विलुप्ती भवन : एखाद्या प्राण्याच्या अथवा वनस्पतीच्या जातीचे अस्तित्व पृथ्वीवरून संपूर्णतः नष्ट होणे. भरपूर संख्येने आढळणारे एखाद्या जातीचे जीव हळूहळू तुरळक प्रमाणात दिसू लागतात तेव्हा बहुतेक वेळा ती जास विलुप्तीभवनाच्या मार्गावर असते.

भारतीय उपखंड आणि आफ्रिका येथे चित्ता हा प्राणी जंगलात सर्वत्र आढळत होता. आफ्रिकेमध्ये चित्ता अजून नेसर्गिक अवस्थेत आढळत असला तरी, भारतीय चित्ता नामशेष होऊन ७५ पेक्षा अधिक वर्षे झाली. कॅलिफोर्नियाचा काँडॉर पक्षी (गिधाडांची एक जात) नैसर्गिक अवस्थेत आता कोठेही आढळत नाही परंतु काही पक्षिप्रेमी संघटनांच्या प्रयत्नां मुळे या पक्ष्याचे प्रजनन प्राणिसंग्रहालयात बंदिस्त अवस्थेत शक्य झाले आहे. जे जीव नैसर्गिक अवस्थेत सापडत नसले तरी प्राणिसंर्गहालयात अस्तित्वात आहेत, त्यांच्याबाबत बोलताना वन्य विलुप्तीभवन अशी संज्ञा वापरतात. विलुप्तीभवन ही अपरिवर्तनीय घटना आहे. विलुप्त झालेले जीव, उदा., ⇨डायनोसॉर, ⇨ट्रायलोबाइट इ., पुनश्च निर्माण होत नाहीत.

क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर विलुप्तीभवनाचा विचार केल्यास विलुप्तीभवनाचे दोन प्रकार मानता येतील. पहिल्या प्रकारात क्रमविकास होत असताना हजारो-लाखो वर्षाच्या कालावधीत एखाद्या जीवामध्ये हळूहळू इतका बदल होतो की, त्याचे पुढील पिढीतील वंशज मूळ पूर्वजांपासून खूपच वेगळे दिसायला लागतात. त्यांना साहजिकच जीवविज्ञानातील नामकरण पद्धतीच्या नियमांनुसार वेगळे वैज्ञानिक नाव दिले जाते. या प्रक्रियेत मूळ जीवाची जाती विलुप्त झाली असली तरी तत्पूर्वी त्या जातीपासून नवीन जाती निर्माण झालेली आहे. काही वेळा तर क्रमविकासाच्या प्रक्रियेत एका मूळ जातीपासून निरनिराळ्या तीन किंवा चार नवीन जाती निर्माण होऊ शकतात. अर्थातच मूळ जाती येथेही विलुप्त झालेली असते. या प्रकारास ‘आभासी विलुप्तीभवन’ असे म्हणतात. विलुप्तीभवनाच्या दुसऱ्या प्रकारात मात्र एखादा जीव वरीलप्रमाणे आपली वंशावळ चालू ठेवण्यास असमर्थ ठरतो आणि पूर्णतः विलुप्त होतो. या प्रकारात त्या जीवाचे अंतिम विलुप्तीभवन झाले असे म्हणतात.

अशा प्रकारे जैव क्रमविकासाच्या ओघात पृथ्वीवर एका बाजूला जातिउद्‌भवन किंवा जातिनिर्मिती म्हणजे नवीन जाती निर्माण होण्याची क्रिया आणि दुसऱ्या बाजूला विलुप्तीभवन म्हणजेच जाती नामशेष होण्याची क्रिया या दोन्ही घटना सतत चालू असतात. पृथ्वीवर जीवांची निर्मिती झाल्या दिवसापासून आजतागायत प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या किती जाती आल्या आणि गेल्या याचा संपूर्ण हिशोब कधीच लागणार नाही. अगदी आजमितीस जिवंत असणाऱ्या जीवांच्या एकूण किती जाती आहेत, हेही आपण नेमके सांगू शकत नाही. कितीतरी छोट्या-मोठ्या जीवांचा आपणास अजून मागमूस देखील लागलेला नाही, तरीसुद्धा पृथ्वीवर वास्तव्य केलेल्या एकूण जीवजातींपैकी फक्त २% जातीच आज अस्तित्वात आहेत, तर उरलेल्या ९८% जाती आपला वंशसुद्धा चालू न ठेवता विलुप्त झाल्या, असे ढोबळमानाने सांगता येते. क्रमविकासाचे एक ज्येष्ठ अभ्यासक जॉर्ज सिम्पसन यांच्या मते क्रमविकासाची अखेरची निष्पत्ती विलुप्तीभवन हीच असते, हे कितीही अतर्क्य वाटले तरी सत्य आहे.

क्रमविकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत अथवा कालखंडांत किती व कोणते जीव पृथ्वीवर वावरत होते हे कळण्यासाठी फक्त जीवाश्मांचा (शिळारूप झालेल्या जीवांच्या अवशेषांचा) अभ्यासच उपयोगी पडतो. जीवाश्म हेच फक्त त्या कोट्यावधी वर्षापूर्वीच्या जीवसृष्टीचे ठोस पुरावे आहेत. या जीवाश्मांच्या अभ्यासावरूनच ⇨चार्ल्‌स डार्विन यांना क्रमविकासाच्या सिद्धांताची कल्पना स्फुरली. [⟶ जीवाश्म क्रमविकास].

ग्रीकांच्या काळात लोकांची अशी धारणा होती की, एखादा जीव पृथ्वीवरून कायमचा नाहीसा होऊच शकत नाही. तथापि अठराव्या शतकातील संशोधकांना मात्र आपण गोळा केलेल्या व अभ्यासिलेच्या अनेक जातींच्या जीवाश्मांशी मिळतेजुळते जीव आता अस्तित्वात नाहीत, असे स्पष्टपणे दिसून आले. असे असूनसुद्धा ग्रीक पुराणमतवाद्यांच्या पगड्याखाली असणारे लोक तसेच धार्मिक आणि उत्स्फूर्त जीवनिर्मिती किंवा सृष्टिनिर्मिती मानणारे लोक मात्र जीवाश्मांच्या पुराव्यावर विश्वास ठेवायला तरीही तयार नव्हते. अगदी आजही जगात उत्स्फूर्त जीवनिर्मितीवर विश्वास ठेवणारे काही लोक आहेतच.

जीवाश्मांच्या पुराव्यांतील विश्वसनीयतेमध्ये काही कमतरता आहेत. याचे पहिले कारण असे की, मुळातच जीवाश्मीभवन (जीवाश्म तयार होणे) ही काही सर्वसाधारण घडणारी प्रक्रिया नाही. मरण पावलेल्या प्रत्येक जीवाचा अवशेष अवसादी (गाळाच्या) खडकांमध्ये जतन होतोच असे नाही, उलट पाणथळ जागांमध्ये पाण्यात साठणाऱ्या गाळाखाली मृतदेह गाडला गेला आणि मृत जीवांच्या शरीरात कवच, हाड, दात इ. कठीण गोष्टी असल्या तर जीवाश्मीभवन होण्याची शक्यता खूपच वाढते. दुसरे असे की, जीवाश्मीभवन क्रिया पूर्ण होऊन एखाद्या मृत जीवाचा जीवाश्म तयार होण्यास खूप कालावधी लागतो. या दीर्घ काळात कोणतीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास जीवाश्मीभवन नीट होऊ शकत नाही. याखेरीज खडकांच्या ज्या स्तरांत जीवाश्म सापडतात, असे स्तर पूर्णपणे तपासणे शक्य होत नाही. काही वेळा तर हे स्तर पृथ्वीच्या कवचामधील संरचनात्मक बदलांशी संबंधित घटनांमुळे भूपृष्ठापासून अधिक खोल गेल्याने अभ्यासकांना उपलब्ध देखील होत नाहीत. इतके असूनसुद्धा आहे त्या जीवाश्मांवरून अनेक जीवांचे अंतिम विलुप्तीभवन झालेले आहे असे ठामपणे सांगता येते.

इ. स. १७९९ मध्ये झॉर्झ क्यूव्हो यांनी प्रथम प्रचलित मतांना धक्का दिला. हत्तीच्या कुलातील काही महाकाय प्राण्याचे जीवाश्म दाखवून त्यांनी ते प्राणी आता पृथ्वीवर आढळत नाहीत, हे लोकांना पटविण्याचे महत्त्वाचे कार्य केले. इतके मोठे प्राणी जर अस्तित्वात असते, तर ते कुठे ना कुठे तरी दिसलेच असते हे त्यांचे मत बहुतेकांना पटले [⟶ क्यूव्हो, बाराँ झॉर्झ लेऑपॉल्द क्रेत्यँ फ्रेदेरिक दागॉबेअर]. ग्रीक पुराणमतवाद्यांना हा एक फार मोठा धक्का होता. अगदी झां लामार्क यांना देखील प्रारंभीच्या काळात असेच वाचे की, सर्व जाती आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी इतके अनुकूलित झालेले असतात म्हणजे परिस्थितीशी त्यांनी इतके जुळवून घेतलेले असते की, ते निसर्गतः विलुप्त होण्याचे काही कारणच नाही. कदाचित माणूस हाच त्यांच्या विलुप्तीभवनास कारणीभूत असावा.

पुढील काळात जीवाश्मांचा पुरावा हळूहळू सबळ होत गेला. विशेषतः डायनोसॉर, ट्रायलोबाइट, ॲमोनाइट इ. प्राण्यांचे जीवाश्म मिळाल्यावर प्राचीन काळातील हे प्राणी आज हयात नसून त्यांचे विलुप्तीभवन झाले आहे, हे एकोणिसाव्या शतकात सर्वमान्य झाले.

एखाद्या जीवाच्या जातींचे, प्रजातींचे (वंशाचे) अथवा कुलाचे विलुप्तीभवन ही अपवादात्मक घटना नसून जैव क्रमविकासाच्या ओघात घडून येणारी ती नित्याचीच बाब आहे, हे सिम्पसन यांचे मत आता सप्रमाण आणि म्हणूनच सत्य असे विधान मानले जाते.


