.


सलिंग प्रजोत्पादनातील फरक (समयुती व असमयुती) लक्षात घेऊन या वर्गाचे पूर्वी दोन उपवर्ग (ऊमायसिटी व झायगोमायसिटी) करीत, परंतु त्यापेक्षा प्रकेसलांच्या संख्येवर किंवा अभावावर वर्गीकरण करणे हे त्यांच्या जातिविकासाला धरून असल्याने हल्ली त्याप्रमाणे तीन उपवर्ग केले आहेत : (१) एकप्रकेसल: (युनिफ्लॅजेलेटी) चरबीजुके आणि चरगंतुके यांच्या पश्चभागांवर एकच प्रकेसल असल्यास एकप्रकेसल म्हणतात. यांचे कोशिकावरण बव्हंशी कवक-तूलीरमय असून त्यात तीन गण, सु. ८५ वंश व ४५० जाती नमूद आहेत. सिनकायट्रियम वंशातील काही जातींपासून बटाट्यांवर गाठी येतात, तसेच भारतातील तूर, मूग, भेंडी,वांगे इ. पिकांना त्यांच्यापासून रोग होतो. (२) द्विप्रकेसल : (बायफ्लॅजेलेटी). चरबीजुकांवर दोन प्रकेसल असून सलिंग प्रजोत्पादन अचर गंतुकाद्वारे होते कोशिकावरण बव्हंशी तूलीरमय असून शवोपजीवन सामान्य असते. यात चार गण, ५० वंश व ४०० जाती आहेत. काही जाती पाण्यात मृत मत्स्यांवर आणि माशांच्या अंड्यांवर जगतात व काही ओलसर जमिनीत आढळतात. काही जीवोपजीवी जाती स्थलवासी प्राण्यांवर व वनस्पतींवर तर काही शवोपजीवी जाती मृत जैव पदार्थांवर वाढतात. काही जातींत विबीजुकासारख्या बीजुककोशांतून चरबीजुके बाहेर पडतात. मुळा, पोकळा, आघाडा इत्यादींच्या पानांवर अल्बुगो वंशातील जातीपासून ‘पांढऱ्‍या तांबेऱ्‍याचा’ रोग होतो. आले, अहाळीव, पपई इत्यादींवरचा ‘पायकूज’ रोग पिथियमच्या जातींपासून होतो व त्यापासून ही पिके नाश पावतात. कधी पानांतून कवकरोगाचे अनेक तंतू बाहेर येऊन त्यावर भुरकटपणा आणतात, त्यास ‘तंतुभुरी’ म्हणतात. उदा., द्राक्षवेली वरची भुरी (प्लॅस्मोपॅरा विटीकोला),बटाट्यांच्या पानांवरील करपा (फायटोप्थोरा इन्फेस्टॅन्स), सुपारीवरील ‘कोलेरोग’ (फायटोप्थोरा ॲरेकी) इत्यादी. (३) अप्रकेसल : (एफ्लॅजेलेटी). यामध्ये प्रजोत्पादक कोशिका अचर (प्रकेसल नसल्याने) असून कोशिकावरण कवक-तूलीरमय असते. यात बीजुके व विबीजुके असतात. गंतुके आदिजीवसदृश गण दोन,वंश सु. ७० व जाती ३५०. यांपैकी म्यूकर व ऱ्‍हायझोपस या शवोपजीवी काळ्या बुरशींमुळे अनेक खाद्य पदार्थ  बिघडतात. एंपूसामुसीमुळे घरातील माश्यांना रोग होऊन त्या मरतात.

(आ) धानीकवक : मागे सांगितल्याप्रमाणे या कवकांत सलिंग प्रजोत्पादनानंतर रंदुकापासून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एक किंवा अनेक पिशवीसारख्या धानीकोशिका बनतात व अनेक जातींत त्यांभोवती वंध्यतंतूचे आवरण बनून बंद किंवा उघडे धानीफल तयार होते. धानीजनक तंतू व धानीफल यांची विविधता लक्षात घेऊन या कवकांचे वर्गीकरण केले आहे. कवकतंतूत सच्छिद्र भिंती व कोशिकांत एक किंवा दोन प्रकल असतात. आभासी ऊतके व विबीजुके असून धानीकोशिकांत (चार किंवा आठ) धानीबीजुके आढळतात.

