सिद्घांत कौमुदी : संस्कृत वैयाकरणी ⇨ भट्टोजी दीक्षित  (सतरावे शतक) ह्यांनी ⇨ पाणिनीच्या (इ. स. पू. सु. पाचवे वा चवथे शतक) व्याकरणसूत्रांवर लिहिलेला ग्रंथ. ही व्याकरणसूत्रे बीजगणितातील सूत्रांप्रमाणेच तांत्रिक परिभाषेत लिहिली गेलेली आहेत. आपल्या सूत्रांचा नीट उलगडा होण्यासाठी पाणिनीने संज्ञासूत्रे आणि परिभाषासूत्रे दिलेली आहेत तथापि पाणिनीच्या काळातील संस्कृत भाषेचे स्वरुप ब्राह्मणग्रंथ, उपनिषदे आणि सूत्रे ह्यांच्याशी जास्त जुळते होते. पाणिनीच्या काळातील भाषा पुढे बदलल्यामुळे त्याची व्याकरणसूत्रे समजण्यास अवघड झाली. ती आकलनास सुलभ व्हावी म्हणून जे प्रयत्न झाले, त्यांतील एक म्हणजे भट्टोजी दीक्षितांची सिद्घांतकौमुदी. सुमारे १६२५ मध्ये रचिलेल्या ह्या ग्रंथात भट्टोजींनी पाणिनीच्या व्याकरणसूत्रांची विषयवार मांडणी केलेली असून त्यांच्यावर संक्षिप्त पण स्पष्ट असे विवेचनही केले आहे. ही पद्घत सूत्रे समजून घेण्याच्या दृष्टीने सोयीची आहे. आपल्या विवेचनात आवश्यक तेथे उदाहरणे देतानाही त्यांनी ती त्यांच्या काळातील अभ्यासकांना जवळची वाटतील अशी योजिली आहेत. व्याकरणाच्या अभ्यासात प्रवेश करु इच्छिणाऱ्यांसाठी हा ग्रंथ अतिशय उपयुक्त असून अनेक पाठशालांमधून त्याचे अध्ययन केले जाते. ह्या ग्रंथावर अनेक भाष्यग्रंथ झाले आहेत. स्वतः भट्टोजींनी ह्या ग्रंथावर प्रौढमनोरमा   ही टीका लिहिली. सिद्घांतकौमुदी चे संक्षिप्तीकरण वरदराज ह्या ग्रंथकाराने मध्य सिद्घांतककौमुदी  आणि लघु सिद्घांतकौमुदी (लघुकौमुदी   ह्या नावाने अधिक प्रसिद्घ) ह्या दोन ग्रंथांच्या रुपाने केलेले आहे. ज्ञानेंद्र सरस्वतींची तत्त्वबोधिनी  आणि वासुदेव दीक्षितांची बालमनोरमा  ह्या सिद्घांतकौमुदीवरील विशेष प्रसिद्घ अशा टीका होत.

कुलकर्णी, अ. र.