वर उल्लेख केल्याप्रमाणे सर्वच विलुप्त जीवांचे जीवाश्म अभ्यासासाठी उपलब्ध होतीलच असे नाही. म्हणूनच जीवाश्मांच्या अभ्यासावरून काढलेल्या काही निष्कर्षामध्ये काही वेळा त्रुटी राहून जाणे अपरिहार्य आहे. या संबंधात ⇨लॅटिमेरिया (सीलकँथ) मासा आणि निओपायलिना नावाचा एक मृदुकाय (मॉलस्का) प्राणी ही दोन उदाहरणे देता येतील. लॅटिमेरिया माशांचे पूर्वज, तसेच तत्सम इतर मत्स्य कित्येक कोटी वर्षापूर्वी विलुप्त झाले, असे जीवाश्मांच्या अभ्यासावरून प्रारंभी दिसले. त्या मूळ मत्स्यांमध्ये फारसा बदल न होता इतका प्रचंड कालावधी लोटूनसुद्धा एखादी जाती विलुप्त न होता टिकून राहू शकते, हे जिवंत लॅटिमेरिया मासा आफ्रिकेजवळ हिंदी महासागरात सापडल्यानंतर लक्षात आले. निओपायलिनाच्या बाबतीत हेच घडले. अर्थात या झाल्या काही अपवादात्मक दुर्मिळ घटना, यामुळे जीवाश्मांच्या अभ्यासाचे महत्त्व अथवा त्या पुराव्याचा आधार अजिबात कमकुवत होत नाही, हेही ध्यानात ठेवले पाहिजे.

विलुप्तीभवनाची क्रिया पृथ्वीवरील जीवांच्या बाबतीत गेली कोट्यावधी वर्षे अव्याहत चालू आहे. तऱ्हेतऱ्हेच्या जीवांचे जीवाश्म या बाबतीत पुरावा म्हणून उपलब्ध आहेत. एखादी जीव जाती जीवाश्मरूपाने पृथ्वीच्या अवसादी खडकांच्या विशिष्ट कालखंडातील स्तरानंतरच्या वरच्या स्तरांमध्ये लापडत नसेल, तर ती जाती त्या विशिष्ट कालखंडानंतर विलुप्त झाली, असे सिद्ध होते.

अवसादी खडकांच्या विशिष्ट स्तराची कालगणना विविध पद्धतींनी करून मग ती जाती नेमकी किती वर्षापूर्वी विलुप्त झाली असावी, याबाबत अनुमान काढले जाते. अर्थातच कालमापनाच्या भूवैज्ञानिक पद्धतींना खूपच मर्यादा असल्यामुळे हा अंदाज काही दशलक्ष वर्षे पुढेमागे धरूनच केला जातो. अत्यंत अचूक स्वरूपाची कालमापणाची पद्धती अस्तित्वात नाही. त्यातल्या त्यात किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकण्याचा गुणधर्म असलेल्या) मूलद्रव्यांच्या रासायनिक अपघटनावर आदारित कालमापन पद्धती (उदा., पोटॅशियम-आर्‌गॉन पद्धती) जास्त विश्वसनीय मानल्या जातात. [⟶ खडकांचे वय किरणोत्सर्गी कार्बन कालनिर्णय पद्धति].

काळाच्या ओघात किती जीवांची कुले, प्रजाती, जाती इ. विलुप्त झाल्या याचा आलेख जर उपलब्ध जीवाश्मांच्या पुराव्यावरून काढला, तर दोन महत्त्वाच्या गोष्टी दिसून येतात. एक म्हणजे विलुप्तीभवनाची क्रिया अगदी नगण्य होती असा पृथ्वीच्या भूवैज्ञानिक इतिहासात एकही कालखंड नाही. दुसरे म्हणजे विलुप्तीभवन अव्याहतपणे सुरू असले, तरी ठराविक कालावधीत जीवांच्या किती जाती वा कुले नष्ट व्हावीत, याचे कोणतेही निश्चित प्रमाण नसते.

कँब्रियन कालखंडापासून (गेल्या सु. ६० कोटी वर्षापासून) ते सध्याच्या कालखंडापर्यतचा विचार करून जर या काळात किती उल्लेखनीय प्राण्यांची कुले विलुप्त झाली आणि केव्हा विलुप्त झाली याचा आलेख काढला, तर असे स्पष्टपणे दिसून येते की, कँब्रियन, सिल्युरियन, डेव्होनियन, पर्‌मियन आणि ट्रायासिक या सर्व कालखंडांच्या शेवटी शेवटी खूप मोठ्या प्रमाणावर जीवांचे विलुप्तीभवन झाले. अशा घटनांना ‘महाविलुप्तीभवन’ म्हणतात.

जवळजवळ १७५ वर्षापूर्वी, म्हणजे १८२५ साली, पॅरिसजवळ आढळणाऱ्या जीवाश्मांचा बारकाईने अभ्यास करून त्या भागातील जीवांच्या अनेक जाती एकदमच नामशेष झाल्या असाव्यात, असे क्यूव्ह्‌ये यांनी सप्रमाण दाखवून दिले होते. एखादी जबरदस्त नैसर्गिक आपत्ती एखाद्या भागातील संपूर्ण जीवसृष्टीचा विनाश करण्यास कारणीभूत ठरत असावी, असा तर्कही त्यांनी मांडला. अशा विनाशानंतर विलुप्त झालेल्या जीवांची जागा घेणारे नवीन जीव उत्क्रांत होतात.

याउलट केवळ सर्व जीवाश्म नैसर्गिक रीत्या जतन होण्यात येणाऱ्या अडचणींमुळे आणि त्यामुळे अभ्यासात निर्माण होणाऱ्या त्रुटीमुळे असा निष्कर्ष निघाला असावा, असे चार्ल्स डार्विन यांचे म्हणणे होते. डार्विन यांच्या म्हणण्यानुसार एखादा जीव हळूहळू दुसऱ्या जीवाशी स्पर्धा करून त्याला मागे सारून स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करतो आणि या संघर्षात दुसरा जीव शेवटी विलुप्त होतो. [⟶ डार्विन, चार्ल्स रॉबर्ट].

विलुप्तीभवन जरी डार्विन यांनी मांडलेल्या पद्धतीनुसार होत असले, तरी काही वेळा महाविलुप्तीभवनाच्या घटनाही निश्चितपणे झाल्या होत्या, असे आता स्पष्ट होऊ लागले आहे. या महाविलुप्तीभवनाच्या काळात मात्र संपूर्ण पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जातिप्रजातींचे जीव एकाच वेळी विलुप्त झाले. हे महाविलुप्तीभवन फारच जलद घडून आले असावे असा पुरावा काही वेळा मिळतो, तर काही वेळा ही क्रिया किमान काही लाख वर्षे चालली असावी, असा पुरावा मिळतो, एकूणच या प्रक्रियेबाबत वैज्ञानिकांमध्ये मतभेद आहेत.

डी. एम्. रॉप आणि जे. जे. सेपकोस्की या दोन संशोधकांनी विलुप्तीभवनाबाबत १९८४-८६ च्या काळात एक सिद्धांत मांडला. त्यांच्या मते महाविलुप्तीभवनाची क्रिया एक आवर्ती घटना आहे. सांख्यिकीचा (संख्याशास्त्राचा) आधार घेऊन त्यांनी असे प्रतिपादन केले की, दोन महाविलुप्तीभवनांच्या दरम्यानच्या काळात २. ६ कोटी वर्षाचे अंतर असते म्हणजेच दर २. ६ कोटी वर्षानी पृथ्वीवर महाविलुप्तीभवन होत आहे. या सिद्धांताने एक नवीनच वाद निर्माण केला असून याबाबतही वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही. इतर काही संशोधकांनी मात्र अगदी अलीकडेच असे म्हटले आहे की, प्रत्यक्षात विलुप्तीभवनाची जी रीत अथवा तऱ्हा दिसून येते तिच्यात कोणतीही आवर्तिता नाही. एकूणच विलुप्तीभवनाची क्रिया स्वैर वाटते, तिच्यात कोणतीही नियमबद्धता नाही किंवा सुसूत्रताही नाही. इतकेच काय तर निरनिराळ्या वर्गातील जीवांच्या विलुप्तीभवनातसुद्धा विविधता आढळते.

ट्रायलोबाइट प्राण्यांचे कँब्रियन (सु. ६० ते ५० कोटी वर्षापूर्वीच्या) काळामधील विलुप्तीभवन पाहता असे दिसून येते की, काही जाती त्यातून बचावल्या. तसेच ⇨क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षापूर्वीच्या) काळाच्या शेवटी जेव्हा अनेक वनस्पती विलुप्त झाल्या तेव्हा क्रमविकासाचा टप्पा ज्या वनस्पतींमध्ये सुप्तावस्थेत होता अशा काही वनस्पती त्यांतून वाचल्या. अनेक कप्प्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कवच असणाऱ्या ⇨ॲमोनॉइडिया गणातील प्राण्यांच्या विलुप्तीभवनाची रीत आणखीनच वेगळी होती. हे प्राणी समूळ नष्ट होण्यापूर्वी किमान ३ वेळा महाविलुप्तीभवनाच्या तडाख्यातून वाचले असावेत. ॲमोनॉइडिया गण ⇨डेव्होनियनच्या (सु. ४० ते ३६·५ कोटी वर्षापूर्वीच्या कालखंडाच्या) सुरूवातीस उदयास आला आणि अल्पावधीतच त्याची अनेक कुले, प्रजाती आणि जाती निर्माण होऊन त्यांनी पृथ्वीवरील सर्व समूद व्यापले. तथापि डेव्होनियनच्या शेवटी शेवटी ह्या गणातील जाति-प्रजातींची संख्या अचानक रोडावू लागली. महाविलुप्तीभवनाच्या उंबरठ्यावर हा गण पोहोचला पण त्यातून ज्या काही अल्प जाती बचावल्या त्यांच्यापासून ⇨पर्मियनमध्ये (सु. २७·५ ते २४·५ कोटी वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये) परत अनेक जाति-प्रजातींचा क्रमविकास झाला. पर्मियन-ट्रायासिकच्या [सु. २३ ते २० कोटी वर्षापूर्वीच्या कालखंडाच्या ⟶ ट्रायसिक] सीमारेषेवर परत अचानक या प्राण्यांची पिछेहाट झाली. अनेक जाति-प्रजाती विलुप्त झाल्या पण ज्या बचावल्या त्यांच्या प्रजातींचा परत एकदा ⇨जुरासिकमध्ये (सु. १८·५ ते १५·५ कोटी वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये) क्रमविकास होत राहिला. जुरासिकच्या शेवटी परत विलुप्तीभवनाच्या भोवऱ्यात त्यांच्या अनेक जाती नष्ट झाल्या पण काही बचावल्या. क्रिटेशसच्या शेवटी मात्र ॲमोनॉइडिया गणातील सर्व जाति-प्रजाती नष्ट होऊन त्यांचे अंतिम विलुप्तीभवन झाले.


