बाणभट्ट : (इ.स.सातवे शतक). अभिजात संस्कृत वाङ्मयपरंपरेतील एक श्रेष्ठ गद्यकाव्यलेखक. कान्यकुब्ज (आधुनिक कनौज) आणि स्थाण्वीश्वर (आधुनिक ठाणेश्वर) यांचा शेवटचा महान हिंदू सम्राट हर्षवर्धन (कार. ६॰६ –सु. ६४७) याचा बाणभट्ट हा आश्रित. आपल्या हर्षचारितात तसेच कादम्बरीच्या प्रास्ताविक श्लोकांत त्याने स्वत:ची आणि स्वत:च्या कुलाची जी माहिती दिलेली ओ, तीवरून पाहता, तो वात्स्यायनगोत्री ब्राह्मण होता. पुढे अनेक गुप्तराजांनी ज्याचा मोठा गौरव केला, असा कुबेर नावाचा एक पुरुष या वात्स्यायनकुलात जन्मला. कुबेराचा कनिष्ठ मुलगा पाशुपत. पाशुपताचा मुलगा अर्थपती आणि त्याचा मुलगा चित्रभानू. हा बाणाचा पिता. बाणची आई राजदेवी. शोणनदीकाठच्या प्रीतिकूट-ग्रामी ते राहत. बाणच्या बाळपणीच त्याची आई राजदेवी मृत्यू पावली व बाण उणापुरा चौदा वर्षांचा असताना चित्रभानूही दिवंगत झाला. पोरक्या बाणाचे येथवरचे चरित्र कादम्बरीतील वैशंपायन या पोपटाच्या आत्मचरित्रात प्रतिबिंबित झालेले आहे. त्यानंतर उनाडांच्या संगतीला लागून बाणाने पुष्कळ प्रवास केला आणि बराच अनुभवही मिळवला. या प्रवासातल्या आपल्या मित्रपरिवाराची एक भलीमोठी वेधक नामावली बाणाने हर्षचरितात दिलेली आहे. तीत कवी, विद्वान, गीतरचनाकार, प्राकृतरचनाकार, विष उतरविणारे, पानदान वाहणारे, वैद्य, प्रवचनकार, कलाकार, सोनार, खर्डेनवीस, चित्रकार, मातकाम करणारे, मृदंगवादक, सन्देशहारिका, गवई, संगीताध्यापक, मालिश करणाऱ्या, नर्तक-नर्तकी, द्यूतकार, धूर्त, भिक्षुणी, कथाकथक, शैव, मांत्रिक, धातुज्ञ, संन्याशी इ. विविध प्रकारचे लोक होते. प्रवासयात्रेत ठिकठिकाणी लाभलेली ही संगत अपूर्वच म्हटली पाहिजे. त्यानंतर हर्षवर्धनाचे मन बाणाबद्दल लोकांनी कलुषित केल्यामुळे त्याने बाणाला त्याच्या स्वैर, छंदीफंदी वर्तनाचा जाब विचारण्यासाठी अजिरावती तीरी असलेल्या मणितारा गावच्या आपल्या शिबिरात बोलाविले. हर्षाने बाणाचे प्रथम काहीसे दुराव्यानेच स्वागत केले पण नंतर मनोमालिन्य दूर झाल्यावर त्याचा गौरव करून त्याला भेटी दिल्या. आपल्यावरील अनेक आपत्तींचा निर्देश करूनही बाणाने आपल्या गरिबीचा किंवा द्रव्यसंकटांचा कोठेही उल्लेख केलेला नाही. त्यावरून तचे आयुष्य सर्वसाधारणपणे सुखात आणि वैभवात गेले असावे. त्याच्या वाडवडिलांकडून त्याला बरीच संपत्ती प्राप्त झाली होती, असे दिसते. आपल्या आश्रयदात्याविषयी बाणाला विलक्षण आदर आणि अभिमान होता, हे त्याने लिहिलेल्या हर्षाच्या चरित्रावरून स्पष्ट दिसते. हर्षचरित अपूर्णच राहिले आहे पण ते पूर्ण करण्याचा बाणाचा उद्देशही नसावा. कारण हर्षाचे संपूर्ण गुणगान करणे हे आपल्या आटोक्याबाहेर असल्याचे त्याने स्पष्ट म्हटले आहे. हर्षचरित आणि कादम्बरी यांत आलेल्या निर्देशांवरून बाणभट्टाची उत्तम माहितगारी आणि गाढ विद्वत्ता सहज कळून येते. व्यास, सुबंधू , भट्टार, हरिचंद्र, प्रवरसेन, भास, कालिदास, गुणाढ्य, सातवाहन, आद्यराज अशा कितीतरी कवींचा त्याने त्यांच्या वैशिष्ट्यांसह गौरवोल्लेख केलेला आहे. तसेच, उत्तरकालीन अनेक कवींनी बाणाचा अतिशय आदराने उल्लेख केलेला आहे. त्याच्या अभिजात साहित्यनिर्मितीचे सामर्थ्य हर्षचरित आणि कादम्बरी या ललितकृतींवरून अगदी निर्विवाद दिसते. यांव्यतिरिक्त त्याने चण्डीशतक (स्त्रग्धरावृत्तातील पद्यांचे स्तोत्र) आणि मुकुटताडितक (भीम-दुर्योधन गदायुद्धावरील अनुपलब्ध नाटक) या कृती रचिलेल्या आहेत. मुकुटताडितकाचा उल्लेख भोजाने आपल्या शृंगारप्रकाशात तसेच चंडपालाने नलचंपूवरील आपल्या टीकेत बाणाची कृती म्हणून केला आहे. त्याच्या नावावर मोडणारे पार्वती-परिणय हे पाचअंकी नाटक वस्तुत: वामानभट्ट बाणाचे (चौदावे-पंधरावे शतक) आहे. हर्षवर्धनाच्या राजसभेतील सूर्यशतककर्ता मयूरकवी हा बाणाचा सासरा किंवा मेहुणा असावा. कादम्बरीकथा ही बाणभट्टाच्या हातून पूर्ण होऊ शकली नाही. त्याचा मुलगा भूषणभट्ट [किंवा-पुलिंद (न)(न्ध्र) भट्ट] याने ती उत्तम रीतीने पूर्ण करून पित्याचे पांग फेडले.

