विकृतिविज्ञान : सजीवांच्या रचना व कार्य यांच्यातील विकृतींचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानास ‘विकृतिविज्ञान’ असे म्हणतात. ‘मानवी विकृतीविज्ञान’ ही मानवी वैद्यकाची शाखा असून तिच्यात मनुष्याच्या शरीरात रोगांमुळे होणाऱ्या रचनात्मक व क्रियात्मक बदलांचा आणि विकृतींचा अभ्यास केला जातो. तसेच रोगाची कारणपरंपरा (वा कारणविज्ञान), स्वरूप व परिणाम यांचाही अभ्यास या शाखेत करण्यात येतो. जिवंत (शस्त्रक्रियेच्या वेळी) किंवा मृत (शवपरिक्षेच्या वेळी) शरीरातून काढलेला अवयव किंवा अवयवाचा भाग व शरीरातील विविध रस, द्रव व घटक यांचा हा अभ्यास मुख्यत्वे प्रयोगशाळेतील प्रयोगांनी व सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने केला जातो आणि त्यात इतर विज्ञानशाखांतील तंत्रे व ज्ञान यांचाही उपयोग करून घेतला जातो. या अभ्यासामुळे मिळालेल्या माहितीचा उपयोग करून वैद्य रोगाचे निदान व त्यावर उपचार करू शकतो तसेच यामुळे रोगावर ताबा मिळवण्याचा व रोगप्रतिबंधाच्या पद्धतीही विकसित करता येतात.

शाखा व व्याप्ती : मानवी विकृतिविज्ञानाच्या उपरुग्ण विकृतिविज्ञान व ऊतक (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या−पेशींच्या−समूहाविषयीचे) विकृतिविज्ञान या दोन प्रमुख शाखा आहेत. प्रस्तुत नोंदीत मुख्यत्वे ऊतक विकृतिविज्ञानाचा विचार केला आहे व ‘विकृतिविज्ञान, उपरुग्ण’ अशी स्वतंत्र नोंदी आहे. याशिवाय ‘रोग’ व ‘रोगनिदान’ या स्वतंत्र नोंदी मराठी विश्वकोशात आहेत. जीवरसायनशास्त्र, सूक्ष्मदर्शकीय अभ्यास या उपरूग्ण विकृतिविज्ञानाच्या प्रमुख शाखा आहेत. त्याचप्रमाणे शल्यविकृतिविज्ञान व मृत्यूत्तर किंवा शव विकृतिविज्ञान या ऊतक विकृतिविज्ञानाच्या प्रमुख शाखा आहेत. विधि-विकृतिविज्ञान ही मृत्यूदत्तर विकृतिविज्ञानाची उपशाखा आहे. यांशिवाय कोशिका विज्ञान व प्रायोगिक विकृतिविज्ञान या शाखांचाही विकृतिविज्ञानात समावेश होतो.

जिवंत शरीरातील रक्त, निरनिराळे द्रायू (द्रव अथवा वायू) व उत्सर्जित पदार्थ यांच्यातील निरनिराळ्या रासायनिक घटकांच्या अस्तित्वाच्या व त्यांच्या पातळ्यांचा अभ्यास ⇨जीवरसायनशास्त्रात करतात. शरीरक्रियांतील विकृतींचे प्रतिबिंब शरीरातील जीवरसायनिक घडामोडींत पडलेले दिसते. त्यामुळे जीवरासायनिक बदलांच्या अभ्यासामुळे शरीरक्रियांतील मूळ विकृती समजणे शक्य होते.

सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसू न शकणाऱ्या व साधी संरचना व कार्य असणाऱ्या असंख्य प्रकारच्या जीवांच्या मोठ्या गटाला सूक्ष्मजीव असे म्हणतात. ⇨सूक्ष्मजीवविज्ञान ही या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा आहे. तिच्यामध्ये विशिष्ट सूक्ष्मजीव ओळखणे, त्याचे वर्गीकरण करणे, त्याच्या रचना व कार्याचा अभ्यास करणे व त्याचा इतर सृष्टीवर होणारा परिणाम अभ्यासणे या गोष्टींचा समावेश होतो. विकृतिविज्ञानाच्या संदर्भात, सूक्ष्मजीवजन्य रोगांचे कारण म्हणून सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो. ऊतकाची, शरीरातील द्रायू किंवा स्त्रावाची किंवा कृत्रिम पद्धतीने वाढवलेल्या सूक्ष्मजीवांची किंवा कोशिकांची सूक्ष्मदर्शकामधून तपासणी करण्याच्या पद्धतीला सूक्ष्मदर्शकीय चिकित्सा असे म्हणतात. ऊतक विकृतिवैज्ञानिक, उपरूग्ण विकृकिवैज्ञानिक, सूक्ष्मजीवैज्ञानिक, कोशिकावैज्ञानिक व काही जीवरासायनिक तपासण्यांचे हे मुख्य अंग आहे. ही तपासणी करण्याआधी उपलब्ध नमुन्यावर बऱ्याच वेळा अभिरंजनक्रिया (ऊतक, कोशिका, कोशिकेचे घटक वा तिच्यतील द्रव्ये अथवा जीवविज्ञानीय द्रव्ये यांसारखी सूक्ष्म वा पारदर्शक द्रव्ये दिसण्यासाठी रंगीत कार्बनी द्रव्याचा वापर करणारी क्रिया) व रासायनिक क्रिया केल्या जातात. प्रकाशीय ⇨सूक्ष्मदर्शक, क्ष-किरण सूक्ष्मदर्शक व ⇨इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक या अधिकाधिक वर्धनक्षमतेच्या सूक्ष्मदर्शकांमुळे सजीवांच्या सूक्ष्मरचनेचे व तिच्यातील रोगजन्य बदलांचे ज्ञान सध्याच्या प्रगत अवस्थेपर्यंत आले आहे.

विकृतिवैज्ञानिक तपासणीसाठी जिवंत शरीराचा भाग वा तुकडा मिळविण्यासाठी बहुधा शस्त्रक्रियेची जरूर पडते. जीवोतक परीक्षेसाठी अनेक प्रकारे ऊतकांचा नमुना मिळवता येतो [⟶ जीवोतक परीक्षा]. अशा नमुन्यांवर आवश्यक अभिरंजन क्रिया व रासायनिक क्रिया करून सूक्ष्मदर्शकीय विकृतिवैज्ञानिक, भौतिक, रासायनिक व सूक्ष्मजीवशास्त्रीय तपासण्या केल्या जातात आणि त्यांवरून मूळ रोगप्रक्रियेविषयी अनुमाने काढली जातात.

काही वेळा शस्त्रक्रियेच्या वेळी पुढील निर्णय होण्यासाठी त्वरित रोगनिदानाची आवश्यकता असते. अशा वेळी ऊतकांच्या तुकड्यावर गोठण प्रक्रिया करून त्यांचे छेद घेऊन सूक्ष्मदर्शकीय तपासणी केली जाते. या निदानावरून शल्यविशारदाला पुढील शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन मिळते. [उदा., कर्करोगाच्या मारक अर्बुदांच्या (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठींच्या) शस्त्रक्रियांत अर्बुदाच्या सूक्ष्मरचनेवरून अर्बुदांचे त्वरित वर्गीकरण करण्याची व त्यावरून त्यांची मारकता, स्थानिक वाढ व प्रसार, प्रक्षेपित प्रसाराची शक्यता व फलानुमान इ. गोष्टी ठरविण्याची आवश्यकता असते. कारण त्यांवरून त्या विशिष्ट अर्बुदासाठी परिणामकारक उपचार पद्धतीची निवड करणे शक्य होते ⟶ अर्बुदविज्ञान कर्करोग].

या प्रकारे जीवोतक परीक्षांमुळे रोग्यांवर उपचार करणाऱ्या वैद्याला निदाननिश्चिती करून पुढील उपचारांची दिशा ठरविता येते आणि उपचारांच्या उपयुक्ततेचा व फलानुमानाचा अंदाज करता येतो. आकस्मिक किंवा निदान निश्चितीपूर्वी मृत्यू आल्यास अनेक कारणांसाठी ⇨शवपरीक्षा केली जाते. शवपरीक्षेत सर्व अवयवांचे व त्यांच्या छेदांचे स्थूल व सूक्ष्म (सूक्ष्मदर्शकीय) विकृतिवैज्ञानिक परीक्षण केले जाते. तसेच जरूरीप्रमाणे शरीरांतर्गत स्त्रावांचे, द्रायूंचे व रक्ताचे नमुने रासायनिक, विषवैज्ञानिक व सूक्ष्मजीववैज्ञानिक परीक्षांसाठी घेतले जातात. या सर्व परीक्षणांच्या विस्तृत व तपशीलवार नोंदी करून त्यांवरून रोगप्रक्रियेचे स्वरूप ठरविले जाते व वर्गीकरण केले जाते. त्यावरून रोगाचे कारण, रोगप्रक्रिया, इतर परिणाम व मृत्यूपर्यंतचा प्रवास यांची एकत्र सुसंगती लावून रोगाच्या एकूण प्रक्रियेची काल्पनिक पुनर्निर्मिती करता येते. अशा अभ्यासाने रोगनिदान व मृत्यूचे कारण स्पष्ट होते परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे रोगप्रक्रिया, त्याची बाह्यतः दिसणारी लक्षणे व चिन्हे, पुढील प्रगती, मृत्यूंस कारणीभूत होणारी परिस्थिती व शरीरात घडणाऱ्या विकृति वैज्ञानिक घडामोडी यांचे सुसंगत, मूलभूत व संपूर्ण ज्ञान मिळते. अशा ज्ञानाच्या उपयोगाने निदानविषयक व उपचारविषयक प्रचलित व प्रायोगिक पद्धतींचे मूल्यमापन करणे शक्य होते. या सर्वांमुळे रूग्णसेवा अधिकाधिक उपयुक्त व परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करता येतो.