ॲमोनॉइडांना अत्यंत जवळचे म्हणजे नॉटिलॉइडिया गणातील प्राणी होत. या गणातील सर्व प्राण्यांचेही अंतिम विलुप्तीभवन झाले, नॉटिलस नावाने ओळखली जाणारी प्रजाती मात्र आजही आपले अस्तित्व राखून आहे. हाताच्या बोटांवर मोजता येण्याएवढ्या का होईना पण नॉटिलसाच्या काही जाती आज समुद्रात बघायला मिळतात.

सर्व ⇨डायनोसॉर प्राणी, विशेषतः ऑर्‌निथिशिया गणातील सर्व जाती व प्रजाती नामशेष झाल्या. आजचे पक्षी जर सॉरिशिया उपगणातील एका जातीचे उत्क्रांत स्वरूप आहे असे मानले, तर मग त्या जातीचे आभासी विलुप्तीभवन झाले, असे म्हणावे लागेल. बाकी सर्व कुले, जाति-प्रजातींचे अंतिम विलुप्तीभवन झाले.

अगदी अलीकडे म्हणजे ⇨प्लामइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षापूर्वीच्या) कालखंडात प्रामुख्याने उत्तर अमेरिकेत महाकाय सस्तन प्राण्यांचे जलद रीतीने विलुप्तीभवन झाले. इतर जीवांच्या बाबतीत हे प्रमाण काही फारसे वेगळे नव्हते.

महाविलुप्तीभवनाच्या संदर्भात आणखीही एक वैशिष्ट्य म्हणजे महाविलुप्तीभवनाचा प्रभाव वनस्पतींपेक्षा प्राण्यांवर जास्त प्रकर्षाने झाला, असे संशोधकांना आढळून आले. क्रिटेशस कालखंड संपून तृतीय [टर्शरी सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षापूर्वीचा ⟶ तृतीय संघ] कालखंड सुरू झाला त्या सीमारेषेवर घडलेल्या विलुप्तीभवनात प्राण्यांच्या बाबतीत प्रचंड उलथपालथ झाली आणि अनेक प्राण्यांच्या जाती नामशेष झाल्या. वनस्पतींमध्ये घडून आलेले बदल त्यामानाने फारसे तीव्र नव्हते, असे मानावे लागेल, कारण या काळात वनस्पतिसृष्टीमध्ये एखाद्या वनस्पतिवर्गाचे वर्चस्व कमी होऊन दुसऱ्या एखाद्या वनस्पतिवर्गाचे वर्चस्व वाढणे अथवा वनस्पतिसृष्टीतील विविध प्रजातींच्या व जातींच्या प्रमाणांत बदल होणे इतकेच परिणाम दिसून आले.

वरील विवेचनावरून असे स्पष्ट दिसते की, विलुप्तीभवनाची तऱ्हा वेगवेगळ्या जीवांच्या गटांमध्ये वेगवेगळी होती. इतकेच नव्हे, तर वेगवेगळ्या कालखंडांतसुद्धा तीत बदल दिसून येतो. विलुप्तीभवन मोठ्या प्रमाणावर झाले, तर विलुप्त होणाऱ्या जीवांची जागा घेण्यासाठी नवीन जीवांचा क्रमविकासही मोठ्या प्रमाणावर होतो, असे आढळून आले आहे. काही वेळा जमीन आणि समुद्र अशा दोन्ही ठिकाणी विलुप्तीभवन झालेले दिसते, तर काही कालखंडांमध्ये समुद्रापेक्षा जमिनीवर ते अधिक प्रमाणात झाले. असे दिसून येते. एक मात्र निश्चित की, विलुप्तीभवन ही गेल्या ७० कोटी वर्षाहूनही अधिक काळ चालू असणारी सर्वसाधारण क्रिया आहे. विलुप्तीभवन हा नियम नसून अपवाद असावा, असे जीवाश्मांचा अभ्यास करणाऱ्यांना प्रथम वाटत होते आता मात्र अंतिम विलुप्तीभवन हाच उत्क्रांतीच्या क्रियेचा क्रमप्राप्त परिपाक किंवा निष्पत्ती आहे, हे सर्वमान्य झाले आहे.

एकूण विलुप्तीभवनाच्या क्रियेचा आढावा घेताना असे दिसते की, वेगवेगळ्या जीवांच्या वर्गीकरणाच्या गटात जाति-स्तरावर विलुप्तीभवनाची घटना अधिक विस्तृत प्रमाणावर आढळते आणि ते साहजिकही आहे. जातींपेक्षा अदिकाधिक वरच्या श्रेणीच्या गटांकडे (म्हणजेच प्रजाती, कुले इ.) पाहता त्या स्तरांवर विलुप्तीभवन कमी प्रमाणात दिसते. तसेच त्याला लागणारा कालावधीही खूप जास्त असतो. अर्थात काही वेळा एखाद्या जीवाच्या कुलात, प्रजातीत एकच जाती जिवंत असेल, तर ही जाती विलुप्त होताच सबंध प्रजाती आणि कुलही आपोआपच विलुप्त होईल. उदाहरणच ध्यावयाचे झाले तर एलिफस या प्रजातीत सध्या फक्त आशियाई हत्ती आहेत. आशियाई हत्ती विलुप्त झाल्यास ती जाती आणि एलिफस प्रजाती दोन्ही विलुप्त होतील. आफ्रिकेचा हत्ती लोक्झोडोंटा प्रजातीत येतो. तर एलिफस आणि लोक्झोडोंटा दोन्हीही शुंडाधारी प्राण्यांच्या कुलात मोडतात. हत्तींच्या या दोनच प्रजाती आणि जाती आज पृथ्वीवर जिवंत आहेत, त्यांचे जवळचे नातलग केव्हाच विलुप्त झाले. [⟶ हत्ती].

महाविलुप्तीभवनासारख्या प्रलयंकारी घटनांमध्ये मात्र एकाच वेळी अनेक जाति-प्रजाती आणि कुले नष्ट होऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मध्यजीव महाकल्पात (सु. २३ ते ९० कोटी वर्षापूर्वीच्या कालखंडात) डायनोसॉरच्या दोन गणांतील मिळून जवळजवळ २८ कुले आणि ३५० पेक्षा जास्त जाती विलुप्त झाल्या. एके काळी सर्वत्र संचार करणारे यशस्वी प्राणी एकाएकी अगदी थोड्याच कालावधीत समूळ नष्टही होऊ शकतात. काळाच्या ओघात बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊन सामना न करू शकल्यामुळे सजीव विलुप्त होतात का ? पृथ्वीवरील परिस्थिती बदलते म्हणजे नेमके काय घडते ? या बदलामागे कोणती कारणे असू शकतात ? इ. प्रश्नांची चर्चा पुढे केली आहे.

महाविलुप्तीभवनाच्या तऱ्हा (आकृतिबंध) जर आकृतीद्वारे दाखवायच्या झाल्या, तर त्या एस्‌. के. डोनोव्हन यांच्या आकृतीच्या आधारे अशा दाखवता येतील. आकृती (अ) मध्ये १, ४, ५, ६ हे आलेखातील आकडे नेहमीपेक्षा अधिक विलुप्तीभवन झाल्याचे दर्शवितात पण २, ३ हे आकडे बराच काळ विलुप्तीभवनाचे प्रमाण अधिक असल्याचे दाखवतात. म्हणून त्या महाविलुप्तीभवनाच्या घटना नाहीत कारण येथे व्याख्येप्रमाणे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात विलुप्तीभवन झाले, असे म्हणता येणार नाही.

विलुप्तीभवनाच्या तऱ्हा (आकृतिबंध) दाखविणारे कल्पनाचित्र (यात स्तरवैज्ञानिक उपविभाग समान लांबीचे वापरले आहेत).

आकृती (आ) ते (उ) यांत प्रत्येक उभी कमी जाडीची रेषा एका जातीची कालानुरूप परिस्थिती दाखवते. उभी जाड रेषा कालदर्शक आहे, तर आडवी रेषा विलुप्तीभवनाची रूंद बाणांनी दाखविलेली सीमारेषा आहे. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे काही जाती हळूहळू विलुप्त होतात (इ), तर काही एकदम एखाद्या कालखंडानंतर दिसेनाशा होतात (आ). काही वेळा थोड्या थोड्या जाती ठराविक कालखंडानंतर विलुप्त होतात, म्हणजे काहीसे टप्याटप्प्याने विलुप्तीभवन होते असे म्हटले तरी चालेल (ई). आकृती (उ) मध्ये विलुप्त झाल्या असाव्यात अशा काही जाती परत जीवाश्म पुराव्यात सापडतात. यांनाच ‘लाझारस जाती’ म्हणतात. अपुऱ्या जीवाश्मांच्या पुराव्यामुळे असे घडत असावे.


