कंकाल तंत्र : प्राण्यांच्याशरीराला आधार, आकार आणि संरक्षण देणाऱ्या टणक सांगाड्याला कंकाल तंत्र किंवा अस्थिपंजर म्हणतात.

कंकाल तंत्राचे (१) बाह्यकंकाल आणि (२)अंतःकंकाल असे दोन प्रकार आहेत. प्राण्यांची उत्क्रांती होत असताना खालच्या वर्गातीलकाही प्राण्यांच्या शरीराला त्वचेमधील दृढ आणि टणक अशा कवचामुळे आधार व संरक्षणमिळते. त्याला बाह्यकंकालअसे म्हणतात. उदा., खेकडा. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांमध्ये शरीराच्याआत असलेल्या हाडांमुळे व उपास्थींमुळे (अपारदर्शक निळसर-पांढऱ्या, मजबूत व लवचिकपेशीसमूहांमुळे) शरीराला आधार व आकार मिळतो. तसेच त्यामुळे शरीराच्या हालचालीस मदतहोते. त्याला अंतःकंकाल असे म्हणतात.

अपृष्ठवंशीय प्राण्यांचा कंकाल :अपृष्ठवंशी प्राण्यांच्या निरनिराळ्या संघांतनिरनिराळ्या प्रकारांचा कंकाल आढळतो.

प्रोटोझोआ :(आदिजीव संघ). या संघातील प्राण्यांच्या शरीरातीलकंकालाचे स्वरूप विविध असते. उदा., पॅरामिशियम या एककोशिक (ज्यांचे शरीर एकाच पेशीचेबनले आहे अशा) प्राण्याच्या शरीराबाहेर तनुच्छद (शरीरावरील आवरण) नावाचे वेष्टनअर्धघनीभूत जीवद्रव्याचे (सजीवांतील आधारभूत द्रव्याचे) असते. तर मोनोसिस्टीस याप्राण्याचा बाह्यकंकाल नायट्रोजनयुक्त निर्जीव घटकांचा बनलेला असतो. डिनोफ्लॅजेलेटया प्राण्यांच्या शरीराबाहेर सेल्युलोजच्याटणक तबकड्यांनी बनलेले कवच असते.डिफ्लूजियामध्ये हे बाह्यकवच वाळू वा अन्य कणांचे असून ते बुळबुळीत नायट्रोजनयुक्तस्रावाचे बनलेले असते. युग्‍लिफामध्ये हे कवच सिलिकेचे तर फोरॅमिनीफेरांमध्ये चुनखडीयुक्त असते. काहींची कवचे कप्प्याकप्प्यांची तर काहींची छिद्रयुक्त असतात.

पोरिफेरा संघ : या प्राण्यांच्या कंकालांत विविधआकारांच्या सिलिकेच्या वा चुनखडीच्या बनलेल्या कंटिका (लहान काट्यांसारख्या रचना) असतात काही रंध्री प्राण्यांमध्ये लवचिक आणि चिवट सूक्ष्म धाग्यांचे कंकाल आढळतात.या संघातील काही प्राण्यांत हे दोन्ही प्रकार असतात.

सीलेंटेरेटा : (आंतरगुही संघ, ज्या प्राण्यांच्या शरीरातील पोकळी अथवा देहगुहा पचनाकरिता देखील उपयोगी पडते अशा प्राण्यांचा संघ). या प्राण्यांच्या शरीराच्या बाह्यस्तरापासून चिवट व लवचिक असा स्राव होऊन त्यापासून चिवट व लवचिक बाह्यकंकाल तयार होतो. त्यालापेरिसार्क (पर्यावर) असे म्हणतात. पेरिसार्क आणि शरीरातील मध्यश्लेषस्तर (अंतःस्तर व बाह्यस्तर यांमधील जिलेटीनमय पदार्थ) या दोहोंमुळे शरीराला आधार व आकार मिळतो.पोवळ्यांच्या बाह्यस्तरांचा स्राव चुनखडीयुक्त असल्याने तो कठीण असतो. वसाहतीने एकत्र राहणाऱ्या पोवळ्यांचे कंकाल एकजीव होऊन त्यांना खडकांचे स्वरूप येते. अल्सिओनियम सारख्या प्राण्यांच्या चुनखडीयुक्त कंटिका आणि गॉर्गोनिया वसाहतीत अंशतःकेराटीनयुक्त आणि अंशतः कॅल्शियमयुक्त अक्ष आधारभूत असलेले आढळतात.

