बायेरिंक, मार्टिन विल्यम : (१८५१-१९३१). डच वनस्पतिशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी मृदा सूक्ष्मजीवशास्त्रात महत्त्वाचे संशोधन केल. त्यांचा जन्म ॲम्स्टरडॅम येथे झाला व शिक्षण लायडन विद्यापीठात झाले भौतिकी व जीवविज्ञान या शास्त्रांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. १८७७ साली त्यांनी पीएच्.डी. पदवी मिळविली. डेल्फट येथील तंत्रविज्ञान शाळेत त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्राच्या संशोधनाची प्रयोगशाळा स्थापन केली व त्यांचे बहुतेक संशोधनकार्य या प्रयोगशाळेतच झाले.

लेग्युमिनोजी कुलातील (शिंबावंत कुलातील) वनस्पतींच्या मुळांवरील गाठींत आढळणाऱ्या –हायझोबीयम वंशातील सहजीवी सूक्ष्मजंतूंचे विलगन (अलग करणे) करून त्यांचे संवर्धन प्रथम त्यांनी केले. हा शोध मृदा सूक्ष्मजीवशास्त्रात महत्त्वाचा मानला जातो. या सूक्ष्मजंतूचा आकार शलाकेसारखा (काडीसारखा) [⟶ बॅसिलेसी] असला, तरी तो बदलून अनियमित आकरांतही आढळतो, हे त्यांनी दाखवून दिले.   

मृदेतील अमोनियाचे नायट्रीकरण सूक्ष्मजंतू करतात, हे त्यांनी एस्. एन्. विनोग्रॅडस्की व व्ही. ए. ओमेलिआन्स्की यांच्या सहकार्याने सिद्द केले. सूक्ष्मजंतूंचे अनेक प्रकार असून त्यांच्यामुळे घडणाऱ्याऱ्या रासायनिक विक्रिया विविध स्वरूपांच्या असतात. सूक्ष्मजंतूना लागणाऱ्या पोषकद्रव्यांतही विविधता असते म्हणून सूक्ष्मजंतूच्या विलगनासाठी विविध पोषकद्रव्यांपासून त्यांनी संवर्धके (वाढ होण्यास मदतकरणारी माध्यमे) बनविली व त्यांच्या साहाय्याने निरनिराळ्या मृदा सूक्ष्मजंतूंचे त्यांनी विलगन केले. 

इ. स. १८८५-८८ या काळातील व्हायरसासंबंधीचे त्यांचे संशोधन फार मोलाचे आहे. तंबाखूच्या पिकावरील ⇨केवडा रोगाचा रोगकारक पदार्थ चिनी मातीच्या गाळणीतून आरपार जाऊ शकतो, हा डी, इवँनोवस्की यांचा शोध त्यांनी पडताळून पाहिला (या गाळणीतून सूक्ष्मजंतू आरपार जाऊ शकत नाहीत) इवँनोवस्की यांनी जरी हा शोध लावला होता तरी त्यांचे महत्व त्यांना कळाले नव्हते असे दिसते व हा रोगसूक्ष्मजंतूमुळेच होतो असे मानण्याकडे त्यांचा कल होता. बायेरिंक यांना चिनी मातीच्या गाळणीतून गाळलेला केवडा रोगाच्या द्रवातून कोणत्याही सूक्ष्मजीवाचे संवर्धन करण्यात यश मिळाले नाही. रोगकार पदार्थाची तंबाखूच्या वनस्पतीत वाढ होते व तो आगरच्या थरातून आरपार जाऊ शकतो असे त्यांनी सिध्द केले व तो पदार्थ ‘संसर्गकारी सजीव द्रव‘ आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. या संसर्गसारी सजीव द्रवालाच त्यांनी व्हायरस असे नाव दिले. त्यांच्या सोधाची प्रचिती सु. ४० वर्षानंतर डब्लू. एम्. स्टॅन्ली या अमेरिकन शास्त्रज्ञांनी तंबाखूच्या केवडा रोगाच्या व्हायरसांचे १९३५ मध्ये विलगन केले तेव्हा आली.

मृदेतील ॲझोटोबॅक्टर वंशातील ऑक्सिजीवी (ज्यांना आपल्या जीवनक्रियेसाठी मुक्त ऑक्सिजन किंवा हवा आवश्यक असते असे) सूक्ष्मजंतू हवेतील नायट्रोजनाचे स्थिरीकरण करतात, असा शोध त्यांनी १९०१ मध्ये लावला. या शोधाबद्दल बायेरिंक यांना ॲम्स्टरडॅम ॲकॅडेमीने सुवर्णपदकाचा बहुमान दिला. त्यांनी ⇨पटकी (कॉलरा) या रोगास कारणीभूत असणारे सूक्ष्मजंतू (व्हिब्रिओ कॉलेरी) ओळखता येणारी विशिष्ट प्रतिक्रिया शोधून काढली व तिला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे. तथापि ही प्रतिक्रिया ‘रोग-विशिष्ट’ नसून फक्त स्वल्पविरामाकार सूक्ष्मजंतु-गटाचे अस्तित्व दर्शविते. ते १९२१ मध्ये सेवानिवृत्त झाले. ते १९३१ मध्ये मृत्यू पावले.

पहा : व्हायरस.

भिडे, वि. प.