प्रत्यक्षात अंतिम अवस्था सर्व ठिकाणी [(अ) ते (ई)] सारखीच आहे. कारण एका विविक्षित कालरेषेनंतर अथवा सीमारेषेनंतर एकूण विलुप्त झालेल्या जातींची संख्या तेवढीच आहे. त्या एकदम विलुप्त झाल्या का टप्प्याटप्प्याने झाल्या या बाबतीत जीवाश्मांचा सखोल अभ्यासच उपयोगी पडतो.

एखाद्या जातीच्या जीवांची संख्या जेव्हा खूपच कमी होते तेव्हा केवळ नैसर्गिक चढउताराच्या क्रियेत ही संख्या शून्यावर येऊ शकते, असे चार्ल्‌स डार्विन यांनी म्हटले आहे. डार्विन यांच्या मते जेव्हा एखाद्या जीवाच्या अधिवासात (नैसर्गिक निवास क्षेत्रात) राहणीमानास आवश्यक बाबींमध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, तेव्हा ते जीव विलुप्त होतात, पण नेमकी प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी अनेक वैज्ञानिक आज संशोधन करीत आहेत. वेगवेगळ्या जीवांच्या बाबतीत आणि वेगवेगळ्या भूवैज्ञानिक काळांत ही प्रतिकूल परिस्थिती निश्चितच समान नव्हती. ती अत्यंत निरनिराळी होती. हे आता सर्वमान्य झाले आहे.

डार्विन यांच्या मतानुसार अधिवासास प्रतिकूल परिस्थिती निर्माण होण्यास रोगराई, भक्षक प्राण्यांचा सुळसुळाट, जीवांमधील वाढती स्पर्धा इ. अनेक कारणे असू शकतात. सभोवतालच्या परिस्थितीत होणारे भौगोलिक बदल हेही एक कारण हू शकते. अर्थातच हे प्रतिपादन म्हणजे विलुप्तीभवनाच्या कारणांची अगदी जुजबी मीमांसा आहे. प्रत्यक्षात काय घडल्यामुळे विलुप्तीभवन झाले याच्यासंबंधी निर्विवाद पुरावा नसल्यामुळे आणि विशेषतः महाविलुप्तीभवनासंबंधी सध्या चालू असलेल्या प्रचंड संशोधनामुळे अनेक गृहीतके या संदर्भात मांडली गेली आहेत. यांपैकी काही अशी : सूर्य किंवा तत्सम मोठ्या ताऱ्यांपासून मधूनच होणारा घातक प्रारणांचा (तरंगरूपी ऊर्जेचा) मारा, वातावरणातील बदल, समुद्रातील विद्राव्य (विरघळणाऱ्या) लेशमात्र मूलद्रव्यांच्या प्रमाणात होणारे बदल, समुद्रातील वा जमिनीवरील ⇨प्रकाशसंश्लेषण कमी झाल्याने अन्नपुरवठ्यात येणारा तुटवडा, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी घट अथवा वाढ, धूमकेतू किंवा आकाशगंगेतील तत्सम वायुरूप अथवा घनरूप (लघुग्रह, उल्का, अशनी) गोष्टी पृथ्वीवर आदळणे, ज्वालामुखींचा प्रचंड उद्रेक, पृथ्वीच्या खंडप्राय तुकड्यांचे भ्रमण, अतिवृष्टी, आनुवंशिक गुणधर्म इ. अनेक कारणे सध्या पुढे केली जात आहेत. बहुतेक कारणांच्या बाबतीत सबळ किंवा ठोस, निर्विवाद पुरावा उपलब्ध नाही. एखादा पुरावा प्रारंभी सकृत दर्शनी निर्विवाद वाटला, तरी त्याही बाबत पुष्कळ त्रुटी असल्याचे पुढे निदर्शनास येत आहे.

सुरुवातीला हेही लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्याही एका कारणामुळे महाविलुप्तीभवन झाले असे मानणे चूक आहे. बऱ्याच संशोधकांना असे दिसून आले की, एखाद्या कारणामुळे जीवांची जाती विलुप्तीभवनाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचते, पण प्रत्यक्षात पुढे त्या जातीचे विलुप्तीभवन होण्यास वेगळेच कारण असते. काही वेळा दोन-तीन कारणांमुळे विलुप्तीभवन झाले असा पुरावा मिळतो. अशा वेळी कोणते कारण महत्त्वाचे मानायचे? एकूणच उपलब्ध माहिती थोडीशी गोंधळात टाकणारी आहे. या बाबी लक्षात ठेवूनच विलुप्तीभवनाच्या वर उल्लेख केलेल्या कारणांपैकी काहींची माहिती करून घेणे इष्ट ठरेल.

प्रारण आणि विलुप्तीभवन : सूर्यापासून येणाऱ्या किरणांत काही घातक प्रारणे असतात उदा., ⇨जंबुपार प्रारण. या किरणांमुळे जीवांच्या जनुकांमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता असते [⟶ जीन]. जनुकांमध्ये झालेले हे बदल जर जीवाच्या कोशिका (पेशी) दुरुस्त करू शकल्या नाहीत, तर त्यामुळे जनुकांचे ⇨उत्परिवर्तन होऊ शकते. क्रमविकासाला आवश्यक असे बदल उत्परिवर्तनाने जनुकांमध्ये येतात, पण हे बदल स्वैर स्वरूपाचे असल्याने जीवांना बऱ्याच वेळा घातक ठरतात. पृथ्वीच्या अनेक भागांत मातीमध्ये युरेनियमासारखी घातक किरणोत्सर्गी द्रव्येही असतात. म्हणजेच पृथ्वीवरील जीव पृथ्वीवरील तसेच पृथ्वीबाहेरून येणाऱ्या प्रारणांशी सामना देत असतात. जेव्हा या प्रारणाचे प्रमाण एका मर्यादेबाहेर वाढते, तेव्हा अनेक जीवांचे विलुप्तीभवन होण्याची शक्यता असते. हे प्रारण कमी-जास्त असण्याचे कारण म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरताना काही वेळा सूर्याच्या खूपच जवळ असते, तसेच सूर्यातर्गत बदलामुळे सूर्यातून बाहेर पडणारी प्रारणेही कमीजास्त असू शकतात. इतकेच नाही, तर काही वैज्ञानिकांच्या मते सौर प्रारणांप्रमाणेच आपल्या नजीकच्या इतर ताऱ्यांपासूनही अशी विश्वकिरणे येत असतात. साधारणपणे दर २० कोटी वर्षानी आकाशगंगा सूर्याजवळून जाऊन एक भ्रमण पूर्ण करते. याच काळात सूर्यावरच्या घडामोडीतही ८ ते ९ कोटी वर्षाचे आवर्ती बदल २-३ वेळा घडून येतात. याच काळात आकाशसंगेच्या एकूण चुंबकीय क्षेत्रात लक्षणीय बदल घडून येतात. या सर्वामुळे जीवांमध्ये जननिक बदल घडून येतात. पर्मियन काळातील विलुप्तीभवन हे बराच काळ चालू राहिले असण्याचे एक कारण वैश्विक प्रारणच असावे, असा वैज्ञानिकांचा कयास आहे. या काळात प्रारणांचा मारा जीवांवर बराच दीर्घकाळ झाला असावा, असा अंदाज आहे.

या गृहीतकाच्या विरुद्ध मत असणारी संशोधक मंडळी असे म्हणतात की, विविध जीवांमध्ये त्यांच्या प्रारण सहन करण्याच्या शक्तीमध्ये लक्षणीय फरक असतो. इतकेच नाही, तर प्रारण पाण्यातील जीवांना मारक ठरणार नाही असे असूनही अनेक जलचर पर्मियन काळातच विलुप्त झाले. संशोधकांच्या मते आयनीभवनकारी (विद्युत् भारित अणू, रेणू किंवा अणुगट म्हणजे आयन निर्माण करणाऱ्या) प्रारणांमुळे मोठ्या प्रमाणात विलुप्तीभवन होते, हा दावा अति- कमकुवत आणि अपुऱ्या पुराव्यावर आधारित आहे.

भूवैज्ञानिक कारक आणि विलुप्तीभवन : पृथ्वीचे कवच अनेक भूपट्टांचे बनलेले आहे. हे भूपट्ट पृथ्वीच्या प्रावरणात असणाऱ्या अर्धघन, अर्धद्रवरूप पदार्थावर तरंगत आहेत. या भूपट्टांची सतत हालचाल होत आहे आणि या हालचालींमुळे पृथ्वीवर भूकंप होणे, ज्वालामुखी उद्रेक होणे, तसेच पर्वतरांगा निर्माण होणे आदि घटना घडत असतात. या घटनांचा आणि विलुप्तीभवनाचा संबंध आहे किंवा कसे, हे पहाण्याचा प्रयत्नमही वैज्ञानिकांनी केला आहे. [⟶ भूपट्ट सांरचनिकी].

ऑस्ट्रेलिया खंड ( तसेच भारत, दक्षिण आफ्रिका इ. इतर खंड पूर्वी अंटार्क्टिकाला जोडलेले होते [⟶ खंडविप्लव]. जेव्हा ऑस्ट्रेलिया खंड सुटा झाला तेव्हा अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधून समुद्र प्रवाह सुरू झाले. पुढे त्यातूनच अंटार्क्टिकाला वळसा घालून फिरणारा पाण्याचा प्रवाह सुरू झाला. आज या प्रवाहामुळेच अंटार्क्टिकाचे हवामान थंड, तर विषुववृत्ताचे गरम राहण्यात मदत होते, पण सुरुवातीला म्हणजे ऑलिगोसीन (सु. ३·५ ते २ कोटी वर्षापूर्वीच्या) काळात या बदलामुळे तेथील हवामानात खूपच बदल होऊन विलुप्तीभवन मोठ्या प्रमाणात झाले असावे, असा कयास आहे. त्याचप्रमाणे ग्रीनलंड व नॉर्वे यांच्या मधून जाणारा समुद्रप्रवाह सुरू झाल्याने आर्क्टिक व अंटार्क्टिका महासागरातील पाण्याची देवाणघेवाण सुरू होऊन त्याचाही वातावरणावर खूपच परिणाम झाला. खंडांच्या अशाच हालचालींमुळे अतिप्राचीन काळात संपूर्ण समुद्रच नष्ट झाले आणि तेथील सागरी जीव विलुप्त झाले, असा पुरावा आढळतो.


