केळकर, कमलाकांत वामन :(१ जानेवारी १९०२–६ डिसेंबर १९७१). भारतीय भूवैज्ञानिक, मराठी विश्वकोशाच्या विज्ञान व तंत्रविद्या कक्षेचे प्रभारी विभाग संपादक, शिक्षक व प्रशासक. त्यांनी पश्चिम भारतातील भूविज्ञानाच्या अध्ययनाचा पाया घातला. त्यांचा जन्म गोकाकजवळील धूपधाळ गावी व शिक्षण बेळगाव आणि पुणे येथे झाले. १९२३ साली ते मुंबई विद्यापीठाचे पदवीधर झाले. त्याच वर्षी ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापक म्हणून दाखल झाले. ‘गोकाकभोवतालचे रूपांतरित खडक व त्यांच्यातील अग्निज भित्ती’ या विषयावर त्यांनी मुंबई विद्यापीठाला सादर केलेला प्रबंध मान्य होऊन त्यांना १९३० साली एम्.एस्‌सी. पदवी विशेष प्रावीण्यासह देण्यात आली. १९३३ साली ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या भूविज्ञान विभागाचे प्रमुख झाले. १९४८ मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यापीठाचा पदव्युत्तर भूविज्ञान विभाग सुरू करण्यात येऊन त्यांची या विभागाचे प्रभारी प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९६२ साली निवृत्त होईपर्यंत ते वरील दोन्ही पदांवर होते. त्यांनी महाविद्यालयीन लष्करी छात्रसेनेत (यू.टी.सी.) अधिकारी म्हणून काम केले (१९३३–४७) आणि शेवटी मेजर होऊन निवृत्त झाले. १९४२–५३ या काळात ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य होते. १९३–५८ या काळात ते सृष्टिज्ञान  या विज्ञानविषयक मासिकाचे संपादक आणि पुढे शेवटपर्यंत सल्लागार होते. पुणे विद्यापीठाच्या परिभाषा समितीवरही त्यांची नियुक्ती झाली होती. १९५९–७० दरम्यान ते मिनरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष होते. १९६२ पासून अखेरपर्यंत ते मराठी विश्वकोश कार्यालयात विज्ञान व तंत्रविद्या कक्षेचे प्रमुख होते.

आपल्या विद्यार्थ्यांना अन्वेषणामध्ये (संशोधनामध्ये) मार्गदर्शन करीत असताना त्यांनी फोंडा ते कारवार, सावंतवाडी, बेळगाव, खानापूर, लोंढा, बागलकोट, सौंदत्ती, जमखंडी, बिळगी इ. भागांचे व गोव्याचेही भूवैज्ञानिक सर्वेक्षण व तेथील खडकांचे अध्ययन केले. या अध्ययनांवर आधारलेले अन्वेषणात्मक लेख अन्वेषण-नियतकालिकांमध्ये त्यांनी लिहिले असून ते संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त आहेत. त्यांनी सृष्टिज्ञान  मासिकात अनेक लेख व लेखमाला, तसेच मराठी विश्वकोशांतील विविध शास्त्रीय विषयांतील अनेक नोंदी लिहिल्या. त्यांनी इतरत्रही लेखन केले असून एका भूवैज्ञानिक पुस्तकाचा मराठीत अनुवादही केला आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.एस्‌सी. परीक्षेत भूविज्ञान विषयात आणि पुणे विद्यापीठाच्या एम्.एस्‌सी. (भूविज्ञान) परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक अशी दोन ‘प्रा. क. वा. केळकर पारितोषिके’ ठेवली असून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या भूविज्ञान विभागात ‘प्रा. क. वा. केळकर भूवैज्ञानिक संग्रहालय’ सुरू करण्यात आले आहे. ते वाई येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.