विधि-विकृतिविज्ञान : ही विकृतिविज्ञानाची एक विशेष शाखा असून हिच्यात शारीरिक इजा व मृत्यूच्या विधिविषयक प्रश्नांची उकल करण्यासाठी वैद्यकीय व विकृतिवैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून ही वेगळी शाखा हळूहळू विकसित होत गेली आहे.

गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेल्या वस्तू व रक्त, त्वचा, केस इ. गोष्टींचे भौतिक, रासायनिक व विकृतिवैज्ञानिक परीक्षण जिवंत व्यक्तीच्या संदर्भात माराच्या खुणा, जखमांचे स्वरूप आणि संपूर्ण शारीरिक तपासणी व मृत व्यक्तीची शवपरीक्षा यांवरून उपयुक्त न्यायवैद्यकीय असे निष्कर्ष काढले जातात.


 विधि-विकृतिविज्ञानाची प्रमुख कामे म्हणजे मृत्यूचे कारण व वेळ शोधणे, मृत व्यक्तीची ओळख पटवणे व इतर नमुन्यांच्या तपासणीवरून गुन्हेगाराची ओळख पटवण्यास मदत करणे. गर्भपात, भ्रूणहत्या, बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबध, निरनिराळ्या कारणांमुळे गुदमरणे इ. गोष्टी व त्यांमुळे होणारे मृत्यू अनैसर्गिक मृत्यू व अपघात, खून व आत्महत्या यांतील फरक इ. गोष्टींच्या संदर्भातील विशेष प्रश्नांची उत्तरे शोधण्याचाही विधि-विकृतिविज्ञानात प्रयत्न होत असतो. यांशिवाय विषबाधा आणि तीमुळे होणारे मृत्यू यांच्या तपासणीसाठी ⇨विषविज्ञान व गुन्हामागच्या मानसशास्त्रीय गुंतागुंतीची उकल करण्यासाठी विधि-मनोविकृतिविज्ञान ही वेगळी विशेष शाखाच उदयास आली आहे. त्यामुळे विधि-विकृतिवैज्ञानिक तपासण्यांसाठी आता स्वतंत्र गुन्हे अन्वेषण प्रयोगशाळा अस्तित्वात आल्या आहेत व तेथे काम करण्यासाठी गुन्ह्याशी संबंधित विकृतिविज्ञानाचे विशेष प्रशिक्षण घेतलेले विधि-विकृतिवैज्ञानिक तसेच रसायनशास्त्रज्ञ आणि विषवैज्ञानिक यांची आवश्यकता असते. [ गुन्हाशोधविज्ञान ⟶न्यायवैद्यक].

कोशिकांची सूक्ष्मरचना व कार्य यांच्या अभ्यासाला ⇨कोशिकाविज्ञान असे म्हणतात. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या शोधानंतर कोशिकांतील अतिसूक्ष्म घटकांचा रचनात्मक अभ्यास व त्या घटकांचा कोशिकांच्या कार्याशी संबंध लावणे शक्य झाले. कृत्रिम पोषक माध्यमांवर कोशिका संवर्धन करण्याच्या तंत्राचा [⟶ ऊतक संवर्धन] तसेच ⇨जीवभौतिकी, जीवरसायनशास्त्र, ⇨रेणवीय जीवविज्ञान (कोशिकांच्या रचना व कार्याचा रेणवीय पातळीपर्यंत अभ्यास करणारी, १९३८ मध्ये उदयास आलेली विज्ञानशाखा) इ. विज्ञानशाखांतील संशोधनाचाही कोशिकाविज्ञानाच्या अभ्यासाला उपयोग झाला आहे. कोशिकांची प्राकृत रचना व कार्ये यांच्या अभ्यासामुळे रोगजन्य परिस्थितीत कोशिकांच्या पातळीवर होणारे विकृतिवैज्ञानिक बदल अभ्यासणे शक्य झाले. [⟶ कोशिका].

प्रायोगिक विकृतिविज्ञानामध्ये नियंत्रित परिस्थितीमध्ये रोगप्रक्रियेचे कार्य अभ्यासण्याचा प्रयत्न केला जातो. पर्यावरणीय विकृतिविज्ञान या शाखेत भौतिक व रासायनिक कारकांमुळे (घटकांमुळे) उद्‌भवणाऱ्या रोगप्रक्रियांचा अभ्यास केला जातो. हृदयविकार, रोहिणीविलेपीविकार व कर्करोग या मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या घातक रोगांना मुख्यतः पर्यावरणीय कारक कारणीभूत होत असावेत, अशी शक्यता वर्तविली जाते. अशा रोगांची अधिक माहिती मिळाल्यास जैव कारकांमुळे होणाऱ्या रोगांप्रमाणे याही रोगांना काही प्रमाणात आळा घालता येणे शक्य होईल.

अशा रीतीने विकृतिविज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. ते आता रोगांमुळे [⟶ रोग] होणाऱ्या विकृती, त्यांची कारणे, रोगप्रक्रिया, शरीरातील विविध अवयवांच्या रचनेवर व कार्यावर होणारे रोगप्रकियेचे परिणाम इत्यादींच्या अभ्यासाचे विज्ञान झाले आहे. तसेच रोगाचे गांभीर्य व फलानुमान यांवर प्रकाश टाकणे आणि उपचार व रोगप्रतिबंध यांची दिशा दाखवून देणे ही सुद्धा विकृतिविज्ञानाची कार्ये आहेत.

विकृतिवैज्ञानिकाला शरीरातील अवयवांची स्थूल व सूक्ष्म रचना व रोगामुळे त्यात होणाऱ्या बदलांचे ज्ञान असणे जरूर आहे. त्याबरोबर त्याला रोग, त्याची कारणे, लक्षणे व चिन्हे, त्याचे शरीरात जिवंतपणी न मृत्यूनंतर आढळून येणारे परिणाम, या सर्वांशी संबंधित उपरुग्ण निदानीय पद्धती, उपरुग्ण चिकित्सा व इतर मूलभूत विज्ञानांचे ज्ञान असणेही जरूर आहे. तसेच शस्त्रक्रियेच्या वेळी काढलेल्या ऊतकांचा अभ्यास करून त्वरित निदान करता येणे व मृत्यूत्तर तपासणीवरून रोगप्रक्रिसंबंधी अचूक निदान करता येणेही त्याला आवश्यक आहे. या सर्व अभ्यासांच्या मदतीने उपरुग्ण, जीवोतक किंवा मृत्यूत्तर तपासणीत आढळून आलेल्या असाधारण किंवा विकृत गोष्टींचा रोगाच्या व रोग्याच्या संदर्भातील वास्तव अर्थ त्याला लावता येणे आवश्यक आहे.

इतिहास : प्राचीन काळी विकृतींचे विज्ञान असे नव्हते परंतु रोगांच्या कारणांविषयी जिज्ञासा व रोग बरे करण्याची जरूरी अनादी काळापासून आहे. त्यामुळे दैवी प्रकोप, भूतबाधा वगैरे आधिभौतिक कारणांनी रोग होतात, अशा अनेक कल्पना आदिमानवांत होत्या व त्यांना अनुसरूनच उपचाराच्याही अनेक पद्धती होत्या. पुढे रोग्याचे निरीक्षण करून दिसणाऱ्या गोष्टी व तत्कालीन विचारप्रणालीस अनुसरून उपलब्ध ज्ञानाचा उपयोग करून केलेले कारणविषयक अंदाज असे स्वरूप त्यास आले. पंचमहभूतांपैकी काहींत दोष उत्पन्न झाल्यामुळे किंवा प्राकृत स्थितीत असलेल्या धातूंमध्ये बिघाड झाल्यामुळे रोग होतात, अशी कल्पना भारतीय वैद्यकात पूर्वीपासून आहे. अशाच स्वरूपाच्या कल्पना प्राचीन ग्रीक व रोमन लोकांतही होत्या. (उदा.,चार ह्यूमर-द्रायू, चार घटक, चार गुण व त्यांचे परस्परांतील योग्य प्रमाणातील संबंध म्हणजे निरोगावस्था व त्यातील असंतुलन म्हणजे रोग.) तसेच शरीरावर बाह्यतः दिसणाऱ्या व आघातांमुळे होणाऱ्या विकृतींची वर्णने त्यांनी लिहून ठेवली आहेत.

चौदाव्या ते सोळाव्या शतकांतील विद्या व कलांच्या प्रबोधन काळात शवविच्छेदन व शरीररचनाविज्ञानाकडे अधिक लक्ष दिले गेले. तसेच मरणपूर्व रोगलक्षणे व मरणोत्तर शवपरीक्षेत आढळणारे अवयवांतील बदल यांची सांगड घालण्याचे कार्य या काळात चालू होते. तसेच रसायनशास्त्राच्या प्रगतीबरोबर शरीरक्रियांशी त्याचा संबंधही या काळात तपासला जाऊ लागला.