मोठ्या प्रमाणात ज्वालामुखींचे उद्रेक होणे आणि त्यांतून बाहेर पडणाऱ्या तप्त लाव्ह्यामुळे अनेक जीव नष्ट होणे, तसेच नंतर धूर व राख यांच्या प्रचंड ढगांमुळे सूर्यप्रकाश अडविला जाणे व तापमान घटणे अशाही घटना घडल्या असाव्यात. भारताच्या दख्खन पठाराच्या भागात क्रिटेशसच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात लाव्हा बाहेर पडल्याचे पुरावे आहेत. भूकंप व त्यामुळे समुद्रात निर्माण होणाऱ्या महाभयंकर त्सुनामी लाटा एखाद्या छोट्या बेटावरील जीव पूर्णपणे नष्ट करू शकतात. अशा लाटांबरोबर वाहत आलेली माती नुकतीच काही भागांत क्रिटेशस व तृतीय कल्प काळांच्या सीमारेषेवर आढळली आहे. एकापाठोपाठ अनेक ज्वालामुखींचा उद्रेक होण्यास अवकाशातून पृथ्वीवर पडणारा एखादा अशनी कारणीभूत असू शकतो, असेही काही संशोधकांना वाटते. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर गंधकाचा जो धूर होतो, त्यापासून पुढे अम्लउ पर्जन्य निर्माण होऊन त्यामुळे जीवांना प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ  शकते. [⟶ ज्वालामुखी – २].

गेल्या लाखो वर्षात उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यामधील जमिनींचा दुवा अनेक वेळा जोडला आणि मोडला गेला. यामुळे या दोन्ही विभागांतील प्राण्यांचे नेहमीच एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतर होत राहिले. या स्थलांतरामुळे उत्तर अमेरिकेतील प्रगत अपरास्तनी प्राण्यांनी दक्षिण अमेरिकेच्या शिशुधान स्तनी प्राण्यांना नामशेष करण्यात हातभार लावला. ज्याला पुराजीववैज्ञानिक ‘ग्रेट अमेरिकन एक्सचेंज’ म्हणतात त्या काळात दक्षिण अमेरिकेचे मूळ रहिवासी असणारे खूर धारण करणारे सस्तन प्राणी समूळ नष्ट झाले. यावरून असे लक्षात येते की, पृथ्वीच्या भौगोलिक किंवा भूवैज्ञानिक परिस्थितीत जेव्हा जेव्हा लक्षणीय बदल घडून येतात, तेव्हा मोठ्या प्रमाणात विलुप्तीभवन होण्याची शक्यता असते.

प्राचीन काळातील समुद्रांतर्गत बदल आणि विलुप्तीभवन : प्राचीन काळात अनेक वेळा समुद्रामध्ये वेगवेगळी स्थित्यंतरे घडली. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे अथवा घटणे, पाण्यातील विद्राव्य (विरघळलेली) द्रव्ये कमी जास्त होणे, इतकेच काय तर विद्राव्य ऑक्सिजन कमी-जास्त होणे अशा प्रकारचे हे बदल आहेत.

कँब्रियन-पूर्व (सु. ६० कोटी वर्षाच्या आधीच्या) काळात समुद्रातील पाण्याची पातळी पुष्कळ वाढल्याने कँब्रियन काळात अनेकविध सागरी जलचर उत्क्रांत होऊन ते सर्वत्र पसरले. नंतरच्या ⇨ऑर्डोव्हिसियन (सु. ४९ ते ४२ कोटी वर्षापूर्वीच्या) काळामध्ये समुद्राची पातळी ५० ते ७० मी. एवढी कमी झाल्याने उथळ भागातील अनेक सागरी भाग कोरडे पडून ट्रायलोबाइट, नॉटीलॉइड, प्रवाळांच्या काही जाती, ब्रॅकिओपॉड आणि एकायनोडर्म या गटांतील अनेक जाति-प्रजाती विलुप्त झाल्या. प्राण्यांची अनेक कुलेही नष्ट झाली.

समुद्राची ही पातळी कमी झाली तेव्हा पृथ्वीवर अनेक ठिकाणी बर्फाचे थर वाढले होते, तर नंतरच्या काळात समुद्राची पातळी वाढल्यानंतर हे बर्फाचे थर कमी झाल्याचे पुरावे आहेत. याचाच अर्थ असा की, पृथ्वीवर काही ठिकाणी तापमानांतही बरेच चढ-उतार झाले असणार.

बर्फ वितळ्यामुळे निर्माण झालेले पाणी थंडगार व जड असते. यामुळे ते समुद्रतळाकडे जाते व तेथील पूर्वीचे पाणी वर ढकलले जाते. या क्रियेमुळे समुद्रातील विद्राव्य ऑक्सिजन कमी होणे, विषारी घटकांचा प्रादुर्भाव होणे इ. घटना घडू शकतात. त्यांमुळे पाण्याची एकूणच रासायनिक स्थिती बददली जात असावी, असा कयास आहे. या घटनेमुळे जीवांचे अधिवास नष्ट होतात व ते जीव लोप पावतात.

पाण्याची पातळी वाढली, तर उथळ पाण्याच्या ठिकाणांचे रूपांतर खोल पाण्याच्या ठिकाणांमध्ये होते. त्यामुळे इतके दिवस उथळ पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना एकदम खोल पाण्यात राहण्याची वेळ येते. या नवीन परिस्थितीशी जुळवून न घेता आल्याने उथळ पाण्यातील जीव विलुप्त होतात. याला कारण उथळ आणि खोल पाण्यात प्रामुख्याने पाण्याचे तापमान, विदाव्य ऑक्सिजन, प्रकाशाची उपलब्धता इ. गोष्टींमध्ये फारच तफावत आढळते. प्रवाळांचेच उदाहरण घ्यावयाचे झाले, तर उथळ व स्वच्छ पाणी, लाटांचा कमी मारा, भरपूर सूर्यप्रकाश, उष्णकटिबंधातील भौगोलिक स्थान आणि उबदार हवामान या सर्व गोष्टींची त्यांना आवश्यकता असते. या सर्व गोष्टी मिळाल्या तरच प्रवाळाभित्तीची वाढ मुबलक होते (उदा., ऑस्ट्रेलियाजवळची ग्रेट बॅरिअर रीफ). आवश्यक असणाऱ्या सभोवतालच्या परिस्थितीत थोडा जरी बदल झाला, तर प्रवाळे विलुप्त होतात.

फार मोठ्या प्रमाणात गोडे पाणी समुद्रात मिसळल्याने समुद्राच्या पाण्यातील लवणांचे प्रमाण एकदम कमी होते (म्हणजेच लवणता अथवा खारेपणा कमी होतो) याचाही परिणाम जीवांवर झाला असावा, असा एक अंदाज व्यक्त केला गेला आहे. ब्रायोझोआ, प्रवाळ, ऑस्ट्रॅकॉडा गटांचे अनेक प्राणी पर्मियन काळाच्या शेवटी विलुप्त झाले. त्यामागचे कारण पाण्याची लवणता कमी झाली हेच असावे, असे मानले जाते. पर्मियनपासून हळूहळू लवणता कमी होत जाऊन ती ट्रायासिकच्या सुरुवातीला अतिशय कमी पातळीवर होती. ज्या जीवांना जगण्यासाठी अगदी विशिष्ट लवणता आवश्यक असते, असे समुद्रातील जीव अर्थातच नामशेष झाले. उलड ज्या जीवांना आपल्या राहणीमानात योग्य बदल करता आला आणि ज्यांना जननिक कारणांमुळे बदलत्या लवणतेला तोंड देता आले. त्यांचा वंश चालू राहिला. समुद्राच्या पाण्याची लवणता मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास त्याचेही असेच गंभीर परिणाम होऊ शकतात असे काहींचे मत आहे.

धूमकेतू, लघुग्रह, अशनी, उल्का इत्यादी आणि विलुप्तीभवन : डब्ल्यू. अल्वारेझ आणि एल्. अल्वारेझ यांनी १९८० मध्ये असे प्रतिपादन केले की, क्रिटेशस-तृतीय कल्प सीमारेषेवरील महाविलुप्तीभवन हे एक मोठा लघुग्रह (गुरू व मंगळ यांच्या कक्षांच्या दरम्यान आढळणाऱ्या खस्थ पदार्थापैकी एक) अवकाशातून पृथ्वीवर आदळल्याने झाले असावे. त्यांच्या मते हा लघुग्रह १० किमी. व्यासाचा असावा. या उत्पातामुळे धुळीच्या ढगामुळे आकाश झाकोळून अनेक महिने अंधार पडला व असंख्य वनस्पतींचे प्रकाशसंश्लेषण बंद पडले असावे. अन्नसाखळीचा उगमच अशा प्रकारे नष्ट झाल्याने असंख्य प्राणी पण उपासमारीने मृत्यूमुखी पडले आणि अशा प्रकारे महाविलुप्तीभवनाची प्रक्रिया घडून आली असावी. एका लघुग्रहाच्या आदळण्यामध्ये असंख्य अणुबाँब एकत्र फुटल्यानंतर जेवढी ऊर्जा बाहेर पडेल त्या पेक्षा कितीतरी पटींनी अधिक ऊर्जा बाहेर पडली. यानंतर प्रचंड आगी लागून त्यांचे लोळ सर्वत्र पसरून पृथ्वीवर आग व धूर यांचेच साम्राज्य निर्माण झाले.

या घटनेचा पुरावा म्हणून अल्‌वारेझ व त्यांच्या सहाऱ्यांनी पृथ्वीच्या काही स्तरांत क्रिटेशस-तृतीय कल्प सीमारेषेवर इडिरियम या मूलद्रव्याचे प्रमाण खूप असल्याचे दाखवून दिले. पृथ्वीच्या कवचात सर्वसाधारणपणे या मूलद्रव्याचे प्रमाण अत्यल्प असते, पण उल्का व अवकाशातील इतर वस्तूंमध्ये इरिडियमाचे प्रमाण अधिक असते. आगीचा पुरावा म्हणून कोळशाचे कण व राख ही याच थरांत संशोधकांना दिसली आहेत. याचबरोबर प्रचंड उष्णता व आघातामुळे पृथ्वीच्या काही खनिजांमध्ये विरूपण झाले आणि अशा विरूपित खनिजांचे (उदा., क्कॉर्ट्‌झ) स्फटिक पण शास्त्रज्ञांना आढळले आहेत.


