लामचित्ता

लामचित्ता : याचा समावेश फेलिडी (मार्जार) कुलात होत असून निओफेलिस नेब्युलोसा असे याचे शास्त्रीय नाव आहे. याचा प्रसार नेपाळ व सिक्कीमच्या पूर्वेस, दक्षिण चीन, हैनान, तैवान आणि इंडोनेशियाच्या दक्षिणेस, मलेशिया येथे आहे. हा अरण्ये, झुडपाळ जंगले व दलदलीच्या प्रदेशांतही आढळतो. मोठा नर डोके, शरीर व शेपटीसहित १९५ सेंमी. लांब व १८-२० किग्रॅ. वजनाचा असतो. याचे शरीर व शेपटी लांब असते व पाय आखूड असून कान काळे व गोलसर असतात. कानांवर एक करडसर ठिपका असतो. याच्या पायांची संरचना बरीचशी वाघ व सिंहाच्या पायांच्या रचनेसारखी असते. याचे पंजे रुंद असतात. हा वृक्षवासी असूनही पंजे कडक असतात. कवटीची संरचना व दातांची संख्या हा याच्यात व वाघ-सिंहात मुख्य फरक आहे. याच्या वरच्या सुळ्यांची वाढ बरीच झालेली असते. त्यावरून निर्वंश झालेला आणि मोठाले सुळे असलेला (सेबर टुथ्‌ड) वाघ व सध्या अस्तित्वात असलेले वाघ-सिंह यांसारखे प्राणी यांच्यामध्ये जवळचे नाते असल्याचा पुरावा मिळतो.

लामचित्त्याच्या अंगावरील खुणांमुळे तो सुंदर व त्याच्यासारख्या इतर प्राण्यांपेक्षा वेगळाही दिसतो. शरीराचा रंग सर्वसाधारणतः करडा किंवा मातीसारखा भुरा ते फिकट किंवा गर्द पिवळसर भुरा असून पोट व पायांकडे तो पांढरट किंवा फिकट पिंगट होत जातो. भारतीय प्राण्यांच्या रंगात पिवळा रंग कमी असतो व सामान्यतः ते जास्त गर्द व करड्या रंगाचे असतात. चेहऱ्यावर नेहमीसारख्या खुणा असून गालफडांवर पट्टे असतात. डोक्यावर ठिपके असतात. मधे अरुंद पट्टे किंवा लांबट ठिपके असलेले दोन रुंद पट्टे दोन्ही कानांच्या मधून निघून खांद्यांपर्यंत जातात. ते पुढे वाढून कमीअधिक नियमित आकाराच्या मोठ्या अंडाकृती किंवा लांबट खुणांच्या रूपात पाठीवर जातात. कमीअधिक प्रमाणात काळ्या रंगाने वेढलेले व फिकट मोकळ्या जागी यांनी विभागलेल्या गर्द डागांनी दोन्ही बाजूंवरील अभ्राच्छादित (ढगांनी व्यापल्यासारखी) रचना तयार होते. पाय व पोटाकडील भागांवर मोठ्या ठिपक्यांच्या खुणा असतात व शेपटीवर गोल कडी असतात आणि ती बाजूवर बहुधा अर्धवट पूर्ण असतात.

 लामचित्ता निशाचर व बुजरा असल्यामुळे तो रानटी अवस्थेत क्वचितच पहावयास मिळतो. त्यामुळे त्याच्या सवयीबद्दल फारच थोडी माहिती आहे. तो वृक्षवासी आहे आणि झाडांवर चढण्यात पटाईत आहे. तोल सांभाळण्यासाठी त्याला आपल्या खूप लांब व जाड शेपटीचा उपयोग होतो. तो घनदाट जंगलांत नदीकाठी राहतो. दिवसा तो झाडावर विश्रांती घेतो. तो हरणे, माकडे, डुकरे, गुरेढोरे, म्हशीच्या पारड्या, कधी कधी साळी व पक्षी यांची शिकार करून उपजीविका करतो. त्याने माणसावर हल्ला केल्याचे ऐकिवात नाही. खेड्यात घुसून तो शेळ्या व डुकरांची शिकार करतो. तैवानमध्ये तो सिक्का हरणाची शिकार करतो. तो आपल्या भक्ष्यावर फांदीवरून झडप घालतो, तसेच तो जमिनीवरही शिकार करतो.

 पाळलेले लामचित्ते स्वभावाने गरीब व खेळकर असतात. एखादी वस्तू फेकून व आपटून तो तिच्याशी तासनतास खेळत राहतो. काही पिंजऱ्यात गडबड करतात इतर काही बहुतेक झोपून काढतात.

 झाडांच्या ढोलीत पिले जन्माला येतात. त्यांचा गर्भावधी माहीत नाही. एका वेळेला बहुधा दोन पिले जन्मतात. पिले म्यॉव म्यॉव, गुरगुरणे इ. आवाज काढतात.

लामचित्त्याच्या सुळ्यांचा उपयोग बोर्निओतील विशिष्ट लोक कर्णभूषणे म्हणून करतात कातडीचा उपयोग आसनांसाठी व चिनी लोक त्याच्या शरीराच्या भागांचा उपयोग औषधासाठी करतात. अमेरिकेत कोलोरॅडो राज्यात कोलोरॅडो स्प्रिंगजवळील शायेन मौंटन झूमध्ये व वॉशिंग्टन डी. सी. येथील यू. एस. नॅशनल झूलॉजिकल पार्कमध्ये लामचित्त्यांची पैदास करून पिले पाळतात.

 आजकाल चित्त्याव्यतिरिक्त मार्जार कुलातील सर्व प्राण्यांची ‘बिग कॅट’ पँथेरा प्रजाती व ‘स्मॉल कॅट’ फेलिस प्रजाती अशी दोन गटांत विभागणी करण्याची पद्धत आहे. शरीराची संरचना आणि वर्तन या दोन्ही बाबतींत लामचित्ता हा वरील दोन्ही गटांच्या अगदी मध्ये येतो. त्यामुळे तो वरील वर्गीकरणात बसत नाही व म्हणूनच त्याचा समावेश निओफेलिस या स्वतंत्र प्रजातीत करतात. 

 जमदाडे, ज. वि. कानिटकर, बा. मो.