चरगंतुके नसतात विषमजालकता अनेकदा आढळते. धानीबीजुके बनण्यापूर्वी न्यूनीकरण-विभाजन झाल्याने ती एकगुणित असतात पिढ्यांचे एकांतरण आढळते. काही जाती जीवोपजीवी असून इतर स्वोपजीवी (साध्या पदार्थापासून अन्न पदार्थ तयार करू शकणाऱ्‍या) वनस्पतींच्या शरीरांत (उदा., अरगट) किंवा पानांवर (उदा., चूर्णभुरी) वाढतात यामुळे रोग होतो. कित्येक शवोपजीवी असून कुजकी फळे, मांस, मृत पालापाचोळा, लाकडी ओंडके इत्यादींवर वाढतात (उदा., पिवळ्या व हिरव्या बुरशी, झायलॅरिया, पेझिझा इ.) या कवकांत दोन उपवर्ग (हेमिऍस्कोमायसिटी व युऍस्कोमायसिटी), सु. १,६६० वंश व १२,००० जाती आहेत. पहिल्यात धानीजनक तंतू व धानीफलाचा अभाव असतो. उदा., यीस्ट व हळदीवरचा टिक्का रोग (टॅफ्रिना मॅक्युलॅन्स कवकामुळे झालेला). दुसऱ्‍या उपवर्गात धानीजनक तंतू व त्याभोवती बनणारे धानीफल असते. यासंबंधीचा तपशील विचारात घेऊन या उपवर्गाचे तीन मुख्य गट व अनेक गण केले आहेत. मुक्त धानीफल व त्यात गोलसर धानीकोशिका अनियमितपणे विखुरलेल्या असणाऱ्‍या पहिल्या गटातील (प्लेक्टोमायसिटीज) एका गणात ॲस्परजिलस व पेनिसिलियम या सामान्य व शवोपजीवी वंशांचा समावेश असून त्या बुरशीप्रमाणे अनेक कार्बनी पदार्थांवर (उदा., पाव, भाकरी, कोंडा, शर्करायुक्त द्रव पदार्थ इ.) वाढून त्यांचे रूपांतर घडवून आणतात. त्यांचे पुंजके तपकिरी (ॲस्परजिलस) किंवा निळसर हिरवे (पेनिसिलियम) दिसतात. यांची विबीजुके साखळीप्रमाणे येतात. ॲस्परजिलसच्या भिन्न जातींपासून काही वितंचके, कार्बनी अम्ले व ‘साके’ नावाचे जपानी मद्य बनवितात. त्यांच्यामुळे काही कर्णरोग व फुप्फुसाचा रोग मनुष्यांना होतो. पेनिसिलियमपासून पेनिसिलीन हे प्रसिद्ध प्रतिजैव औषध मिळवितात.

आ. ३. धानीकवच : (अ) ॲस्परजिलस : (१)विबीजुकदंड (२)विबीजुके, (३)रेतुकाशयी तंतूने वेढलेले अंदुकाशय. (आ)पेनिसिलियम : (१)शाखित विबीजुकदंड, (२) धानीफल, (३)धानीकोशिका, (४)धानीबीजुक. (इ)यीस्ट :(१)संयोगी कोशिका, (२) गंतुबीजुक (३) धानीकोशिका, (४)धानीबीजुक, (५) कोशिकांची माळ. (ई) अरगट: (१) गवताची ओंबी (अरगटसह), (२)जालाश्म, (३)पीठिका, (४)पीठिकेचा उभा छेद, (५) धानीफल, (६)धानीकोशिका, (७)धानीबीजुक. (उ)अन्सिन्यूला : (१) कवकतंतू, (२) धानीफल. (ऊ) पेझिझा : धानीफल.