अवकाशातून पृथ्वीवर वस्तू आदळल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही ठिकाणी विवरे किंवा अन्य भूरूपे निर्माण झालेली दिसत असली, तरी ती अशनिपातामुळेच निर्माण झाली, असे ठामपणे सांगता येत नाही. अशनिपातांसारख्या घटनांमुळेच विलुप्तीभवन झाले का आधीच विलुप्तीभवनाच्या मार्गावर असणाऱ्या जीवांचा या घटनांमुळे अंतिम नाश झाला, हे सांगणे कठीण आहे. तसेच लघुग्रह आदळल्याने होणारे विलुप्तीभवन खूपच जलद गतीने होईल. परंतु पुराजीव वैज्ञानिकांना तरी असे वाटते की, क्रिटेशस-तृतीय कल्प सीमारेषेवरील महाविलुप्तीभवन हे किमान ५० लाख ते १ कोटी वर्षे चालू असावे. एकूणच पृथ्वीवर लघुग्रह आदळल्यानेच विलुप्तीभवन झाले, असे दर्शवणारा सबळ पुरावा नाही. अगदी अलीकडे विरूपण झालेली मूलद्रव्ये इतरत्रही सापडली आहेत. त्यामुळे फक्त अशनिपातांनीच ती तयार होत असावती, असा समज चुकीचा ठरतो. [⟶ उल्का व अशनि लघुग्रह].

यानंतरच्या काळात इतरही अनेक सिद्धांत मांडले गेले. त्यांतील सर्वांत वादाचा ठरला तो पूर्वी उल्लेख केलेला रॉप आणि सेपकोस्की यांचा १९८४ मधील सिद्धांत. त्यांच्या मते गेली किमान २५ कोटी वर्षे तरी पृथ्वीवर दर २·६ कोटी वर्षांनी आवर्ती महाविलुप्तीभवन होत आहे. त्यांचे मूळ दर २·६ कोटी वर्षानी पृथ्वीवर लघुग्रह, धूमकेतू इ. गोष्टींच्या प्रचंड माऱ्यामुळे असावे, असे रॉप आणि सेपकोस्की यांना वाटते. अर्थात, याही सिद्धांताला कोणताही सबळ पुरावा नाही. अवकाशातून पृथ्वीवर नेहमीच अनेक वस्तू आदळत असतात, पण त्यांत कोणताही निश्चित असा आवर्ती क्रम नाही. आपल्या सूर्यासारखाच (पण अजूनपर्यंत व सापडलेला) नेमेसिस नावाचा तारा ठराविक काळात पृथ्वीभोवतालच्या धूमकेतूंच्या कक्षा बदलत असावा आणि मग हे धूमकेतू पृथ्वीच्या फार जवळून जात असावेत, असाही दावा काही संशोधकांनी केला आहे. हे धूमकेतू अर्थातच पृथ्वीच्या वातावरणात लाक्षणिक बदल घडवून आणत असावेत आणि त्यामुळे जीवांचे विलुप्तीभवन होत असावे, असाही एक तर्क आहे [⟶ धूमकेतु]. तात्पर्य, अशी अनेक गृहीतके मांडली जात आहेत, पण सबळ पुरावा मात्र अजूनही पूर्णपणे हाती लागलेला नाही.

पृथ्वीवरील तापमानांतील बदल आणि विलुप्तीभवन : पृथ्वीवरील तापमानांतील बदलही विलुप्तीभवनाला कारणीभूत ठरत असावा. असा तर्क अनेक संशोधकांनी केला आहे. आजही पृथ्वीवर दिसून येणारे प्राणी त्यांच्या तापमानांतील बदल सहन करण्याच्या क्षमतेनुसार विभागले गेले आहेत. इतकेच नाही तर अनेक प्राणी योग्य त्या वेळी स्थलांतर करून आपल्याला राहण्यास योग्य अशा तापमानाच्या जागी जाऊन राहतात.

हवामानाच्या पृथ्वीवरील पट्‌ट्यांत जर लक्षणीय बदल घडून आले जर प्राणी त्या पट्‌ट्यातून भौगोलिक वा इतर कारणामुळे बाहेर पडू शकले नाहीत, तर त्यांचे विलुप्तीभवन होते. ऑर्डोव्हिसियन, डेव्होनियन इ. काळांत हवामानात बदल घडून ते खूप थंड झाल्याचा पुरावा संशोधकांना मिळाला आहे. ऑर्डोव्हिसियन काळात ध्रुवीय थंड पाणी जवळजवळ विषुववृत्ताच्या पट्‌ट्याच्या कडेपर्यत पोहोचले होते, यामुळेच ⇨ग्रॅप्टोलाइटासारखे अनेक जीव विलुप्त झाले. अर्थात गारवा वाढल्यास विषुववृत्तीय प्राणि-वनस्पतींचे जीवन जास्त धोक्यात येते. कारण त्यांना गरम हवामानाचा दुसरा पट्टा सापडणे शक्यच नाही. अशा प्रकारे थंड हवामानामुळे ध्रुवीय बर्फाचा साठा वाढणे, हवामानाचे पट्टे संकुचित होणे, सागरी पाण्याची पातळी कमी होणे या संलग्ना घटना विलुप्तीभवनास कारणीभूत ठरू शकतात.

पृथ्वीच्या इतिहासात अनेक हिमयुगे होऊन गेली आणि त्यांचे येणे-जाणे आवर्ती असावे, असा तर्के केला जातो. मिलानकोविच चक्र हे त्याचे प्रमुख कारण असावे, असे मानले जाते. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची लंबवर्तुळाकार कक्षा, पृथ्वीचा तिरपा ध्रुवीय अक्ष या कारणांमुळे पृथ्वीवर निरनिराळ्या भागांत वेळी तापमानांत बदल घडून येतात. अर्थात हे बदल नित्याचे असतात, पण जेव्हा काही अजूनही अज्ञात असणाऱ्या कारणांमुळे या बदलांची तीव्रता अधिक होत होती तेव्हा विलुप्तीभवने झाली असणे शक्य आहे.

तापमानातील बदल आणि त्यामुळे घडलेले विलुप्तीभवन याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत : प्लाइस्टोसीन काळात आलेल्या हिमयुगामुळे काही महाकाय सस्तन प्राणी विलुप्त झाले असल्याचा पुरावा आहे [⟶ हिमकाल].

सुमारे १८,००० वर्षापूर्वी अमेरिकेच्या मध्य ॲपालॅचिअन भागांत अतिशीत म्हणजे जवळजवळ ध्रुवीय प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतींचे जंगल होते. सुमारे १०,००० वर्षापूर्वी मात्र ह्या जंगलात बदल घडून आला. येथील ध्रुवीय सूचिपर्णी जंगलाची जागा पानझडी वृक्षांनी घेतली. याचाच अर्थ असा की, या काळात हिमयुगानंतर वातावरण बदलून तापमान वाढले होते. उत्तर अमेरिकेच्या उत्तरमध्य भागांतही असाच बदल घडून १८,००० वर्षापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या ध्रुवीय प्राण्यांपैकी जवळजवळ निम्मे प्राणी पुढील ८,००० वर्षात विलुप्त झाले. त्यांची जागा अर्थातच पानझडी जंगलात राहणाऱ्या प्राण्यांनी घेतली.

एकूणच प्लाइस्टोसीन काळाचा विचार केला, तर उत्तर अमेरिकेत महाकाय सस्तन प्राण्यांच्या ४३ जाती विलुप्त झाल्या. दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही या काळात सस्तन प्राण्यांच्या अनुक्रमे ४६ आणि २१ प्रजाती विलुप्त झाल्या. तसेच काही पक्षीही विलुप्त झाले. आशिया व आफ्रिका येथे मात्र या मानाने कमी विलुप्तीभवन झाले. या सर्व घटनांमध्ये तापमानातील तसेच एकूण वातावरणातील बदल हे एक प्रमुख कारण असावे, असा संशोधकांचा तर्क आहे (काहींच्या मते प्रगत मानवाच्या शिकारीमुळेही यांपैकी काही महाकाय सस्तन प्राणी विलुप्त झाले असावेत).

जननिक कारक आणि विलुप्तीभवन : प्रत्येक जीव जन्मतःच आपल्या पालकांकडून गुणसूत्रे आणि अर्थातच गुणसूत्रांतील जनुके प्राप्त करतात. लैंगिक प्रजनन करणाऱ्या जीवांमध्ये नर आणि मादी अशा दोघांकडून शुक्राणू व अंडाणू यांच्यामार्फत ही जनुके प्राप्त होतात, तर अलैंगिक प्रजनन असणाऱ्या जीवांमध्ये फक्त एकच पालक जनुके देत असतो.

जीवांमध्ये असणाऱ्या अनेक जनुकांमधील आनुवंशिक माहितीनुसार जीव भ्रूणविकासाच्या अवस्थेतून जाऊन पुढे स्वतः जननक्षम होत असतो. हे होत असताना या जीवाच्या जनुकांवर सभोवतालच्या परिस्थितीचा सतत परिणाम होत असतो. जीवाची जनुके आणि त्याच्या सभोवती असणारी परिस्थिती यांमुळे प्रत्येक जीवाला आपले असे वेगळेपण प्राप्त होते.


