ॲस्परजिलस : (गदाकवच). कवकांचा (बुरशीसारख्या  हरितद्रव्यरहित वनस्पतींचा, →कवक) एक वंश. याचा समावेश ‘फंजाय इंपरफेक्टाय’ या कवकवर्गात करतात. परंतु याची लैंगिक जनन पद्धती ज्ञात झाल्यामुळे याचे नामाभिकरण ‘यूरोशियम’, ‘सारटोरिया’ व ‘इमेरिसेला’ या वर्गांतील ॲस्कोमायसिटीज वर्गाच्या वंशातही करतात.

ॲस्परजिलसच्या वाढीतील निरनिराळे भाग, (१) तळाशी वाढणारे कवकजालातील तंतू, (२) बिजाणुदंड, (३) बीजाणुसूत्रे, (४) बीजाणू, (५) बिजाणुमालिका.

या वंशात कवकांच्या ७८ जाती १४ प्रकारांत विभागलेल्या आढळतात. सामान्यत: या जातींचे अस्तित्व हवेत आढळते. आर्द्रतायुक्त हवेत लाकूड, कापड इ. वस्तूंवर त्या अमर्यादपणे वाढतात. वाढ तंतुमय, सपट (विभाजक भित्ती असलेल्या), रंगविहीन अशा कवकजालात (कवकाच्या तंतुमय जालात) शाखायुक्त असून पोत दाणेदार असतो. कवकजालात टोकावर बीजाणुदंड (लाक्षणिक प्रजोत्पादन अवयवाचा दांडा) त्यावर बीजाणुसूत्रे (बीजाणूच्या पिशवीचा देठ) व त्यावरही बीजाणुमालिका फुटते व एकूण आकार पंख्यासारखा दिसतो, पक्व बीजाणूमुळेच कवकवाढीस रंग येतो. अलैंगिक जनन पद्धती अशी आढळते. लैंगिक जनन पद्धतीत क्लेस्टोथेशियम प्रकारचे बीजाणुफळ, त्यात‘ॲसाय’नावाच्या बीजाणुधारक पिशव्या व त्यातही ॲस्कोबीजाणू नावाचे अन्य बीजाणू निर्माण होतात. दोन्ही पद्धतींनुसार होणारे बीजाणू वाऱ्यामुळे फैलावतात व रूजल्यामुळे कवकाची वाढ होते. या वंशात अनेक उपद्रवी तशाच उपयुक्तही जाती आढळतात.

(अ)उपद्रवी जाती : (१)ॲस्परजिलस नायजर:काळी वाढ करते. भूईमूगाच्या मर रोगास कारणीभूत. (२) , निड्यूलन्स, ॲ. ग्‍लाउकस: सामान्यपणे आढळतात. (३)ॲ. फ्युमिगेटस: मानवाच्या व प्राण्यांच्या फुप्फुसातील ॲस्परजिलोसीस रोगास कारणीभूत [→ गदाकवकजन्य रोग].

(आ)उपयुक्त जाती: प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थनिर्मितीस : (१)ॲ. फ्युमिगेटस: ग्‍लिओटॉक्सिन व फ्युमिगॅसीन उत्पादक. (२) .ओरायझी कोजिक : अम्‍लोत्पादक. (३)ॲ. फ्‍लाक्स: पेनिसिलीन व ॲस्परजिलिक अम्‍लोत्पादक. (४)ॲ. ओक्रॅसीअस: पेनिसिलीन उत्पादक. (५)ॲ. क्लाव्हेटस, ॲटेरियस: क्लाव्हॅसीन उत्पादक. (६)ॲ. कँडिडस: सिट्रिनीन उत्पादक. (७)ॲ. उस्टस: उस्टिन उत्पादक [→ प्रतिजैव पदार्थ].

औद्योगिक निर्मितीस : (१)ॲ. ओरायझी: तांदळातील स्टार्चाचे शर्करेत रूपांतर करते. या शर्करेचा जपानामध्ये मद्य करण्यासाठी उपयोग करतात. (२)ॲ. नायजर: सायट्रिक अम्‍लोत्पादक. या उत्पादनक्रियेपासून ऑक्झॅलिक अम्‍लाचेही उत्पादन होते, डी–ग्लुकोनिक अम्‍लोत्पादन.

सूक्ष्मजैविक आमापनास: एखाद्या पदार्थाचा सूक्ष्मजीवांच्या वाढीवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करून त्यावरून त्या पदार्थाचे परिमाण काढण्याच्या पद्धतीत म्हणजे आमापनातॲ. नायजरचा उपयोग होतो.

पहा : औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र कवक प्रतिजैव पदार्थ.

संदर्भ:   1.Frobisher, M.Fundamentals of Microbiology,Tokyo,1961.

2.Salle, A. J.Fundamental Principles of Becteriology,New York,1961.

 मोघे, पू. गं.