चूर्णभुरी किंवा भुरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या व काही वनस्पतींच्या पानांवर भुरकट थर पसरणाऱ्‍या रोगकारक कवकांचा त्याच गटातील दुसऱ्‍या गणात (एरिसायफेलीझमध्ये) समावेश होतो. या कवकांची उदाहरणे म्हणजे वाटाण्यावरची भुरी (एरिसायंफे पॉलिगोनाय) व द्राक्षावरची भुरी (अन्सिन्यूला निकेटर),तसेच काकडी, टोमॅटो, तूद इत्यादींवरच्या भुरी (एरिसायफेच्या इतर जातींमुळे आलेल्या) होत.


न्यूरोस्पोरा (लाल बुरशी) पाव भाजण्याच्या भट्टीत एकवेळ आढळे ती नुकसानकारक ठरल्याने तिचे नियंत्रण बव्हंशी झाले आहे. क्लॅव्हिसेप्स पुर्पुरिया (अरगट) ही जीवोपजीवी जाती अनेक जंगली व लागवडीतल्या गवतांवर वाढते व त्यांच्या फुलांतून तिचा शिंगासारखा जाड व काळा जालाश्म डोकावतो यामुळे पिकाचे नुकसान तर होतेच, शिवाय हा खाण्यात आल्यास मनुष्यांना व गुरांना विषारी ठरतो. त्यातील अरगटीन द्रव्य गर्भाशयाच्या आकुंचनाकरिता स्त्रियांना देतात. हा जालाश्म आश्रय वनस्पतींपासून खाली शेतात पडून रुजतो व त्यातून अनेक पीठिका येतात व त्यामधील धानीफलातून सुईसारखी धानीबीजुके बाहेर पडतात व गवताच्या नवीन रोपात रुजून कवकजाल वाढू लागते [→ अरगट]. पेझिझा या शवोपजीवी कवकाचे मुक्त धानीफल पेला किंवा बशीसारखे उघडे असून त्यातून बाहेर आलेली धानीबीजुके जमिनीतील कार्बनी पदार्थांवर रुजून कवकजाल बनते, परंतु धानीफल जमिनीवर येते. काही जाती म्हशीच्या शेणावर वाढतात. हेल्वेला व मोर्शेला [इं. मोरेल, → भूछत्रे] या वंशांतील काही जाती उत्तर भारतात आढळतात. मोर्शेला एस्क्युलेंटा खाद्य आहे, तसेच ट्रफल्स (ट्युबर वंश) हे भूमिगत धानीफलांचे शवोपजीवी कवक असून काही जाती खाद्य आहेत. [→ ट्रफल्स]. या सर्व कवकांचा समावेश दुसऱ्‍या आणि तिसऱ्‍या गटांत परंतु भिन्न भिन्न गणांत केला असून त्यांमध्ये पलिघासारख्या धानीफलातून, धानीबीजुके त्यावर पडणाऱ्‍या भोकातून किंवा फटीतून(पायरिनोमायसिटीज) किंवा मुक्त धानीफलातून (डिस्कोमायसिटीज) बाहेर पडतात.

