दूतकाव्ये : अभिजात संस्कृत वाङ्‌मयातील एक लोकप्रिय खंडकाव्यात्मक, पद्यमय काव्यप्रकार. दूतकाव्यांची संख्या संस्कृतात पन्नासांहून अधिक असून त्यांची रचना अठराव्या शतकापर्यंत होत होती. विरहाकुल प्रियकराने प्रियतमेकडे किंवा तिने त्याच्याकडे कोणातरी व्यक्तीकरवी वा वस्तूकरवी पाठविलेला संदेश अशा काव्यांत सामान्यतः ग्रथित केलेला असतो. कालिदासकृत ⇨ मेघदूतही अशा काव्यांची जननी आहे. मेघदूताच्या अद्वितीय यशाने प्रभावित होऊन अनेक कवींनी अशा प्रकारची काव्ये रचिली आणि त्यांतील बहुसंख्य काव्यांचे प्रतिमानमेघदूत  हेच राहिले परंतु स्वत: कालिदासाला मेघदूताची कल्पना वाल्मीकिरामायणातील एका प्रसंगावरून सुचलेली असावी. वनवासात विरहावस्थेत असताना रामाने हनुमंताहाती सीतेला संदेश आणि आपली खुणेची मुद्रिका पाठविली, तो हा प्रसंग. तथापि असा संदेश पाठविल्याचे प्रसंग प्राचीन वाङ्‌मयात अन्यत्रही आढळतात. दमयंतीने नलाकडे पाठविलेला हंस, हे महाभारताच्या नलोपाख्यानातील असेच एक प्रसिद्ध उदाहरण आहे. हाल सातवाहनाच्या गाहासत्तसईत प्रणयदूतकर्माचे अनेक प्रसंग आढळतात. तत्पूर्वी ऋगवेदातही (५·६१·१७) श्यावाश्वाने रात्रिदेवीला दूती म्हणून आपल्या प्रेयसीकडे–रथवीतीच्या कन्येकडे–पाठविल्याचा निर्देश आहे. काही राजकीय कामगिरीसाठी स्वतः कालिदासाला घरापासून दूर रहावे लागले आणि त्या प्रत्यक्ष भोगलेल्या विरहानुभवातून मेघदूताची कल्पना त्याला स्फुरली असावी, असाही एक तर्क आहे परंतु त्याला आधार नाही.

मेघदूतानंतर निर्माण झालेल्या काही दूतकाव्यांमध्ये मेघदूताचे हळुवार भावविश्व आणि निसर्गाची रम्य, भावोद्दीपक, वैविध्यपूर्ण साद आढळत नाही विरह–शृंगाराचे प्रयोजनही त्यांत बदललेले दिसते. मेघदूताला जे हृदयाला भिडणारे भावगेय रूप आहे ते पुढील अनुकरणांत राहिलेले नाही. नायक, नायिका, दूत, विप्रलंभशृंगार, मंदाक्रांतावृत्त ही जरी दूतकाव्यांची सर्वसाधारण वैशिष्ट्ये ठरलेली असली, तरी काही जैन लेखकांनी अन्य देशी असलेल्या आपल्या आचार्याला अध्ययनाची प्रगती कळविण्यासाठी दूतकाव्यांचा उपयोग केलेला आहे. काही जैन दूतकाव्यांमध्ये समस्यापूरणाचेही वैशिष्ट्य आढळते. वैष्णवसंप्रदायी लेखंकामध्ये राम–सीता, राधा–कृष्ण या पौराणिक व्यक्ती व तद्विविषयक भक्ती विशेषत्वाने दिसतात. जैन व वैष्णव लेखकांच्या बाबतींत विचार, धर्मप्रतिपादन, मार्गावरील तीर्थस्थलांचे वर्णन हेही दूतकाव्यांचे प्रयोजन झालेले आहे.

