रुन्टश्टेट, कार्ल रूडोल्फ गेर्ट फोन : (१२ डिसेंबर १८७५−२४ फेब्रुवारी १९५३). जर्मन फील्ड मार्शल. दुसऱ्या महायुद्धातील ⇨ॲडॉल्फ हिटलरचा एक प्रसिद्ध सेनानी [⟶ महायुद्ध, दुसरे]. त्याचा जन्म ऑशार्स्लाबान (पूर्व जर्मनी) येथील इतिहासप्रसिद्ध ब्रांडनबुर्क घराण्यात झाला. त्याचे वडील लष्करात सेनापती होते. मिलिटरी अकॅडेमी आणि ‘द जनरल स्टाफ कॉलेज’ यांसारख्या संस्थांतून रुन्टश्टटचे सैनिकी शिक्षण-प्रशिक्षण झाले.

पहिल्या महायुद्धात त्याने मेजर, लेफ्टनंट कर्नल इ. विविध हुद्यांवर कामे केली. [⟶ महायुद्ध, पहिले]. एका लष्करी तुकडीचा तो चीफ ऑफ स्टाफ होता. १९३८ मध्ये तो लष्करातून निवृत्त झाला. दुसऱ्या महायुद्धात त्याला परत बोलाविण्यात येऊन पोलंडवरील स्वारीचा प्रमुख म्हणून नेमण्यात आले (१९३९). यूरोपातील पूर्व-पश्चिम आघाड्यांवर त्याचे जबरदस्त नियंत्रण होते. फ्रान्सच्या पराभवात त्याचा मोठा वाटा होता (१९४०). डंकर्कजवळ ब्रिटिशांच्या वेढ्यातून जर्मन सैन्याची मोठ्या कौशल्याने त्याने सुटका केली. या पराक्रमाबद्दल त्यास ‘फील्ड मार्शल’ हा किताब मिळाला (जुलै १९४०). १९४१ मध्ये रशियावरील स्वारीत त्याने भाग घेतला होता. तीत प्रथम तो यशस्वी झाला परंतु नोव्हेंबर १९४१ मध्ये रॉस्टॉव्ह येथे तो पराभूत झाला. १९४२ मध्ये पश्चिम फ्रेंच सीमेचा तो प्रमुख होता. जुलै १९४४ मध्ये नॉर्मंडो येथे वेळकाढू धोरण अवलंबिल्यामुळे त्यास बडतर्फ करण्यात आले. पुढे फ्रान्स आणि बेल्जियममधून जर्मनांची हकालपट्टी झाल्यामुळे तसेच अमेरिकन व ब्रिटिश फौजा सिगफ्रीड लाईनजवळ आल्यानंतर त्यास पुन्हा बोलावण्यात येऊन जर्मन लष्कराचा सरसेनानी म्हणून नेमण्यात आले.

रुन्टश्टेटने १९४४ मध्ये आर्देनजवळील ‘बॅटल ऑफ द बल्ज’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या लढाईची मोहीम आखली. आर्देनच्या दुर्गम प्रदेशातून जर्मनांनी अमेरिकन सैन्याच्या आघाडीवर जबरदस्त तडित प्रतिहल्ला केला, यावेळी अमेरिकन जनरल ⇨जॉर्ज स्मिथ पॅटन याच्या तिसऱ्या आर्मीने झपाट्याने तडाखेबंद कारवाया केल्या व अशक्यप्राय वाटणाऱ्या हालचाली करून पॅटनने जर्मनांनी वेढलेल्या अमेरिकन सैन्याची सुटका केली. त्याचवेळी जर्मन सैन्याची पीछेहाट सुरू झाली व जर्मनांचा पराभव झाला. पराभवामुळे नाझींमध्ये असलेली रून्टेश्टेटची प्रतिष्ठा कमी झाली. अमेरिकन सेनेने रुन्टश्टेटला म्यूनिकपासून दक्षिणेकडे सु. ३७ किमी. वर बॅड टोल्ज या गावाजवळ अटक केली. तो अखेरपर्यंत ब्रिटिशांच्या तुरुंगात होता. प्रकृतिअस्वास्थामुळे त्याच्यावर युद्धगुन्हेगार म्हणून खटला चालविण्यात आला नाही. मे १९४९ मध्ये त्यास उपचारासाठी हँब्रुर्ग येथील ब्रिटिश लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तथापि कारावासात असतानाच हॅनोव्हर (पश्चिम जर्मनी) येथे त्याचे निधन झाले.

बोराटे, सुधीर