आबेल , सर फ्रेडरिक ऑगस्टस : ‍‌(१७ जुलै १८२७ – ६ सप्टेंबर १९०२). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व स्फोटक द्रव्यांचे तज्ञ. त्यांचा जन्म वूलविच येथे झाला. १८५१-५५ या कालात ते रॉयल मिलिटरी ॲकॅडेमी येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. १८५४-५८ या कालात ब्रिटिश युद्ध विभागात ते रसायनशास्त्रज्ञ होते. इंपिरियल इन्स्टिट्यूटचे ते पहिले संचालक (१८८७) आणि ब्रिटिश असोसिएशनचे अध्यक्ष (१८९०) होते.

त्यांनी व सर जेम्स ड्यूअर यांनी मिळून १८८९ मध्ये कॉर्डाइट या स्फोटक द्रव्याचा शोध लावला. गनकॉटनाच्या सुरक्षित-निर्मितीसाठी त्यांनी लगदापद्धत वापरली. खनिज तेलाचे प्रज्वलन बिंदू (पेट घेण्याचे तपमान) ठरविण्याचे बंद-परीक्षा उपकरण त्यांनी शोधून काढले. स्फोटक द्रव्यांसाठी त्यांनी उष्णता कसोटीही शोधून काढली.

गनकॉटन (१८६६), ऑन एक्सप्लोझिव्ह एजंटस् (१८७१), रिसर्चेस ऑन एक्स्प्लोझिव्हज् विथ कॅप्टन नोबेल (१८७५), इलेक्ट्रिसिटी ॲप्लाइड टू एक्स्प्लोझिव्ह परपझेस  द मॉडर्न हिस्टरी ऑफ गनपावडर (१८८४) ही स्फोटक द्रव्यांसंबंधीची महत्त्वाची पुस्तके त्यांनी लिहिली. ते लंडन येथे मृत्यू पावले.

मिठारी, भू. चिं.