झां फ्रांस्वा फेर्नेल (१४९७−१५५८) यांनी १५५४ मध्ये लिहिलेल्या ‘पॅथॉलॉजिया’ या प्रबंधात रोगामुळे शरीरात दिसणाऱ्या विकृतींची संगतवार माहिती देऊन विकृतिविज्ञानाचा पाया घातला. त्यांचेच समकालीन ⇨अँड्रिअस व्हेसेलिअस (१५१४−६४) यांनी शवविच्छेदन व त्यासंबंधी लिखाण केले. त्यात रोगग्रस्त अवयवांतील बदलांची काळजीपूर्वक नोंद करण्यात आली. ⇨विल्यम हार्वी (१५७८−१६५७) यांनी रक्ताभिसरण तंत्रासंबंधी निरीक्षणांवर आधारित वास्तव कल्पना मांडली. याच सुमारास सुक्ष्मदर्शकाचा शोध लागला. ⇨मार्चेल्लो मालपीगी (१६२८−९४) यांनी शरीररचनेच्या अभ्यासासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करून ऊतकांच्या सूक्ष्मरचनेचे वर्णन केले व सूक्ष्मचिकित्सेची सुरुवात केली. ⇨जोव्हान्नी बात्तीस्ता मोर्गान्ये (१६८२−१७७१) यांनी De Sedibus et causis morborum per anatomen indagatis (१७६१) या ग्रंथात शवविच्छेदनांच्या तपशीलवार नोंदणीबरोबरच त्यातील निरीक्षणांचा रोगातील घटनांशी प्रथमच संबंध जोडला. ⇨जॉन हंटर (१७२८−९३) या शल्यविशारदांनी वैद्यकीय संशोधनासाठी प्रायोगिक पद्धतींचा अवलंब केला. मारी बिश्ट (१७७१−१८०२) यांनी शरीरातील अवयव निरनिराळ्या ऊतकांचे बनलेले असतात ऊतकांचे वाहिनी, तंतू, स्नायू, अस्थी इ. एकवीस प्रकार असतात व ही ऊतके रोगांची स्थाने असतात, असा विचार मांडला. याच सुमारास अंतःस्त्राव व ⇨अंतःस्त्रावी ग्रंथींविषयी संशोधनाला सुरुवात झाली होती. ⇨टॉमस ॲडिसन (१७९३−१८६०) यांनी ⇨अधिवृक्क ग्रंथीच्या ऱ्हासामुळे होणाऱ्या रोगाचा शोध लावला. तसेच त्यांनी मारक पांडुरोग हा वेगळा रोग म्हणून प्रथमच ओळखला. ⇨रिचर्ड ब्राइट (१७८९−१८५८) यांनी सूज येण्याच्या म्हणजे शोथाच्या प्रक्रियेचा अभ्यास केला आणि वृक्क (मूत्रपिंड) व यकृतांचे अनेक महत्त्वाचे रोग वेगवेगळे ओळखले. त्यांचे सहकारी जॉर्ज ओवेनरीज (१८१३−८९) यांनी मधुमेहात रक्तातील शर्करा वाढलेली असते, याची नोंद केली. टॉमस हॉजकिन (१७९८−१८६६) यांनी लसीका ग्रंथींच्या [रक्तद्रवाशी साम्य असलेला द्रव म्हणजे लसीका वाहन नेणाऱ्या वाहिन्यांतील आवरणयुक्त लसीका पेशींच्या पुंजक्यांच्या ⟶ लसीका ग्रंथि] काही रोगांचा शोध लावला. कार्ल फोन रोकिटान्स्की (१८०४−७८) यांनी संपूर्ण शवविच्छेदनाची पद्धत प्रस्थापित केली बऱ्याच रोगांच्या स्पष्ट व्याख्या केल्या आणि रोगी व विकृती यांतील परस्परसंबंध अचूक लावला.


 ⇨मातीआस याकोप श्लायडेन (१८०४−८१) व ⇨टेओडोर शव्हान (१८१०−८२) या वनस्पतिशास्त्रज्ञांनी कोशिका ही सजीवांची रचनात्मक एकके असून सर्व सजीव कोशिकांचे बनलेले आहेत, अशी कल्पना मांडली परंतु कोशिका सजीव एकक असून ती स्वतःसारखी दुसरी कोशिका निर्माण करू शकते व रोगजन्य विकृत बदल मुख्यतः कोशिकेत होतात, हे प्रथम ⇨रूडोल्फ लूटव्हिख कार्ल फिरखो (१८२१−१९०२) यांनी दाखवून दिले व आधुनिक कोशिकाविज्ञान व कोशिका-विकृतिविज्ञानाचा पाया घातला. Die Cellular-Pathologie (१८५८) या त्यांच्या ग्रंथामुळे त्रिदोष सिद्धांताला हादरा बसला. यांशिवाय त्यांनी अर्बुदे (१८६३−७१), रक्तकोशिकांचे प्रजनन (१८४५), रक्तपूयता व जंतुजन्य विषरक्तता यांतील भेद (१८४६), अंतर्कीलन (१८४६−५६) वगैरे विषयांसंबंधी महत्त्वपूर्ण लेखन केले.

लुई पाश्चर (१८२२−९५) यांच्या संशोधनापासून सूक्ष्मजंतु विज्ञानांची सुरुवात झाली व नंतर ⇨रॉबर्ट कॉख (१८४३−१९१०) यांनी त्यात भर घातली. याबरोबरच जीवररसायनशास्त्रही प्रगत होत होते. यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर उपरुग्ण चिकित्सा, कोशिकाविज्ञान, सूक्ष्मजंतुशास्त्र व जीवरसायनशास्त्र यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास सुरू होऊन रोगांच्या मूळ कारणांपर्यंत पोहोचणे शक्य होऊ लागले.

विसाव्या शतकात विकृतिविज्ञानातील निरनिराळ्या विशिष्ट क्षेत्रांत प्रगती सुरू झाली तसेच इतर विज्ञानशाखात व एकूणच रोगांची कारणे व रोगप्रक्रिया समजावून घेण्यास उपयोग होऊ लागला. प्रारण (तरंगरूपी ऊर्जा), समस्थानिकांचा (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारंचा) उपयोग. सूक्ष्मदर्शकासाठी जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरणांचा व क्ष-किरणांचा उपयोग, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यांमुळे कोशिका व तिच्यातील सूत्रकणिका (कलकणू), गॉल्जी पिंड, अंतःप्राकल जालक, गुणसूत्रे इ. उपकोशिकीय सूक्ष्मरचनांचा अभ्यास शक्य झाला [⟶ कोशिका]. अभिरंजनक्रियेमुळे कोशिका रचना व कार्याचे मूलभूत ज्ञान होण्यास मदत झाली. कोशिका रसायनशास्त्र, जीवभौतिकी व जीवनरसायनशास्त्र आनुवंशिकी अर्बुदविज्ञान, रेणवीय जीवविज्ञान इ. विज्ञानशाखा उदयास येऊन त्यांची प्रगती झाली. विकृतिविज्ञानात प्रायोगिक पद्धतींचा मोठ्या प्रमाणात उपयोग सुरू होऊन प्रायोगिक विकृतिविज्ञान ही वेगळी शाखाच निर्माण झाली.

शस्त्रक्रियांतील प्रगतीमुळे जीवोतक परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर जिवंत शरीरातील ऊतके उपलब्ध होऊ लागली. तसेच शवपरीक्षेचे महत्त्व समजून आल्याने तीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली.

या सर्वांमुळे शरीर, अवयव, ऊतके व मूळ जिवंत एकक असलेल्या कोशिकेची रचना, कार्य व रोगामुळे त्यात झालेले बदल यांचा अन्ययार्थ व परस्परसंबंध लावणे व या सर्वाचा रोगाची कारणे, रोगप्रिक्रिया, रोगनिदान, रुग्णचिकित्सा व उपचार यांच्याशी संबंध जोडणे शक्य झाले आणि फलानुमानाचाही अंदाज करता येऊ लागला.

ऊतक विकृतिविज्ञान : रोगग्रस्त अवस्थेत शरीरातील विविध ऊतकांत होणाऱ्या फेरबदलांचा अभ्यास म्हणजे ऊतक विकृतिविज्ञान होय. प्राकृत व निरोगी स्थितीत ऊतकांत आढळून न येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैचित्र्यांचा, बदलांचा व विकृतींचा यात समावेश होतो. रोगाची कारणे, रोगप्रक्रिया, गांभीर्य, परिणाम व फलानुमान समजण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा आहे. जिवंत शरीरातून शस्त्रक्रियेने किंवा मृत्यूनंतर शवपरीक्षेच्या वेळी निरनिराळी ऊतके मिळविली जातात व त्यांवर निरनिराळया प्रक्रिया करून त्यांच्या स्थूल व सूक्ष्म गुणधर्माचा अभ्यास केला जातो.

शरीरातील रोगाच्या स्थानाप्रमाणे, शरीररचनेतील बिघाडांप्रमाणे, शरीरक्रियेतील दोषांप्रमाणे, कारणांप्रमाणे, विकृतिवैज्ञानिक, न्यायवैद्यकीय, सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय), साथींच्या प्रसाराच्या दृष्टीने इ. अनेक प्रकारे रोगांचे वर्गीकरण केले जाते. [⟶ रोग]. यांपैकी विकृतिवैज्ञानिक वर्गीकरणात रोगप्रक्रियेच्या मूलभूत स्वरूपाचा विचार केला जातो. विशिष्ट अवयव किंवा तंत्रातील विकृतींच्या अभ्यासाला विशिष्ट ऊतक विकृतिविज्ञान म्हणतात परंतु रोगग्रस्त स्थितीत शरीराच्या विविध अवयवांतील ऊतकांत सर्वसाधारणपणे एकाच स्वरूपाच्या विकृती किंवा विशिष्ट मूलभूत रोगप्रक्रिया आढळून येतात. या सर्वाच्या एकत्रित अभ्यासाला सामान्य ऊतक विकृतिविज्ञान म्हणतात. पुढे ऊतकाच्या अभ्यासासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रांची माहिती दिली असून त्यानंतर या सर्वसाधारण विकृतींविषयीची माहिती दिली आहे.