(इ) गदाकवक : (इं. क्लब फंजाय लॅ. बॅसिडिओमायसिटीज). यांचे कवकतंतू एक किंवा द्विप्रकलयुक्त असून त्यांना अनुक्रमे प्राथमिक व द्वितीयक म्हणतात. प्राथमिक तंतूंचे कवकजाल अमर्याद वाढू शकते व त्यावर विबीजुके किंवा बीजुके येतात. द्वितीयक प्रकारच्या तंतूंच्या कवकजालापासून प्रथम विशिष्ट प्रकारच्या गदेसारख्या कोशिका (बॅसिडिया) बनतात. त्यांतील दोन प्रकलांचा संयोग व नंतर न्यूनीकरण-विभाजन होऊन त्या कोशिकेवर दोन किंवा चार एकगुणित विबीजुके (गदाबीजुके) येतात. ती रुजून पुन्हा नवीन एकगुणित प्राथमिक कवकजाल बनते. गदाकोशिका निर्माण होण्यापूर्वी दोन प्राथमिक कवकतंतू, एकाच तंतूच्या दोन जवळच्या कोशिका, एक तंतू व पुं-प्रकल, दोन विबीजुके किंवा दोन गदाबीजुके यांच्या सलिंग संयोगाने द्विगुणित कवकतंतू बनतात. या वर्गात सलिंग प्रजोत्पादन इंद्रियांचा ऱ्‍हास झाला असला, तरी प्रकलयुती व प्रकलसंयोग आणि पिढ्यांचे एकांतरण आढळते विषमजालकातही असते. गदाकोशिकांत केव्हा केव्हा आडवे किंवा उभे पडदे असतात. या सर्व लक्षणांचा उपयोग वर्गीकरणात केला जातो धानीकोशिका व गदाकोशिका यांतील साम्यावरून गदाकवके धानीकवकांपासून अवतरली असावीत अशी एक विचारसरणी आहे. या दोन्ही वर्गांचा क्रमविकास शैवलकवकांपासून स्वतंत्रपणे झाला असावा असेही कोणी मानतात. यात सु. ५३५ वंश व १३,५०० जाती अंतर्भूत आहेत.

गदाकवकांचे दोन मुख्य उपवर्ग केले असून एकात (होमोबॅसिडिओमायसिटीमध्ये) गदाकोशिका अखंड असून गदाफल बहुधा स्पष्ट असते दुसऱ्‍यात (हेटेरोबॅसिडिओमायसिटीमध्ये) गदाकोशिका आडव्या किंवा उभ्या भित्तींनी विभागलेल्या असून गदाफले विविध असतात. पहिल्या उपवर्गाचे दोन गट (हायमेनोमायसिटीज व गॅस्ट्रोमायसिटीज) केले असून एकात गदाकोशिका पहिल्यापासून किंवा पक्वावस्थेत उघड्या असतात, तर दुसऱ्‍या गटात त्या पक्वावस्थेपूर्वी गदाफलात झाकलेल्या असतात. पहिल्या गटात गदाफलांचा अभाव असलेले(एक्झोबॅसिडीएलीझ) व गदाफल असलेले (अगॅरिकेलीझ) असे दोन गण आहेत, यांपैकी काही कवकांची उदाहरणे पुढे दिली आहेत.

एक्झोबॅसिडीएलीझपैकी एक्झोबॅसिडियम वंशातील अनेक जाती भारतात चहा, तमालपत्र वगैरेंवर जगतात व रोग उत्पन्न करतात.

अगॅरिकेलीझमध्ये सर्व शवोपजीवी जाती असून त्यांचे पाच गट (कुले) केले आहेत. (१) चर्मकवक : (इं. लेदर-फंजाय लॅ. थेलेफोरेसी). गदाफल चिवट, सपाट खपलीसारखे आणि एका बाजूस चिकटलेले किंवा उभे असते उदा.,स्टेरियम यामुळे लाकूड कुजते. (२) प्रवाळकवक : (इं. कोरल-फंजाय लॅ. क्लॅव्हेरिएसी).गदाफल पोवळ्याप्रमाणे असून उभे, साधे किंवा शाखायुक्त असते क्लॅव्हेरियाच्या जाती पांढऱ्‍या किंवा शेंदरी असून ओल्या लाकडांवर येतात. (३) शूलकवक : (इं. स्पाइन-फंजाय लॅ. हिद्नेसी). गदाफलाच्या सपाट भागावर काटे असतात हिद्नमच्या जाती सामान्यपणे वृक्षांच्या खोडांवर आणि लाकडी ओंडक्यांवर येतात. (४) बहुच्छिद्रकवक : (इं. पोअर-फंजाय लॅ. पॉलिपोरेसी). गदाफल मांसल, चिवट किंवा ठिसूळ, कठीण, सपाट,अर्धवतुळाकृती किंवा घोड्याच्या खुरासारखे दिसते. फोम्स, गॅनोडर्मा, पॉलिपोरस इत्यादींच्या जाती सामान्य असून काही औषधांकरिता वापरतात. (५) पटलकवक : (इं. गिल-फंजाय लॅ. अगॅरिकेसी). गदाफलावर अनेक उभे पडदे असलेले छत्र व त्याखाली बहुधा लहान मोठा दांडा असतो. [→ भूछत्रे] प्रसार सामान्य व काही जाती खाद्य, काही विषारी व काही औषधी असतात.