बाणभट्टाचे गद्यग्रंथ त्यातील सांस्कृतिक दर्शनाच्या तपशीलांमुळे आणि त्याच्या समृद्ध शैलीमुळे नावाजण्यासारखे आहेत. सुबंधूपासून अलंकृत गद्यलेखनाची जी विशेष शैली संस्कृत साहित्यात दिसते, तिचे अत्यंत वैभवशाली रूप, गुणदोषांसह, बाणाच्या गद्यकाव्यांत प्रकटले आहे. समासबहुल रचनेची, श्लेष-विरोधांनी नटलेली, वर्णनाच्या वैभवात कथाविषय हरवून बसणारी ही शैली आहे. मात्र बाण एकसुरीपणाने लिहीत नाही. विशेषणांच्या वाक्यखंडांनी तोललेले, तीन पृष्ठांचे एकच वाक्य जसे तो लिहितो, तसेच दोन-तीन शब्दांची सुधोबसरळ वाक्येही तो लिहू शकतो. परंतु एकंदरीत बाणाची शैली राजघराण्यातल्या स्त्रीसारखी आहे : कुलीन, वैभवसंपन्न, नेहमी परिवाराने वेढलेली, डौलदार, मंद पावले टाकीत चालणारी अशी ही शैली एखाद्याला रुचली नाही, तरी तिचा गर्भश्रीमंती डौल मान्य करावाच लागतो.

संदर्भ : 1. Kane, P.V. Ed. The Harshacharita, 1918.

            2. Dasgupta, S.N. De, S.K.A. History of Sanskrit Literature, Classical Period, Calcutta, 1962.

मंगरूळकर, अरविंद.