ऊतकाच्या अभ्यासाची तंत्रे : ऊतकांच्या सूक्ष्मदर्शकीय अभ्यासासाठी जीवोतक परीक्षेसाठी किंवा शवपरीक्षेच्या वेळी मिळालेल्या ऊतकाचे किंवा अवयवाचे पातळ छेद (५ ते १० मायक्रॉन जाडीचे १ मायक्रॉन म्हणजे मीटरच्या एक दशलक्षांशाएवढे अंतर किंवा १० मी.) घेऊन त्यावर अभिरंजनक्रिया केली जाते. अभिरंजनक्रियेसाठी सामान्यपणे हीमॅटॉक्सिलीन (निळा) व इओसिन (लाल) ही रंगद्रव्ये वापरली जातात. शस्त्रक्रिया सुरू असतानाच अवयवाबद्दल सूक्ष्म माहिती त्वरित हवी असल्यास बाहेर काढलेला ऊतकाचा नमुना गोठवून त्याचे त्वरित छेद घेऊन सूक्ष्मदर्शकीय अभ्यास केला जातो. रक्ताच्या किंवा शरीरातील द्रायू व स्त्रावांच्या बाबतीत ते काचपट्टीवर पसरवून वाळलेले जातात व तसेच किंवा त्यांवर अभिरंजनक्रिया करून सूक्ष्मदर्शकाखाली तपासले जातात. रक्तासाठी लिशमान अभिरंजनक्रिया वापरली जाते. स्त्राव किंवा द्रायूतील सूक्ष्मजंतू ओळखण्यासाठी त्यांवर बहुधा ‘ग्रॅम’ अभिरंजनक्रिया केली जाते. क्षयाचे जंतू ओळखण्यासाठी ‘झील नेल्सन’ अभिरंजनक्रिया केली जाते. काही विकृतींत निर्माण होणारे पिष्टसदृश पिष्टाभ (ॲमिलॉइड), काचसदृश काचाभ (हायलाइन) इ. विशिष्ट कार्बनी पदार्थ ओळखण्यासाठी विशिष्ट अभिरंजनक्रिया उपयुक्त ठरतात. काही रासायनिक पदार्थ (उदा., ग्लायकोजेन) ओळखण्यासाठी ऊतकावर प्रथम विशिष्ट ⇨एंझाइमांची रासायनिक विक्रिया करून नंतर विशिष्ट अभिरंजनक्रिया केली जाते.

सूक्ष्मदर्शकीय अभ्यासासाठी नवीन भौतिक तंत्रविज्ञानाचाही उपयोग केला जातो. ध्रुविय (एकाच प्रतलात कंप पावणारा) प्रकाश विशिष्ट पदार्थाकडून (उदा., कोलेस्टेरॉल) एकाच पातळीत परावर्तित होत असल्याने त्याच्या साहाय्याने असे पदार्थ सूक्ष्म छेदात ओळखणे सोपे असते. जंबुपार प्रकाशाच्या साहाय्याने सूक्ष्मदर्शकीय तपासणी करणे हे नव्यानेच प्रगत झालेले तंत्र आहे. प्रारण बाहेर फेकणारे विशिष्ट समस्थानिक पोटात घेतले असता किंवा शिरेवाटे टोचले असता विशिष्ट ऊतकांतील त्यांची संहती (प्रमाण) वाढते. त्याच्या साहाय्याने त्या ऊतकांचा सखोल अभ्यास करता येतो. उदा., आयोडीन (१३१) अवटू ग्रंथीसाठी व क्रोमियन (५१) तांबड्या रक्तकोशिकांच्या अभ्यासासाठी वापरले जातात. अनुस्फुरणाच्या (अन्य उद्‌गमाकडून येणाऱ्या प्रारणाचे शोषण करून दृश्य रूपातील प्रारण उत्सर्जित होण्याच्या क्रियेच्या) साहाय्याने प्रतिजन-प्रतिपिंड प्रक्रियांचा अभ्यास करता येतो [⟶ रोगप्रतिकारक्षमता]. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने कोशिका व सूक्ष्मजीवांच्या अतिसूक्ष्म अंतरंगाचे निरिक्षण करता येते. कृत्रिम पोषक माध्यमांवर विशिष्ट सूक्ष्मजीव वाढवण्याच्या तंत्रामुळे रोग्याच्या शरीरातील द्रायूंतील सूक्ष्मजंतू अशा प्रकारे वाढवणे, ओळखणे, त्यांचा अभ्यास करणे, त्यांच्या विरूद्ध प्रभावी ठरणारी औषधयोजना सुचविणे व त्यांच्याविरूद्ध रोगप्रतिबंधक लस बनवणे शक्य झाले आहे. अशाच प्रकारच्या तंत्रामुळे विशिष्ट कोशिकाही विशिष्ट पोषक माध्यमात वाढवून त्यांचा सखोल अभ्यास करणे शक्य झाले आहे [ऊतकसंवर्धन कोशिका ⟶ कोशिकाविज्ञान]. या सर्व तंत्रांचा उपयोग रोगनिदानासाठी व संशोधनासाठी केला जातो.


 जन्मजात विकार : गर्भाच्या विकासात व वाढीस दोष निर्माण झाल्यामुळे जन्मतः दिसणाऱ्या विकारांना जन्मजात विकार असे म्हणतात. यांतील बरेच विकार आनुवंशिक किंवा गुणसूत्रीय स्वरूपाचे असतात (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांचा गुणसुत्रे म्हणतात). काही गर्भधारणेच्या काळात मातेला झालेल्या रोगांमुळे होतात व काहींच्या बाबतीत कोणतेच कारण सापडत नाही. आनुवंशिक विकारात शरीररचनेतील दोषांमुळे निर्माण होणारी व्यंगे [उदा., हात किंवा पायाला पाचापेक्षा जास्त बोटे असणे, संपूर्ण हात किंवा पायाची वाढ झालेली नसणे, मेंदू व कवटीचा अभाव, हृदयातील पडद्यात छिद्र असणे, अवयवांची वृद्धिन्यूनता, लैंगिक विकार व मध्यलिंग विकृती (पुरुष व स्त्री या दोघांची लैंगिक गुणवैशिष्ट्ये असणे) इ. अवयवांची व्यंगे व राक्षस किंवा अपरूप मानव, एकत्र चिकटलेली सयामी जुळी इ. संपूर्ण शारीरिक व्यंगे] व चयापचय किंवा शरीरक्रियांतील दोषांमुळे होणारे विकार [उदा., रक्तक्लथनातील (रक्त गोठण्यातील) दोषामुळे होणारा रक्तस्त्रावी रोग, जन्मजात रक्तविलयजन्य कावीळ, मूत्रात सिस्टीन हे ॲमिनो अम्ल आढळणे इ.] यांचा समावेश होतो. गर्भधारणेच्या प्रारंभीच्या काळात मातेला व्हायरसजन्य रोग झाल्यास, अनिष्ट प्रमाणात प्रारणांशी संबंध आल्यास किंवा काही औषधांमुळे गर्भवाढीवर विपरीत परिणाम [उदा., जन्मजात मोतीबिंदू, थॅलिडोमाइड या औषधांमुळे गर्भाच्या हातापायांची वाढ न झाल्याने निर्माण होणारे व्यंग (फोकोमेलिया), बाह्य लैंगिक अवयवांतील दोष इ.]. जन्मजात व्यंगे बऱ्याच वेळा एकापेक्षा अधिक अवयवांत आढळण्याची शक्यता असते.

शोथ : कोणत्याही प्रकारच्या इजेला शरीराने निर्मिलेल्या स्थानिक प्रतिक्रियेस शोथ असे म्हणतात. या प्रतिक्रियेत त्या ठिकाणच्या लहान व सूक्ष्म वाहिन्या आणि रक्तातील व आजूबाजूच्या संयोजी (जोडणाऱ्या) ऊताकलातील कोशिका भाग घेतात. आघातजन्य इजा (कापणे, खरचटणे, मुक्कामार इ.) उष्णता, वीज, प्रारण (जंबुपार, क्ष-किरण व गॅमा किरण) सूक्ष्मजीव (सूक्ष्मजंतू, व्हायरस, कवके इ.) अनेक प्रकारचे रासायनिक पदार्थ, विषय पदार्थ व शरीरात शिरलेले सर्व प्रकारचे परकीय पदार्थ (प्रतिजन) इ. अनेक कारणांमुळे शोथप्रक्रिया सुरू होते. कारण कोणतेही असले, तरी सुरुवातीची प्रतिक्रिया एकाच प्रकारची असते. इजेचा प्रकार व स्थान, व्यक्तीचे सर्वसाधारण आरोग्य, उपचारांच्या उपलब्धतेनुसार व परिणामकारकतेनुसार या प्रक्तियेची पुढील प्रगती व परिणाम ठरतात. तसेच स्थानिक प्रतिक्रियेपाठोपाठ ताप, आजारीपणाची भावना, अंगदुखी, डोकेदुखी, श्वेत रक्तकोशिकांची संख्यावृद्धी इ. सार्वदेहिक प्रतिक्रियाही दिसून येतात.

