पिळ्ळैतमिळ : एक तमिळ काव्यप्रकार. ‘पिळ्ळैत्तमिळ’ याचा शब्दश: अर्थ ‘बाल्यवर्णनपर तमिळ काव्य’ असा होतो. तमिळमधील हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा काव्यप्रकार असून त्यात स्त्री वा पुरुष असलेली आपली उपास्य देवता वा आश्रयदाता यास बालरूपात कल्पून त्याचे चित्रण व गुणगान केलेले असते. पिळ्ळैतमिळचा आद्य प्राचीन निर्देश तोल‌्काप्पियम् ह्या ख्रिस्तपूर्व काळातील व्याकरण-ग्रंथात आढळत असला, तरी त्याचे प्रत्यक्ष उदाहरण मात्र प्रसिध्द ⇨ आळवार संत पॅरियाळवार (पेरियाळवार) याच्याच रचनेत आढळते. इ. स. सु. सातव्या शतकात पॅरियाळवाराने कृष्णाच्या बालरूपावर नितान्तसुंदर पद्ये रचली असून, ती आळवार संतांच्या नालायिर-दिव्य-प्रबंधम् (म. शी. चार हजार दिव्य पद्ये) मध्ये संगृहीत आहेत. पॅरियाळवाराच्या ह्या रचनेत पिळ्ळैतमिळ ह्या काव्यप्रकाराचे संकेत रूढ होऊन त्याला परिपूर्ण आकार आलेला दिसत नाही. पुढे मात्र त्याच्या ह्या रचनेचे अनुकरण होऊन त्याला सांकेतिक असा पिळ्ळैतमिळचा आकार व दर्जा प्राप्त झाला. प्रत्येकी दहा कवितांचे दहा खंड वा भाग म्हणजे एकूण शंभर कवितांचा हा प्रकार असून प्रत्येक खंडातील दहा दहा कवितांत काव्यविषय झालेल्या स्त्री वा पुरुष व्यक्तीच्या वा देवतेच्या बालपणातील एकेका अवस्थेचे वर्णन असते. पहिली अवस्था ही तीन महिने वयाच्या बालकाची अर्भकावस्था असते व तीत अर्भकाच्या कल्याणार्थ पालकांनी केलेली ईश्वराची प्रार्थना असते. शेवटची अवस्था, बालक पुरुष वा स्त्री असेल त्याप्रमाणे, खेळातील गाडीशी खेळण्याची वा झोपाळ्यावर गाणी गात किंवा इतर खेळांत तल्लीन होण्याची असते. अंगाई गीते म्हणणे, चांदोबाची गाणी म्हणणे, लुटुपुटीची लढाई, लपंडाव इ. अवस्थांचा व त्यांवरील गीतांचाही अवस्थापरत्वे त्यात समावेश असतो.

सोळाव्या शतकातील प्रसिध्द तमिळ शैव संतकवी ⇨ कुमरगुरुपरर यानेही पिळ्ळैतमिळप्रकारातील दोन रचना केल्या असून, त्यांची नावे मीनाक्षी अम्मै पिळ्ळैतमिळमुत्तुकुमारस्वामी पिळ्ळैतमिळ अशी आहेत. पहिल्यात मदुरेच्या मीनाक्षी देवतेस बालरुपात कल्पून तिची प्रसंशा व चित्रण असून, दुसऱ्यात सुब्रह्मण्य वा मुत्तुकुमारस्वामी (कार्तिकेय) याच्या बाल्यावस्थेचे चित्रण व गुणगान आहे.

पॅरियाळवारवकुमरगुरुपररयांच्यापिळ्ळैतमिळरचना अत्यंतसरसवलोकप्रियअसल्या, तरीत्यांतएकमहत्त्वाचा फरकहीआहे. पॅरियाळवाराची रचना ही अत्यंत ही साधी, स्वाभाविक, प्रासादिक व मानवी वाटते, तर कुमरगुरुपररच्या रचनेत काव्यविषय बनलेल्या देवतेचे दैवीपण सतत जाणवत राहते. कुमरगुरुपररची भाषाही त्यामुळे अत्यंत भारदस्त व आध्यात्मिक आशयानुकूल झालेली आहे.

नंतरच्या काही कवींनी ह्या वाङ्‌मयीन ज्ञापकाचा (मोटिफ) उपयोग आपल्या आश्रयदात्यांची प्रसंशा करण्याकरिता केला. ओट्टक्कूत्तर या कवीने आपला आश्रयदाता चोलवंशीय राजा कुलोत्तुंग दुसरा (कार. ११३३–५०) याच्यावर एक पिळ्ळैतमिळ रचले. राजप्रशस्तीवरील हे पहिले व शेवटचे पिळ्ळैतमिळ समजले जाते. कुलोत्तुंग दुसरा हा ओट्टक्कूत्तरचा शिष्य असावा, असे अभ्यासक मानतात. त्यामुळेच त्यात अधिक जिव्हाळा व जवळीक व्यक्त झाली आहे. तत्तुवरायर (चौदावे शतक) व ⇨ शिवप्पिरगाशर (सतरावे शतक) यांसारख्या तत्त्वचिंतक व गूढवादी कवींनीही पिळ्ळैतमिळच्या ज्ञापकाचा वापर करून आपल्या गुरूंची प्रशस्ती केली आहे. विविध मंदिरांतील देवतांची प्रशस्तीही अनेक तमिळ कवींनी ह्या प्रकारात केली आहे. काही मुस्लिम कवींनीही प्रेषितावर व सूफी संतांवर पिळ्ळैतमिळ प्रकारातील रचना केल्या आहेत. आधुनिक काळात महात्मा गांधीवर व काही प्राचीन संतांवरही पिळ्ळैतमिळ लिहिली गेली आहेत.

वरदराजन्, मु. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)