अभिशोषण : ‘अभिशोषण’ याचा मूळ अर्थ’आत ओढून घेणे’ असा असला तरी ð शरीरक्रियाविज्ञानात ‘शरीरातील विविध पृष्ठभागांतील कोशिकांकडून (शरीराच्या सूक्ष्म घटकांकडून) बाह्य पदार्थ आत घेण्याची क्रिया’असा या शब्दाचा अर्थ आहे. बाह्य पदार्थ रक्तात किंवा लसीकेत (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकासमूहांकडून म्हणजे ऊतकांकडून रक्तात जाणाऱ्या व रक्तद्रवाशी साम्य असलेल्या द्रव पदार्थात) मिसळण्यापूर्वी त्यांवर अनेक रासायनिक प्रक्रिया होऊन त्यांचे स्वरूप रक्तात किंवा लसीकेत एकरूप होण्यासारखे व्हावे लागते. त्वचा श्वसन तंत्र (व्यूह) व आंत्रमार्ग वगैरे अनेक पृष्ठभागांमधून बाह्य पदार्थांचे अभिशोषण होऊ शकते. कोशिकाबाह्य द्रवातील पदार्थांच्या संहतीवर (दिलेल्या घनफळातील पदार्थांच्या रेणूंच्या प्रमाणावर) अवलंबून असणाऱ्या व निवळ भौतिकीय नियमांनुसार होणाऱ्या अभिशोषणाला ‘निष्क्रिय’ व कोशिकांच्या ऊर्जेमुळे होणाऱ्या व संहतीवर अवलंबून नसणाऱ्या अभिशोषणाला ‘सक्रिय’ असे म्हणतात.

त्वचेमधून बाह्य पदार्थांचे अभिशोषण होण्यापूर्वी ते पदार्थ वसेमध्ये (चरबीमध्ये) किंवा पाण्यामध्ये विरघळलेले असावे लागतात. श्वसन तंत्रमार्गे फक्त वायुरूप पदार्थच अभिशोषिले जातात. शरीरात अभिशोषित होणारे बाह्य पदार्थ मोठ्या प्रमाणात पचन तंत्रातच शोषिले जातात. जो आहार जठरात जातो त्यापैकी पाणी व लवणे त्याच स्वरूपात शोषिली जातात. प्रथिन पदार्थांवर एंझाइमांची (शरीरामध्ये तयार होणाऱ्या प्रथिनयुक्त व रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या संयुगांची) विक्रिया होऊन त्यांचे पेप्टोन,प्रोटिओज किंवा ॲमिनो अम्‍ल असे स्वरूप झाल्यानंतरच आंत्र श्लेष्मकलेतील (आतड्याच्या आतील बाजूच्या नाजूक थरातील) कोशिका ते पदार्थ शोषून घेऊ शकतात. वसात्मक पदार्थांचे वसाम्‍ल व ग्‍लिसरीन असे विभाजन झाल्यानंतरच ते लसीकेत शोषिले जातात. पिष्ठमय व शर्करामय पदार्थांचे स्वरूप द्राक्षशर्करेत (ग्‍लुकोजमध्ये) झाल्यावरच ते पदार्थ रक्तात मिसळू शकतात.

मूत्र तंत्रातील वृक्क-कोशिका-गुच्छातून[®वृक्क] गाळण्यात आलेल्या रक्तद्रव्यातून काही विशिष्ट पदार्थ मूत्रजननलिका-कोशिका पुनः शोषून घेतात [®मूत्रोत्सर्जक तंत्र]. हाही अभिशोषणाचाच एक प्रकार आहे.

असे अभिशोषित पदार्थ जरी रक्तात किंवा लसीकेत मिसळले, तरी त्यांचे शरीरघटकांशी सात्मीकरण (एकत्रीकरण) झाल्याशिवाय त्यांचा उपयोग ऊतकांस  होत नाही.

उपयुक्त पदार्थ आत घेणे व निरुपयोगी पदार्थ बाहेर पडणे ही दोन्ही कार्ये कोशिकांच्या व कोशिकाबाह्य द्रवाच्या अभिशोषण-शक्तीमुळेच होतात.

पहा: पचन तंत्र.

 ढमढेरे, वा. रा.