स्थानिक लाली, गरमपणा, सूज, वेदना व कार्यनाश ही शोथप्रक्रियेची पाच लक्षणे व चिन्हे आहेत. यांपैकी पहिल्या चारांचे वर्णन सेल्सस (इ. स. पू. ३० ते इ. स. ३८) यांनी केले व त्यामध्ये पाचव्या लक्षाणात भर गॅलेन (१३१−२०१) यांनी घातली. तांबड्या रक्तकोशिकांच्या स्थानिक संख्यावाढीमुळे लाली रक्तप्रवाहाच्या वाढीमुळे गरमपणा ऊतकात (कोशिकाबाह्य अवकाशात) द्रायुसंचय झाल्यामुळे सूज व शोथ प्रक्रियेत निर्माण झालेल्या रासायनिक पदार्थांमुळे स्थानिक तंत्रिकांची टोके उद्दीपित झाल्यामुळे वेदना ही लक्षणे आढळतात व परिणामी कार्यनाश होतो. सुरुवातीच्या शोथप्रक्रियेत मुख्यतः वाहिन्या व कोशिकांचा सहभाग असतो.

वाहिन्यांतील बदल : इजेनंतर लगेच रोहिणिकांचे काही काळ आकुंचन व नंतर प्रसरण होते. त्याचबरोबर नीलिकांचे आकुंचन होते. परिणामी केशवाहिन्यांचे प्रसरण होऊन स्थानिक रक्तपुरवठ्यात वाढ होते व रक्त जास्त वेळ साचून राहते. त्यामुळे केशवाहिन्यांतून जास्त प्रमाणात द्रायू पाझरून कोशिकाबाह्य अवकाशात साचतो. याचबरोबर केशवाहिन्यांची पारगभ्यता वाढल्याने रक्तातील प्रथिनांचे मोठे रेणूसुद्धा कोशिकाबाह्य अवकाशात प्रवेश करतात. इजेच्या ठिकाणी मुक्त झालेल्या काही रासायनिक आकर्षक घटकांमुळे केशवाहिन्यांत रक्तकोशिकांचे प्रमाण वाढते व त्यांतील श्वेत रक्तकोशिका (मुख्यतः कणकोशिका) वाहिनी भित्तींना चिकटतात (सीमांतीभवन) व अंतःकला कोशिकांमधील फटीतून कोशिकाबाहय अवकाशात प्रवेश करतात व इजेच्या ठिकाणापर्यंत पोहोचतात.

प्रत्यक्ष रक्तवाहिन्यांना इजा झालेली असल्यास रक्तस्त्राव सुरू होतो परंतु रोहिणिकांच्या आकुंचनामुळे तो लगेच तात्पुरता थांबविला जातो. तोपर्यंत इजेमुळे रक्तक्लथन प्रक्रियेला चालना मिळून वाहिन्यांच्या इजेच्या ठिकाणी रक्ताची गाठ तयार होते व रक्तस्त्राव कायमचा थांबवला जातो.

कोशिकीय बदल : रक्तवाहिन्यांतील बदलांपाठोपाठ हे बदल घडून येतात व त्यांत प्रामुख्याने श्वेतकोशिका, तंतुजन कोशिका व स्नेह कोशिका भाग घेतात. श्वेतकोशिकांपैकी अरंज्य कणकोशिका किंवा बहुरूपकेंद्री श्वेतकोशिका इजेच्या ठिकाणी सर्वप्रथम व मोठ्या प्रमाणात दिसतात. सुक्ष्मजंतूंचे भक्षण व नाश हे त्यांचे कार्य असते. ते करताना मृत झालेल्या या कोशिकांना पूयकोशिका म्हणजे पुवाच्या कोशिका म्हणतात. अम्लरंज्य अरुणकर्षी कणकोशिका मुख्यतः ॲलर्जी (अधिहर्षता) प्रतिक्रियांच्या वेळी आढळतात. क्षारकरंज्य कणकोशिका ऊतकातील स्नेह कोशिकांप्रमाणे असून त्या हिस्टामीन हे रसायन मुक्त करतात. लसीका कोशिकाही मोठ्या प्रमाणात परंतु उशिरा आढळतात व इजेस कारणीभूत प्रतिजनाविरुद्ध प्रतिपिंड निर्मितीशी त्यांचा संबंध असतो. ऊतकात आढळणाऱ्या महाभक्षी कोशिका व बृहतकोशिका बहुधा रक्तातील एककेंद्रक कोशिकांपासून निर्माण होत असाव्यात. सूक्ष्मजीव व मृत ऊतकाच्या भागांचे भक्षण आणि नाश करण्याचे व त्यांचे अपमार्जन करण्याचे (विल्हेवाट लावण्याचे) कार्य त्या करतात. ऊतकातील स्नेह कोशिकांचा हिस्टामीननिर्मितीशी संबंध असतो आणि नंतरच्या भरून येणाऱ्या प्रक्रियेत ऊतकातील तंतुजन कोशिका तंतुनिर्मितीचे कार्य करतात.

शोथाच्या कालमर्यादेनुरूप तीव्र व चिरकारी असे प्रकार होतात. तीव्र शोथ ही त्वरित दिसणारी, वेगाने वाढणारी परंतु कमी कालावधीपर्यंत टिकणारी तीव्र प्रतिक्रिया असून रक्तप्रवाहाची स्थानिक वाढ, सूज व श्वेत बहुरूपकेंद्रकी कणकोशिकांचे मोठ्या प्रमाणातील अस्तित्त्व ही तिची वैशिष्ट्ये असतात. शरीराचे सर्वसाधारण आरोग्य व उपचारांच्या उपलब्धतेवर पुढील प्रगती अवलंबून असते. इजा आटोक्यात आणता आल्यास भरून येण्याची प्रक्रिया सुरू होते सूक्ष्मजंतूंचा प्रदुर्भाव व ऊतकनाशक जास्त असल्यास त्या ठिकाणी पूयकोशिका (मृत श्वेत बहुरूपकेंद्रकी कणकेशिका) साचून गळू तयार होतो शोथप्रक्रिया मोठ्या भागात पसरून कोशिकाशोथ होतो बाह्यकलेचा स्थानिक नाश होऊन व्रण निर्माण होतो सूक्ष्मजंतू रक्तात शिरून जंतुरक्तता किंवा पूयरक्तता होते किंवा तीव्र शोथाचे चिरकारी शोथात रूपांतर होते.

चिरकारी शोथप्रक्रिया उशीरा (काही आठवडे ते महिने) प्रगत होते जास्त काळ टिकते व तीत लसीका कोशिका व प्लाविका (रक्तद्रव) कोशिका ह्या ⇨प्रतिपिंड निर्माण करणाऱ्या कोशिका व एककेंद्रक कोशिका यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आढळतो. कणार्बुदीय शोथ हा चिरकारी शोथाचा विशिष्ट प्रकार असून त्यात सुट्यासुट्या विखुरलेल्या कणार्बुदीय रचना (मधील कोशिकारहित पदार्थाभोवती महाभक्षी कोशिका, लसिका कोशिका, प्लावक कोशिका व बृहतकोशिकांची आवरणे वा थर असलेली कणसदृश विशिष्ट रचना) आढळतात. क्षय, कवकजन्य शोथ व संधिवाताभ संधिशोथ या रोगांत याप्रमाणे कणार्बुदीय शोथ आढळतो.

शोथाचे मूळ कार्य संरक्षणात्मक असते. इजेच्या ठिकाणी रक्तरपरवठा वाढविणे, इजाकारक पदार्थाची तीव्रता कमी करणे, इजाकारक पदार्थाचे भक्षण व नाश करून त्याची विल्हेवाट लावणे, प्रतिपिंड निर्मिती करून इजेच्या ठिकाणी ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध करणे व नंतर भरून येण्याची प्रक्रिया सुरू करणे या मार्गांनी हे संरक्षक कार्य केले जाते. काही वेळेस मात्र इजाकारक पदार्थांचे अस्तित्त्व सापडत नाही (उदा., संधिवाताभ संधिशोथ). अशा वेळेस स्वतःच्या शरीरातील घटकांविरूद्धच हानिकारक स्वरूपाची, दिशाहीन व ताबा सुटलेली शोथप्रक्रिया सुरू होते. [⟶ शोथ].


 रक्ताभिसरणातील दोष : [⟶ रक्ताभिसरण तंत्र]. रक्ताभिसरणातील दोषांचे पुढील प्रकार पडतात.

वाहिन्यांतील दोष : वाहिन्यांतील दोषांमुळे रोग होऊ शकतात (उदा., वाहिनी काठिण्य, रोहिणी विस्फार इ.) किंवा रोगांमुळे वाहिन्यांत दोष उत्पन्न होऊ शकतात [उदा., अपायिताजन्य प्रतिक्रिया ⟶ अपायिता]. विषबाधा, श्वासरोध, वृक्काचे काही रोग व हृद्‌रोग इत्यादींत सूज सर्व शरीरभर तर शोथ, संक्रामण व लसिका वाहिन्यांतील अडथळे इत्यादींत सूज स्थानिक असू शकते. वाहिन्यांची पारगम्यता वाढणे, तर्षण दाब [⟶ तर्षण] वाढणे, केशवाहिन्यांतील परिणामी रक्तदाब वाढणे व लसिका वाहिन्यांतील अडथळे ही सूज येण्यामागील कारणे असतात.

रक्तातील न्यूनता : रक्ताच्या एकूण आकारमानात घट झाल्यास त्याला रक्तआयतनन्यूनता म्हणतात. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावामुळे तात्काळ रक्तन्यूनता होते आणि पांडुरोग व निर्जलीभवन यांमुळे चिरकारी रक्तआयतनन्यूनता होते. तांबड्या कोशिकांची एकूण संख्या किंवा त्यांतील हीमोग्लोबिनाच्या न्यूनतेला पांडुरोग म्हणतात. अस्थिमज्जेच्या (रक्तकोशिकाजनक ऊतकाच्या) अकार्यक्षमतेमुळे सर्वसाधारण रक्तकोशिकान्यूनता (तांबड्या व श्वेत कोशिका व बिंबाणू या सर्व प्रकारच्या कोशिकांची न्यूनता) होते.