आ. ४. गदाकवक : (अ)काणी :(१)पूर्णबीजुक, (२)गदाकोशिका, (३)गदाबीजुके,(४)दोन गदाकोशिकांचा संयोग, (५)गदाकोशिकांतील शेजारच्या प्राकलांचा संयोग. (आ) तांबेरा : (१) गव्हाच्या पानांवरचे ठिपके, (२)युरिडोबीजुक, (३)टेलिओ बीजुक, (४)गदाबीजुके व गदाकोशिका, (५)बार्बेरीचे पान व त्यावरील ठिपके, (६)ॲसिडिओ बीजुक. (इ)जीॲस्टर, (ई)क्लॅव्हेरिया, (उ) गॅनोडर्मा :(१)वरचा भाग, (२)छेद. (ऊ) स्टेरियम, (ए)हिद्नम, (ऐ)नीडुलॅरिया, (ओ) ऑरिक्युलॅरिया, (औ)पूतिकवक.


गॅस्ट्रोमायसिटीजमध्ये गदाफल शेवटपर्यंत बंद असते, परंतु पुढे उघडते. सर्व जाती शवोपजीवी असून भूकंदुके(इं. पफबॉल), भूतारका (इं. अर्थस्टार, जीॲस्टर), नीडकवक (पक्ष्यांच्या घरट्याप्रमाणे, नीडुलॅरिया). अत्यंत दुर्गंधी व साधारण भूछत्रासारखे दिसणारे पूतिकवक (इं. स्टिंकहॉर्न-फंजाय लॅ. फॅलेसी) इ. विविध प्रकार आढळतात.

 हेटेरोबॅसिडिओमायसिटी : यामध्ये गदाफल विविध असून गदाकोशिका आडव्या किंवा उभ्या भित्तींनी विभागलेल्या असतात. काही जातींत ते फल मऊ, श्लेष्मल व लिबलिबीत असते पण सुकल्यावर कडक होते. ऑरिक्युलॅरिया हे कवक मनुष्याच्या कानाप्रमाणे दिसते काही जातींत बशीप्रमाणे असते. काणी (इं. स्मट लॅ. उस्टिलॅजिनेलीझ) व तांबेरे (इं. रस्ट लॅ. युरेडिनेलीझ) जीवोपजीवी असून त्यांचे गदाफल नसते त्यांपैकी काहींत विविध प्रकारची पूर्ण व अपूर्ण बीजुके आढळतात. पूर्ण बीजुके रुजून त्यांतून गदाकोशिका येते. ती आडव्या भिंतींनी विभागल्यावर प्रत्येक कोशिकेतून एक गदाबीजुक निघते व त्यापासून एकप्रकल कवकजाल बनते (उदा., तांबेरे). काणीमध्ये काहींत गदाकोशिका न विभागता गदाबीजुके बनतात. कधी ही अनेक असतात, तर कधी त्यांचा दुसऱ्‍याशी संयोग होतो, तर आणखी कधी गदाकोशिका बीजुकाऐवजी तंतूच निर्माण करतात. दोन्हींत एकगुणित व द्विगुणितांचे एकांतरण आढळते. काणीपासून (वंश ४० व जाती ६,०००) पिके,फुलझाडे आणि जंगली वनस्पतींना रोगबाधा होते. मनुष्याने कवकनाशके वापरून अशा रोगांचे नियंत्रण केले आहे. स्फॅसिलोथिका (जोंधळ्यावर), उस्टिलॅगो (गहू आणि मक्यावर), टायलेशिया (गव्हावर) इ. वंश काणीमध्ये येतात. पक्सिनिया (गव्हावर), मेलँप्सोरा (अळशीवर), यूरोमायसीज (चमेली, कुसर, कोरफड इत्यादींवर) व हॅमेलिया (कॉफीवर) इ. वंशांतील तांबेरे सामान्यपणे आढळतात.