आथ्रोपोडा : (संधिपाद संघ). यासंघातील प्राण्यांच्या शरीरावर कायटिनाची उपत्वचा असून त्या कवचात बहुतेक ठिकाणीकॅल्शियमाच्या लवणांचे मिश्रण झालेले दिसते. त्याला स्क्लेराइट (कठक, कॅल्शियमयुक्ततकट) असे नाव असून त्यांना अतिशय टणक अशा तबकड्यांचे स्वरूप येते. सांध्यापाशी मात्रउपत्वचा लवचिक राहते.

मॉलस्का :  (मृदुकाय संघ).मॉलस्कांचा बाह्यकंकाल शंख आणि शिंपाचा बनलेला असतो. काँकिओलीन आणि कॅल्शियमकार्बोनेट यांच्या विशिष्ट थरांनी शंख आणि शिंपा बनलेल्या असून हे थर प्रवाराच्या (कवचाच्या लगेच खाली असणाऱ्या त्वचेच्या घडीच्या) स्रावापासून तयार होतात. एका कवचाच्या शिंपांना एकपुटी आणि चलनक्षम अशा दोन झडपांच्या शिंपांना द्विपुटी शिंपा असे म्हणतात.

एकायनोडर्माटा : (शल्यचर्मसंघ). या संघतील प्राण्यांच्या बाह्यकंकालात त्वचेतील कॅल्शियमयुक्त तबकड्या, कांड्या, दाणे, काटे अशा विविध आकाराचे पदार्थ असल्यामुळे त्यांची त्वचा कठीण आणि खरखरीत असते. या वर्गातील काही प्राण्यांच्या शरीरामध्ये अशा तबकड्या एकमेकींस जोडल्या असल्याने सर्व पृष्ठभागास दगडासारख्या कवचाचे स्वरूप येते.

पृष्ठवंशी प्राण्यांचा कंकाल : पृष्ठवंशी प्राण्यांच्या कंकालाचे दोन भाग असतात : (१)बाह्यकंकाल व (२) अंतःकंकाल.

(१) बाह्यकंकाल :  निरनिराळ्या पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये निरनिराळ्या प्रकारचा बाह्यकंकाल आढळतो. माशांच्या शरीरावरील खवले सरपटणाऱ्या प्राण्यांमधील खवले व नख्या पक्ष्यांमधील पिसे,खवले व नख्या आणि सस्तन प्राण्यांमधील केस, नख्या किंवा नखे बाह्यकंकालात मोडतात.

(२) अंतःकंकाल :  शरीरांतर्गत कंकालाचे दोन भाग असतात : (१) अक्षीय कंकाल व (२) शाखीय कंकाल.

अक्षीय कंकाल शरीराच्या मुख अक्षाशी निगडीत असून त्यामध्ये कवटी, हन्वस्थी (जबड्याच्या अस्थी), पृष्ठवंश, फासळ्या व उरोस्थी (छातीच्या मध्यावरची अस्थी) यांचा समावेश केला जातो. शाखीय कंकालात अंसमेखला (खांद्यातील अस्थींचे वलय),श्रोणिमेखला (कमरेच्या हाडांचे वलय) व शाखांमधील कंकालयांचा समावेश होतो.

  

काही प्राण्यांतील अंतःकंकाल केवळ उपास्थींचाच बनलेला असतो तर काहींचा उपास्थी व अस्थी दोन्ही मिळून तयार होतो.