रक्तपुरवठ्यातील कमतरता किंवा व्यत्यय : रक्तवाहिनी बांधणे, वाहिनीक्लथन किंवा अंतर्कीलन यांमुळे अवयव किंव ऊतकाचा रक्तपुरवठा तात्काळ बंद होतो. याचे परिणाम ऊतकातील समांतर वा पार्श्व रक्तपुरवठ्यावर अवलंबून असतात. समांतर पुरवठा भरपूर असेल, तर ऊतक जिवंत राहू शकते अन्यथा (उदा., हृदय व मेंदूमध्ये) ऊतकनाश (अमिकोथ) होतो. वाहिनी काठिण्यासारख्या रोगांमुळे रक्तपुरवठा हळूहळू कमी होत जाऊन ऊतकाची अपपुष्टी होते.

रक्तवाढ : रक्ताच्या एकूण आकारमान वाढीस रक्तवाढ किंवा रक्ताधिक्य म्हणतात. तांबड्या कोशिकांच्या संख्यावृद्धीमुळे (उदा., रक्तकोशिकाधिक्यरक्तता), उच्च प्रदेशातील वास्तव्याने येणारी ऑक्सिजनाची चिरकारी कमतरता किंवा आकारमानवृद्धीमुळे (उदा. बृहत्कोशिकाजनक पांडुरोग) किंवा रक्तद्रवाच्या आकारमानवृद्धीमुळे रक्ताधिक्य होते.

रक्तपुरवठ्यातील वाढ : ही सर्व शरीरभर किंवा स्थानिक स्वरूपात आढळते आणि तिचे क्रियाशील व अक्रियाशील असे दोन प्रकार पडतात. रोहिणिका व केशवाहिन्यांच्या क्रियाशील प्रसरणामुळे क्रियाशील वाढ होते. व्यायामानंतर स्नायूंच्या रक्तपुरवठ्यातील शरीरक्रिया वैज्ञानिक वाढ व शोथजन्य विकृतिवैज्ञानिक वाढ या प्रकारची असते. नीला मार्गात अडथळा आल्याने नीलिकांत व केशवाहिन्यांत रक्त जास्त प्रमाणात साचून राहिल्याने अक्रियाशील वाढ होते. ती सार्वत्रिक (उदा., हृदयाच्या झडपांच्या किंवा फुफ्फुसांच्या काही रोगामुळे उजव्या जवनिकेचा कार्यनाश) किंवा स्थानिक (रक्तक्लथम किंवा बाहेरून दाब पडल्याने मुख्य नीला बंद होणे) स्वरूपाची असते. रक्तपुरवठ्यातील वाढीमुळे अवयव किंवा ऊतकात जास्त रक्त साचते व सूजही येते.

रक्तस्त्राव : रक्तवाहिनी तंत्रातून फिरणारे रक्त वाहिन्यांबाहेर आल्यास त्याला रक्तस्त्राव म्हणतात. वाहिनीमित्तींना इजा झाल्यास किंवा त्यांना ग्रासणाऱ्या रोगप्रक्रियांमुळे रक्तस्त्राव होतो. या रोगातं वाहिनीभित्तींचे रोग (उदा., वाहिनीविस्फार, वाहिनी काठिण्य इ.) भित्तीना ग्रासणारे तीव्र रोग (उदा., पूयरक्तता, जड धातू विषबाधा, ऑक्सिजनन्यूनता इ.) आणि काही रक्तदोष (उदा., रक्तक्लथन दोष, बिंबुणुन्यूनता, श्वेतकोशिकार्बुद, मारक पांडुरोग इ.) यांचा समावेश होतो.

वाहिनीक्लथन : रक्तवाहिनीतील अंतःकलेला कोणत्याही कारणाने इजा झाल्यास तेथे बिंबाणू साचून रक्तक्लथन प्रक्रिया सुरू होते व तेथे रक्ताची गाठ बनते. ही प्रक्रिया मुख्यतः रक्तस्त्राव थांबविण्यासाठी संरक्षणात्मक असते परंतु काही कारणांनी ही प्रक्रिया वाहिनीअंतर्गत घडल्यास (वाहिनीक्लथन) रक्तपुरवठ्यात व्यत्यय येतो. वाहिनीच्या प्रकारावरून (नीला किंवा रोहिणी), आकारमानावरून व ऊतकातील समांतर वा पार्श्व रक्तपुरवठ्यावरून पुढील परिणामांचा प्रकार, व्याप्ती, तीव्रता व स्थान ठरते. नीलेतील रक्तक्लथनाचे नीलाक्लथन विकार व क्लथननीलाशोथ वा संक्रामणजन्य नीलाक्लथन हे दोन प्रकार आढळतात. सर्वसाधारण रक्ताभिसरण निष्फलता, इजा, अवयवाचे दीर्घकाल अचलीकरण व दीर्घकाल विश्रांती यांमुळे नीलेतील रक्तप्रवाह मंद होऊन नीलाक्लथन विकाराला चालना मिळते किंवा नीलेच्या वा नीलेतील शोथामुळे वा संक्रामणामुळे रक्तक्लथन प्रक्रियेला चालना मिळून क्लथननीलाशोथ वा शोथजन्य नीलाक्लथन होते. दोन्हींमुळे ज्या ऊतकातील रक्ताचा त्या नीलेमार्फत निचरा केला जातो त्या ऊतकात रक्त साचते व सूज येते. रोहिणीतील रक्तक्लथन स्थानिक स्वरूपाचे असून त्याच्या मुळाशी बहुधा रोहिणीकाठिण्य हे कारण आढळते. रोहिणी रक्तक्लथनामुळे ती रोहिणी ज्या ऊतकाला रक्तपुरवठा करते, त्या ऊतकात वा अवयवात ⇨अभिकोथ किंवा ⇨कोथ होऊ शकतो.

अंतर्कीलन : रक्तप्रवाहाबरोबर वाहत येणारी रक्ताची गाठ किंवा इतर पदार्थ रोहिणी किंवा रोहिणीकेत अडकून ती अचानक बंद होण्याला अंतर्कीलन असे म्हणतात. रक्ताची गाठ, चरबी, हवा, अर्बुदांतील (मुख्यतः मारक अर्बुदांतील) कोशिका, सूक्ष्मजंतूंचे पुंजके, परोपजीवा जीव, उल्बद्रव [⟶ उल्ब], सुटा झालेला रोहिणीविलेप इ. पदार्थांचे अंतर्कील आढळतात. ही प्रक्रिया अचानक होत असल्याने सहसा तीव्र स्वरूपाची असते आणि परिणामांची तीव्रता ऊतकातील पार्श्व रक्तपुरवठ्यावर अवलंबून असते. सहसा स्थानिक ऊतकमृत्यू (अमिकोथ) होतो व काही वेळा तात्काळ मृत्यूही येऊ शकतो.


 अपकर्ष व ऊतकमृत्यू : ऊतकांवर विपरीत परिणाम करणाऱ्या गोष्टींमुळे कोशिकांमध्ये होणाऱ्या बदलांना अवकर्षण म्हणतात. हे बदल तात्परते व परिवर्तनीय असू शकतात आणि योग्य उपचारांनंतर ते नाहीसे होऊन कोशिका पूर्ववत कार्यक्षम होऊ शकतात. पुरेसा ऑक्सिजन न मिळणे, रक्तपुरवठ्यातील व पोषणातील न्यूनता, तापमानातील आत्यंतिक बदल, प्रारण व विषारी रासायनिक पदार्थ या कारणांमुळे अपकर्षण होऊ शकतो. कोशिकांमध्ये होणाऱ्या बदलांच्या सूक्ष्मदर्शकातून दिसणाऱ्या स्वरूपावरून व अपकर्षणामुळे ऊतकात साचणाऱ्या काही अप्राकृत पदार्थांच्या अस्तित्वावरून अपकर्षणाचे प्रकार ठरविले जातात. कोशिकांत पोकळ्या निर्माण झाल्यास त्याला द्रवार्बुदीय अपकर्ष व संपूर्ण ऊतक एकजीव पारदर्शक पदार्थाचे बनले आहे असे दिसते तेव्हा त्याला काचाम अपकर्ष म्हणतात. तसेच जलीय (सूज व द्रायूचे अंतःशोषण ही गुणवैशिष्ट्ये असणारा कोशिकांचा) अपकर्ष व श्लेष्मल अपकर्षही (कोशिकाद्रव्याचे बुळबुळीत वा चिकट द्रव्यात रूपांतरामुळे होणारा ऊतकाचा अपकर्ष) आढळतो. ऊतकात मेद वाढल्यास त्याला वसापकर्ष वा मेद अपकर्ष, कॅल्शियम साचल्यास त्याला कॅल्शियमयुक्त अपकर्ष (अप्राकृत कॅल्सीभवन) व पिष्टसदृश पदार्थ वाढल्यास त्याला पिष्टाभ अपकर्ष असे म्हणतात.