दूतकव्ये प्रदीर्घ नाहीत आणि काही दूतकाव्ये तर पुष्कळच छोटी आहेत. कोणत्याही उपलब्ध दूतकाव्याची पद्यसंख्या १५० हून अधिक नाही. मंदाक्रांता या बहुमान्य झालेल्या वृत्ताव्यतिरिक्त शिखरिणी, वसंततिलका, मालिनी, शार्दूलविक्रिडित याही वृत्तांत दूतकाव्ये आहेत. दूत म्हणून वायू, चंद्र, चरणमुद्रा, तुलसी, पोपट, कोकिल, भृंग, हंस, मयूर, चकोर, चातक, चक्रवाक, उद्धव, हनुमान, मन, भक्ती यांसारख्या अनेकविध सचेतन–अचेतन वस्तू, पशु–पक्षी, वनस्पती, पौराणिक व्यक्ती, अमूर्त विषय यांचीही योजना केलेली दिसते. काही उल्लेखनीय दूतकाव्ये अशी :

घटकर्परकाव्य–कवी घटकर्पर, काही पंडितांच्या मते कालिदास पूर्वकालीन निदान कालिदासाचा समकालीन तरी. विषय–विरही प्रेयसीचा प्रियकराकडे संदेश. आपली विरहव्यथा ह्या विरहिणीने मेघाला सांगितली आहे.

पवनदूत –लेखक धोयी, बारावे शतक. जयदेवाचा समकालीन. १०४ पद्ये. धोयी हा बंगालच्या लक्ष्मणसेन राजाचा आश्रित. लक्ष्मणसेन हा या काव्याचा नायक असून तो दक्षिण दिग्विजयाला निघाला असता, त्याची प्रेयसी झालेली गंधर्वकन्या कुवलयवती आग्नेयमारुताला त्याच्याकडे दूत म्हणून पाठविते.


ह्याच नावाने आणखी एक दूतकाव्ये वादिचंद्र सूरी (सतरावे शतक) ह्याने लिहिले. त्यात १०१ पद्ये आहेत. उज्जयिनीचा राजा विद्यानरेश आपली भार्या तारा हिच्याकडे पवनाला दूत म्हणून पाठवितो, असे ह्यात दाखविले आहे.

हंसदूत–लेखक बंगालच्या वैष्णवसंप्रदायची चैतन्याचा शिष्य, रूपगोस्वामी. पंधरावे शतक. वृत्त शिखरिणी. यात वृंदावनाच्या राधेने मथुरेला कृष्णाकडे हंसाला दूत म्हणून पाठविलेले आहे.

इंदुदूत–लेखक विनयविजयगणी. सतराव्या शतकाचा शेवट. १३१ पद्ये. यात या जैन लेखकाने जोधपुराहून सुरतेला राहणाऱ्या आपल्या आचार्यांकडे चंद्राला विज्ञप्तिपत्र देऊन दूत म्हणून पाठविले आहे. या काव्यात मार्गावरची जैन देवालये आणि तीर्थस्थलेही वर्णिलेली आहेत. असे अनेक चंद्रदूत उपलब्ध आहेत.

अन्य उल्लेखनीय दूतकाव्यांत शार्दूलविक्रिडितातील ३१ पद्ये असलेले पिकदूत  नावाचे एक काव्य आहे. त्यात गोपींनी कृष्णाकडे कोकिळाला दूत म्हणून पाठविले आहे. पदांकदूतात (१७२३) गोपींनी कृष्णाच्या पदचिन्हांना मथुरेला कृष्णाकडे संदेश घेऊन जावयास सांगितले आहे. चेतोदूत  हे एका अज्ञान जैन कवीचे काव्य. त्यात आचार्यांकडे दूत म्हणून मनाची पाठवणी केलेली आहे. ह्यांशिवाय तुलसीदूत  (गोपींचा कृष्णाला तुलसीकरवी संदेश), कपिदूत  (हनुमान हा दूत), हृदयदूत, भ्रमरदूत  अशीही काव्ये रचिली गेली आहेत. काकदूत नावाची एक उपहासिकाही उल्लेखनीय आहे. तीत एका भ्रष्ट ब्राह्मणाने बंदिवासातून कादंबरी (मद्य) या आपल्या प्रेससीकडे एका कावळ्याला दूत म्हणून पाठविले आहे.

मंगरूळकर, अरविंद