कवटी अनेक अस्थी किंवा उपास्थींची बनलेली असते. मेंदू, डोळे, अंतर्कर्ण, घ्राणेंद्रिय यांसारख्या नाजूक शरीरभागांचे संरक्षण कवटीमुळे होते. कवटीस जोडून धनुच्या आकाराच्या हन्वस्थी असतात.त्यांची मागील टोके एकमेकांस चलनक्षमरीत्या जोडलेली असतात व त्यामुळे जबड्याची (हन्वस्थीची) उघडझाप होऊ शकते.


पृष्ठवंश ही अस्थींची किंवा उपास्थींची किंवा दोन्ही मिळून बनलेली मणक्यांची साखळी असते.ती पाठीत मध्यभागी शरीर-अक्षात असते. पुढील टोकाने ही साखळी चलनक्षमरीत्या जोडलेली असते. तिचे मागील टोक मोकळेच असते. मणक्यातील सांध्यांच्या चलनक्षमतेमुळे पृष्ठवंशास लवचिकपणा येऊन शरीराची निरनिराळ्या प्रकारची हालचाल शक्य होते. प्रत्येक मणक्याच्या वरच्याबाजूस एक पोकळ कमान असते. एकामागे एक अशा या कमानी मिळून एक लांब नळीसारखा पोकळ भाग तयार होतो. या नळीमध्ये नाजूक मज्जारज्जू (मेंदूच्या मागील भागातून निघणारा मज्जातंतूंचा दोरीसारखा जुडगा) सुरक्षित बसविलेला असतो.

फासळ्या बहुधा कमानीसारख्या वक्र हाडांच्या बनलेल्या असतात. त्या सामान्यतः छातीमध्ये एकामागे एक अशा जोड्यांनी बसविलेल्या असतात. पृष्ठवंशाच्या डाव्या बाजूसएक उजव्या बाजूस एक अशी ही जोडी असते. फासळीचे वरचे टोक मणक्यास जोडलेले असते तर खालचे टोक उरोस्थीस जोडलेले असते किंवा मोकळे असते. पृष्ठवंश, फासळ्याव उरोस्थी मिळून छातीचा पिंजरा तयार होतो. हा पिंजरा हृदय, फुप्फुसे इ. नाजूक शरीरा भागांचे संरक्षण करतो. उरोस्थी लांबट व बहुधा चापट आकाराची असून छातीच्या खालच्या भागी, फासळ्यांच्या खालच्या टोकांच्या मधोमध बसविलेली असते.

शाखाकंकालातील अंसमेखला हा भाग आँफिऑक्सस किंवा सायक्लोस्टोम्स यांसारख्या अविकसित प्राण्यांमध्ये आढळत नाही. प्राण्यांच्या विकासाबरोबरच या शरीरभागाची वाढ व गुंतागुंत वाढत गेली आहे. उदा., इलास्मोब्रँक जातीच्या माशामध्ये अंसमेखला केवळ एका नालाच्या आकाराच्या उपास्थींचीच बनलेली असते.या उपास्थीच्या प्रत्येक बाजूस एक खोबण असून तीमुळे पक्षकंकालास (हालचाल करण्यास आणि तोल सांभाळण्यास उपयुक्त असणाऱ्या परांच्या सांगाड्यास) आधार मिळालेला असतो. उच्चदर्जाच्या प्राण्यांची असंमेखला काही अस्थी व उपास्थी मिळून बनलेली असते. अशा प्राण्यांमध्ये ती सामान्यतः कबंधाच्या (धडाच्या) पुढच्या भागात उलट्या कमानीसारखी बसविलेली असते. रचनात्मकदृष्ट्या तिचे दोन सारखे अर्ध भाग असतात. या अर्धभागांची खालील टोके एकमेकांस किंवा उरोस्थीस जोडलेली असतात व वरील टोके पृष्ठवंशाजवळ मोकळी असतात. प्रत्येक अर्धभागात वरील टोकास चपटे अधिस्कंध असून त्याला जोडून खालीस्कंधाचे हाड असते. खालच्या टोकास जोडून जी दोन हाडे असतात त्यांपैकी पुढच्यास पूर्वाक्षक व मागच्यास अक्षक म्हणतात. काही प्राण्यांमध्ये पूर्वाक्षकावर किंवा त्याच्या जागी प्रौढावस्थेत नवीन हाड येते, त्यास अंसास्थी म्हणतात. स्कंध, पूर्वाकक्ष व अक्षक यांच्या सांध्यात स्कंधीय उलूखल नावाची एक खोबण असून तीमध्ये हातकिंवा पुरस्थपाद (पुढच्या पायांची) हाडे बसविलेली असतात.