(ई) अपूर्ण कवक : (लॅ. फंजाय इंपरफेक्टाय ड्युटेरोमायसिटीज). या कवक-विभागात सध्या सु. १,३०० वंश व ११,००० जाती समाविष्ट असून त्यांमध्ये पूर्णावस्था अस्तित्वात नाही किंवा अद्याप आढळलेली नाही. ती अवस्था नोंदल्यावर ती जाती विशिष्ट लक्षणांप्रमाणे इतर विभागात ठेविली जाते (उदा., न्यूरोस्पोरा, अरगट इ.). अपूर्ण अवस्थेवरूनही कधी वैशिष्ट्यांमुळे त्या जातीचे आप्तभाव निश्चित कळतात (उदा.,पेनिसिलियमच्या काही जाती, काही तांबेरे इ.) बीजुके बहुधा आढळतात. परंतु कधी फक्त वंध्य कवकजालच आढळते (उदा., काही संकवक), त्यावेळी त्यांना मायसिलिया स्टरीलिया या वर्गात घालतात. काही अपूर्ण कवकांपासून इतर वनस्पतींना रोग होतात. उदा., पेस्टालोशिया थीयामुळे चहाच्या पानांवर ठिपके पडून ती गळून पडतात. आल्टर्नेरिया सोलॅनीमुळे बटाट्यांच्या पानांवर चट्टे (करपा) येऊन ती लवकर वाळून जातात. फ्युजेरियममुळे तुरीची पाने अवेळी पिवळी होऊन पडतात, त्याला ‘मर’ म्हणतात. टीनियामुळे होणारा खेळाडूंचा पदरोग या सदरात येतो. बीजुकांच्या आधार-पद्धतीवर केलेले तीन गण येथे समाविष्ट आहेत (मोनिलिएलीझ,मेलँकोनिएलीझ, स्फेरोप्सिडेलीझ). क्रिप्टोकॉकेलीझ या नव्या गणात काहींनी यीस्टचा  (सॅकॅरोमायसीजचा) अंतर्भाव केला आहे, पण त्याबद्दल मतभेद आहे. स्ट्रेप्टोमायसीज वंशाचा अंतर्भाव काहींनी या विभागात केला असून इतर काहींनी सूक्ष्मजंतूत केला आहे. त्यापासून स्ट्रेप्टोमायसीन हे प्रतिजैव औषध काढतात.

पहा : अरगट ॲस्कोमायसिटीज ऍस्परजिलस करपा कवकनाशके काणी कायकवनस्पति केवडारोगजीवोपजीवन तांबेरा पुरावनस्पतिविज्ञान पेनिसिलियम प्रतिजैवपदार्थ फंजायइंपरफेक्टायफायकोमायसिटीज बॅसिडिओमायसिटीज बुरशीभूछत्रे यीस्ट वनस्पतिरोगविज्ञान शवोपजीवनशैवले शैवाक. 

संदर्भ : 1. Bessey, E. A. Morphology and Taxonomy of Fungi, London and New York, 1964.

     2. Butler, E. J. Bisby, G. R. Revised by Vasudeva, R. S. The Fungi of India, Indian Counsil of Agricultural Research, New Delhi, 1960.

     3. Gwynne – Vaughan, H. C. I. Barnes, B. The Structure and Development of the Fungi,Cambridge, 1962.

    4. Smith, G. M. Cryptogamic Botany, Vol. I, Tokyo, 1955.

परांडेकर, शं.आ.