यांशिवाय जीवांच्या काही जनुकांचे अनेकविध प्रकार असतात. मूळ जनुकांमध्ये थोडाफार फरक होऊन असे प्रकार तयार होत असतात. एकाच जनुकाच्या या विविध प्रकारांना युग्मविकल्पी किंवा विकल्प जनुके म्हणतात. अंडाणू व शुक्राणू निर्माण होत असताना गुणसूत्रांमध्ये जी देवाणघेवाण होते तीमुळे प्रत्येक अंडाणू आणि शुक्राणू जननिक दृष्ट्या इतरांपासून वेगळा असतो. या कारणांमुळेच एकाच मांजरीची एका वेळची ४ पिल्ले एकमेकांपासून अगदी वेगळी ओळखता येतात. एकाच आई-वडिलांची मुले एकमेकांपेक्षा वेगळी असतात अर्थात एक अंडज जुळी भावंडे याला अपवाद असतात. एखाद्या जीवाच्या जातीचा विचार केला, तर त्या जातीत अशी अनेक जनुके आणि त्यांची युग्मविकल्पी जनुके यांचा एक जनुक संचय (कोश) असतो. हा जनुक संचय गतिशील असतो म्हणजे त्यात सतत बदल घडत असतात व त्यामुळे वेगवेगळ्या जनुकांची एकमेकांशी असणारी सापेक्ष टक्केवारी (प्रमाण) सतत बदलत असते, यालाच क्रमविकास म्हणतात. जीव उत्क्रांत होत असताना या जनुक संचयातील जी जनुके जास्त अनुकूलनशील असतील म्हणजेच ज्यांच्यामुळे तो जीव सभोवतालच्या परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ राहील अशीच जनुके टिकून राहतात, बाकीची नाश पावतात.

असे असले, तरी एखाद्या विशिष्ट परिस्थितीत जगण्यासाठी उपयुक्त असणारी जनुके दुसऱ्या अथवा बदललेल्या परिस्थितीत उपयुक्त असतीलच असे नाही. म्हणूनच मूळ जनुक संचयात जितकी विविधता असेल तितकी चांगली असते. कारण बदलणाऱ्या परिस्थितीत असेच जीव जगू शकतात. जे जीव जननिक दृष्ट्या बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाहीत, ते हळूहळू अथवा जलद गतीने काळाच्या ओघात विलुप्त होतात. जीवांमध्ये क्रमविकासाच्या दृष्टीने आवश्यक जननिक लवचिकता असणे फार महत्त्वाचे असते. उदा., नदीतील एखाद्या प्राण्यामध्ये खारट पाणी सहन करण्याची क्षमता मुळातच नसेल, तर तो प्राणी समुद्रात जगूच शकणार नाही. त्याच्या जनुक संचयात अशा पाण्यात जनण्यासाठी आवश्यक चयापचयात (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींत) बदल घडवून आणण्याची क्षमता असणारी जनुके नसतील, तर असे प्राणी खारट पाण्याचा प्रादुर्भाव झाल्यास नष्ट होतील. याच प्रकारे तापमानातील बदल, नवीन प्रकारच्या जीवांचे आगमन आणि त्यांच्याशी होणारा स्पर्धात्मक संघर्ष, नवीन भक्षक प्राण्यांचा उदय, नवीन रोगकारक जंतु-व्हायरस यांचा प्रसार इ. बदलांना सामोरे जाण्यासाठी योग्य अशी जनुके त्या त्या जीवामध्ये असणे आवश्यक असते, अन्यथा बदलणाऱ्या परिस्थितीमुळे ते जीव नामशेष, होऊ शकतात. [⟶ आनुवंशिकी जीन].

पृथ्वीवरील परिस्थिती, हवामान वगैरे गोष्टींत सतत बदल होतात. जेव्हा हे बदल फार मोठ्या स्वरूपाचे असतात तेव्हा विलुप्तीभवन मोठ्या प्रमाणात घडल्याचे पुरावे सापडतात. याउलट जेव्हा असे बदल होत नाहीत, त्या काळात जातिउद्‌भवन होऊन जीवांच्या अनेकविध जाति-उपजाती मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या आढळतात.

विलुप्तीभवनास लागणारा माणसाचा हातभार : मानव (किंवा होमोसेपिएन्स) सु. वीस लाख वर्षापूर्वी उदयास आला. यापूर्वीचे आदिमानव विचारात घेतले, तरी पृथ्वीवरच्या जीवांच्या आगमनापासूनचा एकूण काळ विचारात घेता २० ते ५० लाख वर्षाची काळ अगदी नगण्य आहे. असे असूनही मानवाच्या आगमनानंतरच्या काळात असंख्य जीव विलुप्त झाले, याचा गंभीरपणे विचार करावयास पाहिजे. प्लाइस्टोसीन काळात अमेरिकेत नामशेष झालेले महाकाय सस्तन प्राणी मानवामुळे नामशेष झाले किंवा नाही याबद्दल जरी वैज्ञानिकांमध्ये मतभेद असले, तरी गेल्या काही हजार वर्षात माणसाने अनेक जीवांच्या विलुप्तीभवनास हातभार लावला, याबाबतीत कुणालाच शंका नाही.

गेल्या काही वर्षात माणसाने जवळजवळ सर्व पृथ्वी व्यापली आहे. काही दुर्गम भाग, तसेच अतिशीत अथवा अति-उष्ण भाग, निबिड जंगले असे काही भाग सोडता मनुष्य जाती सर्वदूर पसरली आहे. राहण्यासाठी, अन्न पिकवण्यासाठी, कारखान्यांसाठी किंवा निव्वळ मनोरंजनासाठी त्याने पृथ्वीवरची घनदाट जंगले तोडून नष्ट केली आहेत. अनेक प्रकारची विषारी द्रव्ये हवा, माती, पाणी यांसारख्या जीवनावश्यक माध्यमांत सोडून त्याने संपूर्ण हवामानच बदलून प्रदूषित केले आहे. काही भागांत वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरण संतुलनाचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. या सर्व प्रकारांमुळे माणसाच्या सभोवतली असणारे अनेक प्राणी नामशेष होत आहेत.

सर्वसाधारणपणे माणसाने जीवांच्या विलुप्तीभवनास कसा हातभार लावला असावा असा विचार करता पुढील तीन मुद्दे लक्षात येतात : (१) अन्नासाठी किंवा केवळ शिकारीच्या चैनीसाठी प्राण्यांची अतिरेकी हत्या माणसाने केली. वनस्पतींच्या बाबतीत घरबांधणी, जळण वगैरेसाठी लाकूडफाटा म्हणून झालेली वृक्षतोड किंवा औषधोपयोगी वनस्पतींचा प्रमाणाबाहेर उपयोग, हेही याच प्रकारात मोडते. चामड्यासाठी होणारी प्राण्यांची हत्याही याच प्रकारची आहे. (२) प्राणी अथवा वनस्पतींचा अधिवास किंवा राहण्याची नैसर्गिक जागा माणसांकडून नष्ट होणे आणि (३) विदेशी प्राणी अथवा एखाद्या ठिकाणी मूळचे नसणारे प्राणी माणसाने आणणे, हे मुद्देही या संदर्भात लक्षणीय आहेत.

अतिरेकी हत्येची अनेक उदाहरणे गेल्या दोन-पाचशे वर्षातील आहेत. मॉरिशस बेटांवरचा उडता न येणारा पक्षी (आणि त्याचे इतर सगेसोयरे) किंवा डोडो आणि अमेरिकेतील पॅसेंजर कबूतर ही अगदी ठळक उदाहरणे लगेच डोळ्यांसमोर येतात. पॅसेंजर कबूतर सुरूवातीला मांसासाठी मारले गेले, पण नंतर केवळ मौज म्हणून लाखोंची हत्या झाली. १९१२ मध्ये या जातीचे शेवटचे कबूतर सिनसिनॅटी प्राणिसंग्रहालयात मरण पावले. आज निळा देवमासा, कॉड मासा, काही समुद्री कासवे याच मार्गाने नामशेष होतील, असे दिसते आहे. याच कारणांमुळे ‘डिसा’ नावाचे आफ्रिकेतील आमर (ऑर्किड), कानेरी बेटांवरील ‘ड्रॅगन वृक्ष’, बोर्निओ बेटावरील प्रचंड आकाराची कीटकमक्षी ‘नेपॅथस राजा’ इ. वनस्पती विसाव्या शतकाअखेरीस असुरक्षित आहेत. वनस्पतींचे वा प्राण्यांचे नमुने अभ्यासकांनी गोळा करण्यामुळे सुद्धा काही जाती दुर्मिळ झाल्या आहेत.


वर विवेचन केलेल्या प्राणि-वनस्पतींच्या बाबतीत माणसाने त्यांच्या विलुप्तीभवनास प्रत्यक्षपणे हातभार लावला असे म्हणता येईल. याशिवाय जंगलतोड, शहरीकरण, रस्ते तयार करणे, धरणे बांधणे या सर्व घटनांमुळे जीवांना राहण्याजोगी जागा दिवसेंदिवस कमी होत आहे. अधिवासाच्या या नाशामुळे येत्या काही वर्षात अनेक जीव आपल्या नकळत नामशेष होतील, यात शंका नाही. जे प्राणिवनस्पती माणसाने बदललेल्या परिसरात राहू शकतील, तेच प्राणी बहुतांश जगू शकतील. यात पाळीव प्राणी तसेच उंदरांसारखे, झुरळांसारखे उपद्रवी प्राणीच जास्त असतील हे निश्चितच. पाळीव प्राणी अनेक ठिकाणी आताच डोकेदुखी होऊन बसले आहेत. गालॅपागस बेटावर व आफ्रिकेत गायी, शेळ्या, मेंढ्या इत्यादींनी तेथील मूळच्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ आणली आहे, तर बाहेरच्या देशातून आयात करून आपल्या जलाशयांत सोडलेले मासे मूळचे मासे, बेडूक, कीटक इत्यादींना समूळ नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व घटना म्हणजे माणसाच्या हव्यासापोटी होणारे अप्रत्यक्ष विलुप्तीभवन आहे.

घाटे, हेमंत व. बोरकर. वि. द.