श्रोणिमेखला हा शाखाकंकालाचा भाग पृष्ठवंशास जोडलेला असतो. शरीराच्या मागच्या बाजूस असलेल्या या भागामुळे मागील पायांना आधार मिळतो. अंसमेखलेप्रमाणे हाही दोन सारख्या अर्धभागांचा बनलेला असतो. प्रत्येक अर्धभाग तीन हाडांचा बनलेला असतो. वरील बाजूस श्रोणिफलक (श्रोणीतील एक चपटे हाड) असून त्यापुढे असणाऱ्या हाडास जघनास्थी व मागच्यास आसनास्थी म्हणतात. स्कंधीय उलूखलाप्रमाणेच एक खोबण असते तिला श्रोणि-उलूखल असे नाव असून तीमध्ये पश्चपाद (मागच्या पायांनी) हाडे बसविलेली असतात.

पुरस्थपाद  व पश्चपाद यांच्या कंकाल रचनेमध्येमूलभूत असे बरेच साम्य आहे.

मानवी कंकाल तंत्र : (१) कवटी, (२) खालचा जबडा, (३) उरोस्थी, (४) बरगडी, (५) भुजास्थी, (६) पृष्ठवंश, (७) त्रिकास्थी, (८) श्रोणिफलक, (९) अरास्थी, प्रबाहु बाह्यास्थी, (१०) प्रबाहु अंतरास्थी, (११) मणिबंध, (१२)करभास्थी, (१३) अंगुल्यस्थी, (१४) ऊर्वस्थी, (१५) जान्वस्थी, (१६)अंतर्जघास्थी, (१७) बाह्यजंघास्थी, (१८) गुल्फ, (१९) पादास्थी, (२०) पादांगुल्फास्थी.

पुरस्थपादाच्या  वरच्या भागातील हाडास बाह्य अस्थी म्हणतात. त्याचे वरील टोक स्कंधीय खोबणीत बसविलेले असते. खालचे टोक व पोटरीतील दोन हाडे मिळून कोपराचा सांधा बनतो. पोटरीतील दोन लांब हाडांपैकी पुढच्यास अरास्थी व मागच्यास अंतःप्रकोष्ठिका अस्थी म्हणतात. काही प्राण्यांमध्ये (उदा., बेडकामध्ये) पोटरीची हाडे भिन्न न राहता प्रौढावस्थेत एकमेकांशी जोडली जाऊन एकच हाड बनते. अशा हाडाला अंत:बहि:प्रकोष्ठिका अस्थी म्हणतात. पोटरीच्या खालीमनगटातील हाडांना मणिबंध म्हणतात. या हाडांची संख्या निरनिराळ्या प्राण्यांमध्ये निरनिराळी असते. मनगटातील ही छोटी आखूड हाडे दोन रांगांत बसविलेली असतात. मनगटाखाली पंजाची लांबट हाडे असून त्यांपासून पसरट पंजा बनतो. या लांबट हाडांच्या टोकांस बोटांची हाडे बसविलेली असतात.

