क्रिलॉव्ह, इव्हान अंद्र्येयेव्ह्यिच : (१३ फेब्रुवारी १७६८–२१ नोव्हेंबर १८४४). रशियन बोधकथाकार (फॅब्यूलिस्ट). मॉस्को येथे गरीब कुटुबांत जन्म. त्याचे शिक्षण फारसे झाले नाही. वडिलांच्या मृत्युनंतर तो सेंट पीटर्झबर्ग येथे आला. Kofeynitsa (लेखन-१७८३) ही सुखात्मिका लिहून त्याने साहित्यक्षेत्रात पदार्पण केले. त्याने काही नियतकालिकेही चालविली. त्यांतून सरकारी यंत्रणेतील भ्रष्ट्राचारावर कठोर, उपरोधपूर्ण टीका असे. १७९३ मध्ये ह्या नियतकालिकांवर बंदी घालण्यात आली. त्यानंतरच्या बारा वर्षांच्या काळात त्याने रशियात ठिकठिकाणी भ्रमंती केली मिळतील त्या नोकऱ्या केल्या आश्रिताचे जीवनही कंठले. सेंट पीटर्झबर्गला परतल्यानंतर विख्यात फ्रेंच बोधकथाकार ⇨झांद ला फाँतेन (१६२१–९५) ह्याच्या काही बोधकथा अनुवादित असताना त्याला आपल्या अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम गवसले व तो स्वतंत्र बोधकथा लिहू लागला. जी टीका उघडपणे केल्याबद्दल त्याला स्वतःच्या नियतकालिकांना मुकावे लागले होते, ती त्याला बोधकथांच्या द्वारे सुरक्षितपणे करता आली. त्याच्या बोधकथांचे नऊ संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत (१८०९–४३).

अनियमित छंदात लिहिलेल्या ह्या बोधकथांची भाषा ताजी, टवटवीत असून बोलभाषेतील वाक्प्रयोग, सुभाषिते, म्हणी आणि नर्मविनोद ह्यांनी नटलेली आहे. शिवाय रशियन लोकगीतांची धारातीत मिसळलेली आहे. क्रिलॉव्हच्या बोधकथा रशियात तर लोकप्रिय झाल्याच तथापि जागतिक साहित्यातही त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

बोधकथाकार म्हणून मान्यता पावल्यानंतर क्रिलॉव्हला राजाश्रयही मिळाला. सेंट पीटर्झबर्ग येथील सार्वजनिक ग्रंथालयात त्याला एक विनाश्रम पद (सिनिक्यूअर) देण्यात आले.

सेंट पीटर्झबर्ग येथेच तो निधन पावला. त्याचा शंभरावा स्मृतिदिन सोव्हिएट रशियात राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात आला (१९४४).

मेहता, कुमुद