विलुप्तीभवनाचे परिणाम : विलुप्तीभवनाचे झालेले काही परिणाम या आधी आले आहेत. सध्याच्या काळात होत असलेले व भावी काळात होऊ शकणारे संभाव्य परिणाम परिस्थितिविज्ञानाच्या दृष्टीने विचारात घेण्यासारखे आहेत. १९९० ते २००० या दशकात उष्ण कटिबंधात ज्या त्वरेने जीवजातींचा विनाश होत आहे त्या तऱ्हेने तो होत राहिल्यास २०२५ पर्यंत ५ ते १० लाख जीवजाती विलुप्त होण्याच्या वाटेवर असतील आणि २०५० सालापर्यत २० लाख जीवजाती विलुप्त होतील, असा अंदाज आहे.

आर्थिक परिणाम : वापरात असलेल्या सर्व औषधांपैकी जवळजवळ १६ ते १७ टक्के औषधे उष्ण कटिबंधातील वनस्पतींपासून मिळवितात. या औषधांत वेदनाशामकांपासून ते प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थापर्यंतची आणि हृदयविकारांपासून ते आंत्रव्रणावरील उपचारांसाठीची औषधे येतात. कर्करोगावरील उपचारांत उपयुक्त ठरू शकणारी द्रव्ये असणाऱ्या वनस्पतींच्या कमीत कमी १,४०० जाती उष्ण कटिबंधात असाव्यात, असा अंदाज आहे. तथापि उष्ण कटिबंधातील केवळ दहा टक्केच वनस्पतिजातींचे घाईगर्दीने तर एक टक्क्याहून कमी वनस्पतिजातींचेच काळजीपूर्वक परीक्षण करण्यात आलेले आहे. याचा अर्थ यांपैकी पुष्कळ जातींचे वैद्यकीय मूल्यमापन होण्याआधीच त्या विलुप्त होतील, अशी भीती आहे. म्हणजे त्यांचा वैद्यकीय उपयोग होण्याची शक्याताच नाही.

उष्ण कटिबंधात ४,००० पेक्षा अधिक वनस्पतिजाती खाद्य फळे व भाजीपाला या दृष्टींनी उपयुक्त आहेत. मात्र यांपैकी पन्नासहून कमीच जातींचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करून घेण्यात येत आहे. ज्यांचे अनुसंधान कमी प्रमाणात झालेले आहे अशा वनस्पतिजातींपैकी पुष्कळ जाती अवर्षण व त्यासारख्या प्रतिकूल परिस्थितींत तग धरणाऱ्या आहेत आणि त्यांची पिके अधिक मोठ्या प्रमाणावर फायदेशीरपणे घेता येतील. लागवडीत असलेल्या वनस्पतिजाती टिकून राहण्यास साहाय्यभूत ठरण्याच्या दृष्टीने उष्ण कटिबंधातील वन्य वनस्पती अधिक महत्त्वाच्या आहेत. लागवडीत असलेल्या सर्वांत महत्त्वाच्या वनस्पतींपैकी (पिकांपैकी) पुष्कळ वनस्पतींशी आप्तभाव असलेल्या वन्य वनस्पती संकरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील. कारण या वनस्पतींपासून रोग, पीडक, अवर्षण व इतर प्रतिकूल परिस्थिती यांना विरोध करू शकणारी जनुके मिळू शकतात. उष्ण कटिबंधातील वन्य वाणांशी अंतराप्रजनन केल्याने भात व मका या जगातील सर्वांत महत्त्वाच्या धान्य पिकांच्या तसेच कोको, ऊस व केळी या पिकांच्या बाबतीतील अनर्थ टळले आहेत. यासंबंधात पुढील उदाहरण लक्षणीय आहे. १९७० च्या सुमारास दक्षिण अमेरिकेतील कॉफीच्या पिकावर नवीन प्रकारचा गेरवा (तांबेरा) रोग पडल्याने ते पिक धोक्यात आले होते. मात्र इथिओपियातील वन्य स्थितीतील गेरवारोधी वाण मिळवून या संकटावर मात करण्यात आली.

जलवायुमानीय परिणाम : दीर्घकालीन सरासरी हवामान म्हणजे जलवायुमान होय. उष्ण कटिबंधातील वने मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागी शोषल्या जाणाऱ्या सूर्याच्या प्रारणाचे प्रमाण कमी होऊ शकेल आणि परावर्तनाने अवकाशात परत जाणाऱ्या प्रारणाचे प्रमाण वाढू शकेल. शिवाय वनस्पतींची वाढ कमी होऊन हवेतील प्रदूषण वाढेल. या प्रदुषणामुळे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे प्रमाण व परिणामी पादपगृह परिणामाद्वारे उष्णता रोखून ठेवण्याचे प्रमाण वाढेल. यामुळे उत्तर अमेरिका, यूरोप इ. उपोष्ण कटिबंधीय प्रदेशांत पर्जन्यमान, पहिल्या हिमतुषाराची (हिमवृष्टीची) वेळ व हिवाळ्यातील तापमाने यांच्यात बदल होतील. शेतीच्या उत्पन्नाच्या दृष्चीने हे सर्व घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. उदा., पादपगृह परिणाम टिकून राहिल्यास कार्बन डाय-ऑक्साइडाच्या वाढत्या प्रमाणामुळे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील सध्याचे जलवायुमानीय पट्टे उत्तरेस सरकतील. यामुळे तापमानात २°फॅ. एवढी वाड होऊन बाष्पीभवनाचे प्रमाण वाढेल व ऑगस्टमध्ये येणारा पाऊस कमी होईल. यामुळे मक्याचे उत्पादन ११ टक्के तरी घटेल व गव्हाच्या उद्योगाला दरसाल किमान ५० कोटी डॉलरचा फटका बसेल, असा अंदाज करण्यात आला आहे.

विलुप्तीभवन रोखण्याचे उपाय : सर्वप्रथम जीवजाती नष्ट होण्याची गती मोठ्या प्रमाणावर कमी केली पाहिजे. जमिनीचा वापर करणारी अधिक कार्यक्षम व संतुलित तंत्रे वापरायला हवीत. त्यांमुळे खाद्य वनस्पती, प्राणिज पदार्थ व इमारती लाकूड यांच्याविषयीच्या सध्याच्या जवळजवळ सर्व गरजा विक्रीयोग्य लाकडाची वने, वननिर्मूलन केलेल्या जमिनी आणि लागवडीची नवीन पद्धती वापरून भागविता येतील. त्यासाठी वनांची अधिक तोड करण्याची गरज उरणार नाही. मृदांच्या पुननिर्मितीची मंद प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि परिपक्क स्वरूपातील वने परत वाढविण्यासाठी वनांची मोठ्या प्रमाणावर पुनःस्थापना करण्याची गरज आहे. उरलेल्या वन्य जीवजाती त्यांच्या मर्यादित अधिवासांत टिकून राहण्यासाठी ⇨राष्ट्रीय उद्याने व संरक्षित नैसर्गिक प्रदेश यांचे क्षेत्रफळ तीनपट किंवा चारपट केले पाहिजे. परिस्थितिवैज्ञानिक असंतुलन व ऱ्हास यांत मोठ्या प्रमाणात घट होण्यासाठी वने तोडून-जाळून करण्यात येणाऱ्या फिरत्या शेतीऐवजी स्थिर शेती करावी लागेल. स्थिर शेतीत कायमच्या लागवडीखालील अधिक लहान क्षेत्रातून अधिक (वाढीव) उत्पन्न मिळते.


 अशा प्रकारचे उपाय योजले नाहीत, तर आपल्याला या निष्क्रियतेची जबर किंमत मोजावी लागेल. जेव्हा नवीन जीवजाती उत्क्रांत होण्याच्या वेगापेक्षा जीवजाती विलुप्त होण्याचा वेग खूप जास्त असतो (सध्याची परिस्थिती अशी आहे), तेव्हा महाविलुप्तीभवनाचा एक टप्पा सुरू होतो, असे जीवाश्मांच्या नोंदीवरून दिसून आले आहे. भूतकाळात झालेल्या महाविलुप्तीभवनांच्या जीवाश्मरूप नोंदीवरून अनुमान करावयाचे झाल्यास सर्वाधिक उत्क्रांत झालेले जीव अथवा माणसाला स्राव जास्त उपयुक्त असलेल्या जीवजाती टिकून राहण्याची शक्यता नाही, तर तणे, झुरळे, कृतंक (कुरतडणारे प्राणी) यांच्यासारखे सर्वाधिक प्रसार झालेले परिस्थितिविज्ञानाच्या दृष्टीने सर्वसाधारण असे जीव टिकून राहण्याची शक्यता सर्वांत जास्त आहे.

ठाकूर, अ. ना.

पहा : क्रमविकास जीवाश्म ट्रायलोबाइट डायनोसॉर डोडो बलुचिथेरियम.

संदर्भ : 1. Albrition, C. C. Catastrophic Episodes in Earth History, London, 1989.

           2. Balovet, J. C. Extinct Species of the World: 40,000 Years of Conflict, New York, 1990.

           3. Day, D. The Doomsday Book of Animals, New York, 1981.

           4. Donovan, S. E., Ed., Mass Extinction: process and Evidence, London, 1989.

           5. Ehrlich, P. Ehrlich, A. Extinction, London, 1981.

          6. Elliot, D. K., Ed., Dynamics of Extinction, New York, 1986.

          7. Fouty, G, Tyckoson, D. A., EDs., Death of the Dinosaurs and other Mass Extinctions, Phoenix, Ariz., 1987.

          8. Glen, S., Ed., Mass Extinction Debates, Stanford, Calif., 1995.

          9. Koopowitz, H. Hilary, K. Plant Extinctions: A Global Crisis, London, 1990.

        10. Matthews, J. Lowe, D., Eds., Official World Wildlife Fund Guide to Endangered  Species, 2 Vols., 1989.

        11. Nitecki, M. H., Ed., Extinctions, New York, 1984.

        12. Novacek, M. J. Wheeler, Q., Eds., Extinction and Phylogeny, New York, 1992.

        13. Osterbook, D. E. Raven, P. H. Origins and Extinctions, 1988.

        14. Raup, D. M. The Nemesis Affair, 1986.

        15. Stanley, S. M. Extinction, New York, 1987.