पश्चपाद हाडांची रचना पुरस्थपादासारखी असते. मांडीतील हाडास ऊर्वस्थी असे नाव असून त्याचे वरचे टोक श्रोणि-उलूखलात खोबणीत बसविलेले असते. खालचे टोक आणि पिंडरीतील दोन हाडे मिळून गुड्याचा सांधा बनतो. पिंडरीतील दोन लांब हाडांपैकी पुढच्यास अंतर्जंघास्थी व मागच्यास अनुजंघास्थी म्हणतात. बेडकामध्ये प्रौढावस्थेत दोन्ही हाडे मिळून एकच हाड असते त्याला अंतःबहिर्जंघिका म्हणतात. घोड्यामध्ये मणिबंधाप्रमाणे छोटी आखूड हाडे असून तीही दोन रांगांत बसविलेली असतात. गुल्फातील (घोट्यातील) या हाडांना लांबट पादास्थी जोडलेल्या असून त्या पायाच्या पसरट भागास आधार देतात. पादास्थींना बोटाच्या हाडांचा कंकाल जोडलेला असतो.

कोष्ठीय कंकाल : काही पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये कोष्ठीय कंकाल या नावाचा वेगळ्या प्रकारचा सांगाडा असतो. उपास्थी किंवा अस्थींच्या घशातील भित्तीत एकामागे एक बसविलेल्या कमानींचा तो बनलेला असतो. ह्यामुळे घशास आधार मिळतो. माशांचे कल्लेसुद्धा यावरच आधारित असतात. जमिनीवरील विकसित प्राण्यांमध्ये अशा प्रकारचा कंकाल फक्त गर्भावस्थेत दिसतो व तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. माशांमध्ये तो कायम स्वरूपाचा असतो. कोष्ठीय कंकालात वास्तविक हन्वस्थीचाही समावेश होता. हन्वस्थीमागे कंठिका (किंवा कंठास्थी) नावाची दुसरी कमान असून, रचनात्मक फरकाने, जिभेला आधार देणे किंवा हन्वस्थी कवटीस जोडणे इत्यादींकरिता तिचा उपयोग केला जातो. कंठिकेमागील कमानी मात्र मुख्यतः कल्ल्यांना आधार देतात.

मानवी कंकाल तंत्र : मानवी अंतःकंकालाचेही (१) अक्षकंकाल आणि (२) शाखीय अथवा उपांग कंकाल असे दोन विभाग आहेत. अक्षकंकालात डोक्याची कवटी, हन्वस्थी (हनुवटीचे हाड), पृष्ठवंश (पाठीच्या मणक्यांचीमालिका), छातीचा पिंजरा यांचा अंतर्भाव होतो. उपांग कंकालाचे ऊर्ध्वशाखा व अधःशाखा असे दोन भाग आहेत. स्कंध (खांदा), अंसमेखला (दंड, शरीराला घट्ट बांधणारे हाडांचे उलट्या कमानीसारखे वलय), दंड, उपभुज (मनगट व कोपर यांमधील हाताचा भाग) मनगट आणि हात यांची मिळून ऊर्ध्वशाखा बनते श्रोणिमेखला (धडाचा खालचा भाग व पायाचा वरचा भाग जोडणाऱ्या हाडांचा वलयाकृती खोलगट भाग), मांडी, तंगडी, घोटा आणि पाय यांची मिळून अधःशाखा अथवा अधोपांग बनते. 

  

अक्षकंकालातील अस्थींमुळे शरीरातील महत्त्वाच्या अंतस्त्यांना (इंद्रियांना) आधार व संरक्षण मिळते. उपांग किंवा शाखीयकंकालामुळे शरीराची हालचाल होऊ शकते. शेजारच्या दोन अस्थींमध्ये संधी होतो. यासांध्यांमुळे दृढ कंकालात हालचाल होऊ शकते.


शरीरातील स्‍नायू हे अस्थींना बांधलेले असतात. स्‍नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे सांध्यांपाशी अस्थींची हालचाल होऊ शकते. सांधे स्थिर रहावे म्हणून त्यांच्याभोवती तंत्वात्मक (तंतुयुक्त) आवरण असून शिवाय संधिबंध (हाडांचा संधी होण्यासाठी लागणारा बंध) आणि स्‍नायूहीअसतात.

मानवाच्या  कंकालातील कवटी, कणा, व मणका, छाती, पाय, पाऊल, बरगडी, बाहू, मनगट, मांडी, श्रोणी व हात या भागांचे वर्णन त्या त्याशीर्षकाखाली इतरत्र नोंदीत दिलेले आहे.

