चिरचुंबकी जनित्र : (मॅग्नेटो). यांत्रिक शक्तीचा उपयोग करून प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशेने वाहणारा) विद्युत् प्रवाह उत्पन्न करणाऱ्या यंत्राचा म्हणजे जनित्राचा एक विशेष प्रकार. यामध्ये चुंबकीय क्षेत्र मिळविण्यासाठी चिरचुंबकाचा (ज्याची चुंबकीय शक्ती पुष्कळ वर्षे जशीच्या तशी कायम राहते अशा चुंबकाचा) उपयोग करतात. या जनित्रातील आर्मेचर (फिरणारा भाग) लोखंडी पत्र्याच्या तुकड्यांचे केलेले असते व ते फिरत असताना त्यावरील विद्युत् दाब उत्पन्न होणाऱ्या जाड तारेच्या व थोडे वेढे असलेल्या प्राथमिक गुंडाळीमध्ये नीच दाबाच्या विद्युत् प्रवाह सुरू होतो. आर्मेचराच्या एका फेऱ्यात प्रवाह विद्युत‌् मंडल खंडकाच्या (मंडल तात्पुरते खंडित करणाऱ्या साधनाच्या) साह्याय्याने एकदा किंवा दोनदा  एकदम थांबविला जातो. त्यामुळे प्राथमिक गुंडाळीभोवती असलेल्या बारीक तारेच्या व पुष्कळ वेढे असलेल्या द्वितीयक गुंडाळीमध्ये  सु. १०,००० व्होल्टांपर्यंतचा उच्च विद्युत् दाब उत्पन्न होतो. या कामात विशेष मदत करण्यासाठी एक विद्युत् धारित्र (विद्युत् भार साठवून ठेवण्याचे साधन) बसविलेले असते. तसेच निर्माण झालेल्या उच्च विद्युत्‌ दाबाचे योग्य ठिकाणी वितरण करणारी प्रयुक्तीही (वितरक) जनित्राला जोडलेली असते.

अशा उच्च विद्युत् दाबाचा उपयोग अंतर्ज्वलन (ज्यातील सिलिंडरात इंधनाचे ज्वलन होऊन कार्यकारी द्रव्याला उष्णता प्राप्त होते अशा) जातीच्या इंजिनात इंधन पेटविण्यासाठी ठिणग्या उडविण्याकरिता होतो. चिरचुंबकी जनित्राचा उपयोग ट्रॅक्टरमधील एंजिन, छोट्या नावांतील एंजिन, विमानातील एंजिन व इतर बऱ्याच औद्योगिक (पण फक्त पेट्रोल वा केरोसीन) एंजिनांत ठिणगी पाडून इंधनाचे प्रज्वलन करण्यासाठी करण्यात येतो. बस व ट्रक यांसारख्या मोठ्या मोटारगाड्यांत त्याचा पुष्कळ प्रमाणात उपयोग करण्यात येतो. अर्थात डीझेल एंजिन असल्यास इंधनात ठिणगी पाडण्याची जरूरी नसते व म्हणून हे जनित्रही लागत नाही. या जनित्राची किंमत बरीच असल्याने साध्या मोटारगाडीत ते आता वापरीत नाहीत. साध्या मोटारगाडीत एंजिन सुरू करण्यासाठी दिवे लावण्यासाठी आणि इतर साहित्यासाठी एक विद्युत् घटमाला व तिला विद्युत् भार पुरवण्यासाठी एकदिश (एकाच दिशेने वाहणारा) विद्युत् प्रवाह उत्पन्न करणारे एक लहानसे विद्युत् जनित्र बसवावे लागते. त्यामुळे एंजिनात ठिणग्या पाडण्यासाठी मोठ्या किंमतीचे स्वतंत्र चिरचुंबकी जनित्र बसविण्याऐवजी घटमालेला जोडून मंडल खंडकासह एक प्रवर्तन वेटोळे (कमी दाबाच्या प्रवाहापासून उच्च दाबाचा प्रवाह निर्माण करणारे साधन) व त्यापासून  मिळणाऱ्या उच्च दाबाच्या प्रवाहाचे एंजिनातील निरनिराळ्या सिलिंडरांतील ठिणगी गुडद्यांना (ठिणगी पाडणाऱ्या साधनांना, प्लगांना) योग्य अनुक्रमाने वितरण करणारा वितरक या गोष्टी वापरल्या जातात.

चार सिलिंडरांच्या एंजिनांकरिता वापरीत असलेले चिरचुंबकी जनित्र आणि त्याचे विद्युत् मंडल आकृतीत दाखविले आहे.

चार सिलिंडरांच्या एंजिनातील चिरचुंबकी जनित्राची ठिणगी प्रज्वलन पद्धती : (१) चिरचुंबक, (२) आर्मेचर, (३) प्राथमिक गुंडाळी, (४) द्वितीयक गुंडाळी, (५) विद्युत् धारित्र, (६) विद्युत् मंडल खंडक, (७) वितरक, (८) ठिणगी गुडद्या.

वाहनांच्या एंजिनांशिवाय स्थायी एंजिनांसाठीही चिरचुंबकी जनित्र वापरतात. तसेच सुरुंग उडविण्यासाठी तेलाच्या वा वायूच्या ज्वालकात (बर्नरमध्ये) आणि निऑन दिव्यासोबत  ⇨ आवृत्तिदर्शक  उपकरणात या जनित्राचा उपयोग करतात.

चिरचुंबकी जनित्राचे बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये (१) स्थिर चुंबक व फिरणारे आर्मेचर असलेला, (२) स्थिर आर्मेचर व फिरणारा चुंबक असलेला व (३) चुंबक व आर्मेचर हे दोन्ही भाग स्थिर असून चुंबकीय क्षेत्रात बदल करणारा फिरता तिसरा पोलादी भाग असलेला, असे मुख्य प्रकार आहेत.

पूर्वी चुंबक बनविण्यासाठी टंगस्टन, क्रोमियम व कोबाल्ट मिसळलेले पोलाद वापरीत असत. या पोलादाची चुंबकीय शक्ती अगदी मर्यादित असल्यामुळे चुंबकाचे आकारमान मोठे ठेवावे लागत असे. आता चुंबक बनविण्याकरिता ॲलनिको, निफल, ॲल्कोमॅक्स, कोलुमॅक्स इ. चुंबकीय मिश्रधातूंचा शोध लागून त्या वापरण्यात येऊ लागल्यापासून चुंबकाची शक्ती वाढविणे व त्याचे आकारमान कमी करता येणे शक्य झाले आहे. आर्मेचर व चुंबक हे दोन्ही भाग स्थिर ठेवून नरम पोलादाचा फिरणारा तिसरा भाग वापरण्याची  पद्धत आता विशेष प्रचलित आहे. त्यामुळे उच्च दाबाच्या गुंडाळीला विद्युत् प्रवाह झिरपून जाण्यास विरोध करणारे उच्च प्रतीचे वेष्टन घालता येते व एकंदर जनित्राचे आकारमानही लहान करता येते.

पहा : विद्युत् जनित्र.

संदर्भ : Judge, A. W. The Modern Motor Engineer, 4 Vols., London, 1961.

ओक, वा. रा.