शरीरनिर्मित किंवा बाह्य रंजक पदार्थ ऊतकात साचल्यास त्याला रंजनापकर्ष म्हणतात. त्वचेखालील कृष्णरंजक उन्हात जास्त काळ वावारणाऱ्या व्यक्तींत जास्त प्रमाणात आढळते. तसेच गरोदरपणी उदरत्वचा, स्तनमंडल व गालांवर ते प्राकृतपणे जास्त प्रमाणात आढळते. ⇨ॲडिसन रोगातही ते त्वचेखाली व श्लेष्मकलेखाली जास्त प्रमाणात आढळते. त्वचेखाली रक्तस्त्रावाच्या ठिकाणी तांबड्या कोशिकांचे भक्षण व विल्हेवाट तेथील बृहतकोशिका करतात. त्या प्रक्रियेत हीमोग्लोबिनाच्या विघटनांनंतर बनणारे लोहयुक्त रक्तरंजक हीमोसिडेरीन हे द्रव्य त्या ठिकाणी बराच काळ साचलेले आढळते. तसेच एक प्रकारच्या पांडुरोगातही ते प्लीहा (पानथरी) व लसीका ग्रंथींत साचलेले आढळते. रक्तविलय (रक्तकोशिकांचा वाहिनी अंतर्गत मोठ्या प्रमाणात नाश) झाल्यास, पित्तनलिकारोध झाल्यास किंवा यकृतकोशिका अकार्यक्षम बनल्यास पित्तरंजक पित्तारुग्ण या पिवळ्या द्रव्याचे रक्तातील प्रमाण वाढून कावीळ होते.

अपकर्ष फार काळ राहिल्यास किंवा त्याची वरील कारणे तीव्र असल्यास तीव्र शोथ आणि संक्रामणांमुळे व रक्तपुरवठा पूर्ण बंद झाल्यामुळे ऊतकमृत्यू होतो. हा बदल कायमस्वरूपी असून त्यात कोशिकांचा नाश होतो. नाश झालेल्या भागात कालांतराने बृहतकोशिका व महाभक्षी कोशिकांचे भक्षण कार्य सुरू होऊन मृत कोशिकांची विल्हेवाट लावली जाते व त्या ठिकाणी भरून येण्याची व दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होते. [⟶ ऊतकमृत्यु].

कोशिकांची वाढ, पोषण व प्रभेदन यांमधील दोष : अतिपुष्टी : ऊतकाचे किंवा अवयवाचे आकारमान प्राकृत आकारमानापेक्षा जास्त वाढल्यास त्याला अतिपुष्टी म्हणतात. ऊतकातील कोशिकांचे आकारमान वाढणे (कोशिकांची अधिवृद्धी), आकारमान कायम राहून ऊतकातील कोशिकांची संख्या वाढणे (कोशिकांची अधिवृद्धी वा संख्यावृद्धी) किंवा दोन्हींच्या एकत्रित परिणामामुळे अवयवाची अधिवृद्धी होते.

समविभाजन [कोशिकेच्या केंद्रकाच्या विभाजनानंतर बनविलेल्या दोन कोशिकांतील गुणसूत्रांची संख्या कायम राहण्याची प्रक्रिया ⟶ कोशिका] होण्याच्या क्षमतेवरून कोशिकांचे विभाजनक्षम समविभाजन (अंतर्समविभाजित) व समविभाजनोत्तर असे प्रकार पडतात. विभाजनक्षम कोशिका अप्रभेदित किंवा अर्धप्रभेदित असून त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांचे समविभाजन होऊन त्याच प्रकारच्या दोन कोशिका तयार होतात. त्या यकृत, लसीका ग्रंथी, अधिकृत बाह्यक, त्वचा व श्लेष्मकलेचे अधःस्तर, अस्थिरमज्जा (स्कंध कोशिका) इ. ठिकाणी आढळतात. समविभाजनोत्तर पूर्ण प्रभेदित व पूर्ण कार्यक्षम कोशिका हृदय, मेंदू, रक्त इ. ठिकाणी आढळतात. त्या शेवटी मृत्यू पावतात. एकाच प्रकारच्या उत्तेजकामुळे विभाजनक्षम अंतर्सभविभाजित कोशिकांची संख्यावृद्धी होते आणि समविभाजनोत्तर कोशिकांचे आकारमान वाढते.

अतिपुष्टीस कारणीभूत सर्व गोष्टी संपूर्णपणे ज्ञात नाहीत परंतु सर्व साधारणपणे अतिरिक्त कामाच्या आवश्यकतेमुळे अतिपुष्टी होते. ही आवश्यकता प्राकृत असल्यास त्याला शरीरक्रियावैज्ञानिक अतिपुष्टी म्हणतात (उदा., व्यायामानंतर स्नायूंची पुष्टी, गर्भधारणेनंतर गर्भाशय व स्तनांची पुष्टी, उंच प्रदेशात राहणाऱ्यांमध्ये आढळणारी तांबड्या रक्तकोशिकांची संख्यावृद्धी इ.). रोग किंवा इतर कारणांमुळे ऊतकाचा काही प्रमाणात नाश झाल्यास अवयवांची एकूण कार्यक्षमता टिकविण्यासाठी उरलेल्या कार्यक्षम ऊतकाची पुष्टी होते, त्याला प्रतिपूरक (भरपाईची) अतिपुष्टी म्हणतात (उदा., एक वृक्क अकार्यक्षम बनल्यास किंवा काढून टाकल्यास दुसऱ्या वृक्काची पुष्टी, उच्च रक्तदाब किंवा झडपांच्या विकारांमुळे हृदयाची पुष्टी). काही वेळा अंतःस्त्रावांच्या उद्दीपनामुळे अतिपुष्टी होते (उदा., गर्भधारणेच्या काळात गर्भाशय व स्तनांची वृद्धी, पोष ग्रंथजन्य अंतःस्त्रावांमुळे अवटु, परावटू, अधिवृक्क इ. ग्रंथींची वृद्धी).

अधिवृद्धीचे अर्बुदांशी साम्य आढळते व काही वेळा दोन्हींतील फरक ओळखणे अवघड होते परंतु दोन्हींतील मुख्य फरक म्हणजे अधिवृद्धीतील कोशिकांचे प्रभेदन प्राकृत असते.

अधिवृद्धी व अतिपुष्टी दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिननिर्मिती आवश्यक असल्याने पुरेसा रक्तपुरवठा व अन्नपुरवठा आवश्यक असतो [⟶ अधिवृद्धि].

वृद्धिन्यूनता : ऊतक किंवा अवयव अविकसित राहण्याला अवृद्धी वा वृद्धिन्यूनता म्हणतात. जवळजवळ अस्तित्वात नाही इतक्या कमी प्रमाणात अवयव अविकसित राहिल्यास त्याला अवृद्धी म्हणतात. अवयवांची निर्मितीच न झाल्यास त्याला अनुत्पत्ती म्हणतात. अवृद्धी व अनुत्पत्ती यांच सूक्ष्म फरक असून त्यांची कारणेही वेगवेगळी असू शकतात. वृद्धिन्यूनता मुख्यतः वृक्क, अंडाशय, वृषण, हृदय व शरीरातील जवळजवळ सर्वच अवयवांत व बहुधा जन्मतःच आढळू शकते. त्या दृष्टीने तिचा जन्मजात विकारांत समावेश होतो.

पूर्ण विकसित झालेल्या कोशिकेच्या, ऊतकांच्या किंवा अवयवाच्या आकारमानात नंतर घट झाल्यास त्याला अपपुष्टी म्हणतात. यांत इजा, संक्रामण इ. इतर कारणांमुळे झालेल्या ऊतकनाशाचा समावेश केला जात नाही. कोशिकेच्या पोषणात व्यत्यय आल्याने बदललेल्या चयापचय प्रक्रियेमुळे (कोशिकांतील प्रथिनाशक एंझाइमांची अतिरिक्त क्रियाशीलता हा मूळ दोष असावा असे मानतात) अपपुष्टीचे सर्व प्रकार होतात.

शरीरक्रियावैज्ञानिक अपपुष्टी वय वाढण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून सर्व व्यक्तींत व कमीअधिक प्रमाणात अनेक अवयवांत आढळते (उदा., यौवनलोपी ग्रंथी व लसीका ऊतकाची पौगंडावस्थेच्या सुमारास होणारी अपपुष्टी व वृद्धापकाळात सर्वच अवयवांची होणारी अपपुष्टी).

विकृतिवैज्ञानिक अपपुष्टीचे पुढील प्रकार उपरुग्ण निरीक्षणांवर आधारलेले आहेत : (अ) निरुपयोग अपपुष्टी अक्रियाशीलतेमुळे होते (उदा., अस्थिभंगानंतर दीर्घकाळ अचलीकरणांमुळे वा पोलिओसारख्या रोगांत तंत्रिकांच्या उद्दीपनाच्या अभावी अकार्यक्षम झालेल्या स्नायूंची अपपुष्ठी). (आ) वाहिनीजन्य अपपुष्टी अवयवाच्या रक्तपुरवठ्यातील वाढत्या प्रमाणातील कमतरतेमुळे होते (उदा., सूक्ष्मवाहिन्या किंवा रोहिणिका काठिण्यामुळे रक्तपुरवठा कमी झाल्याने होणारी मेंदू वा वृक्काची अपपुष्टी). (इ) दाबजन्य अपपुष्टी अवयवावर सतत दाब पडत राहिल्याने होते. दाबामुळे रक्तपुरवठ्यात व्यत्यय येतो किंवा कोशिकांच्या कार्यातही विकृती निर्माण होऊ शकते. ऊतकात अनैसर्गिक पदार्थ सातल्यासही (उदा., पिष्टाभ) कोशिकांच्या पातळीवर अपपुष्टी होते. (ई) ताणजन्य अपपुष्टी दीर्घकाळ अतिरिक्त कामाच्या ताणामुळे येणाऱ्या थकव्यामुळे होते (उदा., अंतःस्त्रावी ग्रंथींची अपपुष्टी या प्रकारे होऊ शकते). (उ) प्राकृत रचना व कार्यासाठी काही अवयव अंतःस्त्रावांच्या उद्दीपनावर अवलंबून असतात. काही कारणांनी या अंतःस्त्रावांची पातळी कमी झाल्यास त्यांवर अवलंबून असणाऱ्या अवयवांची अंतःस्त्रावन्यूनताजन्य अपपुष्टी होते [उदा., पोष ग्रंथीच्या नाशामुळे अवटू, अधिवृक्क, अंडाशय इ. पोषक अंतःस्त्रावांवर अवलंबून असणाऱ्या अंतःस्त्रावी ग्रंथींची अपपुष्टी अंडाशयजन्य अंतःस्त्रावांच्या कमतरतेमुळे होणारी गर्भाशयाची अपपुष्टी ⟶ अपपुष्टी].