मानवी कंकाल तंत्राचे विकार : विरूपता : अंगस्थितीच्या विकृतीमुळे अथवा रचनात्मक विकृतीमुळे शरीराला विरूपता येते. अंगस्थिती विकृती स्वप्रयत्नाने घालविता येते. कारण तीत शरीराच्या रचनेमध्ये दोष नसतो. उदा., पोक काढून चालण्याची तरुणांमधील सवय, उन्माद (हिस्टेरिया) रोगात होणारी विकृत अंगस्थिती. रचनात्मक विरूपता सदोष घडण असल्यामुळे होते त्यासाठी विशेष उपचार करावे लागतात.

विरूपता जन्मजात अथवा अर्जित (वाढ होत असतानानिर्माण झालेली) असू शकते. जन्मजात विरूपता ही आनुवंशिकतेमुळे, गर्भाच्या सदोषवाढीमुळे, गर्भाशयाच्या दाबामुळे अथवा प्रसूतीच्या वेळी कराव्या लागाणाऱ्या हस्तप्रयोगामुळे येते. संयुक्तांगुली (चिकटलेली बोटे), भंगुर (ठिसूळ) अस्थी, पादविरूपता, अस्थिभंगाप्रवृत्ती वगैरे विकार जन्मजात विरूपतेत मोडतात. अर्जित विरूपतारोग किंवा अभिघातामुळे (इजेमुळे) येते. ही विरूपता अस्थी, स्‍नायू, त्वचा अथवा तंत्रिका (मज्‍जातंतूंच्या) विकारामुळे येते. अशा विरूपतांपैकी काहींचे वर्णन खालीदिले आहे : पृष्ठवंश विरूपता :(अ) पार्श्ववक्रता : या प्रकारात मणके एकमेकांवर परिवर्तित झाल्यामुळे (कलल्यामुळे) पृष्ठवंशाला एकाबाजूला बाक आलेला दिसतो. (आ) कुबड : या प्रकारात मणके पुढे वाकल्यासारखे असल्यामुळे पृष्ठवंशालामागे बाक आलेला दिसतो. याच्या उलट मणके मागे वाकलेले असल्यास त्या अवस्थेला अग्रवक्रता असे म्हणतात. (इ) द्विशाख कंकाल : या विकारात खालच्या मणक्याच्या मागची बाजू जोडली गेली नसल्यामुळे पृष्ठवंशाला पूर्ण संरक्षण मिळत नाही. (ई) कशेरुभ्रंश : चौथा किंवा पाचवा कटिमणका घसरून पुढे येतो त्यामुळे वेदना होऊन पृष्ठवंशावर दाब पडतो.

पक्षरूप स्कंधास्थी : पाठीच्या स्‍नायूंच्या दौर्बल्यामुळे प्राकृतावस्थेत (सामान्य अवस्थेत) चपटी असलेली स्कंधास्थी (खांद्याचे हाड) पाठीवर पंख लावल्यासारखी दिसते.

वक्रहस्तविरूपता : ही विरूपता स्त्रियांत अधिक प्रमाणात दिसते. प्रबाहु-अंतरास्थी (कोपर व मनगट यांमधील हाडाला आधार देणारे लांबटजोड हाड) अधिक लांबवर वाढल्यामुळे हात वाकडा होऊन बाहेरच्या बाजूला ढकलल्यासारखा दिसतो. जन्मतः प्रबाहु-बाह्यास्थी (कोपर व मनगट यांना जोडणारे मुख्य हाड)नसणे, पाचापेक्षा जास्त बोटे असणे अथवा बोटे एकमेकांस चिकटलेली असणे अशा विकृती हातात दिसतात.

अधोपांग  : मांडीचा सांधा जन्मतःच निखळणे, ऊर्वस्थी-ग्रीवेचा (मांडीच्या हाडाच्या तिरक्या भागाचा) त्या अस्थिदंडाशी १२०पेक्षा कमी अथवा अधिक कोन असल्यामुळे उद्‌भवणारी विरूपता. तसेच पायामध्ये दिसणाऱ्या विविध विरूपता. उदा., सपाट पाऊल, वक्रपाद.

