लफ्लर,  फ्रीड्रिख आउगुस्ट योहानेस : (२४ जून १८५२-९ एप्रिल १९१५). जर्मन सूक्ष्मजंतुवैज्ञानिक. त्यांनी अनेक रोगांचे सूक्ष्मजंतू शोधून काढणयाचे महत्कार्य केले.

लफ्लर यांचा जन्म ओडर नदीवरील फ्रँकफुट येथे झाला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण वुर्टूसबर्ग विद्यापीठात व बर्लिन येथील फ्रीड्रिख व्हिल्हेल्म विद्यापीठात झाले. १८७०-७१ मध्ये त्यांनी फ्रेंच-जर्मन युद्धात सैन्यामध्ये रूग्णालयीन साहायक म्हणून काम केले. १८७४ मध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी केली. त्यानंतर त्यांनी बर्लिन योथील एका रूग्णालयात दीड वर्ष साहाय्यक वैद्य आणि मग १८७६-७९ काळात हॅनोव्हर व पॉट्‍सडॅम येथे लष्करी शस्त्रक्रियातज्ञ आणि  सार्वजनिक आरोग्य अधिकारी  या पदांवर कामे केली. १८७९-८४ मध्ये बर्लिन येथील सरकारी आरोग्य खात्यात वैद्यकीय साहाय्यक म्हणून त्यांची झालेली नेमणूक त्यांच्या आयुष्यात क्रांतिकारक ठरली. या काळात त्या वेळचे प्रख्यात सूक्ष्मजीववैज्ञानिक रॉबर्ट कॉख याच्यांबरोबर साहाय्यक म्हणून काम करण्याची लफ्लर यांना संधी मिळाली आणि त्यामुळे सूक्ष्मजंतूविज्ञानातील मूलभूत व उल्लेखनीय कार्य त्यांच्या हातून पार पडले. पुढे १८८६ मध्ये बर्लिन विद्यापीठात आणि नंतर १८८८ मध्ये ग्राइफ्सव्हाल्ट विद्यापीठात ते आरोग्य विषयाचे प्राध्यापक झाले व तेथेच १९०३-०७ मध्ये ते कुलमंत्री होते. १९१३ मध्ये बर्लिन येथील रॉबर्ट कॉख इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शस डिसिझेस या संस्थेचे ते संचालक झाले.

एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध सूक्ष्मजंतुविज्ञानाचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात निरनिराळ्या रोगांचे फारक सूक्ष्मजंतू शोधून काढण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळविले. यामध्ये लफ्लर यांची कामगीरी म्हणजे १८८२ मध्ये त्यांनी व्हिल्हेल्म शुत्झ यांच्याबरोबर घोड्यांचा ⇨ शेवा हा रोग ॲक्टिनोबॅसिलस मॅली (स्यूडोमोनस मॅली ) या सूक्ष्मजंतूमुळे होतो हे शोधून काढले. १८८४ मध्ये घटसर्पाच्या सूक्ष्मजंतूचे शुद्ध रूपातील संवर्धन करण्यात त्यांनी यश मिळविले. या सूक्ष्मजंतूचे ⇨एटव्हिन क्‍लेप्स या शास्त्रज्ञांनी प्रथम निरीक्षण व वर्णन केलेले होते म्हणून हा जंतू आता ‘क्लेप्स-लफ्लर सूक्ष्मजंतू’ या नावाने ओळखला जातो. ⇨प्येअर पॉल एमील रू व ए. ई. जे. येर्‌सँ यांच्या बरोबरच लफ्लर यांनी घटसर्पाच्या विषाचे अस्तित्व सूचित केले होते. काही प्राणी घटसर्पाला प्रतिकारक्षम असतात असे लफ्लर यांनी दाखविले व त्यामुळे एमिल फोन बेरींग यांना घटसर्प विषाविरुद्धचे प्रतिविष विकसित करण्यास मदत झाली. डुकरांमधील धावरे व प्लेग या रोगांचे सूक्ष्मजंतू लफ्लर यांनी १८८५ मध्ये शोधून काढले. १८९२ मध्ये उंदरामधील आंत्रज्वर ( टायफॉइड ज्वर ) साल्मोनेला टायफाय-म्युरियम या सूक्ष्मजंतूमुळे होतो असे त्यांनी दाखविले. पॉल फ्रॉश यांच्यासमवेत त्यांनी १८९७ मध्ये जनावरांतील लाळ रोगाचे ( पायलाग ) कारण व्हायरस हे असल्याचे दाखवून दिले. जनावरांतील रोगाचे कारण व्हायरस हे असल्याचे दाखवून दिल्याचे हे पहिलेच उदाहरण होते.

 

लफ्लर यांच्या कार्याचा विशेष म्हणजे घटसर्पाच्या सूक्ष्मजंतूच्या संवर्धनासाठी घनीकृत रक्तरसाचा त्यांनी प्रथमच वापर केला. त्या काळी जिलेटिनाच्या साहाय्याने घनीकृत केलेले संवर्धक वापरण्याची प्रथा होती. मात्र असे संवर्धक ३७° से. वर घनावस्थेत राहात नसल्याने या तापमानावर हे संवर्धक वापरून मानवी रोगांच्या सूक्ष्मजंतूंची वाढ करणे शक्य होत नसे. यावर मात करण्यासाठी लफ्लर यांनी रक्तरस गरम करून त्यापासून घन संवर्धक तयार केला व ३७° से. च्या वर घटसर्पाच्या सूक्ष्मजंतूची वाढ करणे साध्य केले. हा संवर्धक अद्यापही ‘लफ्लर संवर्धक’ या नावाने वापरात आहे. आरोग्यसंपन्न माणूसही रोगप्रसारास कारणीभूत ठरू शकतो, हे निरोगी बालकांच्या घशातील घटसर्पाच्या सूक्ष्मजंतूचे अस्तित्व दाखवून त्यांनी सिद्ध केले.

 

अनिष्ट प्राण्यांच्या प्रसारास आळा घालण्यासाठी जैव नियंत्रणाचा उपयोग करण्याचा पहिला प्रयत्न करण्याचे श्रेयही लफ्लर यांच्याकडे जाते. उंदरांमधील आंत्रज्वराच्या सूक्ष्मजंतूचा वापर करून शेतामधील धान्याचा नाश करणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्याचे काम ग्रीक सरकारने त्यांच्याकडे १८९२ मध्ये सोपविले. हे सूक्ष्मजंतू शेतातील इतर प्राण्यांच्या बाबतीत सांसर्गिक नाहीत, असे लफ्लर यांनी आपल्या प्रयोगशाळेतील अभ्यासाद्वारे दाखवून दिले होते. या सूक्ष्मजंतूंचा वापर करून उंदरांचा नाश करण्यात त्यांना यशही प्राप्त झाले परंतु हे सूक्ष्मजंतू मानवाला उपद्रवी असण्याची शक्यता जाणवल्याने हे कार्य पुढे थांबविण्यात आले.

सूक्ष्मजंतूविज्ञानातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्यांनी Central blatt fur Bacteriologie and Parasitenkundeहे नियतकालिक १८८७ मध्ये स्थापन केले व ते या क्षेत्रातील अतिशय प्रभावी नियतकालिक होते. सूक्ष्मजंतुविज्ञानाचा इतिहास लिहिण्यास त्यांनी १८८७ मध्ये सुरुवात  केली परंतु हे त्यांचे कार्य अपूर्ण राहिले. बर्लिन येथे ते मृत्यू पावले.

कुलकर्णी, नी. बा. गोडबोले, श्री. ह.