 अनुवृद्धी : कोशिकांभोवतीच्या नैसर्गिक पर्यावरणातील बदलाला प्रतिक्रियास्वरूप असलेल्या कोशिकांतील बदलांना अनुवृद्धी (मध्यवृद्धी) असे म्हणतात. यामध्ये मूळ अपरिपक्क अप्रभेदित कोशिकांपासून विशिष्ट कार्य करणाऱ्या परिपक्व व पूर्णप्रभेदित कोशिका बनण्याच्या मार्गात बदल होऊन विशिष्ट कार्य करणाऱ्या आधीच्या ऊतकाची जागा वेगळ्या प्रकारचे वेगळे विशिष्ट कार्य करणारे ऊतक घेते. शरीरातील सर्व कोशिकांत अनुवंशिक गुणधर्म दर्शविणारा एकाच प्रकारचा जनुकांचा (जीनचा) संच असतो परंतु विशिष्ट कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे त्यातील काही जनुके कार्यरत होऊन काही सुप्त राहतात. परिणामी समविभाजनानंतर कोशिकाच्या पुढील पिढ्या विशिष्ट कार्यासाठी उपयुक्त विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या बनत जातात. प्रभेदन प्रक्रियेत कोशिकांभोवतीच्या पर्यावरणाचा महत्त्वाचा सहभाग असतो. त्यामुळे पर्यावरणातील बदलांमुळे प्रभेदनाचा हा मार्ग बदलू शकतो. हे बदल तात्पुरते किंवा कायमस्वरूपी असू शकतात. बदललेल्या परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्याचे उपयुक्त कार्य या बदलांमुळे होते परंतु काही वेळा या बदलांमुळे ऊतकाच्या मूळ नैसर्गिक कार्यात अडथळे येऊन रोगजनक परिस्थिती निर्माण होते. प्राकृत वाढ होण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून शरीरक्रियावैज्ञानिक अनुवृद्धी असू शकते. याउलट विषारी पदार्थ व रसायने, सूक्ष्मजीव व सूक्ष्मजंतू, चिरकारी शोथ, परोपजीवी जीव, जीवनसत्त्वांची कमतरता, चिरकारी क्षोभ (दाह) इ. कारणांमुळे विकृतिवैज्ञानिक अनुवृद्धी होते. मुखगुन्हा (तोंडाची पोकळी), जठर, पित्ताशय, मूत्राशय व गर्भाशय ग्रीवा (गर्भाशयाचा मानेसारखा चिंचोळा भाग) यांतील श्लेष्मकलेत किंवा तंत्वात्मक ऊतक, कूर्चा इ. संयोजी ऊतकांत विकृतिवैज्ञानिक अनुवृद्धी जास्त वेळा आढळते.

अप्रभेदित वृद्धी : प्राकृत परिस्थितीत ज्या ठिकाणी विशिष्ट कार्य करणाऱ्या विशिष्ट प्रकारे प्रभेदित झालेल्या व परिपक्व कोशिका अढळतात, तेथे तुलनेने अपरिपक्व व अप्रभेदित (व अकार्यक्षम) कोशिका आढळल्यास त्याला अप्रभेदित वृद्धी असे म्हणतात. कोशिकांच्या परिपक्व होण्याच्या प्रभेदनाच्या प्राकृत प्रक्रियेत अडथळा आल्याने अप्रभेदित वृद्धी होते. या कोशिकांचेस केंद्रक मोठे, अनियमित आकाराचे व अभिरंजनक्रियेत जास्त गडद होणारे असून त्यात अनेक केंद्रिका आणि अनियमित व असंतुलित समविभाजन आढळते. त्यातील कोशिकाद्रवात एरवीच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्माचा अभाव आढळतो. या कोशिकांची वाढ व विभाजन लवकर होते. या प्रकारचे बदल मारक अर्बुदांत आढळतात [⟶ अर्बुदविज्ञान]. अप्रभेदनाच्या तीव्रतेचा व अर्बुदाच्या मारकतेचा सरळ संबंध असल्याने अर्बुदाच्या विकृतिवैज्ञानिक तपासणीत कोशिकांच्या अप्रभेदनाची तीव्रता अजभावणे महत्त्वाचे असते.

अर्बुदे : अनैसर्गिक, अनियमित, असंयमित व अनावश्यक ऊतक वृद्धीला अर्बुद असे म्हणतात व अशा वाढीला कारणीभूत असलेले गुणधर्म कोशिकांत दिसतात. या बदललेल्या गुणधर्मांना नवोत्पत्ती म्हणतात. अर्बुदे कोणत्याही ऊतकात होऊ शकतात. त्यांचे सर्वसाधारण वर्गीकरण त्यांतील ऊतकाप्रकारावरून केले जाते. एकाच अर्बुदात अनेक प्रकारच्या ऊतकांचा समावेश असल्यास त्याला मिश्र-अर्बुद म्हणतात. वाढ, वर्तणुक व पुढील परिणामांनुसार अर्बुदांचे वर्गीकरण जीवोतक परीक्षेने मिळविलेल्या ऊतकाच्या नमुन्यावरील विकृतिवैज्ञानिक सूक्ष्मदर्शकीय चिकित्सेद्वारे करावे लागते. हे वर्गीकरण उपचार आणि भवितव्य (फलानुमान) ठरविण्यासाठी महत्त्वाचे व आवश्यक असते. [⟶ अर्बुदविज्ञान].

भरून येण्याची क्रिया : कोणत्याही कारणामुळे नाश पावलेल्या ऊतकाची दुरुस्ती दोन प्रकारांनी होते. नाश झालेल्या कोशिकांची जागा त्याच प्रकारच्या नव्याने निर्माण झालेल्या कोशिका घेतात किंवा त्या जागी संयोजी तत्वात्मक ऊतकाची वाढ होते. नाश पावलेल्या ऊतकाच्या प्रकारांवर व इजाग्रस्त भागाच्या व्यप्तीवर हे अवलंबून असते. कोशिका समविभाजनाने पुनर्निर्मितीची क्षमता असलेल्या ऊतकात (उदा., यकृत, श्लेष्मकला, त्वचा, अस्थी, अस्थिमज्जा इ.) इजेभोवतीच्या त्याच प्रकारच्या कोशिकांची पुनर्निर्मिती होऊन मुळावरहुकूम प्रतिष्ठापना किंवा दुरूस्ती केली जाते. पुनर्निर्मितीची क्षमता नसलेल्या ऊतकांत (उदा., मेंदू, हृदय स्नायू, तंत्रिका केशिका, कूर्चा इ.) किंवा नाश झालेल्या भागाची व्याप्ती फार मोठी असल्यास त्या ठिकाणी मुख्यतः तंत्त्वात्मक संयोजी ऊतकाची वाढ होऊन नाश झालेल्या भागाची दुरुस्ती केली जाते परंतु असा भरून आलेला भाग मूळ ऊतकाचे कार्य करण्यास असमर्थ असतो.

पुनर्रचनेत प्रतिष्ठापना वा दुरुस्ती प्रक्रियेत शोथप्रक्रिया, इजाग्रस्त भागातील अनेक प्रकारच्या कोशिकांची (उदा., प्रत्यक्ष विशिष्ट ऊतकातील, रक्तवाहिन्यांतील आणि रक्तातील व आजूबाजूच्या संयोजी ऊतकांतील कोशिकांची) पुनर्निर्मिती प्रक्रिया आणि भक्षी कोशिकांची नाश झालेल्या व अनावश्यक भागाची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया एकत्रितपणे कार्य करत असतात. सर्वसाधारणपणे ऊतकाच्या प्रकाराप्रमाणे एक ते दोन आठवड्यांत तात्पुरती कामचलाऊ दुरुस्ती केली जाते व नाश पावलेल्या जागेची जास्तीत जास्त मुळावरहुकुम पुनर्रचना करण्याचे कार्य पुढे अनेक दिवस (महिने व वर्षे) चालू राहते.

या प्रक्रियेत अनेक कारणांनी दोष निर्माण होऊ शकतो व दुरुस्तीस अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो [उदा., अस्थींची प्राकृत भरून येण्याची प्रक्रिया व विलंब जुळणी ⟶ विकलांग चिकित्सा].

पहा : उतकविज्ञान फिरखो, रूडोल्फ लूटव्हिख कार्ल रोग रोगनिदान विकृतिविज्ञान, उपरुग्ण.

संदर्भ : 1. Bhende, Y. M. Deodhar, S. G. General Pathology, 2 parts, Bombay, 1986.

           2. Dey, M. C. Dey, T. K. A Textbook of Pathology, Calcutta, 1931.

           3. Illingworth, C. Dick, B. M. A Textbook of Surgical Pathology, London, 1975.

           4. Robbins, S. L. and others, Pathologic Basis of Disease, Philadelphia, 1984.

           5. Van – Peenan, H. J. Essentials of Pathology, Chicago, 1966.

प्रभुणे, रा. प. कुलकर्णी, श्यामकांत