हे सर्व विकार शस्त्रक्रियेने थोडेबहुत नाहीसे करता येतात [→ अस्थिभंग].

अस्थिशोथ : अस्थींमध्ये जंतुसंसर्ग झाल्यास अस्थिशोथ (अस्थींची दाहयुक्त सूज) होतो. अस्थिमध्यकाला (अस्थिमज्जेला) अशा तर्‍हेचा शोथ आल्यास तो फार गंभीर व चिरकारी (दीर्घकाल टिकणारा) असतो [→ अस्थिमज्जाशोथ].

पर्यास्थिशोथ : अस्थीच्या आवरणात जंतुसंसर्ग झाल्यास हॅवर्झ नलिकांमार्गे (अस्थीमध्ये रक्तनलिका ज्यानलिकांमार्गे प्रवेश करतात त्या हॅवर्झ या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या नलिकांमार्गे) मध्यकापर्यंत पसरू शकतो.

अधिप्रवर्धशोथ : वाढ होत असलेल्या लांब हाडाच्या टोकाशी असलेल्या उपास्थीची दाहयुक्त सूज. हा प्रकार बहुधा चिरकारी असून त्याचे मूळ कारण क्षय वा उपदंश संसर्ग हे असते.

यापचयजन्य कंकाल विकार :  मुडदूस, गाऊट, संधिवात, संधिशोथ वगैरे चयापचयजन्य (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक भौतिक बदलामध्ये बिघाड झाल्यामुळे होणाऱ्या)विकारांचे वर्णन त्या त्या शीर्षकाखाली दिले आहे.

ग्रंथिविकारजन्य कंकाल विकार :  ⇨ परावटू ग्रंथीच्या विकारात अस्थींतील कॅल्शियम कमी झाल्यामुळे अस्थिविरलता येते त्यामुळे अस्थिभंगाची प्रवृत्ती होते. ⇨ पोषग्रंथीच्या अतिस्रावामुळे अस्थीची वाढ अधिक झाल्यामुळे हातापायाच्या अस्थी मोठ्याहोतात, त्या प्रकाराला विशालाग्रता असे नाव आहे. क्वचित सर्वच अस्थी मोठ्या झाल्यामुळे सर्व शरीरच फार मोठे व उंच होते, त्या प्रकाराला विशालमूर्ती विकार असे म्हणतात.

अस्थि-अर्बुदे : अस्थीची अर्बुदे (हाडातील कोशिकांच्या अत्याधिक वाढीमुळे तयार झालेल्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असलेल्या गाठी) सौम्य व मारक अशा दोनप्रकारांची असतात. सौम्य प्रकारांत उपास्थि-अर्बुद, अस्थ्यर्बुद आणि तंत्वार्बुदांचा समावेश आहे. मारक अर्बुदांत उपास्थि-कर्क, अस्थि-कर्क, अस्थिजनक कर्क, मध्यक कर्कवगैरे प्रकार आहेत. तसेच शरीरात इतरत्र कर्क रोग झाल्यास त्याचा प्रतिक्षेप म्हणून गौण कर्करोग हाडांमध्ये आढळतो. या सर्व अर्बुदांवर शस्त्रक्रिया करून मारक कर्करोगावर क्ष-किरण वगैरे चिकित्सा करतात [ → अर्बुदविज्ञान]. 

पहा : अस्थि अस्थिमार्दव.  

संदर्भ : 1. Borradaile, L. E. Potts, F. A. Invertebrata, Cambridge, 1958.  

    2. Davies, D. A. Davies F., Eds., Grays Anatomy, London, 1962.

     3. Hegner, R. W. Invertebrate Zoology, New York, 1960.

    4. Walters, H. E. Sayles, L. P. Biology of the Vertebrates, New York, 1957.

पाटील, शि. ज्ञा. सलगर, द. चि.