डेंटॅलियम : मॉलस्का (मृदुकाय प्राण्यांच्या) संघाच्या स्कॅफोपोडा वर्गातील प्राणी. डेटॅलियम हे वंशवाचक नाव असले, तरी या वंशातील सर्व जातींच्या प्राण्यांना डेंटॅलियम म्हणण्याचा प्रघात आहे.

डेंटॅलियमाची संरचना : (१) संवेदी तंतू, (२) मुख, (३) प्रमस्तिष्क-गुच्छिका, (४) पार्श्वगुच्छिका, (५) जठर, (६) जनन ग्रंथी, (७) पचन ग्रंथी, (८) वृक्क, (९) गुदद्वार, (१०) अंतस्त्य-गुच्छिका, (११) कवच, (१२) प्रावारगुहा, (१३) प्रावार, (१४) पाद-गुच्छिका, (१५) पाद.

डेंटॅलियम  समुद्री प्राणी असून सामान्यतः उथळ पाण्यात राहतात, पण समुद्राच्या ४,५७० मी. खोलीपर्यंतही ते आढळतात. शरीर लांबट व द्विपार्श्वसममित (एका पातळीने शरीराचे दोन सारखे भाग होतात असे) असून प्रावाराने (कवचाच्या लगेच खाली असणाऱ्या त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीने) वेढलेले असते. प्रावाराच्या बाहेरनळीसारखे कवच असून ते दोन्ही टोकांशी उघडे, किंचित बाकदार आणि निमुळते असते. अग्र टोक रुंद व पश्च बारीक असते. हा प्राणी वाळूत तिरकस पुरलेला असतो, पण पश्च भाग वाळूच्या बाहेर पाण्यात असतो. पाद लांब असून तो ताणून अग्र टोकावरील मोठ्या छिद्रातून बाहेर काढता येतो. पादाचा उपयोग खणण्याच्या कामी होतो. बारीक टोकावरील छिद्रातून श्वसनाकरिता लागणारे पाणी आत शिरते व याच छिद्रामधून विष्ठा आणि इतर निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकले जातात. शीर्ष स्पष्ट नसते. ते व पाद अग्र टोकाजवळ असून शीर्ष पादाच्या वर असते. शीर्षावर दोन पाली (खंड) असतात व त्यांच्यावर लांब संवेदी तंतू असतात त्यांचा उपयोग लहान भक्ष्य-जीव पकडण्यासाठीही होतो. 

मुख मुखगुहेत (मुखाच्या पोकळीत) उघडते आणि तिच्या तळावर रेत्रिका (भक्ष्य किसण्याकरिता उपयोगी पडणारी दातांच्या ओळी असलेली मुखातील आखूड व रुंद कायटिनी पट्टी) असते. ग्रसिकेतून (घसा व जठर यांतील अन्नमार्गाच्या भागातून) अन्न जठरात जाते. पचन ग्रंथी द्विपाली (दोन खंडांची) असून तिच्या वाहिन्या जठरात उघडतात. गुदद्वार पादाच्या बुडाच्या मागे अधर (खालील) प्रावारगुहेत उघडते. हृदय अल्पवर्धित (थोडी वाढ झालेले) असते खऱ्या रुधिर-वाहिकांच्याऐवजी लहान-मोठी कोटरे (अनियमित आकाराच्या पोकळ्या अथवा खळगे असतात. प्रावार श्वसनाचे कार्य करतो. शरीराच्या मध्याधर भागात दोन वृक्क (मूत्रपिंडे) असून ते गुदद्वाराच्या प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे बाहेर उघडतात. तंत्रिका तंत्रात (मज्जासंस्थेत) युग्मित (जोडीने असणाऱ्या) प्रमस्तिष्क-गुच्छिका (मेंदूचे कार्य करणारा तंत्रिका पेशींचा पुंज), पार्श्व (बाजूच्या) गुच्छिका, पाद-गुच्छिका, अंतस्त्य- गुच्छिका (अंतर्गत इंद्रियांतील गुच्छिका) आणि प्रमस्तिष्क-गुच्छिका व पार्श्व- गुच्छिका यांना पाद- गुच्छिकांशी जोडणाऱ्या लांब संयोजकांचा (जोडणाऱ्या तंत्रिकांचा) समावेश होतो. पादामध्ये संतुलन-पुटी (अवकाशातील स्थान समजण्यासाठी उपयुक्त असणारे ज्ञानेंद्रिय) असते. लिंगे भिन्न असतात. वृषण (शुक्राणू निर्माण करणारी ग्रंथी) किंवा अंडाशय एकच असतो आणि तो वाहिनीच्या द्वारे उजव्या वृक्कात उघडतो. मादी पाण्यात अंडी घालते आणि तेथेच त्यांचे निषेचन (फलन) होते. ट्रोकोफोर डिंभवस्था (भ्रूणानंतरची स्तंत्रपणे जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) असते.

कर्वे, ज. नी.